दोघेही गप्प असतात पण दोघांच्या मनात खूप काही विचार चालू असतात. आणि डोळ्यात दिसत असतो प्रचंड राग...
"तू इथे कशाला आला आहेस? नालायक"- गौरी
"तोंड सांभाळून बोल जरा आणि माहित नाही का तुला इथे मी मुलगी बघायला आलोय ते?"- वरद
"निघायचं हा आत्ताच्या आत्ता इथून निघायचं" गौरी चिडून बोलत होती.
"मला काही हौस नाही तुझ्या दारात पाय ठेवायची. तुला बघायला येतोय हे माहीत असतं तर आलोच नसतो मी इथे परस्पर नकार कळवला असता"- वरद
"हो मी जशी काय तुझ्याशी लग्न करायला होकारच देणारे."- गौरी
"देऊ पण नकोस. उगाच आलो इथे तुझं तोंड बघावं लागलं मला"- वरद
"मग कशाला थांबलाय निघ ना आता"- गौरी
"गौरी अग बोलून झालं असेल तुमचं तर या सगळे वाट बघत आहेत"- साईश त्यांना बोलवायला आला होता.
दोघेही त्याच्या सोबत पुन्हा घरात जातात.
"काय मग झालं का बोलून की सगळा वेळ लाजण्यातच घालवला?"- मयुरी वहिनी दोघांना चिडवू लागली.
गौरी फक्त एक खोटी स्माईल देते. दोघांच्या घरच्यांचे विचार चांगलेच जमलेले असतात. गप्पा सुद्धा रंगलेल्या असतात. वरद आणि गौरी मात्र गप बसून असतात. थोड्यावेळाने देसाई कुटुंब त्यांच्या घरी निघून जातात.
"छान वाटले हो घरचे. म्हणजे त्याचा भाऊ आणि वहिनी सुद्धा बोलकी आणि गोड आहे स्वभावाला. मुलगा थोडा लाजत होता वाटतं काही विशेष बोलला नाही"- भाग्यश्री ताई
"हो मला पण आवडलं. आपल्या गौरी साठी परफेक्ट आहे मुलगा आणि कुटुंब"- प्रतापराव
"अहो बाबा सगळं चांगलं आहे पण लग्न गौरीला करायचंय तिला तर विचारा मुलगा कसा वाटला तिला"- साईश
"तिला काय विचारायचं आपण आहोत की तिचं चांगलं वाईट बघायला. आणि एवढ्या चांगल्या मुलाला नकार थोडी देणारे आपली गौरी. काय ग बरोबर ना?"- प्रतापराव
"बाबा ते मला नाही आवडला मुलगा म्हणजे नाही जुळणार आमचं"- गौरी
"अग पण काय वाईट आहे? म्हणजे नक्की काय नाही आवडलं तुला त्याच्यात?"-भाग्यश्री ताई
"अहो एवढं प्रेमाने बोलायची काही गरज नाही. नाटकं आहेत सगळी फक्त लग्न टाळण्यासाठी"-प्रतापराव
"बाबा असं काही नाहीये. बोललो आम्ही दोघं, विचार वेगळे आहेत आमचे. तिथून सुद्धा नकारच येणारे खात्री आहे मला"-गौरी
"आणि जर होकार दिला तर?"-प्रतापराव
"होकार दिला ना त्यांनी तर तोंडातून एकही शब्द न काढता गपचूप लग्नाला उभी राहीन"- गौरी रागात बोलून बेडरूम मध्ये निघून गेली.
इथे देसाईंच्या घरात सुद्धा गप्पा रंगल्या होत्या. मयुरी वहिनी आणि स्वाती ताई तर गौरीचं खूप कौतुक करत होत्या. त्यांना गौरी खूपच आवडली होती.
"अरे यार मी पण यायला पाहिजे होतं मला बघायचं होत तिला"-अनुष्का तोंड बारीक करून बोलली.
"अग मी आहे ना तू कशाला टेन्शन घेतेस. हे बघ मी गपचूप फोटो काढला तिचा आणि तुझ्या वरद दादा चा. बघ कसे खाली मान घालून लाजून बसलेत"- मयुरी वहिनी अनुष्का ला फोटो दाखवतात.
"अग असं करतात का. तिला न विचारता कशाला फोटो काढायचा!"- स्वाती ताई मयुरीच्या पाठीत हळूच गमतीने मारत बोलतात.
"अहो आई चालतं की तेवढं. पण आपण सगळे इथे ज्यांच्या साठी चर्चा करत बसलोय ते आहेत कुठे?"-मयुरी वहिनी
"अग त्याने आम्हाला सोडलं गेट पर्यंत आणि मग बाहेर निघून गेला"- स्वाती ताई
"ते बघा आला दादा"- अनुष्का जाऊन वरदला मिठी मारते.
"आलं ग माझं बाळ ये बस इथे"- सुलभा आजी. वरद आजी जवळ जाऊन बसतो.
"काय रे मग कशी वाटली तुला गौरी?"- स्वाती ताई
"आई प्लिज मला या विषयावर काही बोलायचं नाही. तुम्ही हट्ट केला म्हणून आलो ना मी मुलगी बघायला. आता पुन्हा चर्चा नको"- वरद
"अहो तुमच्या मुलाला सांगा उपकार नाही केले येऊन."- अनंत राव
"वाह हे चांगलं आहे हा बाबा तिथे सगळ्यांसमोर आमचे चिरंजीव आणि आता मी तुमचा कोणी नाही?"- वरद
"जाऊदे रे वरद बाळा तुला माहितीये ना ते नाही बोलणार तुझ्याशी आता किती वेळा तो विषय काढणार"- स्वाती ताई
"पण का आई? जी चूक मी कधी केलीच नाही तर त्याची शिक्षा मी का भोगू?"- वरद
"ही वेळ नाहीये हा विषय बोलायची. विषय भरकटत चाललाय"- स्वाती ताई
"बाळा बाकीच्यांच जाऊदे तू मला तरी सांग कशी वाटली तुला ती?"- सुलभा आजी
आता आजीला तो दुखवू शकत न्हवता आणि टाळू पण शकत न्हवता. आजी आणि त्याच नात कॉलेज मध्ये भेटलेल्या मित्र मैत्रिणी सारखं होतं.
"आजी अग मला खरच नाही आवडली ती. खूप हट्टी आहे ती स्वभाव पण फार चांगला नाही तिचा"- वरद
"काहीही बोलू नको हा वरद आम्हाला तस काही वाटलं नाही"- कैवल्य
"स्वतः चे गुण सांगतायत ते. त्यांना लग्न नाही करायचंय तर त्या गरीब मुलीत दोष काढणार"- अनंत राव
"बाबा काही गरीब वैगेरे नाहीये ती"- वरद
"तुला काय माहीत? एका भेटीत कळलं तुला? की आधी पासून ओळखतो तिला?"- कैवल्य
"मी कशाला ओळखेन तिला. मला एका भेटीत माणसं कळतात"- वरद नजर चोरत बोलला.
"पण मला तर मुलगी आवडली खूप"- स्वाती ताई
सगळे जण मयुरीच्या हो मध्ये हो मिसळतात. सगळ्यांनाच गौरी खूप आवडलेली असते.
"त्यांना आपला निर्णय काळवायचा आहे दोन दिवसात. आणि सगळ्यांना आवडली आहे मुलगी तर चांगल्या कामात उशीर कशाला? आताच होकार काळवूया"- अनंत राव
"मी तिच्याशी लग्न करणार नाही"- वरद
"अहो ह्यांना सांगा त्याच मुलीशी लग्न करावं लागेल"- अनंत राव
"पण लग्न मला करायचंय ना मग माझी मर्जी नसताना मी का लग्न करू"- वरद
"ह्यांची मर्जी असतांना ह्यांनी खूप रंग उधळलेत आता मी काही ह्यांच ऐकणार नाही. आता मी सांगेन तेच होईल."- अनंत राव
"बाबा आजतरी माझ्याशी बोला स्पष्ट हे सारख सारख आईला किंवा इतर कोणाला उद्देशून का बोलता माझ्याशी?"- वरद
"तुला माहितीये बाबा का नाही बोलत तुझ्याशी तर तू का रे सारख तेच तेच बोलतो जाऊदे ना आणि त्याचा इथे काही संबंध पण नाहीये"- कैवल्य
"संबंध आहे दादा म्हणूनच बोलतोय. हे ज्या मुलीशी माझं लग्न लावायला चाललेत ना ही तीच आहे जिच्यामुळे बाबांनी माझ्याशी बोलणं टाकलंय"- वरद रागात बोलून देतो आणि बोलल्यावर त्याला कळतं आपण हे काय बोलून गेलो.
"काय???" सगळे एक सुरात बोलतात. सगळ्यांनाच हे धक्कादायक होतं.
"बघितलं आज पर्यंत तुम्ही आम्हाला खोटं ठरवलं पण आज तुमच्या मुलानेच काबुल केलं ना"- अनंत स्वाती ताईंना म्हणाले.
"हे काय बोलतोयस तू वरद ते सगळं खरं आहे?"- स्वाती
"आई मी पुन्हा पुन्हा काही सांगणार नाही. ह्याच्या आधी खूप वेळा सांगून झालंय. मला त्या मुलीशी लग्न करायचं नाही बस"- वरद
"आता तर ह्यांना तिच्याशीच लग्न करावं लागेल"- अनंत
"बाबा पण आपण तिचा पण विचार केला पाहिजे म्हणजे तीच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे हा"- मयुरी वहिनी
"ह्याने तीच आयुष्य आधीच खराब तर केलंय आणि आता चूक सुधारायची वेळ आली आहे"- अनंतराव
"वरद मला पण पटतंय ह्यांच बोलणं"- स्वाती ताई शांतपणे म्हणाल्या.
"ह्यांना सांगा जर ह्यांनी त्या मुलीशी लग्न केलं तरच आम्ही ह्यांना माफ करू. ती मुलगी जेव्हा ह्या घरचं माप ओलांडून ह्या घरात पाय ठेवेल तेव्हा आम्ही माघार घेऊ आणि ह्यांच्याशी अधिसारखे वागू"- अनंतराव
अनंतरावांच्या बोलण्यावर सगळे शांत बसतात आणि आता वरद काय निर्णय घेईल ह्या कडे कान लावून बसतात.
"घाई नाहीये उद्या सकाळ पर्यंत निर्णय सांगा आम्हाला"- अनंतराव
सगळे जण आपल्या आपल्या खोलीत जातात. वरद न जेवताच झोपायला जातो. पण त्याला झोप येत नसते. तो अनंत रावांच्या बोलण्याचा विचार करत असतो.
'बाबा पण काय मागे लागलेत. आणि काय देवा तुला पण हीच मुलगी भेटलेली का. पण मी लग्न केलं तर बाबा बोलतील माझ्याशी. पण त्यांनी माझ्याशी बोलावं ह्या साठी मी त्या गौरी सोबत लग्न नाही करू शकत. मला कळत नाहीये मी काय करू. एक मिनिट, मी जरी होकार दिला तरी ती गौरी थोडी होकार देणारे आणि मी होकार दिला तर बाबा किमान माझ्याशी आधीसारखे वागतील तरी. आणि मला शंभर टक्के खात्री आहे ती गौरी नकार देणार मग मी कशाला टेन्शन घेऊ. चला वरद साहेब झोपा आता बिंदास"- वरद मनात विचार करत झोपून गेला.
सकाळी सगळे डायनिंग टेबल वर नाष्टा करत बसले होते. वरद त्याचं आवरून येतो. सगळे एकदम शांत बसून नाष्टा करत असतात.
"बाबा माझा निर्णय झालाय"- वरद
सगळे जण वरद कडे एकटक बघू लागले. अनंतराव फक्त खाली बघून नाष्टा करत होते पण कान मात्र वरद काय बोलेल ह्या कडे होते.
"बाबा मी तयार आहे लग्नाला. माझा होकार आहे कळवा त्यांना"- वरद
"अरे दादा खरच?"- अनुष्का खुश होते.
"अनु तुझा दादा कधीच खोटं बोलत नाही"- वरद अनंतरावांकडे बघत बोलला.
सगळे वरदचा निर्णय ऐकून खूप खुश झाले.
"अहो कळवा त्यांना. ते पण आपल्या निर्णयाची वाट बघत असतील"- स्वाती ताई
"हो आत्ताच कळवतो"- अनंतराव
अनंतराव प्रतापरावांना फोन करतात.
इथे घरी साईश जॉब वर गेलेला असतो. गौरी आणि भाग्यश्री ताई चहा पित असते. प्रतापराव न्युजपेपर वाचत असतात. इतक्यात प्रतापरावांचा फोन वाजतो. फोनवरच नाव वाचून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. ते घाईतच फोन उचलतात.
"हॅलो बोला अनंतराव काय म्हणताय"- प्रतापराव
"काही नाही छान चालू आहे सगळं आणि दिवसाची सुरुवात पण छान झाली"- अनंतराव
"अरे वाह निर्णय झाला वाटत वरद रावांचा" प्रतापराव
"हो हो बरोबर ओळखलंत. आमचं बोलणं झालं त्यांच्याशी त्यांचा होकार आहे"- अनंतराव
"किती खोटं बोलतात बघ तुझे बाबा. सांगतायत माझ्याशी बोलणं झालं. बोलले तरी का हे माझ्याशी?"- वरद अनुष्काच्या कानात कुजबुजतो.
"गप्प बस रे दादा"- अनुष्का
"अहो ही तर खूप चांगली बातमी दिलीत तुम्ही आणि आमच्याही दिवसाची सुरुवात चांगली झाली"- प्रतापराव
"हो मग आता आमचा ही दिवस अजून गोड करा आमचे कान आसुसलेत तुमचा निर्णय ऐकायला"- अनंतराव
"अहो आमचा सुद्धा होकारच आहे. कालच निर्णय झाला आमचा. आता लागा तयारीला"- प्रतापराव एकदम आनंदात बोलले.
पण समोरून होकार दिला हे ऐकून गौरीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या हातातून चहाचा कप निसटला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले.
इथे वरदची अवस्था सुद्धा काही वेगळी न्हवती. गौरीकडून होकार येईल असं त्याला अजिबात वाटलं न्हवत.
'ही हे सगळं मुद्दाम मला त्रास द्यायला करतेय. गौरी विरकर तुझा हा निर्णय खूप महागात पडणारे तुला'- वरद स्वतःशीच पुटपुटला आणि त्याने रागाने आपली मूठ आवळली.