Ramayan - Chapter 7- Part 72 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 72

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 72

अध्याय 72

मूळकासुराचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामभेटीला बिभीषण निघाला, अयोध्येचे वर्णन :

रणीं बिभीषण पडिला । तो प्रधानें सावध केला ।
जैसा नदीस बुडतां काढिला । थडीचिया जनीं हो ॥१॥
रावणानुज होवोनि सावधान । प्रधानांप्रति बोले वचन ।
आतां कर्तव्य काय आपण । इये समयीं करावें ॥२॥
प्रधान म्हणती राजाधिराजा । शरण जावें श्रीरघुराजा ।
सिंहाचे प्रसादें अजा । गजमस्तकीं आरुढली ॥३॥
गदापाणि म्हणे धन्य जिणें । आजि राघवासि भेटणें ।
हाचि निश्चय करोनी मनें । प्रधानांसीं निघाला ॥४॥
चवघांचिया समवेत । बिभीषण मार्गी जात ।
म्हणे आजि भेटेल गरुडध्वज । क्षेम देईल उचलोनि भुज ।
सांगेन जीवींचें निजगुण । अधोक्षज देखिलिया ॥६॥
नेत्रां होईल पारणें । धणीवरी सुख घेईन मनें ।
पूर्णिमा देखोनि चकोर वदनें । चंद्राकारणें पसरिती जैसें ॥७॥
ऐसा मार्ग क्रमित मेदिनीं । उल्लास न माये अंतःकरणीं ।
तंव पुढें देखिली राजधानी । रघूमत्तरायाची ॥८॥
सुवर्णकळाश रत्नजडित । पताका अंबरीं रामनामांकित ।
काळ धाकें न राहे तेथ । पुरी साकेत शोभे ऐसी ॥९॥
अयोध्यानगरींचे जन । करिती श्रीरामकीर्तन ।
घरोघरीं वेदाध्ययन । पुराण व्याख्यान ठायीं ठायीं ॥१०॥
जनीं अयोध्येसीं वसतां । नेणती जन्ममरणवार्ता ।
नाहीं दरिद्राची कथा । नित्य स्मरतां रामनाम ॥११॥
शरयुतीर अति पावन । सेवितां राहिले मुनिजन ।
पायवाट स्वर्गा गमन । करावयालागूनी ॥१२॥
अयोध्येचें स्मरणमात्रें । मोक्ष वोळंगे पाणियातें ।
इतर इजसमान नव्हेत तीर्थे । काशी‍आदि करोनी ॥१३॥
काशी हृदयीं परम कृपण । मरणांतीं मुक्ति दे दान ।
अयोध्या ईहूनि उदार गहन । स्मरणें पावन मोक्ष दे ॥१४॥
यालागीं वाल्मीकासि कवीश्वरीं । वर्णिली अयोध्या प्रथम पुरी ।
मोक्षदानी अति उदारी । निजथोरी जियेची ॥१५॥

श्रीरामांची भेट व त्यांना निवेदन :

ऐसिये अयोध्येमाजी रघुनाथ । राज्य करी बंधूसमवेत ।
तेथें बिभीषण शरणागत । राजसदना उजू आला ॥१६॥
भद्रासनीं रविवंशभूषण । दक्षिणे वसिष्ठ ब्रह्म पूर्ण ।
परिवेष्टीइइत बंधू आदि लक्ष्मण । सेवे सावधान तिष्ठती ॥१७॥
दुरोनी देखिला श्रीरघुनाथ । बिभीषणें घातला दंडवत ।
जोडले करीं प्राणिपात । श्रीरामासि पैं केला ॥१८॥
श्रीरामें उठोनि ते समयीं । शरणागता धरोनि हॄदयीं ।
आलिंगिला गोहीं बाहीं । जेंवी माता बाळका ॥१९॥
बैसकेस दे रत्नजडित पट । देवोनि बैसवला निकट ।
म्हणे शरणागता बहुत कष्ट । झालें ऐसें दिसतसे ॥२०॥
चंद्राच्या तुटतीं जेंवीं कळा । तेंवी तुझे देखोनि मुखकमळा ।
वोहट पडिला हर्षकळा । आनंदजिव्हाळा न देखों ॥२१॥
जीवनेंवीण वल्ली । सुकोन शुष्क जाहली ।
जैसी हृदयींची काजळी । दिसतसे मुखावरी ॥२२॥
कोण हृदयींची चिंता । ते मज निवेदी पौलस्तिसुता ।
श्रीरामाची देखोनि मुखावरी । सुखा झालें बिभीषणा ॥२३॥
पौलस्ति म्हणे कलमोद्भवजनका । स्वर्गगमनपुरीच्या नायका ।
दिनमणिकुळदीपका । अपूर्व एक देखिलें ॥२४॥
वारीमृणालाचा तंतु । त्यामाजि गुंतला ऐरावतु ।
मशकें भूगोळ मुखांतुं । दंतदाढा रगडिला ॥२५॥
मर्कटें समुद्र शोषिला । मृगजळीं वंध्यापुत्र बुडाला ।
जंबुकें सिंह विदारिला । सशानें भेडसाविला शार्दूळ ॥२६॥
छायेनें पुरुष गिळोन । उरगें गरुडावरी केलें आरोहण ।
पिपीलिकेचा जो नंदन । तेणें मेरु उपटिला ॥२७॥
ऐसें वर्तलें नृपचूडामणी । जंबुकें सिंहाचा कवळ नेला हिरोनी ।
ऐसें झालें मजलागूनी । देवाधिदेवा विधिजनका ॥२८॥
ऐसियासि ऐका वृत्तांत । कुंभकर्णाचा जो मूळक सुत ।
तेणें प्रसन्न करोनी उमाकांत । अद्‍भूत वर पावला ॥२९॥
वरदबळेंकरुन । युद्ध केले अति दारुण ।
समस्त मारोनी राक्षससैन्य । माझें राज्य हरितलें ॥३०॥
श्रीराम म्हणे गा गदापाणी । केली रावणकुळा खंडणी ।
पुत्रासहित रणीं । निद्राप्रिय मारिला ॥३१॥
हा तैं काय नव्हता । किंवा अन्यत्र स्थळीं गेला होता ।
याची सांगे समूळ कथा । जे ऐकतां सुख होय ॥३२॥

रामांना मूळकासुराची कथा निवेदिली :

ऐसें बोलिलें नलिनीदळानेत्रें । तें परिसोनि बिभीषणें पवित्रें ।
सांगों आदरिलें चरित्र । निजाग्रजसुताचें ॥३३॥
गदापाणि म्हणे कनकमृगारी । याचे मातेचिया उदरीं ।
पूर्वी पुत्रद्वय जन्मलें सुरारीं । माजी रणपंडित ॥३४॥
कुंभ निकुंभ नामें प्रसिद्ध । काळावरी जयांचे बिरुद ।
तयांमागें अतिमंद । पित्याचे मूळीं लागला ॥३५॥
जन्मता सांडिला बाहेरी । निशा राक्षसीनें वाढविला घरीं ।
याचे मुळें सर्वां बोहरी । देवाधिदेवें श्रीरामें केली ॥३६॥
सर्व कुळाचा झाला नाश । कुंभकर्णस्त्रियेनें नगरास ।
आणोनि वाढविला कोणास । कळों नाहीं दिधलें ॥३७॥
जेंवी पुरिला अग्निहोत्रींचा वन्ही । प्रकट परी न देखे कोणी ।
ऐसा वाढला लंकाभुवनीं । पुढें तपा निघाला ॥३८॥
प्रसन्न करोनि चंद्रमौळी । वर मागितला तये वेळीं ।
अमर करीं भूमंडळीं । देवीं दैत्यीं न मारावें ॥३९॥
मानवादि गंधर्व विद्याधर । किंपुरुष चारण असुर ।
पक्षी श्वापदें जीव क्रूर । मज वधीं तत्पर न व्हावें ॥४०॥
होय म्हणोनि अंधकरिपु । म्हणे मनींचा सिद्ध संकल्पु ।
या इतुकियांचें हातें वपु । मरण न पवे संग्रामीं ॥४१॥
मग उपदेशून मंत्रावळी । कैलासा गेला इंदुमौळी ।
मागें मूळकासुरें भूमंडळीं । आम्हां दुःख दीधलें ॥४२॥
शरणागत ऐसें बोलिल्यावरी । स्वामीची मनोदेवता आश्चर्य करी ।
क्षण एक निवांत दूषणारी । निजासनीं बैसला ॥४३॥

त्याच्या मरणाचा उपाय वसिष्ठांनी सांगितला :

क्षणैक ध्यानस्थ गौतमश्वशुर । मग बोलता झाला उत्तर ।
याचे वधाचा प्रकार । समस्तां प्रति पुसतसे ॥४४॥
तंव वसिष्ठ म्हणे श्रीरघुनाथा । याची ऐसी मरणाची कथा ।
यासी वधील जनकदुहिता । नारदें मज सांगितलें ॥४५॥
सद्‍गुरूमुखींचें ऐसें वचन । श्रीरामचंद्रें परिसोन ।
प्रधान पाचारिले सज्ञान । सुमंतादि थोर ॥४६॥
आज्ञा केली श्रीरघुवीरें । सुग्रीवादि येवोनि वानरें ।
सेना सज्जोनि वाद्यें तुरें । नानापरींची वाजिन्नलीं ॥४७॥
जानकीस पुरुषवेश दिधला । अलंकारभूषणीं मिरविला ।
तंव बिभीषण बोलता झाला । पारणें कीजे राजेंद्रा ॥४८॥
आजि कार्तिकद्वादशी । पारणें सारोनि प्रयाणासि ।
मग करावें लंकेसीं । राक्षसवधाकारणें ॥४९॥
तंवा बोलिला श्रीरघुनंदन । आणीं मूळकासुर मारुन ।
मग करुं भोजन । हे प्रतिज्ञा निश्चित ॥५०॥
तुज राज्य दिधल्यावीण शरणागता । आम्हां भोजनीं नाहीं अर्हता ।
ऐसें वदोनि श्रीरघुनाथा । स्फुरणें बाहु वाढत ॥५१॥

सीता पुरुषवेशाने निघाली :

पुरुषवेश सालंकारीं । शृंगारिली जानकी सुंदरी ।
निजधनुष्य घेवोनि करीं । अश्वावरी बैसविली ॥५२॥
प्रधान सेना सैनिक । परिवेष्टित कपिकटक ।
मध्ये शोभे रघुनायक । जानकी सम्यक पृष्ठभागीं ॥५३॥
मग श्रीरामें काय केलें । पुष्पकासि पाचारिलें ।
त्यावरी बैसोनि सहदळें । लंकापुर पावले ॥५४॥
ऐसें चालतां निजभारीं । पंचघटिका भरता पुरीं ।
प्रवेशला जैसे पुष्पावरी । षट्‍पद बहुसाल ॥५५॥
तडागाचे निकट पाळीं । पक्षी जैसे पावती सकुळीं ।
तैसा निजसैन्येंसीं आतुर्बळी । लंकाप्रदेशीं पावला ॥५६॥
देखोनियां निजलंका । लतामृग चढले तवका ।
शिळा पाषाण तरु अनेका । करी घेवोनि चालिले ॥५७॥
त्रिकूट वेढिला वानरीं । देखोनियां सुरारीं ।
आश्चर्य करी ते अवसरीं । दडोनि राहिला निजगृहीं ॥५८॥

मूळकासुराला अपशकुन, युद्धाला प्रारंभ :

वार्ता ऐकोनि मूळकासुर । कीचित सेना सज्जोनि सत्वर ।
पश्चिमद्वारें चालिला थोर । अपशकुन पैं झाले ॥५९॥
निजरथाच्या ध्वजावरी । वायस येवोनि शब्द करी ।
पुढें एक द्विज मोकळे शिरीं । मार्गीं येतां देखिला ॥६०॥
अशुद्धाचा शिरवा पडे । रथींचा वारु चालतां अडे ।
आंख मोडोनि दुखंडें । धुरेचीं पैं होती ॥६१॥
सारथि उलंडला धरणीं । मूळकासुरें उडी टाकोनी ।
दुसरे रथीं आरुढोनी । संग्रामासी निघाला ॥६२॥
अपशकुनें भयभीत सैन्य । तयासि अभय देवोन ।
करिता झाला तुंबळ रण । वानरेसीं भिडोनियां ॥६३॥
वानर टाकितें झाले शिळा । राक्षस तोडिती शरजाळा ।
अद्‍भूत संग्राम मांडला । वीरें वीर पडखळिले ॥६४॥
तंव हनुमंतें रुद्रावेशें । सोडिलीं पर्वताचीं शिसें ।
देखोनि तोडिलीं रजनीचरेशें । उपरी काय आरंभिलें ॥६५॥
ईशानदत्त वरद बाण । कार्मुकीं योजिलें मंत्र जपून ।
ते वानरसेनेवरी येतां रघुनंदन । देखोनि धनुष्य घेतलें ॥६६॥
कार्मुकीं बाण रघुराजें । योजिला जपोनि मंत्रबीजें ।
जयाचेनि निजदिव्यतेजें । दशदिशांमाजि बिंबती ॥६७॥
ऐसे श्रीरामाचे शर । यमदंडकाहूनि कठोर ।
सुटले तेणें अंबर । व्यापिलें दिसे ते समयीं ॥६८॥
बाणें बाणा निवारिलें । आकाश निर्मळ जाहलें ।
वर्षाकाळ गेलिया आगमन केलें । शरदऋतूनें पैं जैसें ॥६९॥
देखोनि श्रीराघवाचें संधान । राक्षसें आश्चर्य मानोन ।
काय बोलता झाला वचन । बिभीषणासी परियेसा ॥७०॥
अगा ये पूर्वजा बिभीषणा । तुवां साह्य आणिलें श्रीरघुनंदना ।
तरी मज त्याची नाहीं गणना । शिवप्रसादेंकरोनि ॥७१॥
माझा मृत्यु यांचेनि हस्ते । नाहीं जाण तूं निभ्रांतें ।
साटोप धरोनि युद्धातें । वृथा मरावया आलेती ॥७२॥
पूर्वी श्रीरामें कपट केलें । छळोनि वालीसी वधिलें ।
ते मत येथें काहीं न चाले । मज मूळकासमोर ॥७३॥
ऐसे राक्षसाचे वचनीं । श्रीरघुराजें विचारोनि मनीं ।
धनुष्यीं बाण लावोनी । पुढारला पैं होय ॥७४॥
मूळकासुरा हटकोन । श्रीराम करिता झाला संधान ।
मागें जानकी सरसावोन । पाठीसीं उभी राहिली ॥७५॥

सीतेची शंकरांना प्रार्थना :

श्रीराम मूळकासुर परस्परें । युद्धीं भिडती आवेशें थोरें ।
मागोनी जानकीनें त्वरें । धनुष्या हात घातला ॥७६॥
शितीं लावोनि श्रीरामदत्त बाण । वोढी काढोनि आकर्ण ।
मनीं स्मरोनि श्रीरामचरण । काय आठविती पैं झाली ॥७७॥
म्हणो अहो जी सदाशिवा । म्यां जरी एकाग्रचित्तें सेवा ।
करोनि भजलें असेन राघवां । तरी हा बाण मूळका वधों ॥७८॥
माझा पिता विदेही जनक । राज्यराष्ट्रापाळक ।
सत्य असेल तरी ह अचुक । राक्षसा बाण भेदील ॥७९॥
श्रीराम एकपत्नीव्रतधारी । हें सत्य असेल जरी ।
तरी त्या माझ्या निजशिरीं । कुंभकर्णपुत्र मरेल ॥८०॥
अनसूया जे पतिव्रता । तिणें मज अनुग्रहिलें वनीं वसतां ।
तियेचें प्रसादें राक्षससुता । मरण होवो या शरें ॥८१॥
वसिष्ठ सद्‍गुरू ब्रह्म पूर्ण । जरी एकबुद्धीं केलें असेल भजन ।
लक्ष्मण शेषावतार सत्य जाण । तरी येणें बाणें मरण राक्षस पावो ॥८२॥
ऐसें भावोनियां मानसीं । शर सोडिला घोषीं आकाशीं ।
प्रळय झाला दिग्गजांसी । चंद्रसूर्ये भूमि सेविली ॥८३॥
नक्षत्रें खचली पृथ्वीवरी । पर्वत उलंडले सागरीं ।
मर्यादा सांडूं पाहती भारी । संकट येवोनि पडिलें वीरां ॥८४॥
वानरदळीं केला गजर । राक्षससैन्यीं हाहाकार ।
नभोमार्गे शर । मूळकासुरावर येवों सरला ॥८५॥

मूळकासुराचा वध :

राक्षसपुत्र करी निवारण । तंव अकास्मात येवोनि बाण ।
शिर छेदोनि रणीं जाण । सीतेच्या भातां निघाला ॥८६॥
मूळकासुर पडिला रणीं । जेंवी पर्वत खचे मेदिनीं ।
उरले सैन्य वानरगणीं । शिळावरीं कूट केलें ॥८७॥
जेंवी तडागीं तुंबळा । फुटतां पसरे चहूंकडे जळ ।
तेंवी कुंभकर्णपुत्राचें दळ । दशदिशा लंघितें झालें ॥८८॥
जानकीचेनि हस्तें जाण । मूळकासुर पावला मरण ।
ऐसें देखोनि सुरगण । पुष्पवर्षाव करिता झाला ॥८९॥
विजयी झाला श्रीरघुनाथ । विजयी कपि आनंदभरित ।
विजयी बिभीषण शरणागत । निजराज्यीं स्थापिला ॥९०॥
याउपरी पुष्पकविमानीं । बैसोनि जानकीसह कोदंडपाणी ।
बंधुवर्गेसीं अयोध्याभवनीं । प्रवेशता पैं झाला ॥९१॥
वानरां आज्ञा देऊन । निजस्थाना पाठविलें जाण ।
यापरी वर्तलें तें सावधान । श्रोतृजन परिसोत ॥९२॥
म्हणाल हें मूळीचें नव्हे निरुपण । वाल्मीकें कथिलें जाण ।
तरी हे कथा अप्रमाण । ऐसें संतीं न म्हणावें ॥९३॥
वाल्मीकें शतकोटि केलें । तें एक महेशें पाहिलें ।
भागत्रय करोनि वाटिलें । हे प्रसिद्ध जाणतां ॥९४॥
मृत्युलोकीं जो भाग । तो युगानुयुगीं झाला भंग ।
काही एक उर्वरित कथाभाग । लोकोद्धारण राहिला ॥९५॥
याकारणें वाल्मीक ऋषी । वदला नाहीं कथा ऐसी ।
म्हणातां कुष्ठ लागे वाचेसीं । ऐसें पंडित जाणती ॥९६॥
अबद्ध सुबद्ध रामायण । श्रीरामाचें चरित्र गहन ।
श्रवणें भवदोषखंडन । सादरें जरी ऐकिजे ॥९७॥
पक्षियाचे उच्चारें गणिका । विमानीं बैसोनि वैकुंठलोका ।
गेली हा तुम्हांसि ठाऊका । नाममहिमा रामाचा ॥९८॥
श्रीरामाकथासागर । याचा कोणा कळेल पार ।
भोक्ता एक श्रीशंकर । जेणें शतकोटि विभागिलें ॥९९॥
एका जनार्दना शरण । जानकीसहित श्रीरघुनंदन ।
अयोध्येसी सुखसंपन्न । येवोनि राज्यभार चालवीत ॥१००॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
मूळकासुरवधो नाम द्विसप्ततितमोऽध्यायः ॥७२॥ ओंव्या ॥१००॥