उत्कर्ष भाग 3
उत्कर्षने घातलेल्या गोंधळामुळे रात्री नीट झोप झाली नसल्याने दुसऱ्या दिवशी मी उशिराच उठलो.
सकाळची आन्हीके उरकून वर्तमानपत्र वाचायला घेतले होते तेवढ्यात घराची बेल वाजली. समोर उत्कर्ष उभा होता!
त्याच्या हातात मला मोठा चॉकलेटचा बॉक्स होता.
मी थोडा नाखुशीनेच दरवाजा उघडला.
"सॉरी अंकल, कल भी आपको मेरी वजह से तकलीफ हो गया, वो क्या है ना, मेरा बर्थडे था ना."
आत येऊन तो माझ्या पायाशी झुकला.खरं तर मला त्याचा प्रचंड राग आलेला होता, पण त्याचे ते केविलवाणे बोलणे ऐकून मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. या दुहेरी व्यक्तिमत्व असलेल्या तरुणाशी नक्की कसे वागावे तेच कळत नव्हते!
रात्री नशेत असताना तो कशाचीच पर्वा करत नव्हता, उद्धटपणे वागत होता मात्र दिवसा अगदी शहाण्या मुलासारखा झालेल्या चुकीची कबुली देऊन माफी मागत होता.
याचे नाव ठेवताना त्याच्या आई बापाने नक्कीच हा आपल्या खानदानाचे नाव उत्कर्षांला नेईल असा विचार केला असेल, पण प्रत्यक्षात मात्र तो असे गुण उधळून आईवडिलांचे संस्कार धुळीला मिळवत होता!
माझे विचार चक्र असे फिरत असताना तो माझ्याकडे दिलगिरी व्यक्त करत होता...
"माफ करना अंकल कल भी आपको तकलीफ हो गया, लिजिए आप दोनो के लिये गिफ्ट!
ये मेरा आपके लिये बर्थडे गिफ्ट है ."
माझ्या हातात डेअरी मिल्कचा जंबो बॉक्स बळेच देत तो बोलला.
मी तिरक्या भाषेत त्याच्यावर डाफरलो..
" मुझे नहीं चाहिये तुम्हारा गिफ्ट, एक तो रातभर तकलीफ देते हो, और सुबह आके माफी मांगते हो, कैसा आदमी है तू? "
त्याचा चेहरा अजूनच केविलवाणा दिसायला लागला...
" अंकल,आजसे मै बियर नही पीऊंगा. मैने अपनी मा को भी ये वचन दिया है.इसके बाद आप लोगोंको बिलकुल तकलीफ नही होगा, मेरा विश्वास करो "
तो गयावया करत बोलत होता!
मला प्रश्न पडला होता. 'रात्रीचा तो उद्धट उत्कर्ष खरा की सकाळी वाढदिवसाच्या निमित्ताने चॉकलेट घेऊन येणारा, मला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागणारा उत्कर्ष खरा? "
उत्कर्ष जरी बिअर सोडल्याचे म्हणत होता. तरी त्याने दोन दिवस दिलेल्या अनुभवाने माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता.
आणलेला डेअरी मिल्कचा बॉक्स माझ्या डायनिंग टेबलवर ठेऊन पुन्हा पुन्हा सॉरी म्हणत उत्कर्ष निघून गेला.
मी व्यसन मुक्ती केंद्र चालवणाऱ्या तुषार नातू यांचे 'नशा यात्रा' आणि 'बेवड्याची डायरी' ही त्यांच्या स्वानुभावर आधारित पुस्तके वाचलेली होती. कोणताही व्यसनी माणूस आपले व्यसन सहजासहजी सोडत नाही. व्यसन म्हणजे एक प्रकारचा आजार आहे आणि व्यसनी माणूस आपल्या व्यसनासाठी काहीही करू शकतो, खोटे बोलू शकतो, अगदी कोणत्याही थराला जाऊ शकतो.हे मी वाचले होते.
उत्कर्ष सुद्धा असाच मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे जाणवत होते.त्याला खरे तर मानसोपचाराची गरज होती, पण या बाबतीत मी काहीच करू शकणार नव्हतो.
सध्या तरी तो म्हणतो त्याप्रमाणे वागतो आहे की नाही हे पहाणे एवढेच माझ्या हातात होते. बाकी रहिवाशीही 'याने परत त्रास दिला तर पोलीस बोलावून उत्कर्षला धडा शिकवण्याच्या' निर्णयापर्यंत आले होते...
गेल्या दोन दिवसांत आमच्या झोपेचे पार खोबरे झाले होते. आमच्या दैनंदिन शांत जीवनात हे छोटे वादळ पुढे किती दिवस चालणार होते काय माहीत!
आज काहीतरी निर्णय घेऊन या उत्कर्ष प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असे मी मनाशी ठरवले होते.
रात्री आम्ही स्पीकर कधी लागतो याची वाट पहात होतो...
काय विचित्र गोष्ट आहे ना?
जी गोष्ट त्रास देत होती ती गोष्ट घडण्याची मी चक्क वाट बघत होतो!
त्या दिवशी खरोखरच उत्कर्ष शांत होता.
रात्रीही त्याचा बिलकुल आवाज आला नाही.
ही ब्याद सोसायटी मधून निघून गेली असेल तर खूप बरे होईल... असा टोकाचा विचार करत मी पायऱ्या उतरून खालच्या मजल्यावर गेलो. फ्लॅट च्या दरवाजाला कुलूप नव्हते.
याचा अर्थ उत्कर्ष त्याच्या घरातच होता!
आजच्या रात्रीला तो अजून काय काय गोंधळ घालणार याबद्दल एक प्रकारची भीती मनात ठेऊनच रात्री झोपायला गेलो.
उशाशी आपत्कालीन व्यवस्था म्हणून कापसाचे बोळे मात्र तयार ठेवले होते!
(क्रमश:)
प्रल्हाद दुधाळ 9423012020