Euthanasia in Marathi Moral Stories by Pralhad K Dudhal books and stories PDF | इच्छामरण

Featured Books
Categories
Share

इच्छामरण

‘इच्छामरण’-गरज की धोक्याला आमंत्रण.
रस्त्याने चाललो होतो. गर्दी दिसली म्हणून डोकावले.एक वृध्द गृहस्थ रस्त्यात बेशुध्द होऊन पडले होते.काही लोक म्हणत होते की, त्या गृहस्थाने मुद्दाम रस्त्यावर स्वत:ला झोकून देवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता!लोकानी प्राथमिक उपचार केल्यावर ते शुध्दीवर आले,पण ते साधारण नव्वदीचे आजोबा "मला मरू द्या, कशाला वाचवले?" “मला मरायचे आहे.” असं सारखं सारखं बडबडत होते.खोलात जावून थोडी चौकशी केल्यावर समजले की शेजारच्या इमारतीत ते एकटेच रहात होते.त्यांची दोन्ही मुले याच शहरात दुसरीकडे रहातात; पण त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.वृध्दापकाळ व मधूमेहाच्या आजाराने ते त्रस्त झाले आहेत व त्यांना आता असे परावलंबी जगणे नको आहे.आता तरी मृत्यू यावा असे त्याना मनापासून वाटते! यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न केले होते!
माझ्या एका कॉलेज जीवनातल्या मित्राची वृध्द आई आजारी आहे असे समजले.खुप वर्षांत संपर्क नसलेल्या या मित्राच्या घरी मी या निमित्ताने गेलो.घरात प्रवेश केल्याबरोबर एक औषधांचा वा तत्सम उग्र वास आला.घरात असाध्य आजार असलेला रुग्ण आहे,हे घराच्या एकंदरीत अवस्थेवरून तत्काळ लक्षात येत होते! त्या तीन खोल्यांच्या घरातील एका खोलीत त्याच्या आईचे अंथरूण घातले होते.या घरात माझा मित्र व त्याचा भाऊ असे दोघांचे कुटूंब असे सहाजण रहात होते.आईला तीन वर्षापुर्वी अर्धांगवायू होवून ती अंथरूणाला खिळून होती.सर्व औषधी उपचार करून झाले होते. पाण्यासारखा पैसा खर्च झाला होता.कर्ज वाढले होते.सर्वजण आईच सगळ मायेने करत होते पण आईला जगण्याची इच्छाच राहीली नव्हती!
वरील दोन्ही प्रसंगात पेशंट असलेल्या व्यक्ती वयाने वृध्द व आजाराने त्रस्त आहेत. त्यांना जगायची इच्छाच राहिलेली नाही! वार्धक्यामुळे आलेलं परावलंबत्व व बरे न होणारे आजार.अपघातामुळे कायमचे कोमात गेलेले रुग्ण अशा केसेस पाहिल्यानंतर जिवंतपणी मानवी देहाचे होणारे हाल बघवत नाहीत जर अशा रुग्णांच्या जीवनात चांगले काही घडण्याची शक्यताच नाही तर मरण येवून त्यांची यातनांमधून मुक्तता व्हावी असे विचार कुणाच्याही मनात येणे साहजिक आहे.यासाठी इच्छामरण/दयामरण मिळण्याचा हक्क माणसाला असावा असे प्रकर्षाने वाटते!
इच्छामरण/दयामरण असावे की नसावे यावर टोकाच्या विरोधाची मते समाजात पहायला मिळतात. एक ग्रीक शब्द ‘युदेन्शिया’ याचा मराठी प्रतिशब्द इच्छामरण,असा रूढ झाला!खरे तर त्यासाठी ‘दयामरण’ हा योग्य शब्द आहे,पण ‘युदेन्शिया’ याचा चपखल प्रतिशब्द म्हणजे ‘चांगले मरण’! प्रत्येक व्यक्तीला आपल्याला मरण येणारच असेल तर ते ‘चांगले मरण’ यावे असे वाटते! आता ‘चांगले मरण’ म्हणजे कसे? तर आपल्या शरीराची कुठलीही विटंबना न होता कुठल्याही वेदनेशिवाय जेंव्हा हवे असेल तेंव्हा येणारे मरण! जसा सन्मानाने जगण्याचा हक्क दिलेला आहे,तसाच सन्मानाने मरण्याचा हक्कही असावा म्हणून भारतात कायद्याची लढाई लढली जात आहे.
मुबईत के.ई.एम. रुग्णालयातील नर्स अरुणा शानबाग हिला इच्छामरण द्यावे,अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती.रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने २७ नोव्हे.१९७३ रोजी अरूणावर बलात्कार केला होता. तेंव्हापासून त्या कोमात होत्या.अरुणाचे हाल पाहवत नसल्याने व त्या शुद्धीवर येण्याची मुळीच शक्यता नसल्याने त्यांची मैत्रीण पिंकी विराणी यांनी अरुणाला इच्छामरण द्यावे अशी याचिका दाखल केली होती,पण न्यायालयाने ७ मार्च २०११ ला ही याचिका फेटाळली! इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून काही लोक मागणी करत आहेत;पण अशा कायद्याचा गैरवापर होऊ शकतो या कारणास्तव असा कायदा येऊ शकलेला
नाही.तज्ञ म्हणतात की जर इच्छामरण कायदेशीर करायचे झाले तर त्यांचा गैरवापर होवू नये यासाठी तरतूद करावी लागेल. अशी तरतूद असूनही जर त्यांचा भंग झाला तर गुन्हा दाखल होण्याची व त्यासाठीच्या शिक्षेची , तरतूद करावी लागू शकते.त्यामुळे मूळ प्रश्न सुटण्याऐवजी नवी यंत्रणा उभी करणे व त्याची अंमलबजावणी करणे हा मोठा प्रश्न उभा राहू शकतो.अशा विषयाबाबतीत कायदा करणे आवश्यक असल्याचे मत भारतीय विधी आयोगानेही व्यक्त केले होते.हा विधी आयोग सरकारला विविध प्रश्नांवर उपाय सुचवणे,कायद्याचे मसुदे तयार करणे अशी कामे करतो.जर विधी आयोग अहवालात जर सुयोग्य निर्णय घेतला गेला तर अशा प्रकरणात आत्महत्येचा प्रयत्न करण्यास मदत करणे किंवा दंड विधानातील इत्तर गुन्हे दाखल होणार नाहीत अन्यथा इच्छामरणाचे प्रकरण असले तरी आजूबाजूच्या सर्वाना(संबंधीत नातेवाईक,वैद्यकीय अधिकारी ई.) कायदेशीर बाबींचा त्रास होवू शकतो!
अरुणाच्या केसमध्ये दाखल झालेल्या अर्जावर विचार करताना सुप्रीम कोर्टाच्या असे लक्षात आले की आधी दिलेल्या निर्णयात काही त्रुटी व विसंगती आहेत म्हणून अश्या केसमध्ये निर्णय घेताना उपयोगी पडतील अशी सुधारित मार्गदर्शक तत्वे ठरवण्यासाठी पाच न्यायाधीशांची एक समिती नेमलेली आहे.ही मार्गदर्शक तत्वे यथावकाश येतीलच;पण तोपर्यंत इच्छामरण या विषयावर समाजात दोन्ही बाजूनी मते प्रदर्शित होतच रहाणार आहेत!दरम्यानच्या काळात अरूणाचा मृत्यू झाला आहे आणि यातनांतून त्यांची मुक्तता झाली आहे.
‘इच्छामरण असावे’ असे मत असलेली व त्यावर भाष्य करणारी काही प्रातिनिधिक मते –
‘आपल्याकडे मृत्यू विषयी प्रचंड भय आहे.पण मरणातही सन्मान हवा.मरणासन्न अवस्थेत जेंव्हा रुग्ण असतो तेंव्हा इच्छामरणाचा विचार झाला पाहिजे.जसे मृत्युपत्र केले जाते तसेच वैद्यकीय इच्छापत्र करणे गरजेचे आहे.’ असे इच्छा मरणाच्या हक्कासाठी अनेक वर्षे कार्यरत असलेल्या विद्या बाळ म्हणतात. आय.सी.यु मध्ये काम करताना अनेक मृत्यू जवळून पहाणारे डॉ.शिरीष प्रयाग हे सुध्दा इच्छामरणाचे समर्थन करतात.’’औषधांना प्रतिसाद मिळण्याची एक ठराविक मर्यादा असते.त्या
मर्यादेपुढे पेशंटमध्ये सुधारणा होणार नाही हे सर्वाना दिसत असते.अशा वेळी पेशंटला सुखाचे मरण मिळावे.”असे ते म्हणतात.
‘इच्छामरण’ हा विषयच मुळात गुंतागुंतीचा आहे.रुग्णाने केलेली मरणाची इच्छा ही खरी कशी मानायची? ही एक समस्या आहे.याशिवाय,कोणी आपल्या इच्छेने मरण पत्करले की त्याला ते तसे करायला भाग पाडले गेले? याची पडताळणी करणे हे सुध्दा सोपे नाही! एखादे प्रकरण ‘आत्महत्या’ आहे का ‘इच्छामरण’ हे ठरवणे अवघड आहे.त्यामुळे जरी रुग्णाची यातनांमधून सुटका व्हावी असे वाटले तरी इच्छामरणाच्या इच्छेची पडताळणी व अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ती पारदर्शकता राखणारा व सर्व बाजूंनी विचार करून केलेला कायदा होणे आवश्यक आहे. अन्यथा, ‘इच्छामरण’ हे अनेक धोक्यांना आमंत्रण होवू शकते!आजच्या समाजात असलेल्या अपप्रवृत्तींच्या लोकांच्या हातात जर अर्धवट विचार करून केलेल्या इच्छामरणाच्या कायद्याचे कोलीत मिळाले तर तो समाजासाठी अनर्थ होईल व वयक्तिक सूड उगवायला याचा दुरुपयोग होईल! निकोप सामाजिक स्वास्थ्यासाठी हे योग्य नाही!
जोपर्यंत योग्य पर्याय अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आपण या बाबतीत फक्त प्रार्थनाच करू शकतो!

“असे वरदान दे प्रभो ज्यायोगे,
व्हावी मुक्तता मृतवत देहांची,

आहेत भोगत अगणित यातना,
केवळ धुगधुग चालू हृदयांची!

किंबहुना

जीवन असूदे वेदनाविहीन,
आणि मरणही दे वेदनाविहीन!”

...... © प्रल्हाद कोंडीबा दुधाळ. (9423012020)