सावध
प्रकरण ९
टॅक्सी करून ते पुन्हा आपल्या ऑफिस पाशी पोहोचले इमारतीच्या तळमजल्यावर बसलेल्या वॉचमनला पाणिनी ने विचारलं. “मला कोणी भेटायला आल होत?”
“छे: कोणी सुद्धा नाही.” वॉचमन उत्तर दिलं
सौम्या आणि पाणिनीने एकमेकांकडे बघितलं.
“सौम्या आपण कनक ओजसच्या ऑफिसमध्ये आधी जरा नजर टाकू.”
कनक चं ऑफिस पाणिनीच्याच ऑफिसच्या मजल्यावर होतं. आपल्यासमोर फायली आणि फोन घेऊन कनक कामात गढला होता.
“काय म्हणतोयस कनक? कसं काय चाललंय?”
“छान तू सांगितलेलं काम चालू केलं. तुला हवी असलेल्या रिव्हॉल्व्हरची माहिती मिळाली आहे.” कनक म्हणाला, “बऱ्याच जणांना ती रिव्हॉल्व्हर विकली गेल्ये. म्हणजे एकमेकांकडून हस्तांतरित झाली आहे. सगळ्यात शेवटची विक्री उदक प्रपात कंपनी याला झाली आहे”
“उदक प्रपात कंपनीने ती पुढे कोणाला विकली आहे?” पाणिनी ने विचारलं.
“ते अजून कळलं नाही.”—कनक.
“अरे कनक, उदक प्रपात म्हणजे ते एक छोटसं रिसॉर्ट आहे तळ्याच्या बाजूला हाडशीच्या जवळ तेच ना?”
“हो. तेच ते. एक चांगला पिकनिक स्पॉट म्हणून तो ओळखला जातो म्हणजे एका बाजूला तळं आणि दुसऱ्या बाजूला टेकड्या असा छान स्पॉट आहे.”
“ठीक आहे तुझा तपास चालू ठेव. कीर्तीकर च्या त्या ड्रायव्हर बद्दल तुला काही कळले नाही ना?”
“कीर्तीकर च्या घरी अजून अंधारच आहे माझी दोन माणसं मी कामाला लावलेत आणि त्या ड्रायव्हरची पार्श्वभूमी शोधून काढायचा माझा प्रयत्न आहे.”
“ठीक आहे कनक,. पुढे काय घडलं तर मला कळव मी आणि सौम्या आता ऑफिसला जातोय”
“मला कामाला लावून बाहेर मस्तपैकी हादडून येऊन आता ऑफिसला जाऊन सौम्याबरोबर गप्पागोष्टी करत पाय ताणून बसशील पाणिनी.” कनक म्हणाला
पाणिनीने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि सौम्याला घेऊन तो बाहेर पडला.
“मला वाटतंय सौम्या, पोलीस अजूनही मायरा ला उभ आडव घेत असावेत “
ती पोलिसांना तुमचं नाव सांगेल?” --सौम्या
“मीच तिला सांगायला सांगितलं सगळं सत्य.”
“तुम्हाला वाटतं तिने सांगितलं असेल म्हणून?”
“तिला सांगावच लागेल. कारण ते प्रेत शोधून काढलं तेव्हा मी तिच्याबरोबर होतो.”
पाणिनी आणि सौम्या ने ऑफिसच दार उघडलं आणि ते आत गेले.
“सौम्या माझ्या मनात आता एक विचार आलाय. तू इथेच थांब. मी पटकन बाहेर जाऊन हॉस्पिटलमध्ये पियुष पेंढारकर ला भेटून येतो आणि त्याला सांगतो की सगळं काही व्यवस्थित आहे काळजी करू नको. सौम्या तू इथेच थांब आणि पोलीस आले तर त्यांना थांबायला सांग म्हणजे त्यांना स्पष्ट सांग की मी बाहेर गेलोय आणि आणि तुला इथेच थांबायला सांगितलय” पाणिनी म्हणाला
“त्यांना तू सर्व म्हणजे सर्व काही सांग आपण वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात त्या अपघाताचे प्रकरण आपल्याला मिळालेले पत्र सर्व काही सांग.”
“कीर्तीकर बद्दलही सांगू?”
“हो. सर्व काही सांग”
“पोलीस पैकी कोणाकडे हे प्रकरण असेल असं तुम्हाला वाटतंय?”
“बहुदा इन्स्पेक्टर तारकरच येईल” पाणिनी म्हणाला”
“तो आला तर चांगला आहे सर. मला आवडतो, तो.”
“त्याला गृहीत धरून चालू नको. फार हुशार आहे तो.”
अहो सर, पण आपण पोलिसांना मोकळेपणाने सर्वच काही सांगणार असू तर तो हुशार असला काय किंवा नसला काय काय फरक पडणारे?” –सौम्या
“हे खरं आहे तुझं म्हणणं सौम्या, पण खरं सांगू का?. आतापर्यंत पोलिसांना मी मोकळेपणांनी सत्य घटना अशी कधी सांगितलीच नाही ना त्यामुळे मला चुकल्यासारखा वाटतंय आणि सगळ्यात मजा अशी होणारे की मी एवढं मोकळेपणाने सांगायला सांगतोय तुला त्यामुळे पोलीसही संभ्रमात पडणारेत कारण त्यांना असंच वाटणारे की आतापर्यंत पाणिनी पटवर्धन ने कधीच आपल्याला एवढया मोकळेपणाने सांगितलं नाही काही, आणि आता एकदम काय झालं? म्हणजे तो काही लपवून ठेवतो आहे की काय!” पाणिनी म्हणाला
सौम्याला आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर पाणिनी पटवर्धन हॉस्पिटलमध्ये त्याच्या अशीलाला भेटायला गेला. हॉस्पिटल मधल्या नर्स ने पाणिनीला ओळखलं.
“तुमचा पेशंट आज खूप बरा आहे मिस्टर पटवर्धन.”
“वा, वा छान”
“खरं सांगायचं तर मिस्टर पटवर्धन दुपारपर्यंत तो जरा काळजीतच वाटत होता. विशेषतः हॉस्पिटलच्या बिलाबद्दल म्हणजे आपण ते कसं काय भरू वगैरे वगैरे...”
“मी त्याला सांगितलं होतं की त्याची तू काळजी करू नको. ते सर्व मी बघीन म्हणून”-पाणिनी म्हणाला
“ते ठीक आहे पण ते तुम्ही करावं असं त्याला वाटत नव्हतं. त्याला आणखीन एक काळजी सतावत होती म्हणजे त्याला नक्की कोणी धडक दिली ते त्याला माहीत नव्हतं किंवा आठवत नव्हतं”
“पण मग तो एकदम सगळ्या चिंतेतून मुक्त कसा काय झाला ?” पाणिनी ने विचारलं.
“तोंडवळकर नावाचा एक माणूस त्याला भेटायला आला. आपण अपघाताला जबाबदार आहोत हे त्याने त्याच्यासमोर कबूल केलं आणि आवश्यक ती सर्व आर्थिक मदत करायची त्यांने तयारी दर्शवली.” नर्स म्हणाली
“तोंडवळकर नावाचा माणूस भेटायला आला होता?” पाणिनीच्या कपाळाला एकदम आठ्या पडल्या.
“हो तसंच काहीतरी आडनाव होतं असं वाटतंय”
“ करड्या रंगाचे केस होते त्याचे? आणि करड्या रंगाचा सूट किंवा शर्ट घातला होता का?” पाणिनी ने विचारलं. “ हो सर.”
“ साधारण पाच फूट पाच इंच किंवा पाच फूट सहा इंच उंचीचा माणूस?”
“हो! हो ! तोच माणूस आला होता” नर्स म्हणाली
“चला पेंढारकर ला भेटूया.” पाणिनी म्हणाला आणि नर्स ने दाखवलेल्या खोलीत आला.
“नमस्कार वकील साहेब.” पाणिनीला बघून पियुष पेंढारकर म्हणाला
“नमस्कार कशी आहे तब्येत?”
“बरच चांगलं वाटतंय आज. म्हणजे आता काही मी अडचणीत नाही असं जाणवतय. तुम्हाला गंमत कळली काय झालं?” –पियुष
“नाही काय झालं?”
“ज्या माणसाने मला धडक दिली तो इथे आला होता मला भेटायला. त्याच्याबरोबर एक तरुण मुलगाही होता. विमा कंपनीचा तो अधिकारी होता. साधारण तो माझ्याच वयाचा होता. दोघेही खूप चांगले वागले माझ्याशी.. त्यांनी मला आर्थिक मदत द्यायची तयारी दर्शवली.”
“पियुष. खरं म्हणजे ते तुला भेटायला आले तेव्हाचं तू मला सांगायला हवं होतस.”
“मी प्रयत्न केला पण ऑफिस बंद होतं तुमचं. आणि तुमचा मोबाईल नंबर मला माहित नव्हता.”
“ठीक आहे पियुष काय झालं सांग मला.”
“मला भेटायला आलेला हा माणूस मला म्हणाला की कोर्टकचेऱ्या करायची गरज नाही, त्यासाठी खूपच खर्च येईल. मला अपघात घडल्याबद्दल त्याला खूप वाईट वाटत होतं त्याने मला आर्थिक मदतीची तयारी दर्शवली.”
पाणिनी पटवर्धन ने सावधपणे जवळची खुर्ची आपल्याकडे ओढली आणि त्यावर बसला.
“ मला एक सांग पियुष, तू कशावर सही तर केली नाहीस ना?”
“हो. केली ना मी सही. त्यांनी एका कागदावर काही मजकूर लिहिला मला दाखवला आणि मी त्यावर सही केली.”
पाणिनीच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. चेहरा रागाने लालबुंद झाला
“पियुष मला न कळत आणि मला विश्वासात न घेता तू त्यांच्याशी तडजोड केलीस?”
“अहो पण तुम्ही असता तर तडजोड करून शेवटी मला पैसेच मिळवून दिले असते ना? तो विमा कंपनीचा अधिकारी मला म्हणाला की ते मला पन्नास हजार रुपये देतील याशिवाय हॉस्पिटलचा सगळं बिल डॉक्टरांचा सगळं बिल शिवाय वकील म्हणून तुमची जी काही योग्य फी रक्कम असेल ते ते देतील.”
“योग्य फीची रक्कम ! ” पाणिनी पुटपुटला
“हो असेच शब्द वापरले त्यांनी” पियुष म्हणाला.
“पियुष योग्य रकमेची संकल्पना त्यांची आणि माझी वेगळी असू शकते.” पाणिनी म्हणाला
“हे तर काहीच नाही, या व्यतिरिक्त त्या माणसाने मला पन्नास हजाराचा चेक दिला.”
“म्हणजे त्या तोंडवळकर नावाच्या माणसाने?” पाणिनी ने विचारलं.
“तोंडवळकर नाही कीर्तीकर नावाच्या माणसाने” –पियुष
“काय !” पाणिनी एकदम किंचाळून म्हणाला
“हो बरोबर आहे मी सांगतो ते”
“हे बघ, हे बघ, पियुष मला परत सगळं काही नीट सांग सुरुवातीपासून आणि पटकन सांग जेवढे पटकन सांगता येईल तेवढे सांग तू सही केलेल्या कुठल्याही कागदपत्राची प्रत त्यांनी तुझ्याकडे दिल्ये?”
“हो दिल्ये”
“बघू दे मला”
पाणिनी ला पियुष ने कागदपत्र दाखवलं. पाणिनीच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य पसरल.
“ठीक आहे पियुष आता मला सांग सविस्तर काय काय घडलं”
“काही नाही, ते साधारण दीड एक तासापूर्वी इथे आले. असं दिसत होतं की कीर्तीकर खूपच अपसेट झाला होता तो म्हणाला की विमा कंपनीची परवानगी नसल्यामुळे तो अपघाताबद्दल फारसं बोलू शकणार नाही पण जे काही घडलं त्याबद्दल त्याला खूप वाईट वाटत होतं खूप चांगला माणूस वाटला मला तो”
“ठीक आहे पियुष पुढे बोल”
“कीर्तीकर जे काय करतोय ते बरोबर करतोय असं मला वाटतं. पटवर्धन, त्याने मला सांगितलं तो तुमच्या ऑफिसमध्ये तुमची वाट बघत बसला होता कारण त्याला माझ्याकडे तुम्हाला घेऊन यायचं होतं आणि माझ्याशी बोलायचं होतं. त्याने मला सांगितलं की तुमचं ऑफिस बंद होतं पण तुमची सेक्रेटरी तिथे होती पण तुम्ही तुमच्या ऑफिसला परत याल किंवा नाही याची तिला खात्री नव्हती म्हणून तो इथे मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांने तुम्हाला एक दोन वेळा फोन करायचा प्रयत्न केल पण तुमच्याकडून काही उत्तर आलं नाही.”
पाणिनीच्या कपाळावर आठ्या पसरल्या “कीर्तीकर मला फोन करेल याची मलाही कल्पना नव्हती मी दुसऱ्या एका प्रकरणात बाहेर गेलो होतो सर्वसाधारणपणे ऑफिस चं कामकाज संपल्यानंतर मी कुठला फोन घेत नाही कारण असे फोन घेतले की नसतं तर मागे लचांड लागत असा मला अनुभव आहे.”
“ओ ! पटवर्धन सर मला वाटत नाही पण मी काही चुकीचं वागलो आहे.”
“अजिबात काळजी करू नको पियुष. उलट पक्षी तू बरोबर वागला आहेस”
“ओ धन्यवाद पटवर्धन सर. सुरुवातीला तुमच्या अविर्भावावरून मला वाटलं की मी काही चुकीचं केलंय”
पियुष ने दिलेलं कागदपत्र पाणिनीने घडी करून आपल्या खिशात घातलं
“विषय असा आहे पियुष, सर्वसाधारणपणे असं काही घडतं तेव्हा वकील या नात्याने आम्ही अशीलाला सांगतो की वकिलाच्या अनुपस्थितीत स्वतंत्रपणे कुठलीही तडजोड करू नका कारण वकील हा त्यातला ज्ञानी असतो आणि तो अधिक चांगली तडजोड जमवून आणू शकतो. पण याबाबतीत मी असं म्हणेन तुला नक्की कोणी धडक दिली हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आणि ते शोधून काढायची संधी आहे किंवा नाही याबद्दल साशंकता असल्यामुळे मी तुला त्याबाबतीत आधीच सावध करायला पाहिजे होतं ते करू शकलो नाही. बर आता असू दे तुझं डोकं कसं काय आहे दुखतय खूप?” पाणिनी ने विचारलं.
“नाही. तसं थोडं बरं आहे आता पण पटवर्धन सर मला अजूनही वाटतंय मी तसं करायला नको होतं का?”
“नाही- नाही तसं काही नाही तू त्या कागदपत्रावर सही करून दिले आहेस त्यामुळे कीर्तीकर ची सर्व जबाबदारीतून मुक्तता झाली आहे.”
“पण पटवर्धन साहेब याचा अर्थ मी काही चुकीच्या दस्तावर सही करून दिलेली नाही ना?”
“नाही तसंच काही नाही पण लक्षात ठेव इथून पुढे कशावरही सही करू नको तुझ्याकडे कोणीही आलं आणि कशावरही सही मागितली तरी तू सही करून द्यायची नाहीस. समजलं?”
“हो सर समजलं”
“तर विमा कंपनीने पण तुला चेक दिला आहे आणि कीर्तीकरनी पण चेक दिला आहे” पाणिनी म्हणाला
“हो बरोबर”
“तुझ्या आईचं काय?”
“ते तिला भेटायला जाणार आहेत .त्यांनी मला तिला फोन करायला लावला. त्यांनी मला विचारलं की तिला जो मानसिक धक्का बसला आहे त्यासाठी दहा हजार ची रक्कम दिली तर हरकत नाही ना? मला माहिती होतं की आई या रकमेला सहज तयार होईल पण मी त्यांना असं भासवलं की मी या गोष्टीवर जरा विचार करीन आणि गप्प राहिलो. मग कीर्तीकरनी मला विचारलं की ही रक्कम कमी वाटत असेल तर आणखीन पाच हजार द्यायची तयारी आहे. त्यानुसार ते आता आईशी बोलणार आहेत”
“सर्व ठीक आहे आता हे पियुष आता तुला मिळालेले हे चेक तू माझ्याकडे दे मी ते तुझ्या खात्यात भरायची व्यवस्था करतो तुझं खात आहे ना बँकेत?”
“हो आहे ना” पियुष म्हणाला त्याने पाणिनी पटवर्धनला त्याच्या बँकेचे नाव सांगितलं खाते नंबर सांगितला त्यानंतर थोडा गोंधळलेला चेहरा करून त्यांनी पुन्हा पाणिनीला विचारलं “खरंच पटवर्धन सर, मी काही चुकीचे केलेलं नाही ना?”
“हे बघ पियुष आत्ता या प्रकरणात तरी काही चुकीचं केलं नाहीयेस पण परत असं काही करू नको मी मगाशी म्हटल्याप्रमाणे परत कोणी तुझ्याकडे कुठल्याही कागदपत्रावर सह्या घ्यायला आलो तरी तू त्याच्यावर सह्या करायच्या नाहीस अगदी माझं नाव जरी कोणी सांगितलं तरी सह्या करायच्या नाहीस.”
“पटवर्धन सर तुमच्या फी बद्दल काय ते तुमची फी देणार......?”
“आता बरोबर प्रश्न विचारलास तू. ते देणार माझी फी. अशा लोकांना वाटत असतं की वकिलाशी न बोलता परस्पर त्याच्या अशी म्हणजे ज्या माणसाला दुखापत झाली आहे त्याच्याशी बोलून आर्थिक नुकसान भरपाई पटकन तडजोड करून घ्यावी आणि त्याच्या वकिलाला मात्र योग्य ती फी द्यावी अशा वेळेला ते वकिलाला अत्यल्प रक्कम फी म्हणून देतात त्यांना वाटत असतं आपण देऊ केलेल्या फी पेक्षा जास्त फी हवी असेल वकिलाला तर त्याने त्यासाठी कोर्टात दावा लावावा”
“अरे बापरे! असे असतात लोक! मला वाटतं अशी काही वेळ तुमच्यावर ते आणणार नाहीत”
पाणिनी हसला, “नाही, माझ्यावर ते अशी वेळ नाही आणू शकणार, याचं कारण असं आहे पियुष, की हे विमा कंपनीचे लोक एवढे घाबरलेले आहेत की पुढे त्यांचा पॉलिसी होल्डर कुठल्यातरी मोठ्या लफड्यात अडकण्यापेक्षा आणि त्याची मोठी आर्थिक जबाबदारी कंपनीला घ्यायला लागण्यापेक्षा आत्ताच तडजोड करून भविष्यातला संभाव्य वाद मिटवावा असा विचार त्यांनी केला असावा”.
“पण हे योग्य केलं आहे ना त्यांनी?”
“हो हे ठीक आहे कारण त्यांच्या पॉलिसी होल्डरला या प्रकरणात कुठलीच दुखापत सहन करायला लागलेलं नाही.
उद्या आपण तुला प्रत्यक्षात ज्या माणसांनी धडक दिली त्याच्याशी तडजोड करू. दरम्यान मी तुझ्या खात्यात हे चेक भरायची व्यवस्था करतो आता तू जरा निवांत झोप त्यांनीच तुला विश्रांती मिळेल” पाणिनी म्हणाला आणि पियुष चा निरोप घेऊन बाहेर पडला.
( प्रकरण ९ समाप्त)