सावित्रीबाई फुले यांची लेक
म्हणवून घेणारी व्यक्तीही सावित्रीबाईंप्रमाणेच अपार जिद्द असलेली, प्रतिकूल परिस्थितीवर अथक परिश्रमांनी मात करून आपले इप्सित साध्य करणारी आणि त्याचवेळी समाजाचाही विचार करणारी हवी. अशी एक लेक आपल्या बोइसरमधे आहे आणि तमाम बोइसरकरांना ही बाब निश्चितच भूषणावह आहे यात तिळमात्र शंका नाही.
ही लेक मूळची विरारची. ती एका बैठ्या चाळीतल्या कुटुंबात जन्माला आली ती चवथी मुलगी म्हणून ! मुलगाच पाहिजे हा तो काळ असल्यामुळे घरचे जरी नाखूष झाले नसले तरी बाहेरच्यांना टोमणे मारायची आयतीच संधी मिळाली. पण घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून इतर तिघींप्रमाणेच या चवथीलाही वाढविले. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच असली तरी हिची कधीही आबाळ झाली नाही. आपण सगळ्यांत लहान म्हणून ही लेक लहानपणापासूनच मितभाषी होती. शिवाय मोठ्यांपुढे काही न बोलता त्यांचे ऐकणे हा घरचा दंडक होता. या अशा स्वभावामुळे शाळेतही मागे मागेच राहिली. चौघीही मोठ्या झाल्या. तीन मोठ्या बहिणीचे विवाह होऊन त्या अनुक्रमे मुंबई, पुणे आणि नाशिक या मोठ्या शहरांत चांगल्या घरांमधे गेल्या.
यथावकाश हिचाही विवाह झाला पण तीन बहिणींच्या शहरांच्या तुलनेत ती आली बोइसरसारख्या ग्रामीण भागात ! राहते घर कुडाचे होते. घरात एकत्र कुटुंब पद्धत होती. पती, सासू-सासरे आणि धाकटी अविवाहित नणंद ! एक दुभती गायही होती. सासऱ्यांचे सरकारमान्य स्वस्तधान्याचे दुकान होते. त्यामुळे गहू, तांदूळ, साखर यांची पोती घरातच रचून ठेवली जात. पण ही लेक जात्याच परिस्थितीशी जुळवून घेणारी असल्याने तिने पक्क्या घरातून अशा घरात आल्यावरही चुकूनही तोंड वेंगाडले नाही आणि प्रत्येक काम जबाबदारीने केले. तिला दोन अपत्ये झाली. मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी. शाळा दोन किलोमीटर लांब होती. रिक्षाचा खर्च परवडणार नव्हता. मग पतीची सायकल घेऊन पेडल मारत जायची आणि येताना मुलांना तीवर बसवून स्वत: चालत यायची. हे सगळं करत असताना काहीतरी करायचंय हे मनात होतंच. छोटे छोटे व्यवसाय केले. अगदी बिस्किटेही विकली. नंतर जमीन खरेदी करून मोठे घर बांधले. सासरची भातशेती होतीच. लावणी, आवणी, झोडणीसाठी तीस ते पस्तीस मजूर असायचे. स्वयंपाकासह घरची सगळी कामे आटोपून स्वारी शेतात जायची. तिने अगदी बैलगाडीही चालविली.
त्यावेळी गावात अनेक वर्षे एकच व्यक्ती सरपंचपदावर होती. जनता त्यांना पुरती कंटाळली होती. मग काय हे तरुण रक्त सळसळले आणि तेव्हापासून हिने राजकारणामार्गे समाजकारणात प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आली. या क्षेत्रात आल्यानंतर ही व्यक्ती लहानपणी मितभाषी होती असे कोणाला सांगितले असते तर त्यांचा विश्वास बसला नसता. जिला स्वत:चे म्हणणेही धड मांडता येत नव्हते ती आता आत्मविश्वासाने इतरांना मार्गदर्शन आणि मौलिक सहाय्य करू लागली होती. निवडणुकीच्या धामधुमीत घर सांभाळूनच रात्रंदिवस सगळी कामे चोख पार पाडली. समाजकल्याणाला वाहून घेतले आणि महिला दक्षता समितीची अध्यक्ष झाली. महिला सबलीकरणाकडे अधिक लक्ष देऊ लागली. विविध खेड्यापाड्यांतील आर्थिक दुर्बल महिलांना शिवणकाम, कलाकुसर आदी कामे शिकवून स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे केले. आता आपले विचार ठामपणे मांडण्याची पात्रता तिने प्राप्त केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार केवळ वैयक्तिक प्रगती झाली म्हणजे सारे काही मिळविले असे नाही; तर आपल्या प्रगतीबरोबरच आजुबाजूच्या लोकांची आणि पर्यायाने संपूर्ण गावाची प्रगती होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गरीब , गरीब म्हण्या पेक्षा ज्यांना गरज आहे अश्या लोकं साठी तिला काम करायला आवडते आताच ती विक्रमगड ला एक गावात मुलांना फुकट शिवण काम शेकावायला गेली होती. तिचे राहायची , झोपायची , जेवणाची अशी कुठलीच सोय चांगली नव्हती. कोंबड्या चे खुराड असेल्या खोलीत ती राहिली. पण मला ह्या चा खूप त्रास झाला किव्हा मला सोय करून द्या असे म्हणाली नाही. २० दिवस शिवकाम शिकवायचे काम पूर्ण केले आणि मग घरी आli .
खरोखरच सावित्रीबाई फुले यांची लेक शोभावी असे कार्य तिच्या हातून घडत आहे आणि याचा आम्हा बोइसरकराना सार्थ अभिमान आहे.