Anubandh Bandhnache - 1 in Marathi Love Stories by प्रेम books and stories PDF | अनुबंध बंधनाचे.. - भाग 1

Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे.. - भाग 1

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १ )

प्रेम देशमुख. कोल्हापूरजवळील एका खेडेगावात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा, घरची परिस्थिती तशी चांगली होती. वडील सरकारी खात्यामध्ये नोकरी करत होते. घरी आई, वडील, मोठी बहीण आणि एक लहान भाऊ असा परिवार होता. पण त्याचे वडील दारूचे व्यसनाधीन असल्यामुळे जो काही पगार मिळायचा तो असाच खर्च करून टाकत असत. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट होत चालली होती. त्याचे चुलते वगैरे कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. म्हणुन प्रेमच्या आईने माहेरी जाऊन रहायचा निर्णय घेतला. तेव्हापासून प्रेम आणि त्याचा परिवार त्याच्या मामाच्या गावीच एका भाड्याच्या घरी राहु लागले होते. त्याचे वडील घरी कधी त्रास द्यायला लागले तर त्याचा मोठा मामा मदतीला यायचा. मामांचे घर तसे जवळच होते. त्यामुळे त्यांचे येणे जाणे असायचे. म्हणुन प्रेम चे वडील त्यांना घाबरून घरी जास्त त्रास देत नव्हते. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याच्या आईने नाईलाजास्तव त्याला पाचवीपासून बोर्डिंग स्कूल मधे टाकले. कारण मोठी बहीण पण शिकत होती. लहान भाऊ शाळेत जायला लागला होता. तिघांच्या शिक्षणाचा खर्च वाढत होता. प्रेमचे वडील घरी काहीच पैसे देत नसल्यामुळे सर्व खर्च त्याची आई शिलाई मशीन चालवून कसातरी भागवत होती.
इकडे प्रेमला आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे तो मन लाऊन अभ्यास करून दरवर्षी चांगल्या मार्कानी पास व्हायचा. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने विचार केला, आता आपण कुठेतरी काम करायला हवे. कारण आई घरातील सर्व खर्च भागवू शकत नव्हती. हे त्याला जाणवत होते. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. ती मुंबईला होती. म्हणुन त्याने मुंबईला जायचा विचार केला. पण त्याची आई तयार नव्हती. प्रेम ने बारावीपर्यंत तरी शिकावं असे तिला वाटत होते. मी मुंबईला जाऊन काम करत पुढचे शिक्षण घेईन असे आईला बोलून त्याने कशीबशी आईची समजुत काढली.
आणि तो मुंबईला मोठ्या बहिणीकडे राहायला आला. त्याची बहीण पण चाळीमध्ये एका छोट्याशा रूम मधे रहात होती. तिचे मिस्टर एका कंपनीत कामाला होते. त्यांची ओळख चांगली होती. त्यामुळे प्रेमला एका कंपनीत पार्ट टाईम जॉब मिळाला आणि त्याचे अकरावीचे कॉलेजचे एडमिशन पण झाले. प्रेम जिथे रहात होता त्याच नगरामधील काही मुले त्याच्याच कॉलेजमध्ये त्याच्या वर्गात होती. सकाळी कॉलेजला जाताना सोबत जायचे त्यामुळे थोडीफार ओळख झाली होती. कॉलेजमध्ये रमेश नावाचा त्याच्या जवळच राहणारा एक मित्र त्याला भेटला. आणि त्याच्या घरापासून थोड्याच अंतरावर रहाणारा दुसरा मित्र आरव. एकत्र कॉलेजला असल्यामुळे या दोघांशी हळु हळु मैत्री वाढत गेली. कॉलेजमध्ये पण काही नवीन मित्र मिळाले होते,
राघव, हितेश आणि त्याची बहीण ज्योती. असा पाच जणांचा ग्रुप आणि त्यामध्ये एकटी मुलगी ज्योती, हितेश ची बहिण असल्यामुळे सर्वच तिला बहीण मानून ताई म्हणूनच बोलवायचे. प्रेम, रमेश आणि आरव एकच ठिकाणी रहात असल्यामुळे एकमेकांच्या घरी येणे जाणे चालु झाले होते. रमेश घरी एकटाच रहायचा. त्याचे आईवडील गावी रहात होते. त्याचा रूम पण मोठा होता, त्यामुळे प्रेम रात्री झोपायला त्याच्याकडेच जात असे. रमेश मनाने खुप चांगला होता पण त्याचे एक वागणे प्रेमला पटत नव्हते, ते म्हणजे त्याचे मुलींच्या बाबतीत तो जरा वेगळा विचार करायचा.
त्याच्या मते कॉलेजचे पाहिले वर्ष आहे, एन्जॉय करण्यासाठी हेच वर्ष असते, पुढच्या वर्षी बारावीचे टेन्शन. मग आत्ताच मुली पटवायच्या आणि त्यांच्यासोबत मस्त एन्जॉय करायचा. आणि तो तसाच वागायचा. कॉलेज चालू होऊन एक महिना सुध्दा झाला नव्हता की साहेबांनी एका मुलीला प्रपोज सुद्धा केला. आणि ती बिचारी याच्या जाळ्यात फसली. याउलट होता तो आरव....
कॉलेजमधील ग्रुप चा मुख्य सदस्य म्हणजे आरव. सर्व ग्रुप ला एकत्र बांधुन ठेवण्याचे काम हे आरव चे असायचे. आणि तो होता ही तसा दिसायला सुंदर आणि बोलण्यामध्ये तर त्याचा हात कोणीही पकडु शकणार नाही असा, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालु आहे, हे त्या व्यक्तीचा चेहरा पाहूनच ओळखणारा आणि आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला प्रेमात पाडणारा असा तो आरव. स्वभावाने अतिशय प्रेमळ, सर्वांवर प्रेम करणारा, प्रत्येकाची काळजी घेणारा, कोणत्याही प्रसंगात नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा.... जणु ग्रुप मधील सर्वांच्या गळ्यातील ताईत होता तो, आणि त्याच्यामुळेच सर्व ग्रुप एकत्र होता. ग्रुप मधील सर्व मित्र जर मणी असतील तर त्यांना एकत्र बांधणारा त्या माळेचा धागा तो होता.
त्याच्या या स्वभावामुळे सर्वांनाच तो आवडायचा. अभ्यासात हुशार आणि सुंदर अक्षर ही त्याची कॉलेजमधील शिक्षकांसाठी खरी ओळख होती. आरवचे शाळेत असल्यापासूनच सुमेधा नावाच्या मुलीवर प्रेम होते. आरव च्या घरापासुन थोड्याच अंतरावर सुमेधा रहात होती. ती सुद्धा आता कॉलेजला जात होती पण ती दुसऱ्या कॉलेजमध्ये शिकत होती. आरव तिला कधी कधी ग्रुप मधे घेऊन यायचा त्यामुळे ती पण थोडी ग्रुप मधे मिक्स झाली होती. कधी छोटी पिकनिक, वाढदिवसाच्या पार्ट्या, पिक्चर, आणि हितेश चे घर म्हणजे ग्रुपचा भेटण्याचा अड्डा. अशावेळी सर्व एकत्र येऊन खुप धमाल करायचे. हितेश च्या मम्मीला पण सर्वांचा लळा लागला होता. हितेश एवढेच प्रेम ती सर्वांवर करत होत्या. ग्रुप मधे राघव सर्वात लहान असल्यामुळे ताईसारखे मम्मीचे प्रेम पण त्याला जरा जास्तच मिळायचे. ग्रुप मधील पिकनिक मधे कधी कधी मम्मी पण सामील व्हायच्या आणि सर्वांसोबत त्याही एन्जॉय करत होत्या. त्यांच्यासोबत सर्वांचे एक वेगळं नातं तयार झाले होते. ग्रुपमधे प्रेम आणि आरव चे विचार आणि स्वभाव मिळता जुळते असल्यामुळे दोघांचे छान जमायचे. त्यामुळे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असत. आपल्या सर्व पर्सनल गोष्टी पण एकमेकांना शेअर करत असत. कॉलेज चालू होऊन जवळ जवळ चार महिने होऊन गेले होते. प्रेम सोडुन सर्वांच्या गर्लफ्रेंड झाल्या होत्या. आतापर्यंत दोन तीन मुलींनी प्रेमला पण प्रपोज केला होता. पण प्रेम ने सरळ त्यांना नकार दिला होता. त्याला या सर्व गोष्टीमध्ये अडकायच नव्हते. तसेच काहीतरी हितेश ची बहिण ज्योतीचे विचार होते. तिला सुद्धा या सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता. रक्षाबंधन ला ताईने प्रेम आणि सर्वांनाच राख्या बांधल्या होत्या. त्यामुळे ती आता खऱ्या अर्थाने सर्वांची ताई झाली होती. ग्रुप मधील सर्व एकत्र बाहेर गेले तर ताई आणि प्रेम एकमेकांना कंपनी द्यायचे. बाकी सर्व जोड्या जुळलेल्या होत्या....💑
प्रेम कॉलेजचे दिवस खुप एन्जॉय करत होता. कॉलेज सुटल्यावर त्याला ऑफिस मधे जायला लागायचं म्हणुन जास्त वेळ मित्रांसोबत थांबता येत नव्हते. याचे त्याला खुप वाईट वाटायचे. पण जॉब पण तेवढाच महत्वाचा होता. कारण त्यावरच त्याचा खर्च भागत होता. थोडे पैसे तो पोस्टाने गावी आईला पाठवायचा, थोडे त्याच्या ताईला पण द्यायचा, आणि उरलेल्या पैशात त्याचा खर्च आणि सेविंग करायचा.
प्रेम आता मुंबईच्या वातावरणामध्ये चांगलाच रुळला होता. रविवारी त्याला कॉलेज आणि ऑफिसला सुट्टी असायची. इतर दिवशी त्याला आजिबात वेळ मिळायचा नाही, पण रविवारी पुर्ण दिवस तो मित्रांसोबत मैदानात त्याचा आवडता खेळ क्रिकेट खेळायचा.
सर्व काही व्यवस्थित चालले होते. असेच दिवस जात होते. प्रेम त्याच्या लाईफ मधे बऱ्यापैकी खुश होता. पुढे त्याच्या आयुष्यात काय घडणार होते, याची त्याला काहीच कल्पना नव्हती.


( नवरात्री उत्सव जवळ आला होता, हा उत्सव त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळा बदल घडवणारा होता.)

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️