Harishchandragad - 1 in Marathi Short Stories by Dr.Swati More books and stories PDF | हरिश्चंद्रगडावर - भाग 1

Featured Books
Categories
Share

हरिश्चंद्रगडावर - भाग 1

केदारनाथ ट्रेक करून आल्यानंतर दोन तीन आठवडे सर्दी आणि खोकल्याने सगळे बेजार झालो होतो.

जरा कुठे बरं वाटायला लागले नाही तर लगेच नवऱ्यानं जाऊया का एखाद्या ट्रेकला.?

"अरे, आताशी कुठं थोड बरं वाटतंय. पुढच्या महिन्यात जाऊया. तुला जायचं असेल तर तू जा."


माझं हे निर्वाणीच बोलणं ऐकून आमच्या साहेबांनी चेहरा पाडला.


"तुला माहीत आहे . मी एकटा तुझ्याशिवाय ट्रेकला जात नाही. राहुदे, बघू पुन्हा कधीतरी."


स्वारी अशी बोलली खरी . पण चेहरा उतरलेलाच होता.


"बरं बाबा, चल जाऊया. पण जरा सोप्पा ट्रेक बघ."


पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून राजे लगेच ट्रेकग्रुप वर येत्या आठवड्यातील अपडेट पाहू लागले.


"हरिश्चंद्रगड जाऊया. पाचनाई मार्गे आहे. मार्ग जास्त अवघड नाहीये आणि आपण अजून एकदाही गेलो नाही या गडावर.मयुरेशला फोन करून बुकींग करतो."


त्याची खुललेला चेहरा पाहून आपण ट्रेकला जातोय की सेकंड हनिमूनला मला हेच कळत नव्हतं.


तेवढ्यात आमचं शेंडेफळ आलंच.


"कुठं जाताय .."


"बाळा, तू ही चल नाहीतर सध्या तुला सुट्टीच आहे. घरात बसून नुसती गाढवासारखी लोळत असतेस."


"पप्पा तुम्ही तर गप्पच बसा.. तुम्ही काय करता सुट्टीच्या दिवशी तेच मी ही करते. मी नाही येणार ट्रेकला. तुम्ही दोघंच जा."


बापलेकीचा प्रेमभरा संवादाची गाडी अजून भरकटण्याआधी मी तो मधेच तोडला आणि ट्रेकची तयारी करूया असं सांगून नवऱ्याला आणि मुलीला कामाला लावले.


ऐन पावसळ्यात ट्रेक करायचा असल्याने गरजेच्या सर्व वस्तू बॅगेत भरल्या.


नेहमीसारखं शनिवारी रात्री मुंबईवरून निघून सकाळी बेस विलेजला( गडाच्या पायथ्याशी असणारे गाव) पोहचायचे होते.पावसाने थोडी उघडीप दिल्याने रात्री गाडीत बसेपर्यंत कपडे भिजण्यापासून वाचले नाहीतर रात्रभर कुडकुडत प्रवास करावा लागला असता.


हळू हळू बाकीची मंडळीही एक एक करून जॉईन होऊ लागली. मला वाटतं आम्ही दोघंच काका काकू प्रकारात मोडत होतो बाकीचे सर्व तरुण पोरं पोरी. त्यात आम्ही दोघंही दुसऱ्या सीटवर विराजमान झालेलो असल्याने जो कोणी बसमध्ये चढेल त्याचं लक्ष अगोदर आमच्याकडे जायचं आणि त्यातील काहींची नजर अशी असायची की 😳😳..आम्हाला त्यांना सांगावेसे वाटे की आम्ही नेहमी ट्रेक करणाऱ्यापैकी आहोत. So don't worry. 🤨


बसने आता चांगलाच वेग पकडलेला होता. मी आपली खिडकीतून येणारा गार वारा अंगावर घेत काचेवर डोकं टेकवत झोपायची तयारी करू लागते.


अन् तेवढ्यात , 'अरे गाणी लावा कोणीतरी. कोणी झोपू नका रात्रभर.' असं फर्मान सोडले . माझ्या झोपेच खोबरे करणारा हा कोण? मी थोडी त्रासिक नजरेनं पाठी वळून पाहू लागले.पण त्या अज्ञात इसमाचा पत्ता लागला नाही. माझी थोडी चिडचिड होते. पण आता काय , आलिया भोगासी असावे सादर . शांत डोळे मिटून जी गाणी वाजत होती त्याचा आनंद घेत घेत तरी झोपूया असा भाबडा आशावाद ठेऊन कानावर पडणारे 'बिडी जलयले जिगर से पिया' असो वा मधेच येणारा 'अरजित' असो. त्या गाण्यांनी हळू हळू माझ्याही मनाचा ताबा घेतला.

तन डोले मेरा मन डोले असं होतंय ना होतंय तोच आमच्या DJ बाबूने की बेबीने गाणे बदलले. आता एकदम सैराट मधला पर्शा आला आणि तरुणाई सोबत आम्हीही 'याड लागलं , याड लागलं ' गुणगुणू लागलो.


असं एकंदरीत भारी चाललं असताना मागच्या पोरापोरींना अचानक जोश येतो आणि आतापर्यंत कर्णमधुर वाटणारा गाण्यांचा आवाज एकदम कर्कश होऊ लागतो. थोडा वेळ मी तो सहन करते . नंतर मात्र माझी सहनशक्ती संपते. बाजूला बसलेल्या अनिलच्या लक्षात येतं . बायकोरुपी बाँब कधीही फुटू शकतो आणि त्याची जास्तीत जास्त झळ जवळच्या राष्ट्राला म्हणजे म्या पामराला बसणार हे ताडून "आवाज कमी करायला सांगू का त्यांना. आजची तरुण पिढी अशीच , नुसता धिंगाणा चालू आहे मगापासून.. आपण ट्रेकला जातोय की पिकनिकला.. "

बायकोचा राग कमी करण्याचा नवरारुपी बफर आपला प्रामाणिक प्रयत्न करत होता. परंतु तो इतक्या हळू आवाजात बोलत होता की नाच गाण्यात दंग असणाऱ्या त्या टोळक्याला एक शब्दही ऐकू गेला नसेल.


आपल्या नवऱ्याला आपली किती काळजी आहे. हे बघून बायकोही सुखावते आणि बाकीचेही दुखावले जात नाहीत.

"एक काम कर. कानात कापूस घालून झोप. त्यांना काय घालायचा तो धुडगूस घालू दे."


अशा पद्धतीने माझ्या हुशार नवऱ्याने दोस्त राष्ट्रे आणि शत्रू राष्ट्रे दोघांनाही खुश ठेऊन तिसऱ्या महायुद्धाची शक्यता टाळली.


शेवटी एकदाची निद्रादेवी माझ्यावर प्रसन्न झाली आणि मी झोपेच्या अधीन झाले.