Ramayan - Chapter 6 - Part 62 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 62

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 62

अध्याय 62

रावणाचा शिरच्छेद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाची स्थिती व श्रीरामस्वरुपावलोकन :

सोहंभावाचा मेढा सुलक्षण । अनुसंधानाचा तीक्ष्ण बाण ।
लक्षूनियां रघुनंदन । स्वयें रावण विंधो पाहे ॥ १ ॥
तंव अवघा ब्रह्मांडगोळ । रामें व्यापिला दिसे सकळ ।
तेथें कायसें जगतीतळ । रामें प्रबळ वाढिन्नला ॥ २ ॥
सत्पपाताळातळीं चरण । श्रीरामाचे देखे रावण ।
ऐका तयाचें लक्षण । सुलक्षण सुचिन्हीं ॥ ३ ॥
निजधैर्यशेषफडीवरी । श्रीरामचरण निर्धारीं ।
सुचिन्हें शोभती कवणेपरी । नवलपरी तेथींची ॥ ४ ॥
अनुपम चरणपंकज । शोभे सायुज्याचा ध्वज ।
उर्ध्वरेखा ते सहज । दावी वोज उर्ध्वगतीची ॥ ५ ॥
वज्र आणि अंकुश दोन्ही । भक्तसाह्यालागोनी ।
विपक्षीं अंकुश ओढोनी । भक्तरक्षणीं छेदी वज्रें ॥ ६ ॥
अनंतसूर्यांची किरणें । जैसीं मिरवती बाळपणें ।
त्यातें आणोनियां उणें । अधिकगुणें चरणतळा ॥ ७ ॥
जैशा नभाचिया कळिका । तैसी शोभा अंगुळिका ।
शोभताती अलोकिका । रसातळलोकापर्यंत ॥ ८ ॥
नखचंद्री चंद्ररेखा । रमा रातली चरणपीयुखा ।
गंगेचें तें माहेर देखा । सकळ लोकां उद्धरी ॥ ९ ॥
कैशी घोंटियांची बरव । हे तंव निर्गुणाचे अवयव ।
वरी कळावियांची ठेव । सागरीं अपूर्व श्यामलहरी ॥ १० ॥
तळातळ लोक जाण । तेणें वसविलें संपूर्ण ।
वांकीतोडरांचें महिमान । वर्णावया वदन मज कैंचें ॥ ११ ॥
यमनियमांच्या कुसरीं । मनें मुरडिली माघारीं ।
जे सोहंभावाच्या गजरीं । वांकी निर्धारीं गर्जत ॥ १२ ॥
भवस्वर्गा प्रळयकाळ । नामें प्रळयघंघाळ ।
तोडर गर्जोन केवळ । सांगे प्रबळ सायुज्यदान ॥ १३ ॥
सूर्यबिंबामाजी प्रभा । तैसी जानुचक्रीं शोभा ।
महातळींचा तो गाभा । दिसे उभा शोभत ॥ १४ ॥
ऊरुंची शोभा अद्‍भुत । सुतळलोक जेथें नांदत ।
बळिराजा नित्यांकित । राज्य करित पैं तेथें ॥ १५ ॥
बळि चरणाचा अनुरक्त । केंवी राहिला सुतळांत ।
त्या बळीचा निश्चितार्थ । ऐका सुनिश्चित सांगेन ॥ १६ ॥
उर्ध्वलोका देवोनि लात । अधोवदनें नित्यव्रत ।
सुतळीं राहोनि निवांत । चरण चिंतित रामाचे ॥ १७ ॥
राहोनियां मध्यालोकीं । श्रीरामतें अवलोकी ।
सांडोनियां अधऊर्ध्वाची उखी । मेळवित एकीं श्रीरामीं ॥ १८ ॥
कटिप्रदेशीं वितळलोक । विस्तारला एकाएक ।
पाहतां तेथींचा आलोक । लोकालोक हारपे ॥ १९ ॥
सर्वांमाजी तोचि मध्य । शोभा शोभे विद्‌गद ।
अतळलोक प्रसिद्ध । तये स्थानीं नांदत ॥ २० ॥
विजु देखोनि श्रीरामासी । विसरली उदयास्तांसी ।
झाली पीतांबर कासेसीं । माळ कंठींसीं मिरवत ॥ २१ ॥
श्रीराम आकळें सगळा । तेच भक्त भावार्थमेखळा ।
उपनिषदांचा पाळा । येवोनि रिघाला किंकिणींमाजी ॥ २२ ॥
चिद्ररत्‍नें कटिसूत्रकटीं । उपरी मिरवे माळगांठी ।
अनुहताच्या निजनेटीं । ध्वनि गोमटी क्षुद्रघंटा ॥ २३ ॥
झालिया स्वस्वरुपीं भेटी । जेंवी वृत्ति होय उफराटी ।
सांडोनियां मत्तचावटी । अधोदृष्टी । सलज्ज ॥ २४ ॥
तेंवी अधोमुख घंटिका । पालवीं मुक्तलग नेटका ।
कांसे लागलिया देखा । मुक्ति सकळिकां देत राम ॥ २५ ॥
उदर म्हणती दामोदर । परी तें जगदुदर साचार ।
त्रिलोकत्रिवळी सुंदर । वरी मनोहर रोमरेखा ॥ २६ ॥
अनंतब्रह्मांडसाटोवा । कीं विश्रांति सकळ जीवां ।
म्हणोनि दामोदर या नांवा । मिरवावया ख्याति झाली ॥ २७ ॥
नाभि सखोल निर्मळ । रजोरागें रातोत्पळ ।
सृष्टिकर्त्याचें केवळ । जन्म प्रबळ तये स्थानीं ॥ २८ ॥
भूलोकांचें अधिष्ठान । उदर श्रीरामाचें पूर्ण ।
तळीं सप्तपाताळें संपूर्ण । ऊर्ध्वलोकाचें रचन त्यावरी ॥ २९ ॥
हृदय शुद्ध अव्यंग । संकल्पविकल्पातीत सांग ।
तेथें रंगले अंतरंग । अति सभाग्य साधुजन ॥ ३० ॥
दक्षिणांगीं विप्रपादेंकरीं । आपुल्या महिम्याची थोरी ।
वाढविली प्रीतीकरीं । लात उरावरी साहोनि ॥ ३१ ॥
केवळ सुखाचेंही सुख । गुणग्रंथिरहित देख ।
साधूनि रत्‍नजडित पदक । अलौलिक शोभत ॥ ३२ ॥
सोलींव सुखाचें निजसार । श्रीरामहृदयावरी पदकहार ।
सत्वगुणीं अति सुंदर । श्रीरघुवीर शोभत ॥ ३३ ॥
भक्तिवैराग्यशुद्धिसंपुटीं । मुक्तमोतियें जन्मलीं गोमटीं ।
तेंवी श्रीरामाचिये कंठी । वैजयंती गोमटी सुरेखा ॥ ३४ ॥
चिंतात्यागें निर्म्ळ् वृत्ती । तेचि अम्लान माळा शोभती ।
भूर्लोकाची तेथें वसती । लंकापति देखत ॥ ३५ ॥
अष्टपत्री निर्मळ । अंतरीं विकसित कमळ ।
अनन्यगतीच्या दृष्टि बहळ । तुळसीदळमंडित ॥ ३६ ॥
सप्तावरणांहून उदंड । अति दिर्घ बाहुदंड ।
तन्मयाचें मिरवे कोदंड । अति प्रचंड साजिरें ॥ ३७ ॥
दुजे करीं निर्वाण । चहूं पुरुषार्थांचे बाण ।
देह‍अहंकृति रावण । वधावया जाण धरियेले ॥ ३८ ॥
दोहीं हातीं परिकर । दोन्हीं आयुधें विचित्र ।
दिशेंद्रियें दशवक्त्र । निवटावया सत्वर धरिलींसे ॥ ३९ ॥
ओंकार तोचि कंबुकुंठ । मात्रात्रयाचें मूळपीठ ।
वेद तेथोनि प्रकट । झाला उद्‌भट त्रिकांडी ॥ ४० ॥
तें महर्लोकरचन । रविता झाला रघुनंदन ।
त्यांचे श्रवणाचें महिमान । दशानन विवंची ॥ ४१ ॥
समूळ चैतन्याचें आळें । तैसे रामाचे विशाळ डोळे ।
मनोगतें पैं सकळें । एके काळी देखणें सदा ॥ ४२ ॥
पूर्वोत्तरमीमांसा दोन्ही । अहर्निशीं भजती भजनीं ।
म्हणोनियां श्रीरामश्रवणीं । कुंडालालागूनि अधिकारु ॥ ४३ ॥
श्रीराम लेणियांचे लेणें । विश्व मुक्त त्याचेनि श्रवणें ।
श्रवणेंचि देखिला रावणें । नारदवचनेंकरोनी ॥ ४४ ॥
आनंदविश्रांतीस आलें । कीं निवोनि सुख मुसावलें ।
तेंचि साचार शोभलें । वदनबिंब निमासुर ॥ ४५ ॥
त्या आनंदसागराचे तरंग । तेचि दशन सुरंग ।
अधरीं उभय दिसे योग । जीवशिवभाग एकत्र ॥ ४६ ॥
श्रीरामाचें प्रसन्न वदन । तेथें जनांसी विश्रांति गहन ।
म्हणोनि स्वर्गादिकस्थ जन । करिती ध्यान रामाचे ॥ ४७ ॥
निजनैराश्यपरिकर । एकनिष्ठता मुनिवर ।
कां अविच्छिन्न तैलधार । तैसें नासिक सुंदर श्रीराममुखीं ॥ ४८ ॥
समूळ चैतन्याचें आळें । तैसे रामाचे विशाळ डोळे ।
श्रवणांत पैं सकळे । एके काळें देखणे सदा ॥ ४९ ॥
रवि शशी निरंतर । तेजें झाले प्रकाशकर ।
तेचि सेविती स्वतंत्र । श्रीरामनेत्र होउनी ॥ ५० ॥
निजात्मबुद्धिउल्लासें । तपें केली खरपुसें ।
म्हणोनि नेत्राचेनि प्रकाशें । वसे सावकाशें तपोलोक ॥ ५१ ॥
श्रवणांत अति दीर्घता । द्वैतदृष्टी पैं होतां ।
न ये पाहतां सर्वथा । अतर्क्यता स्वभाव ज्याचा ॥ ५२ ॥
नवल तेथींचें निरीक्षण । करीत कामासीं कामन ।
डोळ्या डोळेमोहन । आवडीं जाण पडतसे ॥ ५३ ॥
जेंवी गगनोदरीं धनुष्यरेखा । तैशा भोंवया सुरेखा ।
कीं वदनेंदुचिया पीयूखा । सेविती आर्त चकोर ॥ ५४ ॥
जैसें अधिष्ठान निर्मळ । तैसें विस्तीर्ण कपाळ ।
अखंड न खंडे त्रिकाळ । त्रिवळी प्रबळ तेचि निढळीं ॥ ५५ ॥
संकल्पमृग वधिला लोभी । काढिला सोहंमृगनाभी ।
तोही अर्पिला पद्मनाभीं । निरालंबी मळवट ॥ ५६ ॥
स्वस्वरुपें प्रबळ । सबाह्याभ्यंतर निर्मळ ।
पावोनियां श्रीरामभाळ । वसती सकळ सत्यलोकीं ॥ ५७ ॥
नभ शून्यत्वा उबगलें । तें श्रीरामा शरण आलें ।
येवोनि मस्तकीं राहिलें । नीळालकीं शोभत ॥ ५८ ॥
गजेंद्रदंताची भक्तिफणी । स्वभावें मस्तकीं धरोनी ।
तियें कुरळ केश विंचरोनी । वीरगुंठी दाटिली ॥ ५९ ॥
वरी शुद्ध मनाचीं सुमनें । गुंफोनि अनुसंधानें ।
सुवासितें चैतन्यपणें । बांधितां ठेंगणें नभरामा ॥ ६० ॥
वानूं मुकुटाचा महिमा । कैंची उपमा निरुपमा ।
तेणें रचना मनोरमा । वैकुंठा आणि कैलासा ॥ ६१ ॥
ऐसें चतुदर्शभुवन । वैकुंठकैलासादिकरुन ।
प्रकाशिता रघुनंद । देखोनि रावण तटस्थ ॥ ६२ ॥
अपरिमित चौपासीं । देखोनियां श्रीरामासी ।
रावण चढला आवशीं । बाण सीतासीं लाविला ॥ ६३ ॥
समरांगणीं निजकडाडीं । बाण ओढोनि कानाडी ।
निजभिमानें हाक फोडी । लक्ष निर्वडी भेदावया ॥ ६४ ॥
अनंब्रह्मांडांचिया पंक्ती । ज्याचे कडवसां भासती ।
तो विंधावया रघुपती । लंकापति लक्ष्य पाहे ॥ ६५ ॥
तंव पिरीत झालें तेथें । स्थुळ सूक्ष्म जितुकीं भूतें ।
वेगळालीं पैं समस्ते । राम निश्चित देखतसे ॥ ६६ ॥
वानरसैन्याभीतरी । राम विंधावया बाणेकरी ।
पाहता झाळा दशशिरी । तंव प्रतिशरीरीं श्रीराम ॥ ६७ ॥
गजाकडे जंव पाहत । तंव् महावता सहित ।
गज देखिला रघुनाथ । सवेंचि पाहत रथाकडे ॥ ६८ ॥

रावणाला सर्वत्र रामसाक्षात्कार :

तंव रथवारुंसहित । सारथिशस्त्रास्त्रांसमवेत ।
ध्वजापताका मंडित । देखे लंकानाथ श्रीराम ॥ ६९ ॥
सपर्वत वानरभार । द्रुम पाषाण परिकर ।
पृथक पृथक रघुवीर । दशवक्त्र देखत ॥ ७० ॥
सौ‍मित्र बिभीषण तेथ । सुग्रीव अंगद जांबवंत ।
तार तरळादि समस्त । हनुम्यासहित श्रीराम ॥ ७१ ॥
निजसेनेचे राक्षस । रणयोद्धे रणकर्कश ।
त्यांचा लोपोनि राक्षसभास । सावकाश राम झाले ॥ ७२ ॥
फिरोनि पाहे लंकेकडे । रामरुप लंकेचे हुडे ।
गुप्तद्वारें जीं अवघडें । गूढें निगूढें राम झाला ॥ ७३ ॥
घरें चौबारें समस्त । महा सोपानें अद्‍भुत ।
दुर्गाची सामग्री समस्त । राम निश्चित होवोनि ठेला ॥ ७४ ॥
पाहतां यंत्रगोळांकडे । यंत्रद्रव्य जें अवघडें ।
दुर्धर शस्त्रें जीं अति प्रचंडें । निजनिवाडें राम झाला ॥ ७५ ॥
आपला जो का निजरथ । वारुसारथिध्वजांसहित ।
स्वयें झाला रघुनाथ । अति विस्मित रावण ॥ ७६ ॥
नेहटून पाहे जंव आपण । तंव निजहस्तींचे धनष्यबाण ।
तेंही झाला रघुनंदन । स्वयें रावण विस्मित ॥ ७७ ॥
तळीं पृथ्वीकडे पाहे । तंव ती राम झाली आहे ।
जीवनाचीं रससोये । राम स्वयें होवोनि ठेला॥ ७८ ॥
तेजाचें जें निजतेज । तें रामचि स्वयें सहज ।
वायुचें जें चळणवोज । चाळक सहज श्रीराम ॥ ७९ ॥
श्रीराम न दिसे जेथें । नभ शून्यपणें भासे तेथें ।
देखिलिया श्रीरामातें । चिद्‍गगन तेथें राम झालें ॥ ८० ॥
पवनीं दहनीं अवनीं गगनीं । रामावीण न दिसे नयनीं ।
ठेला त्रैलोक्य व्यापूनी । दशाननीं अति विस्मयो ॥ ८१ ॥
सप्तपाताळांचें अंतर । ऊर्ध्व सप्तलोकांचे पदर ।
दिशांच्या पोकळीं समग्र । स्वयें रघुवीर कोंदला ॥ ८२ ॥
निजदेह पाहे रावण । हस्तपादादि अवयव पूर्ण ।
तोही झाला रघुनंदन । रावणपण खचों पाहे ॥ ८३ ॥
अस्थि चर्म मज्जा मांस । रामें भेदिलें सप्तकोश ।
अंतरीं करोनि प्रवेश । निजहृदयास शोधित ॥ ८४ ॥
मनाचे संकल्प सर्व । स्वयें झाले पैं राघव ।
विसरोनि निजस्वभाव । उन्मनभाव बाणला ॥ ८५ ॥
बुद्धि बोधेंसीं अवचितीं । राम झाली निश्चितीं ।
विसरोनि निजस्फुर्ती । समाधिस्थिती बाणली ॥ ८६ ॥
चित्तें चिंतितां रघुनंदन । स्वयें झाला चैतन्यघन ।
तेणें भयें अभिमान । निजचिन्हही विसरला ॥ ८७ ॥
अहंकार कांपिन्नला । तो श्रीरामा शरण आला ।
तद्रूपतेचा कौल घेतला । सोहं झाला श्रीराम ॥ ८८ ॥
अंतःकरणीं व्यापक धर्म । धरुन होते प्रपंचधाम ।
तेणें देहें देखितां रघूत्तम । सर्वगत राम स्वयें झाले ॥ ८९ ॥
कायसी सुवेळा निकुंभिळा । राम झाला बोरीबाभळा ।
दशकंठ भ्रमित झाला । पाहूं लागला दशदिशा ॥ ९० ॥
जिकडे पाहे तिकडे हरी । रावण पडला भ्रमचक्रीं ।
भ्रमतसे चक्राकारीं । राम निर्धारीं लक्षेना ॥ ९१ ॥
येरीकडे रघुनंदन । तन्मयाचें कोदंड जाण ।
घेऊनि सायुज्यतेचा बाण । सीतीं पूर्ण सज्जिला ॥ ९२ ॥

श्रीरामांच्या दोन हातांची स्थिती :

पूर्ण कानाडी ओढोनि पाहीं । बाण सोडितां लवलाहीं ।
श्रीरामाच्या हस्तीं दोहीं । अपूर्व कांही वर्तलें ॥ ९३ ॥

आकृष्टे युधि कार्मुके रघुपतेर्वामो‍ऽब्रवीद्दक्षिणम् ।
पुण्ये कर्माणि भोजनेच भवतः प्रागल्भ्यमस्मिन्न किम् ॥
वामान्यः पुरब्रवीत्तमपि रे पृच्छाम्यहं स्वामिनम् ।
छिंद्यां रावणमस्तकानि युगपच्चेकैकमादिश्यताम् ॥१॥

श्रीरामाचें दोनी हस्त । परस्परें अनुवादत ।
तेणेंचि स्वामीचा पुरुषार्थ । हर्षें सांगत जगासी ॥ ९४ ॥
श्रीराम अति आवेशीं । बाण लावोनि सीतासीं ।
ओढिता दक्षिणहस्तासीं । गेला कानापासीं कानाडी ॥ ९५ ॥
तंव वाम बोले दक्षिणाप्रती । युद्धी भिडतां रघुपती ।
मागें सरलासि युद्धख्याती । वीरवृत्ती हे नोव्हे ॥ ९६ ॥
पुण्यकाळ देखोनियां पुढें । धांवोनि येसी लवडसवडें ।
दान करिसी वाडेंकोडें । श्रेय निवाडें घ्यावया ॥ ९७ ॥
तैसाच सत्यकर्माच्या ठायीं । पुढें धांवसी लवलाहीं ।
भोजनाच्याही समयीं । कवळ पाहीं घ्यावया ॥ ९८ ॥
जैसा तेथें पुढें होसी । तैसा आजि रणभूमींसीं ।
पुढे होवोनि वेगेंसीं । पुरुषार्थासी दाखवीं ॥ ९९ ॥
जेणें बळें सत्कर्मासीं । पुढें होसी आवेशीं ।
तेणें बळें रणभूमीसी । पुरुषार्थासी दाखवीं ॥ १०० ॥
आजिवरी समग्र वित्त । स्वामींचें भोगिलें समस्त ।
युद्धसमयीं मागें सरत । हें अनुचित सर्वथा ॥ १ ॥
ऐकोनि वामाचें बोलणें । दक्षिण हांसिन्नला सत्राणें ।
निर्बळासी पुढें करणें । लाजिरवाणें आपणासी ॥ २ ॥
धनुष्य देवोनि तुजप्रती । पुढें करितांचि काकुळती ।
येवोनि बोलिलासि छळणोक्ती । युद्धख्याती न करवे ॥ ३ ॥
पुढें जावोनि काय केलें । रणीं थोटावलें राहिलें ।
संधान न करवे वाहिलें । वल्गैजलें वृथाचि ॥ ४ ॥
रणीम् पाठी नाहीं दिधली । जे तूं बोलसी छळणबोलीं ।
वीरवृत्तीची तुवां भली । नाहीं देखिली युद्धरचना ॥ ५ ॥
मागें सरोनि कानासीं । पुसतसें गुज स्वामीसीं ।
कैसें निवटूं रावणासी । हें मजपासीं सांगावें ॥ ६ ॥
दहाही शिरें एकवट । कीं निवटूं वेगळाले कंठ ।
स्वामी सांगावें हें स्पष्ट । रावण दुष्ट वधावया ॥ ७ ॥
तव नीचाचा ऐसाचि स्वभावो । की फाटकियांत शिरवावा पावो ।
तुवां पुढें जावोनि पहा हो । कोण आवो साधिला ॥ ८ ॥
ऐसें निजहस्ताचें लाघव । ऐकोनि सुखावे रघुराव ।
तंव येरीकडे पहा हो । रावणें अपूर्व मांडिलें ॥ ९ ॥
त्या दोघांचिया रणासीं । कैचे सामर्थ्य उपमेसीं ।
त्याची उपमा साजे त्यासी । पैस वैखरीसीं असेना ॥ ११० ॥

गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः ।
रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव ॥२॥

श्रीराम – रावणाचे युद्ध अनुपम :

सगळें सांठवे गगन । ऐसें दुसरें कैचें आन ।
तैसें रामरावणांचें रण । उपमा समान त्याची त्यासी ॥ ११ ॥
सागरासारिखा आन । दुजा सागर कैंचा भिन्न ।
म्हणोनि त्याचे उपमे समान । न दिसे चिन्ह आणिक ॥ १२ ॥
तैसें रामरावणांचे रण । त्यासीं उपमा रामरावण ।
म्हणोनि उपमेसीं पूर्ण । उपमावक्तेपण मज नाहीं ॥ १३ ॥

श्रीरामपूजनाबद्दल रावणाचा उल्लास :

कोदंडपाणि रघुनाथ । गगनभरी लखलखित ।
देखोनियां लंकानाथ । हर्षितचित्त पैं झाला ॥ १४ ॥
जन्मजन्मांतरीं बहुतां । नाना साधनीं कष्टतां ।
भेटी झाली श्रीरघुनाथा । म्हणोनि तत्वतां पूजित ॥ १५ ॥
उभा रणांगणामाझारी । नाहीं पूजेची सामग्री ।
म्हणोनि रामातें बाणधारीं । रावण गजरीं पूजित ॥ १६ ॥
करोनि बाणांच्या अक्षता । त्यांही श्रीरामातें पूजितां ।
उल्लास रावणाच्या चित्ता । अति सादरता पूजेची ॥ १७ ॥

सर्व भूतांत सर्वत्र रावणाला श्रीरामांचा भास :

पूजावया राघवेशा । रावण पाहे जंव आकाशा ।
तंव राम कोंदला दशदिशां । निजमानसा उल्लास ॥ १८ ॥
लक्षोनियां रघुनंदन । भलतेकडे टाकी बाण ।
नेणे स्वसैन्य परसैन्य । करी संधान अद्‍भुत ॥ १९ ॥
पुढें लक्षोनि रघुनंदन । जंव आवेशीं विंधी रावण ।
तंव पाठीसीं धनुष्यबाण । घेवोनि जाण उभा असे ॥ १२० ॥
मागें विंधो जाय रावण । तंव वामांगी रघुनंदन ।
तिकडे करी जंव संधान । तंव दिसे दक्षिणांगीं ॥ २१ ॥
अधऊर्ध्वदिशा समस्त । कोंदला देखोनि रघुनाथ ।
बाणीं सर्वत्र पूजित । तेणें हांसत सुरसिद्ध ॥ २२ ॥
राक्षस म्हणती रावण । भ्रमला अतिशयें दारुण ।
आम्हांसीच विंधितो बाण । रणकंदन मांडिलें ॥ २३ ॥
राम राहिला एकिकडे । रावणेंचि निजनिवाडें ।
आमुचें काढियेलें मेढे । कोणीकडे पळों आतां ॥ २४ ॥
स्वर्गीं हांसती सुरगण । सिद्ध हांसती संपूर्ण ।
गणगंधर्वादि चारण । खदखदून हांसती ॥ २५ ॥
वानर हांसती वाडेंकोडें । रावण रामें केले वेडें ।
आपुलें पारिखें न दिसे पुढें । जिकडे तिकडे शरटाकी ॥ २६ ॥
न कळें कोणासी मात । रावणाचें अनुचरित ।
राम देखोनि सर्वगत । बाणीं पूजित अति प्रीतीं ॥ २७ ॥
देखोनियां सर्वगत । भजे जो कां अनुरक्त ।
जन त्यासी म्हणती भ्रांत । अंतवृत्त कळेना ॥ २८ ॥
विपरीत ठसा जनाचा । अतिशयें गुंता प्रपंचाचा ।
त्यासी म्हणताती दैवाचा । ऐसा लोकांचा निजबोध ॥ २९ ॥
जो उदास प्रपंचासीं । निर्दैवी करंटा म्हणती त्यासी ।
अंतर न कळे कोणासी । सांगतां त्यांसी पैं नये ॥ १३० ॥
गूळ गोड स्वभावतां । परी तो न माने सर्पग्रस्तां ।
अंतरीं ज्वरें व्यापिलें असतां । दुग्ध सर्वथा म्हणे कडू ॥ ३१ ॥
ऐसीच लौकिकाची स्थिती । न कळे हरिभक्तांची वृत्ती ।
सर्वत्र पूजितां रघुपती । भ्रम मानिती सकळिक ॥ ३२ ॥
रावणाची सर्वगतता । जाणोनियां रघुनाथा ।
कृपा उपजली चित्ता । होय सोडिता बाणातें ॥ ३३ ॥
बाह्य क्रोधाचें विंदान । अंतरीं कृपेचें आयतन ।
जेंवी मातेचा कोप दारुण । करीत ताडन दोषत्यागा ॥ ३४ ॥
देहदोषें अहंरावण । बहुसाल पीडिला देखोन ।
निजकृपा कळवळोन । स्वस्वरुप जाण देऊं पाहे ॥ ३५ ॥

ततः क्रुद्धो महाबाहू रघूणां कीर्तिवर्धनः ।
संधान धनुषा रामो बाणमाशीविषोपमम् ॥३॥
तेन तस्य शिरश्छिन्नं श्रीमज्ज्वलितकुंडलम् ।
तच्छिरःपतितः भूमौ दृष्टं लोकैस्त्रिभिस्तदा ॥४॥
तस्यैव सदृशं चान्यद्रावणस्योच्छ्रितं शिरः ।
तत्क्षिप्रं क्षिप्रहस्तेन रामेणाक्लिष्टकर्मणा ॥५॥
द्वितीयं रावणशिरश्छिन्नं संयति सायकैः ।
छिन्नमात्रं ततः शीघ्रं पुनरन्यत्प्रदृश्यते ॥६॥
तदेप्यशनिसंकाशैश्चिन्नं रामेण सायकैः ।
एवमेव शतं छिन्नं शिरसां तुल्यवर्चसाम् ॥७॥
न चैव रावणस्यांतो दृश्यते जीवितक्षये ॥८॥

त्यामुळे रावणाचे कंठावर प्रहार होऊन त्याची दहाही शिरे पडली :

सायुज्याचा निर्वाणबाण । निज कृपेचें संधान पूर्ण ।
करोनियां रघुनंदन । कंठनाळ जाण छेदिलें ॥ ३६ ॥
दिव्यतेजें अद्‍भुत । मुकुटकुंडलें समवेत ।
कंठ छेदितां रघुनाथ । आश्चर्य तेथ वर्तलें ॥ ३७ ॥

परंतु पुनः तशीच अगणित शिरे वर आली व गेली :

दहाहीं शिरें भूमीं पडतां । आणीक तैसींच तत्वतां ।
निगतीं झाली लंकानाथा । सुरां समस्तां विस्मयो ॥ ३८ ॥
तंव श्रीरामाचा अमोघ बाण । संपूर्ण कार्य साधिल्यावीण ।
मागें सरों नेणे आपण । तेणें मागुतें निवटिलीं ॥ ३९ ॥
दहाहीं शिरें लंकानाथीं । पुनःपुनः प्रसवती ।
बाण सवेंचि निवटिती । अत्यद्‍भुत लाघव ॥ १४० ॥
शिरें पुनः पुनः निघती । बाण तितुकींही निवटिती ।
वानर जयजयकार गर्जती । विमानीं हांसती सुरसिद्ध ॥ ४१ ॥
अनंत शिरांचिया राशी । रावण प्रसवे आवेशीं ।
तितुकीं निवटितां बाणासीं । निजमानसीं आनंद ॥ ४२ ॥
बाण छेदित क्षणक्षणां । तरी अति उल्लास रावणा ।
पूजावया रघुनंदना । शिरें जाणा प्रसवत ॥ ४३ ॥
रावणाचार भाव पूर्ण । सर्वगत श्रीरघुनंदन ।
देखोनियां आपण । करी निंबलोण निजशिरीं ॥ ४४ ॥
कंठीं लागतां श्रीरामबाण । अति आल्हादें रावण ।
पूजिता झाला रघुनंदन । सावधान अवधारा ॥ ४५ ॥
सर्वगत श्रीरामासी । देखोनि रावण उल्लासीं ।
निजशिरें अति प्रीतीसीं । राघवासी ओंवाळी ॥ ४६ ॥
अति उल्लासीं लंकानाथ । दहाही शिरें ओंवाळित ।
तेणें धणी न माने चित्त । मग प्रसवत आणिक ॥ ४७ ॥
अल्प अर्पितां श्रीरामचरणीं । न पुरे रावणाची धणी ।
छेदोनि श्रीरामबाणीं । अर्पित चरणीं अति प्रितीं ॥ ४८ ॥
अल्प अर्पितां श्रीरामचरणीं । अनंत विस्तार त्रिभुवनीं ।
ऐसा निश्चय कळावया जनीं । शिरें रामचरणीं अर्पित ॥ ४९ ॥
निजशिरांची लक्षपूजा । रावणें केली रघुराजा ।
देह धरिला जया काजा । तें अति वोजा साधिलें ॥ १५० ॥
अनंत शिरांचिया राशी । अर्पितां श्रीरामचरणांसी ।
अति उल्लास रावणासीं । निजहरिखेंसीं बोलत ॥ ५१ ॥
श्रीरामाचें निजसामर्थ्य । स्तविता झाला लंकानाथ ।
श्रोतीं अवधान द्यावें तेथ । अति विख्यात चरित्र ॥ ५२ ॥
श्रीरामरावणांचें श्रवण । श्रोता वक्ता अतिपावन ।
एका जनार्दना शरण । श्रीरामकथन अवधारा ॥ ५३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणशिरच्छेदनं नाम द्विषष्टितमोऽध्यायः ॥ ६२ ॥
ओंव्या ॥ १५३ ॥ श्लोक ॥ ८ ॥ एवं ॥ १६१ ॥