Nilya Aakashanch Swapn - 2 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग २

Featured Books
Categories
Share

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग २

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग २


मागील भागात आपण बघीतलं की पंकज घरी आला तेव्हा माधवी उदास बसलेली होती. पुढे बघू काय झालं ते.


आज पंकज आणि माधवी डाॅक्टर कडे जाऊन आले. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष उलटून गेली तरी त्यांना बाळाची चाहूल लागली नव्हती.


डाॅक्टरांना माधवीने सरळच विचारलं,


" डाॅक्टर किती दिवस हे सायकल करायचं आहे.गोळ्या थांबल्या की माझी पाळी पुन्हा पहिल्यासारखी अनियमित येते. असं का?"


" तुमची पाळी अनियमित आहे ती नियमित येण्यासाठी आधी उपचार करावे लागतील. नंतर मूल होण्यासाठी उपचार करावे लागतील."


" हे कधी पर्यंत करावं लागेल?"


" हे बघा. मूल व्हावं म्हणून जी उपचार पद्धती आपण सुरू करतो ती फार वेळ खाऊ आहे. तुम्हाला कंटाळून चालणार नाही. धीरानं घ्या."


" डॉक्टर तुम्ही म्हणताय धीरानं घ्या पण माझा धीर आता संपत चालला आहे."


हे बोलताना जवळ जवळ माधवी रडलीच. पंकजने हळूच तिच्या खांद्यावर थोपटले.डाॅक्टरही शांत बसले. त्यांना या सगळ्या गोष्टींची सवय होती.


" आता पुन्हा कधी यायचं?" पंकज ने विचारल.


" पुढल्या महिन्यात बघा पाळी वेळेवर येते का तसं मला सांगा."


" ठीक आहे."


पंकज आणि माधवी दोघंही डाॅक्टरांच्या केबीनबाहेर पडले.


***


आज माधवी दवाखान्यात यायलाच तयार नव्हती. दवाखान्याच्या फे-या,औषधं घेणं आणि मग वाट बघत बसणं. या सगळ्या गोष्टींचा माधवीला कंटाळा आला. ती कंटाळून पंकजला म्हणाली,


" एवढे कष्ट करूनही बाळाची चाहूल येत नाही. काय करायचं?" माधवीच्या स्वरात खंत होती.


" हे बघ आपल्याला काही मिळवायचं असेल तर वाट बघावी लागते.ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करावीच लागते. तुला एकटं वाटू नये म्हणून तुला म्हटलं भिसी गृपमधे जा."


" पंकज तुम्हाला माहिती नाही एखाद्या बाईला मूल नसणं हा तिचा घोर अपराध समजल्या जातो. साखरेत घोळलेल्या शब्दातून वांझ हा शब्द न उच्चारता त्या बाईचा अपमान सहज केल्या जातो. असं करताना बोलणा-या बायकांच्या चेहे-यावर गुर्मी असते. मला हे सगळं सहन होत नाही त्यापेक्षा माझं घर मला आवडतं."


माधवीच्या आवाजात चीड, मूल न होण्याचं दु:ख, एक स्त्रीच कशी दुस-या स्त्री ला समजून घेत नाही याचं वैशम्य भरलेलं होतं.


पंकजला सगळं कळतं होतं म्हणूनच तो माधवीला कोणतीच गोष्ट तिची इच्छा नसेल तर करण्यासाठी भाग पाडत नसे.


" ठीक आहे. तू तुझ्या मनाविरूद्ध काही करू नको. तुझा तो कवितांचा व्हाॅट्स ॲप गृपवर काय चालू आहे? एवढ्यात तू काही नवीन लिहीलं नाही का? मला दाखवलं नाही."


पंकजने विषय बदलण्यासाठी माधवीला विचारलं.



"आजकाल माझ्या कवितेमधून मातृत्वाची आर्त आळवणी ऐकू येते. कितीही मनाशी ठरवलं की शब्दांना दु:खाच्या नगरीचा फेरफटका करायला लावायचा नाही तरीही आपसूक शब्दच तसे कागदावर उतरतात."


हे बोलून माधवी आर्त डोळ्यांनी पंकजकडे बघू लागली.


" माधवी तुझ्या मनातील आर्तता पूर्ण पणे बाहेर पडू दे. त्या आर्त भावनेला मनात कोंडून ठेऊ नकोस. अशाने तुला त्रास होईल."

पंकज म्हणाला.


क्षणभर दोघंही स्तब्ध होते.अचानक माधवी म्हणाली,


" दूर त्या कठीण कातळावर

हिरवी पालवी कधी फुटेल का?

कातळाचं आयुष्य खूप कठीण,

त्यावर आनंदमोहोर येईल का?

मी तशीच कातळ बनले आता

मज कुशीत तान्हूला खेळेल का?

वांझ मी असले तरी आईपण आहे,

या जन्मी ते मज कधी दिसेल का? "


ही कविता म्हणजे माधवीने फोडलेला आर्त टाहो पंकजचे मन हेलावून गेला.


माधवीने स्वतःला कठीण कातळाची उपमा दिली हे पंकजच्या मनाला टोचलं. माधवीला या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायला हवं हे त्याने मनाशी ठरवलं.


" माधवी तुला बाहेर कोणाशी मैत्री करायची नाही नको करू.कोणाकडे जायचं नाही नको जाऊ पण अशी एकटी चार भिंतींच्या आत सतत राहशील तर कोलमडून जाशील. मी ऑफीसमधून घरी आलो की रोज आपण बाहेर फिरायला जायचं का? माझ्या बरोबर तुला फिरायला आवडेल नं?"


पंकजच्या या प्रश्नावर काहीकाय विचारतोस असं म्हणून त्याच्या गालावर हळूच चापट दिली. तशी पंकज हसला.


" चल तयार हो आपण आजपासूनच फिरायला जाऊ.कुठे जायचं ते तू ठरवायचं. डन?"


" डन. मी येते तयार होऊन. मला तुझ्याबरोबर कुठेही फिरायला आवडेल. तू आहेस हे माझ्यासाठी महत्वाचं."


हे बोलून माधवी तयार व्हायला गेली.


मघाशी पंकज स्वतःशीच विचार करत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ऑफीसचं काम असतं या सबबीखाली मी स्वतःचाच विचार करत होतो. माधवी किती एकटी पडली आहे हे लक्षातच घेतलं नाही.‌ आपलं हे वागणं बरोबर नाही. ऑफीस संपलं की तिथल्या सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि दिवसांचा ऊरलेला वेळ फक्त माधवीला द्यायचा.


हे आता नाही केलं तर माधवी आपल्या कोषात कधी जाईल ते कळणार नाही आणि तिचं मानसिक संतुलन बिघडल तर सगळच संपेल. त्याहूनही ती जेवढी हसरी राहील, पाॅझीटीव्ह राहील तेवढा उपचारांना चांगला प्रतिसाद देईल. उपचार यशस्वी झाले तर लवकर कुणीतरी येईल जो आपल्याला बाबा आणि माधवीला आई म्हणेल.


आपल्याला कोणीतरी बाबा म्हणेल या विचारानेच पंकज आनंदाने शहारला. केवढी सुखद भावना आहे ही. या भावनेसाठी माधवीला एकटं पडू द्यायचं नाही. तिला आनंदी ठेवायचं हे पंकजने मनाशी पक्क ठरवलं.


पंकज विचारात गुंतलेला असताना माधवी तयार होऊन आली. माधवीला बघताच पंकजच्या मनात आलं की माधवीचं सौंदर्य मनाचं सौंदर्य आहे ते करपून जायला नको. मी तसं होऊ देणार नाही.


" हॅलो , पंकज कुठल्या विचारात हरवला"

माधवीच्या या प्रश्नावर पंकज हसत म्हणाला,


" विचार नव्हतो करत. तू किती छान दिसतेस हे बघत होतो."


" चल काहीतरी" माधवी हसली तसा पंकज पण हसला.

पंकज गाडीची किल्ली घेऊन निघाला. माधवीपण निघाली.

_________________________________

कुठे गेले असतील हे दोघं फिरायला?