अध्याय 3
विश्रव्याची कथा
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
विश्रव्याची तपःसाधना :
मग तो पुलस्त्यनंदन । विराम परम पावन ।
तेजें जैसा सहस्त्रकिरण । धर्मपरायण पवित्र ॥१॥
कर्माचरणीं अति प्रसन्न । चहूं वेदांचे अध्ययन ।
शास्त्रांविषयीं महाप्रवीण । भगवद्भजन अहर्निशीं ॥२॥
शांति दया सुशीळव्रत । गुरूसेवेसी रतचिता ।
परोपकारीं वेची जीवीत । पितृभक्त अतिशयें ॥३॥
सर्वभूतीं समता देखे । साधुजनां आत्मवें ओळखे ।
पराचा गुण दोष न देखे । ऐसा सुखें तो असे ॥४॥
अष्टांगयोग साधूनी । प्राणापान जिणोनीं ।
मुद्रा खेच्री अगोचरी तिन्ही । लघूनी ब्रह्मस्थानीं पावला ॥५॥
ऐसा योगनिष्ठ तपोनिष्ठ धर्मनिष्ठ ऋषी । आचरे आश्रमविहित कर्मासी ।
नुल्लंघी मातृपितृवचनासी । द्वेष तयासीं असेना ॥६॥
त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भरद्वाजाने आपली कन्या त्याला दिली :
जाणोनि तयाचें तप श्रेष्ठ । भरद्वाज आला तपोनिष्ठ ।
बोलता झाला येवोनि निकट । म्हणे अति संतुष्ट मी झालों ॥७॥
माझें देववर्णनीय कन्यारत्न । तें मी तुज देतों दान ।
बरवा पाहूनि सुदिन । कन्यादान तेणें केलें ॥८ ॥
गृहाश्रमीं स्वधर्मीं रक्षण । स्त्रियेवांचून नव्हे जाण ।
अग्निहोत्र यज्ञाचरण । स्त्रियेवाचूंन चालेना ॥९॥
अतीतभिजन पंचमहायज्ञ । देवतार्चन पितृतर्पण ।
कामरक्षण पुत्रसंतान । स्त्रियेवाचूंन तें नव्हें ॥१०॥
पतिवचनीं निजरत । तेचि पतिव्रता निश्चित ।
पतिवचनीं जे उदासभूत । ते जाण निश्चित समवेश्यां ॥११॥
ज्या स्त्रिया पति वंचिती । ज्या पतीतें निखंदिती ।
ज्या पतीतें द्वेषिती । त्या निश्चितीं समवेश्या ॥१२॥
असो तो विश्रवा ऋषी । संतोषला स्त्रीगुणांसी ।
वदता झाला तियेसी । अतिप्रेमेंसीं सत्वर ॥१३॥
म्हणे अवो प्रिये कांते । तुज पुत्र देईन निश्चितें ।
जयाची कीर्ति त्त्रिभुवनातें । विस्तारातें पाववी ॥१४॥
मग ते भरद्वाजनंदिनी । भ्रतार वचनें संतोषोनी ।
सवेंचि ऋतुस्नान होऊनी । गर्भे गर्भिणी ते झाली ॥१५॥
पुत्रप्राप्ती :
यथाकाळें झाली प्रसूती । महातेजें झाली तेजोदीप्ती ।
ऋषि येवोनि पुत्रमुखाप्रती । आनंदस्थितीं न्याहाळित ॥१६॥
कर्म करोनि विधिपूर्वकेंसीं । नाम ठेविलें वैश्रवण त्यासी ।
दिवसें मासें अति त्वरेसीं । पुत्र वृद्धीसी पावला ॥१७॥
विश्रव्यापासून वैश्रवण । तयासीच म्हणती कुबेर जाण ।
झाला पितयासमान । देदीप्यमान तेजस्वी ॥१८॥
शांत दांत उदार पूर्ण । शीळसंपन्न उत्तम गुण ।
चतुरानन सहितगण । स्वानंदे पूर्ण तेथें आला ॥१९॥
त्या तेजस्वी वैश्रवणाच्या उग्र तपश्चर्येने प्रसन्न
होऊन ब्रह्मदेवाने त्याला लोकपाळ कुबेर केले :
अवलोकोनि बाळकासी । स्रष्टा आनंदें मानसीं ।
धनद कुबेर नाम त्यासी । स्व इच्छेसीं ठेविलें ॥२०॥
हुताशन आहुतिबळें वाढे । वैश्रवण तेणेंचि पाडें ।
मातापित्यांच्या सुरवाडें । वाडेंकोडें वाढिन्नला ॥२१॥
पित्याचे वृत्तीसी अवलंबून । करिता झाला अनुष्ठान ।
शतसहस्त्र वर्षे जाण । जलपान करून तो असे ॥२२॥
शतसहस्त्र वर्षेवरी । निराहारी तप करी ।
त्याचिया तपाची थोरी । चराचरीं अनुपम्य पैं श्रेष्ठ ॥२४॥
तप करोनि तापस । शांतीचा नाहीं लवलेश ।
वृथा दंडमुंडणवेष । परान्नास सोकले ॥२५॥
परान्नी ठेवोनियां चित्त । वैराग्य दाविती मिथ्याभूत ।
बीह्य शांत संतरी तप्त । ते जाण निश्चित असाधु ॥२६॥
तैसा नव्हे वैश्रवण ऋषी । तपचि धन थोर जयासी ।
इंद्र आला सुरगणेंसीं । चतुराननेंसीं त्यापासीं ॥२७॥
म्हणती तुझें तप देखोन । संतोषले देवगण ।
वर मागसी तो आपण । मी ब्रह्मा जाण पैं देतों ॥२८॥
मग बोले वैश्रवण । मज जरी झालेति प्रसन्न ।
तरी लोकपाळत्व मागतो आपण । कृपा करोन मज दीजे ॥२९॥
तदनंतर चतुरानन । बोले मधुरवचन ।
माझ्या मनीं होतें जाण । तें त्वां पूर्ण मागितलें ॥३०॥
तरी यम इंद्र वरूण । कुबेर तूं चौथा जाण ।
निश्चियेंसीं दिक्याळपण । तिज संपूर्ण दिधलें ॥३१॥
ब्रह्मदेवाने क्रीडेसाठी त्याला पुष्पक विमान दिले :
क्रीडार्थ विमान पुष्पक । देता झाला सत्यलोकनायक ।
ज्या विमानाची प्रभा सम अर्क । त्रिभुवनीं देख असेना ॥३२॥
ऐसें देवोनि वरासी । ब्रह्मा इंद्र सुरगणेंसीं ।
जावोनियां निजलोकासी । आनंदेंसी क्रीडती ॥३३॥
मग तो धनेश आपण । ब्रह्मयाप्रति करी विनवण ।
मज वसावया पाहिजे भवन । कोणाचें हिरोन न द्यावें ॥।३४॥
परासी न द्यावें दुःख । परपीडेपरीस नाहीं पातक ।
यालगीं साधु सज्ञान लोक । प्राणांतीं दुःख न देती ॥३५॥
वैश्रवणाच्या मागणीप्रमाणे ब्रह्मदेवाने त्याल मयासुरनिर्मित लंका दिली :
याकारणें स्वामिनाथा । कृपाळुवा कृपावंता ।
मज भोगार्थ नगर तत्वतां । आपण आतां पैं द्यावे ॥३६॥
ऐकोनि पुत्राचें वचन । संतोषोनि बोले चतुरानन ।
म्हणे मयासुरें केले निर्माण । लंकाभवन अति रम्य ॥३७॥
तेथें राक्षस होते निवासी । ते विष्णुभये त्यजून पुरीसी ।
गेले असती पाताळासी । नगररक्षणासी कोणी नाहीं ॥३८॥
ते स्थळीं जावोनि आपण । करावें त्रिकुटाचें रक्षण ।
जे लंकेसीं परिघ जाण । समुद्र पैं असे ॥३९॥
ऐसिये लंकेप्रति । विचरावें स्वानंदस्थितीं ।
मग तो कुबेर शीघ्रगतीं । त्रिकूटीं वस्ती करिता झाला ॥४० ॥
जरी लंकेसी देऊं आणिक उपमा । अमरावति न शके सीमा ।
जिणें ठेंगणें केलें व्योमा । उंचपणें महिमा न नर्णवे ॥४१॥
तें लंकेसीं नांदे वैश्रवण । विमानीं बैसोनि आपण ।
गंधर्व करिती गायन । अप्सरा वर्तन करिताती ॥४२॥
बंदिजन कीर्ति वर्णती । सेवकजन वेत्र घेउनि हातीं ।
कळिकाळाच्या माथां टोले देती । दुर्धर शक्तीं आगळी ॥४३॥
ऐसा तो वैश्रवण । पुष्पकविमानीं बैसोन ।
मातृपितृदर्शनालगून । नित्य लंकेहून येतसे ॥४४॥
रसाळ कथा रामायण । वाल्मीकमुखींचें निरूपण ।
श्रोतीं देवोनि अवधान । कथानुसंधान परिसावें ॥४५॥
एका जनार्दना शरण । झालें वैश्रवणाख्यान ।
पुढें गोड असे कथन । कॄपा करून पहावें ॥४६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वैश्रवणाख्यानं नाम तृतियोऽध्यायः ॥३॥ ओंव्या ॥४६॥