Swpnasparshi - 15 in Marathi Moral Stories by Madhavi Marathe books and stories PDF | स्वप्नस्पर्शी - 15

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

स्वप्नस्पर्शी - 15

                                                                                    स्वप्नस्पर्शी:१५

 खिडकीतून जेव्हा सुर्यकिरणं आत आली तेव्हा सगळ्यांना जाग आली. सात वाजून गेले होते. इतका वेळ कधीच कुणी झोपत नसे, पण कालच्या प्रवासाचा शीण असेल असे आधी वाटले मग लक्षात आले की आजुबाजूला गाडयांचे आवाज नाही, दूधवाला पेपरवाला यांची बेल नाही, कुठूनही रेडिओ, टीव्हीचा आवाज नाही आणि मुख्य म्हणजे कामावर जायचे दडपण नाही की मुलांना शाळेची तयारी करुन पाठवायची घाई नाही. तिथे कर्तव्य होते इथे इतिकर्तव्यता होती. आता मात्र चौघं भराभर आवरुन कामाला लागले. अस्मिताने आधी चहा ठेवला, मग भांड्यांची बॅग उघडून भांडे जागेवर लावायला लागली. राघव, स्वरुपा वॉर्डरोबमधे दोघांचे कपडे नीट रचुन ठेवू लागले. कागदपत्र, लॅपटॉप एका वेगळ्या कप्प्यात ठेवला. त्याला लागूनच रायटिंग टेबलही होता. त्यामुळे तिथुन घेणे, ठेवणे, सोपे झाले. मधुरने हॉलच्या शोकेसमधे आईची पुस्तकं, काही शोच्या वस्तु, फ्लॉवरपॉट असं सामान लावलं. जसजसं सामान जागेवर जावू लागलं तसतसं काय आणायला हवं होतं हे लक्षात येऊ लागलं. अस्मिताने आणलेली चहा बिस्किटे खात मग काय आणायचं बाजारातून याची यादी तयार केली. मग हे ही लक्षात आले की घरकामाच्या बाईचे, काका काही बोलले नाही. बघुया म्हणत परत सगळे उठले. अस्मिता व स्वरूपाने मिळून, आणलेलं धान्य डब्यांमध्ये भरून टाकलं. दुधाच्या पिशव्या सध्या तर होत्या, पण रोजच्या दूधवाल्याचं, पेपरचे  काय ? हे पण यादीत टाकलं. मधुर, राघव गॅरेजमधे जाऊन नजर टाकून आले. कुलूपासकट ते व्यवस्थित होतं. तिथेच पाणी घालायचा मोठा पाईपही सापडला. मागच्या बाजुला बोअरची छोटी रुम होती. वरच्या टाकीत पाणी चढवायचं तंत्र बघून ते चालू करुन बघितलं. काल अंधार झाल्यामुळे कुणी गच्चीवर गेलं नव्हतं. गेस्टरुमला लागून असलेल्या पॅसेजमधुन जिना वर जात होता त्या गच्चीच्या दाराला कुलूप होतं. काकांनी दिलेल्या चावीच्या गुच्छातून ते कुलूप उघडलं. एखादा मोठा समारंभ व्हावा अशी ती मोठी गच्ची होती. त्यावर छोटी शिडी लावून सिंटेक्सची टाकी बसवलेली. मोकाट वारं, कायम साथीचा हिरवागार डोंगर, समोरच्या वाडीतल्या पाटाचे मोटेने वहाणारे झुळुझुळू पाणी, मंत्रमुग्ध होऊन दोघेही पहातच राहिले. समोरच्या वाडीतली कामं सुरू झाली होती. गच्चीवर त्या दोघांना पाहून लांबूनच कुणीतरी हात हलवला इकडून या दोघांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. दिवसाच्या प्रहराचं, प्रत्येक ऋतुतलं सौंदर्य वेगळं असणार हे दोघांच्या लक्षात आलं. वरूनच मधुरनी दोघींना आवाज दिल्यावर हातातलं काम सोडून त्या वर आल्या आणि निसर्गाच्या संगतीत हरवून गेल्या. थोड्यावेळाने सगळेच खाली आले. सामान तसे लावून झालं होतं. काका यायच्या आत आंघोळ करुन तयार झाल्यावर स्वरूपाने उपमा बनवला. चहा नाष्टा झाल्यावर मधुरनी टीव्ही चालू आहे का बघितला. त्यात केबल कनेक्शन होते पण पॅक टाकावा लागणार होता. मग ते ही यादीत लिहिलं गेलं. राघवांचं वेगळच काम चालू होतं. कुत्रा आणल्यावर त्याला कुठे बांधायचं ? पावसाळ्यात कुठे ठेवायचं ? शेवटी मागच्या अंगणात त्याच्यासाठी एक खोपटं करायचं ठरवलं. मग त्यासाठी लागणारं सामानही यादीत लिहिलं. मधुरला खुप गंमत वाटत होती कारण त्यानी कधी घर बदललेलं पाहिलच नव्हतं. त्यामुळे नवीन घराची गंमत, ते सजवणं, लावणं यात त्याला खुप इंटरेस्ट निर्माण झाला. त्यानी जाहीर केलं की नवीन घराचा आराखडा, सजावट, वस्तुंची खरेदी सगळं मी करणार. अस्मिता लगेच कमरेवर हात ठेवून म्हणाली “ आणि मी कुठे गेले ?” तिलाही तयार संसार वाट्याला आल्यामुळे हे घर लावताना मजा वाटत होती. “ अरे आपण मिळूनच जाऊया ना.” स्वरुपा म्हणाली. तिला आधीचे दिवस आठवले. सुरवातीचा जेमतेम पगार, त्यात घर खर्च करताना एकाला एक आवडतं तर दुसऱ्याला दुसरं. तेव्हा आपली आवड मारून वस्तु खरेदी मधेही किती आनंद असतो. तो तिने  अनुभवला होता. अश्या लुटुपुटूच्या भांडणात मजाही होती. पण हे ज्यानी त्यांनी अनुभवावं. दुसऱ्यानी सांगुन त्याची मजा घालवू नये हे तिला माहीत होतं.

   स्कूटरचा आवाज आला तसे सगळे बाहेर आले. प्रकाशकाका बरोबर एक बाई आणि दुधाची चरवी घेऊन एक गडी आला होता. “ अरे राघवा, काल सांगायचं राहूनच गेलं. ही वनिता तुमच्याकडे घरकामाला येईल. स्वच्छ काम करते. आपल्या छोट्या कारखान्यात आहे कामाला. तुमचं सकाळी काम आटोपून दुपारी तिकडे कामाला येत जाईल. पैशाचं काय ते ठरवून घ्या. हा आपला गोविंदा. सकाळी तुमच्याकडे दुध टाकून जात जाईल. किती पाहिजे ते सांगुन ठेवा.” राघवांच्या लक्षात आलं काकांचा तर गाई म्हशींचा धंदा आहे. मग ते ही गंमतीने म्हणाले “ किती रुपये लिटर ? परवडलं तर घेतो.” दोघही हसू लागले. स्वरुपा व्यवहारी होती एखादा दिवस असे दुध घेणं ठीक होतं पण नेहमी नाही. “ काका, खरच सांगा किती रुपये लिटर ?”

 “ अगं पैशाचं काय एव्हढं घेऊन बसलीस ?”

 “नाही. तुम्ही सांगणार नसलात तर आम्ही घेणार नाही.” शेवटी चाळीस रुपये भाव ठरून अस्मिताने एक लीटर दुध ठरवून घेतलं. आधीच्या पिशव्या अजुन घरात होत्या आणि लागलं तर कधीही काकांकडून आणता येणार होतं. सगळं घर लावून झाल्याचे काकानी पाहिले. मग बाजारात हे तिघं जायला निघाले तेव्हा आम्ही पण येतो म्हणजे बाजार पाहून ठेवता येईल, असं म्हणत स्वरुपा, अस्मितापण निघाल्या. वनिताला सगळे घरकाम आणि कपडे इस्त्री यांचे आठशे रुपये ठरवून उद्यापासून कामावर बोलावले. राघवांनी कार काढली, काका घरी स्कूटर ठेवून आले. मधुर सगळे दारं खिडक्या नीट बंद करुन येऊन बसला. गप्पा चालू झाल्या.

  “ राघवा, राकेश आला हं सकाळी. तुम्हाला भेटायला अगदी उत्सुक आहे. प्रवासानी थकल्यामुळे अजुन झोपलाय नाहीतर तो ही आत्ता आपल्या बरोबर आला असता. आता जेवताना त्याची भेट होईल.” एक एक गाडं पुढे सरकत होतं.

   गाडी बाजारात पोहोचली. कुठे काय मिळते ते काका दाखवत होते. राघव, स्वरुपा बघून ठेवत होते. घरापासून साधारण वीस एक मिनिटांचा रस्ता होता. भाजी बाजार तर गच्च भरलेला. थंडीचे दिवस असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या भाज्या फळं उपलब्ध होते. पेरू, चिंचा, आवळे मुबलक दिसत होते. पुण्याच्या मनाने इथे खुपच स्वस्त भाज्या फळं होती. मग अस्मिताने भरपुर बाजारहाट करुन घेतला. एका बाजुला मासळी बाजार होता. राघव, मधुर खुष झाले. सर्व प्रकारची खरेदी आटोपून डिश टीव्हीचे पैसे भरले. काकांनी लाईटबिल, फोनबील कुठे भरायचे ते दाखवले. कामं संपवून सगळे काकांच्या घरी आले. जेवायची वेळ झालीच होती. त्यांना पहाताच राकेश समोर आला. काकांनी त्याची ओळख करुन दिली. हसतमुख राकेशला पाहून सगळ्यांनाच बरं वाटलं. अनोळखीपणाचा बंध तिथे तयारच झाला नाही. जेवताना, जेवण झाल्यावर सगळे अखंड गप्पा मारत होते. राकेश आला म्हणुन जयाकाकूंनी तिरफळ घालुन फिशकरी आणि अंडाभुर्जी केली होती. त्या चवदार झणझणीत जेवणावर गोड खाणं अवघड होतं. ताव मारून जेवण झाल्यावर सगळ्यांनाच सुस्ती आली. राघवांनी रात्री तिकडेच जेवायला बोलावले. पावभाजी आईस्क्रीमचा बेत ठरला. रात्री मग व्यवहाराचे बोलायचे पक्के झाले. मग चलूया म्हणत त्यांनी निरोप घेतला.

    घरी आल्यावर जरा झोप काढून चौघं कामाला लागले. बाजारातच प्रकाशकाकांकडच्या लोकांना बोलवायचे ठरवले असल्याने सगळं सामान आइसक्रीम त्यांनी तिथेच खरेदी केले होते. पावभाजी बनवणे हे मधुरचे आवडीचे काम. बाकीच्यांनी त्याच्या हाताखाली मदत करायची. सहा वाजेपर्यंत सगळी तयारी झाली. मग अस्मिताने चहा बनवून कालच्या प्रमाणे मागच्या अंगणात आणला. चौघही सुर्यास्त बघत बसले. निसर्गात तुम्हाला काही बोलावं न वाटणं हे तुम्ही अंतर्मनात प्रवेश केल्याचं लक्षण आहे. बहिर्मुख मन सतत काहीतरी बोलणं, खाणं अश्या क्रिया करत असतं. म्हणजेच तुमचे मन जेव्हढे चंचल तेव्हढया तुमच्या शारीरिक क्रिया होणार. राघवांच्या मनात विचार चालू होते. मनाच्या क्रियांचा अभ्यास यावर त्यांनी नुकतेच एक पुस्तक वाचले होते. शरीर हे एक जड मशिन आहे. अवयवांना दिलेले काम संकलन करुन ते मेंदुकडे पाठवतात, व त्याच्या आज्ञेनुसार क्रिया प्रतिक्रिया चक्र घडत रहाते. मग यात मन कुठे आहे ? मन इच्छा निर्माण करतं. संकलन करुन पाठवलेल्या माहितीवर हे मला पाहिजे, हे नको असे ठरवून मेंदु त्याप्रमाणे आज्ञा देतो. असं चक्र आहे का ? मग नियंत्रण कुणाचे ? मनाचे ? राजा बोले अवयवप्रजा डोले. मग या सगळ्यात आत्मा कुठे ? शांततेने मनात एक पोकळी जाणवते तिथे ? हे सगळे तर्कवितर्क आहेत का ? एक बिंदु कुठे असेल ज्यातून आपण जन्म घेतो आणि मरतो ? काका आले. मधुरच्या बोलण्याने राघव भानावर आले. खरं तर त्यांना आत्ता कुणाशी बोलणं जड जात होतं. पण इतक्यात आपल्याला फक्त मनाच्या क्रिया प्रतिक्रिया अभ्यास करायचा आहे. तो तर त्यांच्याशी बोलताना पण करता येणार हे लक्षात आल्यावर त्यांचा मूड परत जागेवर आला. थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा होऊन व्यवहाराची बोलणी सुरू झाली.

   राकेश म्हणाला “ काकांनी आणि बाबांनी मिळून ही जमिन घेतली होती. इथे  खुप काही करायचं मनात होतं. पण आता तिकडे आमचा चांगला जम बसला आहे त्यामुळे इकडे परत येणं अवघड आहे. शिवाय तिकडे दोघं मित्र मिळून एक प्रोजेक्ट सुरू करतोय त्यासाठीही पैसा उभा करायचा आहे. म्हणुन शेवटी ही जमिन विकायची ठरवली. जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे आहे आणि काकांनी ती तुम्हाला आधीच सांगितली आहे. त्यावर तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला.”

   राघव म्हणाले “ आम्ही पण सगळं चेक केले आहे आणि काकांनी सांगितलेल्या रकमेला तयार आहोत. रक्कम एक रकमी देणार आहोत.”

  “ ठीक आहे. ठरलं तर मग. पेपरवर सह्या झाल्या की रक्कम द्यायची.” काका दोघांचही भलं पहात होते. दोघही त्यांचे आपले आहेत ही भावना लक्षात घेऊन राघव व राकेशनी मान डोलावली.

   “ चला तोंड गोड करा.” काकांच्या या वाक्याने सगळे हसले. अस्मिता अंजिरबर्फी घेऊन आली. पावभाजी, आइसक्रीम, गप्पा यात किती वाजले काही कळालेच नाही. घर जवळ असल्याने त्याची कुणाला फिकीरही नव्हती. मुलं पेंगायला लागल्यावर काकांकडचे जायला निघाले.

   मधुर राकेशची तर फारच गट्टी जमली. दोन दिवस दोघं मिळून कुठे कुठे फिरून आले. घरी आले की त्यांची वर्णनं सुरू व्हायची. कधी इकडे जेवायचे, कधी काकांकडे. एकमेकांशिवाय त्यांना चैन पडत नव्हती. पंधरा तारखेला तहसिलदार ऑफिसमध्ये जाऊन, घेणारा देणारा यांचे फोटो, त्यासाठी साक्षी रहाणाऱ्यांच्या सह्या, सगळ्या कार्यवाही सरकारी वेगाने चाललेल्या होत्या. पेपर्स तयार असुनही ते पुर्ण व्हायला चार तास लागले. हातात कागद आल्यावर राघवांनी पाच लाखाचा चेक राकेशच्या हातात दिला. अजुन एक पेपर येणं बाकी होतं. तो आल्यावरच प्रक्रिया पुर्ण होणार होती. एक दोन दिवसात तो पेपर हातात येईल असे काका म्हणाले. राकेश अमेरिकेला पुर्ण रक्कम घेऊन जावू शकणार होता. तोपर्यंत मुंबईची कामं आटोपून वापस गुहागरला यायचा त्याचा प्लॅन होता. मधुर दुसऱ्या दिवशी पुण्याला जायला निघणार असल्याने त्याने राकेशला आपल्या बरोबर चालण्याचा आग्रह केला. मग त्याच्या बरोबर निघून  एक दिवस पुण्याला राहून राकेश पुढे मुंबईला जाणार असे ठरले. रात्री जड मनाने अस्मिता, मधुर सामान आवरू लागले. तसे राघव हसून म्हणाले “ तुम्ही काय कायमचे चालले आहात काय ? सुतकी चेहेरे करताय कशाला ? आत्ता मुलांना ख्रिसमसची सुट्टी लागेल तेव्हा त्यांना इथे सोडायला या. मी नंतर त्यांना पोहोचवून देईन.” “ खरच की.” म्हणत दोघांचे चेहेरे खुलले. मग त्यांच्या स्वरुपा, राघवांना सुचना देणे सुरू झाले. रोज फोन करा, दारं नीट लावा, स्वतःची काळजी घ्या हे ऐकुन स्वरुपा वैतागून म्हणाली “ आम्ही काय लहान मुलं आहोत का ?” यावर मधुर नाटकीपणे म्हणाला “ म्हातारपण हे एकप्रकारचं बालपणच असतं.”

   “ हो पण आम्ही अजुन म्हातारे झालेलो नाही.” राघवयांच्या या बोलण्यावर हसत सगळे झोपायला गेले. सकाळी लवकर उठायचे होते.  

   मधुर, अस्मिता, राकेश गेले आणि राघव स्वरूपाचे सहजीवन सुरु झाले. आधी दोन दिवस करमेचना. दोघांच्याच स्वैपाकाची स्वरुपाला सवय नव्हती. त्यामुळे तो ही जास्ती होऊ लागला. पण मग नियमपूर्वक काही गोष्टी सुरू केल्या. सकाळी लवकर उठायची सवय दोघांनाही होतीच, मग लांब फिरायला जाणे, तिथुन सुर्योदयाचा नजारा पाहून आल्यावर पेपर वाचत चहा, आंघोळ करुन स्वरुपा नाष्टा बनवेपर्यन्त राघव आपलं आटोपून घेत असत. मागच्या अंगणात बसायला त्यांनी टेबल खुर्च्या आणल्या होत्या. तिथेच दोघं नाष्टा करायला बसत. निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुखावह वाटत होतं. स्वरुपा पुजा करेपर्यंत राघव ध्यानाला बसत. झेनयोगाच्या अभ्यासक्रमात त्यांनी आपलं नाव घातलं होतं. स्वरूपाचा स्वैपाक होईपर्यंत राघवांची काही कामं चालत. सध्या डॉग हाऊस तयार करण्याचं, त्याच्या फळ्या मापाच्या करणे, ठोकणे, सुरू केलं. दुपारी जेवण झाल्यावर थोडावेळ झोप आणि मग टिव्ही, गप्पा, वाचन, बुद्धिबळ खेळून झाल्यावर रात्रीची झोप असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला. पण हा दिनक्रम फार दिवस टिकणार नाही हे दोघांनाही माहित होते. हळूहळू कामं  सुरू होणार आणि नंतर दिवसही पुरणार नाही. आहे तोपर्यंत मजा करायची असे त्यांचे ठरले. कुत्र्याचं खोपटं तयार झाल्यावर त्यांनी छानपैकी रंगवून काढलं. एक दिवस पुर्ण संध्याकाळ समुद्रावर घालवली. पण तरीही कुठेतरी शिथिलता जाणवत होती. काका गावाला गेल्यामुळे आपल्याला ही शिथिलता आली की इतक्या वर्षांच्या दगदगीनंतर शांतपणा अनुभवायला मिळाला म्हणुन स्वस्थता आली आहे हेच राघवांना कळत नव्हतं. मग दोघांना जाणवलं असा वेळ घालवण्यापेक्षा थोडं काम सुरू करावं. दोघही जयाकाकूंकडे जाऊन, समोरच्या अंगणात बाग तयार करण्यासाठी पारिजातक, गुलाब, चाफा, जाई, जुई, बोगनवेल, मधुमालती अशी रोपं घेऊन आले. काकूंनी बरोबर एक गडीही दिला. दुसऱ्या दिवशी तो आल्यावर, कुठे कुठली रोपं लावायची याची आखणी केली. लॉन करायचं ठरल्यावर राघवांनी त्याला घेऊन लगेच नर्सरी गाठली. गवताचे चौकोनी तुकडे ते घेऊन आले. तोपर्यंत वनिता आणि स्वरूपाने मिळून लॉन तयार करायचा तो मोठा चौकोन पाण्याने चांगला भिजवून ठेवला. आल्यावर राघवांनी, त्याच्याकडुन कसं लावायचं ते शिकून घेऊन गडी, वनिता आणि अधून मधुन राघव स्वरुपा असे करत लॉन त्या दिवशी पुर्ण केलं. तो दिवस त्यातच गेला.

   राघवांचं अंग रात्री भरुन आलं. शेती करणं किती अवघड आहे. आपण यात उगाच पडलो का ? थोडं लहानपणी, तरुणपणीही खरं तर शेतात काम केलं होतं. पण तेव्हा अंगात ताकद होती. हाताला सवय होती. आता शरीराला सुखासिनतेची सवय झालेली. राघव नाराज झाले. आपण स्वतःबद्दल अवास्तव अपेक्षा बाळगल्या का ? साधं लॉन लावताना आपण एव्हढं थकलो मग पुढे कसे करणार ? सुखाचा जीव धोक्यात घातला का ? स्वरुपा पण खरं तर थकली होती, पण मनानी एकदम फ्रेश झाली. एखादा नवीन मार्ग गवसल्यासारखा  तिला वाटू लागला. राघवांना एक क्रोसिन देऊन ती त्यांची समजूत काढू लागली. सवय होईपर्यंत असे होतच असते. कुठलेही काम सुरवातीपासून कसे परफेक्ट जमेल ? हळुहळू होईल अंगमेहनतीची सवय, आणि गड्यांकडून तर कामं करुन  घ्यायची आहेत. आज दिवस कसा भरकन आणि छान गेला. उद्यापासून त्या लॉनला आणि नवीन लावलेल्या झाडांना पाणी टाकण्यात तुमचे दोन तास कसे जातील तुम्हालाच कळणार नाही. त्यातून एक प्रकारची एकाग्रता निर्माण होते. झाडाला जेव्हा नवीन पालवी फुटते, कळी दिसू लागते, मग फुलं फुलायला लागतात, सुगंध सुटतो. तेव्हाचा आनंद वर्णन करता येत नाही तो स्वतःच अनुभवता येतो. ती जणू स्वतःचे अनुभव सांगत होती. गोळीचा असर किंवा स्वरूपाच्या बोलण्याने असेल, पण राघवांना हलके वाटू लागले. त्यांचा डोळा लागला. तशी स्वरुपा खिचडी करायला उठली. थोड्या वेळाने त्यांना कशीबशी खिचडी खाऊ घातली. ती खाऊन ते लगेच झोपी गेले. तिला आता थोडं टेन्शनच आलं कारण राघव फारसे आजारी पडत नसत. त्यांना या वयात शेतीच्या बाबतीत प्रोत्साहन दिलं ही चुक तर नाही झाली ?

   सकाळी राघवांना जाग आली तेव्हा ते नेहमीप्रमाणे ताजेतवाने होते. कालच्या वेड्या विचारांचं त्यांना क्षणभर हसु आलं. दार उघडून बाहेर आले तेव्हा गार वाऱ्याच्या झुळकीनी पुलकीत झालेलं तन मन जणू हवेवर अलगद तरंगत साऱ्या जगाची भ्रमंती करून येईल असं त्यांना वाटू लागलं. आज बाहेर फिरायला जायला स्वरूपाने मनाई केली. मग आवरून ते बागेला पाणी घालू लागले. त्यांना वाटले आपण जे देतो तेच आपल्याला वापस मिळतं. त्या हिशोबाने जमिनीला आपण पाणी घातलं की त्यांना जीवनस्त्रोत मिळतो. शांती मिळते. त्यामुळे सुक्ष्मलहरींनी ती शांती आपल्या मनापर्यंतही पोहोचवत असेल म्हणुन पाणी घालताना एकतानता साधली जात असेल. यात मग क्रिया प्रतिक्रिया कश्या प्रकारच्या असतील ? डोळ्यांना हिरवा रंग सुखकारक वाटत असेल. पाण्याचा एक  प्रकारचा नाद कानाला रिझवत असेल, पाण्याचा गार स्पर्श त्वचेला गारवा देत असेल. या संवेदना मेंदुला पोहोचून, मन ते सुखाचे तरंग अनुभवण्यात मग्न होत असेल आणि यातुन साधत असेल एकतानता.

   “ काय म्हणतोय राघवा, कसे वाटतय ? करमतय का ?” राघवांच्या एकतानतेला धक्का बसला. पण ओळखीचा आणि अपेक्षित आवाज एकून मनानी आनंद व्यक्त केला. त्यांनी नळ बंद करुन आनंदाने काकांचे स्वागत केले.

   “ अरे काका, कधी आलात तुम्ही ? तुमचीच वाट पहात होतो.” काका आणि राघव घरात गेले. काकांच्या आवाजानी स्वरुपाही आनंदली होती.

   “ पोहे केलेत काका. आत्ता आणते.”

   “ अगं नको. आत्ता खाणं झालं आहे. राघवा तुझा पेपर तयार आहे. राकेश पण आलाय. आज रात्री तो परत जाईल.”

  “ ही तर चांगली बातमी आणली काका. आता कामालाही सुरवात करता येईल. नुसतं बसुन कंटाळा आला आहे. सवय नाही अशी.”

   “ राघवा, तू तयार होऊन अकरा पर्यन्त घरी ये. मग आपण ऑफिसमध्ये जाऊया.”

   “ हो चालेल येतो मी. काका अजुन एक बोलायचं आहे. आज राकेश आहे तर आजचा दिवस सोडून देऊ. उद्या मात्र बसुन आपण कामाचा आराखडा तयार करू. तुम्हाला उद्या वेळ आहे ना ?”

   “ हो चालेल राघवा. तुझ्या आणि राकेशसाठी हे दहा दिवस ठेवले होते. पण आता माझीही कामं सुरू करावी लागतील. दोघांचे बोलणे झाल्यावर काका निघून गेले.

  अकरा वाजता राघव काकांकडे पोहोचले. राकेश खुपच आपुलकीने भेटला. राघवांना ते फार भावले. आयुष्यात अश्या लोकांचं मोल फार असतं, कारण अश्या व्यक्ती फार थोड्या असतात. काही वेळाने तिघं ऑफिसला गेले. जाता जाता काका, राघव बीएसएनएल ऑफिसमध्ये लॅंडलाइनसाठी अर्ज देऊन आले. वाई फाई सकट दोन दिवसात कनेक्शन लावून देणार होते. हे एक फार मोठे काम झाले. त्यामुळे मुलांशी नीट बोलता येणार होते. तहसीलदार ऑफिसमधे तयार झालेलं खरेदीखत तिघांनी नीट वाचलं. कुठे त्रुटी राहिली असेल तर ती आत्ताच दुरुस्त करून घेणं शक्य होतं. राघवांनी मग उरलेल्या रकमेचा चेक दिला. आता ते त्या जमिनीचे मालक झाले. पुढच्या जीवनाचा मार्ग प्रशस्त झाला. त्या दोघांना त्यांच्या घरी सोडून ते परतले. संध्याकाळी त्या आनंदात राघव स्वरुपा आपल्या झालेल्या जमिनीच्या बांधावरून फिरुन आले. वर्ष दीड वर्षांनी तिचं रूप पालटणार होतं. राघवांचं हिरवं स्वप्न साकार होणार होतं. अर्थात हे सगळं खुप सुरळीत पार पडेल असे नव्हते. काही अडचणी येतील जातील. पण हेच तर आयुष्य. त्या रात्री नव्या जाणिवेने राघवांना छान झोप लागली.

   दुसऱ्या दिवशी प्रकाशकाका सकाळीच घरी आले. ते, स्वरुपा, राघव मिळून आराखडा करू लागले. “ सगळ्यात प्रथम घर बांधणीच्या प्रक्रियेला सुरवात करणे. मधुरला कागदपत्र पाठवून लोनसाठी सुरवात करणे, आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टरला साईट दाखवून कुठे घर बांधायचे, किती जागेत बांधायचे याची रुपरेषा ठरवून आधी त्या जागेवरचा झाड झाडोरा साफ करणे, मग शेतीसाठी  मोकळ्या जागेत पुढचे प्लॅनिंग करणे अश्या प्राथमिक गोष्टी ठरल्या. काकांच्या म्हणण्याप्रमाणे आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर इथला घेतल्यास जास्ती फायद्याचा राहिल. ते इथेच असल्याने त्यांना पहाणीला वरचेवर येऊन बांधकामातील संदर्भात सुचना करता येतील. त्याचं घर बांधलेला कॉन्ट्रॅक्टर व आर्किटेक्ट इथलेच होते. जर का तसे चालणार असेल तर आज दुपारी त्यांच्याकडे जाऊन बोलता येईल. काकांचा सगळा सेट तयार होता. त्यांच्या कुठल्याही हेतुबद्दल शंका घेणेही शक्य नव्हते. त्यात त्यांना बाहेरून कमिशन मिळत असेल तर राघवांना काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी स्वतःही काकांना कमिशन बाबत विचारले. तसे काका रागावले. या वयात समाजकार्य हा पण एक भाग कसा असतो यावर त्यांनी लेक्चर दिलं. आपणासी जे जे ठावे ते सकळांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जनं. ही रामदासांची ओवी जगण्याचा त्यांचा संकल्प होता. राघव स्वरुपानी काकांचे पायच धरले, आणि आम्हालाही तुमच्या या मार्गात सामील करून घेण्याची कळकळीची विनंती केली. काकांनाही या गोष्टीचा आनंद वाटला. इकडच्या भागाची काहीच माहिती नसल्याने काकांवर विश्वास ठेऊन ते निर्धास्त राहिले. एकदा मधुरशी बोलून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो असे म्हणून राघव, मधुरला फोन करायला गेले. स्वरुपा आणि काका स्वैपाकघरात कॉफी करता करता गप्पा मारत बसले. राघवांनी मधुरला सविस्तर कल्पना देऊन तुझे यावर काय मत आहे ते विचारले. त्यानी थोडा विचार केला आणि म्हणाला “ माझा इथे एक आर्किटेक्ट मित्र आहे त्याला विचारणारच होतो, पण काकांचे म्हणणे बरोबर आणि सोईचेही आहे. काही अडचण वाटली तर त्याला प्लॅन दाखवून सल्ला घेता येईल तेव्हढा तो जवळचा आहे. काकांच्या घराचं डिझाईन मला फार आवडलं. एकदम आर्टिस्टीक आहे. फार तर एलिव्हेशन आपल्याला वेगळं घेता येईल. शिवाय हवा, उजेड, दिशा यांची योग्य सांगड घातली आहे. तसच बांधलं तरी हरकत नाही. बाकी शेती प्रकल्पासाठी मात्र काकांवरच पुर्ण विश्वास ठेऊन रहावं लागेल असं मला वाटतय.” मधुरचं म्हणणं बरोबर होतं. राघव त्याच्याशी सहमत होते. “दोघं आज आर्किटेक्टकडे जाऊन या. ते काय म्हणतात ते बघा. मग मी मुलांना घेऊन चार दिवसात तिकडे येतच आहे. तेव्हा सगळं फाईनल करून टाकू. इकडे सगळी प्रोसिजर पुर्ण करून ठेवतो तिकडे आल्यावर कागदपत्र दिले की आठवड्यात लोन मंजुर करतात. मग घराचं काम चालू करता येईल.”

   “ मधुर इथल्या एलआयसीमधुन लोन घेतलं तर ? कारण ते माणसं सर्वे करतात मग लोन मंजुर करतात. इथल्या इथे ते सोपे होऊन जाईल.”

  “ हो. ते ही आहे. तुम्ही एल आय सी ऑफिसला जाऊन या आणि मग मला सांगा. त्याप्रमाणे करूया.” अशी ठरवा ठरवी होऊन राघवांनी फोन ठेवला. स्वरुपाला मधुर चार दिवसांनी मुलांना घेऊन येतोय हे सांगितल्यावर ती एकदमच खुष झाली. काकांना फोनवर जे काय बोलणे झाले ते कळाल्यावर त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्टला फोन लावले. चार वाजता आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये भेटायचे ठरले. एलआयसीच्या मित्राचा नंबर देऊन उद्या त्याला ऑफिसमध्ये भेटून यायला काकांनी सांगितले.

   सुरवात तर दमदार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच राघव एलआयसी ऑफिसमध्ये जाऊन काकांच्या मित्राला भेटले. पण जमीन राघवांच्या नावावर तर मधुरला होम लोन घेता येणार नाही म्हटल्यावर प्रश्न उभा राहिला. तसं तर राघव घर बांधू शकणार होते पण मधुरला इन्कमटॅक्स साठी इन्व्हेस्टमेंट दाखवायची होती म्हणुन तो हे घर दाखवणार होता. मग त्यांनी एक मार्ग काढून दिला. कायद्याच्या चौकटीत बसवून जमिनीच्या घराच्या भागाचे बक्षिसपत्र बनवून त्याचे अफिडेव्हीट बनवायला सांगितले. घराच्या कामाची लिंक लागली. दुपारी काकांबरोबर आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये भेटून बोलून झाल्यावर उद्या जमिनीची पहाणी करायला ते येणार असे ठरले. मग नंतर त्याप्रमाणे पैशाचे व्यवहार फाईनल करायचे होते. मधुर पुण्याहून येताना आवश्यक ते कागदपत्र घेऊन आला. तो आल्यावर घरबांधकामाचे व्यवहार ठरले. लोन प्रोसिजर सुरू झाली. घराचे डिझाईन फाईनल झाले. अमेरिकेहून नील, जानकी, अस्मिता सगळेच त्यात सहभागी होते. स्वरुपा घरात मुलांमध्ये व्यस्त झाली. बाहेरची काम संपवण्यात मधुर राघव गुंतले. चांगला दिवस बघून भूमीपूजन केले आणि घराच्या बांधकामाला सुरवात झाली. राघवांना परत मुलांना आणून सोडायला नको म्हणुन मधुर जाताना त्यांना घेऊन गेला.

   समोरच्या, आजुबाजूच्या घरातल्यांशी आता ओळखी झाल्या होत्या. एकमेकांकडे अधुन मधून येणे जाणे सुरू झाले. स्वरूपानी त्यांच्याकडून खुप वेगवेगळे फुलझाडं आणले. गोविंदकडून बागेत लावल्यावर ती त्यांची जोपासना करू लागली. बाग फुलू लागली. मागच्या अंगणात वाफे करुन घेऊन भाजीपाला लावला. ती घरात रमली. आता काय करावं हा प्रश्न तिच्या समोर नव्हता. बागकाम, घरकाम झाल्यावर पुस्तकं वाचायचा शौक ती पुरवत होती. बाजारात गेल्यावर लायब्ररीत जाऊन नाव नोंदवून आली. आठवड्यातून एकदा गावात चक्कर मारून भाजीफळं, पुस्तकं बदलणे, समुद्रावर फिरुन येणे असा तिचा दिनक्रम चालू होता. या क्रमात राघवांना वेळ मिळाला तर ते सामिल होत असत. राघव घर बांधणीवर जातीने लक्ष देत देऊ लागले. त्या बरोबर शेती, जमिनीवरचा झाड झाडोरा साफ करणेही चालू होते. काकांनी त्याचा कॉन्ट्रॅक्ट देऊन व्यवहार केला होता. झाडं कापून लाकडांचे पेसे तो देणार होता. शेतजमीन साफ करुन बांधावरची मोठी झाडं तशीच ठेवली. त्यामुळे पोफळीच्या, केळीच्या झाडांना वाऱ्यापासून संरक्षण मिळणार होतं. काका अधुन मधून चकरा मारुन अनुभवी नजरेने योग्य ते टिपत व दुरुस्ती करून देत. ही कामं चालू असताना एकीकडे विहीरीची डागडुजी सुरू झाली. विहिरीला पाणी तर होतं पण गाळ साचला होता. तो गाळ उपसून शेतात खत म्हणुन टाकता आला. भरपुर गाळ निघालेला पाहून काका खुष झाले.

   “ राघवा, बरं झालं जमिनीचा पहिला पोत तर तयार झाला.”

विहीरीचे झरे साफ करुन झाल्यावर उफाळून पाणी वर आलं. विहीर दुरुस्तीनंतर पंप बसवून घेऊन जेव्हा त्या पंपातून पाणी बाहेर पडू लागलं तेव्हा राघव, स्वरुपा दोघही अतिशय आनंदले. ते पाणी जमिनीवर पडून रंग बदलणाऱ्या मातीने तृप्तीचा हुंकार दिला. दोघांनी त्या पाण्याची पुजा केली.

   एक एक कामं मार्गी लागू लागली. घर वेगाने वर चढत होतं. जांभ्या दगडाच्या वापरामुळे ते लवकरच आकाराला आलं. पण आतल्या सुखसोई, टाईल्स, रंग, इलेक्ट्रिकलचे काम, फर्निचरला बराच वेळ लागणार होता. तोपर्यंत जमिनीतला झाड झाडोरा खणून काढून ती साफ करून, नांगरून, कुळवून तिला नरम करण्याचे काम चालू होते. त्यासाठी रोपं कशी व कुठे लावायची त्याची आखणी केली. कारण सुपारीची झाडं ही ठराविक अंतरावर लावतात. त्याप्रमाणे त्याचे पाट काढून ते पाणी संपुर्ण वाडीभर खेळेल अशी त्याची रचना करुन जमिन नरम करणे सुरू झाले. सुपारीला जमिन चांगली निचरा होणारी परंतु पुरेशी ओल धरुन ठेवणारी असावी लागते. कसदारपणात कमी असली तरी त्याची उणिव भरपुर खत घालुन पुर्ण करतात. काकांनी सांगितले की सुपारीच्या रोपांना सावली आवश्यक असते. त्याप्रमाणे दोन सुपारीच्या रोपांमध्ये केळी लावल्या जातात. त्यांची लागवड मे, जूनमधे करून पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरमधे दोन तीन वर्षाच्या वयाची सुपारी रोपं आपण लावून घेऊया. पण आपण यावर्षीही थोडी रोपं लावून बघूया कारण बांधावरच्या कडेने भरपुर झाडं आहेत. मधे रिकाम्या जागेत नारळाची झाडं लावून घेऊ या. आताच ही झाडं लावली म्हणजे सहा आठ महिन्यात थोडीफार त्यांची वाढ होईल. राघव या सगळ्याच बाबतीत अनभिज्ञ होते. त्यामुळे ‘ काका वाक्य प्रमाणम ’ यावर विश्वास ठेऊन होते.

   घर बांधणीच्या कामात मात्र ते अगदी रस घेऊन कामावर लक्ष ठेऊन होते. कोपऱ्या कोपऱ्याचे अंगल्स तपासणे. कुणी मजुर घाईघाईत असं तसं तर काम संपवत नाही ना ते बघणे, गिलाव्यावर पाणी मारणे, पाण्याचे पाइप नीट जोडले जात आहेत ना यावर लक्ष ठेवणे, कारण नंतर गळती सुरू झाली की घराला ओल हा प्रकार फार सतावतो. तसेच कोकणात पाऊस खुप असतो. त्यामुळे उतरत्या कौलारू घराचं डिझाईन इथे असते. दिवस कसे भराभर निघून जात होते. मधे काकांनी जर्मन शेफर्ड पिल्लू आणून दिले. पिल्लू म्हंटले तरी त्याचा उफाडा मोठा होता. स्वरुपा तर घाबरुनच गेली. राघव घरात असताना त्याला समोर मोकळं सोडायचं या बोलीवर ती थोडी रिलक्स झाली. मधे आबा येऊन चक्कर मारुन गेले. त्यांच्या सुचनांप्रमाणे शेतीत काही फेरबदल केले. मधुरच्या चकरा तर चालुच असत. नीलला फोनवर ही सगळी प्रगती कळवली जात असे. बघता बघता मे महिना उजाडला. घर आकाराला आले होते पण बारीक सारीक कामं राहिली होती आणि या पावसाळ्यात घर कुठे गळत नाही ना हे पण पाहून घ्यायचे ठरले. मुख्य म्हणजे फर्निचरचे काम बाकी होते. स्वरूपाने पावसाळ्यात नवीन घराच्या बागेत झाडं लावून घ्यायची ठरवलं होतं. डिसेंबरला नील येईल तेव्हा वास्तुशांती करायची असा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला. अशयाप्रकारे घराचा प्रोजेक्ट पुर्णत्वाला आला. इकडे आबा काकांच्या सल्ल्याप्रमाणे यावर्षी फक्त केळी व नारळाची लागवड करायचं ठरलं. हळुहळू राघवांच्या हिरव्या स्वप्नाला सुरवात झाली होती. स्वरूपाने या घरात केलेली बाग चांगलीच बहरू लागली होती. मधे जरा वेळ होता तेव्हा आईला बद्रीनाथ केदारनाथ ट्रीपला नेऊ या असं त्यांच्या मनात घोळत होते. त्यांनी आईला त्या संदर्भात फोन केला तेव्हा तिने नकार दिला. रामेश्वरला गेल्यापासून ती खुपच शांत झाली होती. आता माझ्या कुठल्याही इच्छा शिल्लक नाही असे तिने राघवांना सांगुन टाकले. तिच्या इच्छेविरुद्ध त्यांना काही करणे शक्य नव्हते. मग त्यांनी परत आपले लक्ष घर व शेतीत घातले. सुपारी, नारळाच्या शेती प्रकल्पावरची पुस्तकं, इंटरनेट वरून माहिती घेणं चालू होतं. काका तर चालता बोलता विश्वकोश, पण राघवांनाही आत्ता त्यातील बऱ्यापैकी गोष्टी, बारकावे, लक्षात येऊ लागले. कुत्र्याचे संगोपन जमू लागले. त्याला फिरवणे, आंघोळ घालणे, ही कामे ते जातीने करत. छोटं पिल्लू असलं तरी त्याचा दरारा मोठा होता. घराच्या आसपास अपरिचित व्यक्ती आली की त्याच्या भुंकण्याने घर दणाणून जाई.

   एके दिवशी काका सकाळीच घरी आले आणि म्हणाले “ राघवा, उद्या आपण नारळाची रोपं लावण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे. मे महिन्यात नारळ लागवडीची जमिन तयार करावी लागेल. आठ बाय आठ अंतरावर १x१x१ मीटर आकाराचे खड्डे करून घेऊ. पहिल्या आठवड्यात सरकारी रोप वाटिकेतून चांगल्या प्रतीची रोपं घेऊन येऊ या. मग पावसाळ्याला सुरवात होईल तेव्हा म्हणजे साधारण जुनच्या दुसऱ्या आठवड्यात रोपं लावूया. मग त्यासाठी लागणारे गडी, त्यांची मजुरी याबाबत त्यांनी कल्पना दिली. शेती कामाची अवजारं तर घरात आली होती. कुदळं, फावडे, घमेले, बादल्या त्याशिवाय शेणखत, कल्पतरू, सेंद्रियखत, सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या गोण्या, येऊन पडल्या होत्या. पालापाचोळयाचाही साठा त्यांनी करायला लावला होता. दुपारी राघवांनी नेटवर ते वाफे तयार करण्याची प्रक्रिया वाचून काढली. काका म्हंटल्यासारखं तुकड्या तुकडयांनी स्वप्न पुर्ण करत न्यायचं तसं आता अर्ध्यात येऊन पोहोचलो. महत्वाची सुरवात तर उद्या होणार असं त्यांना क्षणभर वाटून गेलं, पण नाही जमिन लागवडीसाठी उत्तम तयारी होणं किती आवश्यक आहे हे त्यांना आता लक्षात आलं. हिरवं स्वप्न अंतरगाभार्याची उद्या सुरवात आहे या विचारतच ते झोपी गेले.

                                                                              .................................................