#आखिर_मैने_पेचअप_करवा_ही_दिया!
समीर व सविता दोघांनी वेगळं होण्याचा निश्चय केला. छोटा शुभ कुठे रहाणार हे प्रश्नचिन्ह होतं पण शक्यतो मुलाला आईकडेच रहाण्याची परवानगी कोर्ट देतं.
समीरचं म्हणणं.।
मला मुळी कोर्टकचेरीत पडायचंच नाही कारण तसंही सविताला उंच उडायच आहे. तिला बंधन नकोय ..कोणाचच ना नवऱ्याचं ना मुलाचं..तिला हवं आहे फक्त आणि फक्त करिअर. त्यासाठी तिचा सारा आटापिटा चालला आहे.
सगळ्या कामाला घरात बाई. शुभचं सगळं बाईच करते. सविताला रात्री यायला बारा एक वाजतो. तोपर्यंत शुभ झोपलेला असतो. सकाळी तो उठायच्या आधी सविता ऑफीसमध्ये. वीकेंडलाही बहुधा ऑफीसच. तिला खूप खूप मोठं व्हायचंय. तिला संसार नकोय.
मी हल्ली बोलत नाही तिच्याशी. माझी नोकरी गेली म्हणून घरी बसून असतो तर हिचा माझ्यातला इंटरेस्टच संपलाय. मी मोबाईलवर वेळ घालवतो माझा तर किती जळते नुसती. मी नाही बोलत तिच्याशी पण ती तरी कधी बोललेय का आपणहून माझ्याशी. एवढा कसला इगो🙄. वेगळं झालेलच चांगलं असं धुमसत रहाण्यापेक्षा.
अर्थात हा झाला समीरचा व्हयू
------------------
सविताचाही पाहूया..
सात वर्ष झाली आमचं लग्न होऊन. समीरची कसली ती प्रगतीच नाही. एका रांगोळी प्रदर्शनात भेट झालेली आमची. त्याच्या रांगोळ्यांच्या प्रेमात पडले मी. काय त्या एकेक रंगछटा. निसर्गचित्र, ती त्याने साकारलेली संध्याकाळ,समुद्रात बुडणारा तो लालबुंद गोळा आणि त्यावेळच्या आकाशाच्या त्या निरनिराळ्या छटा,ते घरट्याकडे परतणारे पक्षी, तो समुद्रकिनारा,आजुबाजूची नारळपोफळीची झाडं..ती साद घालू लागली मला माझ्या स्वप्नात. त्याच्या दुसऱ्या प्रदर्शनाला आवर्जून गेले मी. तर मलाचं साकारलेलं त्यानं रांगोळीतून. काय ते भाव..माझ्याच मी प्रेमात पडले क्षणभर. त्याच्या बोटांच चुंबन घेतलं. त्याच्या कलेत वहावत गेले. मैत्रीच्या रोपट्याची प्रेमलतिका कधी झाली कळलंच नाही.
आईबाबांनी विरोध केला. कारण तो फक्त एक रांगोळीकार होता व प्रायव्हेट नोकरी..तीही बिनभरवशाची..पण तरीही विरोधाला न जुमानता मी केलं समीरशी लग्न.पैशाचा प्रश्न नव्हताच. मला पुरेसा पगार होता.
पहिली चार वर्ष कित्ती मजेत गेली. आमच्या संसारवेलीवर एक छानसं फुल फुललं. शुभदिनी फुललं. शुभ नाव ठेवलं आम्ही. तसं आधीच ठरवलेलं मुलगा झाला तर शुभ मुलगी झाली तर शुभदा. किती जपायचा समीर मला व शुभला. पण त्याची नोकरी गेली आणि तो चिडचिडा होऊ लागला. रंगांशी मैत्रीही तोडली त्याने.
मला शुभचं भविष्य साकारायचंय. घर चालवायचंय. मला नाही झेपत ऑफीसमधून येऊन घरकाम करणं. नाही म्हणजे पहिले समीर खूप सांभाळून घ्यायचा. घरी असला की बराच हातभार लावायचा. शुभला भरवायचा,कुकर लावायचा,कधी पुलाव करायचा,नॉनवेजही छान जमतं त्याला .मला आवडतं त्याच्या हातचं नॉनवेज.
पण नोकरी गेल्यावर सगळंच सोडलं त्याने. नुसता मोबाईल घेऊन बसून असतो. वायफायवर गप्पा मारत असतो. एक नोकरी गेली तर दुसरी नको का बघायला? बरं घरात मदत करायचीही बंद झाला.
आमच्या ऑफीसमध्ये एक काकू लादी पुसायला यायच्या. त्यांच जवळचं कोणीच नव्हतं. मुलगा आहे पण वेगळा रहायचा मग मी विचारलं त्यांना आमच्याकडे रहाल का तर हो म्हणाल्या.
सकाळी उठल्यापासून सारी कामं करतात. शुभलाही छान सांभाळतात पण तेही समीरला पटत नाही. माझी महत्त्वाची प्रोजेक्ट्स आहेत. म्हणून घरी यायला लेट होतो. शुभशी खेळताही नाही येत मला. तो लहान असुनही समजून घेतोय मला. पण समीरने गेले चार महिने अबोला धरलाय माझ्याशी.
कोणाला सांगू मी माझ्या मनातलं. मला व्यक्त होऊच देत नाही तो. खरंच नाही हव्यास मला या नोकरीचा. समीर तुला हवं तर मी घरी बसते पण मग तू कर की रे नोकरी. सांभाळ आपलं घरटं. पण नाही तो बोलतच नाही माझ्याशी तर कसं सांगू त्याला.
शुभला आईबाबा दोघंही हवे आहेत. आईबाबांशी खेळायचंय त्याला. घरातली शांतता गुदमरुन टाकतेय त्याचं शैशव. हल्ली समीर सिगारेट ओढू लागलाय.ड्रिंक्स घेऊ लागलाय. त्याचे सो कॉल्ड मित्र पुरवतात त्याला पैसे. नको रे समीर असा वहावत जाऊ. खरंच मला पुर्वीचा समीर हवा आहे. पण हा तर तोडायला निघाला आहे. मीही मग हो म्हंटलं. शुभ तर लहान आहे त्याला काय कळतंय?
-------------------
शुभचं ऐकूया जरा..
हो आहे मी लहान, पण कळतय मला बरचसं. सहा वर्ष होतील मला. हा बाबा दिवसभर घरात असतो. सिगरेट ओढतो. त्याचा धूर नकोसा होतोय मला. गुदमरून टाकतोय मला.
आजी छान सांभाळतेय मला. आई दिवसभर ऑफीसात..ती भेटतच नाही मला. कधी भेट झाली तर कित्ती पाप्या घेते माझ्या! खूप खूप रडते ती. तिला काय होतंय नाही कळत मला. काल मला जवळ घेतलन आणि भरपूर रडली..खूप वेळ रडतच होती.
हा बाबा बाजूलाच झोपलेला पण विचारलंन नाही तिला काय होतंय म्हणून. मीच गेलो त्याला सांगायला आई रडतेय म्हणून तर म्हणाला,"रोजचीच नाटकं आहेत तिची. रडूदेत तशीच. च्याऐला कंटाळा आलाय मला तुझ्या आयशीचा." मीच मग आईजवळ गेलो . तिच्या कुशीत शिरलो. माझ्या टीशर्टने तिचे डोळे पुसले.
सकाळी बाबा आईला सांगत होता की एकत्र रहाण्यासारखं काही उरलं नाही. सो इट्स टाईम टू गेट सेपरेट. मला तर धडकीच भरली. आईबाबा मला तुम्ही दोघे हवे अहात. मीच कायतरी आयडीया करतो. म्हणजे तुम्ही एकत्र याल.
मी आज मुद्दाम औषधाची बाटलीच तोंडाला लावली पुरी पिऊन टाकली.बघुया काय होतंय ते. मी गेलो तरी चालेल पण बाप्पा माझ्या आईपप्पांची बट्टी होऊ देत.
---------------
आज दुसरा दिवस मी इस्पितळात आहे. माझ्या बाजूला दोन्हीकडचे आजीआजोबा बसलैत. बाबा आईची माफी मागताहेत. दोघं एकत्र आले वाटतं.
डॉक्टर त्यांना सांगताहेत. बाळ ठीक आहे. आत्ता धोका नाही पण परत अशी औषधं त्याच्या हाताला लागतील अशी ठेवू नका.
अरे च्यामारी आत्ता औषधं परत घेतय कोण? माझ्या आईबाबांमध्ये बट्टी झाली. एवढंच तर हवं होतं मला. कसे गप्पा मारताहेत एकमेकांशी. खूपच बरं वाटतंय मला.
बाबा सांगतोय आईला तो परत नोकरी शोधणार,सिगारेट पिणार नाही,ड्रिंक्स घेणार नाही म्हणून. चलो जो होता है अच्छे के लिए होता है. आखिर मैंने पेचप करवाही दिया.🤗
---गीता गजानन गरुड.