Ramayan - Chapter 7- Part 43 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 43

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 43

अध्याय 43

श्रीराम-भद्र-संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

तत्रौपविष्टं राजानमुपासंते विचक्षणाः ।
कथयतः कथा नानाहास्यकाराः समंततः ॥१॥
विजयो मधुमंतश्च कश्यपो मंगलाकुलः ।
पुराजित्कालियो भद्रो दंतवक्त्रः सिमागधः ॥२॥
एते कथा बहुविधाः परिहाससन्विताः ॥३॥

भद्रासनीं चापशरपाणी । तेथें बैसलें संत चतुर ज्ञानी ।
पंडित ऋषी महामुनी । श्रीरामातें उपासिती ॥१॥
नानापरींच्या कथा पुराणें । धर्मचर्चा हरिकीर्तनें ।
विनोद हास्य गीत गायनें । सकळ मिळोन तेथें करिती ॥२॥
कोण कोण ते सभेप्रती । श्रीरामसन्निध तेथें असती ।
तयांची नामें संकळितीं । यथानिगुतीं सांगेन ॥३॥
विजयो दुसरा मधुमंत । कश्यप मंगळ चौथा तेथ ।
पुराजित् काळियो दंतवक्त्र । भद्र जाण आठवा ॥४॥
नवमाचें सुमागध नाम । हे नवविध सभानायक परम ।
यांचा विश्वास मानी श्रीराम । अति चतुर म्हणोनि ॥५॥
हे इतुके श्रीरघुपति । आपुलेनि प्रताप सांगती ।
नानापरींचें विनोद करिती । धरणिजापतिसुखार्थ ॥६॥
ऐसें ऐकोनि तयांचें गीतगायन । विनोद उपहास नृत्य जाण ।
तयांप्रती बोले श्रीरघुनंदन । सावधान अवधारा ॥७॥

रामांनी लोकांचे मताविषयी भद्राला प्रश्न केला :

तयांमध्ये भद्र श्रेष्ठ । विवेकी ज्ञाता आत्मनिष्ठ ।
तयाप्रति रावणारी प्रतापतेजिष्ठ । बोलता झाला ते समयीं ॥८॥
अगा भ्द्रा विचक्षणा । सभेंत योग्य अति शहाणा ।
युक्तिप्रयुक्तीं तूं विचक्षणा । तुझ्या गुणां तुळणा नाहीं ॥९॥
पुरवासी देशवासी जन । वसताती आपुले घरीं जाण ।
काय वदती श्रीरघुनंदन । नवा राजा अयोध्येचा ॥१० ॥
कीं आणिकही निंदा करिती । कीं भरता बोल ठेविती ।
कीं शत्रुघ्न सौमित्र याची स्थिती । निंदा करिती देखोनी ॥११॥
कैकेयीमाता वनवासासीं । आम्हां धाडिलें दंडकारण्यासीं ।
किंवा बोलती सीतेसी । रावणें हरिलें म्हणोनी ॥१२॥
नगरवासियांचें वर्तमान । भद्रा ऐकिलें असेल जाण ।
तें मजप्रति निवेदन । ये काळीं करावें तुवां ॥१३॥
श्रीरामाचें मुखपद्में जाण । ऐसें भद्रें ऐकोन ।
पुढती श्रीरामासी मधुर वचन । बोलता झाला ते समयीं ॥१४॥

रामराज्याविषयी नागरिक प्रसन्न असल्याचे त्याने रामांना सांगितले :

म्हणे भास्करवंशभूषणा नरचूडामणी । लोक पुरीं पाटणीं गृहीं वनीं ।
मार्गी चालतां वचनीं । स्तवन करिती पैं तुझें ॥१५॥
श्रीराम धर्मिष्ठ राजा । आणि पतिव्रता जनकात्मजा ।
लक्ष्मणे वनवासीं अग्रजा । बहुत सुख दिधलें पैं ॥१६॥
वधिले रावणकुंभकर्ण । सेना सैन्यपुत्र प्रधान ।
राज्यीं स्थापोनि बिभीषण । बंधुसीतेसीं येथें आला ॥१७॥
अयोध्येसीं धर्मनीती । नवा राजा होवोनि रघुपती ।
प्रजापाळक परम प्रीतीं । विजयी व्हावा श्रीराम ॥१८॥

तरीही खरे असेल ते स्पष्ट सांगण्याचा रामांचा त्याला आग्रह :

ऐसें भद्रें बोलिल्यावरही । पुनरपि श्रीराम प्रश्न करी ।
भद्रा बरवें वाईट या दोहींभीतरी । जन सूत्रीं बांधले ॥१९॥
सुख दुःख पुण्य पाप । ऐसें जनाचे संकल्प ।
सत्य असत्य हा खटाटोप । मी माझें देख सकळांसी ॥२०॥
मी श्रेष्ठ कुलवंत । येर ते अवघे अकुळवंत ।
मी ज्ञाता महापंडित । येर अज्ञान अपंडित जाणावे ॥२१॥
ऐसें त्रिगुणांचेनि पाशें । सकळहि जग बांधिलें असे ।
त्या अशुभ शुभ वार्ता पैं असे । गुणानुरुपें निघताती ॥२२॥
भद्रा नगरवासी जन । जे वदत असती तें आपण ।
यथानिगुतीं करीं निवेदन । शंका झणीं धरसील ॥२३॥
आपणासि शुभ कर्तव्यता । हें भद्रा जाण तत्वता ।
अशुभ त्यागोनि उत्तमार्था । म्यां श्रीरघुनाथा आचरावें ॥२४॥
ऐसी सीतापति बोलोनि सरे । तदनंतरें भद्रें वीरें ।
नगरीचा वृत्तांत सत्वरें । श्रीरामासी सांगितला ॥२५॥

भद्राने सीतेच्या चारित्र्याविषयी लोक साशंक असल्याचे सांगितले :

अहो जी दयानिधि रावणारी । पुरीं पाटणीं नगरीं ।
हाटविदीं चौहाटीं घरोघरीं । ठायीं ठायीं बोलती ॥२६॥
रावणें सीता बळेंकरुन । हरोनि लंके नेली जाण ।
भोवतीं ठेविले राक्षसगण । अशोकवनाभीतरीं ॥२७॥
जानकी सौंदर्याची खाणी । अभिलाषें ठेविली अशोक वनीं ।
तेथें राक्षस घोरदर्शनी । तियेभोंवतीं ठेविले ॥२८॥
तुझी कीर्ति अद्भुत लाठी । वानर मेळविले कोट्यानुकोटी ।
शिळीं सेतु बांधोनि समुद्रतटीं । लंका नेटीं उतरलासी ॥२९॥
वधिले रावणकुंभकर्ण । राज्यीं स्थापिला बिभीषण ।
सीता सोडवोनि अयोध्ये गमन । प्रतापें पूर्ण तुम्हीं केलें ॥३०॥
ऐशा तुमच्या कीर्तीसी । रावणें कळंक लाविला हरुन सीतेसी ।
तिसी न पुसतां गृहीं कैसी । एकाएकीं घातली ॥३१॥
न करिती पृच्छा शोधन । जानकीस गृहीं घालोन ।
कैसा वर्ततो रघुनंदन । लोकलाज सोडोनी ॥३२॥
आमच्या स्त्रिया ऐसें करिती । उचकणें सीतेचें आम्हां देती ।
याकारणें लोक ऐसें बोलती । श्रीरघुपति सत्य जाण ॥३३॥
राक्षसां वश झाली सीता । नाना भोग भोगी जनकदुहिता ।
तिये न पुसतां श्रीरघुनाथा । घरामध्यें घातली ॥३४॥
जें आचरली सीता सती । तैसेंच आमच्या स्त्रिया वर्तती ।
तुझ्या आधारें आम्हां न मानिती । ऐसी वदंती जनाची ॥३५॥
राजा प्रवर्ते अधर्मासी । तेथें नीति कोणीं कोणासी ।
शिकवावी रघुपति कायसी । या स्थितीसी देखोन ॥३६॥
यापरी बहुविध जन । नगरीं करिती विवंचन ।
हें सत्य श्रीरामा जाण । नाहीं अनुमान यदर्थी ॥३७॥
ऐकोनि भद्राचें वचन । परमार्थबुद्धि श्रीरघुनंदन ।
सर्वां सुहृदाप्रति बोले जाण । हे कथा सत्यत्वें मानते तुम्हां ॥३८॥

सभेतील इतरांचे भद्राला अनुमोदन :

सभाजन म्हणती श्रीरघुनाथा । भद्र वदला जे कां कथा ।
ते सत्य स्वामी या अर्था । आम्हीं ऐसेंच ऐकिलें ॥३९॥
सर्वही प्रणिपात करुन । श्रीरामप्रति बोलती जाण ।
म्हणती राजेंद्रा असत्यपण । भद्रवचना पैं नाहीं ॥४०॥
ऐसी सर्वांची वचनावळी । ऐकोनि कृपाळु ते काळीं ।
सभा विसर्जून हृदयकमळीं । रावणारि विचार करितसे ॥४१॥
पुढिलें प्रसंगीं सौमित्ररघुपती । संवाद एकांतीं बैसोनि करिती ।
एका जनार्दनी विनंती । सावध श्रोतीं परिसावें ॥४२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामभद्रसंवादो नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥४३॥
ओंव्या ॥४२॥ श्लोक ॥३॥ एवं ॥४५॥