देवयानी विकास आणि किल्ली.
पात्र परिचय
विकास नायक
देवयानी नायिका
सुप्रिया देवयानीची मैत्रीण
लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर.
राजू सुप्रियाचा मित्र
शीतोळे पोलिस इंस्पेक्टर
भय्या विकासचा मोठा भाऊ.
अश्विनी विकासची वाहिनी, भैय्याची बायको
भगवानराव विकासचे बाबा
यमुना बाई विकासची आई
गोविंद राव देवयानीचे बाबा
कावेरी बाई देवयानीची आई.
मावशी आणि काका देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर
मनीषा विकासची बहिण
अंकुश मनीषाचा नवरा.
सुरेश देवयानीचा भाऊ.
विश्राम देवयानीचा चुलत भाऊ.
विनोद विकास चा चुलत भाऊ
प्रिया विकासची चुलत बहीण.
सेजल देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
पूर्णिमा देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.
राजेश विकासचा मित्र.
भाग ३४
भाग ३३ वरून पुढे वाचा ......
“मग?” – देवयानी म्हणाली. एक अशुभ शंका तिच्या मानायला चाटून गेली.
“मग काय? आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो. विकासला कधी आम्ही आजारी पडतांना आजवर पाहीलच नव्हतं. मग डॉक्टर कडे नेलं तर ते म्हणाले की टेस्ट करून घ्या. मग टेस्ट केली, आणि जे नको होतं तेच झालं. तो पॉजिटिव निघाला. त्याला काल हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलं आहे.” – अश्विनी.
“अरे बापरे. आईग! कोरोंना आपल्या घरापर्यंत पण येऊन पोचला का. अरे देवा. आता कशी आहे त्याची तब्येत?” देवयानी आता हादरली होती.
“कल्पना नाही. त्याला भेटू देत नाहीत. इतकंच काय, हॉस्पिटलच्या दारात पण उभं करत नाहीत. कोरोंना चे सगळेच नियम वेगळेच आहेत. आणि अतिशय कडक आहेत.” अश्विनीनी हताश स्वरात सांगितलं.
“मग आपल्याला कसं कळेल की प्रोग्रेस काय आहे तो ?” – देवयानी.
“तसं ते सांगतात की सुधारणा आहे म्हणून. पण अग ५० लोक आहेत अॅडमिट, काय खरं आणि काय खोटं, काही कळायला मार्ग नाही.” – देवयानी.
“अहो वहिनी, पण असं कसं चालेल?” – देवयानी.
“आम्ही पण त्याच चिंतेत आहोत. ह्यांनी कोणाची तरी ओळख काढली आहे, हॉस्पिटलमध्ये, तो उद्या सांगतो म्हणाला. ते जाऊ दे. तुझं काय, तू भारतात येण्याचा प्रयत्न करते आहेस असं विकास म्हणत होता. काय झालं?” – अश्विनी
“ते गूऱ्हाळ चालूच आहे. सरकारी काम, वेळच लागणार आहे. बरं, मी उद्या पुन्हा फोन करेन, याच वेळी. तो पर्यन्त काही कळू शकेल. चालेल ना?” – देवयानी.
“चालेल. पण तू टेंशन घेऊ नकोस. उद्या सांगते तुला सर्व. आणि हे बघ, घाबरण्या सारखं काही झालं नाहीये. तसं असतं तर इतक्या शांत पणे मी बोलू शकले असते का? आमच्या डॉक्टरांनी त्याचा रीपोर्ट पाहीला. म्हणाले की काही विशेष नाहीये. पण सगळे प्रीकॉशन घेताहेत. तीन चार दिवसांत बरं वाटेल म्हणाले. ठीक आहे? उद्या बोलू. बाय.” – अश्विनी
“ओके. बाय.” – देवयानी.
दुसऱ्या दिवशी देवयानी बॉस शी बोलत होती.
“सर, त्या दिवशी तुम्ही मला तुमच्या मित्राची गोष्ट सांगितली होती, त्यांनी कसं खोटं सर्टिफिकेट दिलं ते, आठवतंय का ?”
“हो आठवतंय न, आणि त्यावर तू काय म्हणाली होतीस ते पण चांगलं लक्षात आहे माझ्या. का? काय झालं?”- देवयानीचा बॉस
“सर मी ते विकासला सांगितलं. तर तो काय म्हणाला ,माहीत आहे?” – देवयानी.
“काय?” – बॉस.
“तो म्हणाला की तो अॅडमिट आहे असं खोटं सर्टिफिकेट पाठवू का?” – देवयानी.
“बापरे, मग तू काय म्हणालीस?” – बॉस.
“मी खूप चिडले त्याच्यावर. असं खूपच अभद्र बोलायची काय जरूर होती? आठ दिवस बोललेच नाही, त्याच्याशी.” – देवयानी.
“अग, असं नको करूस. त्यानी गंमत केली असणार नक्कीच.” – बॉस.
“पण बघा ना सर, काय झालं ते. काल कळलं की त्याला कोरोंना झाला आहे आणि तो आता अॅडमिट आहे. हॉस्पिटल ने फोन बाळगायला मना केलं, त्यामुळे त्याच्याशी बोलणं पण होत नाहीये. बघा ना सर, वाईट, साईट बोललं की लगेच खरं होतं. आता मी इथे, मला तर समजतच नाहीये की काय करू ते.” - देवयानी.
“अग तू टेंशन घेऊ नकोस. डॉक्टर आहेत, तिथे त्याची काळजी घेतच असणार. तू चिंता करून काय होणार. Any way तुला कुठली डेट मिळाली आहे ?” – बॉस.
“अजून नाही, बहुधा ऑगस्ट मध्ये जायला मिळेल असं म्हणताहेत.” – देवयानी.
तो विषय तिथेच थांबला. आता कामाला सुरवात झाली होती.
रात्री देवयानीनी फोन केला. अश्विनीनीच उचलला.
“काय खबर वाहिनी?” – देवयानी.
देवयानी अधीर झाली होती. हे तिच्या कातर स्वरावरूनच अश्विनीच्या ते लक्षात आलं होतं, की तिला खूप काळजी वाटते आहे म्हणून.
“अग तो माणूस, विकासच्या तब्येती बद्दल सांगणार होता, त्यांनी ह्यांना सांगितलं की दोन च्या सुमारास हॉस्पिटल ला या. संबंधित डॉक्टरांशीच गाठ घालून देतो. प्रत्यक्षच त्यांच्याशी बोला. आता दोन वाजता हे जातील. ते आल्यावरच काय परिस्थिती आहे ते कळेल.” – अश्विनी.
“हूं.” देवयानीनी सुस्कारा सोडला. “अजून अनिश्चितता आहेच. पण निदान आपल्याला कळेल तरी. काय कंडिशन आहे ती.”
“हो, खरंय. तो पर्यन्त देवाची प्रार्थना कर.” – अश्विनी.
“हो, बरोबर आहे तुमचं वाहिनी. आपल्या जवळ दूसरा पर्याय तरी कुठे आहे?” – देवयानी.
“ठीक आहे मग, मीच आता रात्री तुला फोन करेन. ओके? उद्या शनिवार आहे न, म्हणजे मग आपल्याला सविस्तर बोलता येईल. तू आता झोप शांत पणे. काळजी करत उगाच जागू नकोस.” – अश्विनी.
“हो, मी वाट पाहते तुमच्या फोनची. ओके बाय.” – देवयानी.
रात्र भर देवयानी तळमळत होती. सलग अशी झोप लागतच नव्हती. जाग आली की विकास चा विचार मनात येऊन थरकांप व्हायचा. अमेरिकेत सुद्धा कोरोंना चा धुमाकूळ चाललाच होता. तिथल्या बातम्या तर अजूनच भयंकर होत्या. जाग आली की ती रामरक्षा म्हणायला सुरवात करायची. म्हणता म्हणता केंव्हातरी झोप लागायची. पुन्हा थोड्या वेळाने दचकून जागी व्हायची. असं करता करता पांच वाजले. मग तिने विचार केला की फोन लावावा का ? पण मग विचार आला की आत्ता भारतात तीन साडे तीनच वाजले असतील, म्हणजे डॉक्टर शी भेटून भैय्या भाऊजी अजून आले नसतील. मग पुन्हा एक डुलकी काढली. तिला एकदम नऊ वाजताच जाग आली. ती लगेच उठून बसली. फ्रेश झाली आणि फोन केला.
“देवयानी, अग रात्रभर जागी होतीस की काय?” – अश्विनी.
“नाही, नाही चांगली झोपले होते.” – देवयानी.
“आवाजावरून तर तसं वाटत नाही. खरं सांग.” – अश्विनी.
“नको ना वहिनी, सांगा न काय सिचुएशन आहे?” – देवयानी.
“ओके सांगते. हे जाऊन आले हॉस्पिटल मध्ये. डॉक्टर शी बोलणं झालं. विकासची प्रकृती तितकीशी चांगली नाहीये. ऑक्सिजन पर्सेंटेज कमी झालं आहे म्हणून ऑक्सिजन लागला आहे. दहा बारा दिवस तरी हॉस्पिटल मध्ये राहावं लागेल असं
म्हणताहेत. क्ष-किरण फोटो काढला, त्यात छातीत पॅचेस आढळले आहेत. खोकला पण आहेच. ते कुठलं तरी रेमडेसीवीर नावाचं इंजेक्शन आहे ते द्यावं लागणार आहे.” – देवयानी.
“अरे देवा,” देवयानी म्हणाली आणि तिला स्वत:ला आवरता आलं नाही. ती रडायलाच लागली. आणि नकळतच तिने फोन बंद केला.
सगळे जण हॉल मध्येच होते. आणि अश्विनीने फोन स्पीकर वर टाकला होता. त्यामुळे ती रडते आहे हे सर्वांनाच कळलं पण कोणीच काही करू शकत नव्हते. आधी त्यांनी ठरवलं होतं की देवयानीला सगळं ठीक आहे असच सांगायचं पण नंतर सर्वांचंच असं मत झालं की देवयानीला सगळं कळायलाच हवं. शेवटी ती त्याची होणारी बायको आहे.
पांच मिनिटांनी अश्विनीनी देवयानीला फोन लावला. या वेळी विडियो कॉल लावला. अश्विनीला अपेक्षा नव्हती की ती कॉल घेईल म्हणून पण देवयानीनी तो घेतला. देवयानीचा चेहरा बघितल्यावर सगळ्यांनाच धस्स झालं. देवयानी अजूनही रडतच होती.
“अग शांत हो देवयानी, इतकी काही परिस्थिती वाईट नाहीये. काळजी करण्या सारखी आहे, पण इतकी क्रिटिकल नाही. बघ आम्ही कोणी रडतो आहे का? शांत हो बाळा.” – विकासची आई बोलली, तिला धीर दिला.
“तुमच्या चेहर्यांवरूनच दिसतंय आहे की किती काळजीत आहात तुम्ही लोकं. असं व्हायलाच हवं होतं का हो वहिनी? पहा न किती विघ्न येताहेत आमच्या लग्नात.
तुम्हाला सांगते वहिनी, आमचा बॉस एकदा म्हणाला होता की वडील अॅडमिट आहेत असं खोटं सर्टिफिकेट देऊन त्यांचा मित्र लवकर भारतात गेला. तू का नाही करत असं? मी सांगितलं त्यांना की मी असं काहीही करणार नाही म्हणून. हे विकासला सांगितलं तर तो म्हणाला की ‘मी पाठवू का मी अॅडमिट आहे असं सर्टिफिकेट’ मी इतकी चिडले त्याच्यावर की आमचं आठ दिवस बोलणंच नाही झालं. आणि आता बघाना कशी बोला फुलाला गाठ पडली आहे ते. असं बोलावं का हो त्यानी? का हो असं अभद्र बोलला तो? तेंव्हाच माझ्या मनात पाल चूक चुकली होती.” देवयानी म्हणाली.
आणि हे बोलता बोलताच देवयानी पुन्हा रडायला लागली. आता सर्वांच्या लक्षात आलं की देवयानी एवढी हमसून हमसून का रडते आहे ते. त्यांनाही विकासचा रागच आला. पण आत्ता या क्षणी देवयानीला समजावणं आवश्यक होतं.
नेहमी हसतमुख असलेल्या देवयानीचा देखणा चेहरा आज काळवंडून गेला होता. एक प्रकारची पिळवटून टाकणारी वेदना तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिला असं पाहून अश्विनी आणि यमुनाबाईंना सुद्धा रडायला आल. पण त्यांनी कसं बसं स्वत:ला सावरलं. थोड्या वेळाने देवयानी रडायची थांबली. उठून washroom मध्ये जाऊन फ्रेश होऊन आली. आता नेहमी सारखी नाही, पण बरीचशी पूर्व पदावर आली होती.
“ते कुठलं इंजेक्शन म्हणत होता, ते दिलं का ?” – देवयानीनी विचारलं.
“नाही ते उद्या मिळणार आहे असं डॉक्टर म्हणत होते.” – अश्विनी.
“उद्या मिळणार आहे म्हणजे ? आपण आणू शकत नाही का ?” – देवयानी.
“नाही त्याचा काळा बाजार व्हायला लागला म्हणून सरकार ने त्याचं वितरण आपल्या ताब्यात घेतलं आहे. ते डायरेक्ट हॉस्पिटललाच देतात. इथल्या कलेक्टर ऑफिस मधूनच वितरण होतं.” अश्विनीनी सांगितलं.
क्रमश: ........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.