Devayani Development and Key - Part 12 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग १२

Featured Books
Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १२

   देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मानिषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

 

भाग 12

भाग  11  वरून  पुढे  वाचा ................

 

विकास गाडी घेऊन आला. ती लांब लचक ऑडी पाहून तर मावशीचे डोळेच विसफारले आणि आनंद पण झाला. त्या आराम शीर  गाडीत बसून त्या बाहेर पाहात होत्या.

“अहो, परिसर किती उत्तम ठेवला आहे ना. आणि हा पुतळा कोणाचा आहे, केवढा उंच आहे.” – मावशी 

“एयरपोर्ट च नावच बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळे त्यांचा पुतळा इथे लावला हे एकदम परफेक्ट आहे.” – विकासने माहिती पुरवली.

“अहो रस्ते सुद्धा किती सुंदर आहेत.” – मावशी 

“ह्या, हे एयर पोर्टचे  रस्ते आहेत. दिल्ली मेड.” काका अजूनही हार मानायला तयार नव्हते.

तेवढ्यात गाडीने वळण घेतलं आणि वर्धा रोड वर विकासने फ्लाय ओवर वर गाडी घेतली. तो डबल डेकर रस्ता बघून मावशी तर अचंबित झालीच पण काका सुद्धा चकित झाले. तेवढ्यात गाडी चालल्याचा आवाज आला. मावशी म्हणाल्या

“हा आवाज कसला आहे ? ट्रेन चालल्या सारखा.” – मावशी 

“हा ट्रिपल रोड आहे. खाली मेन रोड, मध्ये  हा fly over  ज्याच्या वरुन  आपण  चाललो आहोत आणि सगळ्यात वरतून मेट्रो. तिची सध्या ट्रायल रन सुरू आहेत. तुम्हाला पण उद्या मेट्रोची सफर करवून आणतो बघा.” – विकास

“काय सांगता काय ? नागपूर असं आहे ?” – मावशी

“म्हणजे काय ?” -विकास

“मला तर असं सांगितलं की नागपूर हे गाव खेडं आहे म्हणून.” – मावशी 

“अहो मावशी, महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर आणि 40 लाख लोकसंख्या आहे इथली. तुम्हाला कोणी सांगितलं की नागपूर हे खेडं आहे म्हणून ?” – विकास

“ह्यांनी.” काकांनी चमकून मावशी कडे पाहीलं. काही बोलायचा विचार झाला होता पण त्या ऐवजी त्यांनी खिडकी बाहेर बघणंच पसंत केलं.

“मावशी, विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला म्हणून, नागपूर उपराजधानी आहे. आधी नागपूर हीच मध्य प्रदेशची राजधानी होती. नागपूर महाराष्ट्रात आल्यामुळे आता मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ झाली आहे. विकासने बोलता बोलता रस्त्याच्या कडेला घेत ने गाडी थांबवली,”

“मावशी जरा खाली उतरता का ?”- विकास

“घर आलं ?” – मावशी

“नाही,” विकास म्हणाला “काही दाखवायचं आहे. हे बघा समोर जे  बिल्डिंग चं बांधकाम चालू आहे ना, ते झीरो माइल मेट्रो स्टेशन आहे. ही २० मजली इमारत होणार आहे. पहिले ५ मजले मेट्रो ची कार्यालये  आणि ६ व्या  मजल्यावर स्टेशन. नंतर बाकीच्या मजल्यावर, मॉल, मल्टीप्लेक्स आणि इतर बिझनेस offices  होणार आहेत.”

“बापरे चांगलंच भव्य होणार आहे. पण काय हो, हे झीरो माइल असं विचित्र नाव का दिलं आहे.?” मावशीनी कुतुहलाने विचारलं.

“अहो आपण जिथे उभे आहोत तिथे हिंदुस्थानाचा शून्य मैलाचा दगड आहे. हा आपल्या देशाचा मध्य बिंदु आहे. नागपूरातून रेल्वे आणि रोड ने चारही दिशांना जवळ जवळ सारख्याच वेळेत पोचता येतं. म्हणून झीरो माइल नाव आहे. इथे पाठी मागे एक स्तंभ आहे. Zero milestone, ब्रिटिशांनी लावलेला. चला. बसा.” विकास ने माहिती दिली. 

थोडं पुढे गेल्यावर विकास म्हणाला

“हे डाव्या बाजूला जे दिसतंय ते विधान भवन आहे. आणि समोर जी वास्तु दिसते आहे ती रिजर्व बँक आहे.”

रिजर्व बँकेची ती भव्य वास्तु पाहिल्यावर काकांचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता. विकासला त्या दोघांचेही आश्चर्याने आ वासलेले  चेहरे आरश्या मधून दिसत होते. नागपूर दर्शन चं काम समाधान कारक रित्या झालेलं होतं. विकासने मग फार काही न बोलणंच श्रेयस्कर समजलं. गोल वळसा घालून गाडी घराच्या रस्त्याला लागली. चला घर आलं. विकासच्या सुंदर बंगल्या समोर गाडी थांबली

मावशी ने कल्पनाच केली नव्हती की विकासचा दुमजली, एवढा मोठा बंगला असेल म्हणून. तिने पुन्हा एकदा आजूबाजूला नजर फिरवली परिसर एकदम स्वच्छ. कुठे काडी कचरा दिसत नव्हता आणि आतले रस्ते सुद्धा छान. मावशी पाहात होत्या त्यांच्या नागपूर बद्दलच्या सर्व सेट कल्पनांना हादरे बसत होते. काकांची पण अवस्था काही वेगळी नव्हती. सुरेश ने आधीच फोन केला होता त्यामुळे अख्खी जनता फाटकातच स्वागताला जमली होती. गुलाबांचा  गुच्छ देऊन दोघांच स्वागत झालं. मावशी बाई आणि काका भारावून गेले. अर्धी लढाई जिंकली होती.

चहा पाणी झालं मग सगळ्यांच्या ओळखी झाल्या. मग थोड्या गप्पा. मग देवयानी मावशीला आणि काकांना घेऊन घर दाखवायला घेऊन गेली. घर बघून झाल्यावर मावशीचा नूरच बदलून गेला होता. घर दाखवून काका आणि मावशीला घेऊन देवयानी खाली आली तो पर्यन्त जेवणाचं टेबल तयार होतं. काका आणि मावशीच्या आवडीचे पदार्थ देवयानीने केले होते. आणि खास वऱ्हाडी पदार्थ पण होते. जेवण हसत खेळत पार पडलं. मावशीला पण घरातला मोकळेपणा आवडलेला दिसला. लढाई जवळ जवळ जिंकली होती. जेवण झाल्यावर सगळे हॉल मधे येऊन बसले.

देवयांनीला विकासचे बाबा म्हणाले की “दिवस भराचा प्रवास करून आले आहेत, मावशी आणि काकांना जरा आराम करायचा  असेल, त्यांना वरच्या गेस्ट रूम मधे घेऊन जा.” त्या दोघांच्या पाठोपाठ देवयानीची आई पण निघाली. मग बराच वेळ देवयानी, तिची आई आणि मावशी, काका बोलत बसले. मावशीने देवयानीच्या आईची चांगलीच कान उघडणी केली. इतकं चांगलं स्थळ नाकारण्याचं काय कारण आहे म्हणून विचारलं.

“अग आपण काय विचार करत होतो की इतक्या दूर नागपूर सारख्या गाव खेड्यात मुलगी द्यायची नाही म्हणून. पण देवयानी आधीच इथे पोचली होती त्यामुळे आम्हाला पण टाळता नाही आलं. आणि इथे आल्यावर तर नागपूर कडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोनच बदलून गेला. मला तर काही कळतच नव्हतं. म्हणून तर तुला बोलावून घेतलं. आता तूच सांग कसा नकार द्यायचा ते.” – कावेरी बाई.

“कशाला नकार द्यायचा? चांगलं घर दार आहे, माणसं मन मिळावू आहेत. मुलाला उत्तम नोकरी आहे, एकदम सुखवस्तू घराणं आहे. भाऊ, बहि‍णी काका सगळे गुण्या गोविंदाने राहताहेत. आणि मुख्य म्हणजे देवयानी त्यांच्यात मिसळून गेली आहे. तिच्या वागण्यावरूनच दिसतं आहे की ती खुश आहे. मग अश्या परिस्थितीत तू वेगळा विचार का करते आहेस ? पक्कं करून टाका. मी तर म्हणते की आपण सगळेच इथे आहोत आणि त्यांची मंडळी पण इथेच आहेत तेंव्हा साखरपुडा पण आत्ताच उरकून घ्या. लग्न पक्कच करून टाका.” मावशीने असं म्हंटल्यांवर देवयांनीला इतका आनंद झाला की तिने मावशीला मिठीच मारली. मावशीने पण कौतुकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. मग देवयानी आणि तिची आई खाली आल्या आणि दार लोटून घेतले. मावशीला म्हणाली की इथले सगळे लोकं मोठ्या आवाजात बोलतात, तुम्हाला डिस्टर्ब होईल म्हणून दार लोटून घेते. मावशी, काका जरा आराम करायला मोकळे झाले.

खाली आल्यावर त्यांच्याकडे हॉल मधले सगळेच उत्सुकतेने बघत होते. मग हलक्या आवाजात देवयानीच्या आईने सगळ्यांना सर्व सविस्तर सांगितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सुरेश म्हणालाच की

“आई तू ग्रेट आहेस. आज तू मावशीला बीट केलस, सगळी कसर भरून काढलीस. काय प्लॅन केला होता! आम्हाला कुणालाच खात्री नव्हती पण तू कॉन्फिडेन्ट होतीस. हॅट्स ऑफ.”

“अरे हळू बोल कोणी ऐकलं तर सगळंच मुसळ केरात जायचं.” कावेरीबाईंनी सुरेशला दटावलं

गोविंद राव लगेच म्हणाले की

“आता यापुढे या विषयावर चर्चा नको. हा विषय आता संपला आहे. आता साखरपुडा केंव्हा करायचा त्यावर बोलायचं.”

“हे मात्र सोळा आणे बोललात गोविंद राव.” भगवान राव पुढे म्हणाले “आमच्या इथे एक म्हण आहे लोहा गरम हैं, हातोड़ा मार दो. म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर  तवा गरम आहे  पोळी भाजून घ्या.” आणि गडगडाट झाल्यासारखे हसले. गोविंद रावांनी पण साथ दिली. मग सगळेच सामील झाले.

आणि मग बराच वेळ वेग वेगळ्या विषयांवर चर्चा चालली. शेवटी गोविंद राव म्हणाले की

“ओके भगवानराव कसं करूया आता ?”

“अहो आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुमची रजा काय म्हणते , त्याच्यावर अवलंबून आहे.” – भगवानराव 

“लेटेस्ट म्हणजे परवा निघाव लागेल. ते ही विमानाने, नाहीतर उद्याच.” गोविंद रावांनी आपली अडचण सांगितली.

“ठीक आहे पण परवा तुम्ही गेल्यावर पुन्हा केंव्हा सुट्टी मिळेल ? काकांचा काही प्रश्न नाही ते रिटायर्ड आहेत पण सुरेश, विश्राम, प्रिया याचं पण बघाव लागेल ना.” – भगवानराव 

“माझ्या  आणि प्रियाचा पण काही प्रॉब्लेम नाहीये. विश्राम ची नोकरी आहे त्यालाच विचारा.” सुरेश बोलला.

“नो प्रॉब्लेम, मी अॅडजस्ट करीन. तुम्ही तारीख ठरवा. कुठे करणार आहात ?” विश्रामने पण सहमति दर्शवली.

“साखरपुडा इथे करू, लग्न बेळगाव ला.” भगवान राव म्हणाले.

मावशी आणि काका खाली आले.

“अश्विनी, मावशी काका उठले आहेत तर आता सगळ्यांसाठी चहा करायचं  बघा.” भगवानराव म्हणाले, पण अश्विनीच्या आधी देवयानीच उठली.

“वहिनी तुम्ही बसा. मी करते.” असं म्हणून देवयानी किचन मधे गेली. तिच्या पाठोपाठ विकास पण गेला. त्यांच्या मागे  वहिनी पण गेली.

“विकास तू किचन मधे काय करतो आहेस ? आज पर्यन्त तर कधी पाऊल ठेवलं नाही मग ?” अश्विनीनी विकास कडे पाहून विचारलं.

“अग काही नाही, देवयानी आपल्या घरात नवीन आहे न म्हणून तिला जरा मदत करावी म्हणून आलो. नवीन माणसाला जरा गोंधळल्या सारखं होतं ना म्हणून.” विकास नी सावरून घेण्याचा प्रयत्न केला.

“ती कुठे आता नवीन राहिली आहे , तुझ्या पेक्षा जास्त माहिती झाली आहे तिला. जा तू बाहेर जा.” – अश्विनी 

“वहिनी, काय तू पण, अरे जरा समजून घे ना.” – विकास

“ओके ओके.” असं म्हणून अश्विनी हसत हसत बाहेर आली.

बाहेर गोविंद रावांनी मावशीला गोषवारा सांगीतला. आणि मावशीने संमती दर्शक मान हलवली. आता लढाई पूर्ण जिंकली होती. सगळ्यांनाच मग हुरूप आला.

“असं करा उद्या तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून मुहूर्त काढा साखर पुड्याचा. म्हणजे त्या प्रमाणे ठरवता येईल. रजा मिळायला काही प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. साखर पुडा आहे म्हंटल्यांवर कोणी नाकारणार नाही. मावशी तुम्हाला चालेल ना ?” गोविंद रावांनी मावशीला विचारलं.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.