Ramayan - Chapter 7- Part 11 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 11

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 11

अध्याय 11

रावणाला लंकेची प्राप्ती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सुमाळी व इतर प्रमुख राक्षसची रावणाला प्रार्थना :

पूर्वप्रसंगीं श्रीरघुपती । रावणासी झाली वरदोक्ती ।
तें जाणोनि सुमाळी निश्चितीं । अभय चित्तीं समाधान ॥१॥
उठोनि समस्त रजनीचर । मारीच प्रहस्त विरुपाक्ष महोदर ।
आणिक प्रधान थोर थोर । येते झाले समस्तही ॥२॥
सुमाळी समस्त राक्षसेंसीं । येता झाला रावणापसीं ।
काय बोलिला तयासी । सावधानेंसीं अवधारा ॥३॥
अगा दशग्रीवा महावीरा । तपोबळेंकरुनि चतुरा ।
पावलासी प्रकारा । परमोदरा रावणा ॥४॥
तूं त्रिभुवनीं श्रेष्ठ राक्षस । पावलासी उत्तम वरास ।
विष्णुभय पावलों त्रास । लंका त्यजूनि रसातळा देलों ॥५॥
महाबहो तेह्तें गेलों । तेथें असतां विष्णुभय पावलों ।
थोर संग्रामीं भग्न झालों । सांडवलों आश्रमापासूनी ॥६॥
सहृद सोयरे समवेत । प्रवेशलों रसातळांत ।
तुज झालें वरद प्राप्त । म्हणोनि आम्ही धांवत येथें आलों ॥७॥
आम्हांसी वसावया जाण । धनेशें दिधलें लंकाभवन ।
कुबेर तुझा ज्येष्ठ बंधु त्यानें । लंकपुरी वसविली ॥८॥
आतां याहीउपरी । वैरियें नेलें तें झडकरी ।
येईल जाण निर्धारी । सामें दामें भेदें युद्धें ॥९॥
परावे जें हरियेलें । तें पावों संग्रामबळें ।
अथवा करोनि नाछळें । वैरी नेलें तें आणवूं ॥१०॥
ऐक रावणा याहीवरी । तूं लंकेचे राज्य करीं ।
तूं लंकेश्वर निर्धारीं । काया वाचा मानसें ॥११॥
सर्व राक्षसांच्या ईशा । होईं गा तूं महापुरुषा ।
सत्य मानोनि लंकेशा । लंकाराज्य तूं करीं ॥१२॥

रावणाचा नकार :

रावण म्हणे सुमाखीसी । धनेश ज्येष्ठ बंधु आम्हांसी ।
आपण तयावांचोनि राज्यासी । अंगीकारासी न करावें ॥१३॥
जाणोनि रावणाच्या वचनासी । सुमाळी राहिला तटस्थेंसीं ।
तदनंतरें श्रीरामा परियेसीं । सावधान होवोनियां ॥१४॥

देव- दैत्यांच्या वैराचा इतिहास प्रहस्त प्रधान रावणाला सांगतो :

कोणे एके काळीं रावण । राक्षसासमवेत जाण ।
बैसला असतां विराजमान । प्रहस्त प्रधान बोलता झाला ॥१५॥
महाबाहो परियेसीं कथेसी । देवदैत्य असुरांसी ।
वैर पूर्वींपासोनि तयांसी । गोत्रसंबंधासी राजेंद्रा ॥१६॥
तरी बंधु कैसे म्हणसी । येविशीं ऐक इतिहासासि ।
पूर्वी एक कश्यपऋषी । तेरा स्त्रिया त्यासी असती ॥१८॥

अदितिश्च दितिश्चैव भगिन्यौ सहिते उभे ।
भर्ये परमरुपिण्यौ कश्यपस्य प्रजापतेः ॥१॥
अदितिर्जनयामास देवास्त्रिभुवनेश्वर ।
दितिस्त्वजनयद्दैत्यान्कश्यपस्यात्मसम्भवान् ॥२॥
दैत्यानां किल धर्मज्ञ पुरीयं बत सार्णवा ।
सपर्वता महावीर तेऽभवन्प्रभविष्णवः॥३॥
निहत्य तांस्तु समरे विष्णूना प्रभविष्णुना ।
देवानां वशमानीतं त्रैलोक्यमिदमव्ययम् ॥४॥

लंकेचा इतिहास ऐकून रावण उद्विग्न :

अदिती दिती गोघी बहिणी । रूपें तरी चंद्राननी ।
तयांच्या स्वरूपा अप्सरा लाजोनी । स्वर्गांगना होत्या झाल्या ॥१९॥
कश्यपऋषितपेंकरीं । दक्षप्रजापतीच्या त्या कुमारी ।
तया घरीं सुंदरी । भर्तृदेवा करीत होत्या ॥१९॥
अदिती देवांसि जन्मविती । जे त्रिभुवनीं नांदती ।
दितिउदरीं दैत्य जन्मती । कश्यपसंतती उभयतां ॥२०॥
दैत्यांकारणें श्रीरामा । पर्वताग्री विश्वकर्मा ।
लंका निर्माण करवी व्योमा समान जीचें उच्चत्व ॥२१॥
भोंवता अंबुनिधिपरिघ पूर्ण । लंका सुवर्णाची तेजें गगन ।
लखलखीत दशदिशा जाण । पताका तोरणें सुवर्णाचीं ॥२२॥
ते राक्षसांची लंकापुरी । विष्णु समरांगणीं राक्षसमारीं ।
हरोनि तो दैत्यारी । देवां वश करिता झाला ॥२३॥
देवीं त्रैलोक्य वश केलें । राक्षसाते पराभविलें ।
म्हणोनि आम्हीं पाताळें । विष्णुभयें वसविलीं ॥२४॥
असो ऐसें पूर्वील कथन । देवां दैत्या वैर दारूण ।
देवीं विपरीत करोन । त्रैलोक्यीं वसते झाले ॥२५॥
ऐकोनि प्रहस्ताचें वचन । रावणें अंतर्दृष्टी लावोन ।
मुहूर्त एक चिंता करून । थोर उद्विग्न पैं झाला ॥२६॥
स्वस्थ न वाटे तयाचे चित्तीं । नावडे वैभव संपत्ती ।
मुखे कोमलीं मनोवृत्ती । चंचळ झाली तयाची ॥२७॥
समस्त राक्षस मिळोन । वनीं विचरतां रावण ।
लंकेप्रती पाठवावया गण । प्रहस्त प्रधान बोलाविला ॥२८॥

लंकाधीश कुबेराकडे लंकेची मागणी करण्यासाठी प्रहस्ताला रावणाने पाठविले :

अगा प्रहस्ता गुणानिधी । तूं बुद्धिवंत जैसा क्षीराब्धी ।
धैर्याचा मेरू त्रिशुद्धी । मज एक बुद्धी आठवली ॥२९॥
तुवां शीघ्र त्रिकूटाचळासीं । जावोनि तया कुबेरापाशीं ।
भेटावें माझिये वाक्येसीं । तयापासीं सांगावें ॥३०॥
माझे जे कां शब्दरत्न । तयासी करावें निवेदन ।
सामोपचारेंकरोन । वित्तेश आपण बोधावा ॥३१॥
म्हणावें हें लंकापुरी । तुवां वसविली राक्षस वसावया खरी ।
तुझिया प्रतापाची होरी । सुरासुरीं वर्णिजे ॥३२॥
तुवां हें लंकाभवन । मज द्यावें प्रीती करून ।
तूं ज्येष्ठ बंधु पितयासमान । माझें वचन मानावें ॥३३॥
मग तो प्रहस्त झडकरू । प्रवेशला जेथें वित्तेश राज्य करी ।
तें लंकाची वर्णूं थोरी । तरी अमरपुरीं तुकीं न ये ॥३४॥
ऐसिये लंकेप्रती जाण । धनेश राज्य करी सुखसंपन्न ।
प्रहस्त रावणप्रधान । येता झाला ते समयीं ॥३५॥

प्रहस्ताची कुबेराकडे लंकेची मागणी :

करोनि कुबेरासी नमस्कार । काय बोले प्रहस्त चतुर ।
स्वामी एक विनंती आदर । करोनि आयकिजे ॥३६॥
तुमचा कनिष्ठ बंधु रावण । त्यानें मज पाठविलें जाण ।
तुम्हांपासीं एक वचन । विज्ञापन करूं आलों ॥३७॥
शस्त्रधरांमध्ये परम श्रेष्ठा । परम उदारा परमनिष्ठा ।
दशग्रीवा एक उत्कंठा । म्हणोनि मजला पाठविलें ॥३८॥
धनेशा हे लंकापुरी । रम्य इजसमान नाहीं दुसरी ।
सुमाळिप्रमुख निशाचरीं । पूर्वी येथें परक्रमें बसविली ॥३९॥
हें लंकापुरीभवन । पूर्वीं राक्षसी भोगिलें जाण ।
हें नगर राक्षसांलागोन । द्यावें तुम्हीं वैश्रवणा ॥४०॥
तरी मी करितों विनंती । लंका देईं रावणाप्रती ।
तरी वाढेल यश कीर्ती । जे बंधुवचन मानितां ॥४१॥
ऐकोनि प्रहस्ताचें वचन । मग काय उत्तर देता झाला वैश्रवण ।
मज हे लंका विश्रवा पित्यानें । शून्य होती म्हणिन दिधली ॥४२॥
राक्षसीं त्यजिली लंका । विष्णुभयें गेले पाताळलोका ।
ते म्यां वसविली आयका । दानमानगुणेंकरोनी ॥४३॥

कुबेराने तत्काळ लंका रावणाला दिली :

आतां प्रहस्ता झडकरीं । तू जावोनि रावणा आज्ञा कतीं ।
जे हे लंका महानगरी । येथें राज्य करीं निष्कंटक ॥४४॥
तुज हे लंकाभवन । तितयानें दिधलें जाण ।
मज दिधलें वित्तरक्षण । तें आपण मी रक्षितों ॥४५॥
ऐसें बोलोनि वैश्रवण । पुष्पकारूढ होऊन ।
जेथें होता पिता विश्रवा जाण । तेथें आला कुबेर ॥४६॥

कुबेराचे आपल्या पित्याला वृत्तनिवेदन :

दोन्ही कर जोडोन । पित्यासि करी साष्टांग नमन ।
बोले मृदु मंजुळ वचन । सावधान ऐकें श्रीरामा ॥४७॥
अगा ये ताता परिसेयीं । रावणें लंका मागावयासी ।
पाठविलें प्रहस्त प्रधानासी । मजपासीं शिष्टाई ॥४८॥
म्यां ऐकोनि प्रहस्तवचन । रावणा दिधलें लंकाभवन ।
पूर्वी राक्षस होते म्हणोन । आतांही राक्षस वसतील ॥४९॥
मजकरणें स्वामिनाथा । अनुच्छिष्ट नगर देईं आतां ।
ऐकोनियां पुत्रकथा । काय झाला बोलता विश्रवा ॥५०॥

पित्याने कुबेराला कैलासपर्वतावर रहाण्यास सांगितले :

हात जोडोन पुत्राप्रती । विश्रवा करी विनंती ।
माझें वचन सावधवृत्ती । ऐकें बा रे कुबेरा ॥५१॥
मजसन्निध येऊन । दशग्रीव बोले छळवचन ।
मज अत्यंत निर्भर्त्सून । दुर्मति पुनः पुनः क्रोधें बोले ॥५२॥
तरी कुबेरा मी तुजप्रती । बोलतों स्वधर्माची युक्तीं ।
जेणें होय यश कीर्ती । स्वर्गी वानिती सुरसिद्ध ॥५३॥
वरप्रदानें करून । रावण नेणे मानापमान ।
त्याहीवरी शाप दारूण । मूढ प्रकृती झाली ॥५४॥

तस्माढच्छ महाबाहो कैलासधरणीधरम् ।
निवेशय निवेशार्थं त्यक्त्वा लंकां सहानुगाम् ॥५॥
तत्र मंदाकिनी रम्या नदीनामुत्तमा नदी ।
कांचनैः सूर्यसंकाशैः पंकजैः संवृतोदका ॥६॥
कुमुदैरुत्पलैश्चैव अनेकैश्च सुगंधिभिः ।
तत्र देवाः सगंधर्वाश्चाप्सरोरगकिन्नराः ॥७॥

विश्रवा म्हणे महाबाहो झडकरीं । कुबेरा जाई जेथें कैलासगिरी ।
धरणीतें धरिलें ज्याची थोरी । त्या पर्वतावरी जाईं वेगीं ॥५५॥
समस्त सुहृदांसहित । तुवां वसावें तेथ ।
लंका त्यजूनियां त्वरित । सुखें स्वस्थ रहावें पुत्रा ॥५६॥
कैलासगिरीचे पाठारीं । मंदाकिनीचे तीरीं ।
तुवां वसवावी नगरी । सपरिवारीं रहावें तेथें ॥५७॥

मंदाकिनी नदीचे माहात्म्य :

तरी तें मंदाकिनीचें वर्णन । करावें ऐसी मति नाहीं जाण ।
जिचें होतांचि स्मरण । पाप दारूण धाकें पळे ॥५८॥
जे मंदाकिनी देखती दृष्टीं । तयां नरांची पातकें गिरीकपाटीं ।
लंघिताही सकळ सृष्टी । बसावया ठाप पैं नाहीं ॥५९॥
धन्य मंदाकिनीचें जिवन । जे नर करिती स्नान आचमन ।
तयांचे पुण्याचे गणन । सर्वथा जाण न करवे ॥६०॥
मंदाकिनीस जे करिती स्नान । तयां कोण गति हें शास्त्रां मौन ।
न बोलवे वेदांसि जाण । तेथें आपण काय जाणों ॥६१॥
मंदाकिनी स्वर्गभूषण । मंदाकिनीसी विष्णुचरणीं जनन ।
मंदाकिनी महेशें जाण । मस्तकीं भूषण म्हणोन धरियेली ॥६२॥
तिये मंदाकिनीचे तीरीं । जो स्नान दान तर्पण करी ।
तयाजे पूर्वज अंबरीं । सुखरूप होवोनि राहती ॥६३॥
तें मंदाकिनी अति पावन । कांठीं सुवनकमळें विकासमान ।
सूर्यतेजासम जाण । कुमुदें उत्फुल्ल साजिरीं ॥६४॥
अनेक सुगंधीं पुष्पजाती । कोट्यनुकोटी नेणों किती ।
देव गंधर्व क्रीडा करिती । उरगकिन्नरादिकरोनी ॥६५॥
क्रीडा करिती संतत । राहोनि त्या तटाकांत ।
आनंदें निर्भर मनांत । आश्रयोनि तेथे असती ॥६६॥
आयकें कुबेरा अवधारीं । तुम्हीं जाणतां चराचरीं ।
राक्षस निष्ठुर भारी । लाधले उत्तम वरातें ॥६७॥
त्याहूनि कोण आहे श्रेष्ठ । जे तप करोनि उत्कृष्ट ।
तरी तूं जाणता धर्मिष्ठ । माझें वचन करावें ॥६८॥
ऐसें विश्रवा बोलतां । कुबेर चित्तीं उल्लासता ।
पितृवचन गौरवोनि माथां । काय करिता जाहला ॥६९॥

कुबेर सहकुटुंब कैलासाला गेला :

स्त्रीपुत्र आणि प्रधान । घेवोनि आपुलें निजसैन्य ।
निजवाहनीं आरूढोन । जाता झाला कैलासा ॥७०॥
शून्य झाली लंकापुरी । तीस योजनें लांब दूरी ।
मनुष्य नाहीं तियेभीतरीं । उद्वस दिसे श्रीरामा ॥७१॥
तदनंतरे जावोनि प्रहस्त । रावणाप्रति सांगे वृतांत ।
तुम्ही रावण राक्षसांसहित । राज्यधर्म करा लंकेमध्यें ॥७२॥
ऐसें ऐकोनि प्रहस्तवचन । बंधूसमवेत सेनाप्रधान ।
प्रवेशोन लंकाभवन । काय रावण करिता झाला ॥७३॥
जैसा स्वर्गी शचीपती । आरूढोनि विमानाप्रती ।
तैसा उंच लंकापती । वेंघोनि दिशा अवलोकी ॥७४॥

स चाभिषिक्तः क्षणदाचरैस्तदा निवेशयामास पुरीं दशाननः ।
निकामपूर्णां च बभूव सा पुरी । निशाचरैर्नीलबलाहकोपमैः ॥८॥

लंकेत रावणाला राज्याभिषेक :

तेव्हां ते समस्त राक्ष । राज्याभिषेक सावकाश ।
करुनि रावणा राज्याधीश । लंकाभवनीं स्थापिला ॥७५॥
मनःकामना पूर्ण झाली । लंकेसारखी नगरी आली ।
तेथें राक्षस महाबळी । नानावर्णींचे राहिले ॥७६॥
जैसें आकाशीं अभ्र घन । निबिड दाटे आच्छादे गगन ।
तैसे राक्षस नीळवर्ण । वसले लंकापुरीं ॥७७॥

कुबेराची अलकानगरी :

तदनंतरें श्रीरघुपती । धनेश पितृवाक्य उत्साहस्थितीं ।
वसते झाले अलकेप्रती । ते अलकेची स्थिती अवधारा ॥७८॥
चंद्रासारिखी शुभ्र निर्मळा । तैसी अलका शोभे गा भूपाळा ।
सुवर्ण अलंकार विचित्रमाळा । मुक्ताफळाचीं तोरणें ॥७९॥
जैसा इंद्र अमरावतीं । क्रीडता होय निर्भयचित्ती ।
तैसा कुबेर अलकेप्रती । सुखरूपस्थितीं राहिला ॥८०॥
एका जनार्दना शरणा । रावणा प्राप्त लंकाभवन ।
कुबेर अलकेप्रति जाण । सुखसंपन्न राहिला ॥८१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणलंकाप्राप्तिर्नाम एकादशोऽध्यायः ॥११॥
ओंव्या ॥८१॥ श्लोक ॥८॥ एवं ॥८९॥