अध्याय 50
लक्ष्मण-सुमंत-संवाद
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
येरीकडे कथासंबंधु । रावणारीचा कनिष्ठ बंधु ।
नामें लक्ष्मण प्रतापी प्रसिद्ध । राक्षसांचा कंदु छेदक ॥१॥
ऋषिआश्रमीं मैथिली । प्रवेशली दुःखित ते काळीं ।
तिचेनि शोकें आतुर्बळी । महा दुःख पावला ॥२॥
हीन दीन मुखकमळ । कोमाइलें जैसें कर्दळीफळ ।
सीतेचा देखोनि शोक सबळ । अति तळमळ करीतसे ॥३॥
सुमंताजवळ लक्ष्मणाने जानकीवियोगाचे दुःख सांगितले :
श्रीरामसारथ्या पाहें येथ । श्रीरामासी हे दुःख होईल प्रप्त ।
सीता पतिव्रता जाण निश्चित । वृथा ज्येष्ठें त्यागिली ॥४॥
श्रीराम येथें असता । तयासी सीतेचा शोक कळता ।
राघवावीण एवढ्या अनर्था । आजि म्यां दृष्टीं देखिलें ॥५॥
सुमंता प्रारब्धाचा महिमा । यासी अन्यथा करुं न शके ब्रह्मा ।
जे सीतेकारणें श्रीरामा । केवढा सायास प्राप्त झाला ॥६॥
मेळवोनि लतामृगांचे भार । शिळीं बांधोनि सागर ।
रणीं दैत्य राक्षस घोर । क्रोधेंकरोन निवटले ॥७॥
याहीपूर्वी रामें रणकर्कशें । पितयाचे वचनीं चवदा वर्षे ।
वनीं क्रमिलीं सीतेसरसें । थोर क्लेश पावला ॥८॥
वधोनि समस्त राक्षस । जानकीसहित पावला यश ।
तैं सकळां सुरवरां हर्ष । लंकाप्रातीं पैं झाला ॥९॥
सीतेचें तेथें दिव्य झालें । पतिव्रता सर्वांसी जाणविलें ।
जानकीतें दिधलें । देवीं श्रीरामाचे पैं हाती ॥१०॥
ते धरणिजेसहित रघुनंदन । प्रवेशला अयोध्याभवन ।
नगरींच्या लोकां हर्ष गहन । श्रीराम आला म्हणोनी ॥११॥
नगरासी येतां श्रीरघुनाथा । सवेंचि केली पट्टाभिषेकता ।
जानकी सहित भुवननाथा । राज्य सुखें करिता झाला ॥१२॥
सवेंचि पुरवासी जनीं । अपवाद ठेविला रघुनंदनीं ।
म्हणती राखसें हरिली पत्नी । ते गृहीं केवीं घातली ॥१३॥
सुमंताकडून लक्ष्मणाचे सांत्वन :
लक्ष्मणाचें ऐकोनि वचन । सुमंत सारथि बोले आपण ।
म्हणे लक्ष्मणा हें काय कारण । शोकातें बहुत करितोसी ॥१४॥
शोक सांडोनि राहें स्वस्थ । श्रीरामाचें अकळ चरित्र ।
लीलाविग्रही धरणिजाकांत । संदेह येथ न धरावा ॥१५॥
पूर्वी दुर्वास मुनिश्रेष्ठ । तापसांमाजि तपोनिष्ठ ।
तो अयोध्ये येवोनि दशरथानिकट । कथा एक वंदू पाहे ॥१५॥
राजा आणि वसिष्ठ मुनी । मीही होतो तये स्थानीं ।
कथा वदला जो मुनी । ते रायें गुप्त करविली ॥१७॥
याकारणें लक्ष्मणा । ते मज सांगतां न ये जाणा ।
जरी ऐकावी वाटतसे मना । तरी तुजप्रति सांगेन ॥१८॥
हे प्रकट न करावी मात । तरी पुसेल शत्रुघ्न भरत ।
तयांसी न सांगावी निश्चित । जिव्हारी दृढ धरावी ॥१९॥
हें गुह्य अवतारचरित्र । प्रकट न करावें लौकिकांत ।
जें मी सांगेन तें हृदयांत । सावधान धरावें ॥२०॥
पुढिलें प्रसंगीं दुर्वासऋषी । संवाद करील दशरथासीं ।
ते मी सांगेन तुजपासीं । सविस्तरें अवधारीं ॥२१॥
एका जनार्दना शरण । पुढें दुर्वास रायाचें संवादकथन ।
सर्वांचे सार जाण । रामकथाचरित्र ॥२२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
सुमंतसारथिसंवादो नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥ ओंव्या ॥२२॥