husbandwife in Marathi Biography by Geeta Gajanan Garud books and stories PDF | नवराबायको

Featured Books
Categories
Share

नवराबायको

#नवराबायको

लग्न झाल्यानंतरचं हळवं प्रेम,डोळ्यात डोळे घालू बघत बसणं, वाटेत हातात हात घालून फिरणं हे फार छान कोवळं प्रेम असतं. कोवळ्या रोपट्यासारखंच.

मग लेकरू होतं. ही लेकरं लय द्वाड असत्यात. दिवसा त्यांच्या अंगात कुंभकर्ण शिरतो तर रात्री छान हसूखिदळू लागतात.

साधारण एकदिड वाजले की त्यांना खेळायचा मुड येतो किंवा भूक तरी लागते. त्यातुनही झोपलीच तर हमखास अंथरूण ओलं करतात. त्यात मुलगे लय बहाद्दर. ही मंडळी सरळ आईबाबांच्या पांघरुणातनी कारंजा सोडून देतात. बाबा बिचारा सकाळी उठला की लयच कनफ्युज होतो.

या लहानग्यांना भरवणं,त्यांना न्हाऊमाखू घालणं म्हणजे चिऊताई चिऊताई दार उघड,थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते तसं असतं.

नवरारुपी कावळेराव मग लयच वैतागतो अन् उशीत तोंड घालून झोपी जातो. कधीतरी चुकून बाळराज झोपलेच तर वाळवंटातल्या म्रुगजळासारखं या जोडप्यांच प्रेम बहरतं.

ही बाळं मोठी होऊ लागतात तसं त्यांची शाळा,शाळेतला अभ्यास,प्रोजेक्ट, परीक्षा यात लव्हबर्ड्स स्वतःचं प्रेम विसरून जातात.

आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळावे यासाठी बरेच पालक स्वतःचे छंद वगैरे बाजूला ठेवून आपल्या पाल्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करतात. त्या सोडवून घेतात. पुढे दहावी बारावी झाली की मुलं उच्चशिक्षणाचे मार्ग निवडतात.

इथतागद आईवडलांची चाळीशी,पंचेचाळीसी होऊन गेलेली असते. लग्न उशिरा झालं असेल तर पन्नाशीही होऊन गेली असते.

आताशा नवरोबा(कावळोबा) बऱ्यापैकी सेटल झालेला असतो. पण..पण त्याच्या बायकोचं मेनोपॉज सर्कल स्टार्ट होतं. अनियमित पाळी येऊ लागते. चिडचिड होऊ लागते. प्रणयाची इच्छा विरुन जाते.

अतिरक्तस्त्राव,फायब्रॉईड,स्थुलता अशी विविध दुखणी बायकांच्या बाबतीत डोकी वर काढतात.

मुलांच्या शिक्षणाच्या धावपळीत बहुतांश बायका ह्या फ्रीजमधलं उरलंसुरलं संपवणं हेच आपलं आद्यकर्तव्य आहे असं मानत शिळंपाकं प्राशन करत स्वतःच्या देहाची हेळसांड करत आलेल्या असतात.

अंगातली ताकद कमी झाल्यावर संधीवात,कंबरदुखी डोकं वर काढते. नवरोबा बिचारा दार उघड दार उघड करत आंबूनचिंबून जातो.

पण तसं असलं तरी वेगळ्या मार्गानेही प्रेम करतात बरं का.

काही नवरोबा बायकोची दुखरी कंबर दाबून देतात. काही बायकोसाठी आवर्जुन संध्याकाळी गजरा घेऊन येतात. तिच्या आवडीचं आईसक्रीम घेऊन येतात.

तिला वेळेवर डॉक्टरकडे घेऊन जातात. कपड्यांची घडी घालून ठेवतात. कपाट आवरतात. बाजारातून लागेल ते वाणसामान, भाजी,फळं आणून देतात. बायकोला फळं खायला लावतात. तिच्या जेवणाकडे लक्ष ठेवतात. सिंकमध्ये भांडी असली तर घासतात. कपडे वाळत घालतात.

दुपारचा भात उरला असेल तर तो स्वतःच्या ताटात घेतात जेणेकरुन बायकोने ताजा भात खावा.. असंही न बोलता काही नवरोबा प्रेम करत असतात.

बायकाही नवऱ्याच्या आवडीचे लाडू करुन ठेवतात. थंडीत त्यांच्यासाठी ड्रायफ्रुट्स आणून ठेवतात. त्याचे इनर्स आणण्यापासून सर्व कामं आवडीने करतात.

इतकंच काय एकमेकांच्या मनातले विचारही ही नवराबायकोची जोडगोळी ओळखू लागते. एकमेकांच्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेतात. तरुणपणीच्या आठवणींत हरवतात. लुटूपुटूची भांडणंही जेवणातल्या लोणच्यासारखी चालूच असतात.

मुलांची शिक्षणं पुर्ण झाली की त्यांची लग्नकार्य होतात. बरीच मुलं नोकरीच्या ठिकाणी आपला संसार थाटतात. ही जोडगोळी मग मुलांच्या आठवणी काढून डोळ्यांच्या कडा ओल्या करते. एकमेकांना खूष ठेवण्याचा प्रयत्न करते. बायकोचं जुनं काहीतरी सासुचं,नणंदेचं काढून वाद घालणं चालूच असतं. पण तेही मनापासनं नसतं. असंच आपलं टाईमपास म्हणून.

प्रत्येकाची आपापली गोळ्यांची पुडकी तयार होतात. बीपी,डायबेटीस,ह्रद्यरोग,एसिडीटी..अनेक दुखणी दोघांचाही नको जीव करतात. तरी दोघंही आपापल्यापरीने एकमेकांना सांभाळत असतात. एकमेकांशी भांडत असतात, पुन्हा काहीच न झाल्यासारखे एकत्र येत असतात भूतकाळातची पान पालटून गुजगोष्टी करत फावला वेळ व्यतित करतात. रोज उठून दोघंही जीवंत आहोत याबाबत परमेश्वराचे आभार मानतात.

या दोघांतल कोणीतरी एक भुर्रकन उडून गेलं की जोडीतला दुसरा पक्षी मग कासावीस होतो. जोडीदाराच्या भुतकाळातल्या आठवणी मऊ दुलईसारख्या अंगाशी लपेटून पुढचा जीवनप्रवास करत रहातो.

------गीता गजानन गरुड.