मर्डर वेपन
प्रकरण १
“आपल्या ऑफिसात एक विचित्र अशी स्त्री तुमची वाट बघत बसल्ये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ तिचं म्हणणं आहे की तिला धोका आहे आणि तुमचं संरक्षण हवाय तिला.जोडीने तुमचा सल्ला आणि तुमच्या विश्वासातल्या एखाद्या चांगल्या गुप्तहेराची मदत.”
“ कोण आहे ती? आणि कुठे आहे अत्ता?” पाणिनीनं विचारलं
“ तिचं नाव आहे रती रायबागी, पण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे.” –सौंम्या
पाणिनीने आश्चर्याने भुवया उंचावल्या.
“ मी साडेबाराला जेवायला बाहेर गेले, जातांना आपल्या रिसेप्शनिस्ट गती ला सांगून गेले होते.मी बाहेर पडले आणि पाच दहा मिनिटात ही बया आली म्हणे.खूप चिडून आली होती.गतीला म्हणाली कि कोणत्याही स्थितीत तिला पाणिनी पटवर्धनना भेटायचंच आहे. गतीने तिला सांगितलं की आधी अपॉइंटमेंट घेतल्या शिवाय तुम्ही कोणालाही भेटत नाही.अडीच वाजल्याशिवाय तुम्ही येणार नाही आणि आल्यावर तुम्हाला एक वेगळी अपॉइंटमेंट आहे. त्यावर ती एकदम भडकून म्हणाली की जगाच्या अंतापर्यंत ती थांबेल पण भेट झाल्याशिवाय जाणारच नाही. पाणिनी पटवर्धन यांनी मला मदत केलीच पाहिजे.”
“ बरं मग?”
“ त्यानंतर आपली गती पुस्तक वाचत बसली.रती थोडा वेळ थांबली,नंतर उठून म्हणाली की मी आलेच आणि जी बाहेर पडली ती पुन्हा आलीच नाही.” सौंम्या म्हणाली.
“ ती येईल पुन्हा कोणत्याही क्षणी.” पाणिनी म्हणाला. “ ती कशी आहे दिसायला?”
“ गती म्हणाली कि ती साधारण तीस ते पस्तीस वयाची असावी.दिसायला चांगली आहे, आवाज गोड आहे, तिने मोठ्या फ्रेम चा गॉगल घातला होता, गतीचं म्हणणं आहे की ती खूप रडली असावी.रडत असावी आणि ते दिसू नये म्हणून तिने तसा गॉगल घातला असावा. ”
“ठीक आहे आपण तो पर्यंत आपली दैनंदिन पत्र व्यवहाराची काम उरकून घेऊ.” पाणिनी म्हणाला.
पुढचा अर्धा तास सौंम्या आणि पाणिनी त्याच कामात व्यग्र राहिले. त्यानंतर सौंम्या बाहेर गेली.आत येतांना तिच्या हातात एक हँडबॅग होती.पाणिनी ने खुणेनेच हे काय म्हणून सौंम्याला विचारलं.
“ आपली रती ज्या खुर्चीत बसली होती तिथे ही हँडबॅग होती.”
“ हे विचित्रच वाटतंय जरा.आधी माझ्या भेटीसाठी हट्ट करणारी ही बया अचानक निघून जाते काय, परत येतच नाही काय, तिच्या खुर्चीत ही हँडबॅग सापडते काय,” पाणिनी म्हणाला.
“ तुम्हाला काय वाटतंय आपण ही हँडबॅग उघडणे योग्य होईल? खूप जड आहे ही. कदाचित सोन्याच्या नाण्यांनी भरलेली असू शकते.” डोळे मिचकावत सौंम्या म्हणाली.
पाणिनीने बॅगेचं नीट निरीक्षण केलं. “ मला वाटतंय की मी उघडून बघतो आत काही नाव,पत्ता मिळतोय का ”
पाणिनीने बॅग उघडली आणि आत हात घालायला गेला तेवढ्यात झटका बसल्यासारखा हात बाहेर काढला.
“ काय झालं सर? ” सौंम्याने घाबरून विचारलं.
आपल्या खिशातून पाणिनीने रुमाल बाहेर काढला. आणि हाताला गुंडाळून हात आत घातला.त्याच्या हातात पॉइंट अडतीस व्यासाच पिस्तूल होतं.
“ बापरे ! ” सौंम्या किंचाळली.
पाणिनीने ते उघडून नीट तपासलं.त्याचा वास घेतला.
“ चार काडतुसे भरलेली आहेत.दोन उडवली आहेत.अगदी नुकतीच. ” पाणिनी म्हणाला. “ आपण आता आणखी काय आढळते आहे ते पाहू.” पाणिनी म्हणाला. “ हे पाहिलंस का कार्ड ठेवण्याची केस आहे.यात लायसेन्स, आधार वगैरे असेल.”
पाणिनीने कार्डावरचा पत्ता वाचला. रती रायबागी, ७२१ नैॠत्य
प्रथमेश मार्ग, विलासपूर, केरशी...... आणखी एक दिसतोय,क्रेडीट कार्डवर, सौ..पद्मराग रायबागी,
अरेच्चा, आणखी एक पत्ता दिसतोय, ड्रायव्हिंग लायसेन्स वर, रती कण्व रायबागी, ६९२ प्रतिष्ठित सोसायटी, चैत्रापूर. या शिवाय नाण्यांची पर्स ही आहे.नाण्यांनी भरलेली.”
“ आपण अशा प्रकारची तपासणी करणे योग्य वाटतंय न तुम्हाला?” –सौंम्या
“ही बंदूक एखाद्या गुन्ह्यात वापरली गेली असल्याची दाट शक्यता आहे आणि अशा प्रकारे ही हँडबॅग इथे आपल्या ऑफिसमध्ये सोडून जाणं म्हणजे मला तिच्या प्रकरणात अडकवण्याचा एक डाव असू शकतो माझ्या इच्छेविरुद्ध. एखाद्या बाईने अशाप्रकारे आपल्या ऑफिसमध्ये येणं आणि आपली हँडबॅग इथे सोडून जाणं ही सहज घडणारी घटना नाही त्याच्यामागे मोठा प्लॅन असू शकतो आता हे कुणी केलंय हे मला जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे.”
त्या हॅन्ड बॅग मध्ये शंभर आणि पाचशेच्याही बऱ्याच नोटा होत्या जवळ जवळ पन्नास हजार रुपयांच्या.
“मला वाटतं या बाईने आपल्या वकील फीच्या पैशाची सोय केलेली असावी.” पाणिनी म्हणाला.
“असे भूतकाळात का बोलता आहात?” सौंम्या ने विचारलं
"याचं कारण असं आहे सौम्या की मला वाटत नाही आपण तिला पुन्हा भेटू आपल्याला मान्य करायलाच पाहिजे एवढी मोठी रक्कम पर्समध्ये ठेवून जेव्हा एखादी मुलगी बाहेर पडते आणि त्याबद्दल सगळंच विसरून जाते तेव्हा त्याचा अर्थ एकच होतो की तिनं तिची स्मृती हरवली आहे अगदी तिनं तिचं रिवाल्वर कशासाठी वापरलं होतं हे सुद्धा ती विसरली असायची शक्यता आहे" पाणिनी म्हणाला.
"हे बघ आणखीन काय काय आहे कॉम्पॅक्ट आहे लिपस्टिक आहे किल्ल्यांचा जुडगा आहे पण त्या जुडग्याला फक्त एकच किल्ली आहे.
......अरे... हा बघ आणखीन एक किल्ल्यांचा जुडगा आहे आणि त्याला जवळ जवळ पाच-सहा किल्ल्या लावलेत." पाणिनी म्हणाला.
तेवढ्यात फोन वाजला सौम्यान तो घेतला तिने थोडा वेळ फोन मधला संभाषण ऐकलं आणि पाणिनी ला म्हणाली
"पद्मराग रायबागी चा वकील बोलतोय, मिस्टर भोपटकर."
पाणिनी पटवर्धन ने सौम्याकडून फोन घेतला
"मी एडवोकेट पाणीनी पटवर्धन बोलतोय"
"पद्मराग रायबागी चा वकील या नात्याने मी तुम्हाला आत्ता फोन लावलाय माझं अशील पद्मराग रायबागी याच्या बायकोने तुमच्याशी मिळकतीच्या संदर्भात संपर्क केलाय असं मला कळलं आहे आणि तुम्ही तिचं वकील पत्र घेतलय" भोपटकर म्हणाला
"तुमची अशी समजूत कोणी करून दिली बुवा?" पाणिनीनं विचारलं
"तशी वस्तुस्थिती नाहीये का?" भोपटकर ने विचारलं
"खूप चतुर आहात तुम्ही . मलाच दुसरा प्रश्न विचारून माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही टाळताय." पाणिनी म्हणाला.
"माझ्याकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर हवं असेल तर आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल तुम्हाला कुठून कळली ही माहिती,की मी तिचं वकीलपत्र घेतलय म्हणून?" पाणिनीनं विचारलं
"तिनेच सांगितलं मला की तुम्ही तिचं वकीलपत्र घेताय असं"
"कधी सांगितलं तिने तुम्हाला हे?"
"आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे दुपार पूर्वी"
"तुम्ही तिच्याशी बोललात समक्ष?"
"ती फोनवर माझ्या सेक्रेटरी शी बोलत होती" भोपटकर म्हणाला
"ती जेव्हा मला भेटायला आली त्यावेळेला मी माझ्या ऑफिसमध्ये नव्हतो बाहेर होतो मी येईपर्यंत ते थांबली नाही त्यामुळे आत्ताच्या घडीला तिचं वकील म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी माझ्याकडे कुठलाही अधिकार तिने दिलेला नाही मला." पाणिनी म्हणाला.
"ती भेटेलच तुम्हाला पुन्हा यामध्ये आता काही शंका नाही की वकील म्हणून तिने तुमची निवड केलेली आहे मला तुम्हाला एवढेच सांगायचे तिला ज्या कारणासाठी तुमची वकील म्हणून मदत हवी आहे म्हणजे प्रॉपर्टीच्या सेटलमेंट बद्दल तर तसं सेटलमेंट करायचा तिला काहीही अधिकार नाहीये ती सगळी प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याची आहे आता मुद्दा राहिला घटस्फोटाचा माझं असेल हे त्यासाठी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे मला वाटतं मला काय म्हणायचे ते मी पोलीस स्पष्ट केले तुम्हाला आणि तुम्हाला ते नीट लक्षातही आलंय.
अर्थातच तिला काहीही पैसे न देता सोडायचा पद्मराग रायबागी चा हेतू नाही. पण त्याचबरोबर तिला हेही लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्णपणे माझ्या अशिलाच्या पैशावर तिला डोळा ठेवता येणार नाही." भोपटकर म्हणाला
"दोघांची सामुदायिक अशी काही मिळकत नाही का?" पाणिनीनं विचारलं
"फार दखल घेण्याजोगी नाही. अर्थात दोघांच्या संमतीने आम्ही एक बऱ्यापैकी तडजोड करून द्यायला तयार आहोत" भोपटकर म्हणाला.
"तुमचा प्रस्ताव नेमकेपणाने काय आहे ते सांगू शकाल?" पाणिनीनं विचारलं
"फोनवर नाही"
"तुमच ऑफिस कुठे आहे?" पाणिनीनं विचारलं
"चंद्रकंस इमारतीमध्ये"
"अरे ती तर पुढच्या चौकातच आहे. तुम्हाला मिनिटभर वेळ आहे का? असेल तर मी तिथे येतो. तिची केस घ्यायची की नाही हे ठरवण्यापूर्वी मला काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आणि शोधून काढायचेत" पाणिनी म्हणाला.
"लगेचच येणार असाल तर भेटू आपण मला आनंदच वाटेल" -भोपटकर
"मला पाच मिनिटं द्या मी पोहोचतोच तिथे" पाणिनी म्हणाला.
पाणिनीने सौम्याला फोन मध्ये झालेले संवाद सांगितले आणि तिला सांगितलं की तो भोपटकर ला भेटायला जाऊन येतो आहे. पुढच्या पंधरा मिनिटातच पाणिनी पटवर्धन भोपटकर च्या केबिनमध्ये हजर झाला होता.भोपटकर उठून सुहास्य मुद्रेने पाणिनी च स्वागत केलं.
"बसा पटवर्धन साहेब. ही माझी सेक्रेटरी सूज्ञा पालकर. ही तुमची खूप मोठी फॅन आहे."
तिनेही खूप आनंदाने पाणिनीशी हस्तांदोलन केलं
" पालकर, आम्ही दोघं थोडा वेळ बोलून घेतो कोणालाही आज सोडू नकोस. आणि फोन कॉलही माझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस" भोपटकर म्हणाला.
"अहो तेवढं हे महत्त्वाचं आणि अर्जंट नाही" पाणिनी म्हणाला.
"नाही कसं माझ्या दृष्टीने आहे आरामात बसा पटवर्धन साहेब. तशीही घटस्फोटाची केस कटकटीचीच आहे पण तुमचं अशील जर सारासार विवेक बुद्धीने वागणार असेल तर पंधरा दिवसात आपण हे प्रकरण चांगल्या प्रकारे संपवू शकतो."
"तुमचं म्हणणं होतं की तुमच्याकडे ठोस असा काही प्रस्ताव आहे पण तो तुम्हाला फोनवर बोलणं प्रशस्त वाटलं नाही." पाणिनी म्हणाला.
"म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही." भोपटकर म्हणाला.
"म्हणजे मी माझ्या अशिलाला काय सल्ला देणार आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी त्याला सांगणार आहे की त्यानं त्याच्या पत्नीला म्हणजे तुमच्या अशीलाला पुढची पाच वर्ष किंवा तिने पुन्हा दुसर लग्न करेपर्यंत दरमहा दहा हजार रुपये द्यावेत. म्हणजे पाच वर्ष किंवा पुनर्विवाह यापैकी जे आधी घडेल त्या तारखेपर्यंत. मी त्याला असाही सल्ला देणार आहे की त्याने त्याच्या मृत्युपत्रात तिला पाच लाख रुपये एक रकमी देण्याची तरतूद करावी. आणि अशा आशयाचा एक करार करावा की ही देणगी रद्द करता येणार नाही. जर तुमची अशील माझ्या अशिलाच्या आधी मृत्यू पावली तरच ही देणगी रद्द करता येईल"
भोपटकर म्हणाला.
"हे फार विचित्र प्रकारे हाताळले जाते अशा प्रकारची कल्पना मृत्युपत्रात टाकणं मला नाही आवडणार त्यापेक्षा पाच लाखाची विमा पॉलिसी तिच्या नावाने काढायची कल्पना कशी वाटते?" पाणिनीनं विचारलं
"हे जमवता येऊ शकेल मी आत्ता तुम्हाला ज्या पद्धतीने कल्पना दिली तशी चर्चा मी माझ्या अशीला बरोबर केली होती आणि त्याला माझ्या अशीलाची काही हरकत नव्हती"
"ठीक आहे तुमचा प्रस्ताव असा आहे तर किती......" पाणिनी म्हणाला.
"प्रस्ताव नाही , प्रस्ताव नाही . ऐका मिस्टर पटवर्धन.... माझ्या अशिलाला मी काय सल्ला देणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं."
"ठीक आहे लक्षात आलं माझ्या तुम्हाला काय म्हणायचंय याच्यापेक्षा किती जास्त रकमेला तुमचं असेल तयार होईल?" पाणिनीनं विचारलं
"अजिबात तयार होणार नाही मिस्टर पटवर्धन ही अगदी कमाल रक्कम मी तुम्हाला सांगितले उगाच मी घोडेबाजार करत नाही" -भोपटकर
"याचाच अर्थ मी तिचं वकीलपत्र स्वीकारलं तर एक तर मला तुमचा हा प्रस्ताव स्वीकारायला लागेल किंवा नाकारायला लागेल" , पाणिनी म्हणाला.
"तुम्ही तुमच्या अशिलाशी अजून बोलला नाहीत?"
"नाही अजून"
"ती खूप उत्साही आणि चांगली बाई आहे समोरच्यावर तिचा चांगला प्रभाव पडतो मला वाईट वाटतं की त्यांचं लग्न यशस्वी झालं नाही." भोपटकर म्हणाला
"किती दिवस एकत्र राहिले ते?" पाणिनीनं विचारलं
"१८ महिने जेमतेम."
"का बिनसले त्यांचे संबंध?" पाणिनीनं विचारलं
"अवघड आहे याचे उत्तर पटवर्धन. एखाद्या माणसाला टक्कल का पडतं एखाद्या माणसाचे केस पांढरे का होतात हे उत्तर जेवढे अवघड आहे तेवढेच उत्तर अवघड आहे"
"हे एकतर्फी होतं की दोघांच्या संमतीने?" पाणिनीनं विचारलं
"मी सांगितलं हे कुणाला कळून देऊ नका पण यापूर्वी रायबागी च दोन वेळा लग्न झालेलं होतं. त्यातलं पहिलं लग्न हे एक आदर्श म्हणता येईल असं होतं पण त्याची पत्नी वारली. तो एकदम एकाकी पडला काही दिवसांनी त्याला दुसरं लग्न करण्याची गरज भासू लागली त्याने ते केलं. पण तो त्यात सुखी झाला नाही त्याचा शेवट घटस्फोट होण्यात झाला. पुन्हा त्याच्या जीवनात एकाकी पण आलं आणि त्याने तिसरं लग्न केलं रती शी. ती त्याची सेक्रेटरी होती त्याच्याबद्दल तिला खूप आत्मीयता आणि सहानुभूती वाटत असे. आता तिच्याबरोबर सुद्धा तो सुखी नाहीये आता तो का सुखी नाहीये हे त्याचे त्यालाही माहित नाही आणि त्यामुळे मलाही माहित नाही" भोपटकर म्हणाला
"आणि म्हणून तिला माझा सल्ला घ्यावासा वाटला?" पाणिनीनं विचारलं
"हो तिने माझ्या ऑफिसला फोन केला पण मी बाहेर होतो ती माझ्या सेक्रेटरीशी बोलली ती म्हणाली की तिचं सगळं हे प्रकरण तुमच्या हातात सोपवणार आहे"
"मी सहसा घटस्फोटाच्या केसेस हाताळत नाही म्हणजे त्या दृष्टीने माझी केलेली निवड चुकीचीच आहे मी मुख्यत्वे करून गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस हाताळतो खास करून खून दरोडे अशा" पाणिनी म्हणाला.
" हो मला त्याची कल्पना आहे मिस्टर पटवर्धन परंतु तुम्ही एक निष्णांत वकील आहात आणि खून दरोडे अशी प्रकरण तुम्ही हाताळत असाल तर घटस्फोटाची प्रकरण हाताळणे म्हणजे तुमच्या डाव्या हाताचा मळ आहे. आणि तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगतो मिस्टर पटवर्धन जेव्हा सूज्ञा पालकर ने मला सांगितलं की तुम्ही हे घटस्फोटाचे प्रकरण हाताळणार आहात तेव्हा मला एकदम धस्स झालं "
"मी तुम्हाला जर विचारलं की माझ्या अशिलाच्या मालकीची किती रक्कम असणार आहे तर मला तुम्ही सांगू शकता का?" पाणिनीनं विचारलं
"काही रक्कम नाही."
"काय !! काही रक्कम नाही? तुम्ही तर म्हणाला होतात दरमहा दहा हजार." पाणिनी म्हणाला.
"म्हणजे माझ्या अशीलाकडे प्रॉपर्टी बरीच आहे पण ती या घटस्फोटाच्या प्रकरणासाठी नाही म्हणजे ती त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे त्यावर तुमच्या अशीलाचा म्हणजे रती चा काही हक्क नाही. म्हणजे रायबागी च्या मनात असलं तर तो तिला ती रक्कम देऊ शकतो पण ती त्याला द्यायची नसेल तर त्याबाबत मी किंवा तुम्ही काही करू शकतो असं मला वाटत नाही" भोपटकर म्हणाला.
"जर असं आहे तर रती ने जेव्हा माझा सल्ला मागितल्याचं तुम्हाला कळलं तेव्हा तुम्हाला काळजी का वाटली?"
"तुमच्यासारख्या नावातलेल्या वकिलाशी वादविवाद होणार म्हणून!" भोपटकर हसून म्हणाला.
"ठीक आहे चला तर मी निघतो मला तुमच्याशी ओळख करून घ्यायची होती आणि थोडी पार्श्वभूमी पण समजून घ्यायची होती. मी असं गृहीत धरतो की रती घटस्फोटासाठी अर्ज करते आहे किंवा करणार आहे."
"ती पुढच्या आठवड्यात अर्ज करणार आह पटवर्धन, आपण दोघांनी एकमेकात एक गोष्ट मान्य करूया आपल्या दोघात वितुष्ट नाही वैयक्तिक पातळीवर. आपण आपापल्या अशिलाची बाजू जोरदारपणे मांडूच आणि जिथे जिथे शक्य होईल तेवढे आपण एकमेकांना सहकार्य करू आणि हे प्रकरण लवकरात लवकर संपवू."
"उदाहरणार्थ?" पाणिनीनं विचारलं
"उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या अशिलाच्यावतीने नोटीस काढण्याची व्यवस्था कराल आणि मी माझ्या अशीलाच्या वतीने कोर्टात हजर राहीन आणि त्याला उत्तर देईन म्हणजे वर करणी एकमेकांची संमती नाही असं दाखवण्यासाठी. मग लवकरच ते प्रकरण कोर्टात जाईल आणि मग मी कोर्टात हजरच राहणार नाही अर्थात या गृहीतावर की आपण एकमेकात तडजोड केलेली आहे." भोपटकर म्हणाला.
"या सगळ्यात एवढा घाई करायचं कारण काय? रायबागी च्या मनात दुसरी एखादी स्त्री आहे का लग्न करण्याच्या दृष्टीने?"
भोपटकर हसला. "पटवर्धन रायबागी चा स्वभाव असा आहे की तो चोवीस तास फक्त काम आणि कामातच घडून घेतलेला असतो आपल्याला घरी कोणी बायको आहे याचंही त्याला भान नसतं जेव्हा त्याला बायको सोडून जाते आणि एकटे पणा जाणवतो तेव्हाच त्याला आपण केलेल्या कृत्याची जाणीव होते. तुम्ही तुमच्या अशिलाला हे सांगू शकता मिस्टर पटवर्धन की तिला कधीही वाटलं की रायबागी एंटरप्राइजेस मध्ये सेक्रेटरी म्हणून पुन्हा नोकरी करावी तर ती ते कधीही करू शकेल त्यात तिला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही हे सगळं प्रकरण परस्पर संमतीने आणि हळुवारपणे समंजसपणे हाताळले जाणार आहे आणि माझा अशी या गोष्टीची नक्कीच काळजी घेणारे की त्याच्या पत्नीला एक चांगली रक्कम तो देऊ शकेल." भोपटकर म्हणाला.
पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. त्याने भोपटकर शी हस्तांदोलन केलं.
"आवश्यकता वाटेल तेव्हा आपण वरच्यावर भेटत जाऊ"
तो जाताना त्याची सेक्रेटरी पाणिनी कडे टक लावून बघत होती.
"खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून मिस्टर पाणिनी पटवर्धन भेट होत राहील आपली." ती कौतुकाने म्हणाली.
"यस भेटूया" पाणिनी म्हणाला.
पाणिनी पटवर्धन पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये आला. भोपटकर बरोबर झालेले सगळे संवाद त्याने सौम्याला सांगितले
"रती चा फोन लागतो का बघ सौम्या" पाणिनी म्हणाला.
सौम्याने फोन लावायचा प्रयत्न केला परंतु फक्त रिंग वाजत होती फोन उचलला जात नव्हता तिने पाणिनी ला तसं सांगितलं.
"तिच्या नवऱ्याचा पद्मराग रायबागी चा आपल्याकडे फोन नंबर नाही परंतु टेलिफोन डिरेक्टरी मधून लँडलाईन नंबर मिळतो का पहा" पाणिनी म्हणाला.
"त्याचा फोन उचलला जात नाही रेकॉर्डेड मेसेज येतो आहे."
"जाऊदे दे सोडून सौम्या."
"आपल्याकडे असलेल्या पर्स त्यातल्या पैशाचं आणि रिव्हॉल्व्हरच काय करायचं आपण आपण ते इथेच आपल्या ऑफिसमध्ये ठेवून द्यायचं?" - सौम्या ने विचारलं
"पाच वाजेपर्यंत आपल्याला रती फोन येतो की नाही बघ तिला कदाचित पटकन आठवेल तिनं तिची बॅग कुठे विसरली ते." पाणिनी म्हणाला.
"पैज लावायची यावर?"सौम्यान विचारलं
"नको आत्तापर्यंत तरी तुझ्याशी लावलेली पैज मी हरलोय "
(प्रकरण एक समाप्त)