Ramayan - Chapter 7- Part 54 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 54

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 54

अध्याय 54

नृगराजाचे शापसमयीचे वर्तन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ऐसा पवित्र आणि परिकर । रामायणी कथा सार ।
एकैक श्रवणीं पडतां उत्तर । भवदोषां वेगळें होईजे ॥१॥
ऐसें श्रीरामाचें चरित्र । धन्य गाती तयांचें वक्त्र ।
धन्य ऐकोनि घेती त्यांचे श्रोत्र । परम पवित्र ते नर ॥२॥
श्रीराममुखींची ऐकोनि कथा । बोलता झाला जाहला शक्रारिहंता ।
पुढें नृगरायाची समूळ कथा । ते मजप्रति सांगिजे ॥३॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणा । पुढें नृगरायाचे आख्याना ।
मी सांगतों सावधान । श्रवणीं अवधारिजे ॥४॥
येरीकडे नृगराजभूपती । जाणोनि ब्राह्मणाची शापोक्ती ।
थोर दुःखी झाला चित्तीं । ब्राह्मणाप्रती न चले कांहीं ॥५॥
मंत्री पुरोहित नगरजन । थोर थोर बोलवोनि ब्राह्मण ।
शिल्पकार गृहकर्ते जाण । तेथें तेही बोलाविले ॥६॥
तयांप्रति नृगभूपती । सांगता झाला विप्रशापोक्ती ।
यासी कांही उपाव न चलती । ऐसें निश्चितीं मज कळलें ॥७॥
कोणे एके काळीं नारद पर्वत । मम दर्शना आले होते येथ ।
तिहीं भय दाखविलें अद्भुत । अधःपात होईल म्हणोनी ॥८॥
नारद पर्वत दोघे जण । मिथ्या नव्हे त्यांचे वचन ।
पुनरपि अदृश्य होऊन । त्रैलोक्यीं गमन तिहीं केलें ॥९॥

नृगराजाने सरड्याच्या रुपाने राहण्यासाठी तीन बिळे तयार करवून घेतली :

तरी आतां शीघ्रकाळें । शिल्पकारांहातीं विवरें प्रबळें ।
तीन करावीं शीत उष्ण जळें । पीडा नव्हे जयामध्यें ॥१०॥
शीतकाळीं शीत न वाटे । उष्णकाळीं सीतळ गोमटें ।
पर्जन्यमाजि जळथेंबुटे । जयामाजि न पडती ॥११॥
ऐसीं विवरें तीं प्रकारची । करावीं शीघ्र तत्काळची ।
सुंदर शोभा बहुत उंची । रत्नवैडुर्यपाचसंयुक्त ॥१२॥
तयांभोवतें उद्यान । नाना पुष्पांचे परिमळें भरें गगन ।
नाना प्रकारचे वृक्ष गहन । तयां भोवतें लावावे ॥१३॥
जंवपर्यंत शापमोचन । तंवपर्यंत सरड होवोन ।
तया वनीं क्रीडा करीन । सावकाश आनंदें ॥१४॥

राजाने पुत्राला राज्य देऊन धर्मोपदेश केला :

तदनंतर वसुपुत्र । अत्यंत धार्मिक पवित्र ।
तया बोलावोनि मस्तकीं छत्र । धरोनि राज्य तया दिधलें ॥१५॥
अगा ये वसु परियेसीं । प्रजा पाळीं स्वधर्मेंसीं ।
नाहीं तरी गति माझिया ऐसी । पावसील तत्काळ ॥१६॥
प्रत्यक्षासि प्रमाण । मज घडले शापबंधन ।
तरी तुवां सावध होवोन । सावचित्त असावें ॥१७॥
मज शाप झाला म्हणोन । खेद न करावा आपण ।
धर्मनीतीचें संरक्षण । सावधान करावें ॥१८॥
माझे विषयींची चिंता । काही न करावी तुवां पुत्रा ।
सुखदुःखलाभ अलाभता । काळाधीन पैं असे ॥१९॥
माझा काळ समीप आला । शीघ्र तुम्ही येथोनि चला ।
ऐसें म्हणोनि प्रवेशला । गुरुद्वारीं तत्काळ ॥२०॥
ऐसें नृगरायाचें कथन । जयासि होय भक्तीनें श्रवण ।
तो महापातक दारुण । तयापासून मुक्त होय ॥२१॥
एका जनार्दना शरण । झालें नृगरायाचें आख्यान ।
पुढें निमीचें आख्यान । श्रीरघुनंदन सांगेल ॥२२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
नृगराजशापसमयो नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः ॥५४॥ ओंव्या ॥२२॥