Ramayan - Chapter 6 - Part 71 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 71

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 71

अध्याय 71

त्रिजटेचे दर्शन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्रतिगृह्णिष्व तत्सर्वं मदनुग्रहकांक्षया ।
मुनिवेष्ठं समुत्सृज्य राज्यार्थमनुभूयताम् ॥ १ ॥
एवमुक्तस्तु काकुत्स्थः प्रत्युवाच बिभीषणम् ।
धर्मज्ञं धर्मविद्वाक्य ज्यायज्ञो न्यायकोविदम् ॥ २ ॥

लोटांगणीं बिभीषणें । विचित्रालंकार भूषणें ।
विचित्र रत्‍नें विचित्र वसने । आणिलीं आपण पूजेसीं ॥ १ ॥
विचित्र पूजेची सामग्री । घेवानि बिभीषण विनंतीकरी ।
सहित जानकी सुंदरी । पूजा अंगीकारीं मत्प्रीतीं ॥ २ ॥
मजवरी अनुग्रह पूर्ण । त्याचें फळ हेंचि जाण ।
यथासामर्थ्यें पूजाविधान । आणिलें प्रीतीने अंगीकारीं ॥ ३ ॥
सांडोनि मुनिवेषासी । अंगीकारीं राजचिन्हांसी ।
जेणें सुख होय आम्हांसी । तें प्रीतीसीं आचरावे ॥ ४ ॥
निजभक्ताचें मनोगत । संरक्षावें यथातथ्य ।
हेंचि तुझें निजव्रत । तें साद्यंत सांभाळी ॥ ५ ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । दृढ धरिले दोन्ही चरण ।
तेणें कळवळला रघुनंदन । काय आपण अनुवादे ॥ ६ ॥
लौकिक नीति शास्त्र प्रयुक्तीं । मंजुळ वचनें रघुपती ।
स्वयें बिभीषणाप्रती । काय विनंती करीतसे ॥ ७ ॥

उपपन्नामिदं राजन्मयि कल्याणचेतसि ।
सौहार्दे वर्तमानस्य ग्राह्यश्व प्रणयान्मया ॥ ३ ॥
मामजुव्रतचारी च भरतः कैकयीसुतः ।
शत्रघ्नसहितो विद्वान्मदाराधनलालस: ॥ ४ ॥
राज्यश्रियं परित्यज्य मुनिवेषधरः किल ।
तपस्तप्यति मे भ्राता नंदिग्रामकृतालय: ॥५ ॥

भरताची स्वे घेतल्यणिवाव राज्याभिषेकादि गोष्टीस रामांचा नकार :

ऐक लंकाधिपति वृपवरा । तूं मज निजाचा सोयरा ।
तुझेनि -धर्मे दशशिरा । बाणधारा निवटिलें ॥ ८ ॥
जो अजेय त्रैलोक्यासी । बंदीं घातलें सुरवरांसी ।
अदट कर्म जयापासीं । तो बाणें एकेंसीं निवटिला ॥ ९ ॥
एवढे कर्म दारुण । तुझेनि धर्मे साधिलें पूर्ण ।
त्या तुझें निजवचन । केंवी उल्लंघन करूं शके ॥ १० ॥
परंतु तुवांचि निजचित्तीं । विचारावे यथानिगुतीं ।
भरत सांडोनि अयोध्येप्रती । व्रतसमासी केंवी करणें ॥ ११ ॥
सांडानि आहारविहार । तुच्छ करोनि राज्य समग्र ।
भूमिशायी वल्कलांबर । व्रत घोर अंगीकारिलों ॥ १२ ॥
सांडोनि आस्तरणप्रावरण । राज्यभोग पै संपूर्ण ।
अयोध्ये न वचे मजवीण । सिंहासन न पाहे ॥ १३ ॥
कैकेयी माता अति प्रीतीं । शिकवितांही नाना युक्ती ।
राज्या न शिवेचि हातीं । धैर्यमूर्ति पै भरत ॥ १४ ॥
चित्रकूटाच्या ठायी । शिकविला बहुसाल मींही ।
राज्य देतां लवलाहीं । प्राणावरी पाहीं उठावला ॥ १५ ॥
प्राण त्यागितां भरतासीं । तेथें आला वाल्मीक ऋषीं ।
समजावितां आम्हां दोघांसी । वाल्मीकासी अति कष्ट ॥ १६ ॥
मी न सांडीं वनवास । भरत अंगीकारीना राज्यभारास ।
तेणें काळें अनागत भाष्य । ऋषीनें भरतास सांगितलें ॥ १७ ॥
वनवासींचें सकळ चरित्र । भरता सांगितलें समग्र ।
तेणें काळें महावीर । दुःखें तत्पर परतला ॥ १८ ॥
करोनियां अति निर्वाण । भरतें वाहिली आण ।
श्रीरामावांचूनि आपण । राज्यभुवन न पाहें ॥ १९ ॥
मागोनि माझ्या पादुका । मस्तकी बांधिल्या देखा ।
अयोध्ये न येतां रघुकुळटिळका । सर्वथा देखा उतरींना ॥ २० ॥
माझी वनवासाचीं व्रतें । तितुकीं अंगीकारिलीं भरतें ।
शनुध्नहीं तैसींच तेथें । कठिण व्रतें आचरत ॥ २१ ॥
तिघी आगळ्या शतें सात । माझ्या माता तळमळित ।
अयोध्येचे जन समस्त । आर्तभूत मजलागीं ॥ २२ ॥
राजधानी सांडूनि वहिला । भरत नंदिग्रामीं राहिला ।
त्यासी उपेक्षोनि मला । अभिषेक भला केंवी माने ॥ २३ ॥

भरतभेटीवाचून राज्याभिषेक ही धर्मनीती नव्हे :

धर्मनीति नव्हे ऐसी । जगीं होईल उपहासी ।
म्हणोनि विनवितों तुम्हांसी । दुर्निमित्तासी चुकवावें ॥ २४ ॥
जें मज अपेक्ष जघन्य । तें तुम्हांसी नव्हे मान्य ।
याकारणें तुम्हीं आपण । जघन्य सांडावें ॥ २५ ॥
म्हणोनि घातलें लोटांगण । क्षमा करावी मज संपूर्ण ।
आम्हांसी द्यावें आज्ञापन । करावें गमन लंकेसीं ॥ २६ ॥
सुख द्यावें प्रजांसी । सुख द्यावें विश्वजनासी ।
सुख देवोनि कलत्रपुत्रांसी । निजराज्यासी भोगावें ॥ २७ ॥

अयोध्येला जाण्यासाठी श्रीरामांची उत्कंठा :

माझे मन उत्कंठित । बंधु माता सुहद समस्त ।
गुरुदर्शनालागी बहुत । उत्कंठित मन माझें ॥ २८ ॥
मज दिधलिया आज्ञापन । सकळ पावलें पूजाविधान ।
स्वयें मानोनि समाधान । क्षमा आपण करावी ॥ २९ ॥

अनुजानीहि मां सौम्य पूजितो5हं बिभीषण ।
मन्युः खलु न कर्तव्यस्तवरितं चानुमानय ॥ ६ ॥

त्रिजटेला भेटीस आणण्याची श्रीरामाची बिभीषणाला अनुज्ञा :

कोप सांडोनि तत्वतां । आज्ञा पावे लंकानाथा ।
विलंब न करावा सर्वथा । उदासता न करावी ॥ ३० ॥
आपण जावें लंकेसीं । आनंदवावे सर्वांसीं ।
त्रिजटा सखी जानकीसीं । अत्यादरें तिसी पूजावें ॥ ३१ ॥
जैसी माझ्या ठायीं प्रीती । त्रिजटा पूजावी त्याच स्थिती ।
तिचेनि संगे सीता सती । तरली निश्चितीं दुर्गम ॥ ३२ ॥
रावणाचा कडकडाट । तीव्र कामें दुर्धराट ।
त्याचें करावया सपाट । संगती निर्दुष्ट त्रिजटेची ॥ ३३ ॥
येईल तरी आणीं भेटीसी । परी प्रीती करावी बहु तिसीं ।
तेणें अति सुख आम्हांसी । मद्‌भक्तांसी पूजिलिया ॥ ३४ ॥

वैदेह्माश्च सखी तत्र त्रिजटा नाम राक्षसी ।
अस्यास्तु प्रियहेतोस्त्वमनुज्ञां दातुमर्हसि ॥ ७ ॥

जानकीच्या सुखाकारणें । अवश्य त्रिजटेसी पूजणें ।
मद्‌भक्त पूजिलें जेणे । तेणें अनंत गुणे मज पूजिलें ॥ ३५ ॥

रामासह अयोध्येत येण्याची बिभीषणाची त्यांना आग्रहाची विनंती :

ऐकोनी श्रीरामवचन । लोटांगणीं बिभीषण ।
विनविता झाला आपण । रघुनंदन वंदूनी ॥ ३६ ॥
आज्ञापिलें स्वामिनाथा । तें मज वंद्य निजमाथां ।
लंके न वचें सर्वथा । येईन भरताचे भेटीसी ॥ ३७ ।
त्रिजटेचीं प्रीति गहन । तरी क्षणही न लागतां जाण ।
येथें घेवोनि येईन । नमनालागून स्वामीच्या ॥ ३८ ॥
श्रीराम सांडोनियां वनीं । विषयविलास भोगालागूनी ।
जो प्रवेश राजभुवनीं । श्यामवदनी तो पापी ॥ ३९ ॥
दासाचा धर्म पूर्ण । निजस्वामी सुखसंपन्न ।
प्रवेशल्या राजसुवन । तेंचि आज्ञापन सेवका ॥ ४० ॥
यालागीं स्वामिनाथा । लंके न वचें सर्वथा ।
सवें येईन जी तत्वतां । बंधुभरता भेटीसी ॥ ४१ ॥
झणीं अव्हेरू करिसी माझा । मी सवें येईन रघुराजा ।
निजभक्त कैवारी हा तुझा । निजपैजा बडिवार ॥ ४२ ॥
नुपेक्षिसी विज्ञापन । म्हणोनि केलें प्रार्थन ।
मज सांडोनि जातां पूर्ण । प्राणोत्क्रमण होईल माझें । ४३ ॥

श्रीरामांनी ती विनंती मान्य केल्यामुळे बिभीषणाला परमानंद :

ऐकोनियां तें वचन । प्रीतीं आलिंगिला बिभीषण ।
बाप कृपाळु रघुनंदन । अंतर पूर्ण जाणता ॥ ४४ ॥
निजभक्ताचें मनोगत । संरक्षावें यथातथ्य ।
जाणता एक रघुनाथ । आणिका हे वृत्त कळेना ॥ ४५ ॥
अंतर जाणता श्रीराम । जो कां भक्तकामकल्पद्रुम ।
भक्तलळे अति निःसीम । पाळावे नेम तयांचे ॥ ४६ ॥
रामें अति प्रीतीं आलिंगिला । तेणें बिभीषण सुखावला ।
ब्रह्मसुखा विटावूं लागला । ऐसा झाला आनंद ॥ ४७ ॥
तेणें आनंदें नाचत । निजदेह न सांभाळित ।
रामरूपें सकळां नमित । हर्षयुक्त लोटांगणी ॥ ४८ ॥

त्रिजटेला रामदर्शनार्थ आणण्याची बिभीषणाची आपल्या दासांना आज्ञा :

बोलावूनि निजगण । सांगता झाला बिभीषण ।
लंकेमाजि जावोनि आपण । घ्यावें दर्शन त्रिजटेचें ॥ ४९ ॥
जिवलग सखी जानकीची । अनिवार प्रीति राघवाची ।
तेणेंचि तियेचे भेटीची । श्रीरामांसीं उत्कंठा ॥ ५० ॥
जे अनिमेष चिंतिती रामासी । राम चिंतित तयांसी ।
स्मरणाची महिमा ऐसी । देव भक्तासी ध्यातसे ॥ ५१ ॥
देवासीं ध्यान भक्ताचें । काय वानूं भाग्य त्याचें ।
दर्शन घ्यावया त्रिजटेचें । मन रामाचें उत्कंठित ॥ ५२ ॥
श्रीरामाचे प्रियकर । ते वंद्य आम्हां साचार ।
विमानीं घालोनि सत्वर । आणावी रघुवीरदर्शना ॥ ५३ ॥
कुबेरापासोनि विमान । घेतलें रावणें हिरोन ।
तें घेवोनि यावें आपण । श्रीरघुनंदन आरोहणा ॥ ५४ ॥
ऐसें आज्ञापितां दूतांसी । आज्ञेप्रमाणें लंकेसीं ।
जाऊन भेटले त्रिजटेसी । लोटांगणेंसीं अति प्रीतीं ॥ ५५ ॥
माते त्रिजटे परिसें विनंती । बिभीषणें पाठविले तुजप्रती ।
तुझे भेटीची श्रीरघुपती । आस्था चित्तीं लागलीसे ॥ ५६ ॥
जरी मानेल तुझिया मनार । तरी आरूढ होवोनियां विमाना ।
भेटावया रघुनंदना । शीघ्रत्वें जाण चलावें ॥ ५७ ॥

त्रिजटेने विमान नाकारून ती पायी चालत निघाली :

ऐकोनियां आज्ञापन । त्रिजटा घाली लोटांगण ।
श्रीरामें केली आठवण । भाग्य गहन पै माझें ॥ ५८ ॥
आज्ञेप्रमाणें त्वरित । तेथें येईन डोई चालत ।
विमानाचें कार्य येथ । मज सर्वथा असेना ॥ ५९ ॥
माझा गुरु सीता सती । विमाना नातळेचि ते सर्वार्थीं ।
भेटावया रघुपती । गेली चालत निजचरणीं ॥ ६० ॥
जियें वर्जिलें फळ मूळ । मांस जिरालें सकळ ।
अशुद्धव नाहीं अळुमाळ । अस्थिचर्म केवळ एक झाले ॥ ६१ ॥
ते भेटावया रघुपती । गेली चरणीं चालती ।
तिसी न पाहेचि रघुपती । कठिणवृत्तीं दिव्य मागे ॥ ६२ ॥
तेथें इतरांची गति कायसी । जे राम भेटेल विषयविलासीं ।
ज्यासी विषयेच्छा मानसीं । श्रीराम त्यासी केंवी भेटे ॥ ६३ ॥

संप्रदायाची महती :

यालागीं मी आपण । सर्वथा नातळे विमान ।
गुरुसंप्रदायेंकरोन । श्रीरामचरण सेवीन ॥ ६४ ॥
जो लाजे संप्रदायासी । अथवा कां विषयविलासी ।
तो केंवी पावे रामासी । जाय निजनरकासी निजकर्म ॥ ६५ ॥
विषयांचिये संगतीं । नरका गेले नेणों किती ।
अद्यापि कायसी विषयस्थिती । निजांगें रघुपती सेवावा ॥ ६६ ॥

रामदर्शनार्थ चाललेल्या त्रिजटेची भावावस्था :

म्हणोनि उठली सुंदर । रामदर्शनीं आल्हादपर ।
चरणीं चालत वेगवत्तर । श्रीरामचंद्रनमनासी ॥ ६७ ॥
सीता गेली ज्या रीतीं । आठवोनियां ते स्थिती ।
अति हळूवार लघुगती । पदगर्ती संचार ॥ ६८ ॥
अति साटोपें देह चालतां । सर्वथा चळण नाहीं चित्ता ।
चित्त जडले श्रीरघुनाथा । श्रीरामकांतानुग्रहें ॥ ६९ ॥
अनुग्रहाचें बळ दारुण । चळण सर्वत्र जो अपरिच्छिन्न ।
रहितदेशकाळवर्तमान । चित्त निमग्र तेथें झालें ॥ ७० ॥
तेणें अनुसंधानें चालतां । धरा न दिसे पाऊल ठेवितां ।
दृश्य नये दृष्टीचे हाता ॥ शब्दीं निःशब्दता शब्दार्थे ॥ ७१ ॥
निग्रहोनि सर्वेंद्रियवृत्ती । श्रीराम धरोनियां चित्तीं ।
भेटावया रघुपती । आनंदभरित चालिली ॥ ७२ ॥
अंतरींचिया निजवृत्ती । त्रिजटा चालतां सहजस्थितीं ।
पुढें देखिला रघुपती । सीतासतीसमवेत ॥ ७३ ॥

सीता-रामांच्या दर्शनामुळे त्रिजटेला अपार आनंदाचे भरते :

जेंवी सागरी लहरी । क्रीडे त्याची त्यावरी ।
श्रीरामे सीता सुंदरी । तैसियापरी शोभत ॥ ७४ ॥
सूर्याचे ठायीं जैसी दीप्ती । कीं कर्पूराचे ठायीं दृती ।
कनकाच्या ठायीं कांती । श्रीरामीं शोभती तेंवी सीता ॥ ७५ ॥
रामरूपी जगज्जननी । देखोनियां जनकनंदिनी ।
हरिखली राक्षसभगिनी । लोटांगण घालित ॥ ७६ ॥
चुकलिया बाळका माता । भेटलिया आनंद चित्ता ।
तेंवी देखोनि जनकदुहिता । त्रिजटेच्या चित्ता अतिहरिख ७७ ॥
मूकिया जोडे वाक्यसिद्धी । कीं निर्दैवा लाभे महानिथी ।
पुरश्चरणें मंत्रसिद्धी । जेंवी समाधि योगिया ॥ ७८ ॥
जिज्ञासुया ब्रह्मज्ञान । तेंवी जानकरिधुनंदन ।
देखोनियां त्रिजटापूर्ण । आनंदमग्न पै झाली ॥ ७९ ॥
ते देखोनि श्रीरामासी । अति अवस्था झाली कैसी ।
देखोनियां निजवत्सासी । धांवे प्रीतीसीं माउली ॥ ८० ॥
चुकलिया बाळक माता । भेटलिया आलिंगी तत्वतां ।
तैसे झालें श्रीरघुनाथा । सप्रेमता आलिंगी ८१ ॥
आलिंगितां रघुनंदन । त्रिजटा आनंदमग्न ।
सागरीं मिळे जेंवी लवण । तैशी दशा पूर्ण पै झाली ॥ ८२ ॥
अलंकार हारपे सुवर्णीं । तेंवी त्रिजटा रघुनंदनी ।
स्वयें गेली पैं बुडोनी । सर्वथा जनीं अलक्ष ॥ ८३ ॥
आलिंगनाचे मिषें पूर्ण । स्वरूपीं समावेश करून ।
हळूच सोडिली आलिंगून । त्रिजटा आपण श्रीरामें ॥ ८४ ॥
नसोनियां दोनीपण । प्रतिबिंब भासे पूर्ण ।
तेंवी सुटलें आलिंगन । दोनीपण नुरवोनी ॥ ८५ ॥
चरणीं ठेवोनि मस्तक । उथळलें निजसुख ।
तेणें करोनि रघुकुळटिळक । त्रिजटा देख प्रार्थित ॥ ८६ ॥

श्रीरामांना त्रिजटेची विनम्र विज्ञापना :

श्रीरामस्वामी सावधान । परिसावें माझे विज्ञापन ।
तुझे संगतीहूनि जाण । संगति गहन दासांची ॥ ८७ ॥
तुझ्या आलिंगनीं देख । देसी जें निजात्मसुख ।
ते देणे अलोलिक । वचनमात्रें निजभक्तीं ॥ ८८ ॥
वेदशास्त्रां नेणवसी । साधकासी नातुडसी ।
तो केंवी येरां आतुडसी । दर्शनासी धांडोळितां ॥ ८९ ॥
तीर्थोतीर्थी फिरों जातो । सर्वथा न लभे तुझी वार्ता ।
अधोमुखें धूपम्र घेतां । तूं सर्वथा नातुडसी ॥ ९० ॥

सत्संगमहिमा :

पात करितां पर्वतीं । देह देतां कर्वतीं ।
सर्वथा नव्हे तुझी प्राप्ती । सत्संगतीवांचूनी ॥ ९१ ॥
उग्र तपीं जो नातुडसी । तो श्रवणकीर्तनापासीं ।
सत्संगतीसीं पै तिष्ठसी । अहर्निशीं श्रीरामा ॥९२ ॥
सत्संगती कथाश्रवण । सद्धावें करितां संपूर्ण ।
साकल्यें सांपडसी पूर्ण । श्रवणें जाण अनायासे ॥ ९३ ॥
अथवा कां हरिकर्तिन । विलज्ज करितां जाण ।
नामें ओसरला येसी । आपण वत्सालागून धेनु जेसी ॥ ९४ ॥
सत्संगें नामकीर्तन । निःशंक करितां संपूर्ण ।
न पाचारितां येसी धांवोन । समाधान कीर्तनीं ॥ ९५ ॥
भक्त विरक्त जरी चित्तीं । तरी ओळंगती चारी मुक्ती ।
जरी भक्त न धरी हातीं । दाटोनि निघती घर त्याचें ॥ ९६ ॥
मुक्ती होवोनि अंकिता । नित्य ओळंगती तुझिया भक्ता ।
कृपेनेंहात ठेविता माथां । स्वयें रघुनाथा भेटसी ॥ ६७ ॥
विषमबुद्धी तुजपासीं । सर्वस्वें भजती अहर्निशीं ।
त्यांसीच तूं प्रसन्न होसी । बुद्धि ऐसी लाचुगी ॥ ९८ ॥
परी अभक्ताच्या घरासी । विसरोनियांही न वचसी ।
तैसें नाहीं तुझ्या भक्तासी । नाहीं मानसीं अरिमित्र ॥ ९६ ॥
निजहितीं चाड ज्यांसी । तिहीं सांडोनि इतर संगासी ।
दृढ धरितां सत्संगासी । निजसुखासीपाविजे ॥ १०० ॥

त्रिजटेने वर्णिलेला अनुभव:

नव्हती आणिकांच्या कथा । माझा अनुभव प्रत्यक्ष आतां ।
भेटलिया जनकदुहिता । श्रीराम तत्वता भेटलो ॥ १०१ ॥
कर्म विचारितां राक्षसी । मनुष्याचा आहार आम्हांसी ।
भेटी होतां जानकीसी । निजकर्मासी विसरलें ॥ १०२ ॥
सत्संगें स्मरता नाम । नामें झालें नित्य निष्काम ।
प्रत्यक्ष भेटला श्रीराम । विश्रामधाम जगाचें ॥ १०३ ॥
दुष्टकर्मी हाडखायेर । त्यासी भेटला रघुवीर ।
हा सांगाचा बडिवार । वदावया वक्त्र सरेना ॥ १०४ ॥

संताची लक्षणे व गुरुदास्याचे महत्त्व :

कोण तो संत म्हणसी । जेणें भेट होय श्रीरामासी ।
ऐक त्याच्या चिन्हांसी । यथामतीसीं सांगेन १०५ ॥
स्वस्वरूपीं अवधान । करी तो मुख्य साधु पूर्ण ।त्या
सद्‌गुरू परता जाण । साधु आन असेन ॥ १०६ ॥
मुख्य साधुत्व सद्‌गुरुसी । स्वयें सेवितां तयासी ।
लात देवोनि संसारासी । ब्रह्मत्व अंगासी स्वयें घडो ॥ १०७ ॥
सकळ साधनां श्रेष्ठ पूर्ण । मुख्यत्वें गुरुसेवन ।
गुरुदास्या परतें जाण ।साधन आन असेना ॥ १०८ ॥
निष्काम पुण्याचिये जोडी । केल्या होती जन्मकोडी ।
तैं लाहि जें रोकडी । निजावडी गुरुचरणी ॥ १०९ ॥
नाना साधनीं बहुत । कदा काळें नव्हे प्राप्त ।
तो गुरुदास्यास्तव येथ । होयप्राप्त निजात्मा ॥ ११० ॥
तीर्थातीर्थाचिया प्रदक्षिणा । क्षम नुपजे ज्ञानध्याना ।
तेणें गुरुवचनासाठीं जाणा । आत्मदर्शन लाहिजें ॥ १११ ॥
योगयागादि नाना व्रतें । स्वतां सामर्थ्य नाहीं त्यातें ।
देखिलिया सद्‌गुरुतें । मुरडती समस्तें लाजोनी ॥ ११२ ॥
याकारणें भलतेणें । उठावया संसारधरणें ।
दृढ गुरुदास्य करणें । येर साधणें काज नाही ॥ ११३ ॥
मुखी सद्‌गुरुनामस्मरण । मनीं गुरुमूर्तीचें ध्यान ।
श्रवणीं गुरुचरित्रश्रवण । करी पूजन पादसेवा ॥ ११४ ॥
पायीं नित्य-दक्षिण अथवा को दर्शनागमन ।
बुद्धीचा निश्चयी पूर्ण । अज्ञा प्रमाण संप्रदायें ॥ ११५ ॥

प्रेमातिशयाने त्रिजटा मूर्च्छित :

ऐसें सांगतांसांगतां । पूर्ण भरतें दाटलें ।
न सांभाळे प्रेमावस्था । पडली तत्वतां मूर्च्छित ॥ ११६ ॥
तें देखोनियां समग्र । अवघीं केला जयजयकार ।
गुरुमाहात्म्यचरित्र । अति पवित्र महामहिमा ॥ ११७ ॥
साचार श्रीरामाची प्रासी । गुरुवचनी असे तिष्ठती ।
येवढी गुरुदास्थाची स्थिती । त्रिजटा ख्याती अनुवादली ॥ ११८ ॥
सौमित्रादि बिभीषण । सुग्रीव आणि हनुमान जाण ।
मूर्च्छित सकळ वानरगण । चरित्र पावन ऐकोनी ॥ ११९ ॥
ते देखतांचि राबवा । आकळिलें अति कणवा ।
विसरला निजस्वभाव॥ उठाउठीं खेंवा मिठी घाली ॥ १२० ॥
प्रयासीं सुटलें आलिंगन । परी दोघांही नाही दोनी पण ।
बाप कृपाळु रघुनंदन । आनंदला पूर्ण भक्तकीर्ती ॥ १२१ ॥
आपुलें प्रतिबिंब पूर्ण । ते हे साधु सजन ।
ऐसें जाणोनि आपण । त्रिजटा देखोन सुखाचे ॥ १२२ ॥
लोटांगण घालोनि सकळांसी । त्रिजटा बोले अति प्रीतीसीं ।
भावें भजतां सजनांसी । भेट अनायासीं श्रीरामाची ॥ १२३ ॥

संतनिंदेचे दुष्परिणाम :

हेळणा कां द्वेषण । सजनांचें करितां संपूर्ण ।
उभयलोकीं निंद्य जाण । नरक दारुण तयासी ॥ १२४ ॥
इहलोकीं जननिंद्य । पुढें दारुण नरकबाध ।
वार्ता नव्हे अर्थवाद । प्रत्यक्ष संबंध घडलासे ॥ १२५ ॥
माझी भगिनी शूर्पणखा । विरोधतां रामनायिका ।
स्वयें मुकली काना नाका । निंद्य लौकिका पैं झाली ॥ १२६ ॥
म्यां सेविली सीता सती । तेणें मज श्रीरामप्राप्ती ।
विरोधतां जानकीपती । नरकप्राप्ती शूर्पणखे ॥ १२७ ॥
इहलोक ना परलोक । स्वयें निंदिती नीच लोक ।
ऐसी दशा अलौकिक । विरोधितां देख सजन ॥ १२८ ॥
त्रिजटा निजप्रतीती । अनुवादतां अति प्रीतीं ।
आनंदली त्रिजगती । सुर वर्षती सुमनभार ॥ १२९ ॥

सीता, बिभीषण आणि प्रमुख वानरांना त्रिजटेचे लोटांगण :

जानकीसी लोटांगण । घालूनि दिधलें आलिंगन ।
तैसाचि सौमित्र जाण । प्रेमेंकरोन आलिंगिला ॥ १३० ॥
देखोनियां बिभीषण । हरिखें घाली लोटांगण ।
तुझेनि धर्मेकरोनि जाण । वंशोद्धरण श्रीरामें ॥ १३१ ॥
शरण जाऊनि श्रीरामासी । उद्धारिलें सकळ कुळासी ।
कीर्ति पावन सकळ जगासीं । हाडखाइरासीं रामभजन ॥ १३२ ॥
सुग्रीव अंगद जांबवंत । जुत्पती मिनले समस्त ।
येरी अत्यादरें तेथ । नमन करीत सर्वांसी ॥ १३३ ॥

मारूतीला वंदन व त्याची प्रशंसा :

पुढे देखोनि मारुती । आनंद उथळला चित्तीं ।
लोटांगण अति प्रीती । मिठी घालिती हनुमंता ॥ १३४ ॥
तुझें नाम मारुती । तूं प्राण सकळांचा निश्चितीं ।
तुझेनि सकळां स्थितिगती । चाळक श्रीरधुपतीचा होसी ॥ १३५ ॥
प्राणें प्राण्या निजगती । प्राणें प्राण्या नित्यविश्रांतीं ।
प्राणें प्राण्या जीवनस्थिती । प्राणी वर्तती निजप्राणे ॥ १३६ ॥
असो आणिकांची स्थिती । जानकीचा प्राण तूं निश्चितीं ।
घेवोनि येऊनि श्रीरघुपती । लंकापती निवटिला ॥ १३७ ॥
सोडविल्या सुरपंक्ती । बिभीषणा राज्यप्राप्ती ।
भेटवोनि सीते रघुपती । राक्षसपंक्ती उद्धरिली ॥ १३८ ॥
नमन करितां सीता सती । न पाहेचि रघुपती ।
सुग्रीवादि सकळ जुत्पती । करितां विनंती पाहेना ॥ १३९ ॥
बिभीषण आणि सौमित्र । सकळ सुरवरांचा भार ।
विनवितां अति तत्पर । चरित्र पावन त्रिलोकीं ॥ १४० ॥
ते काळीं तुवां आपण । प्रबोधोनि रघुनंदन ।
ख्याती केली दारुण । पावन चरित्र त्रिलोकीं ॥ १४१ ॥
दिव्या उतरोनि सीतेसी । प्रसन्न केलें स्वामीसीं ।
अति प्रीतीं ऐक्यतेसी । प्रकृति पुरुषासी भेटविली ॥ १४२ ॥
तुझिया उपकाराचे स्वामी । अवघे जाण ऋणी आम्ही ।
ते प्रकृति सरती श्रीरामीं । तुझ्या धर्मी पैं झाली ॥ १४३ ॥
प्रकृति पुरुषां एकात्मता । तुझ्या हातीं गा हनुमंता ।
देहो श्रीरामीं सरता । होय तत्वतां तुझेनि ॥ १४४ ॥

मारुतीकडून त्रिजदेला वंदन व परस्परांचे रामगुणसंकीर्तन :

ऐसें करितां विनवण । हनुमान घाली लोटांगण ।
प्राणांचा चाळक रघुनंदन । सकळ पावन त्याचेनि ॥ १४५ ॥
बहुत बोलोनि कार्य कोण । सकळीं स्मरावा रघुनंदन ।
तेणें त्रैलोक्य पावन । सकळोद्धारण श्रीरामें ॥ १४६ ॥
ऐसें श्रीराममहिमान । परस्परें भक्तजन ।
करिते झाले वर्णन । श्रीरामध्यानसंनिष्ठ ॥ १४७ ॥
ऐकतां निजभक्तकथा । परमानंद श्रीरघुनाथा ।
विस्मित होवोनि तत्वता । भक्तचरित्रा पहातसे ॥ १४८ ॥

पुष्पक विमानातून अयोध्येस जाण्याची रामांना बिभीषणाची विनंती :

तंव शरणागत बिभीषण । घेवोनि कामग विमान ।
लोटांगणी रघुनंदन । प्रीतीकरून विनविला ॥ १४९ ॥
कुबेरापासोनि विमान । रावणें हरितलें आपण ।
तें निवेदोनि बिभीषण । करी विनवण श्रीरामा ॥ १५० ॥
जानकीसहित आपण । सवें सुमित्रानंदन ।
येथें करावे आरोहण । करावया गमन अयोध्ये ॥ १५१ ॥
अति रमणीय कामग । संकल्पमात्रें सवेग ।
अपेक्षित स्थळ अव्यंग । न लागतां निमेष पाविजे ॥ १५२ ॥
ज्वाळमाळाकिंकिणीं । सुवर्णमयरत्‍नाभरणी ।
पाचपेरोजांची मांडणी । तेजें दिनमणी आच्छादी ॥ १५३ ॥
पताका झळकती अंबरीं । मुक्तघोषांचिया हारी ।
हिरे माणिकें विचित्रपरी । अतिकुसरीं७ खेवणिलीं ॥ १५४ ॥
ऐसें अति मंडित विमान । पुढें देवोनि बिभीषण ।
करोनि चरणांसी नमन । कर जोडून राहिला ॥ १५५ ॥
तें देखोनियां रघुपती । संतोषला निजचित्तीं ।
अति मंजुळ मधुरवृत्तीं । बिभीषणाप्रती अनुवादे ॥ १५६ ॥

परवस्तूच्या उपभोगास रामांचा नकार :

जितुकें रावणाचें वैभव । तुज दिधलें म्यां सर्व ।
तुवां बैसोनियां स्वयमेव । सुखगौरव भोगावें ॥ १५७ ॥
जेव्हां निवटिला दशाननी । तेव्हांचि तुझी राजधानीं ।
ऐसें सर्वथा जन मानी । परमभोग पतनीं घालिती । १५८ ॥
परममुक्त जो विषये । सर्वथा नातळती योगिये ।
कदाचित इच्छा जाये । तैं व्यभिचार पाहें पै केला ॥ १५९ ॥
बिभीषण झणें भाविसी चित्तीं । ज्यासी नातळे रघुपति ।
ते आपणासीं भोग्य न होती । ऐसें सर्वाथीं न म्हणावें ॥ १६० ॥
लंकेचें राज्य समस्त । तुम्हां भोग्य परंपरागत ।
म्हणोनि अधिकार येथ । भोगीं साद्यंत असे तुम्हां ॥ १६१ ॥
ऐसें बोलतां रघुनंदन । तटस्थ झाला बिभीषण ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥ १६२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
त्रिजटादर्शनं नाम एकसप्ततितमोऽध्यायः ॥ ७१ ॥
॥ ओव्या १६२ ॥ श्लोक ७ ॥ एवं १६९ ॥