भूषण बऱ्याच वर्षांनी आपल्या काकांच्या घरी गावी आला होता. त्याचा जन्म आणि आणि पूर्ण आयुष्य मुंबईतच गेले होते. लहानपणी तो तसा दरवर्षी गावी यायचा त्यामुळे गावाबद्दल त्याला चांगलीच माहिती होती. गावात त्याच्या वयाची मुलं त्याला चांगली ओळखायची पण. तो गावात आल्यानंतर सगळ्यांना भेटला. उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस होते त्यामुळे गावात क्रिकेट च्या स्पर्धा भरवल्या जाात होत्या. भूषण त्याच्या गावातल्या संघातून खेळायचा त्यामुळे त्याची नेहमी मित्रांशी भेट व्हायची.
एके दिवशी अशेच ते संध्याकाळी भेटले होते आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या. आजचा सामना पण ते जिंकले होते त्यामुळे सगळेच उत्साहित होते. गप्पांचा ओघ क्रिकेट वरून गावातल्या घडामोडींवर गेला. गावात रात्रीचे स्मशानाच्या आसपासच्या परिसरात कोणीतरी भूत पहील्याची घटना घडल्याची समजली. भूषण हा पुरोगामी विचारसरणी असलेला माणूस असल्याने त्याला असल्या गोष्टींवर जरासुद्धा विश्वास नव्हता. तो मित्रांच्या या गोष्टी ऐकून हसू लागला. त्याच्या काही मित्रांचे अशा गोष्टींवर विश्वास होता म्हणून त्यांना भूषण चे असे वागणे त्यांना आवडले नाही. वादावादी मध्ये त्यांनी भूषण ला आव्हान(चॅलेंज) दिलं की तुझा जर अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नसेल तर तू रात्री स्मशानात जाऊन दाखवावे. भूषण पहिल्यांदा निरर्थक आव्हान समजून टाळाटाळ करत होता पण त्याचे मित्र जरा जास्तच पिच्छा पुरवू लागले. शेवटी आपण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि घाबरत पण नाही हे पटवून देण्यासाठी भूषण ने ते आव्हान स्वीकारले.
पैज अशी ठरली कि रात्री भूषण ने एक लाल रंगाचा फडका घेऊन स्मशानात जाणे आणि तो स्मशानाच्या बाजूच्या एका फणसाच्या झाडाच्या फांदीला बांधून परत येणे. सकाळी बाकीचे मित्र तिथे जाऊन शहानिशा करतील कि भूषण ने फडका ठरलेल्या ठिकाणी बांधलाय कि नाही. ठरल्या प्रमाणे भूषण आणि त्याचे मित्र रात्री जेवणानंतर एका चौकात जमले. रात्रीचे जेव्हा सडे अकरा उलटून गेले पैज ठरल्या प्रमाणे मित्रांनी भूषण कडे एक जुना लाल रंगाचा दुपट्टा दिला गेला. तसेच एक टॉर्च आणि जनावरांपासून संरक्षण म्हणून एक दांडा दिला. योजना अशी होती कि पावणे अकरा च्या सुमारास भूषण स्मशानाच्या दिशेने निघेल जेणेकरून मध्यरात्रीपर्यंत तो त्या झाडापर्यंत पोचेल आणि झाडाच्या एखाद्या फांदीला तो दुपट्टा बांधून सव्वा बारापर्यंत परत त्या चौकात येईल.
भूषण स्मशानाच्या दिशेने निघाला. रात्रीची वेळ होती तसेच भुतांवर कितीही विश्वास नसला तरी प्रत्येकाच्या मनात थोडीतरी भीती हि असतेच. भूषण च्या मनातही अशीच भीतीची कुणकुण होती. त्यामुळेच त्याने मित्रांच्या नकळत एक गणपती बाप्पाचा एक फोटो आपल्या खिशात घेतला होता आणि थोडाफार तो नामस्मरण पण करत होता. मित्र पण थोडे चिंतेत होते कि या पैजेच्या नादात काही वाईट नोको व्हायला. स्मशानाकडे जाणारा रस्ता झाडाझुडपातून जात होता. वस्तीतील घरं सोडून आता भूषण एकटा त्या झाडाझुडूपातल्या रस्त्यातून एकटा चालला होता. टॉर्च च्या प्रकाशझोतात रस्त्याकडे एकटक पाहत तो मार्गक्रमण करत होता. आजूबाजूला पाहण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. रात्रीचा रातकिड्यांचा आजण आणि अधूनमधून लांबून येणारे कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज त्याची भीती अजूनच वाढवत होते.
घाबरत घाबरतच तो स्मशानापर्यंत पोचला. तिथल्या वातावरणातच त्याला एक कोंदटपणा वाटत होता. थोडेसे चांदणे पडले होते. स्मशानाची जागा मोकळी होती. जिथं प्रेत जाळली जायची त्या जागी लाकडं व्यवस्थित बसावी म्हणून बांधकाम केले गेले होते. त्या जागेपासूनच काही अंतरावर ते फणसाचे झाड होते. लवकरात लवकर त्या झाडाच्या खालच्या फांदीवर तो दुपट्टा बांधून तिथून काढता पाय घ्यावा या कल्पनेने भूषण त्या झाडापाशी गेला आणि त्या झाडाच्या खालच्या फांदीवर तो दुपट्टा बांधू लागला. दुपट्टा बांधून झालाच होता आणि त्याची नजर झाडाच्या एका वरच्या फांदीवर गेली आणि त्याने जे बघितले ते पाहून तर त्याची वाचाच फुटली. त्या झाडाच्या वरच्या फांदीवर कोणीतरी फासावर लटकत होत. चांदण्याच्या प्रकाशात तिथे फक्त लटकलेल्या माणसाची आकृती दिसत होती. पण भूषण ला असं वाटलं कि ती लटकलेले प्रेत त्याच्याकडेच पाहते आहे. ते पाहून भूषण च्या मनात धडकी भरली. भीतीच्या त्या धक्क्याने तो थरथर कापू लागला. तो थोडावेळ त्या लटकलेल्या आकृतीकडे पाहतच राहिला. काही वेळाने त्याला असे वाटले की तो माणूस मान पण फिरवतो आहे. भूषण तिथून जोरदार पळत सुटला.
भूषण जोरदार ओरडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा आवाजच फुटत नव्हता. तो जलदगतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला वेग मिळत नव्हता. तो कसाबसा धावत पळत तिथून निघाला पण त्याला असे वाटू लागले कि कोणीतरी त्याचा पाठलाग करतय. भूषण मदती साठी आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहत होता. पण सगळीकडे फक्त अंधार होता. त्या अंधारातून वाट मिळेल तशी तो पळत होता.
थोड्या वेळाने त्याला समोरून एक मोटारसायकल येताना दिसली आणि त्याला थोडे बरे वाटले. ते त्याचे दोन मित्रच होते. ते जवळ आले आणि भूषण चा जिवंत जीव आला आणि त्याने मागे वळून पहिले. पण मागे कुणीच नव्हते. मित्रांनी त्याला मोटारसायकल वर मध्ये बसवले आणि वेगात वस्तीच्या दिशेने निघाले. भूषणने झालेला प्रकार त्यांना सांगितलं. त्या दोघांनी त्याला थोडा धीर दिला आणि घरी सोडले.
पैज भूषण जिंकला होता पण ती पैज त्याला फारच महाग पडली होती.
- समाप्त -