Ramayan - Chapter 6 - Part 19 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 19

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 19

अध्याय 19

रावणाचा पराजय

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पूर्वप्रसंगाच्या अंती । नीळ मूर्च्छित पडिला क्षितीं ।
रावण मिरवी यश कीर्ती । गर्वोन्नति विजयाची ॥ १ ॥

विसंज्ञं वानरं दृष्टवा रणोत्सुकः ।
रथेनांबुदघोषेण सौ‍मित्रिमभिढुद्रुवे ॥१॥
तमाह सौ‍मित्रिरदीनसत्त्वो विस्फारयंतई धनुरप्रमेयम् ।
अवेहि मामद्य निशाचरेन्‍द्र न वानरांरत्वं प्रतियोद्धुमर्हसि ॥२॥
स तस्य वाक्यं प्रतिपूर्णघोषं ज्याशब्दमुग्रं च निशम्य राजा ।
आसाद्य सौ‍मित्रिमुपस्थितं तं रोषान्वितं वाक्यमुवाच रक्षः ॥३॥
दिष्ट्यासि मे राघव दृष्टिमार्गं प्राप्तोऽन्तगामी विपरीतबुद्धिः ।
अस्मिन्‍क्षणे यास्यसि मृत्युलोकं संछाद्यमानो मम बाणजालैः ॥४॥

नीळाला नेत असता लक्ष्मणाच्या आगमनामुळे रावण परतला :

श्रीरामस्मरणें सुखसंपन्न । नीळ निजसुखें मूर्च्छापन्न ।
त्यातें देखोनि विसंज्ञ । दशानन विचारी ॥ २ ॥
वानरांचा सेनापती । रावणें आणिला रणख्याती ।
ऐशी मिरवावया कीर्ती । नीळ लंकेप्रती स्वयें न्यावा ॥ ३ ॥
तंव नीळाची सोडवण । करुं पावला लक्ष्मण ।
सज्जोनियां धनुष्यबाण । संमुख रावण लक्षूनी ॥ ४ ॥
रावन म्हणे निजचित्तीं । रामसैन्यीं वीर भद्रजाती ।
मज न लभे यश कीर्ती । ऊर्मिलापति स्वयें आला ॥ ५ ॥
आजि लक्ष्मणासी रण । युद्ध करणें निजनिर्वाण ।
ऐसा करोनियां पण । स्वयें रावण परतला ॥ ६ ॥

रावणाचा लक्ष्मणाकडून अधिक्षेप :

मेघ गर्जती कडकडाट । तैसा रथाचा घडघडाड ।
लक्ष्मणेंसीं निकटानिकट । युद्धा दशकंठ स्वयें आला ॥ ७ ॥
रावणासी म्हणे सौ‍मित्र । लंकाधिपति तूं दशशिर ।
मस्तकीं ढळती छत्र चामर । त्या तुज वानर गांजिती ॥ ८ ॥
जरी अंगी आहे आंगवण । तरी मजसीं करी पां रण ।
लक्ष्मणें साधिलें रणांगण । धनुष्यबाण सज्जूनी ॥ ९ ॥
लक्ष्मणें करितां ज्याघोष । नादें त्रासला लंकेश ।
जीवीं लंकेश । जीवीं बैसला परम त्रास । वीरवित्रास सौ‍मित्र ॥ १० ॥
ज्याघोष तळघोषेंसीं जाण । ऐकोनि सौ‍मित्राचें वचन ।
कोपें कोंदला दशानन । रणीं गर्जोन अनुवादे ॥ ११ ॥
आजी माझें मनोरथ । शिवें संपूर्ण केले येथ ।
लक्ष्मण आला रणाआंत। करीन घात बाणें एकें ॥ १२ ॥
शूर्पणखीचे नाक कान । येणे छेदिले आपण ।
तिचें व्हावया उत्तीर्ण । घेईन प्राण बाणें एकें ॥ १३ ॥
दृष्टीं पडतां लक्ष्मणासीं । बाणीं निर्दळून त्यासी ।
अवश्य धाडीन मृत्युपासीं । गर्जे आवेशीं रावण ॥ १४ ॥
ऐकोनि रावणाचें गर्जन । सौ‍मित्र जाला हास्यवदन ।
करुन दावीं रणविंदान । वृथा जल्पोन कार्य काय ॥ १५ ॥

जानामि वीर्य तव राक्षसेंद्र बलं प्रतापं च पराक्रमं च ।
अबस्थितोऽहं शरणचापपाणिरागच्छ किं मोघविकत्थनेन ॥ ५ ॥
स एवमुक्तः कुपितः ससर्ज रक्षोऽधिपः सप्तशरान्सुपुंखान् ।
तान्लक्ष्मणः कांचनचित्रपुंखैश्चिच्छेद बाणैर्निशितैः सुपत्रैः ॥ ६ ॥
क्षुरार्धचंद्रोत्तमकर्णभल्लैः शरांश्च चिच्छेद न चुक्षुभे च ।
स तान्प्रचिच्छेद निशाचरेंद्रं शितानशरान्लक्ष्मणमाजघान ॥ ७ ॥

लक्ष्मणाकाडुन रावणाची निर्भर्त्सना :

सौ‍मित्र म्हणे दशानना । तुझें वीर्य शौर्य प्रताप पूर्ण ।
सर्वही मज आहे ज्ञान । सावधान अवधारीं ॥ १६ ॥
स्वयंवरी वाहतां हरकोदंड । तुझे जालें काळें तोंड ।
तरी वाढिवसी बळबंड । अति तूं लंड निःसंग ॥ १७ ॥
वाळीनें घोलोनि कांखेतळीं । केली सप्तसमुद्रीं आंघोळी ।
ता तू म्हणवितोसी बळी । राक्षसकुळीं निःसंग ॥ १८ ॥
तूं निसंगत्वाचा निखिल राशी । राजा आणि भीक मागसी ।
तोही कपटी कपटवेषी । परदारेसी हरावया ॥ १९ ॥
राजा निजांगें चोरी करी । हे तुझ्य़ा प्रतापाची थोरी ।
वाखाणिली दिगंतरीं । निःसंग संसारी तूं एक ॥ २० ॥
चोरी करुनियां परनारी । पळोनि लपसी लंकापुरीं ।
तरी वानिसी बळाची थोरी । निःसंग संसारीं तू एक ॥ २१ ॥
तुझ श्वेतद्विपाप्रती । दासी लाता देवोनि नाचविती ।
हेही तुझी परम ख्याती । निर्लज्ज निश्चती तूं एक ॥ २२ ॥
कपटवेषें भीक मागतां । सीतेसी स्वयें म्हणविसी माता ।
तिसीच करुं पाहसी कांता । मातृगामिन महापापी ॥ २३ ॥
चोरीमारी परद्वारी । मातृगामी दुराचारी ।
इतुकीं ब्रीदें तुझ्या शिरीं । लाज संसारी तुज नाहीं ॥ २४ ॥
असो हा तुझा निंद्य वृत्तांत । माझा करीन म्हणसी घात ।
तो मी शरचापसमन्वित । युद्धाआंत उभा असें ॥ २५ ॥
रणीं करोनि दावी ख्याती । त्यातें वीर शूर प्रतापी म्हणती ।
जें कां वृथा बडबड करिती । त्यांते निंदिती अधमत्वें ॥ २६ ॥
सज्जूनियां धनुष्यबाण । म्या साधिलेंसे रणांगण ।
माझा घेणें आहे प्राण । यावें आपन संग्रामा ॥ २७ ॥
शुर्पणखीचे नाक कान । छेदिलें हे कर्म सामान्य ।
नाककानेंसी दशानन । आजि छेदीन संग्रामीं ॥ २८ ॥
रावणा ऐकें माझी गोष्टी । संग्रामीं देवों नको पाठी ।
मग मी न लगें तुझ्या पाठीं । कडकडाटीं झुंझावें ॥ २९ ॥

लक्ष्मण व रावणांचे अस्त्रयुद्ध :

ऐकतां सौ‍मित्राचें वचन । हृदयीं पोळला दशानन ।
सुवर्णपत्री निर्वाणबाण । विंधी दारुण शर सप्त ॥ ३० ॥
रावणाचें सातही बाण । हेळा सौ‍मित्र सांडी तोडून ।
तेणें क्षोभला रावण । असंख्य बाण वर्षला ॥ ३१ ॥
ज्या बाणांच्या कडोविकडीं । सुरासुर पाडिले निर्वडी ।
ते ते बाण सौ‍मित्र तोडी । जेंवी सर्पकोडी खगेंद्र ॥ ३२ ॥
गरुड छेदी भुजंगभार । तेंवी रावणाचे दर्धर शर ।
रणीं पसरले अपार । तेणें दशशिर गजबजित ॥ ३३ ॥
तेचि समयीं सौ‍मित्र । निर्दाळावया दशशिर ।
सुवर्णपत्री सुपुंख शर । विंदिले विचित्र ते ऐका ॥ ३४ ॥
सुरुप भाळी सतेज शर । नाराच नाळीक अर्धचंद्र ।
सवेग विंधितां सौ‍मित्र । बाणीं जर्जर लंकेश ॥ ३५ ॥
तरी बळियाढा रावण । निवारोनि लक्ष्मणाचे बाण ।
घ्यावया लक्ष्मणाचा प्राण । अस्त्र निर्वाण प्रयोजी ॥ ३६ ॥
काळी कराळी कंकाळास्त्र । देहदमनी दाहकास्त्र ।
अखंडास्त्र विखंडास्त्र । दंडे दंडास्त्र मारक ॥ ३७ ॥
चंडास्त्र ग्रचंडास्त्र । दंडास्त्र विततंडास्त्र ।
घातनास्त्र पातनास्त्र । निमेषं सौ‍मित्र निवारी ॥ ३८ ॥
निर्वाणास्त्र अति क्रूर । ज्याचेनि होय सर्व संहार ।
रागें मोकली दशशिर । तें सौ‍मित्र निवारी ॥ ३९ ॥
निर्वाणास्त्रें माझीं समस्त । हेळां सौ‍मित्रें केलीं व्यर्थ ।
रावण चुरी दोनी हस्त । दांत खांत करकरां ॥ ४० ॥
हृदयीं आली आठवण । ब्रह्मदत्त वरदबाण ।
रणीं मारावा लक्ष्मण । रागें रावण विंधित ॥ ४१ ॥

शरेण कालग्निसमप्रभेण स्वयंभुदत्तेन ललाटदेशे ।
स लक्ष्मणो रावणसायकार्तश्चाल चापं शिथिलं प्रगृह्य ॥ ८ ॥
पुनःस संज्ञां प्रतिलभ्य कृच्छ्रच्चिच्छेद चापं त्रिदशेंद्रशत्रोः ।
निकृत्तचापं त्रिभिराजघान बाणौस्तदा दाशरथिः शिताग्रैः ॥ ९ ॥
स सायकार्तो विचचाल राजा कृच्छ्राच्च संज्ञां पुनराससाद ।
स कृत्तचापः शरताडितश्च मेदार्द्रगात्रो रुधिरावसिक्तः ॥ १० ॥

रावणाच्या ब्रह्मदत्त वरदबाणाने लक्ष्मणाचा वेध :

ब्रह्मदत्त वरदबाणांसी । रावण विधी रणाभिवेषीं ।
लक्ष्मण निवारीचना त्यासी । वंदिली शिसीं ब्रह्माज्ञा ॥ ४२ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । अन्यथा न करिती ब्रह्मवचन ।
ललाटीं वंदिला वरद बाण । दिसे संपूर्ण रुतलासा ॥ ४३ ॥
ब्रह्मवराचा वरदहस्त । बाण नव्हेती गंधाक्षत्त ।
सौ‍मित्रासी रणभिषिक्त । स्वानंदें करित स्ययंभू ॥ ४४ ॥
पुढील कथेची महिमा भारी । बाण खडतरताचि शिरी ।
लक्ष्मणधैर्याची थोरी । मूर्च्छा सांवरी येतयेतां ॥ ४५ ॥
धनुष्याग्र लावोनि शिरापुढां । मूर्च्छा सांवरी वीर गाढा ।
सवेग उठोनि वेगाढा । सज्जिला मेढा शरवृष्टी ॥ ४६ ॥
शिथिल चाप शिथिल दर्प । शिथिल युद्धखटाटोप ।
ते काळीं सौ‍मित्रिप्रताप । धरी साटोप तें ऐका ॥ ४७ ॥
सौ‍मित्राची शौर्यथोरी । रावण विंधितांचि शरीं ।
एक चापकरीं छेदिले ॥ ४८ ॥
भयें स्वेदसकंपशरीर । सर्वांगीं वाहे रुधिर ।
सौ‍मित्रें दशशिर । केला जर्जर बाणजाळें ॥ ४९ ॥
छिन्नधन्वा लंकानाथ् । लागतां बाणांचा आघात ।
चांचरी जात गडबडित । पडत पडत सांवरी ॥ ५० ॥
वृथा गेला वरदबाण । रणी न मरेचि लक्ष्मण ।
तेणें क्षोभला रावण । शक्ति दारुण स्वयें सज्जी ॥ ५१ ॥

जग्राह शक्तिं सहसा सुचण्डां स्वयम्भुदत्तां युधि देवशत्रुः ।
स तां सधुमानलसन्निकाशां वित्रासनीं वानरराक्षसानाम् ॥११॥
चिक्षेप शक्तिं सहसा ज्वलंतीं सौ‍मित्रये राक्षसराजसिंहः ।
प्रदीप्यमानां रघुनन्दस्तां जघान बाणैरनलप्रकाशैः ॥१२॥
तथापि सा तस्य विवेश शक्तिर्भुजांतरं दाशरथेर्विशालम् ॥१३॥
शक्त्या तया स सौ‍मित्रस्ताडितोऽपि स्तनांतरे ः
विष्णोरमीमांस्यभागमात्मानं प्रति सोऽस्मरन् ॥१४॥

रावणाकडून ब्रह्मशक्तीचा उपयोग :

ब्रह्मयानें दिधली निर्वाणार्थी । ब्रह्मयाची ब्रह्मशकी ।
अनिवार त्रिजगतीं । लक्ष्मणवधार्थी मोकली ॥ ५२ ॥
रावणे सोडितांचि शक्तीसी । कोटिसूर्यसमप्रकाशी ।
कडडिली पैं आकाशीं । तेज चौपासीं न समाये ॥ ५३ ॥
तेजें राक्षसां पडिपाडी । वानरां पडली झांपडी ।
उभय सेना त्रासली बापुडी । शक्तिकडाडी सभ्रांत ॥ ५४ ॥
शक्ति तेजें देदीप्यमान । नादें कडाडितां गगन ।
लक्ष्मण ते काळीं सावधान। शरचापबाण सज्जूनी ॥ ५५ ॥
शक्ति येतां अति प्रचंड । लक्ष्मणाचें बळ वितंड ।
बाणीं करोनि शतखंड । शक्तिचें तोंड ठेंचिलें ॥ ५६ ॥
मागें ने सरे ब्रह्मशक्ती । पुढें न निघवे बाणाहातीं ।
जाजावली रणावर्ती । वांचती गति दिसेना ॥ ५७ ॥
लक्ष्मणाचा करावा घात । तो राहिला शक्तिपुरुषार्थ ।
शक्तिसीं आला प्राणांत । वीर विख्यात सौ‍मित्र ॥ ५८ ॥

शक्तिच्या शरणागतीस मान देऊन लक्ष्मण ती स्वतःवर घेतो :

अचुक लक्ष्मणाचे बाण । चुकवितां न चुकती जाण ।
शक्ति सौ‍मित्राला शरण । माझा प्राण वांचवीं ॥ ५९ ॥
शरणागता नाहीं मरण । हें तंव तुमचें ब्रीद संपूर्ण ।
वांचवावया निजप्राण । शक्ति लोटांगण स्वयें घाली ॥ ६० ॥
दृढ ब्रह्मचारी तूं लक्ष्मण । मी ब्रह्मयाची ब्रह्मशक्ति जाण ।
तुझे हातें कन्यारत्‍न । हृदयीं संपूर्ण सांठवी ॥ ६१ ॥
तूंचि माता तूंचि पिता । मी जालें तुझी दुहिता ।
लक्ष्मणा कृपावंता । माझ्या घाता करुं नको ॥ ६२ ॥
शक्तिनें म्हणतांचि शरण । लक्ष्मणें विंधों सांडिले बाण ।
शक्तिसी हे हृदयस्थान । कृपाळु पूर्ण शरणागता ॥ ६३ ॥
शक्तीनें देतांचि आलिंगन । होईल परदारस्पर्शन ।
लक्ष्मणें सांडोनि देहाभिमान जाला परिपूर्ण परब्रह्म ॥ ६४ ॥

लक्ष्मणास मूर्च्छा :

जेथें नाहीं पुरुषप्रकृती । जेथें नाहीं शिवशक्ती ।
लक्ष्मण राहिला ते अद्वैती । सहजस्थिती स्वानंदें ॥ ६५ ॥
लक्ष्मण पावला विश्रांती । निर्मुक्त केली ब्रह्मशक्ती ।
श्रीरामभजनाची हे ख्याती । सकळ विश्रांति श्रीरामें ॥ ६६ ॥
धर्मयुद्धाची निजनीती । पूर्वी शिकविली रघुपती ।
लक्ष्मण राहिला तेचि गतीं । सहजस्थितीं स्वानंदे ॥ ६७ ॥
घातूं आली ब्रह्मशक्ति । तिसीं दिधली नित्य मुक्ती ।
धन्य संतांची संगती । सुखसंवित्ती घातका ॥ ६८ ॥
बाह्यकथेची अनुवृत्ती । म्हणती योद्धा लंकापती ।
लक्ष्मण भेदूनि शक्ति । पडिला क्षितीं मूर्च्छित ॥ ६९ ॥

विसंज्ञं पतितं दृष्ट्वा सौ‍मित्रिं राक्षसेश्वरः ।
अवतीर्य रथात्तूर्णमभिदुद्राव लक्ष्मणम् ॥१५॥
ततो दानवदर्पघ्नं सौ‍मित्रिं देवकंटक ।
तं पीडयित्वा बाहुभ्यां न प्रभुर्लंघनेऽभवन् ॥१६॥
हिमवान्मंदरः शैलः कैलसश्च महाचलः ।
शक्यो भुजाभ्यां संवोदुं न त्वयं राघवानुजः ॥१७॥
आश्वस्तवश्च विशल्यश्च लक्ष्मणःशत्रुसूदनः ।
विष्णोर्भागममीमास्यमात्मानं प्रत्यनुस्मरन् ॥१८॥

मुर्च्छित लक्ष्मणास नेण्याच्या प्रयत्‍नामध्ये रावणाचे दौर्बल्य :

विसंज्ञ देखोनि लक्ष्मण । रथाहूनि उडोनि रावण ।
सवेग येवोनियां आपण । मुष्टिघातें पूर्ण ताडिला ॥ ७० ॥
रावणें हाणिता मुष्टिघात । झणाणिले दोनी हस्त ।
धापां दाटला लंकानाथ । पडत पडत सांवरी ॥ ७१ ॥
लक्ष्मणा हाणितां मुष्टिघात । माझा होऊं पाहे प्राणांत ।
त्यासीं न्यावे लंकेआंत । परम पुरुषार्थ हा माझा ॥ ७२ ॥
मुख्य धूर लक्ष्मण । रथीं घालितां रावण ।
त्यासीं नुचले तो अणुप्रमाण । सर्वशक्तीं पूर्ण शिणतांही ॥ ७३ ॥
एके दोनी चौ हातीं । लक्ष्मण नुचलें लंकापती ।
सात पांच दहाही हातीं । विसां हातीं कुंथत ॥ ७४ ॥
लक्ष्मणायेवढी धूर प्राप्त । माझेनि न नेववे लंकेआंत ।
कपाळ पिटी लंकानाथ । अभागी निश्चित मी एक ॥ ७५ ॥
लक्ष्मण न मरे मुष्टिघाता । लंके न नेववे घालोनि रथा ।
यासीं करितां शस्त्रघाता । शस्त्रें वृथा स्वयें जाती ॥ ७६ ॥
सस्त्रें हाणिता आकाशासी । जेंवी न रुपती तयासीं ।
तेंवी शस्त्रपात लक्ष्मणासी । अंग घायेंसीं आढळेना ॥ ७७ ॥
आकाशमोट बांधूं जातां । जेंवी चौपलवी ये हाता ।
तेंवी लक्ष्मणासी उचलितां । लंकानाथा अति लज्जा ॥ ७८ ॥
भाग्यें सांपडला येथ । न चले मुष्टिघात शस्त्रपात ।
न नेववे लंकेआंत । तळमळित रावण ॥ ७९ ॥
लक्ष्मणें सांडितां देह‍अहंता । देहीं कोंदली ब्रह्मरुपता ।
तेणें तो नुचले लंकानाथा । स्वयें कुंथतां साटोपें ॥ ८० ॥
रावण विस्मित मानसीं । म्हणे शिवासगट कैलासासी ।
म्यां आंदोळिलें निजबळेंसी । परी लक्ष्मणासी नुचलवे ॥ ८१ ॥
मेरु मंदार गिरिवर । निमेषे उअचलीन मी दशशिर ।
परी नुचलवे हा सौ‍मित्र । रामानुचर बळिष्ठ ॥ ८२ ॥
अचेतन पडिला लक्ष्मण । त्यासीं न चले आंगवण ।
जळो माझें रावणपण । आपणा आपण निर्भत्सी ॥ ८३ ॥
लक्ष्मणासी धरितां लंकानाथ । कोपें खवळला हनुमंत ।
वज्रपाय मुष्टिघात । स्वयें हाणित लंकेशा ॥ ८४ ॥

ततः कुद्धौ वायुसुतो रावणं समभिद्रवत् ।
आजघानोरसि न्यूढे वज्रकल्पेन मुष्टिना ॥१९॥
तेन मुष्टिप्रहारेण रावणो भीमविक्रमः ।
जानुभ्यां न्यपतद्‍भूमौ चचाल निपपात च ॥२०॥
विसंज्ञं रावणं दृष्ट्वा समरे भीमविक्रमम् ।
ऋषयो वानराश्चैव नेदुर्देवाश्च सासुराः ॥२१॥
हन्मानपि तेजस्वी लक्ष्मणं शुभलक्ष्मणम् ।
आनयद्राघवाभ्याशं बाहुभ्यां परिगृह्य वै ॥२२॥
वायुसूनोः सुहृत्त्वेन भक्ता परमया च सः ।
अकंप्योऽपि हि शत्रूणां लघुत्वमगमत्कपेः ॥२३॥

हनुमंताच्या मुष्टिप्रहाराने रावणास मूर्च्छा :

लक्ष्मण होतां मूर्च्छान्वित । लंके नेऊं पाहे लंकानाथ ।
तेणें कोप येवोनि हनुमंत । दे मुष्टिघात लंकेशा ॥ ८५ ॥
तेणें मुष्टिघातें रावणांसी । गुडघे आदळोनि भूमीसीं ।
पालथा पडिला तोंडघसीं । मोकळ्या केशीं विसंज्ञ ॥ ८६ ॥
बळिया बळी लंकानाथ । ज्यासी सुरासुर नित्य कांपत ।
त्यासीं लागतां वानरघात । पडे मूर्च्छित लंकेश ॥ ८७ ॥
रावण पडतां मूर्च्छित । वानर रामनाचें गर्जत ।
सुरासुर जयजयकार करित । ऋषि वदत पुरुषार्था ॥ ८८ ॥

हनुमंताचा सर्वत्र जयजयकार :

देखोनि हनुमंताचे बळ । स्वर्ग मृत्यु पाताळ ।
जयजयकारीं गर्जती सकळ । राक्षसदळ खवळलें ॥ ८९ ॥
राक्षसदळीं हाहाकार । पुढें जो जो जाईल वीर ।
त्यासी कपि करील संहार । द्वंद्वी वानरा राक्षसां ॥ ९० ॥

लक्ष्मणास मारुती रामाकडे नेतो :

विकळ पाडोनि रावणासी । हनुमंत गेला लक्ष्मणापासीं ।
उचलोनियां सावकाशीं । श्रीरामापासी आणिला ॥ ८१ ॥
होतां श्रीरामदर्शन । ब्रह्मशक्तीतें उद्धरोन ।
सौ‍मित्र जाला सावधान । अगाध महिमान भक्तीचे ॥ ९२ ॥
भक्तीपासीं यश कीर्ती । भक्तीपासीं शांति विरक्ती ।
भक्तीपासीं ब्रह्मस्थिती । स्वानंदे वर्तती सर्व कर्मीं ॥ ९३ ॥
भक्तीस विकला भगवंत । भक्ताचे उच्छिष्ट स्वयें काढित ।
रणांगणीं घोडे धूत । शेखीं होत द्वारपाळ ॥ ९४ ॥
भक्तसांकडीं समस्त । सदा सोशी भगवंत ।
ते भक्ति हनुमंतांत । सप्रेंअ वर्तत स्वानंदे ॥ ९५ ॥
विसां हातीं स्वयें रावण । शिणतां नुचलेचि लक्ष्मण ।
तोचि हनुमंतें आपण । पुष्पप्राय जाण उचलिला ॥ ९६ ॥
अभक्ता जो दुर्धर नेमस्त । तो भक्ता जड नव्हे भगवंत ।
यालागीं पुष्पप्राय हनुंमंत । स्वयें उचलित सौ‍मित्र ॥ ९७ ॥
होतां श्रीरामदर्शन । सौ‍मित्र जाला सावधान ।
वानरां उल्लास पूर्ण । केलें गर्जन रामनामें ॥ ९८ ॥

रावणोऽपि महातेजाः प्राप्य संज्ञा महाहवे ।
आददे निशितान्बाणान्जग्राह विपुलं धनुः ॥२४॥
अस्वस्थश्च विशल्यश्च लक्ष्मणः शत्रुसूदनः ।
एतस्मिन्नंतरे वीरो दृष्ट्वा रावणविभ्रमम् ॥२५॥

लागतां हनुमंताचा हात । रावण पडला होता मूर्च्छित ।
तो होवोनि स्वयें स्वस्थ । शरचापयुक्त रथी बैसे ॥ ९९ ॥

लक्ष्मण सावध होतो :

येरीकडे लक्ष्मण । स्वयें होवोनि सावधान ।
सज्जोनियां धनुष्यबाण । पाहे रावण युद्धार्थी ॥ १०० ॥
मज हाणोनि ब्रह्मशक्ती । केऊता गेला लंकापती ।
त्यासी रणीं लावोनि ख्याती । बाणवर्ती मारीन ॥ १ ॥
माझे लागलिया बाण । रणीं वांचला रावण ।
हें मज उणेपण । घेईन प्राण बाणें एकें ॥ २ ॥
सोडूनियां बाणवर्त । रणीं रावणासीं करीन घात ।
लक्ष्मण चालिला गर्जत । शरचापयुक्त साटोपें ॥ ३ ॥
लक्ष्मण निघतां उल्लासेंसी । श्रीरामे धरिला पोटासीं ।
अति प्रीतीं प्रेमेंसी । गुह्य त्यापासीं सांगत ॥ ४ ॥
रणीं मारावा दशानन । माझी प्रतिज्ञा हें प्रमाण ।
प्रतिपाळावी आपण । रणीं रावण मज द्यावा ॥ ५ ॥
तुवां करितांचि रण । निमेषें मारशील रावण ।
माझी प्रतिज्ञा होऊं नेदीं शून्य । सखा संपूर्ण तूं माझा ॥ ६ ॥
किती रावणाचें बळ । रणमाराचें कैसें सळ ।
तुकोन पाहूं दे एक वेळ । संग्रामशीळ तयाचें ॥ ७ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । सौ‍मित्र घाली लोटांगण ।
श्रीरामा देवोनि रावण । वंदूनि चरण परतला ॥ ८ ॥

लक्ष्मणं च समाश्वस्तं सैन्य च मुदितं पुनः ।
निपातितानां वीराणां वानराणां महाचमूः ॥२६॥
दृष्ट्वा रामो रणं गत्वा प्रत्ययाद्रावणं युधि ।
आयांतमुपसंगम्य हनूमान्वाक्यमब्रवीत् ॥२७॥
राम पृष्ठं समारुह्य जह्येनं पापराक्षसम् ।
शृत्वा हनूमतो वाक्यं रामो दाशरथिस्ततः ॥२८॥
एवमुक्तस्तथेत्युक्ता समारुह्य प्लवंगमम् ॥२९॥

लक्ष्मणाला थांबवून श्रीराम रावणावर चाल करितात :

स्वस्थ राखोनि सौ‍मित्रासी । संग्रामा निघतां श्रीरामासीं ।
युद्ध करावया रावणासीं । वानरांसी उल्लास ॥ ९ ॥
वानर घायीं अतिनिर्बुज । लाविती श्रीरामचरणरज ।
अवघे होवोनि नीरुज । नाचती भोजें संग्रामीं ॥ ११० ॥
करितां श्रीरामनामस्मरण । वानरां बाधेना जन्ममरण ।
येणें निःशंकपणें जाण । रावणीं रण करुं येती ॥ ११ ॥
मांडून माहेश्वरी ठाण । सज्जूनियां धनुष्यबाण।
संमुख लक्षोनियां रावण । श्रीराम रण करुं आला ॥ १२ ॥
श्रीराम करितां रणगर्जन । कांपिन्नलें त्रिभुवन ।
हडबडिला दशानन । राक्षससैन्य खळबळिलें ॥ १३ ॥

हनुमंताच्या विनंतीवरुन श्रीराम त्याच्या पाठीवर आरुढ होतात :

रावण रथी श्रीराम विरथी । देखोनि क्षोभला मारुती ।
येवोनियां श्रीरामाप्रती । करी विनंती अति नम्र ॥ १४ ॥
रणीं मर्दावया रावण । स्वयें स्वामीनें कृपा करुन ।
माझे पृष्ठीं करावें आरोहण । म्हणोनि चरण दृढ धरिले ॥ १५ ॥
ऐकोनि हनुमंताची विनंती । संतोषला श्रीरघुपती ।
हनुमंताचे पृष्ठाप्रती । शौर्यशक्ति बैसला ॥ १६ ॥
गरुडासन वृषभासन । इंद्र ऐरावतीं आरोहण ।
अवघे दिसती तृणासमान । श्रीरामासन कपिपृष्ठीं ॥ १७ ॥
आधींच हनुमंत परम शूर । तो जाला श्रीरामा रहंवर ।
त्यावरी बैसला श्रीरामचंद्र । आला संहार राक्षसां ॥ १८ ॥
चालला बोलता रथ । स्वयें जालासे हनुमंत ।
आला राक्षसांसी अंत । रणप्राणांत रावणा ॥ १९ ॥
पशु अश्व जुंपिता रथीं । त्यापासीं पाहिजे सारथी ।
तो नाही श्रीरामरथीं । एकला मारुति रथयंता ॥ १२० ॥

राघवः समराकांक्षी हंतुकामस्तु रावणम् ।
गंभीरोदग्रया वाचा राक्षसेंद्रभुवाच ह॥३०॥
तिष्ठ तिष्ठ मम त्वं हि कृत्वा विप्रियमिदृशम् ।
क्व नु राक्षसशार्दूल गत्वा मोक्षमवाप्स्यसि ॥३१॥
यदिंद्रवैवस्वतभास्करान्वा स्वयंभुवैश्वानरशंकरान्वा ।
गमिष्यासि त्वं दशधा दिशो वा तथापि नैवाद्य गतो विमोक्ष्यसे ॥३२॥

श्रीरामांकडून रावणाची निर्भर्त्सना :

रणीं मर्दावया दशानन । सकोप कोपे रघुनंदन ।
गिरा गभीर गर्जोन । काय आपण बोलत ॥ २१ ॥
चोरोनियां सीता सुंदरी । येवोनि लपसी लंकापुरीं ।
माझ्या दृष्टी पडल्यावरी । कैशा परी वांचसी ॥ २२ ॥
माझे लागलिया घाय । तुज कोण राखेल माय ।
सुरासुर जाल्या साह्य । तरी पाहें सोडिना ॥ २३ ॥
इंद्र चंद्र वरुण कुबेर । यम वायु वैश्वानर ।
माझे देखोनि दुर्धर शर । सुरासुर कांपती ॥ २४ ॥
माझे सुटल्या बाण । दशदिशा पळतां जाण ।
कोणी राखों न शके प्राण । अलोट मरण तुज आलें ॥ २५ ॥
माझे सुटल्या बाण । धाकें सुरवर सांडिती प्राण ।
तेथोनि तुज राखेल कोण । अलोट मरण तुज आलें ॥ २६ ॥
जन्मोनियां ब्रह्मवंशीं । महापापी तूं जालासी ।
ब्रह्मा क्षोभलासे मानसीं । राक्षसांसी प्रळयांत ॥ २७ ॥
चोरीमारी परदारी । इतकीं पापें रावणा तुझे शिरीं ।
तेणें ब्रह्मा क्षोभला भारी । निशाचरी प्रळयांत ॥ २८ ॥
माझे सुटलिया बाण । ब्रह्मा बापुडें ब्राह्मण ।
त्यासीं नव्हे निवारण । अलोट मरण तुज आलें ॥ २९ ॥
रावणा तूं तंव पापमूर्ती । अति उन्माद विषयासक्ती ।
भोग मागतां पार्वती । शिव तुजप्रती क्षोभला ॥ १३० ॥
स्वामीची जे निजकांता । ते तंव सेवकाची निजमाता ।
मातृगामी तूं लंकानाथा । उमा मागतां प्रळयांत ॥ ३१ ॥
चोरितां श्रीरामाची दारा । परम क्षोभ श्रीशंकरा ।
निर्दाळावया निशाचरां । प्रळयरुद्रा प्रेरिलें ॥ ३२ ॥
ऐकोनि श्रीरामवचन । हृदयीं खोंचला दशानन ।
हनुमंतावरी दुर्धर बाण । रागें रावण विंधित ॥ ३३ ॥

राघवस्य वचः श्रुत्वा राक्षसेंद्रो महाकपिम् ।
आजघान शरैस्तीक्ष्णैः कालवैश्वानरापमैः॥३३॥
ततो रामो महातेजा रावणेन कृतं व्रणम ।
दृष्ट्वा प्लवंगशर्दूलं क्रोधस्य वशमभ्यगात् ॥३४॥
तस्याभिसंगम्य रथं सचक्रं साश्वध्वजच्छत्रमहापताकम् ।
ससारथिं साशनिशुलखड्गं रामः प्रचिच्छेद शरैः सुतीक्ष्णैः ॥३५॥

राम रावण यांचे युद्ध :

तीव्र बोलतां रघुनाथ । हृदयी पोळला लंकानाथ ।
करावया हनुमंताचा घात । बाण सज्जित साटोपें ॥ ३४ ॥
खंडोनि माझी रथगती । सव्यासव्य चक्राकृती ।
रणीं विचरतो मारुती । दुर्धर शक्ती वानरा ॥ ३५ ॥
येणें मारिला अखयासुत । इंद्रजित केला हताहत ।
मुख्य द्वंद्वी हा हनुमंत । याचा घात मी करीन ॥ ३६ ॥
माझ्या रथासीं समान । येणें आणिला रघुनंदन ।
याचे करीन मी हनन । सवर्म बाण विंधोनी ॥ ३७ ॥
अडकलाहे श्रीरामातळी । उडोन जाऊं न शके बळी ।
तंव मी याची करीन होळी । बाणजाळीं विंधोनि ॥ ३८ ॥
ऐसें बोलोनि दशशिर । बाण घेवोनि दुर्धर ।
रणीं लक्षोनियां वानर । शर सत्वर विंधिला ॥ ३९ ॥
बाण लागतांचि जीवीं । हनुमान निर्द्वद्व सर्वभावीं ।
रावणातें वाकुंल्या दावी । घायाची पदवी पोंचट ॥ १४० ॥
बाण नव्हेती सुमनमाळा । तुवां घातली माझें गळां ।
घायें उल्लास गोळांगळा । राक्षसदळा ॥ ४१ ॥
हें ऐकोनि दशशिर । बाण घेऊनि दुर्धर ।
रणीं लक्षोनि वानर । शर सत्वर विंधित ॥४२ ॥
हनुमान जाला श्रीरामरथ । पुच्छें राक्षससैन्यघात ।
मुख्य धुरांतेंचि घोळसीत । रणकंदनार्थ कपिपुच्छ ॥ ४३ ॥
कपिपुच्छाचा दुर्धर मार । राक्षसदळीं हाहाकार ।
तेणें दचकला दशशिर । रणीं वानर नाटोपे ॥ ४४ ॥
हनुमंतासीं बाणघात । देखोनियां रुधिरोक्षित ।
रणीं कोपला श्रीरघुनाथ । लंकानाथ दंडावया ॥ ४५ ॥
अति लाघवी रघुनंदन । कैसें कैसे केलें रणविंदान ।
भ्रमचक्रीं पडे रावण । तैसे बाण सोडिले ॥ ४६ ॥

बाणाच्या पिसार्‍याने रावणास रथासह उडविला :

बाणपिसारियाचा पवन । सरथ उडविला रावण ।
वाहटुळीमाजीं भ्रमे पान । तेंवी भ्रमण लंकेशा ॥ ४७ ॥
बाणपिसारियाचा वारा । रावण उडविल अंबरा ।
परिभ्रमे गरगरां । रथीं थरथरां कांपत ॥ ४८ ॥
श्रीरामयुद्धाची कडाडी । रावणा पाडिली रणझांपडी ।
अतिशयेंसी हडबडी । रणनिर्वडी विसरला ॥ ४९ ॥
बाप लाघवी रघुनाथ । अश्व सारथी ध्वजेंसीं रथ ।
बाणीं छेदिला आकाशांत । छत्रपात सचक्र ॥ १५० ॥

रावणाच्या रथाच्या घोड्यांचा व सारथ्याचा वध :

तयाचि लाघवामाझारीं । चाप छेदोनि वरच्यावरी ।
मुकुट छेदोनियां शिरीं । धरेवरी पाडिला ॥ ५१ ॥
छेदोनि पाडितांचि रथ । पालथा मुखीं लंकानाथ ।
धरेवरी आदळत । पर्वतपात जेवी होय ॥ ५२ ॥

तं विज्वलंतं तु समीक्ष्य रामः समाददे दिप्तमथार्थचंद्रम् ।
तेनार्कवर्ण सहसा किरीटं चिच्छेद रक्षोधिपतेर्महात्मा ॥ ३६ ॥
तन्निर्विषाशीविषसन्निकाशं शांतार्चिषं सूर्यमिव प्रकाशम् ।
गतश्रियं कृत्तकिरीटकुंडलं प्रोवाच रामो युधि राक्षसेंद्रम् ॥ ३७ ॥
क्रुतं त्वया कर्म महत्सुतीवं हतप्रवीरश्च कृतस्त्वयाहम् ।
तस्मात्परिश्रांत इति व्यवस्य न त्वां शरैर्मुत्युवशं नयामि ॥ ३८ ॥

रावणाच्या मुकुटाचा छेद व त्याचे भूमीवर पतन :

बाणार्धशंद्रकडकडाट । सकुंडल छेदिला मुकुट ।
रणी गांजिला दशकंठ । वीर वरिष्ठ श्रीराम ॥ ५३ ॥
दांत पाडिलिया देख । जैसें सर्पांचें शमे विख ।
तेंवी संग्रामीं दशमुख । बळें निःशेष सांडवला ॥ ५४ ॥
जेंवी शांत होय हुताशन । सूर्यासी गिळी अभ्रघन ।
तेंवी संग्रामीं दशानन । हन दीन आभासे ॥ ५५ ॥
मुकुट कुंडले छेदिलीं शिसीं । विरथ रावण मोकळे केशीं ।
संमुख देखोनि श्रीरामासी । कासाविसी होतसें ॥ ५६ ॥
बाणापिसारियाचा वारा । सरथ उडविला अंबरा ।
त्यासी भिडावया श्रीरामचंद्रा । न धरवे धीर लंकेशा ॥ ५७ ॥
करितां श्रीरामासीं रण । माझी न पुरे आंगवण ।
आता त्याचे सुटल्या बाण । अवश्य प्राण घेतील ॥ ५८ ॥
रणीं सहाय यावा दुसरा । तंव कपिपुच्छें निशाचरां ।
थोर लाविला भेदरा । मुख्य धुरा घोळसूनी ॥ ५९ ॥
हनुमान होवोनि श्रीरामरथ । पुच्छें राक्षसां करी आघात ।
जो तो दडे जेथींचा तेथ । लंकानाथ कोण पाहे ॥ १६० ॥
कपिपुच्छें राक्षसश्रेणी । त्रासियेल्या रणांगणीं ।
रावण साह्य न ये कोणी । तोही रणीं धांकत ॥ ६१ ॥
कपिपुच्छें राक्षसभार । रणीं गांजिले निशाचर ।
रामें गांजिला दशशिर । दुर्धर शर वर्षोनी ॥ ६२ ॥

रावणाला श्रीराम केविलवाण्या स्थितीमुळे विश्रांतीसाठी सोडतात :

छत्रपात शस्त्रपात । रथपातेंसी कळापात ।
दीन देखोनि लंकानाथ । आश्वासित श्रीराम ॥ ६३ ॥
सावध ऐकें दशानना । तुज म्यां दिधलें जीवदाना ।
आजि मी न घें तुझ्या प्राणा । जाय परतोन लंकेसी ॥ ६४ ॥
तुझे पुत्र आणि प्रधान । वानर म्हणती हीन दीन ।
तिहीं तुजसीं केलें रण । आंगवण जंव पुरे ॥ ६५ ॥
वानरांसी करितां रण । भागलासी संपूर्ण ।
माझे साहतां दुर्धर बाण । अति क्षीण जालासी ॥ ६६ ॥
भंगल्याचा करितां घात । हा तंव नव्हे गा पुरुषार्थ ।
आजींचा चुकला आघात । लंकेआंत जाय वेगीं ॥ ६७ ॥
जावोनि भगिनी निजकलत्र । संबोखी पुत्र पौत्र ।
सुखें सुहृद स्वगौत्र । पाहें समग्र लंकेशा ॥ ६८ ॥
माझ्या बाणाचा बाणावर्त । तो तुज रावणा प्राणांत ।
एक वेळां जावोनि लंकेआंत । भोगीं मुख्यार्थ प्रिय कांता ॥ ६९ ॥

स एवमुक्तो हतमानदर्पो निकृत्तचापः स हताश्वसूतः ।
अन्यं रथं सारथिना प्रणीतं समारुरोहाथ विवृद्धलज्जः ॥ ३९ ॥
शोकार्दितः कृतमहाकिरीटो विवेश लंकां सहसा गतश्रीः ।
तस्मिन्प्रविष्टे रजनीचरेंद्रे महाबले दानवदेवशत्रौ ॥ ४० ॥
हरीन्विशल्यान्सह लक्ष्मणेन चकार रामः परमाहवाग्रे ॥ ४१ ॥

हीन, दीन स्थितीमध्ये रावणाचे लंकेस प्रयाण :

तुज दिधलें जीवदान । ऐकोनि रामाचें वचन ।
रावण जाला हीन दीन । लज्जायमान रणरंगी ॥ १७० ॥
रावणाची गेली राजकळा । अंगीं बाणली अवकळा ।
शौर्यवीर्यधैर्यबळा । रामें नागविला रणरंगी ॥ ७१ ॥
रावणाचें ब्रीद गहन । आपणा म्हणवी अरिदर्पघ्र ।
श्रीराम दर्पघ्ना दर्पघ्न । दशानन दंडूनी ॥ ७२ ॥
रावणाच्या शरीरभारा । मुसमुसित गर्वफुगार ।
बाणपिसार्‍याचा वारा । दशशिरा गर्वभंगा ॥ ७३ ॥
रणीं क्षोभोनि रघुनाथ । रावणा केले हताहत ।
आणिक आणोनियां रथ । लंकेआंत प्रवेशे ॥ ७४ ॥
निर्वाणशस्त्रे अति प्रबळ । शर चाप त्रिशूळ शूळ ।
परिघ पट्टिश शक्ति सबळ । केलें निर्मूळ श्रीरामें ॥ ७५ ॥
मुकुट कुंडले नाहींत शिसीं । रथीं बैसला मोकळे केशीं ।
परम लज्जा रावणासीं । स्वयें लंकेसीं प्रवेशला ॥ ७६ ॥
रावण जाता पैं लंकेसीं । मुखीं उरल्या मसी ।
मुख न दाखवी कोणासी । अधोमुखेंसीं निघाला ॥ ७७ ॥
युद्धी अपजयो राक्षसेंद्रा । तेणें रुदन दशशिरा ।
नयनीं स्रवती अश्रुधारा । लंकापुरा प्रवेशे ॥ ७८ ॥

श्रीराम स्वतःच्या शिबिरात येतात :

स्वयें येवोनि रघुपती । लक्ष्मणासीं भेदली शक्ती ।
आलिंगून अति प्रीतीं । निःशल्य करिती सौ‍मित्रा ॥ ७९ ॥
माझे सखे जुत्पती । घायवट रणीं पडती ।
त्यांसी द्याया सुखविश्रांती । स्वयें रघुपति रणा पाहे ॥ १८० ॥
घायवट पडतां कपिभुज । लाविती श्रीरामचरणरज ।
तेणें जावोनि दुःखसमाज । नाचती भोजें रणरंगी ॥ ८१ ॥
वानरवीर रणांगणी । रणीं पडता नाहीं कोणी ।
रामनामाच्या स्मरणीं । उल्लासोनी गर्जत ॥ ८२ ॥
रणीं भंगला दशशिर । विजयी जाला श्रीरामचंद्र ।
वानर करिती जयजयकार । नामें कपींद्र गर्जती ॥ ८३ ॥
लागली विजयवाद्यांची ध्वनी । घाव घातला निशाणीं ।
मंगळ तुरें मंगळ ध्वनीं । कपिये रणीं नाचती ॥ ८४ ॥
वानरां हर्ष अपार । अवघे करिती जयजयकार ।
नामें गर्जत अंबर । श्रीरामचंद्र निजविजयी ॥ ८५ ॥
एका जनार्दना शरण । रणीं भंगला रावाण ।
नित्यविजयी रघुनंदन । बिभीषण आल्हादी ॥ ८६ ॥
बिभीषणाचे मनोरथ । पुरवावयालागीं रघुनाथ ।
रणीं दंडिला लंकानाथ । विजयन्वित श्रीराम ॥ १८७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणपराजयो नाम एकोनविशतितमोऽध्यायः ॥ १९ ॥
ओंव्या ॥ १८७ ॥ श्लोक ॥ ४१ ॥ एवं ॥ २२८ ॥