अध्याय 35
मकराक्षाचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
कुंभ पडल्यावर निकुंभाचे रणांगणावर आगमन :
सुग्रीवें झोंटधरणी । कुंभ पाडिलिया रणीं ।
तें देखोनिया नयनीं । निकुंभ क्षोभोनी चालला ॥ १ ॥
निकुंभो भ्रातरं दृष्ट्वा सुग्रीवेण निपातितम् ।
प्रदहन्निव कोपेन सुग्रीवं प्रत्यवेक्षत ॥१॥
कृतसंग्राममालं च दत्तपंचांगुलं शुभम् ।
आददे परिघं घोरं नगेंद्रशिखरोपमम् ॥२॥
निकुंभो भूषणेर्भाति परिघेणायतेन च ।
नगर्या विटपावल्या गन्धर्वनगरैरपि ॥३॥
सहसैवामरावत्या सर्वैश्च भुवनैः सह ।
निकुंभपरिघोद्भूतं भ्रमतीव नभस्थलम् ॥४॥
निकुंभाच्या परिघ आयुधाने वानरसैन्याची दाणादाण :
कुंभ पडताचि रणीं । निकुंभ चालिला कोपोनी ।
सुग्रीवा जाळिले नयनीं । क्रोधोन्मादीं अवलोकी ॥ २ ॥
मागें बहुतां रणांगणीं । जेणें केलिया संग्रामश्रेणी ।
जो दाटुगा अरिदळणीं । तो परिघ घेवोनि चालिला ॥ ३ ॥
परिघमाथां पंचपाकोळी । दृढ धरिला पंचागुळीं ।
निकुंभ वीर महाबळी । घेऊन करतळीं चालिला ॥ ४ ॥
कुमुटकुंडलें पदक कंठीं । बाहुभूषणें सुगंध उटी ।
अंगत्राण लखलखाटी । परिघ मुष्टीं डुल्लत ॥ ५ ॥
परिघ साधन प्रत्यावृत्ती । अमरावती अलकावती ।
बसतां हातीं बीट पावती । भ्रमणावर्तीं पाडिल्या ॥ ६ ॥
भ्रमे गंधर्वांचें नगर । सचंद्र तारा ग्रह समग्र ।
परिभ्रमतां परिघाग्र । काळचक्र परिभ्रमे ॥ ७ ॥
निकुंभाअंगी प्रबळ बळ । परिघ साधोनि अति कुशळ ।
भ्रमत भासे नभोमंडळ । भासे भूतळ परिभ्रमतें ॥ ८ ॥
प्ररिघाच्या भ्रमणद्वारा । छेदिलें वृक्षशिळाशिखरां ।
पुढें रिघवेना वानरां । परिघधारामहामारें ॥ ९ ॥
भंवता परिघाचा आवर्त । न चले वानरांचा पुरुषार्थ ।
कपिप्रताप गेला व्यर्थ । संग्रामार्थ चालेना ॥ १० ॥
वानर होतां लज्जान्वित । देखोनि आला हनुमंत ।
पहावया निकुंभाचा पुरुषार्थ । संग्रामीं येत संमुख ॥ ११ ॥
हनुमंताचे आगमन व निकुंभाशी युद्ध :
हनुमान म्हणे निकुंभवीरा । तुझ्या परिघाचा थोर दरारा ।
आधीं मज मारी वानरा । मग पुढारां संग्राम ॥ १२ ॥
मारिले सुर नर समस्त । दैत्य दानवां केला घात ।
मज मारिल्या हनुमंत । तुझा पुरुषार्थ कळेल ॥ १३ ॥
मागील बडिवाराचे बोल । आज मी करीन तुझे फोल ।
पाहूं पां किती तुझें बळ । परिघें प्रबळ हाण मज ॥ १४ ॥
ऐकोनि हनुमंताच्या उत्तरा । दांत खावोनि करकरां ।
परिघ भोवंडोनि गरगरां । मारुं वानरां धावला ॥ १५ ॥
परीघ गाळीव लोहान्वित । सुवर्णबंदी रत्नांकित ।
पाचपिरोजीं लखलखित । सिंदुरार्चित नरमांसें ॥ १६ ॥
निकुंभें परिघ घेवोनि करीं । भोवंडोनि चक्राकारी ।
हाणितां हनुमंताचे उरावरी । शतसहस्त्री भंगला ॥ १७ ॥
वज्रदेही कपि बळकट । लागतां परिघ झाला पीठ ।
निकुंभ करी कटकट । म्हणे फटफट हनुमंत ॥ १८ ॥
तुझे अंगी पोंचट बळ । घाव हाणिती तो पोकळ ।
परिघ जैसा एरंड सरळ । गेला तत्काळ मोडून ॥ १९ ॥
पुढां तिखट मागें पोंचट । तैसे तुझे फळकट ।
वृथा संग्रामीं करिसी कष्ट । आजि तूं स्पष्ट मरसील ॥ २० ॥
कंप न येचि धराधरा । आकश कांपेना थरथरां ।
तेंवी मज हनुमंता वीरा । नाहीं भेदरा परिघाचा ॥ २१ ॥
गज हाणितां फुलेंसीं । तैसा परिघ हनुमंतासीं ।
नाहीं मूर्च्छा ना कासाविसी । रणाभिनिवेंशीं गर्जत ॥ २२ ॥
जेंवी गगनीं उल्कापात । तेंवी परिघखंडें समस्त ।
उडोनि पडलीं धगधगीत । लखलखित धरेवरी ॥ २३ ॥
तुझा घेतां परिघघात । तेणें मी झालों रिणाईत ।
उतराई व्हाया येत । मुष्टिघात साहें माझा ॥ २४ ॥
निकुंभाचा परिघघात । हनुमंतें केला व्यर्थ ।
त्यासी हाणावया मुष्टिघात । जाला उदित वानर ॥ २५ ॥
पंचांगुळीं अंगुष्ठनेटीं । दृढ वळोनि वज्रमुष्टी ।
निकुंभा हाणितां नेटपाटीं । पाडिला सुष्टीं धुकधुकित ॥ २६ ॥
धन्य कपीची आंगवण । फोडोनियां अंगत्राण ।
देहींचें चर्म भेदून जाण । मुष्टि दारुण लागली ॥ २७ ॥
मुष्टि हाणितां गोळांगुळा । राक्षसहृदयीं निघती ज्वाळा ।
प्रतापतेजाचा उमाळा । जेंवी अंतराळां । महाविजु ॥ २८ ॥
ऐसें हनुमंतें आपण । निकुंभ पाडिला जाण ।
तरी त्यासी न ये मरण । आंगवण सांडीना ॥ २९ ॥
हनुमंतें हाणोनि मुष्टिघात । निकुंभ पाडिला मूर्च्छित ।
पडिला तो जांभया देत । नव्हे प्राणांत तयाचा ॥ ३० ॥
पडल्या पडल्या रणाआंत । राक्षस स्वयें भ्रमरहित ।
होवोनी तो सावचित्त । धरी हनुमंत कवळोनी ॥ ३१ ॥
निमाला मानूनि निश्चित । हनुमंतें टाकिला उपेक्षित ।
राक्षस होवोनि सावचित्त । धरी हनुमंत कवळोनी ॥ ३२ ॥
धरिला मानूनी हनुमंत । उल्हास राक्षससैन्यांत ।
एक जावोनि लंकेआंत । हरिखें सांगत लंकेशा ॥ ३३ ॥
बहुतां प्रकारांचा वैरी । हनुमान धरिला युद्धामाझारी ।
ऐसें सांगता निशाचरी । दशशिरीं अति धाक ॥ ३४ ॥
जरी धरिला हनुमंत । तरी त्याचा न करवे घात ।
जरी आणिला लंकेआंत । करील आकांत राक्षसां ॥ ३५ ॥
मागें धरिला ब्रह्मपाशीं । तैं न मारावेचि आम्हांसी ।
मारोनियां राक्षसांसी । जाळून लंकेसी प्रतापें गेला ॥ ३६ ॥
कपि न धरवे संग्रामांत । ऐसें मानी लंकानाथ ।
येरीकडे पैं हनुमंत । करी घात निकुंभाचा ॥ ३७ ॥
निकुंभे धरितां हनुमंतासी । तोही मुष्टि हाणी त्यासीं ।
मिठीं न सोडून मारुतीसी । पडे तेणेंसीं रणभूमीं ॥ ३८ ॥
न सुटे निकुभाची मिठी । हनुमान पडल्या लोटी ।
चेपितां राक्षसाची घांटी । अति संकटी सोडिला ॥ ३९ ॥
स्वयें सोडोनी ऐसियापरी । हनुमान उडोनि अंबरीं ।
उडी घातली निकुंभावरी । संग्रामगजरीं गर्जोन ॥ ४० ॥
हनूमानुत्पपाताशु निकुंभं मारुतात्मजः ।
समुत्पत्य च वेगेन निपपातास्य वक्षसि ॥५॥
परिगृह्य च बाहुभ्यां परिवृत्य शिरोधराम ।
अपातयत्तस्य शिरो भैरवं नदतो महत् ॥६॥
अथ निनदति सादिते निकुंभे पवनसुतेन रणे बभूव युद्धम्।
दशरथसुराक्षसेंद्रसूनोर्भूशतरमागतरोषयोः सुभीमम् ॥७॥
हनुमंताकडून निकुंभाचा वध :
हनुमंतें गिरागजरीं । उडी घालोनी निकुंभावरी ।
दोन्ही बाहु मुरडोनि करीं । शिर नखाग्रीं ख्रुडिलें ॥ ४१ ॥
छेदोनी निकुंभाचें शिर । रामनामाचा गजर ।
हनुमंतें केला भुभःकार । गर्जती वानर हरिनामें ॥ ४२ ॥
हनुमंतें बळानुबंधें । निकुंभ मारिला महायुद्धे ।
वानर नाचती आनंदें । जयजयशब्दें गर्जोनी ॥ ४३ ॥
श्रीरामांचा आवेश :
निकुंभ मारिला पराक्रमें । हें देखोनियां श्रीरामें ।
कोपा चढला क्षात्रधर्में । पुरुषानुक्रमें बोलत ॥ ४४ ॥
लहान सहान मारितां येथ । युद्ध नव्हे पैं समस्त ।
मारावया लंकानाथ । धनुष्या हात घातला ॥ ४५ ॥
निर्दाळावया रावण । आलें श्रीरामा स्फुरण ।
बाहु थरकती संपूर्ण । धनुष्यबाण सज्जूनी ॥ ४६ ॥
रावण मारावया कडाडीं । काढोनि धनुष्याची वोढी ।
श्रीरामें घालितां उडी । आले तांतडीं त्रिवर्ग ॥ ४७ ॥
सुग्रीव बिभीषण हनुमंत । तिघीं जणीं श्रीरघुनाथ ।
निववोनी कोप केला शांत । सभा स्वस्थ बैसली ॥ ४८ ॥
व्यपेते तु जीवे निकुंभस्य हृष्टा विनेदुः प्लवंगा दिशः सस्वनुश्च ।
चचालेव चोर्वी पफालेव साद्यौर्बलं राक्षसांना भयं वा विवेश ॥८॥
निकुंभवधामुळे वानरसैन्यांत जयजयकार :
निकुंभ देखोनी निर्जीव । करोनि रामनामाचा रव ।
हरिखें नाचती वानर सर्व । केलें अपूर्व हनुमंतें ॥ ४९ ॥
हनुमंताची आंगवण । देखोनि हनुमंताची ख्याती ।
राक्षस चळचळ कांपती । चळीं कांपे लंकापती । रणीं मारुति नाटोपे ॥ ५१ ॥
विजयाच्या निजगजरीं । वानर गर्जती नामेंकरी ।
नाम कोंदलें चराचरी । दशदिशांमाझारीं हरिनाम ॥ ५२ ॥
निकुंभाच्या बळाची थोरी । ज्यासी कांपिजे सुरासुरीं ।
तोही मारिला निर्धारीं । क्षणामाझारीं हनुमंतें ॥ ५३ ॥
हनुमंतें बळें अद्भुत । केला निकुंभाचा घात ।
पुढिल कथावृत्तांत । श्रोतां सावध परिसिजे ॥ ५४ ॥
निकुंभ पडतांचि रणीं । राक्षसां जाली महापळणी ।
पळोनी गेले लंकाभुवनीं । घायवट रणीं कुंथत ॥ ५५ ॥
कुंभ – निकुंभ वधामुळे रावणाला दुःख व मकराक्षाची योजना :
कुंभ निकुंभ दोघे जण । कपींनी मारिले करोनि रण ।
तें ऐकोनि रावण । दुःख दारुण पावला ॥ ५६ ॥
आजानुबाहु विशालाक्ष । वीरपुत्र जो कां मकराक्ष ।
संग्रामीं परम दक्ष । विपक्षपक्षच्छेदक ॥ ५७ ॥
त्यासी पाचारोनी रावण । गुह्य सांगे स्वयें आपण ।
रणीं मारावे रामलक्ष्मण । वानरगणसमवेत ॥ ५८ ॥
धरोनि पुरुषार्थाचें बळ । रामलक्ष्मण माझें शल्य ।
तें त्वां करावें निःशल्य । वानरदळ दंमूनी ॥ ५९ ॥
पितृघातक मुख्य वैरी । त्यासी तूं साधोनियां मारी ।
तुझ्या पुरुषार्थाची थोरी । सुरासुरीं कांपिजे ॥ ६० ॥
ऐसें बोलोनि दशानन । स्वयें सांडून सिंहासन ।
मकराक्षासी आपण । गौरवी रावण युद्धार्थीं ॥ ६१ ॥
दिव्य गंध सुमनमाळा । मुकुत कुंडलें कटिमेखळा ।
अंगत्राण पदक गळां । मुक्ताफळांसमवेत ॥ ६२ ॥
मकराक्षाची घोषणा व प्रयाण :
ऐकोनि रावणांचे वचन । शुर अभिमानी खरनंदन ।
मारोनि राकलक्ष्मण । विशल्य करीन लंकेशा ॥ ६३ ॥
नमस्कारोनी रावणा । त्यासी करोनि प्रदक्षिणा ।
मकराक्षें केली गर्जना । शीघ्र रथ आणा सैन्येंसीं ॥ ६४ ॥
रामलक्ष्मण मनुष्यमात्र । मनुष्य आमचा नित्य आहार ।
वानर ते पालेखाईर । मारीन समग्र रणमारें ॥ ६५ ॥
मकराक्षआज्ञा समर्थ । सैन्येंसीं आणिला रथ ।
प्रदिक्षिणा करोनि येथ । रथीं बैसत साटोपें ॥ ६६ ॥
स्वयें सारथियासी सांगत । जेथें आहे रघुनाथ ।
तेथवरी जाऊं दे रथ । संग्रामार्थ तेणेंसीं ॥ ६७ ॥
लहानसहनासी हात । नाहीं घालणें रणाआंत ।
स्वयें निवटीत रघुनाथ । निश्चितार्थ हा माझा ॥ ६८ ॥
राक्षसांप्रती गर्जोन । मकराक्ष सांगे आपण ।
रणीं मारावे रामलक्ष्मण । स्वयें रावण मज सांगे ॥ ६९ ॥
आजी रणीं आपण । वधीन रामलक्ष्मण ।
सुग्रीवातें निर्दळीन । वानरसैन्यसमवेत ॥ ७० ॥
मकराक्षाचें सबळ सैन्य । विकट दाढा विक्राळ वदन ।
एका अंगीं रोम दारुण । जैसे बाण सतेज ॥ ७१ ॥
व्याघ्रमुख तरसमुख । वडवामुख तगरमुख ।
राक्षससैन्य अनेक । भयानक गडगर्जे ॥ ७२ ॥
मत्त वृषभाऐसे डरकत । मत्त गजाऐसे गडगर्जत ।
राक्षस मिळाले असंख्यात । मकराक्ष तेथ मुख्य धूर ॥ ७३ ॥
घाव घातला निशाणा । शंख भेरी विकट विराणा ।
दुंदभि गाजती दणदणां । विक्राळ गर्जना वीरांची ॥ ७४ ॥
मकराक्षाला अपशकुन :
ऐसा वीरांचा गडगजर । चालतां मकराक्षाचा संभार ।
निष्ठोनी सारथ्याचा कर । आंसूड सत्वर तळीं पडला ॥ ७५ ॥
वीरवीरांची आरोळी । सैन्य चालतां गजदळी ।
निष्ठोनि सारथ्याकरतळीं । आंसूड तळीं पडों सरला ॥ ७६ ॥
वेगें काढितां आसुंडा । रथातळीं झाला रगडा ।
अश्व चालतां पुढां । चरणांची उबडा पडती मेटें ॥ ७७ ॥
वारुवांची क्षीण शक्ती । समभूतीं मेटें वळती ।
अवघे अडखळोनी पडती । खुंटली गती रथाची ॥ ७८ ॥
उठवोनि अश्वसमाज । रथ करुं जाता सज्ज ।
रथाचा मोडोनि पाडिला ध्वज । जेंवी कां विज लखलखित ॥ ७९ ॥
प्रतिकूळ वायु खवळला बळी । डोळा उघडितां रिघे धूळी ।
जो तो दोन्ही डोळे चोळी । अश्रूंतें गाळी गजाश्व ॥ ८० ॥
करीत वाजंत्रांचा गजर । येतां मकराक्षाचा भार ।
तो देखोनी वानरवीर । युद्धा सत्वर मिसळले ॥ ८१ ॥
अपशकुनाला उपेक्षून मकराक्षाची पुढे चाल :
ऐसे देखोनी अपशकुन । मकराक्ष सांडी उपेक्षून ।
जेथें उभे रामलक्ष्मण । तेथें आपण शिघ्र आला ॥ ८२ ॥
उडउडों पैं वानर । झांबडती राक्षसभार ।
तैसेच क्षोभती निशाचर । रणीं वानर मर्दिती ॥ ८३ ॥
रणीं खवळला वेताळ । वनरां निशाचरां प्रबळ ।
रोमहर्षे युद्ध तुंबळ । हलकल्लोळ राक्षसां ॥ ८४ ॥
वानरसैन्यावर मकराक्षाचा बाणांचा वर्षाव :
शूळ पट्टिश विंधिती बाण । हाणिती शिळा द्रुम पाषाण ।
फोडोनियां अंगत्राण । धनुष्यबाण मोडिती ॥ ८५ ॥
जैसें दानवांसी सुरवर । रणीं भिडती अति दुर्धर ।
तैसेचि वानर आणि निशाचर । घोरां दर मांडिलें ॥ ८६ ॥
मोडिले देखोनी निशाचरसैन्य । मकराक्षें वाहोनियां गुण ।
रणीं त्रासिले वानरगण । सपिच्छ बाण भेदूनी ॥ ८७ ॥
श्रीरामाचें आश्वासन :
सपिच्छीं खडतरतां बाण । रणीं त्रासिले वानरगण ।
श्रीरामापाशीं अवघे जण । आले पळोन अति भीत ॥ ८८ ॥
श्रीराम कृपाळू संपूर्ण । निवारोनी राक्षसबाण ।
आश्वासोनि वानरगण । अभयदान दीधलें ॥ ८९ ॥
वारितान्राक्षसान्दृष्ट्वा मकराक्षो निशाचरः ।
क्रोधानलसमाविष्टो वचनं चेदमब्रवीत् ॥९॥
क्वासौ रामः सुदुर्बुद्धिर्येन मे निहतः पिता ।
जनस्थानगतः शूरः सानुजः सपरिच्छदः ॥१०॥
मकराक्षाची दर्पोक्ती :
आश्वासोनी वानरगण । संत्रासितां राक्षससैन्य ।
तें मकरक्षें देखोन । रागें आपण जल्पत ॥ ९० ॥
कोण तो राम कैसा येथें । जेणें जिणोनी जनस्थानातें ।
मारिलें माझिया पितयातें । बंधूसहित ससैन्य ॥ ९१ ॥
ते तुझी संग्रामख्याती । आजी मी आणीन समाप्ती ।
तुम्ही बापुडीं मनुष्यें किती । माझे शरघातीं उरावया ॥ ९२ ॥
जनस्थानीं मी नव्हतों तेथें । म्हणोनि पावलेती यशातें ।
आतां जाणवेल येथें । संग्रामार्थ पुरुषार्थी ॥ ९३ ॥
पुरुषार्थाचिया प्रौढी । मारीन रामलक्ष्मणजोडी ।
वानरांची करीन झोडी । तीं तंव बापुडीं वनचरें ॥ ९४ ॥
अद्यं गंतास्मि वैरस्य पारं ते रजनीचर ।
सुहृदां चैव सर्वेषां निहतानां रणाजिरे ॥११॥
हत्वा रामं सुदुर्बुद्धि लक्ष्मणं च नराधमम् ।
तयोःशोणितनिस्यंदैः करिष्ये सलिलक्रियाम् ॥१२॥
एवमुक्ता महाबहुर्युद्धेषु रजनीचरः ।
रथेनांबुदघोषण ययौ रामदिदृक्षया ॥१३॥
आहूयमानो बहुभिर्वानरैर्बलशालिभिः ।
युद्धाय स महातेजा रामादन्यं न चेच्छति ॥१४॥
रणीं मारिले माझे पितर । त्या वैराचें परपार ।
आजि मी पावेन साचार । रामसौमित्र मारुनी ॥ ९५ ॥
मारोनि दोघे महाबळी । त्यांच्या अशुद्धीची अंजुळी ।
पितरा देईन तिळांजळी । तेचि काळीं उत्तीर्ण ॥ ९६ ॥
या दोघांचें घेवोनी रक्त । रणीं मारिले सुहृद आप्त ।
ते ते तर्पीन समस्त । पितृकार्यार्थी उत्तीर्णत्वें ॥ ९७ ॥
प्राशावें लक्ष्मणाचें रक्त । ऐसा शूर्पणखेचा मनोरथ ।
तिचाही पुरवीन अर्थ । दोघे रणांत मारुनी ॥ ९८ ॥
ऐसा बोलोनी बडिवार । युद्धलागीं खर पुत्र ।
मेघगडगर्जनें रहंवर । पेलोनि सत्वर संग्रामा आला ॥ ९९ ॥
वानरवीर अति आवेंशीं । मकराक्ष पाचारी युद्धासी ।
उपेक्षूनि त्यां समस्तासी । श्रीराम गिंवसीं संग्रामा ॥ १०० ॥
श्रीरामावांचून आणिकांसी । नाहीं करणें संग्रामासी ।
ऐसा करोनी नेमासी । श्रीरामा गिंवसी साटोपें ॥ १ ॥
वीर धीर श्रीरघुनाथ । ऐसा पवाडा अति विख्यात ।
तो कां लपतो वानरांत । संग्रामार्थ निघेना ॥ २ ॥
श्रीरामासीं रणकल्लोळ । करावया मकराक्षाचें बळ ।
डावलोनि वानरदळ । आला तत्काळ संग्राम ॥ ३ ॥
दृष्ट्वा रामं सदूरस्थं लक्ष्मणं च महारथम् ।
सेषुणा पाणिनाहत्य ततो वानमब्रवीत् ॥१५॥
तिष्ठ राम मया सार्धं द्वंद्वयुद्धं प्रयच्छ मे ।
त्याजयिष्यामि ते प्राणन्धनुर्मुक्तैःशितैः ॥१६॥
य़त्तदा दंडकारण्ये पितरं हतवान्मम ।
दह्यंते भृशमंगानि दुरात्मन्म राघव ॥१७॥
दिष्ट्यासि गोचरं राम राम मम त्वं प्राप्तवानासि ।
कांक्षितोऽसि क्षुधार्तस्य सिंहस्येवेत्तरोः ॥१८॥
ऐसा विचारतां रणाआंत । दूरी देखिला रघुनाथ ।
तंव मकराक्ष बाणहस्त । असे पाचारीति कराग्रें ॥ ४ ॥
ऐकें श्रीरामा सावध । मजसीं द्यावें द्वंद्वयुद्ध ।
आम्हां तुम्हां युद्धसंबंध । इतरीं विनोद पहावा ॥ ५ ॥
दोघांच्या संग्रामात । जो तिसरा घालील हात ।
त्याचा तेथेंच करावा घात । हा निश्चितार्थ करावा ॥ ६ ॥
संगें नको वानरगण । कायसें बापुडें लक्ष्मण ।
तुजसीं करावें रणांगण । संकल्प पूर्ण हा माझा ॥ ७ ॥
त्रिशिरा मारिला खर दूषण । त्यां द्वंद्वाचा संताप पूर्ण ।
तुझा घ्यावया प्राण । रणांगण वांच्छितों ॥ ८ ॥
हो का माझे अदृष्टपूर्ते । भाग्यें भेटलासी तूं येथें ।
जेंवी क्षुधिता सिंहातें । भेटती अवचितें लांडगे मृग ॥ ९ ॥
क्षुद्र मृद्र सिंहासीं ग्रास । तैसा मी तुझा करीन घांस ।
कायसा संग्रामविलास । श्रीरामपशु भेटला ॥ ११० ॥
जरी असेल आंगवण । तरी मजसीं करावें रण ।
त्याही युद्धाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ ११ ॥
तूं श्रीराम प्रतापें प्रबळ । मी मकराक्ष संग्रामशीळ ।
माझा तुझा रणकल्लोळ । लोक सकळ देखत ॥ १२ ॥
शस्त्रास्त्रीं धनष्यबाणीं । शूलमुद्गलगदापाणीं ।
अथवा मल्लविद्याविंदाणीं । बाहुप्रहरणीं भिडूं दोघे ॥ १३ ॥
जें जें अभ्यासिलें रघुपती । मजसीं भिडावें त्वां व्युत्पत्तीं ।
श्रीरामाची यशःकीर्ती । करीन समाप्ती संग्रामीं ॥ १४ ॥
श्रीराम नामें ब्रिदाइत । सकळकुळीं कुळ प्रस्तुत ।
मज द्यावा द्वंद्वयद्धार्थ । कळेल पुरुषार्थ दोघांचा ॥ १५ ॥
तुझिया पुरुषार्थाची झडती । घेवों मी निश्चितीं ।
वानरांमाजी लपसी किती । निंद्य युद्धार्थी श्रीरामा ॥ १६ ॥
श्रीरामांचे प्रत्युत्तर :
ऐकोनि मकराक्षाचें वचन । श्रीराम बोले हास्यवदन ।
ज्याचे ठायीं बहुत जल्पन । आंगवण त्या नाहीं ॥ १७ ॥
महाशूराची नवलगती । युद्धी करोनी दाविती ख्याती ।
वृथा जे कां बडबडती । ते तंव निश्चितीं तोंडभांड ॥ १८ ॥
सैरा बडबड करिती भांड । त्यांचे बोल भंडउभंड ।
तैसेंचि जाण तुझें तोंड । अति वितंड जल्पसी ॥ १९ ॥
बोलाचिया बळावारी । कोणी जिंतिला नाहीं वैरी ।
तूं तंव निर्लज्ज संसारी । भांडाच्या परी जल्पसी ॥ १२० ॥
जरी असेल आंगवण । तरी करोनी दावीं रण ।
बडबडेचें फळ कोण । सीतारमण बोलिला ॥ २१ ॥
नाहीं बळ नाहीं पुरुषार्थ । तोंडभांड जल्पसी येथ ।
ऐसें बोलतां रघुनाथ पोळला जीवांत मकराक्ष ॥ २२ ॥
बोलाचिया बळावारी । कोणीं जिंतिला नाहीं वैरी ।
येणेंही बोलें जिव्हारी । पोळला भारी मकराक्ष ॥ २३ ॥
धनुष्या वाहोनियां गुण । शत सहस्र अमित बाण ।
श्रीरामावरी क्षोभोन । वर्षे आपण मकराक्ष ॥ २४ ॥
सुवर्णपुंखी मनोहर । रत्नांकित अति गंभीर ।
मकराक्षाचे तीव्र शर । रामें समग्र छेचिले ॥ २५ ॥
बद्धगोधांगुळित्राण । ज्याघोष तळघोष जाण ।
तेणें नादें कोंदलें गगन । त्रिभुवन दुमदुमिले ॥ २६ ॥
मकराक्ष आणि श्रीरामचंद्र । युद्धीं मिसळले महाशूर ।
कौतुक पहावया सुरवर । विमानीं समग्र दाटले ॥ २७ ॥
देव दानव ऋषीश्वर । महोरग नर किन्नर ।
सिद्ध गंधर्व विद्याधर । विमानीं अंबर कोंदलें ॥ २८ ॥
मकराक्ष वर्षे शर । बाण वर्षे श्रीरामचंद्र ।
तेणें लोपले रवि चंद्र । दिशा समग्र कोंदल्या ॥ २९ ॥
बाणीं खिळोनि सांडिली धरा । बाणीं खिळियेला वारा ।
बाणी व्यापिलें अंबरा । दिशा समग्र कोंदल्या ॥ ३० ॥
निशाचर विंधी जे जे शर । ते ते तोडी रामचंद्र ।
श्रीरामाचे शर दुर्धर । निशाचर स्वयें छेदी ॥ ३१ ॥
छेदितां बाणीं बाण । कोपा चढला रघुनंदन ।
अनिवार शर दारुण । विंधी आपण साटोपें ॥ ३२ ॥
ततःक्रुद्धो महाबाहुर्धनुश्चिच्छेद संयुगे ।
अष्टाभिरथ नाराचैः सूतं विव्याध राघवः ॥१९॥
छित्वा शरै रथं रामो हत्वा चाश्वानपोथयत् ।
विरथो वसुधां प्राप्य मकराक्षो निशाचरः॥२०॥
अधिकं क्रोधसंरब्धः शूलं जग्राह पाणिना ।
त्रासयन्सर्वभूतानां युगांताग्निसमप्रभम् ॥२१॥
विभ्राम्याथ च तच्छूलं प्रज्वलंतं निशाचरः ।
क्रोधाश्च प्राहिणोत्तस्मै राघवाय महात्मने ॥२२॥
श्रीरामांनी मकराक्षाचे रथ अश्व, सारथी यांचा संहार केला :
मकराक्षें आपण । निवारितां बाणें बाण ।
श्रीरामें धनुष्य छेदोनी आपण । पाडिलें जाण क्षितितळी ॥ ३३ ॥
सवेंचि विंधोनियां बाण। सारथ्याचा घेतला प्राण ।
चारी वारु मारिले जाण । श्रीरामें क्षोभोन संग्रामीं ॥ ३४ ॥
हताश्च हतसारथी । मकराक्ष जाला विरथी ।
सक्रोध शूळ घेवोनी हातीं । श्रीरामाप्रती धांविन्नला ॥ ३५ ॥
मकराक्षाचे निर्वाणभल्ल । शूळ हस्तीं वरद ।
धगधगीत अति प्रबळ । अग्निकल्लोळतेजस्वी ॥ ३६ ॥
जेंवी कां भूतांसी घातक । दंडहस्तें धांवें अंतक ।
तेंवी शूळहस्तें मकराक्ष । रामासंमुख धांविन्नला ॥ ३७ ॥
ज्वाळा निघती नेत्रद्वारा । दांत खातसे करकरां ।
शूळ परजोनी गरगरां । श्रीरामचंद्रा हाणितला ॥ ३८ ॥
शूळ येतांचि कडाडीं । सर्व भूतां पडे झांपडी ।
स्वर्गी सुरवरें झालीं वेडीं । रामें निर्वडीं विंधिला ॥ ३९ ॥
आपतंतं ज्वलंतं तु खरपुत्रकराच्च्युतम् ।
बाणैश्चतुर्भिराकाशे शूलं चिच्छेद राघवः ॥२३॥
स च्छिन्नो बहुधा शूलो दिव्यहाठकचित्रितः ।
व्यशिर्यत महोल्केव रामबाणार्दितो भुवि ॥२४॥
तं दृष्ट्वा विफलें शुलं मकराक्षो निशाचरः ।
मुष्टिमाधाय काकुत्स्थं तिष्ठ तिष्ठेति चाब्रवीत् ॥२५॥
स तं दृष्ट्वा पतंतं तु प्रहस्य रघुनंदनः ।
पावकास्त्रं ततो रामः संदधे स्वशरासने ॥२६॥
तेनास्त्रेण हतं रक्षः श्रीरामेण महात्मना ।
संभिन्नहृदयस्तत्र पपात च ममार च ॥२७॥
मकराक्षाचा वध :
शूळ येतां धगधगित । राम रणयोद्धा सावचित्त ।
तीं बाणीं आकाशांत । छेदूनि निश्चित पाडिला ॥ १४० ॥
शिववरद शूळशक्ती । श्रीराम शिवाची ध्येयमूर्ती ।
देखोनि पळाली ते परती । शूळ या युक्तीं छेदिला ॥ ४१ ॥
बाप धनुर्वाडा श्रीरघुनाथ । जैसा गगनीं उल्कापात ।
तैसा शूळ धगधगित । रणाआंत पाडिला ॥ ४२ ॥
शुळ जातांचि निष्फळ । मकराक्ष करी तळमळ ।
श्रीरामासीं न चले बळ । सिद्धि सळ न पवेचि ॥ ४३ ॥
म्हणे श्रीरामा राहें राहें । माझा मुष्टिघाय साहें साहें।
म्हणूनि उभवोनी बाहे । आला लवलाहें राक्षस ॥ ४४ ॥
मकराक्ष येतां दारुण । श्रीरामें सज्जिला अग्निबाण ।
हृदयीं विंधितांचि जाण । पडे निष्राण क्षितितळीं ॥ ४५ ॥
बोंब सुटली राक्षसदळीं । वानरीं पिटिली टाळी ।
मकराक्ष महाबळी । रामें तत्काळीं मारिला ॥ ४६ ॥
दृष्ट्वा ते राक्षसाः सर्वे मकराक्षस्य पातनम् ।
लंकामेव प्रधावंति रामबाणभयार्दिताः ॥२८॥
राक्षस – सेनेचे लंकेत पलायन :
श्रीरामें निमिषार्धात । मकराक्षाचा केला घात ।
राक्षससेना भयभीत । लंकेआंत पळाली ॥ ४७ ॥
दुर्धर मारिला निशाचर । विजयी जाला श्रीरघुवीर ।
वानर करिती जयजयकार । श्रीरामचंद्र निजविजयी ॥ ४८ ॥
एका जनार्दना शरण । झालें मकराक्षाचें निर्दळण ।
पुढील गोड निरुपण । रामायण अति रम्य ॥ १४९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
मकराक्षवधो नाम पंचत्रिशत्तमोऽध्यायः ॥ ३५ ॥
ओंव्या ॥ १४९ ॥ श्लोक ॥ २८ ॥ एवं ॥ १७७ ॥