Utkarsh - 6 in Marathi Short Stories by Pralhad K Dudhal books and stories PDF | उत्कर्ष… - भाग 6

Featured Books
Categories
Share

उत्कर्ष… - भाग 6

उत्कर्ष भाग 6(अंतिम भाग)

त्या नंतरच्या दिवशी सकाळी बराच वेळ खालच्या फ्लॅट मधून कसलाही आवाज नव्हता..
काल उत्कर्षची बहीण आल्यानंतर सगळे कसे शांत शांत वाटत होते...
कसलाच आवाज नाही!
अकराच्या दरम्यान मी काही कामानिमित्त खाली गेलो होतो.योगायोगाने रस्त्यात माझी आमच्या बिल्डिंग प्रतिनिधीशी गाठ पडली.मला पाहून त्यानेच मला हाक दिली.
" काय म्हणताय काका? "
" काही नाही बघा, मग काय म्हणतोय मग तुमचा उत्कर्ष?"
आमच्या बिल्डिंग मधला सध्याचा चर्चेचा विषय उत्कर्ष ने घातलेला गोंधळ हाच होता...
मी तो विषय काढताच बिल्डिंग प्रतिनिधी खुलला....
मधल्या दोन तीन दिवसांत घडलेल्या परंतु मला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी मला आमच्या बिल्डिंग प्रतिनिधीने सांगितल्या.
त्या दिवशी उत्कर्षची पोलीसात तक्रार झाली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी बिल्डिंगमधील काही रहिवाशानी तसेच सोसायटी ऑफिसने पोलिसांशी संपर्क साधून फॉलोआप घेतला होता. उत्कर्षला पोलीस स्टेशनवर बोलावून समज दिली गेली होती तसेच त्याच्या बहिणीलाही फोन केला गेला होता. आधीच केलेल्या नियोजनाप्रमाणे त्याची बहीण भारताला यायला निघालेली होती.
काल संध्याकाळी बहिणीचे स्वागत करताना उत्कर्ष आधीएवढा उत्साही का दिसला नाही तसेच त्या दिवसापासून उत्कर्षचे उपदव्याप बंद असण्याचे हे कारण होते तर!
संध्याकाळी उत्कर्ष लिफ्टमध्ये दिसल्यावर मी त्याला छेडले...
" आ गयी आप की सिस्टर? "
" हा अंकल आपने ढोल बजते सुना नहीं क्या? "
" देख रहा था ना मैं बाल्कनीसे, क्या उत्कर्ष तुम अकेलाही डान्स करता था, कम से कम आठ दस दोस्त तो बुलाना था न डान्स करने के लिये!"
" हा न अंकल, बुलाये तो थे, लेकिन कॅन्सल करना पडा सब प्रोग्रॅम, सोसायटीवाले बहुत गुस्सा हो गये ना... मेरी सिस्टर को भी ऑफिसमें बुलाकार बहुत कुछ सुनाया... अंकल, मैं वापस जा रहा हूं, अब पूना में नही रहना हैं मुझे!"
दोन दिवसांत बरेच काही घडलेले दिसत होते...
पुढच्या दोन तीन दिवसांत उत्कर्ष आणि त्याची बहीण घरातल्या बऱ्याच वस्तू सोसायटी ग्रुप वर जाहिरात करून विकत होते!
टी व्ही, फ्रिज , म्युजिक सिस्टीम, सोफा, टेबल, खुर्च्या असे बरेच सामान दोन दिवसांत विकून उत्कर्षची बहीण बहुतेक अमरावतीला निघून गेली.
उत्कर्ष घरातल्या एका एका वस्तूची विल्हेवाट लावताना दिसत होता. मलाही तो सोफा हवाय का विचारून गेला. मी नको सांगितल्यावर तो म्हणाला
" ठीक हैं अंकल, आप poetry लिखते हैं मुझे पता हैं, मेरे पास बहुत सारे पेपर्स हैं... यह आप रख लिजिए... "
मी नको म्हणून सांगितले;पण तो ऐकेनाच, त्याने मला बळेच दोन कागदाचे गट्ठे आणून दिले. त्याच्या त्या निरागस आग्रहाला मी नकार देऊ शकलो नाही...
" अंकल मैं ने आपको बहुत तकलीफ दिया, मुझे माफ करो, मुझे दुवा दे दो, मैं जल्द ही यु एस जानेवाला हूं, आपका आशीर्वाद चाहिये... "
उत्कर्ष आमच्या दोघांच्या वारंवार पाया पडत होता.
उत्कर्षचे हे रूप मी प्रथमच बघत होतो. त्याच्याबद्दल कणव दाटून आली.
कुठला कोण उत्कर्ष, अचानक आला काय, दोन चार रात्री आमची झोप उडवली काय, आणि त्याच्याबद्दल तिरस्कार वाटत असतानाच नकळत त्याने हृदयाला हात घातला काय...
एखादा माणूस आपल्या जीवनात येऊन अल्पकाळात असे वादळ उठवून अचानक निघूनही जाऊ शकतो?
जाता जाता आपण या नंतर कधीच भेटणार नाही याची जाणीव होऊन अचानक कातर झालेला उत्कर्ष,.... एकदम गंभीर!
सगळंच कल्पनेच्या पलीकडंच होतं!
माझ्या डोळ्यात नकळत पाणी आले...
पायाशी वाकलेल्या उत्कर्षला मी हळुवारपणे पाठीवर थोपटले, उठवून उभं केलं..
"औक्षवंत हो, यशवंत हो!"
स्वतःच्याही नकळत ओठांवर आशीर्वादाचे शब्द उमटले...
" चलता हूँ... "
उत्कर्ष पटकन हात जोडून निघून गेला..
दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही झोपेत असतानाच बहुतेक उत्कर्ष निघून गेला होता!
माझ्या दरवाजा बाहेर अजून काही कोऱ्या पेपर्सचे रिम्स ठेवलेले होते...
(समाप्त )

--- प्रल्हाद दुधाळ.
9423012020.