Victoria 203 in Marathi Adventure Stories by Dilip Bhide books and stories PDF | विक्टोरिया २०३

Featured Books
Categories
Share

विक्टोरिया २०३

विक्टोरिया २०३.. एक सत्याग्रह

हा मनोरंजक प्रसंग घडला, तेंव्हा मी अमरावतीच्या इंजीनियरिंग कॉलेज मधे थर्ड इयर ला होतो. विक्टोरिया २०३ हा सिनेमा नवीनच लागला होता. त्या दिवशी आमच्या हॉस्टेल मधले दोन – तीन मुलं हा सिनेमा बघायला गेली होती, खूप अगोदर जाऊन ते रांगेत उभे होते. तिकीट खिडकी वर यांच्या समोर फक्त १० -१२ जण होते, पण यांचा नंबर आला तेंव्हा तिकीटं संपली असं सांगून क्लर्क ने खिडकी बंद केली. यांनी आत जाऊन विचारलं, पण यांना पिटाळून लावलं. बिचारी हिरमुसलं तोंड करून हॉस्टेल वर आली. आमच्या कॉलेजला  दोन हॉस्टेल होते, एक सरकारी कॉलेज हॉस्टेल आणि एक खाजगी, राठी हॉस्टेल. दिवसभरात ही बातमी दोन्ही हॉस्टेलवर पसरली. संध्याकाळी निरोप आला की कॉलेज हॉस्टेलच्या कॉमन रूम मधे सर्वांनी जमायचं आहे म्हणून. तिथे दोन तीन लोकांनी हा अन्याय थांबवलाच पाहिजे यावर भाषणं दिली. पण करायचं काय? हा प्रश्न तसाच होता. मग एक मुलगा उठला, म्हणाला, “माझ्या जवळ यावर रामबाण उपाय आहे. मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका.” तो थोडा थांबला. हॉल मधे शांतता झाल्यावर त्याने पुढे सुरवात केली.

“आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऑर्थर हेले चं मनीचेंजर हे पुस्तक वाचलेलं आहे, त्यातला एक किस्सा आठवा. ईस्ट फोरम च्या राहिवाश्यांवर बँकेने अन्याय केलेला असतो. एक वकील आणि सामाजिक कार्यकर्ती त्यांच्या विरोधात उभी राहते. सुमारे २०० -३०० लोकं दुसऱ्या दिवशी बँके समोर लाइन लावतात आणि प्रत्येक जण ५ डॉलर देऊन आपलं खातं उघडतो. गर्दी इतकी असते, की बँकेचे बाकी सर्व व्यवहार ठप्प होतात. तीन दिवस सर्व व्यवहार बंद, करोडो रूपायांचं नुकसान झाल्यावर बँक नमते घेते, आणि आपला निर्णय वापस घेते.” तो मुलगा थांबला.

“अरे, ये सब तो हमने भी पढ़ा हैं, आजके परिस्थितिमे इसका क्या संबंध हैं?” -एका मुलाने मूलभूत प्रश्न विचारला.  “सांगतो,” तो मुलगा म्हणाला “ उद्या १२ च्या शो ला १०० पोरं तिकीट खिडकी वर साडे अकरा पासूनच लाइन लावतील. देवळात जशी नागमोडी लाइन असते, तशी लावून मेन गेट ब्लॉक करायचं.” पुढची सर्व योजना त्याने सविस्तर समजावून सांगितली. सर्वांनाच पटली.

दुसऱ्या दिवशी तिकीट खिडकीवर १०० मुलं लाइन लावून उभी. चित्रपट गृह मुख्य रस्त्याच्या आत १०० फुट एका गल्लीत होतं. २० मुलं गल्लीच्या दोन्ही बाजूला मुख्य रस्त्या पर्यन्त उभी राहिली.

तिकीट खिडकी सुरू झाली, पहिल्याच मुलाने सांगितलं की त्याला सीट नंबर तिकिटावर लिहून पाहिजे. मागणी अर्थातच अमान्य झाली. मग मला तिकीट नको असं सांगून तो बाजूला झाला आणि रांगेत शेवटी जाऊन उभा राहिला. यात ३ ते ४ मिनिटं गेली होती. २० -२५ पोरांनी हीच नाटकं केल्यावर क्लर्कने खिडकी वैतागून बंद केली. इतक्यात काही गुंड मंडळी मेन गेट मधून आत गेली आणि त्यांनी खूप सारी तिकीटं  विकत घेतली. ते लोकं बाहेर आले, आणि ते पाहून, लगेच गल्लीच्या दोन्ही बाजूंनी उभे असलेली मुलं आपल्या हातात फलक घेऊन उभे राहिले. मजकूर होता “ब्लॅक मधे तिकीट घेऊ नका” आणि खाली “विद्यार्थी” असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं.

या वेळेपर्यंत एक वाजला होता आणि १२ चा शो प्रेक्षक नव्हते, म्हणून सुरू होत नव्हता, बरीच मंडळी सिनेमा बघायला आली, पण एवढी मोठी रांग पाहून वापस गेली. काही लोक ब्लॅक मधे घ्यायला तयार होते, पण मुलं आणि त्यांच्या हातातले फलक पाहून मागच्या मागेच परतले. मॅनेजर आता भयंकर चिडला होता. तो तावातावाने बाहेर आला आणि त्यांनी रांगेतल्या एका मुलाला ओरडून विचारलं की “क्या तमाशा लगा रखा हैं तुम लोगोने,” १५-२० मुलं सुटी सुटी इकडे तिकडे फिरत होती, त्यांची वेळ आली होती, त्या मुलांनी मॅनेजर आणि त्याच्या बरोबर आलेले दोघं, यांच्या भोवती कोंडाळं केलं. “अरे बोलो ना” – मॅनेजर.

कोणीच उत्तर दिलं नाही. फक्त एक पाऊल समोर सरकले. वर्तुळ थोडं छोटं झालं. आता मॅनेजर घाबरला. म्हणाला “मी मॅनेजर आहे, काय प्रॉब्लेम आहे सांगा.” कोणीच बोललं नाही. एक पाऊल समोर, वर्तुळ अजून छोटं. आता मॅनेजर रडकुंडीला आला. “अरे, सांगा यार, माझी नोकरी जाईल, खूप नुकसान होतेय.”

“आम्ही फक्त मालकांशी बोलणार., तुमच्याशी नाही.” एकाने उत्तर दिलं. आणि त्यांना जायला वाट करून दिली. इतकं होईतो अडीच वाजत आले होते, तीन चा शो पण पाण्यात जाणार होता. मॅनेजरने  मालकाला फोन केला, तो लगेच येतो म्हणाला.

पोलिस स्टेशन फार दूर नव्हतं. त्यांना कळल्यावर ते आले. त्यांनी आल्या आल्या रांगेतल्या एका मुलाला विचारलं “काय चालू आहे” आमचा लीडर आता समोर आला. “सत्याग्रह”

“म्हणजे? कशाकरिता?” – पोलिस.

मग आमच्या लीडरने सर्व सांगितले मग म्हणाला, “ब्लॅक चा धंदा रोखण्या साठी आमचा शांतता पूर्ण सत्याग्रह चालू आहे.”

“बाकीच्या लोकांना का रोखता आहात?” – पोलिस.

“अहो, लोकच काय, ते गुंड लोक आत जाऊन ब्लॅक करण्यासाठी तिकिटांचे गठ्ठे घेऊन बाहेर आलेत, त्यांना पण आम्ही रोखलं नाही.” – लीडर.

चित्रपट गृहांचा मालक आला. त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. आता पावणे चार वाजले होते. तीन चा शो पण बरबाद झाला होता. मालकांनी सांगितलं की “ यापुढे, तुम्हाला रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडणार नाही. मॅनेजर कडे जायचं तो तुम्हाला तिकीटं  देईल. आता प्रॉब्लेम संपला, आवरा तुमचा सत्याग्रह, इतकंच नाही तर आज संध्याकाळचा सहा चा शो फक्त तुमच्या करता राखीव. आणि तो ही फ्री.”

“सर, आम्हाला कुठलीही सवलत नको आहे. आम्ही तिकीट काढू. तुम्ही फक्त ब्लॅक वाल्यांना बंदी घाला. तुमचे बूकिंग क्लर्क आणि हे मॅनेजर त्यांना सामील आहेत.” आमच्या लीडरने मुख्य कारण सांगितले.

मालकांनी ती ही विनंती मान्य केली. आणि आमचा सत्याग्रह संपला असं लीडरने जाहीर केलं. मालकांनी अतिशय आग्रहानी सहा चा शो आमच्या साठी ठेवला.

दिलीप भिडे