रात्री कुठं कुठं गाडी थांबली रस्त्यावर किती ट्रॅफिक जाम लागली याचा मला जराही थांगपत्ता लागला नाही.
पहाटे पहाटे कुठंतरी गाडी थांबली होती. बहुतेक फॉरेस्ट चेकपोस्ट असावं .. हळूच खिडकीची काच सरकवून बाहेरचा अंदाज घेऊ लागले. सपकन पावसाची एक सर तोंडावर आली.
बाहेर पावसाची संततधार सुरूच होती. मी बसमध्ये पाठी वळून बघितले तर रात्री जागुया म्हणणारे हवशे गवशे मस्त गाढ झोपेत होते.
साधारण तासभरात आम्ही पाचनाईला पोहचलो. बस पार्किंग करत असताना तिथं अगोदरपासूनच उभ्या असलेल्या बसेस आणि कार बघून आज गडावर नक्कीच जत्रा भरणार याची खात्री पटली.
हल्ली त्या इंस्टाग्रामवर रिल्स टाकून स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणाईचा कल गड किल्ल्यांवर वाढू लागला आहे. त्यात गड आणि त्याचा इतिहास राहिला बाजूला..
मेरी रिल तेरी रीलसे कैसे हटके है . याचीच फुशारकी जास्त असते.
ट्रेकला सुरवात करण्याअगोदर सकाळचे प्रातर्विधी , मुखमर्जन करून आणि नाश्तासाठी जे उपलब्ध होते ते पोटात ढकलले. पोटोबालाही शांत करने गरजेचं. एकदाका ट्रेक सुरू झाला की पुन्हा खाली येईपर्यंत जेवण नाही मग. हा, काही गडांवर तिथले स्थानिक खाण्यापिण्याची सोय करतात. या स्थानिकांबद्दल मला नेहमीच आदर आणि कौतुक वाटतं. अगदी लहान लहान पोरं पोरीही डोक्यावर खाण्याच्या वस्तू घेऊन गड चढतात. एवढं असूनही त्यांच्या चेहऱ्यावर त्रासाचा किंवा तक्रारीचा एवढासाही लवलेश नसतो. नाहीतर आपण , जरा कुठं काही कमी पडलं की लगेच रडगाणे सुरू करतो.
आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी या लोकांच्याकडून जगण्याची प्रेरणा घेण्यासाठी एक तरी ट्रेक करावा.
यावेळचा ग्रुप थोडा मोठा असल्याने साहजिकच ट्रेक सुरु करायला उशीर झाला. गडाच्या पायथ्याशी जाणारा रस्ता गावातूनच जातो. वाटेत लागणारी उतरत्या छपरांची घरे, मधेच लागणारा एखादा पाण्याचा ओहोळ , कौलारू पण बाहेरून तरी बऱ्यापैकी सुस्थितीत दिसणारी शाळेची इमारत . आता या शाळेचा पट किती असेल त्या परमेश्वरालाचं माहीत.. आज रविवार असल्याने मुलांचा किलबिलाट कानावर आला नाही.
बाजूलाच असणाऱ्या घराच्या दारात एक आजी आमच्याकडे बघत उभ्या होत्या. त्यांच्या नाकातील भल्या मोठ्या नथीने माझे लक्ष वेधले. मी अनिलला म्हणाले देखील "फोटो काढू या का यांचा. " तो ही तयार झाला. पण काय वाटले कुणास ठाउक मीच नको म्हणाले. वळून पुन्हा त्यांना पाहिलं तर त्या बघून प्रसन्न हसल्या. भारी वाटलं . चला , दिवसाची सुरुवात छान झाली.
आधीच ट्रेकला उशिरा सुरवात झालेली त्यात माझा नी अनीलचा हा वेग बघून आमच्या हुशार ट्रेक लीडरने वैतागून "चला पटपट येताना फोटो काढा . आता इथे उशीर केलात तर परत यायला उशीर होईल." सुचानारुपी आज्ञा दिली.
आमच्याही ध्यानात ही गोष्ट आलीच होती. त्यात भरीस भर म्हणजे आज वरूणदेव भारीच जोशात होते . नुसतं धो धो कोसळण चालू होतं .अजिबात विश्रांती घ्यायचं नावच नाही.
बर ,चुकून समजा थोडावेळ 'टाइम प्लिज' म्हणून ब्रेक घेऊन थांबले तर बदमाश धुकं लगेच आपला डाव साधून घ्यायचं. क्षणात असं पसरायचं की समोरचं काहीही दिसायचं नाही.
पाऊस आणि धुक्याच्या या लपंडावात आम्ही अस्ते
अस्ते , कदम कदम बढाये जा , एक दुसरे का जोश बढाये जा असं करत करत दीड तासाचा ट्रेक करून एकदाचे गडाच्या पठारावर जिथं भगवान शंकराचे मंदिर आहे तिथं येऊन पोहचलो.
वरती येताना फोटोच्या नादात मी अनिलचा रेनकोट कुठेतरी विसरले. बिचाऱ्याने नंतरचा पूर्ण ट्रेक सपासप कोसळणाऱ्या पावसाचा मारा सहन करत आणि कुडकुडत पूर्ण केला. पण एका शब्दाने बायकोवर राग काढला नाही. मी मनात विचार केला. इथे जर मी असते आणि त्यानं माझा रेनकोट हरवला असता तर ... तर.... वाचकांनी इमॅजिन करावे..😁😁 गडावरच राणी लक्ष्मीबाईने तलवार उपसून अनिल नावाच्या क्षुद्र जीवास पळता भुई थोडी केली असती.