सुमंतांच्या वाड्यात
पात्र परिचय
दिनेश सुमंत मोठा भाऊ .
विशाल सुमंत धाकटा भाऊ.
शलाका दिनेशची बायको.
विदिशा विशालची बायको.
आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं
प्रिया विशालची मुलगी
केशवराव शेजारी.
प्रदीप केशवरावांचा मुलगा.
गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील)
प्रभावतीबाई विदिशाची आई.
राधास्वामी मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस.
निशांत शोधकर्ता (डिटेक्टिव)
भाग ६
भाग ५ वरुन पुढे वाचा .......
“मी ओळख करून देतो. हे निशांत. हे शोधकर्ता आहेत. त्यांना मुद्दाम बरोबर घेऊन आलो आहे.” – गोविंदराव.
“हे काय करणार? कशाचा शोध लावणार? म्हणजे आपण आता स्वामींच्या गुरु कडे जायचं नाही का?” दिनेशने गोंधळून विचारले. “आम्ही तर स्वामींशी बोलून ठेवलं आहे, ते आत्ता येतच असतील.”
“एका अंगाने ते चालू द्या. दुसऱ्या अंगाने हे निशांत त्यांच्या पद्धतीने शोध लावण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला काय? प्रश्नावर उपाय मिळण्याशी मतलब. तो कोणाच्याही पद्धतीने मिळाला तरी चालतो.” गोविंदराव म्हणाले. यावर दिनेश आणि विशालने मान डोलावली. थोड्याच वेळात स्वामी आले.
“माझं गुरुजींशी बोलणं झालं आहे. ते उद्या येतील. मग ते सांगतील तसं करू आपण.” – स्वामी म्हणाले. त्यानंतर फारसं काही बोलणं झालं नाही. स्वामी गेल्यावर निशांत म्हणाला, “मला यांच्याकडून पूर्ण स्टोरी ऐकायची आहे. दिनेशराव केंव्हा सांगता?”
“मी काय म्हणतो,” दिनेश म्हणाला, “तुम्ही आत्ताच आला आहात आज दिवसभर आराम करा. संध्याकाळी आपण निवांत बोलू. तसंही या भानगडीत आमच्या खूप सुट्ट्या झाल्या आहेत. आज जरा ऑफिसला जाऊन येतो.
संध्याकाळी दिनेश आणि विशाल ऑफिस मधून आल्यावर जेवण वगैरे झाल्यावर मीटिंग बसली. दिनेशने पहिल्या पासून सांगायला सुरवात केली. निशांत अधून मधून काही प्रश्न विचारात होता. सगळी कहाणी सांगून झाल्यावर दिनेश निशांतला उद्देशून म्हणाला, “मग काय म्हणता कसं आणि काय शोधणार आहात?”
“इतकं ताबडतोब नाही सांगता येणार. आजचा दिवस तर आराम करण्यात गेला, ऊद्या मी संपूर्ण घराची पाहणी करेन आणि काही कच्चे दुवे मिळतात का ते बघतो. ऊद्या रात्री पुन्हा बसू आपण.”
दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आपल्या गुरुजींना घेऊन आला. प्रसन्न चेहरा. ज्ञान आणि अध्यात्म याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं प्रथम दर्शनीच लोकांना विश्वास आणि आदर वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांना पाहिल्यावर आपसूकच सर्व त्यांच्या पाया पडले. त्यांना दिनेशने खुर्ची दिली बसायला, पण त्यांनी नम्रपणे ती नाकारली आणि आसन मागून त्यावर पद्मासन घालून बसले. गुरुजी लगेच ध्यान लावून बसले. तासाभराने त्यांनी डोळे उघडले. सर्वांकडे बघून म्हणाले,
“या घरात आणि घरात राहणार्या माणसांमधे मला काही दोष आढळला नाही. आता प्रश्न हा आहे की, तरी सुद्धा तुम्हा लोकांना त्रास का होतो आहे हा प्रश्न आहेच. कोणी तरी तुमच्या वाइटावर असण्याची शक्यता असू शकते, आणि ती व्यक्ति अघोर शक्तीला वश करून ही कामं करण्यास भाग पाडू शकते.” त्यांच्या या बोलण्यावर सगळेच भयभीत झाले. गुरुजीच असं म्हणताहेत मग आपल्या सारख्यांनी काय करायचं, असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता.
“मग गुरुजी, आता काय करायचं?” – दिनेश.
“हे बघा, या घरात शिरतांनाच मला जाणवलं होतं की हे चांगले संस्कार असलेल्या माणसांचं घर आहे म्हणून. जर काही अघोर शक्तींचा वास असेल तर लगेच नकारात्मक लक्षणे दिसतात. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण त्याला नेगेटिव वाईब्स म्हणू शकतो. पण मला असं काहीही जाणवलं नाही. नक्कीच तुमच्या घरात रोज पूजा होत असेल. संध्याकाळी दिवा लागत असेल, शुभं करोती म्हंटल्या जात असेल. बरोबर आहे ना?” – गुरुजी.
“:हो गुरुजी. हे सगळं तर आम्ही करतोच. पण मग आता आमची या संकटातून सुटका कशी होणार?” – शलाका.
“हे बघा, जे मला समजलंय ते सांगतो. पण त्या अगोदर तुम्ही प्रत्येक घटना मला जशी घडली, तशीच काहीही न वगळता सविस्तर सांगा.” – गुरुजी.
मग दिनेशने सर्व घटनाक्रम जसा घडला तसाच सविस्तर सांगीतला. गुरुजी अगदी लक्ष पूर्वक ऐकत होते.
“या कुठल्याही घटने मधे मला अघोर शक्तीचा संबंध असेल असं वाटत नाही. या सर्व घटना कोणीतरी पद्धतशीरपणे घडवून आणल्या असाव्यात असा मला संशय आहे.” सर्व ऐकून घेतल्यावर गुरुजी म्हणाले.
“गुरुजी काय म्हणता आहात तुम्ही? आम्हाला काहीच समजत नाहीये. स्वामी म्हणत होते की अघोर शक्ति कार्यान्वित केल्या गेल्या आहेत म्हणून.” – दिनेश.
“स्वामींनी जेवढं ज्ञान प्राप्त केलं आहे त्यानुसारच त्यांनी मत बनवलं, आणि तुम्हाला तेच सांगीतलं. उपाय पण त्यानुसारच केलेत. निदानच चुकलं तर औषध पण चुकेल आणि मग रोग बरा कसा होणार? पण यांचा अर्थ स्वामी अप्रामाणिक आहेत असा होत नाही. त्यांनी त्यांच्या बुद्धी नुसार उपाय केलेत.” – गुरुजी.
“हे भगवान, देवा परमेश्वरा कुठल्या चक्रव्यूहात अडकलो आहोत आम्ही, समजत नाहीये. गरूजी आता तुम्हीच सांगा काही तरी उपाय.” – दिनेश.
“हे बघा, आता मी काय सांगतो, ते नीट लक्ष पूर्वक ऐका. अघोर शक्ति ही शक्ति आहे. ती स्वत: काही करू शकत नाही. तिला काही करण्यासाठी माध्यम लागतं. म्हणजे समजा मला ती शक्ति प्राप्त झाली आहे आणि मला कोणाचं तरी नुकसान करायचं आहे. आता माझ्याजवळ नुसती शक्ति असून चालत नाही, तर मला अशी एखादी व्यक्ति हवी असते, जी त्या शक्तीच्या प्रभावाखाली येऊन मला हवे ते करेल.
“म्हणजे काय गुरुजी? जरा नीट समजाऊन सांगता का?” – शलाका.
“म्हणजे असं की वाळू कोणी तरी आणून टाकायला पाहिजे. पडद्यांना आग लावायला कोणी तरी माणूसच पाहिजे. लिंब ठिकठिकाणी पेरायला माणूसच पाहिजे. शक्ति ही अशरीर असते. माध्यमाशिवाय, तिचा प्रभाव शून्य असतो. आता अशी व्यक्ति तुमच्याच घरातली असणं शक्य नाही, असं तुम्ही म्हणता, तेंव्हा बाहेरची व्यक्ति घरात येऊन हे सगळं करत असेल, असं म्हणावं लागेल.” – गुरुजी.
“गुरुजी याचा अर्थ काय लावायचा? आमच्या पैकीच कोणीतरी माध्यम आहे असं समजायचं का?” – विदिशा.
“नाही. घरात आल्यावर मी जेंव्हा ध्यान लावलं तेंव्हा मला असं काहीच जाणवलं नाही. मुळात या सगळ्या घटना क्रमात कोणी माध्यम असेल असंही मला वाटत नाही. आणि जर माध्यम नसेल, तर शक्तीचा प्रयोग पण नसेल. कुठल्याही अमानवी शक्तिने इथे प्रवेश घेतला नाहीये. हे मी निक्षून सांगतो आहे. तुम्हाला भयभीत होण्याचं काहीच कारण नाही. ” – गुरुजी.
“जर कोणी माध्यम नसेल आणि अघोरी शक्तीही नसेल तर या सगळ्या गोष्टी घडल्या कशा? तुमच्या म्हणण्या प्रमाणे कोणीतरी तर नक्कीच असायला पाहिजे. मग?” – दिनेश.
“करेक्ट आहे. एक गोष्ट निश्चित आहे की कोणीतरी तुमच्या वाइटावर आहे. भानामतीचा आभास निर्माण करून कोणीतरी आपला हेतु साध्य करायच्या मागे आहे. या पलीकडे मला काही सांगता येणार नाही. भानामती, चेटूक या गोष्टींची भीती मनातून काढून टाका एवढंच सांगेन.” – गुरुजी.
गुरुजी आणि स्वामी दोघंही निघून गेले. बराच वेळ सर्वच आपल्याच विचारात गढून गेले होते. गुरुजींच्या स्पष्टीकरणामुळे एका चिंतेतून मुक्तता झाली होती, पण नवीनच प्रश्न उपस्थित झाले होते. “असं काय कारण आहे की ज्यामुळे कोणीतरी आपल्याला त्रास द्यायला सुरवात केली आहे?.” – दिनेश.
“दिनेश,” आता गोविंदराव बोलले. “माझ्या मते हा प्रांत निशांतचा आहे. आणि गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे, जर यात चेटूक नसेल, तर गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं गुंतलेली असतील. आणि या स्थितीत निशांत हा योग्य माणूस आहे असं मला वाटत. तेंव्हा दिनेश, तू त्याला ग्रीन सिग्नल द्यायला हरकत नाही.”
“हूं, आता तेच करावं लागणार आहे. निशांत, तुम्ही तसेही आज पासून सुरवात करणार होता, तुम्हाला काय वाटतं तुम्ही निष्कर्षाप्रत पोहोचू शकाल यांची खात्री वाटते आहे का?” – दिनेश.
“हे बघा दिनेशराव आमच्याकडे जेंव्हा काम येतं तेंव्हा ते एक कोडच असतं. आणि ती कोडी सोडवणं हेच आमचं काम असतं. तेंव्हा तुम्ही निश्चिंत रहा. यांचा छडा निश्चित लागेल. फक्त मला या हॉल मधे झोपण्याची परवानगी द्या. म्हणजे झालं. बाकी मी बघून घेतो. या नंतर जी काही अॅक्टिविटी रात्रीच्या वेळी तुमच्या घरात होईल, ती मला माझ्या नजरेसमोर व्हायला हवी आहे.” – निशांत.
“तुम्हाला फूल सपोर्ट आहे आमचा. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझा शब्द. मग तर झालं?” – दिनेश.
“धन्यवाद, आता तुम्ही निश्चिंत मनाने ऑफिसला जा. मी आहे.” – निशांत.
त्याच दिवशी गोविंद राव नागपूरला गेले.
क्रमश:.......
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.