अध्याय 62
अगस्ति – श्रीराम संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
कुंभोद्भव म्हणे जामदग्नजेत्यासी । पूर्वी त्रेतायुगाची कथा ऐसी ।
जे वर्तली ते तुजपासीं । विस्तारेंसीं सांगेन ॥१॥
पूर्वी त्रेतायुगामाझारीं । शतयोजनें वनविस्तारीं ।
पशु पक्षी नाहीं त्या वनांतरीं । त्यजोनि दुरी गेले मानव ॥२॥
तया वनाभीतरीं । एक तापस उत्तम तप करी ।
मीही रामा हिंडत तेथवरी । तया वना प्रवेशलों ॥३॥
फळें मुळें सुस्वादिष्ट । भक्षितां प्राणी होय संतुष्ट ।
मार्गीं रमलियाचे कष्ट । तया वनीं निवारती ॥४॥
अनेक वृक्ष बहुत जातींचे जाण । तयांचे कोण करील वर्णन ।
तयांमध्ये एक सरोवर विस्तीर्ण । एकयोजनपर्यंत ॥५॥
तया सरोवराभीतरीं । नानापरींच्या कमळिणी भ्रमरी ।
रुणझुण करिती नाना स्वरीं । मंजुळ शब्देंकरोनी ॥६॥
हंस सारस चक्रवाक । मयुर साळया आणिक शुक ।
तित्तित लाव्हे कुक्कुट बक । कारंडक अनेक हो ॥७॥
तया वनींचें फळ । अत्यंत खादिष्ट रसाळ ।
आणि तेथील निर्मळ जळ । सेविल्या अपूर्व सुख होय ॥८॥
ते समयीं सरोवराभीतरीं । शव एक देखिलें तनु साजिरी ।
सरोवरातीरीं आश्रम रावणारी । उत्तम सुंदर देखिला ॥९॥
सरोवराच्या काठावर पडलेले शव विमानातून आलेल्या पुरुषाने भक्षण केले :
शव देखोनि आश्चर्य वाटलें । मग तेथें क्षण एक मन स्थिर केलें ।
तंव तत्क्षणीं अद्भूत वर्तलें । तें अवधारीं श्रीरामा ॥१०॥
तंव एक स्वर्गीहून । उतरता देखिलें विमान ।
घंटावळी रत्नखचित जाण । तेजें संपूर्ण लखलखित ॥११॥
तया विमानभीतरीं । गंधर्वगायन सुस्वरीं ।
अप्सरानृत्यताल गजरेंकरीं । माजि सुंदर पुरुष बैसलासे ॥१२॥
तया पुरुषें तेथें उतरोन । करोनि करचरणप्रक्षाळण ।
शव भक्षिता झाला आपण । तें म्यां दृष्टीं देखिलें ॥१३॥
सवेंचि पुरुष विमानीं । आरुढ होतां तेच क्षणीं ।
म्यां पुसिले तू कोंण म्हणोनि । शव कां भक्षिलें विमानस्था ॥१४॥
अति निंद्य शवभक्षण । तुवां करावय काय कारण ।
तें मज सांगें विस्तारुन । कृपा करोनि ये समयीं ॥१५॥
तूं अत्यंत सुंदर पुरुष । आणि भक्षिलें तुवां मांस ।
हें आश्चर्य देखिलिया मनास । पुसों इच्छितों तुजलागीं ॥१६॥
ऐकोनियां माझें वचन । विमानस्थ पुरुष बोलिला जाण ।
म्हणे मुनि होवोनि सावधान । सविस्तर कथन अवधारीं ॥१७॥
श्वेताचे आत्मकथन :
पूर्वीं विदर्भदेशींचा भूपती । वसुदेव नामें महाख्याती ।
तयासि दोघी स्त्रिया निश्चितीं । दोघी पुत्रवती पैं झाल्या ॥१८॥
तो आमुचा पिता जाण । आम्ही दोघे बंधु धर्मपरायण ।
माझें श्वेत नामाभिधान । सुरस कनिष्ठ बंधु माझा ॥१९॥
राज्य करितां वसुदेवास । बहुत काळ लोटला मुनि परियेस ।
मज राज्यीं स्थापोनि राजा स्वर्गास । मरण पावोनि पैं गेला ॥२० ॥
पित्यामागें म्यां श्वेतें । राज्य केले वर्षे बहुतें ।
मग उबगलों विषयभोगातें । उदास चित्तें होवोनी ॥२१॥
राज्यीं स्थापूनि कनिष्ठ बंधूसी । मी आलों वनासी ।
तप केलें तीन वर्षे ऋषी । मग मी स्वर्गासी विमानारुढ होवोनि गेलों ॥२२॥
गेलियावरी ब्रह्मलोकातें । क्षुधतृषेनें बाधिलें तेथें ।
मग म्यां विनवोनि ब्रह्मयातें । पुसतां झालों ते काळीं ॥२३॥
मग ब्रह्मा म्हणे महापुरुषा । तप करोनि अति सायासा ।
परी दान धर्म दया सहसा । घडलीं नाहीं तुजलागीं ॥२४॥
तुवां तप केले अद्भूत । परी पूजिले नाहींत अतीत ।
यालागीं क्षुधा तृषा बाधित । ये लोकीं जाण तापसा ॥२५॥
दानधर्मदयेवीण । मम लोका आलिया होय विघ्न ।
यालागीं भले साधुजन । अन्नदान करिताती ॥२६॥
तापसी म्हणे ब्रह्मयासी । मज भक्षावया काय देतोसी ।
येरु म्हणे तुझें शरीर पडलें भूमीसीं । तें भक्षावें स्वादिष्ठ ॥२७॥
मग विमानीं आरुढोन । या सरोवरा आलों जाण ।
स्वशरीर केलें भक्षण । तुजदेखतां अगस्तिमुनी ॥२८॥
आपुलें शरीर केलें भक्षण । येथे तृप्ति पावलों जाण ।
यावरी तुमचें झालें दर्शन । तृषेसि बोळवण पैं झाली ॥२९॥
आता अहो जी अगस्तिमुनी । मज कृपा करावी दीनालागूनी ।
म्हणोनि माथा ठेविला चरणीं । काय विनवणी करिता झाला ॥३०॥
अहो कुंभोद्भवा इल्वलारी । हीं हेमाभरणे अंगीकारीं ।
कृपा करोनि मजवरी । दीन म्हणोनि उद्धरावें ॥३१॥
हेमाभरणें अंगीकारुन । तया दिधलें आशीर्वचन ।
म्हणे तूं स्वर्गा करीं गमन । क्षुधा तृषा जाण बाधेना ॥३२॥
मग माझे आशीर्वादेंकरीं । प्रवेशता झाला स्वर्गपुरी ।
त्याचीं आभरणें हीं रावणारी । तुज म्यां दिधलीं ये काळीं ॥३३॥
तो पुरुष स्वर्गासीं । पूर्वदेह सांडोनि वनप्रदेशीं ।
दिव्यदेहें ब्रह्मलोकासी । विमानारुढ होवोनि गेला ॥३४॥
ऐकोनि अगस्तीचें वचन । संतोषला श्रीरघुनंदन ।
म्हणे स्वामी कृपा करुन । तयाचें कथन सविस्तरीं सांगावें ॥३५॥
श्रीराम म्हणे अगस्तीसी । श्वेतराज वनप्रदेशीं ।
तप करितां सायासीं । वस्तीं मनुष्यासी नव्हती तेथें ॥३६॥
ऐसें झालें उद्वस वन । मृगपक्षिविवर्जित जन ।
महा विक्राळ दारुण । तेथें तप कैसें केलें ॥३७॥
भार्गवजेत्याचें ऐसें वचन । ऐकोनि अगस्ति आनंदोन ।
पूर्वील इतिहास पुरातन । संतोषोन सांगता झाला ॥३८॥
मनूची कथा :
पूर्वी कृतयुगामाझारी । मनुनामें प्रसिद्ध निर्धारीं ।
तया पुत्र इक्ष्वाकु नृपकेसरी । पितयाचे आज्ञेअधीन असे ॥३९॥
मनु धर्मात्मा धर्मपरायण । पुत्रासी राज्यीं स्थापून ।
म्हणता झाला स्वधर्मेंकरुन । राज्यपाळण करावें ॥४०॥
अदंड्या दंड न करावा । न करीं अधर्माचा ठेवा ।
गोब्राह्मण आणिक जीवां । प्रतिपाळण करावें ॥४१॥
ऐसें बोलोनि मनूनें जाण । केलें स्वर्गाप्रती गमन ।
मागें इक्ष्वाकु प्रतापेंकरुन । राज्य करिता पैं झाला ॥४२॥
पृथ्वीचे राजे जिंतिले । आपुले करोनि स्थापिले ।
पुढें चिंतातुर मानस झालें । पुत्रसंततीकारणें ॥४३॥
म्हणे म्यां पृथ्वी जिंतिली । स्वधर्मेकरोनि प्रतिपाळिली ।
परी आपणासि संतति पाहिजे झाली । यदर्थीं विचार करितसे ॥४४॥
स्वधर्मकर्मेकरीं जाण । पुत्राचें करिता झाला जनन ।
तंव एकशत पुत्र झाले निर्माण । धर्मपरायण तेजस्वी ॥४५॥
सर्वांहूनि धाकटा पुत्र । दंडकनामें अति विख्यात ।
मूढ झाला अपंडित । अनर्थ अद्भुत करिता झाला ॥४६॥
दुर्बुद्धि पुत्र देखोन । इक्ष्वाकुनें शाप दिधला दारुण ।
दंडक झाला अति उद्विग्न । सांडोनि उद्धटपण शांतीतें पावला ॥४७॥
करी पित्याचे सेवेसी । संतोष मानसीं अहर्निशी ।
तव पिता संतोषोनि एके दिवसीं । काय करिता पैं झाला ॥४८॥
विंध्यादिशैलाभीतरीं जाण । इक्ष्वाकूनें दंडका राज्य देऊन ।
येरें शुक्राचार्य गुरु करोन । राज्यभार चालविला ॥४९॥
तया पर्वताचे पाठारीं । दंडकें वसविली मधुमंतपुरी ।
त्रियेचे रचने त्रिभुवनामाझारीं । उपमेसी नाहीं आणिक ॥५०॥
तया नगरीचे ठायीं । वास करिता झाला पाहीं ।
पुढील कथेची नवायी । सावध होवोनि अवधारिजे ॥५१॥
दंडकाची कथा :
कोणे एके काळीं दंडक जाण । पारधी निघाला मृग लक्षोन ।
तंव भार्गवकन्या देखिली जाण । वनविहरण करीतसे ॥५२॥
ती लावण्याची पुतळी । कीं स्वर्गीची देवांगना सजली ।
उपमेलागी भूमंडळीं । दुसरी नाहीं तिजसारिखी ॥५३॥
ऐसी सुंदर सुकुमार । अनंतगुणगंभीर ।
हंसगती चालता चरणीं भ्रमर । परिवेष्टित भोवतीं ॥५४॥
ऐसें तें दैत्यगुरुचें कन्यारत्न । देखोनि दंडका चेतला मदन ।
म्हणॆ तीस तूं कोणाची कोण । काय कारणें वनीं हिंडसी ॥५५॥
माझा मदनें जातो प्राण । अवां माझें करी वरण ।
येरी म्हणे राया मी पितयाअधीन । स्वतंत्रपण मज नाहीं ॥५६॥
या वनीचे प्रदेशीं राया । माझा पिता शुक्राचार्य ।
अनुष्ठान करितो त्याची तनया । अरजा ऐसें नाम माझें ॥५७॥
तो माझा पिता गुरु जाण । तूं तया मागें कन्यादान ।
न मागतां करिसी माझें ग्रहण । तें अनर्थ दारुण भोगिसी ॥५८॥
ऐकोनि तियेचें वचन । मंदबुद्धि दंडक जाण ।
बळें देवोनि आलिंगन । संभोगून सोडिली ॥५९॥
संभोगून तियेसी । दंडक आला निजनगरीसी ।
येरी मागें उसकाबुसकी । रुदन वनवासीं करिती झाली ॥६०॥
तंव झाला माध्यान्हकाळ । शुक्रे शिष्यांचा घेवोनि मेळ ।
क्षुधार्थीं होवोनि वनफळें प्रबळ । भक्षावया येता झाला ॥६१॥
मार्गी रुदन करितां कन्येसी । देखता झाला देवऋषी ।
म्हणे तूं कोणें गांजिलीसी । कां शोक करिसी सांग मज ॥६२॥
येरीनें सांगतां वृत्तांत । शुक्रे ऐकोनि क्रोधें उचंबळत ।
म्हणे दृष्टात्म्याने करोनि अकृत । निजकन्येसी गांजिलें ॥६३॥
दंडकाला शुक्राचार्यांचा शाप :
शुक्र शाप ते काळीं दारुण । देता झाला दंडका जाण ।
सप्त दिवसां सहराज्य आपण । निजसैन्येंसीं भस्मेल ॥६४॥
हें जें दंडकारण्य । धुई दाटोन होईल दहन ।
पर्जन्य येथे न पडे जाण । बहुकाळ अवर्षणें जन पीडती ॥६५॥
ये वनीं कोणीं न करावी वस्ती । जाणोनि रहावें देशींच्या प्रांतीं ।
ऐसें ऐकोनि जनीं समस्तीं । त्या स्थळाचा त्याग केला ॥६६॥
कवीनें संबोखोनि कन्येसी । दंडकारण्यी स्थापून तिसी ।
देता झाला वरदानासी । आत्मजेसी ते काळीं ॥६७॥
अवो आत्मजे ये वनाभीतरीं । तुझ्या आश्रमा शाप व बाधा निर्धारीं ।
तू येथें राहें आनंदें निर्भरी । वनफळें सेवोनियां ॥६८॥
शुक्रे वनीं स्थापोन कन्यारत्न । आपण निजाश्रमा करी गमन ।
ऐसें अगस्तिमुखीं श्रीरामें ऐकोन । तंव सायंकाळ प्रवर्तला ॥६९॥
श्रीरामासहित अगस्तिमुनी । प्रवर्तले संध्यावंदनीं ।
निजकर्मे करितां रजनी । तिये काळीं पैं झाली ॥७०॥
एका जनार्दना शरण । श्रीरामें करोनि संध्यावंदन ।
मग करिते झाले भोजन । ते कथा पावन अवधारा ॥७१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
अगस्तिश्रीरामसंवादो नाम द्विषष्टितमोऽध्यायः ॥६२॥ ओंव्या ॥७१।।