अध्याय 78
हनुमंत नंदिग्रामास गेला –
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
भरद्वाज ऋषींनी श्रीरामांचे विमान पाहिले :
विमानीं बैसोनी रघुनाथा । अति त्वरान्वित जातां ।
तळी भरद्वाज अवचितां । आश्रमीं असतां देखिला ॥ १ ॥
आश्रमी असतां भरद्वाज ऋषी । आश्चर्य देखिलें आकाशीं ।
हेमच्छाया दशदिशीं । चौपासीं पसरली ॥ २ ॥
रविचंद्रांतें लाजवीत । प्रकाश शीतोष्णातीत ।
गगनीं काय असे जात । ऋषि मनांत विचारी ॥ ३ ॥
निर्धारोनि पाहे नयनीं । तंव परिवारला वानरगणीं ।
श्रीराम देखिला विमानीं । जनकनंदिनी अंकावरी ॥ ४ ॥
सौमित्रासहित राम होये । सवें वानर कैचे हो हे ।
राक्षसगणही दिसती पाहें । श्रीराम होये सर्वथा ॥ ५ ॥
माझ्या श्रीगुरूच्या अनागता । श्रीराम न करी अन्यथा ।
निवटूनियां लंकानाथा । शरणागता स्थापिलें ॥ ६ ॥
होय तो शरणागत पूर्ण । राक्षसांमाजी बिभीषण ।
हनुम्यासहित सुग्रीव जाण । वानरगणसमवेत ॥ ७ ॥
ऐसें श्रीरामाचें निजविमान । निजगुरूच्या भाष्यावरून ।
परीक्षा करोनियां पूर्ण । गुणाकार पूर्ण पाहिला ॥ ८ ॥
पूर्णे चतुर्दशे वर्षे पंचम्यां भरतायज: ।
भरद्वाजाश्रमं प्राप्य ववंदे जयतो मुनिम् ॥ १ ॥
गोत्रं नाम समुच्चार्य राघव: सहलक्ष्मणः ।
प्रणतं राघवं दृष्ट्वा सानुजं पुनरब्रवीत् ॥ २ ॥
विमानातून जाणार्या रामांना स्वतःची
ओळख देऊन भरद्वाजांनी आश्रमात बोलाविले :
माघ शुद्ध पंचमीपासून । वर्ताळा करितां लेखन ।
तंव चौदा वर्षें जाहलीं पूर्ण । व्रत संपूर्ण पै झालें ॥ ९ ॥
ऐसा निश्चय मानोनी मनीं । रामसौमित्र लक्षूनी ।
लोटांगण घालूनी । अति प्रीतीकरोनी विनवीत ॥ १० ॥
भरद्वाजगोत्रोत्पन्न । भारद्वाज माझें अभिधान ।
श्रीराम । तुज अभिवंदन । दीनवचन परिसावें ॥ ११ ॥
स्वस्तिक्षेम विजययात्रा । केली निवटोनि दशवक्त्रा ।
तेणेंकरोनि रघुवीरा । चराचरां आनंद ॥ १२ ॥
परम भाग्याचे आम्ही पूर्ण । जे पुनरागमनी रघुनंदन ।
नयनी देखिला संपूर्ण । सकळानुष्ठान फळा आलें ॥ १३ ॥
तूं दीनाची माउली । आर्तश्रांताची साउली ।
निजजनां कल्पवल्ली । कृपा ओलावली तुझेनि ॥ १४ ॥
तूं शरणागता शरण्य । आर्तबंधु आर्तत्राण ।
मी तुझें निजदीन । करी पावन आश्रम माझा ॥ १५ ॥
आश्रमा तुझे आगमन । तेणें सकळ कृतकल्याण ।
धर्मानुष्ठानाचें फळ पूर्ण । तुझे श्रीचरण देखोनी ॥ १६ ॥
तुझेनि पावन आश्रम । तुझेनि पावन स्वधर्म ।
तुझेनि पावन स्वकर्म । सर्वोत्तम तुझेनि आम्ही ॥ १७ ॥
घालोनियां लोटांगण । अत्यंत प्रीतीं रघुनंदन ।
विनवितांचि स्वयें जाण । आला ठाकून प्रेमभावे ॥ १८ ॥
श्रीराम प्रेमाचा पाहुणा । राम प्रेमाचा अंकित जाणा ।
प्रेमाचे पडिभरें पूर्णा । न म्हणे आपण कुळजाती ॥ १९ ॥
हा तरी द्विज वर श्रेष्ठ । ऋषीश्वरांमाजी वरिष्ठ ।
भजनयुक्त स्वधर्मनिष्ठ । प्रेम उद्भट त्याहीवरी ॥ २० ॥
ऐसियाचें उपेक्षण । सर्वथा न करी रघुनंदन ।
तळी उतरिलें विमान । सेवकजनसमवेत ॥ २१ ॥
श्रीराम व भरद्वाजांची भेट :
येरें घातले लोटांगण । केले साष्टांग नमन ।
वेगें श्रीराम उचलोन । धरी आलिंगून हृदयेसीं ॥ २२ ॥
श्रीरामें देतो आलिंगन । उडालें शून्याचे शून्यपण ।
देह झाला चैतन्यघन । जीवशिवपण नाठवे ॥ २३ ॥
तैसेंचि श्रीरामासीं पूर्ण । देतां ऋषीसीं आलिंगन ।
श्रीरामा नाठवे रामपण । आनंद पूर्ण उथळला ॥ २४ ॥
गूळ भेटे गोडियेसीं । ऋषिरामांची भेटी तैसी ।
येरामाजी येरू परिसेयीं । निजउल्लासीं निमग्न ॥ २५ ॥
तया सुखाचे जाणते । दुजेपण कैचें पाहतें ।
टकमक झाली सकळातें । चेतवी तेथें कोण कोणा ॥ २६ ॥
तेणें काळे रघुनाथ । आपण आपणा सावध करित ।
एकाकी न रमते स द्वितीयमैच्छत । सत्य श्रुत्यर्थ केला रामें ॥ २७ ॥
आपल्या आपण भक्तिसुख । स्वयें भोगावें सम्यक ।
देव भक्त होवोनी एक । आलिंगन देख सोडिलें ॥ २८ ॥
सुटतां दोघांचें आलिंगन । सर्वदा नाहीं दोन्हीपण ।
तेणेंचि भावें श्रीरामगण । बिभीषणादि नमियेले ॥ २९ ॥
जें सुख श्रीरामभेटीसी । इतरां आलिंगन तेणेंचि भावेंसीं ।
सर्वथा भेद मानसीं । न दिसे बुद्धीसीं एकत्वें ॥ ३० ॥
श्रीराम आणि सौमित्र जाण । सुग्रीवादि बिभीषण ।
हनुम्यासहित वानरगण । आलिंगिले श्रीरामभावें ॥ ३१ ॥
मांडिलें प्रीतीं पूजाविधान । विष्टरयुक्त वरासन ।
बैसवोनी रघुनंदन । षोडशोपचारी पूजिला ॥ ३२ ॥
तैसेचि सकळ सेवक । बिभीषणादि प्रमुख ।
भरद्वाजें एकाएक । अतिसम्यक पूजिले ॥ ३३ ॥
भरद्वाजांकडे भोजन करण्यास रामांचा भरताकरिता विनम्र नकार :
मुसे भोजना आज्ञापन । तें न मानीच रघुनंदन ।
कांही नेदीच प्रतिवचन । तेणें ऋषिवर जाण सचिंत ॥ ३४ ॥
ऋषि देखोनि चिंताक्रांत । विनविता झाला रघुनाथ ।
क्षमा करावी भोजनार्थ । प्रसन्नचित्त होवोनियां ॥ ३५ ॥
भरत उपवासी मजवीण । त्यजिला आहार जीवन ।
व्रत अंगीकारोनि दारुण । वनवास पूर्ण घेतला ॥ ३६ ॥
राजधानी सांडोनियां दूरी । वल्कलांबर जटाधारी ।
भूमिशायी निरंतरी । व्रतधारी पै झाला ॥ ३७ ॥
त्यासीं सांडोनि आपण । चौदा वर्षेंपर्यंत जाण ।
सर्वथा नाहीं घेतलें अन्न । आजीच भोजन केंवी करणें ॥ ३८ ॥
तुम्ही साधु सर्वज्ञ । निजचित्तीं विवंचून ।
मज द्यावें आज्ञापन । तेंचि वचन मज वंद्य ॥ ३९ ॥
म्हणोनि श्रीरामें आपण । ऋषीस घातलें लोटांगण ।
तेणें ऋषि विस्मयापन्न । स्वयें रघुनंदन नमियेला ॥ ४० ॥
पूर्णब्रह्म रघुनंदन । स्वयें असोन आपण ।
वाढवीत भक्तमहिमान । दीनजनकृपाळु ॥ ४१ ॥
अहं भक्तपराधीन । ऐसें श्रुतिशास्त्रपुराण ।
तें दाविलें साच करोन । भक्त महिमान वाढविलें ॥ ४२ ॥
राम भक्तांचा अंकिला । राम भक्तांचा विकला ।
राम भक्तांचा केला । सत्वर या बोला आणिलें रामें ॥ ४३ ॥
निदान फळाहार तरी करावा अशी भारद्वाजांची रामांना आग्रहाची प्रार्थना :
ऐसी करोनियां विनवण । ऋषीनें प्रार्थिला रघुनंदन ।
फळाहारा आज्ञापन । द्यावें आपण पै स्वामी ॥ ४४ ॥
म्हणोनि विनविला रघुपती । तेणें संतोषला निश्चिती ।
स्वयें मानोनियां विनंती । निजचित्तीं विवंची ॥ ४५ ॥
विरक्त ब्राह्मण तपोधन । कष्टी फलाहारालागून ।
होऊं पाहे खेदक्षीण । याचेसूचन करावें ॥ ४६ ॥
रामांची मूक संमती. सर्व वनस्पती रसपूर्ण झाल्या :
ऐसें निजचित्तीं राघवें । धरितांचि निजस्वभावें ।
वनस्पती सर्वभावें । जीवें भावें वोळल्या ॥ ४७ ॥
सर्वकऋतु सर्व काळ । एकें वेळे वोळले सकळ ।
वनस्पती फळ मूळ । रसकल्लोळ वोळला ॥ ४८ ॥
शुष्कें वोळलीं रसभारें । अफळें दाटली फळसंभारें ।
खाकरे होतीं जी निःसारे । तीं कोमळांकुरें लसलसलीं ॥ ४९ ॥
सजीव निर्जीव तरुवर । अमृतरसें पै समग्र ।
अवघे वोळले एकत्र । बाप रघुवीर कृपाळू ॥ ५० ॥
सरसे विरसें नीरसें । अवघीं वोळलीं ब्रह्मरसें ।
लाघव केलें राघवेशें । मुनि संतोषें वसावया ॥ ५१ ॥
हा अर्थ नेणोनि मुनी । राम विनविला फळभोजनीं ।
ऋषिवचना संतोषोनी । मस्तकीं मानी श्रीराम ॥ ५२ ॥
अर्ध्यं च प्रतिग्रण्हीष्व श्वोऽयोध्यायां गमिष्यसि ।
तस्य तच्छिरसा वाक्यं प्रत्यगृण्हात्स राघव ॥ ३ ॥
श्रीराम भरद्वाजांची पूजा स्वीकारून प्रसन्न झाले :
स्वामी श्रीरामा परियेसीं । आतां गेलिया अयोध्येसीं ।
मागुता निजप्रीतीं देखिजेसी । ऐसें कोणासीं भाग्य आहे ॥ ५३ ॥
हातींचा श्रीराम गेलिया । पुनरपि भेटेल गोष्टी वांया ।
संतोष मानी तो गिळिला माया । निजात्मघात स्वयें केला ॥ ५४ ॥
यालागीं रघुनंदना । कृपा करावी दीनजनां ।
यथाशक्ति पाद्यार्घ्य जाणा । केलें तें प्रीतीनें अंगीकारीं ॥ ५५ ॥
ऐसी प्रीतिपूर्वक विनवण । ऐकोनियां रघुनंदन ।
अंगीकारिली प्रीतिकरोन । दीनजनकृपाळु ॥ ५६ ॥
फळें आणावया ऋषीश्वर । शिष्य धाडी जंव सत्वर ।
तंव आश्रम मनोहर । पुष्पी अपार लगडला ॥ ५७ ॥
सजीव निर्जीव वनस्पती । अमृतरसें वर्षताती ।
पाषाण तेही द्रवती । श्रीरधुपतिनिजकृपा ॥ ५८ ॥
तेणें अति संतोष मानसीं । श्रीरामें कृपा केली ऐसी ।
आश्रमचि रामपूजेसीं । सकळ सिद्धीसीं वोळला ॥ ५९ ॥
फळें तोडोनि अति प्रीतीं । कर्षीने आणिलीं शीघ्रगतीं ।
सहित वानरांच्या पैकी । श्रीरधुपति सुखावला ॥ ६० ॥
वर देण्याची रामांची इच्छा :
विधियुक्त फळभोजन । ऋषीनें संपादिलें पूर्ण ।
तेणें संतोषला रघुनंदन । माग वरदान म्हणे द्विजा ॥ ६१ ॥
ऐकोनि वरदाचें वचन । ऋषि संतोषी निमग्न ।
घालोनियां लोटांगण । काय आपण विनवित ॥ ६२ ॥
ऐकें स्वामी रघुनाथा । तंवचि वासनेची वार्ता ।
तंवचि मागणियाची कथा । जंव भेटी तत्वतां नाहीं तुझी ॥ ६३ ॥
तंवचि आटाआटी साधनांची । तंवचि खटपट तीर्थाची ।
तंवचि उठाउठी व्रताची । भेटी रामाची जंव नाहीं ॥ ६४ ॥
तंवचि वासना अनिवार । तंवचि मनाचा महामार ।
तंवचि इंद्रियें दुर्निवार । जंव रघुवीर न देखती ॥ ६५ ॥
तंवचि विषय दारुण । तंवचि ऐकिजे अधःपतन ।
तंवचि बाधा जन्ममरण । जंव रघुनंदन न देखिजे ॥ ६६ ॥
दृष्टीं देखतां रघूत्तम । सर्वांगीं वोळंगती सकळ काम. ।
मागणे निमालें निःसीम । पूर्णकाम मनोरथ ॥ ६७ ॥
असो दर्शनाची कथा । श्रीरामनाम आठवितां ।
पूर्णकाम मनोरथां । श्रीरघुनाथा तुझेनि नामें ॥ ६८ ॥
भक्तकामकल्पद्रुम । तो भेटतां रघूत्तम ।
आन इच्छी मनोधर्म । ऐसा अधम कोण आहे ॥ ६९ ॥
सावध ऐक कृपानिधी । होतां तुझी आगमनविधी ।
आश्रमी वोळंगती सकळ सिद्धी । मागणे बुद्धि विसरली ॥ ७० ॥
निर्विषयचित्त होऊन सतत रामस्मरण घडावे
अशी भरद्वाजांची मागणी. तसे रामांनी वरदान दिले :
प्रसन्न होऊनि निश्चितीं । माग म्हणता रघुपती ।
हेंचि मागणे पुढतपुढती । जें विषय चित्तीं रुही नेदीं ॥ ७१ ॥
निर्विषय निरभिमान । निर्विकल्प तुझें भजन ।
सर्वा भूतीं समसमान । द्यावें अनवच्छिन्न सर्वकाळ ॥ ७२ ॥
कृपाळुवा रघुनाथा । आणिक न मागें जी सर्वथा ।
म्हणोनि चरणी ठेविला माथा । अति अवस्था मुनिवरा ॥ ७३ ॥
तें देखोनि रघुनाथ । उचलोनि हृदयीं आलिंगित ।
तेणें निर्विषय झालें चित्त । सुख अद्भुत उथळलें ॥ ७४ ॥
आधींच तपोधन ऋषी । श्रीरामीं प्रेमा अहिर्निशीं ।
वरी देतां आलिंगनासी । निर्विषयसुखासी पावला ॥ ७५ ॥
सुख पावतां मुनिवर । अवघे झाले आल्हादपर ।
बाप कृपाळु रघुवीर । नामें वानर गर्जती ॥ ७६ ॥
देवोनियां ऋषीस वरदान । अस्तु म्हणे रघुनंदन ।
तेणें ऋषि सुखसंपन्न । केलें नमन साष्टांगीं ॥ ७७ ॥
तेथून स्वतः अयोध्येस जाण्यापूर्वी रामांनी
हनुमंतास पुढे जाऊन कळविण्यास सांगितले :
करावया अयोध्यागमन । श्रीराम करी विवंचन ।
चौदा वर्षें लोटलीं पूर्ण । झालें उल्लंघन मर्यादे ॥ ७८ ॥
माझेनि वियोगें भरता । होत असेल अति चिंता ।
मर्यादा लोटली तत्वतां । सांडील सर्वथा देहासी ॥ ७९ ॥
यालागोनि पै पहिलें । वृत्त पाहिजे पाठविलें ।
हनुमंतासी पाचारिलें । आज्ञापिलें अति शीघ्र ॥ ८० ॥
मतिमंतं हजुमंतमिदं वचनमब्रवीत् ।
अयोध्यामद्य एव त्वं गच्छ तूर्णं वनेचर ॥ ४ ॥
शृंगवेरपुरं प्राप्य गुहं गहनगोचरम् ।
वृत्तं निषादपतये वक्तव्यं वचनान्मम ॥ ४ ॥
जाताना मार्गात शृंगवेरपुरास गुहकास वृत्त सांगण्यास सुचविले :
जो बुद्धीचा सागरू । भावार्थाचा महामेरू ।
आज्ञेचा तरी किंकरू । महावीरू हनुमंत ॥ ८१ ॥
तयासी बोलावोनि रघुपती । सांगता झाला अति प्रीतीं ।
तुवां जावोनि अयोध्येप्रती । आगमनस्थिती सांगावी ॥ ८२ ॥
वनवासींचा समाचार । रावणवधाचें चरित्र ।
बंदिमुक्त सुरवर । वृत्त समग्र सांगावें ॥ ८३ ॥
गुहक आमुचा निजमित्र । मार्गी त्याचें आहे नगर ।
नामें शंगवेरपुर । त्यासी सत्वर भेटावे ॥ ८४ ॥
सांगतो आमुचें आगमन । होईल सुखें संपन्न ।
पावोनियां समाधान । तुझें पूजन करील ॥ ८५ ॥
तेथोनि पुढारें गमन । अति वेगें करोनि जाण ।
घ्यावे भरताचें दर्शन । वृत्त संपूर्ण सांगावें ॥ ८६ ॥
भरत आमुचा अनुरक्त । सर्वथा संदेह नाहीं येथ ।
तरी राजनीतिलौकिकार्थ । पहावें व्रत भरताचें ॥ ८७ ॥
ज्ञेयाः सवे च वृत्तांता भरतश्चेंगितानि च ।
सत्वेन मुखवर्णेन दृष्टिव्याभाषितेन च ॥ ६ ॥
भरताचे चिन्ह पाहून त्याला माझ्या आगमनाची वार्ता
सांगावी व सत्वर निघून यावे असे राम मारुतीला सांगतात :
राज्यलोभाची जाती पाहीं । धर्माधर्म नाठवे कांहीं ।
ज्येष्ठाचा तेथें पाड कायी । अंध लवलाही बुद्धि होय ॥ ८८ ॥
राज्यभोग देखतां पुढें । मन होवोनि ठाके वेडें ।
साखरेवरोनि माशी नुडे । तेंवी जडे विषयार्थी ॥ ८९ ॥
भरताचें पित्रार्जित । राज्य आहे पितृदत्त ।
जरी झाला लोलुप्त । तरी निश्चित देऊ त्यासी ॥ ९० ॥
धर्ममर्यादा आहे ऐसी । जेथें जेथें प्रीत जयासी ।
ते तें अर्पावे तयासी । हेंचि साधूंचे निजव्रत ॥ ९१ ॥
राज्यलोभ तत्वतां । आम्हासी नाहीं सर्वथा ।
चिन्ह पाहोनियां भरता । राज्य निश्चित देवों त्यासी ॥ ९२ ॥
धर्ममर्यादा ऐसी जाण । शीघ्र पाहोनि याचें चिन्ह ।
काय तें चिन्हाचें लक्षण । ऐक सांगेन संकेत ॥ ९३ ॥
दृष्टीं देखतांचि प्रियासी । हर्ष दाटे सर्वांगासी ।
रोमांच उभवोनि उल्लासीं । गुढी चौपासीं उभविती ॥ ९४ ॥
शीघ जावोनि आपण । काय तें ओळखावें चिन्ह ।
आमुचेंही आगमन । करीं निवेदन भरतासी ॥ ९५ ॥
अंतरींचिया प्रेमावस्था । कंठीं बाष्प दाटतां ।
देह नावरे सर्वथा । पडे तत्वतां मूर्च्छित ॥ ९६ ॥
अंतरीं प्रेमा अनिवार जाण । तरी हें बाह्य प्रकटे चिन्ह ।
अंतरीं प्रीति नसतां पूर्ण । बाह्म चिन्ह प्रकटेना ॥ ९७ ॥
ऐसी पाहोनि विवंचना । शीघ्र यावें वायुनंदना ।
तदनुसार अयोध्ये जाणा । करूं गमना अति प्रीतीं ॥ ९८ ॥
इति प्रीतिसमादिष्टो हनूमान्मारुतात्मजः ।
अथोत्पतात वेगेन बलवान्कपिकुंजरः ॥ ७ ॥
रामाज्ञेप्रमाणे हनुमंताने उड्डाण केले :
ऐकोनियां श्रीरामवचन । अनायासें प्रेमचिन्ह ।
श्रीराममुखें करून । हनुमंतें आपण ऐकिलें ॥ ९९ ॥
म्हणोन घातलें लोटांगण । करोनि प्रदक्षिणा नमन ।
भरतदर्शनीं प्रेम गहन । केलें उडाण अति वेगें ॥ १०० ॥
गरुडवेग पवनवेग । लाजवीत मनोवेग ।
हनुमान चालिला सवेग । अतिबळवेग मारुती ॥ १०१ ॥
शृंगवेरपुरं प्राप्य गुहमासाद्य वीर्यवान् ।
वाचा तं शुभया हर्षाद्धनूमानिदमब्रवीत् ॥ ८ ॥
हनुमान शृंगवेरपुराला आला :
नामबळें अनिवार । उडाण केलें वेगवत्तर ।
गगन आक्रमिले समग्र । शृंगवेरपुर पावला ॥ १०२ ॥
गुहकद्वारीं कपिकुंजर । रामनामें भुभुःकार ।
हनुमंते केला वेगवत्तर । तेणें समग्र गजबजिले ॥ १०३ ॥
अति दीर्घ रामनामध्वनी । कोणा भाग्यपुरुषाची वाणी ।
गर्जिन्नली दीर्घस्वरेकरोनी । नादें अवनी दुमदुमिली ॥ १०४ ॥
ज्याचे मुखीं नामोच्चारण । तो जाण श्रीरामासमान ।
येविषयीं श्रुतिपुराण । बाहु उभवोन गर्जती ॥ १०५ ॥
हृदि रूपं मुखे नाम नैवेद्यमुदरे हरेः ।
पादोदकं व निर्माल्यं मस्तके यस्य सोऽस्तुतः ॥ ९ ॥
रामभक्तांचे लक्षण :
पार्थिवशरीरें जाण । जे झाले श्रीरामासमान ।
ऐक त्या भक्तांचें लक्षण । सावधान सुचिन्हीं ॥ १०६ ॥
मनीं सतत भरली मूर्ती । चित्ते चिंतन अहोरात्रीं ।
बुद्धीचा निश्चय रघुपती । संसारस्कृर्ती सांडोनियां ॥ १०७ ॥
देहाचे ठायीं अहंकार । झाला होता दृढोत्तर ।
त्यासीं गुरुवचन निजसार । पावतां सत्वर परतला ॥ १०८ ॥
देहाचे ठायीं त्रिशुद्धी । दृढ होती अहंबुद्धी ।
तीतें जाळोनि सोहंसिद्धी । निजानंदीं प्रकटली ॥ १०९ ॥
नित्य निर्माल्य मिरवे शिरीं । चरणतीर्थ अभ्यंतरीं ।
हरिप्रसाद त्याच्या उदरीं । तो मूर्तिधारी श्रीराम ॥ ११० ॥
त्यासीं दृश्यमाजीं पूर्ण । सहजीं भासे रघुनंदन ।
ज्याचें अंतर जेथें निमग्न । तेंचि भान तयासी दिसे ॥ १११ ॥
अतिशयें उल्लासेंसीं । नाम गर्जत आवेशेसी ।
रामरूप तो निश्चयेसीं । चला भेटीसीं जाऊं तया ॥ ११२ ॥
ऐकोनि रामनामाची ध्यनी । अद्यापि प वचों भेटीलागूनी ।
अधम ऐसें आम्हांलागूनी । आन कोणी असतिना ॥ ११३ ॥
रामभक्त मारुतीच्या दर्शनासाठी गुहक आला.
त्याला रामांची माहिती गुहकाने विचारली :
ऐसा करोनि विचार । श्रीरामप्रेमें वेगवत्तर ।
बाहेरी आले जी समग्र । तंव कपींद्र देखिला ॥ ११४ ॥
वानर होवोनि मनुष्याची वाणी । श्रीरामनाम त्याच्या वदनीं ।
अति प्रचंड दिसे नयनीं । श्रीरामगुणीं भरलासे ॥ ११५ ॥
अति प्रचंड विख्यात । श्रीरामप्रेमें ओतिला दिसत ।
तेणे गुहक हर्षभरित । प्रीतीं घालित लोटांगण ॥ ११६ ॥
प्रेमयुक्त अंतःकरण । ऐकोनियां नामस्मरण ।
करोनि साष्टांगीं नमन । पुसे चिन्ह कपीसी ॥ ११७ ॥
स्वामी तुम्ही कोठील कोण । मुखीं नामाचें उच्चारण ।
वानरी तनु काय कारण । येणें कोठून झालें स्वामी ॥ ११८ ॥
मारुतीने रामकथा थोडक्यात गुहकाला सांगून
रामांच्या आगमनाची शुभवार्ता त्याला सांगितली :
ऐकोनि प्रीतिमंजुळ वचन । श्रीरामीं प्रेमा गहन ।
तेणें हनुमान सुखैकघन । लोटांगणें विनवित ॥ ११९ ॥
संपवोनि वनवासव्रत । करोनि राक्षसांचा निःपात ।
जनस्थान करोनि मुक्त । द्विजदानार्थ दिधलें रामें ॥ १२० ॥
वधूनि रावण कुंभकर्ण । विजयी झाला रघुनंदन ।
सुरवरांचें बंदिमोचन । न लागतां क्षण पै केलें ॥ १२१ ॥
सूरच देवोनि त्रिभुवना । सहित जानकीलक्ष्मणा ।
करोनि विमानीं रोहणा । पैल जाणा येताती ॥ १२२ ॥
शरणागत दोघे जण । सुग्रीव आणि विभीषण ।
अपरिमित वानरसैन्य । नामें त्रिभुवन गर्जत ॥ १२३ ॥
राक्षसांसी देवोनि मुक्ती । रामें उद्धरिली त्रिजगती ।
नामें महापातकियां गती । अगाध कीर्ति रामाची ॥ १२४ ॥
वानर वनचर पालेखाईर । केवळ श्रीरामाचे किंकर ।
माझे नाम हनुमान वीर । गुढी सत्वर घेवोनि आलों ॥ १२५ ॥
तुम्ही श्रीरामाचे निजगण । म्हणोनि श्रीरामें आपण ।
कळवावया निजगमन । गुढी देवोन पाठविलें ॥ १२६ ॥
आतां स्वस्ति! असो तुम्हांसीं । येतां भेटी श्रीरामासीं ।
मज जाणें अयोध्येसी । गुढी भरतासी सांगावया ॥ १२७ ॥
ऐकोनि हनुमंताचे वचन । गुहकें घातले लोटांगण ।
वृत्त न सांगतो संपूर्ण । केंवी प्रयाण करा स्वामी ॥ १२८ ॥
एवमुक्तस्तु स गुहः संपरिष्वज्य तं कपिम् ।
हर्षेण महताविष्टस्तं हरिं पर्यपृच्छत ॥ १० ॥
क्व राम: क्व च वैदेही बुद्धिमांश्व क्व लक्ष्मण: ।
ह्लावितोऽस्मि त्वया सार्धं जलौघेनेव मेदिनी ॥ ११ ।
राम -लक्ष्मण -सीता यांच्याबद्दल गुहकाची पृच्छा :
घालोनियां लोटांगण । विधियुक्त करोनियां पूजन ।
करिता झाला विनवण । रामलक्ष्मण कोठे स्वामी ॥ १२९ ॥
काय सांगों त्यांची महती । निराहारी रघुपती ।
स्वयें निघाला वनाप्रती । सांडोनि निश्चिती पादत्राण ॥ १३० ॥
कोठे आहे रघुपती । लवकरी सांग मजप्रती ।
सखा सौमित्र तदनुवृत्ती’ । अनुपम ख्याती तयाची ॥ १३१ ॥
श्रीरामसेवेच्या आदरा । वीरें त्यजिली निद्रातंद्रा ।
तुच्छ करोनियां शरीरा । निःशेष आहारा त्यजियेलें ॥ १३२ ॥
कोठे आहे ती जानकी माता । श्रीरामसेवेलागी तत्वतां ।
बाळपणी तापसता । अति निसुरता धरियेली ॥ १३३ ॥
विमान देखिलें अंबरीं । आम्हांसी न दिसे अद्यापिवरी ।
सांग काय झालें परी । दीर्घस्वरीं आक्रंदे ॥ १३४ ॥
मारुतीने गुहकाचे सांत्वन करून याच
मार्गाने श्रीराम येतील असे त्याला सांगितले :
देखोनि त्याचा प्रेमभावो । हनुमंत उचंबळला पहाहो ।
गुहका शांत होवोनि महाबाहो । रामागमन सांगत ॥ १३५ ॥
मार्गी येतां विमान । भरद्वाज अनन्यशरण ।
होवोनियां रघुनंदन । अति प्रीतीकरून प्रार्थिला ॥ १३६ ॥
तेथें क्रमोनियां आजिची राती । सर्वथा आतां विमानस्थितीं ।
सहित सौमित्र सीता सती । येईल रघुपति येणें मार्गे ॥ १३७ ॥
सौमित्रें अद्यापि जाण । स्पर्शिलें नाहीं अन्न ।
अस्थिमात्र जानकी जाण । स्वयें आपण उरलीसे ॥ १३८ ॥
श्रीरामाची गोष्टी पाहें । सर्वथा मज सांगता नये ।
ऐशा रीतीं आली पाहें । त्रैलोक्यीं विजय करोनियां ॥ १३९ ॥
तुमच्या भाग्याची सीमा । सर्वथा करितां नये आम्हां ।
नित्य स्मरण रघूत्तमा । तुमचा प्रेमा अनुवादे ॥ १४० ॥
श्रीरामाचें करिती स्मरण । ते आम्हांसी पूज्य जाण ।
म्हणोनि घातलें लोटांगण । स्वयें उल्लाण करिता झाला ॥ १४१ ॥
स गत: शीघ्रमध्यानं महात्मा कपिकुंजरः ।
आससाद द्रुमान्फुल्लान् नंदिग्राम समंततः ॥ १२ ॥
गुहकाचा निरोप घेऊन मारुती नंदिग्रामाला पोचला :
हनुमंताचे उहुाण । गुहकें स्वयें देखोनि जाण ।
करोनि साष्टांगें नमन । आनंदमग्न पै झाला ॥ १४२ ॥
श्रीरामागमसुख जाण । त्यापुढें तुच्छ ब्रह्मसदन ।
येणें हरिखें अवघे जण । निषादगण नाचती ॥ १४३ ॥
येरीकडे हनुमंत । पवना मनातेंही लाजवित ।
वेगें चालिला त्वरित । आक्रमीत गगनातें ॥ १४४ ॥
अति बळियाढा कपिकुंजर । मार्ग क्रमोनि सत्वर ।
पातला नंदिग्राम नगर । महावीर भरत जेथे ॥ १४५ ॥
नंदिग्रामातील राममय झालेले वातावरण :
श्रीरामागमनवसंत । मूर्त पातला हनुमंत ।
तेणें वनश्री शोभत । अति अद्भुत पुष्पी फळी ॥ १४६ ॥
अफळें आलीं फळासी । निरंकुरें अंकुरासीं ।
निरसे आलीं रसासीं । निर्जीव जीवेसी उठलीं ॥ १४७ ॥
आला जाणोनि रघुनाथ । अष्टमहासिद्धि धांवत ।
सत्वर पातलिया तेथ । हर्षें नाचत येवोनी पुढें ॥ १४८ ॥
तेणें मंडित नगर । सकळ लोक भजनपर ।
श्रीरामध्यानीं अति तप्तर । इंद्रियाचार तद्रूप ॥ १४९ ॥
एक करिती हरिकर्तिन । अर्थमय होवोनी पूर्ण ।
गाता श्रीरामाचें गुण । प्रेमा जाण नावरे ॥ १५० ॥
प्रेमें युक्त अंतःकरणा । पदीं गातो रघुनंदन ।
अंतरीं ठसावे चिन्ह । होती जाण तद्रूप ॥ १५१ ॥
अलोट कीर्तनाचे सुख । अवघे होती तदात्मक ।
एक होती रघुकुळटिळक । एक दशमुख पै होती ॥ १५२ ॥
छेदोनियां श्रीरामाच्या बाणीं । शिरे अर्पिती श्रीरामचरणीं ।
तंव तंव उल्लास अंतःकरणी । प्रेमेंकरोनि डुल्लत ॥ १५३ ॥
ऐका श्रोते पै सर्वज्ञ । करिती श्रीरामनामश्रवण ।
अर्थामाजी होवोनि निमग्र । करिती गर्जन रामनामें ॥ १५४ ॥
पदव्युत्पत्ती कीर्तन । कळा विन्यास ठाणमान ।
देखतां ठसावे ज्ञान । तटस्थ पूर्ण तेणें होती ॥ १५५ ॥
ऐसे श्रीरामाचे भक्त । अवघें नगर समवेत ।
धन्य आचार्य भरत । श्रीरधुनाथ निजभजनें ॥ १५६ ॥
तें देखोनि हनुमान जाण । झाला अत्यंत सुखसंपन्न ।
एका जनार्दना शरण । अमृतपान रामकथा ॥ १५७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
हनुमंतनंदिग्रामाभिगमनं नाम अष्टसप्ततितमोऽध्यायः ॥ ७८ ॥
॥ ओंव्या १५७ ॥ श्लोक १२ ॥ एवं १६९ ॥