Devayani Development and Key - Part 18 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग १८

Featured Books
Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १८

    देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

 

 

 

 

 

भाग   १८

भाग  १७  वरून  पुढे  वाचा ................

 

“ओके. उद्या किती वाजता येऊ?” – विकास.

“दुपारी बारा नंतर फोन करा मग मी सांगेन केंव्हा यायचं ते. पण सगळं व्यवस्थित लिहून आणा म्हणजे झालं.” – शीतोळे. 

“ठीक आहे साहेब.” – विकास. 

“चिंता करू नका. आम्ही आहोत तुमच्या मदतीसाठी. काहीही झालं तरी कायदा हातात घेऊ नका. चलो. चलते हैं.” आणि असं म्हणून शीतोळे निघाले.

देवयानी आणि विकास मग थोडे इकडे तिकडे रेंगाळले आणि मग विकासच्या फ्लॅट वर गेले. शीतोळ्यांच्या आश्वासना मुळे दोघांनाही जरा हायसं वाटलं होतं. डोक्यावरचा ताण निघून गेला होता. पण नेहमी सारखा लाइट मूड काही येत नव्हता. जेवण झाल्यावर विकासने देवयांनीला तिच्या फ्लॅट वर सोडलं. तो पण थोडा वेळ बसला. इंस्पेक्टर शीतोळे भेटले असं सांगून काय बोलणं झालं ते सुप्रियाला सांगितलं  आणि घरी परतला. परतताना सांगितलं की “रात्री कोणालाही दार उघडू नका. थोडा जरी संशय आला तर लगेच फोन करा. मी दहाच मिनिटांत पोचेन.” सुप्रिया आणि देवयानीनी मान हलवली. मग विकास निघाला. तो लिफ्ट मधे शिरतच होता की शीतोळयांचा  फोन आला.

“हॅलो, काय म्हणता साहेब,” – विकास.

“तुमच्याकडे राजूचा फोटो आहे का?” – शीतोळे. 

“माझ्या जवळ नाहीये. मी आज प्रथमच भेटलो त्याला पण सुप्रिया कडे कदाचित असेल.” – विकास. 

“बघा आणि असेल तर मला लगेच पाठवा.” – शीतोळे

“पाठवतो साहेब. पण असं अचानक?” – विकास

“आम्हाला फोटोवरून बऱ्याच गोष्टी कळतात म्हणून. बाकी काही नाही.” – शीतोळे 

विकास वळला देवयानी दारातच  उभी होती. तिला सांगितलं की राजूचा फोटो पाहिजे आहे तो मला पाठव.

“राजूचा फोटो कशाला ?” सुप्रियाने विचारलं.

“माहीत नाही. इंस्पेक्टर साहेबांना पाहिजे म्हणाले.” – विकास

सुप्रियाने विकासला फोटो पाठवला. आणि त्यानी तो शीतोळयांना फॉरवर्ड केला.

“सुप्रिया, लक्ष्मी आणि देवयानी, आत्ता मी जे काही सांगितलं ते फक्त तुमच्यातच ठेवा. राजू पर्यन्त हे पोहोचायला नको. फोटो बद्दल सुद्धा कोणालाच सांगू नका” आणि मग तो फायनली  निघाला.

 

दुसऱ्या दिवशी विकास ने दुपारी एक वाजता शीतोळयांना फोन केला. ते पुण्याच्या बाहेर होते, ते म्हणाले की ते वापस आले की फोन करतील.

शीतोळयांचा  फोन संध्याकाळी साडे सहा वाजता आला. विकासला जरा बरंच वाटलं. त्याला आणि देवयानीला सुट्टी घ्यायची  जरूर पडली नव्हती, सात वाजे पर्यंत ते पोलिस स्टेशन ला  पोचले. देवयानीनी सर्व वर्णन लिहूनच ठेवलं होतं. ते दिलं. शीतोळयांनी वाचल्यावर मान हलवली. ओके आहे असं म्हणाले. मग शिपायाला बोलावून राजूच्या फोटोची प्रिंट काढायला सांगितली. आणि फ़ोटो देवयानीच्या अर्जाला शेवटी चिकटवला.  देवयानीचा आणि विकास चा पण फोटो मागीतला आणि ते पण  चिकटवले. प्रत्येक फोटोच्या खाली त्यांची नावं लिहिली. आणि फाइल मधे लावायला सांगितलं.

ठीक आहे शीतोळे म्हणाले-

“आता तुम्ही जा आणि काही विपरीत घडलं तर लगेच रीपोर्ट करा. त्यावेळी ही फाइल अॅक्टिव होईल. तुम्ही काळजी करू नका आणि कुठलीही वेडी  वाकडी स्टेप घेऊ नका. सांभाळून रहा. तुम्हाला डिवचण्याचे प्रयत्न होऊ शकतात. पण तुम्ही शांत रहा. आणि लगेच आम्हाला सांगा. या तुम्ही आता.” – शीतोळे

देवयानी आणि विकास बाहेर पडले तेंव्हा रात्रीचे साडे आठ वाजले होते.

“काय करायचं? घरी जायचं?” -विकास.

“घरी जाऊन पुन्हा बाहेर पडायचं का जेवायला? का घरीच मागवायचं ?”- देवयानी.

सुप्रियाचा फोन आला.

“काय ग काय झालं? दिलं का निवेदन?”

“हो दिलं. साहेब म्हणाले की आत्ता काहीच अॅक्शन घेणार  नाहीये पण पुढे पुन्हा त्रास झाला तर बघू.” देवयानीनी सांगितल. 

“ठीकच आहे. मग आता काय जेवून येणार का? इथे सर्व तयार आहे.” – सुप्रिया. 

“अग विकास पण आहे न बरोबर. त्याचं काय?” – देवयानीनी शंका काढली.

“त्यालाही घेऊन ये. No problem.” सुप्रिया म्हणाली.  

देवयानी विकासशी बोलली आणि सुप्रियाला हो येते म्हणून सांगितलं. आणि ते दोघं देवयानीच्या फ्लॅट वर पोचले.

सुप्रिया स्वयंपाकात एकदम expert होती. तिच्या  हातच जेवण विकासला नेहमीच आवडायचं. जेवण झाल्यावर थोड्या गप्पा टाकून विकास आपल्या घरी गेला.

 

दोन आठवडे शांततेत गेले. देवयानीला आणि सगळ्यांनाच वाटलं की राजूनी आता मनातून देवयानीचा विषय काढून टाकला आहे. त्यामुळे सगळे निश्चिंत होते. पण त्यांचा हा निष्कर्ष चुकीचा होता हे त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना कळलं. त्या दिवशी संध्याकाळी पांच वाजता देवयानीला मेसेज आला की जर ती लग्नाला तयार झाली नाही, तर तो आत्महत्या करेल आणि तिच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल. मग तू आणि पोलिस काय ते बघून घ्या. देवयानी दचकली. मेसेज राजू च्या मोबाइल वरून आला होता. देवयानी अतिशय बिझी होती. तिला विकासला फोन करणं शक्यच नव्हतं. साडे सात  वाजता काम संपल्यावर तिने विकासला फोन केला आणि सांगितलं की ती डायरेक्ट त्यांच्या फ्लॅट वर येते आहे. सुप्रियाला पण कळवून  टाकलं की राजूचा असा असा मेसेज आला आहे आणि ती विकास कडे जाते आहे. जेवण त्याच्या बरोबरच घेईन.

फ्लॅटवर ती पोचली तेंव्हा विकास यायचा होता. ती चहा करून त्याची वाट पहात बसली. १०-१५ मिनिटांत विकास पण आला. चहा पिता पिता देवयानीने त्याला तो मेसेज दाखवला. वाचून झाल्याव विकास म्हणाला-

“मला असं वाटलं होतं की राजूने तुझा नाद सोडला. पण हे भलतंच वळण लागतेय, प्रकरण गंभीर होत चाललं आहे असं दिसतंय. शीतोळयांना कळवायचं का?”

“विकास, शीतोळे साहेब म्हणाल होते की काहीही घटना घडली, तर त्यांना  लगेच कळवा. म्हणजे ही घटना त्यांना कळवायला हवी. तूच आत्ता म्हणालास ना की मॅटर सिरियस आहे म्हणून.” देवयानी म्हणाली.

“तू म्हणते ते बरोबर आहे पण आत्ता रात्रीचे आठ वाजले आहेत. त्यांना त्रास देणे योग्य दिसेल का?” – विकासनी शंका काढली.

“आणि आज रात्रीच राजूने आत्महत्या केली आणि त्यांनी लिहून ठेवलेली माझ्या नावाची चिठ्ठी पोलिसांना सापडली तर काय करायचं? सांगायचं त्यांना की कालच   आम्हाला हा मेसेज आला होता पण आम्ही काहीच न करता झोपून गेलो, असं सांगायचं?” देवयानी आता घाबरली होती.

“देवयानी, अग तू कुठल्या कुठे पोचलीस? असं काहीही होणार नाही.” – विकास

“मला खूप भीती वाटते आहे रे. मला शिक्षा झाली तर? काय माझ्या आयुष्यात लिहून ठेवलं आहे, हे कळतच नाहीये. आपली ताटा तूट तर होणार नाही ना अशी सारखी भीती वाटते आहे. पहा न आपल्या लग्नात किती विघ्न येताहेत.” देवयानी आता फार अस्वस्थ झाली होती आणि तिच्या बोलण्या वरून ते लक्षात येत होतं.

देवयानीचा सुर आता रडवेला झाला होता. तिला हे सगळं झेपत नव्हतं. ती अस्वस्थ पणे टेबला वर सांडलेल्या पाण्या मधे रेघोट्या ओढत होती. विकासच्या मते हा सगळा राजूचा स्टंट होता. यात काही दम नाही, असं त्याला वाटत होतं. त्याला देवयानीकडे पण बघवत नव्हतं. तिचा चेहरा चिंतेने काळवंडून गेला होता.

“अग तुला घाबरवण्यासाठी राजू असं करतोय. आत्महत्या करणारी माणसे कधी अशी  वॉरनिंग  देतात का ?” – विकास तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता.

पण देवयानीला त्याचं म्हणण पटत नव्हतं. ती आता रडायलाच लागली. शिक्षेच्या भीतीने तिचं धैर्य आता जवळ जवळ संपल. होतं. विकासने तिला धीर दिला म्हणाला –

“ओके. लावतो आत्ताच शीतोळयांना फोन. तू रडणं थांबव. मी तुझ्या बरोबर असतांना तुला काळजी करायचं काहीच कारण नाही.” – विकास 

“अरे पण मला शिक्षा झाली तर मी एकटीच असणार आहे. मग मी काय करू.? मला, तुला सोडून कुठेही जायचं नाहीये” आणि तिने विकासचा हात घट्ट धरला. एखादा  लहान मुलगा घाबरल्यावर वडीलांचा हात जसा घट्ट धरून ठेवतो, तसच काहीसं विकासला जाणवलं. मग मात्र मुळीच वेळ न घालवता त्यानी शीतोळयांना फोन लावला. देवयानी म्हणाली की “स्पीकर वर टाक.”

“हॅलो, साहेब मी विकास बोलतो आहे. जरा चुकीच्याच वेळी फोन केला पण तुम्हाला सांगणं जरुरीचं वाटलं म्हणून कॉल केला.”

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.