Mall Premyuddh - 11 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 11

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 11

मल्ल - प्रेमयुद्ध

घराच्या मागच्या अंगणात विहीर होती. विहिरीच्या बाजूला चाफ्याचे झाड होते. सगळीकडे फुलांचा सडा पडला होता. बसायला दगडी ताल होती. जरा अंतर ठेवून दोघे त्यावर बसले. आजूबाजूला घर होती. कोणी ना कोणी येऊन घरांमधून डोकावत होते. कदाचित जोडी कशी आहे यावर चर्चा होत होती.
बराच वेळ दोघेही शांत होते.
."माफ करा..." वीर म्हणाला.
"सगळं झाल्यावर माफी कसली मागताय?" क्रांती रागाने बोलली.
"काय करणार याआधी एवढं कुणी आवडलं नव्हतं...पण मी जबरदस्ती न्हाय करणार ? " वीर शांतपणे बोलला.
" मग आत्ता काय करताय??? तुमाला म्हाइतीये मला लग्न करायचं न्हाय....आणि तुमच्याबरोबर तर न्हाईत न्हाय..." वीरने पटकन क्रांतीच्या नजरेत बघितले. तो दुखावला हे क्रांतीला लगेचच समजले.
" म्हणजे ...." क्रांती थोडी गडबडली.
" कळतंय..." वीर
" मला पुढं खेळायचंय म्हणून... लग्न झालं तर सगळं थांबलं." क्रांती
"बरोबर हाय म्हणूनच मी दोन महिन्यांचा वेळ घेतलाय... या दोन महिन्यात माझा स्वभाव जर तुमास्नी आवडला तर लग्न करायचं न्हायतर मी माझ्या बाजून लग्न मोडीन... हा माझा शब्द हाय..." वीर
"दोन महिन्यात सगळं बदललं...?" क्रांती
"माझ्या प्रेमावर माझा इशवास हाय... मी शंभर टक्के प्रयत्न करीन." वीर.
क्रांतीला पुढं काय बोलावं समजत नव्हते.
"मला तुम्ही न्हाय आवडत. तुम्ही आत्ताच सांगितलं सगळ्यांना तर बरं व्हाईल." क्रांती.
"प्रेमात एक चान्स मिळायला पाहिजे अन तो तुम्ही मला द्याल अशी आशा हाय..." वीर एवढं बोलून उठला.
" माझ्या बाजूनं एकदा इचार करा. ज्या मुलीला तुम्ही अजिबात आवडत न्हाय अस काय होईल की दोन महिन्यात मला तुम्ही आवडायला लागलं. खर सांगायचं तर मला तुमचा चेहरा बघायची पण इच्छा नसते. हे मनातलं सांगती. अन मला वाटत हे आत्ताच तुम्हाला कळायला पाहिजे." क्रांती जसजसा बोलत होती. तसतसं वीर आतून कोसळत होता. वीर उठला.
"चलायचं...मला वाटत झालं बोलून आणि तुम्ही याच उत्तर मला द्याल साखरपुड्याच्या आत...एक चान्स"
"वीर प्लिज मला नका अडकवू या सगळ्यात..." क्रांती कळवळीने बोलली. वीर ने एक छोटा बॉक्स काढला खिशातून. गिफ्ट रॅप केलेला. हे छोटं गिफ्ट आणलं होतं तुमच्यासाठी... जेंव्हा खरंच वाटल की तुमास्नी आम्ही आवडतो तेव्हा घाला." वीरने बॉक्स दयायला हातपुढे केला.
"नको ..." क्रांती.
" ठीक हाय इथं ठेवतो..." त्याच दगडावर त्याने बॉक्स ठेवला आणि आत गेला. क्रांती त्या बॉक्सकडे बघत बसली. घ्यावा की नाय या गोंधळात तीने तो बॉक्स उचलून पदराआड लपवला आणि आत गेली. चिनूने त्यांचं बोलणं ऐकलं होतं. आता मात्र तिला आक्कीचा लय राग येत व्हता.
वीर आत जाऊन भूषण शेजारी बसला. भूषणच्या लक्षात आले की काहीतरी बिनसलंय. वीरचा चेहरा बारीक झाला होता.
"काय रे...? काय झालं?" भूषण
"काय न्हाय..." वीर
"परवाची तारीख काढली साखरपुड्याची..." भूषण
"काय...?" वीर
""तुला नको होती का एवढ्या लवकर...?" भूषण म्हणाला तेवढ्यात संतू पेढे घेऊन आला.
"घ्या घ्या दाजी पेढे घ्या...आता दाजी म्हणयालाच पाहिजे.." संतुन वीरला पेढा भरवला.वीर कसानुसा हसला. त्याचा एवढा अपमान करायची कोणाची हिम्मत झाली नव्हती. त्याला ते सहन होत नव्हतं. जेवणाची ताट आली. सगळ्यांनी हात धुतले. क्रांतीही सगळ्यांना आग्रहाने जेवायला वाढत होती. क्रांतीचा स्वभाव तेजश्रीला आवडला होता. पण वीरच्या नजरही क्रांती नजर देत नव्हती.

"आव सगळ्यांना वाढताय व्हणाऱ्या नवऱ्याला इचार की..." क्रांतीला काय करावे सुचत नव्हते. बासुंदी घेतली आणि त्याला वाढली. वाटी भरून. वीर काहीही बोलत नव्हता नंतर नंतर बासुंदी संपवता संपवता त्याच्या नाकीनऊ आले. सगळी मंडळी निघाली. घरात आनंदच आनंद होता. एकमेकांना नमस्कार करून सगळेजण गेले.

"आव हे बघितलंत का? न्हाय म्हणलं तरी पाच तोळ्यांचा दागिना असलं हा..." आशाने राणीहार दाखवत दादांना म्हंटले.
"पोरगा दागिन्यावानी असला म्हंजी झालं... बाकी काय बी नको..." दादा
"मंजी अजून इशवास वाटत न्हाय का?" आशा
" माणस लाख मोलाची हायत... पण मला आपल्या पोरीची काळजी वाटती. तिच्या मनात नसून...?" दादा
"मनात नसत तर एवढी साडी नेसून तयार झाली असती? वीरबरोबर एवढा येळ बोलत बसली असती? होणाऱ्या सासू आणि जावेबरोबर प्रेमाने बोलली असती? तुम्ही चुकीचा इचार केला तर तुमास्नी सगळं चुकीचं दिसल... " आशा समजावत होती. दाराडून क्रांती ह्या दोघांचं बोलणं ऐकत होती. आई वडील म्हणून आई सुखाच्या बाजून विचार करत होती तर वडील मनाच्या बाजूनं... मनाचं ऐकावं म्हणतात पण मग आई चुकीची कशी असलं? आई या नावाला लेकराच सगळं कळत म्हणत्यात मग आई चुकीची कशी असलं? क्रांती विचार करत होती अन मागून चिनू आली.
" तायडे आई नसेल चुकीची पण दादांना तुझी काळजी वाटती." चिनू
"काय...? तुला कस कळलं मी काय बोलती?" क्रांती.
"तुझी बहीण हाय... बर हे मला त्या दिवळीमधी पडलेलं सापडलं... काय हाय हे? कुणी दिल?" चिनूने गिफ्ट रॅपर फोडायचा प्रयत्न केला.
"सोड ते माझं ये.." क्रांतीने तिच्या हातामधून ओढून घेतलं.
"हो मला म्हाईती तुझंच हाय पण दिल कुणी...?" चिनूने पुन्हा क्रांतीच्या हातामधून ओढून घेतले आणि फोडायचा प्रयत्न केला.
" गप ग... तुला काय करायचं? दे इकडं..." क्रांतिने चिनुच्या हातून ओढून घेतले.
"बाई ग काय एवढं त्यात मी फोडून बघितलं तर... अस ही दाजींन दिलाय म्हंटल्यावर तुला ते नकोच असलं..." चिनू रागात म्हणाली.
" नको असलं तरी ते माझ्यासाठी दिलय ना... मग तू कशाला फोडती..." अस म्हणत क्रांती आत गेली. चिनू गालात हसली.
पोरगी नक्की फसणार हाय... दाजी पहिला प्लॅन सक्सेसफुल..आम्ही सगळे तुमच्या टीम मधी..." चिनू एकटीच बदबडत हसली.


"कुणी सांगितलं नसत उद्योग करायला??? मी दवाखान्यात माझ्या टेस्ट करायला न्हाय जाणार..." संग्राम ओरडून तेजश्री सोबत बोलत होता.
"तुमचं झालं न समाधान आम्हाला न्हाय लेकरू झालं तरी चाललं पण आम्ही टेस्ट करणार न्हाय..." संग्राम
"तस आबांना सांगा..." तेजश्री
"लै जीभ चराचर चालायला लागली... चार कौतुकच शब्द कानावर पडत की चढला व्हय झाडावर.. आम्ही आत्ता बोलतो आबांसोबत..." संग्राम तावातावाने खाली आला. आबा हिशोब करत गड्यांचे पैसे देत होते.

"आबा अमास्नी बोलायचंय तुमच्याशी." संग्राम अतिशय नम्रपणे बोलला.
" जर थांबा एवढा हिशोब झाला की बोलू..." आबा पैसे मोजत बोलले.
" ह्यात जर तुम्ही लक्ष घातले असते तर आमच्या डोक्यावरचं वझ कमी झालं असत ...काय...?" आबा
" आबा आम्ही तयार हाऊत..." संग्राम
"बर मग आज सगळा हिशोब समजावतो.पुढच्या आठवड्यापासन तुम्ही हिशोब बघायचा.चालतय नव्ह...? आता संग्रामसाहेब नातवंड खेळवायचं वय आमचं.. आमाला कायमची ह्या कामातून सुट्टी घ्यायची." सगके गडी हात जोडून निघून गेले.
"बोला..." आबा
"आबा आम्ही कशापायी टेस्ट करायची? आमच्यात काय कमी हाय अस वाटतय का?" संग्राम
"अस न्हाय दोष असलं म्हणून न्हाय... काय गोष्टी नैसर्गिकरित्या होत नसतील तर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड पाहिजे. दोष निघल म्हणून टेश करायची अस न्हाय किंवा तुमच्यात दोष निघल म्हणून पण टेस्ट करायची न्हाय फकस्त काय अडचण हाय अन त्यावर काय उपाय करू शकतात डॉक्टर यासाठी टेस्ट करायची." आबांनी संग्रामच्या खांद्यावर हात ठेवला.
"आबा पण आमच्यात दोष निघाला तर?" संग्राम
"मंजी घाबरताय की काय?" आबा
"न्हाय पण ... " संग्राम
"पण बिन काय न्हाय ... वीरने गाडी काढली भायर तवा लगीच जायचं..." आबा म्हणले की लगेच संग्राम बाहेर गेले. तेवढ्यात सुलोचनाबाई आल्या.

" आव मला सांगा साखरपुड्याची तयारी कशी करायची?" सुलोचना म्हणाली तेजश्री बाहेर आली.
"आमच्यापेक्षा तरुण सळसळत रक्त हाय उभं इथं... काय सुनबाई घ्याल न जबाबदारी..." आबा
" व्हय आबा घेईन पण रक्त तरुण असलं तरी तुमचा अनुभव दांडगा... तयारी झाली की सगळं सांगेन तुम्हाला काही राहील तर सांगा." तेजश्री नम्रपणे बोलली.
" तर सांगा नक्की सांगा आम्ही तुमास्नी मार्गदर्शन नक्की करू पण आता जबाबदारी तुमची अन संग्रामची.." आबा
"हो आबा..." तेजश्रीने आबा आणि सुलोचनाबाई याना नमस्कार केला. देवापुढे साखर ठेवली.
"आई आपण आज साड्या खरेदीला जाऊन येऊ... बाकी हे आले की आम्ही क्रांतीसाठी अंघटी आणि बाकीचे साखरपुड्याला लागणार साहित्य आणायला जातो. म्हणजे फळ, हार, फुल, क्रांतीसाठी काही वस्तू, पेठे आणि हो आई आपल्याला डाळ, गूळ, साखर, तांदूळ अश्या वस्तू बांधून न्याव्या लागतील." तेजश्री बोलत होती दोघे सासू सासरे तिचा उत्साह बघून आनंदी होते.


रात्र झाली होती. क्रांतीला झोप लागत नव्हते. ती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती.
"तायडे झोप लागत न्हाय ना..." चिनूने हळूच विचारले
" न्हाय ग... तू का जागी हायस ?" क्रांती
"तुझी तगमग बघून मला बी झोप यायना..." चिनू
"माझी कसली तगमग.." क्रांती
"आग फोड ते गिफ्ट कशाला ताणतीस? मला म्हायती हाय तुलबी उत्सुकता हाय दाजींन काय दिलाय ते बघायची..." चिनू हसली.
"गप..." दबक्या आवाजात क्रांती तिला ओरडली.
" तुला नको असेल तर मी ठेवते...पण फोड बाई..." चिनू म्हणाली तशी क्रांती उठून बसली. त्याबरोबर चिनू उठली.
"फोडायचं का?" चिनू म्हणेपर्यंत गिफ्ट घ्यायला उठली. गिफ्ट क्रांतीच्या हातात दिले.
"फोड..." क्रांती त्याकडे बघत बसली. चिनूने तिच्या हातातून हिसकावून घेतले अन फोडायला लागली परत क्रांतीने तिच्या हातामधून घेतले आणि फोडले. ज्वेलर्सचा बॉक्स होता. तिने बॉक्स उघडला. मोठाले सोन्याचे झुमके आणि त्याला कान होते.
दोघीही आ करून त्या कानंतल्याकडे बघत होत्या.
" बापरे साखरपुड्याच्या आधी असली गिफ्ट मग लग्नानंतर काय...? क्रांतीने बॉक्समधून कानातले हातामध्ये घेतले आणि त्याकडे बघत बसली.
"वीर एवढं महागडं गिफ्ट नको मला... मी हे परत करीन..." कानातले ठेवताना त्याच्याखाली चिठ्ठी सापडली.
"क्रांती...तुम्हाला एवढं महागडं गिफ्ट नको असणार पण हे मला परत करू नका... तुमच्याकड ठेवा जेंव्हा तुम्ही माझा मनापासन स्वीकार कराल अन माझ्या प्रेमात पडल तवाच हे घाला...
तुमचा वीर...
क्रांतीचे ओठ थरथर कापत होते. इकडे चिनू मात्र तिची ही अवस्था बघून हसत होती.


क्रमशः
भाग्यशाली राऊत

( कथा खूप आवडतीये मला पर्सनल मेसेज येतायत खरच मनापासून धन्यवाद असेच प्रेम राहुद्या...तुमचीच भाग्या)