Ramayan - Chapter 6 - Part 48 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 48

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 48

अध्याय 48

श्रीरामांच्या क्रोधाचे शमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भरतास वंदन करुन हनुमंताचे वृत्तांत-कथन :

देखोनि भरतप्रेमासी । नमन करोनि वेगेंसीं ।
सांगावया रामकथेसी । प्रेम कपीसीं अनिवार ॥ १ ॥
आम्हां निश्चयमनें । स्वयें राम अनुभवणें ।
जगीं रामरुप देखणें । भरतोल्लंघन केंवी घडे ॥ २ ॥
बंधु धाकटा रामाचा । तोही आम्हां राम साचा ।
केंवी उल्लंघूं याची वाचा । लावीन कथेचा अन्वय ॥ ३ ॥
भरता ऐकें सावधान । चित्रकुटीं रघुनंदन ।
देवोनि तुम्हांसी समाधान । पुढारें गमन मांडिलें ॥ ४ ॥
घेवोनि अगस्तीची भेटी । सांगोनियां गुह्य गोष्टी ।
शरभंगऋषि जगजेठी । उठाउठीं उद्धरिला ॥ ५ ॥
विराध येवोनि आडवा । सीता उचलोनि निघे तेधवां ।
रामें करोनि बाणलावा । महाबाहो मारिला ॥ ६ ॥
जटायुसीं सख्य पडिलें । येवोनि पंचवटीसीं राहिले ।
आश्रम मनोरम रचिले । राखण ठेविलें जटायूसी ॥ ७ ॥
करितां वनविहारासी । सौ‍मित्रें मारिलें शंबरासी ।
शूर्पणखा माता होय त्यासीं । लक्ष्मणासी छळूं आली ॥ ८ ॥
सौ‍मित्रें केले विंदान । सवेग छेदिले नाक कान ।
खरदूषणां गेली शरण । रामलक्ष्मण मारावया ॥ ९ ॥
चौदा सहस्र रक्षोगण । त्रिशिरा आणि खर दुषण ।
श्रीराम लक्षोनी आपण । दारुण रण करुं आले ॥ १० ॥
एकलेनि रामें आपण । मारिले न लागतां क्षण ।
मुक्त करोनि जनस्थान । द्विजां दान दिधलें ॥ ११ ॥
ऐकोनियां हे मात । तळमळी लंकानाथ ।
सीताहरणासी उद्यत । छळणार्थ करुं आला ॥ १२ ॥
मृगवेष दिधला मारीचासी । देखतां सीता उल्लासी ।
त्वचा मागे कांचोळीसीं । श्रीराम त्यासी मारुं गेला ॥ १३ ॥
मायेचा मृग निघे बाहेरी । राम काढोनि नेला दूरी ।
जटाय़ू चरूं गेला वनांतरी । सीता सुंदरी एकली ॥ १४ ॥
रक्षण ठेविला लक्ष्मण । ऐकोनि मायामृग वचन ।
त्याचें करोनियां छळण । दिला दवडोनि सीतेनें ॥ १५ ॥
रावण येवोनि कपटेंकरीं । हरिली जानकी सुंदरी ।
जटायु धांवला झडकरी । त्यासी मारी रावण ॥ १६ ॥
राम आला धांवोन । तंव जताय़ूसीं होतां प्राणोत्क्रमण ।
करोनि त्याचें उद्धरण । पुढें आपण चालिला ॥ १७ ॥
हातपायावीण मोधळा । कबंध गिळावया आला ।
रामें निजबाणें छेदिला । पाठविला वैकुंठा ॥ १८ ॥
पंपातीरीं महावीर । आम्ही भेटलों वानर ।
स्वामी मिनला रामचंद्र । भाग्य थोर आमुचें ॥ १९ ॥
वालिसुग्रीवां वैर भारी । दारराज्य हिरोनि झडकरी ।
आम्हां घालोनि बाहेरी । राज्य करी किष्किंधे ॥ २० ॥
शरण आलों रामासीं । रामें कुढाविलें आम्हासी ।
मारोनियां वाळीसी । सुग्रिवासी स्थापिलें ॥ २१ ॥
वालिसुत युवराजा । करोनि सीताशुद्धिचिये काजा ।
झडकरी पाठविला वोजा । सांगातें मज दिधलें ॥ २२ ॥
सीताशुद्धी आणिली तिहीं । मग निघाले लवलाहीं ।
कपिसैन्य चालवीत पाहीं । दोहीं बाहीं रघुराजा ॥ २३ ॥
बिभीषण शिकवी रावणासी । न मानी तो त्याच्या वचनासी ।
लाता हाणितल्या त्यासीं । तो आला रामापासीं पैं शरण ॥२४ ॥
वानरसैन्य अपरिमित । हातीं पर्वत झेलित ।
सागरीं गालिती त्वरित । हेळचि सेतू बांधिला ॥ २५ ॥
करोनियां लंकालाग । वानर प्रवेशले दुर्ग ।
आगी लावोनि वस्तु सवेग । अनेक जाळिल्या ॥ २६ ॥
राक्षससैन्य बहुसाल मरतां । कृपा उपजली भगवंता ।
एकाचिया अपराधता । लोकां समस्तां केवी मारुं ॥ २७ ॥
श्रीराम दीनदयाळ । श्रीराम स्वयें स्नेहाळ ।
श्रीराम कृपाकल्लोळ । प्रणतपाळ श्रीराम ॥ २८ ॥
राम कृपेचा कोंवळा । राम जीवींचा जिव्हाळा ।
राम कृपाळू कळवळा । लोकां सकळां देखोनी ॥ २९ ॥
रामें जगाची उत्पत्ती । रामें जगाची स्थितिगती ।
रामें जगाची विश्रांती । सच्चिन्मूर्ति श्रीराम ॥ ३० ॥
निरपराधें केंवी मारुं । म्हणोनि मांडिला शिष्टाचारु ।
पाठविला अंगदवीरु । अति चतुर बोलका ॥ ३१ ॥
तेणें शिकविला बहुत रीतीं । तें न मानेचि लंकापती ।
मग मांडिली युद्धख्याती । केली शांती राक्षसां ॥ ३२ ॥
युद्ध झालें घोरांदर । मंत्री प्रहस्तादि महोदर ।
इंद्रजितादि महावीर । कुमरें कुमर मारिले ॥ ३३ ॥
महाबाहु कुंभकर्ण । उभा चिरिला बिंधोनि बाण ।
आधीं नाक कान कापून । शिरःकमळ जाण छेदिलें ॥ ३४ ॥
बंधुपुत्रांचें दुःख भारी । दहाही मुखीं शंख करी ।
रावणा दुर्दशा थोरी । सुरासुरी धाक त्याचा ॥ ३५ ॥
दुःखें आरंबळला बहुत । आतुर्बळी हा रघुनाथ ।
माझें काही न चले मत । दांत खात करकरां ॥ ३६ ॥
अदट वीर कुंभकर्ण । रामें मारिला विंधोन बाण ।
इंद्रजित महावीर दारुण । सौ‍मित्रें जाण निवटिला ॥ ३७ ॥
प्रधान मारिले आघवे । सैन्य सेनानी गेले जीवें ।
एकलें म्यां काय करावें । रणीं नागवे रघुनाथा ॥ ३८ ॥
दांत करकरां खात । डोळे गरगरां भवंडित ।
रागें दोनी हात चुरित । शक्ति अद्‍भुत उचलिली ॥ ३९ ॥
शरणागत मारूं आपण । त्याकारणें सांडितील हे प्राण ।
लक्षूनियां बिभीषण । शक्ति जाण हाणितली ॥ ४० ॥
वेगीं लक्ष्मण धांविन्नला । पाठीसीं शरणागत घातला ।
शतधा शक्ति छेदून ठेला । गाढा दादुला सौ‍मित्र ॥ ४१ ॥
मंत्रीं खिळिल्या अति निगुतीं । परततां न ये मागुतीं ।
ऐसें विचारोनि चित्तीं । आली काकुळती सौ‍मित्रा ॥ ४२ ॥
मज खिळिलें अभिमंत्रून । क्षीण माझी आंगवण ।
मागें सरतां रावण । दंड संपूर्ण मज करील ॥ ४३ ॥
म्हणऊन तुज मी आलें शरण । तूं शरणागतशरण्य ।
नुपेक्षावें मजलागून । कन्या पूर्ण मी तुझी ॥ ४४ ॥
कन्या होवोनि शरण झाली । तेणें अत्यंत कृपा आली ।
सौ‍मित्र शरणागता माउली । अंगीकारिली ब्रह्मशक्ति ॥ ४५ ॥
कन्या झाली उपहत । जनक तिसी अंगीकारित ।
सौ‍मित्र अत्यंत कपाभित । थारा देत निजहृदयीं ॥ ४६ ॥
जरी उपेक्षूं इयेसी । तरी जगीं होईन उपहासी ।
ब्रह्यवरद ये शक्तीसीं । ब्राह्मण आम्हांसीं निजपूज्य ॥ ४७ ॥
द्विजवचन उपेक्षितां । पूर्ण अपजयो बैसेल् माथां ।
वधिलें जरी शरणागता । तरी अनर्थामाझारीं पडिजे ॥ ४८ ॥
जीवें जातां शरणागत । प्राण सांडील रघुनाथ ।
सुग्रीवादि कपि समस्त । प्राण निश्चित सांडितील ॥ ४९ ॥
मग माझें जिणें काय । वृथा भूमीसीं भार होय ।
चुकवावया सकल अपाय । जीवें पाहें विनटला ॥ ५० ॥
संरक्षितां शरणागत । सुख वानरां समस्त ।
सुखावेल श्रीरघुनाथा । सुर समस्त सुखी होती ॥ ५१ ॥
राम वधील रावणा । अभिषेकील बिभीषणा ।
सिद्धी पावेल पूर्णपणा । वरदवचन रामाचें ॥ ५२ ॥
एकल्या माझ्या जीवासाठीं । उल्लासती ब्रह्मांडकोटी ।
राम विजयी सकळ सृष्टीं । मजसाठीं होईल ॥ ५३ ॥
ऐसें विचारोनि चित्तीं । पसरिली अंगाची वासती ।
हृदयीं झेलिली ब्रह्मशक्ती । केली ख्याती सौ‍मित्रें ॥ ५४ ॥
शक्ति भेदितां लक्ष्मणा । गर्जे सिंहनादें रावण ।
त्यावरी चालिला रघुनंद । धनुष्यबाण सज्जूनी ॥ ५५ ॥
सोडूनियां निर्वाणबाण । तत्काळ मारावा राव ।
येरें साधिलें विंदाण । पाठी देऊन पळाला ॥ ५६ ॥
पळाल्यावरी रामरावो । सर्वाथा न करी घावो ।
ऐसा जाणोनि दृढ भावो । रावण पाठी देवोनि पळाला ॥ ५७ ॥
पळवोनियां रावण । विजयी झाला रघुनंदन ।
पाहूं आला लक्ष्मण । तंव मूर्च्छापन्न देखिला ॥ ५८ ॥
करवाळोनि अमृतहस्तीं । केली निर्वीर्य ते शक्ती ।
विशल्य न करीच रघुपती । ब्रह्मवचनापुरती राखिली ॥ ५९ ॥
ब्राह्मणाचा अतिक्रम । सर्वथा न करी रघूत्तम ।
आदरिला लौकिक धर्म । बंधूत्तम उठावया ॥ ६० ॥
बोलावोनि सुषेण वैद्यराज । पुसता झाला रघुराज ।
वेगीं उपाव सांग मज । बंधुराज उठवावया ॥ ६१ ॥
सुषेण वैद्य सुबुद्धी । आणविल्या दिव्योषधी ।
शक्ति भेदली हृदयसंधी । ते त्रिशुद्धी विरावावया ॥ ६२ ॥
सुर्योदय न होतां पहाहो । आणावा ओषधिसमुदावो ।
म्हणोनि मज धाडी रामरावो । महाबाहो परियेसीं ॥ ६३ ॥
मी आलों वेगवत्तर । नोळखें ओषधिभार ।
तेथें लागों पाहे उशीर । मग डोंगर उपडिला ॥ ६४ ॥
मार्गी जातां त्वरान्वित । तंव बाण रामनामांकित ।
देखोनि आलों येथ । तंव अद्‌भुत देखिलें ॥ ६५ ॥
रामरुपें भ्रमलें चित्त । बोल बोलिलों बहुत ।
ते क्षमा करो रघुनाथ । मर्कट उद्धत अविवेकी ॥ ६६ ॥
देखोनि तुझा आश्रम । अत्यंत झाला विश्राम ।
मनें विसरलों गमनधर्म । सर्वांही सम रामसुख ॥ ६७ ॥
पक्षी सिद्धां बोल । तेणें लाजिला वेदांत ।
सरस्वतीचित्त भ्रमित । बृहस्पति तेथ वेडावला ॥ ६८ ॥
सांडून सकळ मत्सर । भरताश्रमीं निरंतर ।
भूतें वर्तती एकत्र । निर्मत्सर रामनामें ॥ ६९ ॥

भरत – हनुमंताची तन्मयता :

वर्णितां श्रीरामाचे गुण । कपीस नाठवे कपिपण ।
हनुमान झाला मूर्च्छापन्न । देहाचें भान विसरला ॥ ७० ॥
देखोनि कपीची अवस्था । भरत ओसंडला चित्ता ।
श्रीरामगुणकीर्ति ऐकतां । विस्मित चित्ता होऊनी ॥ ७१ ॥
मन बुद्धी चितवृत्ती । अहंकाराची अहंकृती ।
रामीं मिळाली निश्चितीं । ब्रह्म स्फुर्ती विसरला ॥ ७२ ॥
अंग झालें रामांचित । वाचा झाली प्रेमसद्‌गदित ।
नेत्रीं आनंदाश्रु स्रवत । भरत मूर्च्छित पडियेला ॥ ७३ ॥
श्रवणीं ऐकतां श्रीरामचंद्रा । भरता लागली योगमुद्रा ।
विसरला तो निद्रा तंद्रा । कृपा रघुवीराची ऐसी ॥ ७४ ॥
नाठवे गेहदेहभान । रामरुपीं जडला पूर्ण ।
खुंटला बोल तुटलें मौन । भरतपण विसरला ॥ ७५ ॥
भरत विसरला भरतपण । हनुमान विसरला हनुमत्पण।
दोघांस नाठवे दोनीपण । तटस्थ पूर्ण श्रीरामें ॥ ७६ ॥
दोघे विसरले दोनीपण । कार्या आठव करी कोण ।
बाप कृपाळु रघुनंदन । चैतन्य पूर्ण चेतविलें ॥ ७७ ॥
जीवनकळा सावध केली । प्राणशक्ति परिचारिली ।
इंद्रियां पाटवता झाली । झांपडी उघडली नेत्रांची ॥ ७८ ॥
चित्त चेतनेतें धरित । मन पूर्वसंकल्प आठवित ।
बुद्धि निश्चयातें अंगिकारित । रामकार्यार्थ साधावया ॥ ७९ ॥
अकस्मात सावध होये । म्हणे मज झालें काय ।
उगाचि येथ तटस्थ आहें । आठव नोहे स्वामिकाजा ॥ ८० ॥
करुं पाहे उड्डाण । भरतें घातलें लोटागण ।
मज सनाथ न करितां पूर्ण । केंवी प्रयाण करुं पाहसी ॥ ८१ ॥
भोजन करावें येथें । तीर्थप्रसाद द्यावा मातें ।
उपेक्षूं नये आर्तातें । तुम्ही निजचित्तें कृपाळु ॥ ८२ ॥
घरा आलिया श्रीरामभक्त । पूजा न करितां जावूं देत ।
त्याच्या सकळ कर्मांचा घात । अधःपात तो भोगी ॥ ८३ ॥
ऐसी निजधर्मविवंचना । तूं जाणतोसी कपिनंदना ।
सर्वथा उदास न करीं मना । म्हणोनि चरणां लागलों ॥ ८४ ॥
येरें वारिला त्वरित । जैसा राम तैसा भरत ।
वेळोवेळां पायां लागत । हें अनुचित सर्वथा ॥ ८५ ॥
ऐकोनि कपीचें वचन । भरत झाला हास्यवदन ।
तुज सकळ धर्माचें निजज्ञान । मज चाळवण कां करिसी ॥ ८६ ॥

ब्राह्मण कुलसम्पन्नं भक्तं विष्णोर्महात्मनः ।
आयांतं वीक्ष्य नोतिष्ठेत्स दुःखैः परिभूयते ॥१॥

सर्वांसीं अगजन्मा ब्राम्हण । कुळशीळसगुणगुण ।
वेदशास्त्रसंपन्न । आलिया आपण पूजावा ॥ ८७ ॥
भलतैसा हो कां भक्त । श्रीरामभजनीं रत ।
भगवद्‍बुद्धीनें पूजा करीत । तोचि संत सर्वज्ञ ॥ ८८ ॥
ज्ञानी आत्मा विश्वाचा । भगवंतचि स्वयें साचा ।
त्यासी पूजी तो दैवाचा । परमार्थाचा असेल भागी ॥ ८९ ॥
त्याचें करील जो उपेक्षण । तो महादुःखें दारुण ।
भोगी आकल्पांत पूर्ण । उर्ध्वगमन असेना ॥ ९० ॥
तूं तंव भजनभक्तीचें । केवळ हृदय श्रीरामाचें ।
सबाह्य अभ्यंतर साचें । निश्चयाचें रामभजन ॥ ९१ ॥
ज्ञान तरी अत्यद्‍भुत । जग ब्रह्मरुप देखत ।
ब्रह्मानंदें सदा डुल्लत । ब्रह्मभूत कपिनाथ ॥ ९२ ॥
ऐसियासी देखोन । जो न करी पूजन नमन ।
तो महापापी पूर्ण । रामदर्शन त्यास कैंचे ॥ ९३ ॥
राम साधूचिये दृष्टी । राम साधूचिये गांठी ।
राम साधूचिये पोटीं । सज्जन भेटीं राम भेटे ॥ ९४ ॥
राम साधूचिये वृत्तीं । राम साधूचिये स्थितीं ।
राम साधूचिये भक्ती । श्रीरामप्राप्ती सत्संगें ॥ ९५ ॥
राम सत्संगा आतुडला । राम सत्संगा विकला ।
राम सत्संगा लाधला । राम राहिला सत्संगें ॥ ९६ ॥
भक्तां सबाह्य श्रीरामरावो । कपि स्वयें भक्तरावो ।
भाग्यें भेटला महारावो । सभाग्य पहा हो केवढा मी ॥ ९७ ॥
ऐकोनि भरताचें उत्तर । हनुमान झाला चिंतातुर ।
भरता नमूनि सत्वर । काय कपींद्र बोलिला ॥ ९८ ॥
श्रीरामानुजा तुझें वचन । सर्वथा नुल्लंघवे पूर्ण ।
संकोचित अंतःकरण । तें सावधान अवधारीं ॥ ९९ ॥
सौ‍मित्र पडिला विसंज्ञ । नाहीं घेतलें जीवन ।
येथें मी करितां भोजन । तेंचि दूषण रामभजनीं ॥ १०० ॥
श्रीराम बैसला सचिंत । वानरभार शोकाकुलित ।
बिभीषण दुःखें तळमळित । मजचि येथ आहार केंवी ॥ १ ॥
स्वामी भरता विनंती ऐक । मज द्यावें चरणोदक ।
संभावना सकळिक । तेणें देख पावली ॥ २ ॥
तुझें चरणतीर्थ घेतां । विजयी होईन सर्वथा ।
सौ‍मित्रा उठवीन तत्वतां । लंकानाथा जीवघात ॥ ३ ॥
उभवोनि रामराज्याची गुढी । तुटेल देवांची बांदवडी ।
सीता सोडवीन तांतडीं । येथें रोकडी आणीन ॥ ४ ॥
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । तंव भरत म्हणे मागुता ।
कांहीं विनवीन कपिनाथा । तें तत्वतां ऐकावें ॥ ५ ॥

भरताने हनुमंताची बाणावरुन रवानगी केली :

श्रीरामदर्शना चित्त । बहुत झालें उत्कंठित ।
आज्ञेस्तव आलों येथ । कांही मत चालेना ॥ ६ ॥
बाण तुज सवें देईन । त्यावरी करीं आरोहण ।
माझें वरचें लोटांगण । श्रीरामा आपण करावें ॥ ७ ॥
इतुकेनि कृतकृत्य । झालों तुझेनि सनाथ ।
तूं कृपाळू श्रीरामभक्त । मनोगता रक्षावें ॥ ८ ॥
श्रीरामनाम स्मरतां । तुज श्रम नाहीं सर्वथा ।
जाणोनि माझ्या मनोगता । वचनार्था संपादीं ॥ ९ ॥
ऐकोनि भरतवचन । हनुमंत विस्मयापन्न ।
कोण उल्लंघी तुझें वचन । म्हणोनि चरण वंदिले ॥ १० ॥
वाचेसीं पडिलें महामौन । राहिला दोन्हीं कर जोडून ।
येरें सज्जोनियां गुण । सीतीं बाण लाविला ॥ ११ ॥

श्रुत्वेति तस्य वचनं भरतः शराग्रे
सादिं कपिं समधिरोप्य गुणेन योज्य ।
मोघें धनुर्झटिति कुंडलितं चकार
तुष्टाव तं परमविस्मयमागतस्य ॥२॥

भरतप्रेंम अद्‍भुत । प्रेमें बांधला कपिनाथ ।
सर्वथा कांही न चले मात । बैसे पर्वतसह बाणाग्रीं ॥ १२ ॥
करोनि प्रदक्षिणा नमन । घेतलें चरणतीर्थ मागोन ।
बाणीं करितां आरोहण । येरें संधान योजिलें ॥ १३ ॥
वोढी काढोनि कानाडी । वरी बैसविला परवडी ।
गुणीं जोडून झडाडी । बाण प्रौढी सोडिला ॥ १४ ॥
करोनियां रामस्मरण । भरतें सोडिला निजबाण ।
कपि करोनियां रामस्मरण । गगनीं सबाण उसळला ॥ १५ ॥
हनुमान जातां गगनांत । गगन अवघें लखलखित ।
दिव्य तेज अद्‍भुत । तेजें भास्वत आच्छादे ॥ १६ ॥
दिव्य दुंदुभि सुरवरीं । स्वर्गीं त्राहाटिल्या भेरी ।
पुष्पवृष्टी सुरवरीं । केली शिरीं कपीच्या ॥ १७ ॥
गंधर्वाचें गायन । सिद्धांचें जयजयकारें गर्जन ।
देवांगनांचे नर्तन । कपीचें गर्जन निजगजरें ॥ १८ ॥
विजयी झाला कपींद्र । आतां उठवील सौ‍मित्र ।
निवटून राक्षसभार । दशशिर मारील ॥ १९ ॥
तुटेल देवांची बांधवडी । नृत्य करिती तांतडी ।
स्वर्गीं उभवोनी गुढी । जयजयकारें गर्जताती ॥ १२० ॥
स्वर्गीं हर्षित सुरगण । वेगीं जातसे वायुनंदन ।
आकाशमार्गें शोभायमान । क्षणें गमन दिगंता ॥ २१ ॥

हनुमंताला विलंब लागल्याने श्रीरामांना चिंता :

येरीकडे रघुनंदन । झाला अत्यंत उद्विग्न ।
सावध परी असावधपण । मार्गनिरिक्षण मांडिलें ॥ २२ ॥
कां पां न येचि कपिनंदन । कां लागलें विलंबन ।
न कळे कांही झाले विघ्न । राक्षसीं छळून मारिला ॥ २३ ॥
कीं सगळा पर्वतचि चुकला । आणखी पर्वतांतरासी गेला ।
कीम् जातां मार्गचि भुलला । वेडावला कपींद्र ॥ २४ ॥
कीं नीट तेथेंचि गेला । पर्वतही ठाकिला ।
ओषधी नोळखेचि वहिला । कीं डोळा लागला पर्वतीं ॥ २५ ॥
राक्षस कोणी निमले तेथ । तिहीं माया केली बहुत ।
गोंवून पाडिला आहे हनुमंत । कपिनाथ विटंबिला ॥ २६ ॥
तो नभीं राक्षसांसी । नाकळे सर्वथा मायेसी ।
जिंतून माया राक्षसी । निजकार्यासी लाधेल ॥ २७ ॥
ओषधीतें राखण । गंधर्व असती तेथ ।
तिहीं देखिला कपिनाथ । ओषधी घेत पर्वतीं ॥ २८ ॥
तिहीं कळी मांडिली तेथें । घेंवो न देती ओषधीतें ।
बळें मिसळोनि युद्धातें । तिहीं कपीतें गोविलें ॥ २९ ॥
हेंही न घडे कपीसीं । क्षणें मारील गंधर्वांसी ।
जगतीतळीं हनुमंतासीं । रणीं युद्धासीं न भिडवे ॥ १३० ॥
चौदा सहस्र वनकर । ऐंशीं सहस्र किंकर ।
मारिला अखयाकुमार । अदट वीर हनुमंत ॥३१ ॥
अमित राक्षसांच्या पंक्ती । क्षणें मारिल्या मारुतीं ।
तेथें गंधर्व बापुडे किती । क्षणें कपिपति निवटील ॥ ३२ ॥
न कळे काय पडली गुंती । लोटोनि गेली मध्यराती ।
हनुमान न येचि शीघ्रगतीं । रघुपति सचिंत ॥ ३३ ॥
प्राणें वेंचल्या लक्ष्मण । ओषधीचें काय कारण ।
अश्रुपूर्ण झालें नयन । लक्ष्मण केवीं वांचेल ॥ ३४ ॥

हा वीर सुमहाबाहो प्रतिवाक्यं प्रयच्छ मे ।
न त्वमर्हसि सौ‍मित्रे त्युत्कुं दुःखार्दितं हि माम् ॥३॥
अहा लक्ष्मणा काय केलें । रणीं युद्धातें सांडिलें ।
शक्तिभेदें शयन केलें । मज मोकलिलें संग्रामा ॥ ३५ ॥
त्वदियाग्निसमुत्थेन शोकेनाहं विदाहितः ।
करोम्यराक्षसामुर्वी त्रैलोक्यं च दहाम्यहम् ॥४॥

करोनि अद्‍भुत पुरुषार्थ । वांचविला शरणागत ।
शक्ति केली प्रतिहत । शरणागत तुज आली ॥ ३६ ॥
शरणागता शरण । साच एक लक्ष्मण ब्रीद दाविलें साच करुन ।
शक्ति झेलून निजहृदयीं ॥ ३७ ॥
बिभीषण घातला पाठीसीं । शक्ति धरिली पोटेसीं ।
सौ‍मिअत्रें ख्याति केली ऐसी । शरणागतासीं शरण्य ॥ ३८ ॥
येरयेरांच्या घाता वहिलीं । येरयेरें प्रवर्तलीं ।
येरयेरांच्या भयें भ्यालीं । दोनी आलीं तुज शरण ॥ ३९ ॥
बिभीषण पहिलें शरणार्थीं । पाठीसीं घातला निश्चितीं ।
सवेंचि शरण आली शक्ती । ते ठेविली त्वरित हृदयेंसीं ॥ १४० ॥
प्राण जाईल सर्वथा । परी नुपेक्षावें शरणागता ।
सौ‍मित्रें साच केलें आतां । प्राणांतव्यथा साहोनी ॥ ४१ ॥
बैसोनि लक्ष्मणाजवळी । हात पिटित वक्षःस्थळीं ।
सौ‍मित्रें मांडिळी रांडोळी । मजसीं कां बोली बोलेना ॥ ४२ ॥
येरे येरे लक्ष्मणा । साद दे कां बंधुरत्‍ना ।
मज सांडिलें माजी रणा । निष्ठुर मना करोनी ॥ ४३ ॥
मज सांडोनि दुःखार्दित । रणीं निघालासि त्वरित ।
माझे अपराध बहुत । तुवां समस्त साहिले ॥ ४४ ॥
बहुसाल कष्टलासी वनीं । कष्ट करिसी अनुदिनीं ।
पोट आपुलें बांधोनी । फळे आणोनी मज देसी ॥ ४५ ॥
चरण क्षालन करिसी नित्य । चरण चुरिसी अहोरात्र ।
निद्रा न लगे अणुमात्र । सावचित्त रामभजनीं ॥ ४६ ॥
तुझें कष्ट आठवितां । मज होतसे दुःखावस्था ।
हृदयस्फोट होईल आतां । न देखतां सौ‍मित्र ॥ ४७ ॥
म्हणऊनि घाली लोटांगणी । सवेंचि सावध झाला मनीं ।
मी भ्रांत काय म्हणोनी । कंदनालागोनी उठिला ॥ ४८ ॥

श्रीरामांचा आवेश व क्रोध :

म्हणे काय झालें येथें । कवण नेईल सौ‍मित्रातें ।
दमोनियां सकळ भूतें । लोकपाळांतें दमीन ॥ ४९ ॥
पृथूनें दमियेली धरित्री । दुहिल्या ओषधी समग्री ।
मी त्याहून दमीन बाणाग्रीं । सौ‍मित्र शरीरीं उठ जंव ॥ १५० ॥
अगस्तिऋषीनें निश्चितीं । शोषियेला अपांपती ।
मी त्याहून करीन ख्याती । त्रिजगती कोरडी ॥ ५१ ॥
सौ‍मित्राची जीवनश्री । आणोनि देईल झडकरी ।
तंव करीन बोहरी । बाणधारीं आपांची ॥ ५२ ॥
तेजें तेजेंचि शोषीन। जंव सतेज होय लक्ष्मण ।
अन्यथा महावात प्रेरीन । निःशेष शोषीन तेजासी ॥ ५३ ॥
बाणें महाशून्य भरडीन । प्राशीन सकळ प्रभंजन ।
जंव लक्ष्मणाचा निजप्राण । स्वयें आपण आणून देई ॥ ५४ ॥
क्षोभवोनि चिदाकाश । घोटीन सगळेंचि आकाश ।
सौ‍मित्राचें हृदयाकाश । सावकाश जंव होय ॥ ५५ ॥
दमोनियां सकळ देव । उडवीन त्यांची माव ।
करिती सौ‍मित्रासी सावयव । तें लाघव करीन ॥ ५६ ॥
दमूनि दिशांची पोकळी । भरीन चिदानंद कल्लोळीं ।
जंव सौ‍मित्राचे कर्णबिळीं । आहाळ बाहळी निघे शब्द ॥ ५७ ॥
बाणें पाडोनियां सूर्यासी । खंडोनी उदयास्तांसी ।
घेईन होरोनि तेजासी । नेत्रीं लक्ष्मणासीं भरीन ॥ ५८ ॥
अश्विनीदेव दोनी । निरोध केला आहे घ्राणीं ।
त्यांचा कंदचि खणोनी । सौ‍मित्रघ्राणीं ओपीन ॥ ५९ ॥
वरुणातें गाळून घाणा । जेणें नीरस केली रसना ।
गोडी हिरोनि आणीन जाणा । चेतवीन सौ‍मित्राची ॥ १६० ॥
वायूनें मांडली घसघस । केला सौ‍मित्र मंदस्पर्श ।
पिळोनि त्याचा प्राणांश । करीन सुस्पर्श सौ‍मित्र ॥ ६१ ॥
इंद्रे मांडिलें बंड । निर्वीर्य केले बाहुदंड ।
ठेंचोनियां त्याचें तोंड । सबळ भुजदंड करीन ॥ ६२ ॥
यम संचरे अधोगती । क्षीण केली शरीरशक्ती ।
त्यासीं लावोनियां ख्याती । अक्षय निश्चितीं सौ‍मित्र करीन ॥ ६३ ॥
ब्रह्मयानें केला निरोध । खुंटला रतिस्वानंद ।
त्याचा छेदोनियां बाध । अखंडानंद भरीन ॥ ६४ ॥
केली उपेंद्रें छळणोक्ती । खुंटली गमनागमनशक्ती ।
त्यासीं लावोनियां ख्याती । ऊर्मिलापती उठवीन ॥ ६५ ॥
बळीनें द्वारपाळ केला । वामन त्रिविक्रम भला ।
खिळीन सौ‍मित्राच्या पाउला । चालवीन मग सुखे ॥ ६६ ॥
नभें मांडिले द्वंद्व । निःशेष खुंटला शब्द ।
उडवून त्याचा शून्यवाद । अनाहतशब्द काढीन ॥ ६७ ॥
चंद्र पीडिला क्षयरोगें । तरी निश्चळ न राहे उगें ।
सौ‍मित्राचें मन नेलें वेगें । मूर्च्छित करोनि राहिला ॥ ६८ ॥
ऐसें दंडीन मी त्यासी । स्वयें विसरोनि निजधर्मासी ।
सांडून संकल्पविकल्पांसी । उठवीन सौ‍मित्रासी निर्विकल्प ॥ ६९ ॥
ब्रह्मयानें बुद्धि केली मंद । उडवीन त्याचे ब्रह्मपद ।
सौ‍मित्रासीं निर्विकल्प शुद्ध । स्वरुपावबोध जंव करी ॥ १७० ॥
रुद्रें अहंकार केला क्षीण । त्यासीं सोहंमार करीन ।
संवर्तका संहारुन । धरी स्वरुपाभिमान जंव सौ‍मित्र ॥ ७१ ॥
विष्णु येवोनियां त्वरित । न करी सौ‍मित्रा सावचित्त ।
तरी तो करीन पदच्युत । सर्वगत देशधडी ॥ ७२ ॥
लक्ष्मणाचे विरहें जाण । पूर्ण क्षोभला रघुनंदन ।
अंतका अंतक होऊन । धनष्यबाण सज्जिले ॥ ७३ ॥
मारीन राक्षस सकळ । जाळीन हें जगतीतळ ।
झाला क्रोधाग्निकल्लोळ । काळा काळ रघुवीर ॥ ७४ ॥

एवमुक्त्वा महाबाहुः प्रगृहीतं च कार्मुकम् ।
ततः संत्रस्तमानसा वानरा भीमविक्रमा ॥५॥
किमेतदिति भाषंतः ससुग्रीवबिभीषणाः ।
प्रणिपत्याग्रतः स्थित्वा सर्वे प्रांजलयोऽब्‍रुवन् ॥६॥
एकस्यार्थे महाबाहो त्रैलोक्यं हंतुमिच्छसि ॥७॥

रामाच्या क्रोधाने लोकपाळ सचित व रामाचा अनुभव :

अकाळ मांडला युगांत । लोकपाळ हडबडित ।
राम होतां क्रोधान्वित । डोळे झाकी प्रळयरुद्र ॥ ७५ ॥
ब्रह्मा म्हणे काय जालें । काळेंवीण प्रळयांत मांडिले ।
दुणे कष्ट मज ओढवले । पुन्हां कैसें सकळ ब्रह्मांड रचू ॥ ७६ ॥
होतां सकळां आडदरा । पळती मर्कटें सैरा ।
तें देखोनि थोरथोरा । वानरवीर पुढें झाले ॥ ७७ ॥
नळनीळादि जांबवंत । अंगद सुग्रीव कपिनाथ ।
बिभीषण शरणागत । श्रीरघुनाथ प्रार्थिती ॥ ७८ ॥
पूर्णावतार रामरावो । अकाळीं करुं नये प्रळयो ।
कांपतसे ब्रह्मदेवो । नवी सृष्टीं पहाहो करवेना ॥ ७९ ॥
अकाळ प्रळयो करितां । बोल लागेल निजव्रता ।
तूं सकळांतें पाळिता । निरपराधें घातां नये करुं ॥ १८० ॥
एकाचे अपराधासाठीं । संहारणें सकळ सृष्टी ।
ते प्रतिपालनाची गोष्टी । केंवी जगजेठी बोलावी ॥ ८१ ॥
तूं जनक सकळांचा । पिता पितामहाचा ।
निरपराध निजबाळांचा । संहार कैसा करितोसी ॥ ८२ ॥
म्हणोनि धरिले दोनी चरण । नको प्रयोजूं गुणीं बाण ।
तूं कृपाळु रघुनंदन । क्रोधोपशमन करीं रामा ॥ ८३ ॥
भक्तजनांचा कृपाळ । श्रीराम दीनदयाळ ।
वोळला कृपाकल्लोळ । प्रणतपाळ श्रीराम ॥ ८४ ॥
तृषार्थ दीन चातक । देखतांचि एकाएक ।
वर्षोनियां कृपापीयूख । निवविले देख दयाळुत्वें ॥ ८५ ॥
निजभक्तांचें वचन । नुल्लुंघीत रघुनंदन् ।
केलें क्रोधाचें उपशमन । भक्तावगणन न करीच ॥ ८६ ॥
एका एकपणाची दिठी । एका जरार्दनीं नाथिली गोष्टी ।
घालितां श्रीरामीं मिठी । ब्रह्मत्वें सृष्टी हेलावे ॥ ८७ ॥
एका जनार्दना शरण । प्रार्थूनियां रघुनंदन ।
केले क्रोधाचें उपशमन । निजजनकृपाळु ॥ १८८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रघुनाथक्रोधोपशमनं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४८ ॥
ओंव्या ॥ १८८ ॥ श्लोक ॥ ७ ॥ एवं ॥ १९५ ॥