Kisse Choriche - 7 in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | किस्से चोरीचे - भाग 7

Featured Books
Categories
Share

किस्से चोरीचे - भाग 7

किस्से चोरीचे

अगदी दोन हजार चार सालापर्यंत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल सेवा पोहोचलेली नव्हती.शहरांत खाजगी कंपन्यानी मोबाईल सेवा देणे सुरु केले असले तरी ती खूप महागडी होती.
ग्रामीण भागात त्यावेळी लँडलाईन हेच मुख्य संपर्कसाधन उपलब्ध होते.आमच्या खात्याच्या टेलिफोन लाईन्स मुख्यत्वे जमिनीखालून टाकलेल्या केबल्सवर चालायच्या. या केबल्समधील वाहक तारा या किमती तांब्याच्या असायच्या त्यामुळे आमच्या खात्याला कायमच केबल चोरांचा उपद्रव व्हायचा. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात अशा अनेक केबल चोरीच्या नियमितपणे घटना घडत असत.
एकदा का एखाद्या विभागात अशी केबल चोरीची घटना घडली की त्या विभागाच्या अधिकाऱ्याला खूपच डोकेदुखी व्हायची.केबल चोरी झाल्यावर त्या केबलवर चालणारे सगळे टेलिफोन बंद व्हायचे.
टेलिफोन ग्राहकांच्या तक्रारीना तोंड द्यावे लागायचे त्यात भर म्हणजे पोलिसांत तक्रार नोंदणी झाल्याशिवाय स्टोअरमधून नवीन केबल मिळायची नाही.
पोलीसही अशी तक्रार घ्यायला टाळाटाळ करत कारण त्यांच्या रेकॉर्डवर चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढल्याने त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागायचे.
इकडे टेलिफोन बंद म्हणून ग्राहकांच्या रोष, केबल दुरुस्ती लवकर होत नाही म्हणून खात्याच्या अधिकाऱ्यांचा तसेच लोकल पुढऱ्यांचा दबाव आणि पोलिसांचा असहकार अशा तिहेरी कात्रीत त्या भागाच्या खात्याच्या अधिकाऱ्याला पकडले जायचे.
असाच एक अनुभव मी भोर टेलिफोन केंद्राचा प्रभारी असताना घेतला आहे... तोच हा किस्सा.
तर झाले असे की भोर टेलिफोन केंद्रापासुन अगदी भाटगर धरण माळवाडी गावापर्यंत जमिनीखालून टेलिफोन केबल घालून वाड्यावस्त्यांवर टेलिफोन सेवा दिली जायची. ही टेलिफोन केबल इत्तर ठिकाणी बऱ्यापैकी खोल असल्याने कधी चोरी झाली नव्हती; पण भाटगर धरणाच्या खालच्या भागात नीरा नदीवर असलेल्या लोखंडी पाईपातून टाकलेल्या केबलवर नेमकी चोरट्याची नजर गेली आणि एक दिवस बरोबर पुलावरच्या केबलची चोरी झाली आणि त्या भागातले सगळे टेलिफोन बंद झाले.
तक्रारी आल्याबरोबर मी कामाला लागलो. खात्याच्या पद्धतीने काम करायचे तर आधी पोलीस तक्रार, त्यांची टाळाटाळ, यात खूपच मनस्ताप होणार होता तो टाळण्याचा सोपा मार्ग मी शोधला.
भोर केंद्राच्या आवारात एक केबलचा तुकडा बरेच दिवसापासून पडला होता त्याची लांबी मी मोजली आणि ही केबल झालेली चोरी रेकॉर्डवर न आणता वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परवानगीने ती केबल पुलावर टाकून मी चार दिवसांत सेवा पूर्ववत केली.
परस्पर काम झाल्याने अधिकारी आणि ग्राहक खुश झाले अर्थातच मलाही आनंद झाला;पण हा आनंद फार काळ टिकला नाही. पंधरा दिवसांतच पुन्हा त्याच ठिकाणी चोरांनी डल्ला मारला आणि मी टाकलेली ती केबल कापून नेली!
आता मात्र मी पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला...
प्रथम केबल चोरी बाबत सगळे तपशील लिहून भोरच्या पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज दिला.तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याने माझा अर्ज वाचला आणि अर्जात लिहिलेले चोरीचे ठिकाण वाचल्यावर तो म्हणाला
" साहेब ही तक्रार इथे नाही घेता येणार, कारण भाटगर धरण ज्या नीरा नदीवर आहे, ती नदी आणि त्यावर असलेला पूल हा सातारा जिल्ह्यात आहे! ही चोरी झालेले ठिकाण शिरवळ पोलीस चौकीच्या हद्दीत आहे... त्यामुळे तुम्ही हा तक्रार अर्ज शिरवळ पोलिसांना द्या, तेच ही तक्रार घेऊ शकतील."
" अहो पण जे टेलिफोन बंद झालेत ते पुणे जिल्ह्यातल्या गावातले आहेत, शिवाय भोर टेलिफोन केंद्र पुणे जिल्ह्यात आहे ना? "
"पण चोरी झाले ते ठिकाण आमच्या हद्दीत नाही ना, त्यामुळे इथे तक्रार नाही नोंदता येणार!" शेवटी पोलिसचं ते, इथे डोकेफोड करण्यात अर्थ नाही, हे लक्षात आल्यावर आम्ही शिरवळ पोलीस चौकीसाठी एक अर्ज लिहिला आणि शिरवळ गाठले...
माझा अर्ज वाचून तिथला पोलीस कर्मचारी म्हणाला...
" टेलिफोन केंद्र भोरचे, केबलमधून टेलिफोन चालतात भोर तालुक्यात, मग आम्ही सातारा जिल्ह्यात कशी काय तक्रार घेणार? तुम्हांला भोर पोलिसांकडेच तक्रार नोंदवावी लागेल!"
" अहो पण भोर पोलिसांनी तुमच्याकडे पाठवले आम्हाला"
" ते का पाठवले, त्यांनाच विचारा... "
आमचा तक्रार अर्ज परत देत त्याने संवाद आटोपता घेतला...
यांच्या नादाला लागलो तर हेलपाटे मारण्याशिवाय हाती काही लागणार नव्हते.
आम्ही तिकडून निघालो.मी ऑफिसात येऊन पोलिसांकडून मिळालेल्या असहकार्याबद्दल एक सविस्तर पत्र आमच्या साहेबांना लिहिले आणि दुसऱ्या दिवशी ते घेऊन पुण्यातील ऑफिसला गेलो. साहेबांनी मला पोलीस अधीक्षक पुणे आणि सातारा जिल्हा यांना पोलीस चौकीत मिळालेल्या उत्तराबद्दल तातडीने पत्र पाठवायला सांगितले आणि केबल दुरुस्तीसाठी आवश्यक त्या साहित्यासाठी विशेष मंजुरी दिली.
केबल चोरी होऊन एव्हाना चार दिवस उलटून गेले होते. ग्राहक वैतागले होते. मी युद्धपातळीवर काम हाती घेऊन केबल जोडून सेवा पूर्ववत केल्या. यावेळी केबलवर सिमेंट काँक्रेट ओतून पाईपातून केबल सहजासहजी चोरी करता येणार नाही अशी काळजी घेतली शिवाय पुलावर नजर ठेवण्याची व्यवस्था केली.
त्याचा काही उपयोग होणार नाही याची खात्री असूनही साहेबांनी सांगितले होते म्हणून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी केलेल्या टाळाटाळी संबंधात सविस्तर पत्र तयार करून पुणे आणि सातारा पोलीस अधीक्षक यांच्या नावे रजिस्टर पोस्टाने पाठवून दिले...
दरम्यानच्या काळात माझी पुण्याला बदली झाली.या घटनेला साधारण एक वर्ष उलटून गेले असेल अचानक एक दिवस मला भोर पोलिसांचा त्या केबल चोरीबद्दल मी अधीक्षकाना लिहिलेल्या पत्रासंबंधात फोन आला.
मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यावेळी तक्रार नोंदवण्यासाठी टाळणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक साहेबांनी दिले होते आणि त्यांना माझे स्टेटमेंट हवे होते...
ती केबल चोरी, त्यावेळी झालेला अपमान आणि मनस्ताप हे सगळं मी खरं तर तोपर्यंत विसरून गेलो होतो;पण आता तोच त्रास आणि पश्चाताप या चौकशीच्या निमित्ताने 'त्या' पोलिसाला होणार आहे...याचा नाही म्हटलं तरी आसुरी आनंद मला झाला होता!
© प्रल्हाद दुधाळ
9423012020