Swpnasparshi - 13 in Marathi Moral Stories by Madhavi Marathe books and stories PDF | स्वप्नस्पर्शी - 13

Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

स्वप्नस्पर्शी - 13

                                                                                         स्वप्नस्पर्शी : १३

   खंडाळ्याला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीने व स्वरूपाबरोबर चार दिवस निवांतपणे घालवल्यावर राघवांना फार बरे वाटले. सगळ्यांसाठी जगता जगता आपलं स्वतःसाठी कधी जगणं झालच नाही हे त्यांच्या लक्षात आले. पण आता स्वतःच ते आपलं हिरवं स्वप्न पुर्ण करणार होते. स्वतःसाठी जगण्यात जेव्हढा आनंद असतो तेव्हढाच दुसऱ्यांसाठी जगण्यातही असतो. या विचाराने आपण बरोबर दिशेला आहे हे जाणवून ते सुखावले.

   पुण्याला आल्यावर पेन्शनचं काम पुर्ण झालं होतं. त्यांना साठ लाख प्रॉव्हिडंट फंडाचे मिळाले आणि दरमहा पंचेचाळीस हजार रुपये पेन्शन सुरू झाली. एक एक कामं जशी संपू लागली तसं त्यांना मोकळं वाटू लागलं. मृत्युपत्राचा विचार सध्या त्यांनी बाजूला सारला. पण फंडातून आलेल्या पैशाने काही चांगलं काम करावं या विचाराने दहा लाखाची रक्कम, शाळेला टेक्निकल कोर्स सुरू करण्यासाठी द्यावी असं त्यांनी मधुरशी विचारविनिमय करून ठरवलं. आता पुढचं काम म्हणजे आई आबांना घेऊन दक्षिणेतील प्रेक्षणिय स्थळांची ट्रीप ठरवायची होती. आईला झेपतील अशी मुख्य मुख्य ठिकाणं दाखवायची, जिथे विमानप्रवास आहे तिथे तो प्रामुख्याने करायचा. आईला यावेळेस सगळं सुख द्यायचं. बालाजी मंदिरात हॅलिकॉप्टरने जाता येते, तिथे त्याची सफर करायची. मधले ठिकाणं ट्रेनने करायचे अश्या सगळ्या सफरी तिला घडवायच्या. मधुरच्या सल्ल्याने बंगलोर, म्हैसुर, तिरूपती बालाजी, मीनाक्षी मंदिर, रामेश्वर, कन्याकुमारी एव्हढी ठिकाणं बघायची ठरवली. आईला एव्हढं सगळं झेपेल ना? हा प्रश्न राघवांच्या मनात येतच होता. पण आता आईची मनाची तयारी होती तर तिच्या कलाकलाने घेत किंवा तिची इच्छा असेल तेव्हढं पाहायचं ठरवलं. त्याप्रमाणे पंचवीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर असा प्रोग्राम ठरवून मधुरने सगळे रिझर्व्हेशन, हॉटेल बुकिंग करून ठेवले. राघवांनी आबांना फोन करून प्रवासाची सगळी कल्पना देऊन, वीस नोव्हेंबरला तुम्हाला घ्यायला येईन असे सांगुन गरम कपडे, आईची, तुमची औषधं जास्तीचे घेऊन ठेवा अश्या सुचना दिल्या. ठरवा ठरवी झाल्यावर राघवांनी प्रकाशकाकांना फोन केला. त्यांनी सांगितले राकेश सात डिसेंबरला इकडे येईल व आपली रजिस्ट्रेशनची पंधरा तारीख पक्की आहे. त्याची सगळी कागदपत्र, रजिस्ट्रेशन डेट मी इथे तयार ठेवतो. तू एकदा तुझ्या कागदपत्रांचे फोटो काढून व्हॉटसअप वर टाक. इथे एकदा सगळं चेक करतो. वकिलालाही दाखवतो. काही अजुन हवं असेल तर आत्ताच सांगुन ठेवता येईल. ऐन वेळेस काही राहिलं तर काम अडायला नको. प्रकाशकाकांच्या म्हणण्यानुसार राघवांनी जमिनी संदर्भातल्या फाईलींचे फोटो काढून त्यांना पाठवून दिले. एक दोन दिवसात त्यांच्या वकिलाने सगळं व्यवस्थित असल्याचा निर्वाळा दिला. जमिनीसाठीच्या व्यवहाराचा दहा लाखाचा व घर बांधणीसाठी पन्नास लाखाचा चेक आबांनी आधीच देऊन ठेवला होता, त्यामुळे आता ती पण तयारी झाली होती. वासूचा अधुन मधुन फोन चालू असायचा, आपली प्रगती कळवायचा. वीणा पण स्वरुपाजवळ सगळं सांगायची. आबांचं स्थान हळुहळू आता राघवांकडे येऊ लागलं होतं. आबांचं ज्यांना सहकार्य लागत होतं अश्यांनी आता राघवांकडे मोर्च्या वळवला. राघवही त्यांना योग्य मार्गदर्शन करत होते.

    गावाला जायची तयारी सुरू झाली. थंडीचे दिवस असल्याने गरम कपड्यांचे सामान वाढले, अमेरिका वारीची तयारी इथेही उपयोगी पडत होती. स्वरूपाने आई आबांना खाता येतील आणि टिकतील असे पदार्थ बनवायला सुरवात केली. मधुरने पुर्ण ट्रीप प्रोग्राम, हॉटेल बुकिंग, कार, विमान, ट्रेन रिझरव्हेशनच्या प्रिंटआउट काढून त्यांची फाइल बनवून दिली. राघव, आई आबांना आणायला गावी गेले, तिथे तर आईचा गावाला जायचा उत्साह उतू जात होता. आपल्याला एव्हढा प्रवास झेपेल की नाही हा विचारही मनात येऊ द्यायचा नाही असे तिने ठरवले होते. तीर्थक्षेत्री काय काय करायचे ते बेत ती परत परत आबा, स्वरुपा, राघवांना ऐकवत होती. तिचे म्हणणे ते ऐकून घेऊन प्रोत्साहन देत होते. वीणा वासुला घरसंदर्भात नाना सुचना ती ऐकवत व ते ही तिच्या म्हणण्याला आनंदाने होकार देत होते. राघवांनी त्यांच्या बॅगांवर नजर टाकून, सर्व आवश्यक गोष्टी आहेत ना ते तपासून घेतले. गावाला आल्यासरशी शाळेला मदतीचा चेक देऊन आले.

    बावीस तारखेला त्या दोघांना घेऊन राघव पुण्याला आले. दोन दिवस मुलं, स्वरुपा, आई यांची नुसती धमाल चालली होती. शेवटी राघव आणि आबांनी त्यांना आवरतं घेतलं, आणि एकही बॅग वर झाली तर आम्ही ती धरणार नाही अशी तंबी दिली. मग खोटं खोटं हिरमुसून त्यांनी सामान आवरतं घेतलं. पंचवीस तारखेला विमानाने ते  बेंगलोरला जायला निघाले. विमान पाहिल्यावर आई थोडी घाबरलीच पण आबा एव्हढे सोळा तास विमानप्रवास करून आले हे तिच्या लक्षात आल्यावर ती जरा सावरली. तिला, आबांना व्हीलचेअर वरूनच सगळीकडे नेत असल्यामुळे लहान मुलांच्या कुतुहलाने ती आरामात बसुन पहात एन्जॉय करत राहिली. विमानाने उड्डाण केल्यावर छोटं होत जाणारं खालचं जग काडेपेटीसारखं दिसू लागल, मग लवकरच नुसत्या ढगांच्या पिसाऱ्यात तरंगू लागल्यावर तिच्या चेहेऱ्यावरचे अगम्य भाव पहाण्यासारखे होते. तिचा तो भाव बघून तिघांना आनंद होत होता, कारण त्यांना माहित होतं आईची तब्बेत एव्हढी नाजुक आहे की तिचा कुठलाही दिवस शेवटचा ठरू शकेल.

    बेंगलोरला पोहोचल्यावर तो दिवस आईच्या विश्रांतीसाठी ठेवला होता. मग दुसऱ्या दिवशी नाष्टा करून कारने बेंगलोर दर्शनला निघाले. राघव आईला माहिती देत होते. बेंगलोरला वर्षभर वातावरण आल्हाददायक असते. कर्नाटकची राजधानी असलेलं हे शहर गार्डन ऑफ सिटी म्हणून ओळखले जाते. प्रथम ते लालबागला आले. ते एक बॉटनिकल गार्डन, हैदर अलीने त्याची निर्मिती केली होती. दोनशे चाळीस एकरात जवळपास हजार प्रकारच्या झाडांचे नमुने आणि ग्लासहाऊस होते. कितीतरी वेगवेगळ्या फुलझाडांची माहिती वैशिष्टयासह लिहून ठेवलेली. राघवांना आपल्या हिरव्या स्वप्नांचे जसे वेध लागले होते, तसे ती बाग पाहून त्यांच्या लक्षात आले हैदर अलीनेही हे हिरवं स्वप्न पाहिलं असावं. त्यांनी हिरव्या स्वप्नात रंगही भरले होते. कोण कोण कुठल्या स्वप्नांनी भारलं जाऊन आयुष्य वेचत असावं कल्पनाही करता येत नाही. कधी स्वप्न बदलतही जातात. पण प्रत्येकजण त्यासाठी जीव टाकत असतो हेच खरं. माणूस जरी म्हणत असला की मी आई, वडील, मुलांसाठी जगतो. बायकोसाठी करतो पण त्यालाही हे माहित असतं की आपण जे करतोय ते काम आपला श्वास आहे. कुणाला तरी आपल्या बदलणाऱ्या स्वप्नांचे अर्थ कळतात मग अनेक स्वप्नांवर माणूस आपलं काम करतो. त्याला हरहुन्नरी म्हणतात. कुणाची स्वप्न छोटी असतात, तर कुणाची विशाल. एक फक्त घर चालवतो तर एक जगात क्रांती आणतो. जेव्हा स्वप्नांच्या आड कुणी यायला लागतं, मग ते पालक असो किंवा पती पत्नी. तिथुन मतभेद सुरू होतात. आपल्या स्वप्नांशी ठाम असलेला व्यक्ती जगाशी लढतो, किंवा स्वप्नांचं स्वरूप बदलतो. स्वरूपाने राघवांना भानावर आणलं.

     परत सगळे कारमधे बसले. मग ते बेंगलोर फोर्टला आले. इ.स. १५१७ मधे के. पे. गौडाने निर्माण केलेला किल्ला होता तो. आई आबांना चढउतार शक्य नव्हतं त्यामुळे त्यांना एके ठिकाणी बसवून राघव, स्वरुपा आत एक चक्कर मारून आले. किल्ला बऱ्यापैकी सुरक्षित होता. लांब अणुकूचीदार खिळे असलेला दरवाजा, भव्य दगडी कमानी, त्यावरील नक्षीकाम कोरलेल्या मूर्ती तिथे होत्या. त्यानंतर टिपू सुलतानचा महाल दाखवण्यात आला. दोन मजली लाकडी बांधकामातला तो महाल अजूनही सुस्थितीत होता. लाकडी नक्षीकाम, कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुना होता तो. टिपू सुलतानच्या कलात्मक रसिकतेचे दर्शन होते ते. ड्राइव्हर चला चला करू लागला. तसे राघवांना कळेना हे नीट पाहू का देत नाही ? तेव्हा तो म्हणाला “अजुन कितीतरी गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. एकाच ठिकाणी एव्हढा वेळ थांबलं तर बाकी गोष्टी पहायच्या राहून जातील. इथले म्युझियम खुप पहाण्यासारखे आहे.” मग कार म्युझियमकडे वळाली. तिथे पुरातन काळातील समाजजीवन दाखवणारे विविध प्रकारचे दागिने, नाणी, शिलालेख यांचा दुर्मिळ संग्रह होता. जसजसे धातू सापडत गेले तसतशी युगांना त्या त्या नावाप्रमाणे ओळखले जाऊ लागले. अश्मयुग, सुवर्णयुग, ताम्रयुग, लोहयुग ही परिचयाची नावं होती. आताचं स्टीलयुग. राघवांना मनातच हसू आले. पण मनातलं हसू चेहेऱ्यावर उतरतच. कुणाच्या लक्षात येण्याआधी बाजूला होऊन ते नाणे इतिहास वाचू लागले. आबा, आई, स्वरुपा एक चक्कर मारून बाहेर निघून गेले. त्यांना फारसा त्यात इंटरेस्ट नव्हता. हे म्युझियम पाहून झाल्यावर कार एका हॉटेल समोर थांबली. कर्नाटकी पद्धतीचं गरमागरम जेवण समोर आलं. रसमभात, भाजी भात, दहीभात बरोबर लोणचं, पापड असं चटकदार जेवण होतं. तिथे ठिकठिकाणी फुलांचे लांब लांब गजरे विकायला होते. ते घेऊन दोघी आपली गजऱ्याची हौस भागवत होत्या.

    जेवण करून थोडी विश्रांती झाल्यावर कार नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट येथे पोहोचली. बिल्डिंग समोर असलेल्या त्या मोठ्या हौदातल्या पाण्यात पांढऱ्या रंगाच्या इमारतीचे प्रतिबिंब पडले होते. आतील दालनातील मुर्तीकाम, पेंटिंग, चबुतरे कलात्मक होते. आई, आबांनी थोडक्यात तिथले पाहून, बाहेर बागेतला आनंद घेत बसले. सगळं पहाणं त्यांना झेपण्यासारखं नव्हतं. त्यामुळे दोघांनी जेव्हढं जमेल तेव्हढं पाहून बाकी निसर्ग निवांतपणे न्याहाळायचा असे ठरवले.  आजच्या टुरमधलं इस्कॉन टेंपल हे शेवटचे ठिकाण होते. हे एक कृष्ण मंदिर आधुनिक व पारंपरिक तत्वावर आधारित उत्कृष्ट वास्तूकला असलेले मंदिर आहे. त्याची भव्यता व सौंदर्य, स्वच्छता वाखाणण्यासारखी होती. मनोहारी कृष्णरुपाचे दर्शन घेऊन मनाला सात्विक आनंद लाभत होता. आई आबा, थोडावेळ तिथे बसुन राहिले. आजच्या दिवसाचा टुर इथेच संपत होता.

     हॉटेलवर गेल्यावर सगळ्यांनीच थोडा आराम केला. त्यानंतर डाइनिंग हॉलमधे येऊन कर्नाटकी जेवण न मागवता काही वेगळे पदार्थ खाऊन बघायचा आग्रह राघवांनी आईला केला, पण आवडले नाहीतर तिचे पोट भरणार नाही हे लक्षात घेऊन मग तिला पाहिजे तेच मागवले. दुसऱ्या दिवशीही कार बुक केली होती. ड्राईवरने सांगितले आज आपण तीन ठिकाणं पहाणार आहोत. डोडा अलाडा मारा, टिके वॉटर फॉल, आणि तितली पार्क. प्रवास सुरू झाला. थंडीचे दिवस असल्याने तसेही वातावरण आल्हाददायक होते. शहरदर्शन करत कार बेंगलोर पासून २८ कि. मी. वर डोडा अलाडा मारा इथे आली. हे एक वडाचे झाड आहे. जवळपास तीन एकर परिसरात हे झाड विस्तारलेले होते. आपल्या शाखा खेळवत हे झाड विस्तारत जाते. जवळपास चारशे वर्षाचे वय असलेले ते झाड ऋषी मुनींसारखे भासत होते. धीर गंभीरपणे आपल्या वळलेल्या जटांचा भार सांभाळत ध्यानमग्नतेत डोलणारं ते निसर्ग वैभव पाहून ते पुढचे ठिकाण पहाण्यासाठी निघाले. आता थोट्टीकल्लु इथे टी. के. वॉटरफॉलला जायचे होते. पाणी हा शब्द उच्चारला तरी मनाला शांत वाटायला लागतं. हिरव्यागार वनामधला मोठ मोठ्या दगडांवरून फेसाळत पडणारं पाणी पाहून मन आनंदाने चिंब होऊन गेलं. त्याच्या वेगाने उसळणारे तुषार बऱ्याच दुरपर्यंत वाऱ्याच्या दिशेने उडत होते. तरुणाईची झिंग तिथे चालू होती. या चौघांनी लांबूनच तो धबधबा पहाणं पसंत केलं. तिथेच मुनीश्वर स्वामींचे मंदिर होते, त्यांचे दर्शन करून काही वेळाने तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवण केले व पुढे निघाले. तिथुन ड्राइव्हरने तितली पार्कला कार आणली. तिकीट काढून आत गेल्यावर रंगीबिरंगी बगीच्यामध्ये नाना रंगाची फुलपाखरं डोळे लवते न लवते इकडून तिकडे उडत बागडत होती. जीवनाच्या क्षणभंगुरपणाचं रहस्य ते जणू सांगत होते. त्यांच्या लवलवत्या सानिध्यात वेळ कसा गेला कळालेच नाही. दिवसभराची निसर्ग सन्निध्यातली टुर संपवून चौघे हॉटेलवर आले. कालच्या मानवनिर्मित कलाकृती आणि आजच्या नैसर्गिक कलाकृतीवर गप्पा रंगल्या होत्या. नात्यात वय हा भाग जाऊन त्यात मित्रत्व आल्यावर त्या नात्याला कसा सुंदर रंग चढतो हे जाणवून राघव भारावले. आईवडीलांनाही मित्रत्वाच्या नात्याने बघितले की त्याला अजुन वेगळी गोडी येते. कर्तव्याचं ओझं तिथे रहात नाही. दिवस संपला. जेवणखाणं आटोपून सगळेच झोपायला गेले. उद्या म्हैसुरला जायचे होते. तिथे पोहोचल्यावर म्हैसुर पॅलेस बघायचा आणि संध्याकाळी वृंदावन गार्डन. रात्रीचा मुक्काम तिथेच होता.

     सकाळी लवकर आवरून इडली डोशाचा नाष्टा करुन झाल्यावर बॅगा कारमध्ये टाकल्या आणि म्हैसुरकडे वाटचाल सुरू झाली. रस्त्यात ड्राइव्हर माहिती सांगत होता. म्हैसुरचा राजवाडा हा वाडियार राजा यांनी बांधला. सात राजवाडे मिळून याची निर्मिती झाली. पहिला यदूराय यांनी बांधला. तो जुना राजवाडा दसऱ्याच्या वेळेस आग लागून जळाला तेव्हा महाराजा कृष्णराज वाडियार आणि त्याची आई यांनी ब्रिटिश आर्किटेक्ट हेनरी आयर्विन यांच्याकडून नवीन राजवाडा बांधून घेतला. सगळा इतिहास चौकडी मन लावून ऐकत होती. दीड तास कसा गेला काही कळालेच नाही. राजवाड्या समोर गाडी उभी राहिली. त्या अप्रतिम कलात्मक बांधकामाने राघवांना जाणवून गेले की भारतात कला आणि अध्यात्म यांचा संगम आहे, तर पाश्चिमात्यात कला आणि उपभोग याचा संगम आहे. जी शांतता इथल्या प्रत्येक वास्तूंमध्ये मिळते ती पश्चिमात्यांच्या हर्ष उन्माद लहरींमध्ये वेगवेगळ्या भावना उत्पन्न करते. मोठ मोठे दालनं, दरबार, दागदागिने, कपडे, मुर्त्या, पेंटिंग, राजेशाही जीवनशैली दाखवणारे सोन्याचे सिंहासन, कलात्मक फुलदाण्या, रोजच्या वापरायच्या वस्तु, एक वाडा तर पुर्ण शस्त्रगाराने भरलेला होता. किती पाहू किती नको असे त्या चौघांना झालं. पुर्ण दिवस घालवला तरी पहाणं अर्धवट राहिल असेच वाटत राहिलं. शेवटी आई स्वरुपा यांना आवरतं घेऊन भराभर पहात ते वाड्याबाहेर आले. ड्राइव्हर सांगत होता, दसऱ्याला पुर्ण राजवाड्याला लाइटींग केलेली असते. त्या दिवशी तर राजवाडा पहाण्यासारखा असतो. मनानी तृप्त होऊन आता पोट तृप्त करायला सगळे एका हॉटेलमध्ये आले. जेवताना राजवाडा हा एकच विषय गप्पांमध्ये चालला होता. थोडा वेळ हॉटेलमध्ये विश्रांती घेऊन संध्याकाळी वृंदावन गार्डनला गेले. कृष्णराजा सागर डॅम हा कावेरी नदीवर बांधलेला होता. जवळपास साठ एकर परिसरात वेगवेगळे झाडं, फुलझाडं, फळझाडं, लावलेली होती. तीन मोठे कारंजे, म्युझिकल फाऊंटन यासाठी वृंदावन गार्डन प्रसिद्ध होतं. गावाबाहेर फारशी न पडलेली आई या सगळ्याचा मेळ पाहून हरखून गेली. संध्याकाळचे नयनरम्य रंगांमध्ये गाण्याच्या तालावर नाचणारे ते संगीतमय कारंजे सगळ्यांना अद्भुत विश्वात घेऊन गेले. ते निर्मिलेल्या कलाकारांना तिथल्या जमलेल्या प्रेक्षकांनी दाद दिली. नोव्हेंबर महिना असल्याने आणि मोकळ्यावर वातावरण एकदमच गार जाणवत होते. आजचा टुर संपवून ते हॉटेलवर परतले. दुसऱ्या दिवशी आराम करून मग ते मदुराईला मीनाक्षी मंदिर पहायला जाणार होते.

    टप्याटप्याने प्रवास चालू होता. १२ भव्य गोपुरांवर रंगकाम आणि शिल्पकाम केलेले ऐतिहासीक पार्वती मंदिर पाहून चौघेही नतमस्तक झाले. देवानी मानवाच्या हाती कला देऊन स्वतःची महती वर्णन करून घेतली आहे असेच वाटत होते. आईने देवीची सालंकृत ओटी भरली. भरल्या नजरेने ती देवीचे रूप पहात राहिली. स्वरूपाही त्याच भावात उभी आहे असे राघवांना वाटून गेले. या दोघींच्या मनात नवरा, मुलं, सगळ्या जगाचं सुख हेच त्यांचं सुख असल्यामुळे देवीकडे दोघी तेच मागत असाव्या. देवदर्शन झाल्यावर बाहेर आल्यावर दोघींनी खरेदीकडे मोर्चा वळवला. प्रत्येक ठिकाणची आठवण म्हणून त्यांची खरेदी चालू होती. बेंगलोरला बेंगलोर सिल्क घेतल्या. म्हैसुरला म्हैसुर सिल्क. मदुराईला कुणाकुणाला द्यायची खरेदी केली. आबा, राघव त्यांना चिडवत राहिले तरी त्या आपलं मस्त एन्जॉय करत राहिल्या. शेवटी ते खरेदी ओझं राघवांनी कुरियर करून टाकलं. पुढचा टप्पा तिरूपती बालाजीचा होता. आई जिद्दीवर प्रवास करत होती. तिरूमलाला मुक्काम करून, त्यांनी आराम केला. सकाळी त्यांचे बालाजीचे बुकिंग होते. राघवांनी आई आबांमुळे हॅलिकॉप्टरचे बुकिंग केल होते. सकाळी लवकर तयार होऊन सगळे दर्शनाला गेले. हॅलिकॉप्टरचा चौघांचा पहिलाच अनुभव होता. हिरव्यागार दरीचे विहंगम दृश्य वरून दिसत होते. त्या हिरवाईवर बालाजीचा सोन्याचा कळस चमकत होता. चौघेही या वेगळ्या अनुभवाने थरारून गेले. बालाजी मंदिरात जरी दर्शनाची वेळ घेतली होती तरी मोठी रांग होती. पण बसायची सोय असल्याने उठत बसत ते गाभार्यापर्यन्त पोहोचले. गाभार्याच्या प्रवेशद्वारा समोरून दिसणाऱ्या बालाजीच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटले. हिरेमाणके, सोन्यानी लगडलेल्या त्या देवाला भक्ती भावाने पहात रहाणं अवघड होऊन जातं. भक्तीने डोळे मिटावे तर त्याच्या श्रीमंती तेजाचं दर्शन राहून जातं. तिथे देव तुम्हाला एकच दर्शन देतो. भक्तीने डोळे मिटा, अंतर्मनात मला बघा. किंवा सृष्टी रचनकाराच्या रचने समोर त्या पालन कर्त्याचे वैभव न्याहाळत नतमस्तक व्हा. चौघेही पाया पडून ते रूप मनात साठवून बाहेर आले. लाडूचा प्रसाद ग्रहण करून सर्वांसाठी लाडू पॅकही घेतले. आईने देणगी दिली. तिच्या डोळ्यात आता सगळ्या इच्छा पुर्ण झाल्याचं समाधान होतं.

    एक दिवस तिथेच राहून विश्रांती घेऊन मग ते रामेश्वरला आले. बारा ज्योतिर्लिंगापैकी ते एक आहे. हिन्दी महासागर आणि बंगालच्या खाडीने वेढलेल्या त्या सागरावर श्रीलंकेला जोडणारा रामायण कालीन रामसेतू असल्याचे सिद्ध झाले आहे. रामाने स्थापन केलेल्या त्या शिवलिंगाचे दर्शन करून क्षणभर त्या काळात गेल्याचे जाणवते. आई आबा एका अनोख्या शांतीत हरवल्यासारखे वाटू लागले. इथे आल्यावर तिला कुठेच जायची इच्छा होईना. तसे तिने राघवांना सांगितले. त्यांनी तिची इच्छा प्रमाण मानून कन्याकुमारी प्रोग्राम कॅन्सल केला. राघव व स्वरुपा आधी तिथे जाऊन आले होते, त्यामुळे परत पहायचे त्यांचेही मन नव्हते. तिथले दोन दिवस इथेच अड्जेस्ट करून त्याप्रमाणे हॉटेलबुकिंग वाढवून घेतले. दोन दिवस सकाळ संध्याकाळ समुद्रदर्शन शिवदर्शन घेत आईने निवांत क्षणांमध्ये घालवले. तिला माणसांच्या सोबतीचा क्षणही जड व्हावा इतकी ती आतून मौन झाली.

    जाताना ती जेव्हढी बोलत होती तेव्हढीच येताना शांत झाली. हा तिच्या तब्बेतीचा भाग नव्हता तर एक तृप्ततेचे वलय तिच्याभोवती पसरलेले होते. दोन दिवस पुण्याला विश्रांती घेऊन ड्राइव्हर त्यांना गावी सोडून आला, कारण आता आठवडयाभरात राघवांना गुहागरला जायची तयारी करायची होती. प्रकाशकाकांनी दाखवलेल्या शेताजवळच्या बंगल्यात घर बांधणं होईपर्यंत रहायचं ठरलं होतं. त्याचे मालक काकांचे मित्र होते. तसाही तो बंगला नुसता पडून होता. वर्षभरासाठी भाडयानी द्यायला ते तयार होते. प्रकाशकाकांनी गडी लावून सगळा सहा खोल्याचा बंगला, मागचं पुढचं आंगण स्वच्छ करुन घेतलं होतं. खिडक्यांच्या काचा, जाळ्या, लॉकसिस्टीम, दाराचे ग्रील सगळं तपासून दुरुस्त करुन घेतलं होतं. त्यांचं म्हणणं आधी तुमची सुरक्षा. गावाबाहेर रहायचं तर आधी सुरक्षा बघायची. त्यांनी राघवांना कुत्रे आवडतात का विचारले. खरं तर त्यांची ती हौस राहूनच गेली होती. स्वरुपाला आधी विचारलं तर ती तयार झाली नाही, पण सुरक्षिततेसाठी कुत्रे आवश्यक आहे हे सांगितल्यावर ते घरात शिरणार नाही या बोलीवर ती तयार झाली. मग काकानी जर्मन शेफर्डचे पिल्लू मिळेल तेव्हा आणून ठेवेन असे सांगितले. राघवना हुरळून गेल्यासारखे झाले होते. लाल काळ्या मातीत हात घालायला त्यांचे हात, मन आतुर झाले होते. काही शेतीसंदर्भातली पुस्तकं आणून त्यांचा अभ्यास चालू होता. दहा डिसेंबरला गुहागरच्या बंगल्यात ते रहायला जाणार होते तेव्हा मधुर अस्मिताही त्यांच्याबरोबर येणार असे ठरले. आधी घर लावायला मदत करुन रजिस्ट्री झाली की दोघं वापस पुण्याला येणार होते. मुलांची शाळा चालू असल्याने ते येऊ शकणार नव्हते तेव्हा अस्मिताची आई मुलांना सांभाळायला काही दिवस येऊन रहाणार होती.

    सुदैवाने बंगल्यात टिव्ही, फ्रीजसकट सगळं होतं त्यामुळे इथून काही घ्या किंवा नवीन विकत घ्या अशी काही भानगड आताच करावी लागणार नव्हती. नवीन घर तयार झालं की रंगसंगतीनुसार नंतर सगळं विकत घ्यायचं ठरलं. अस्मिता या बाबतीत फार चोखंदळ होती. स्वरूपाही होती पण संसारातील आलेल्या अडीअडचणींमुळे तिला धकवायची सवय लागली होती. बॅगा भरणं सुरू झालं. अमेरिकावारीसाठी खरेदी केलेल्या मोठ मोठ्या बॅगा चांगल्या उपयोगी आल्या. घरी घालायचे, बाहेर घालायचे, सणावारी घालायचे कपडे, चादरी,  पांघरुणं, स्वतःची निवडक पुस्तके, जी दोघांनी खास तिथे वाचायला विकत घेतली होती. विणकामचे सामान स्वरूपाने घेऊन ठेवले. तिच्या लक्षात आले होते राघव घर बांधणीत बिझी होऊन जातील आपण एकदम एकट्या होऊन जाऊ. खरं तर जानकीकाकू काही एकट्या सोडणार नाही पण आपले राहिलेले छंदही पुरे करू या हिशोबने तिने वेगळी तयारी करुन ठेवली. इतके दिवस मधुर, अस्मिता, मुलं, शेजार पाजार, किट्टी, हा सगळा कितीतरी वर्षांचा गोतावळा अवतीभवती होता, आता हे सगळच नसणार यासाठी तिला मनानीही तयार रहायचं होतं. नवीन लोकं, नवीन ओळखी त्यांचे स्वभाव, यावर परत अभ्यास होणार होता. तिच्या छंद लिस्टमधे बाग करायची हे ही होतं. झाडांशिवाय ती जगुच शकत नव्हती. राघवांचा लॅपटॉप, कागदपत्रं, कॅमेरा, वॉकमन, स्पोर्ट शूज घेणं चालू होतं. त्यांनी स्वरुपाला पत्ते, बुध्दिबळ, बॅटमिंटन सेट घ्यायला लावला. आपण आता सहजीवन खऱ्या अर्थाने सुरू करणार यावर मधुर अस्मिता हसले पण त्यांच्याही लक्षात आले की आपलेही जीवनाचे गाडे बदलणार. आई बाबांशिवाय सगळा संसार आपल्याला सांभाळावा लागणार. मधुरला आई बाबांशिवाय घर, हे खुप जड जात होतं. एखादी गोष्ट मानणं, आणि प्रत्यक्षात तिचा सामना करणं यात फार फरक असतो. तरी गेल्या दोन तीन महिन्यात राघव, स्वरुपा इकडे तिकडे फिरत असल्याने त्याला थोडी सवय झाली होती. पण आता आई बाबा कायमचेच असे येऊन जाऊन रहाणार हे तर उघडच होते.

    रात्री राघव मधुरला म्हणाले “ चल जरा पाय मोकळे करून येऊ.” चपला घालुन दोघं लांबवर फिरत गेले. “ मधुर, तू असा उदास झालास तर आम्हा दोघांचा पाय इथून निघेल का ? आम्ही तुला सोडून थोडीच चाललो आहोत. आपल्या मनात अंतर आलेले नाही. कितीतरी संसार असे असे आहेत की शरीराने एकत्र रहातात पण मनं कधीच जवळ आलेले नसतात. अश्या नात्यांमध्ये काय अर्थ आहे. त्यापेक्षा आपण आपल्या प्रगतीसाठी, एखादं स्वप्न पुर्ण करण्यासाठी काही गोष्टी थोड्या काळापुरत्या दुर सारल्या तर ते अभिमानास्पदही होते आणि मनही जवळ रहातात. आपल्या चकरा तर चालूच रहाणार.” “ पण बाबा तुम्ही आताच म्हणले न थोड्याकाळासाठी दुर म्हणून, पण आता तर ही गोष्ट कायमसाठी होणार. तुम्ही तिथे घर, शेतीला सुरवात केली की हळूहळू इकडे येणं कमी होणार.” “ मधुर, हे ही आपलेच घर ना. आबा गावाकडे राहिले तेव्हा मी असाच वागलो का ? प्रेमामुळे कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये. मग ते प्रेम जाचक बनतं. त्यापासून लोकं पळ काढतात. मग ते प्रेम, प्रेम उरत नाही. कर्तव्य बनतं.” मधुरला एकदम लक्षात आलं. आपण आई बाबांना जाचक ठरायचं नाही. मनाचं अंतर वाढवायचं नाही. जसं आहे तसं स्वीकारलं की गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात. मग मधुर म्हणाला “ बाबा, खरं आहे तुमचं म्हणणं. आता मी हट्ट करणार नाही. चला आपण हा क्षण साजरा करूया.” समोरच्या दुकानातून अफगाण ड्रायफ्रूट आइसक्रीमचा मोठा बॉक्स घेऊन दोघेही परतले. स्वप्नांमधले अडथळे दुर झाले होते. राघवांना आपल्या स्वप्नाचा परिसस्पर्श जाणवू लागला होता.

                                                                              .................................................