Ramayan - Chapter 6 - Part 13 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 13

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 13

अध्याय 13

श्रीरामांची शरबंधनातून मुक्तता

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सीता अशोकवनात परत्ल्यावर श्रीराम शरबंधानातून शुद्धीवर
आले व लक्ष्मणाची अचेतन स्थिती पाहून विलाप करु लागले :

सीता नेलिया अशोकवना । मागें शरबंधीं रघुनंदना ।
पावोनि लब्धचेतना । आपअपणा अवलोकी ॥ १ ॥

अथ दीर्घेण कालेन संज्ञां लेभे नरोत्तमः ।
प्रत्यवेक्षत मात्मानं शोणितेन परिप्लुतम् ॥१॥
अदीनो दीनया वाचा रामः परमसत्ववान् ।
अभ्यभाषत दीनात्मा हरिभिः परिवारितः ॥२॥
लक्ष्मणं पतितं दृष्ट्वा दुःखशोकसमान्वितः ।
विललाप ततो रामो मंदभश्रूण्यवर्जयन् ॥३॥
किं नु मे सीतया कार्यं लब्धया जीवितेन वा।
शयानं योऽद्य पश्यामि लक्ष्मणं शुभलक्षणम्॥४॥
यत्र क्वचिल्लभेद्‌भार्यां पुत्रान्मित्रांश्च बांधवान् ।
न लक्ष्मणसमो भ्राता सचिवः सांपरायिकः ॥५॥

शरबंधनीं रघुनंदन । स्वयें होवोनि सावधान ।
निजांगीं खडतरले बाण । रुधिरें क्लिन्न भूमिशायी ॥ २ ॥
सवेंचि पाहे लक्ष्मण । तंव यासीं न देखे प्राण ।
सज्ञान घेवोनि अज्ञान । मिथ्या रुदन स्वयें दावी ॥ ३ ॥
नाहीं लक्ष्मणा जीवघात । ऐसें जाणोनि श्रीरघुनाथ ।
पहावया वानरवृत्तांत । आक्रंदत अति दुःखें ॥ ४ ॥
वाचा विकळ भ्रष्टस्वर । ऐकतां देखती वानर ।
रणीं पडला सखा सौ‍मित्र । तेणें रघुवीर विलपत ॥ ५ ॥
रावण इंद्रजित कुंभकर्ण । मारिल्या मज सुख कोण ।
सखा न भेटे लक्ष्मण । सांडिन प्राण यालागीं ॥ ६ ॥

कितीही विजय मिळविले तरी लक्ष्मणाची सर नाहीः

करुनि राक्षसकंदन । घेतलिया लंकाभुवन ।
सखा न भेटे लक्ष्मण । सांडीन प्राण त्यालागीं ॥ ७ ॥
स्त्रिया सीतेऐशा जाण । असंख्य मिळती संपूर्ण ।
तैसा न मिळे सखा लक्ष्मण । सांडीन प्राण त्यालागीं ॥ ८ ॥
स्त्रिया मेळविल्या मिळती । पुत्र पौत्र होय संतती ।
सख्या लक्ष्मणाची प्राप्ती । त्रिजगतीं दुर्लभ ॥ ९ ॥
प्रवेशल्या अयोध्येसी । भरतशत्रुघ्नकौसल्येसी ।
केंवी मुख दाखवूं सुमित्रेसी । त्यजीन प्राणांसी यालागीं ॥ १० ॥
वना आलों दोघे जण । पुसती केउता तो लक्ष्मण ।
तेव्हा माझें काळें वदन । त्यजीन प्राण यालागीं ॥ ११ ॥
लक्ष्मणावांचून आपण । सर्वथा न करीं फळभक्षण ।
त्यावीण न घें मी जीवन । त्यजीन प्राण यालागी ॥१२ ॥
लक्ष्मणावांचून आपण । पदमात्र न करीं गमन ।
त्यालागीं त्यजीन मी प्राण । सत्य भाषण हें माझें ॥ १३ ॥
दुःख आठवलें दारुण । नयनीं आले अश्रु पूर्ण ।
आपल्या कर्माचें दुषण । स्वयें आपण अनुवादे ॥ १४ ॥

अयंमिथ्या प्रलापो मे हत्वा युद्धे दशाननम् ।
यन्मया न कृतो राजा राक्षसानां बिभिषणः ॥६॥

बिभीषणाचा विलाप :

रणीं मारोनि रावण । राक्षसराजा बिभीषण ।
माझेनि न करवेचि जाण । शेकलें ऋण मज त्याचें ॥ १५ ॥
परम माझें मज दूषण । लंका बिभीषणा दिधली दान ।
तें मी नव्हेंचि उत्तीर्ण । शेकलें ऋण मज त्याचें ॥ १६ ॥
भरतासीं पत्र देतां जाण । तेणें रणीं विंधोनि रावण ।
राजा करील बिभीषण । ऋण उत्तीर्ण त्याचेनि ॥ १७ ॥
आमची ऐकून मरणावस्था । भरत शत्रुघ्न तिघीं माता ।
प्राण देतील तत्वतां । उत्तीर्णता नव्हे तेणें ॥ १८ ॥
अंतकाळींचें जें ऋण । वंदून बिभीषणाचे चरण ।
त्यासी देवोनि धनुष्यबाण । ऋण‍उत्तीर्ण मी होईन ॥ १९ ॥
दिव्यास्त्रेंसीं धनुष्यबाण । माझे पावल्या बिभीषण ।
त्रैलोक्यीं पूज्य होईल पूर्ण । निजवरदान हें माझें ॥ २० ॥
ऐकोनि श्रीरामवचन । बिभीषण मूर्च्छापत्र ।
स्वयें दीर्घ करी रुदन । अभाग्य पूर्ण मज माझें ॥ २१ ॥
बुद्धि सांगे रघुनंदन । आम्हा दोघांचा गेल्या प्राण ।
गजरें येवोनि रावण । करील कंदन वानरां ॥ २२ ॥
मजसंमुख करोनि रण । वानर मारतील रक्षोगण ।
मागें तुम्हांसी न यावें मरण । शिघ्र गमन तुम्ही करा ॥ २३ ॥
जुत्पती वीर वानरगण । त्यांसी माझें लोटांगण ।
सवेग न येतां रावण । शीघ्र गमन तुम्ही करा ॥ २४ ॥
मजपुढें करोनि रण । वीर मारिले रक्षोगण ।
जालेती सर्वस्वें उत्तीणें । शीघ्र गमन करावें ॥ २५ ॥

अस्मिन्महूर्ते सुग्रीव प्रतियातुमिहार्हसि ।
सत्वहीनं हि मां राजा रावणोऽभिद्रविष्यति ॥७॥
अंगदं तु पुरस्कृत्य ससैन्यं ससुहद्रणम् ।
सागरं तर सुग्रीवा पुनस्तेनैव सेतुना ॥८॥

श्रीरामांचा सुग्रीवास ससैन्य परतण्याचा आदेश :

सुग्रीवा बुद्धि ऐक पां खरी । येचि समयींचे अवसरीं ।
जंव पडली आहे अंधारी । सहपरिवारीं निघावें ॥ २६ ॥
वानरवीर सुहृज्जन । सैन्य सेनानी कपिगण ।
एकवटोनि आपण । करावें गमन किष्किंधे ॥ २७ ॥
वानरवीरांसमवेत । सुग्रीवराजा जीवें जीत ।
ऐकोनि येऊनि लंकानाथ । करावया घात वानरां ॥ २८ ॥
वानरराजा तूं कपिपती । तुजवीण वानर न चालती ।
तुवां निघावें शिघ्रगतीं । किष्किंधेप्रति नेमस्त ॥ २९ ॥
अंगदें आणिलें मुकुटासी । तो राग पोटीं रावणासी ।
पुढें घालोनियां त्यासी । सकळ सैन्येंसीं निघावें ॥ ३० ॥
करोनि आलों सेतुबंधन । तेणें मार्गे गा आपण ।
शीघ्र करावें गमन । किष्किंधाभुवन ठाकोनी ॥ ३१ ॥
ऐकोनि श्रीरामवचन । सुग्रीव न ढळे अणुप्रमाण ।
पुढती बोले रघुनंदन । शीघ्र गमन करीं बापा ॥ ३२ ॥

यत्तु कार्यंवयस्येन सुहृदा वा परं मम ।
कृतं सुग्रीव सत्सर्वं भवता धर्मभीरुणा ॥९॥
मित्रकार्यं कृतमिदं भवद्‌भिर्वानरर्षभाः ।
अनुज्ञाता मया सर्वे यथेष्ट गंतुमहर्थ ॥१०॥
शुश्रुवुस्तस्य ये सर्वे वानराःपरिदेवितम् ।
ते सर्वे चक्रुरश्रुणि नेत्रैः कृषेतरेक्षणाः ॥११॥

आमचें तुमचें सख्यत्व परम । त्या सख्यत्वाचें कृतकर्म ।
तुवां संपादिलें सुगम । आत्माराम मी जाणें ॥ ३३ ॥
मित्रकार्यी तूं विख्यात । संपादिला मित्रकार्यार्थ ।
सुखी केला हा रघुनाथ । परम आप्त तुम्ही मज ॥ ३४ ॥
असंख्य मेळवोनियां दळ । महावीर कपि प्रबळ ।
सेतु बांधोनि तत्काळ । आलेत सकळ मत्कार्या ॥ ३५ ॥
सखया सुग्रीवा परियेसीं । वानर कष्टलें परदेशीं ।
यांसी नेवोनि स्वगृहांसी । स्त्रीपुत्रांसीं भेटवीं ॥ ३६ ॥
तुवांही किष्किंधाभुवनीं । तारा रुमा दोन्ही पत्‍नी ।
सुक भोगावें अनुदिनीं । सिंहासनीं स्वानंदें ॥ ३७ ॥
अंगद युवराजा जाण । वीर शूर सुभट पूर्ण ।
त्याचेही लळे पाळून । सुखी संपूर्ण करावें ॥ ३८ ॥
माझिया कार्यालागीं जाण । वानरीं वेंचिले प्राण ।
समस्तां माझें लोटांगण । शीघ्र गमन करावें ॥ ३९ ॥
तुम्ही शीघ्र न करितां गमन । येथें येवोनि दशानन ।
करील वानरां रणकंदन । दुःख दारुण तें मज ॥ ४० ॥
मज न बाधी दुःखावस्था । परी सुग्रीवाची परम चिंता ।
दुःख न होतां कपी समस्तां । शिघ्रगमनता निघावें ॥ ४१ ॥
लक्ष्मणाच्या दुःखावस्था । मी प्राण त्यागीन आतां ।
प्राण त्यागील स्वयें सीता । यालागीं शीघ्रता तुम्ही जावें ॥ ४२ ॥
ऐसें श्रीरामाचें विलपन । ऐकोनियां वानरगण ।
अश्रुपूर्ण जाले नयन । रुदन स्फुंदोन ते करीती ॥ ४३ ॥

रामांच्या आदेशावर सुग्रीवाची प्रतिक्रिया :

ऐकोनि श्रीरामवचन । सुग्रीव बोलिला गर्जोन ।
सांडोनियां रामचरण । मागें आपण सरुंना ॥ ४४ ॥
निकट आल्या प्राणांत । ओढवलिया कल्पांत ।
नाही सांडणें रघुनाथ । निश्चितार्थ हा माझा ॥ ४५ ॥
कैंचें राज्य कैचें छत्र । कैचें कलत्र कैंचें पुत्र ।
सखा सांडोनि श्रीरामचंद्र । अणुमात्र ढळूंना ॥ ४६ ॥
सांडोनियां रघुनंदन । आठवी स्त्रियादि भोग भवन ।
तेव्हांचि त्याचें काळें वदन । आकल्प पतन तयासी ॥ ४७ ॥

बिभीषणस्तु रामस्य दृष्टा गात्रं शरैश्चितम् ।
लक्ष्मणस्यच धर्मात्मा बभूव व्यथितस्तदा ॥१२॥
जलक्लिन्नेन हस्तेन तयोर्नेत्रे विमृज्य च ।
शोकसंपीडितमना रुरोद विललाप ह ॥१३॥

बिभीषणाच्या जलसिंचनाने राकलक्ष्मणांना सुद्धी :

सर्वांगी खोचिनियां बाण । रणीं पडले राम लक्ष्मण ।
तें देखोनियां बिभीषण । करी रुदन अति दुःख ॥ ४८ ॥
बैसोनियां सुग्रीवापासीं । बिभीषण रडे आक्रोशीं ।
कपटें छळोनि राक्षसीं । रणीं रामासी पाडिलें ॥ ४९ ॥
खोंचले देखोनियां बाण । जळहस्तें बिभीषण ।
श्रीराम आणि लक्ष्मण । करी स्पर्शन सर्वांगीं ॥ ५० ॥
बिभीषणहस्तींचें उदक । तेणें निवारेल देहदुःख ।
श्रीरामलक्ष्मण नावेक । पावले सुख शरबंधीं ॥ ५१ ॥
बिभीषणहस्तोदकगुण । दोघे झाले सावधान ।
परी सर्वांगीं विकळपण । अर्ध क्षण बैसवेना ॥ ५२ ॥
सुग्रीव आणि बिभीषण । दोघे देखोनि अति उद्विग्न ।
ते काळीं अंगद आपण । बोले गर्जोन तें ऐका ॥ ५३ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । सुग्रीवादि वानरगण ।
सुख पावती संपूर्ण । तें मी करीन अवधारा ॥ ५४ ॥

अथाब्रवीद्वानरेंद्रः सुग्रीवः पुत्रमंगदम् ।
सुषेणं श्वशुरं पार्श्वे समाहूयेदमब्रवीत् ॥१४॥
सहशूरैर्हरिगणैर्लब्धसंज्ञावविक्लवौ ।
उभौ प्राययतः क्षिप्रं किष्किंधां रामलक्ष्मणौ ॥१५॥

अंगदास सुग्रीवाचा आदेश :

सुग्रीव सांगे अंगदासी । पाचारोनि सुषेण शुरासी ।
सकळसैन्य समुदायेंसीं । न्यावे किष्किंधेसीं राम सौ‍मित्र ॥ ५५ ॥
ऐकोनि सुग्रीवाची युक्ती । अंगदें अति विनयवृत्तीं ।
सुग्रीवादि सकळ जुत्पती । केली विनती अभिवंद्य ॥ ५६ ॥
सुग्रीव राजा कपिपती । घेवोनि सौ‍मित्र सीतापती ।
न वचतां किष्किंधेप्रती । वानर न ढळती ससैन्य ॥ ५७ ॥
स्वामी तुज सुग्रीवेंवीण । वेगळे न होती वानरगण ।
घेवोनि राम लक्ष्मण । जावें आपण किष्किंधेसीं ॥ ५८ ॥

अहं तु रावणं हत्वा सपुत्रं सहबांधवम् ।
मैथिलीमानयिष्यामि सक्रो नष्टमिव श्रियम् ॥१६॥
सर्वे गच्छंतु विश्वासाद्वज्‍रांगो मारुतात्मजः ।
अनेनाहं सहायेन हानिष्ये राक्षसाधिपम् ॥१७॥

अंगदाचे पतिवचन :

सुग्रीव सुषेण गुप्तती समस्त । नळनीळादि जांबवंत ।
अंगद लोटांगणें विनवीत । निजपुरुषार्थ लक्षोनी ॥ ५९ ॥
लब्धसंज्ञ राम लक्ष्मण । दोघे जाले सावधान ।
येथोनि यांसी नाहीं मरण । विकळ पूर्ण सर्वांगीं ॥ ६० ॥
जंव विकळ राम लक्ष्मण । तंव सुग्रीवादि वानरगण ।
समस्तांहीं होवोनि सावधान न्यावे । दोघे जण किष्किंधे ॥ ६१ ॥
मागें मी एकला आपण । मारीन इंद्रजित कुंभकर्ण ।
रणीं निर्दाळीन रावण । सपुत्रप्रधानसैन्यासीं ॥ ६२ ॥
माझेनि विश्वासें समस्त । सुखीं जावें सुनिश्चित ।
एक ठेवावा हनुमंत । रणसाह्यार्थ मजलागीं ॥ ६३ ॥
याचेनि रणसाह्यपणीं । करीन रावणाची धूळधाणी ।
मारीन राक्षसांच्या श्रेणी । सीता जननी सोडवीन ॥ ६४ ॥
करोनियां समुद्रमथन । इंद्रे श्री काढिली शोधून ।
तेंवी राक्षस दमून । सीता चिद्रत्‍न आणीन ॥ ६५ ॥
लंका बिभीषणा दिधली दान । जें कां श्रीरामवाचाऋण ।
तें मी होईन उत्तीर्ण । बिभीषण येथें ठेवा ॥ ६६ ॥
रणीं मारोनि रावणासी । स्वयें सोडवीन सीतेसी ।
राज्य देईन बिभीषणासी । रामऋणासीं उतराई ॥ ६७ ॥

अंगदाचे वचन ऐकून सुग्रीवास आनंद व प्रतिक्रिया :

इतुकें करोनि । सीता घालोनि शिबिकेसीं ।
गर्जत येईल किष्किंधेसीं । सत्य वचनासी मानावें ॥ ६८ ॥
ऐकोनि अंगद अनुवादन । सूखावला सुग्रीव आपण ।
हरिखें चुंबोनियां वदन । संतोषोन स्वयें डोले ॥ ६९ ॥
धन्य अंगदां तुझी वचनावळी । धन्य अंगदा तुझी शैली ।
वीर शूर आतुर्बळी । वानरकुळीं अंगद ॥ ७० ॥
जैसा बोलिलासी तैशी शक्ती । तैसी करुं शकसी ख्य़ाती ।
निधडा वीर तूं त्रिजगतीं । वानूं किती गुण तुझे ॥ ७१ ॥
तूं एकला करिसी रण । आम्ही घेवोनि राम लक्ष्मण ।
किष्किंधे जातां पैं पळोन । अतिजघन्य पैं आम्हां ॥ ७२ ॥
नगरी हांसिजे वानरीं । स्वर्गीं हांसिजे सुरवरीं ।
हांसिजेल ऋषीश्वरीं । चराचरी अतिनिंद्य ॥ ७३ ॥
इंद्रजित आलिया कुंभकर्ण । ससैन्य आलिया रावण ।
मागें सरणें नाहीं जाण । केलें निर्वाण सुग्रीवें ॥ ७४ ॥

हनुमंताला हर्ष :

ऐकोनि अंगदाची मात । हरिखला हनुमंत ।
आला स्वानंदें गर्जत । राक्षसांतकृतकारी ॥ ७५ ॥
अंगद माझा निजसखा । मी अंगदाचा पाठीराखा ।
मारावया दशमुखा । विचार इतुका कायसा ॥ ७६ ॥
जांबवंत सुग्रीव बिभीषण । नळनीळादी वानरगण ।
श्रीरामाचें शरणबंधन । निर्बंधन केंवी होय ॥ ७७ ॥

नारदमुमींचे आगमन व श्रीरामांस वंदन :

ऐसा करितां विचार । तंव तपस्तेजाचा डोंगर ।
आला नारद मुनीश्वर । करीत गजर नामाचा ॥ ७८ ॥
नारदाची निजाअवडी । श्रीराम मारील राक्षसकोडी ।
डोळेभरी पाहीन गोडी । कडोविकडीं नाचत ॥ ७९ ॥
शस्त्रास्त्रीं वीर वानरगणीं । श्रीराम भिडेल झोंटढराणीं ।
त्याही युद्धाची घेईन धणी । शेंडी थरकोनी थडथडित ॥ ८० ॥
पाताळीं युद्ध न पडे दृष्टी । नारद पायें पृथ्वी पिटी ।
नसतां मृत्युलोकीं रणगोष्टीं । तै त्या उठी पोटशूळ ॥ ८१ ॥
स्वर्गीं नाहीं रक्षकल्लोळ । नारदा कपाळशूळ ।
लंकाभुवनीं रणगोंधळ । केला सुकाळ श्रीरामें ॥ ८२ ॥
संग्रामपीक आलें प्रबळ । पाडिले शरबंधनाचे टोळ ।
नारद उडवील तत्काळ । रणसुकाळ पहावया ॥ ८३ ॥
पहावया श्रीरामरणगोडी । नारदासीं परम आवडी ।
फेडावया शरबंधसांकडी । अति तांतडी तो आला ॥ ८४ ॥
श्रीरामाचा निजबाण । ज्या लागे तो ब्रह्म पूर्ण ।
ऐसें पहावया निर्वाणरण । आवडी गहन नारदासीं ॥ ८५ ॥

एतस्मिन्नेव काले तु महायोगबलन्वितः ।
आजगाम महातेजा देवर्षिर्नारदस्तथा ॥१८॥
राघवस्य समीपे तु निपपात सखीकृतः ।
कृत्वा प्रदक्षिणं रामंतेषां मध्ये वनौकसाम् ॥१९॥
अभितुष्टाव काकुत्स्थं स्मारयन्पूर्वजन्म च ।
राम राम महाबाहो शृणुष्व वदतां वर ॥२०॥
दिव्यं लक्ष्मणसंयोगं किमात्मानं न बुध्यसे ।
भवान्नारायणः श्रीमान्सर्वलोकनमस्कृतः ॥२१॥

नारदाचे श्रीरामपराक्रमवर्णन व विनंती :

श्रीराम देखोनि शरबंधनीं । नारद येवोनि तेच क्षणीं ।
प्रदक्षिणा लोटांगणीं । लागला चरणीं रामाच्या ॥ ८६ ॥
अगाध नारदाचें महिमान । तपस्तेजें देदीप्यमान ।
मानूनि श्रीरामभक्त पूर्ण । वानरगण स्वयें वंदिले म॥ ८७ ॥
मी एक श्रेष्ठ महामुनी । वानर वनचर हीन भजनीं ।
ऐसें नारद कदा न मानी । घाली लोटांगण समसाम्य ॥ ८८ ॥
जोचि भाव श्रीरामचंद्रीं । तोचि भाव वानरांवरी ।
प्रदक्षिणा नमस्कार करी । भिन्नत्व न धरी अणुमात्र ॥ ८९ ॥
ऐसी साधूंची शुद्ध शैली । नारदीं नांदे सुखसमेळी ।
तो येवोनि श्रीरामाजवळी । सांगे समूळीं मूळकथा ॥ ९० ॥
तुझे स्वरुप द्वंद्वविहीन । मिथ्या मानिसी शरबंधन ।
होवोनियां सावधान । करीं कंदन राक्षसां ॥ ९१ ॥
तुझें होताहे निर्वाणरण । पाहूं आलों मी आपण ।
घेवोनियां धनुष्यबाण । करीं कंदन राक्षसां ॥ ९२ ॥
ऐसें सांगतां नारदमुनी । श्रीराम नुठी शरबंधनीं ।
मुख्य स्वरुप प्रबोधोनी । अनुवादे वाणी ते ऐका ॥ ९३ ॥
तूं तंव सर्वभूतीं सबाह्य पूर्ण । पूर्णपणें निजनिर्गुण ।
निर्गुणत्वें तूंचि सगुण । निजलक्ष्मण निधारीं ॥ ९४ ॥
मत्स्यरुपें अवसरोन । शंखासुरातें सर्दून ।
स्वयें केलें वेदोद्धरण । तूं आदिकारण श्रीरामा ॥ ९५ ॥
कृर्मरुपें तूं आपण । पृष्ठभागीं धरा धरोन ।
करोनिया समुद्रमंथन । काढिलीं पूर्ण चौदा रत्‍नें ॥ ९६ ॥
वराहरुपें तूचि जाण । निमन्न धरा उद्धरोन ।
हिरण्याक्ष निर्दाळून । जालासी आपण स्वयें वराह ॥ ९७ ॥
प्रल्हादकैवारालागीं जाण । अचेतन खांब फोडून ।
हिरण्यकशिपा विदारुन । जालासी आपण नृसिंह रामा ॥ ९८ ॥
कां उपेंद्ररुपें आपण । दानप्रसगें बळीचें छळण ।
शेखीं जालासी बळीचे अधीन । म्हणती वामन द्वारपाळ ॥ ९९ ॥
परशुराम तूं ब्रह्मक्षत्रीं । गो ब्राह्मणांचा कैवारी ।
सहस्रार्जुनासी करिसी बोहरी । धरा निःक्षत्री त्रिसप्तकें ॥ १०० ॥
तो तूं सातवा अवतार । प्रत्यक्षाकारें श्रीरामचंद्र ।
मिथ्या शरबंध शरपंजर । उठीं सत्वर रिपुदळणीं ॥ १ ॥
ऐसे नारदें सांगतां आपण । शिववरदाचे वरदबाण ।
मिथ्या न करी श्रीरघुनंदन । ऋषि पूर्ण जाणों सरला ॥ २ ॥
तूं तंव साक्षात नारायण । शेषशायी श्रीजनार्दन ।
तूं तंव जगाचा जीवन । गरुडवाहन श्रीरामा ॥ ३ ॥
गरुड तुझा निजसेवक । हाथ जोडोनि उभा संमुख ।
शरबंध छेदावया देख । त्यासी आवश्यक स्मरावें ॥ ४ ॥

श्रीरामाचे नारदास उत्तर :

श्रीराम म्हणे नारदाप्रती । गरुडस्वामी मी रघुपती ।
शरबंधाचे निवृत्ती । सेवका काकुळती केंवी करुं ॥ ५ ॥
माझा स्वामी श्रीशंकर । निवारील शरपंजर ।
ऐसें ऐकतां उत्तर । शिव सत्वर धांविन्नला ॥ ६ ॥

शंकराच्या आज्ञेने गरुडाचे आगमन :

शिव सांगे गरुडासी । तूं तंव महा मूर्ख होसी ।
शरबंध लागला श्रीरामासीं । शीघ्र त्यापासीं तूं जाय ॥ ७ ॥
माझ्या वरदाचे वरद बाण । स्वयें छेदीना रघुनंदन ।
तुंवा जावोनि आपण । शरबंधन छेदावे ॥ ८ ॥
माझ्या वरदाचे सर्पशर । तिहीं बाधिला श्रीरामचंद्र ।
तुवां जाणोनि सत्वर । नागशर छेदावें ॥ ९ ॥
ऐकोनि शिवाचें उत्तर । गरुडासीं उल्लास थोर ।
वंदावया श्रीरामचंद्र । अति सत्वर चालिला ॥ ११० ॥

एतस्मिन्नन्तरे वायुर्मेघाश्चासन्सविद्युतः ।
पर्यस्तं सागरे तोयं कंपंतश्च महीधराः ॥२२॥
महता पक्षवातेन सर्वे तीररुहा द्रुमाः ।
बहवः पातिता भग्नाः समूला लवणांभसि ॥२३॥
ततो मुहूर्ताद्ररुडं वैनतेयं महाबलम् ।
वानरा ददृशुः सर्वे ज्वलंतमिव पावकम् ॥२४॥
तमागतमभिप्रेक्ष्य नागास्ते विप्रदुदुवुः ।
यैस्तु तौ पुरुषौ बद्धौ शरभूतैर्महाबलैः ॥२५॥
ततःसुपर्णः काकुत्स्थौ दृष्ट्‍वा प्रत्यभिवाद्य च ।
विममर्श च पाणिभ्यां मुखे चंद्र्समप्रभे ॥२६॥

गरुडाच्या पक्षघाताच्या आवाजाने सर्पांचे पलायन :

गरुडें करितां उड्डाण । उभयपक्षांचा पवन ।
पर्वतवृक्ष उन्मळोन । पडतीं आण अमुद्रीं ॥ ११ ॥
खचोनि पडती गिरिकडे । पक्षी किलकिलती बापुडे ।
समुद्रजळ गगना उडे । अति झडाडें पक्षांच्या ॥ १२ ॥
पक्षवात तो मेघ निर्वाहे । उसळलें जळ वर्षताहे ।
सुवर्णपक्ष विद्युत्प्राये । झळकताहे आकाशीं ॥ १३ ॥
तेजोराशि दैदीप्यमान । कपि देखती गरुडागमन ।
न लागतां अर्धक्षण । आलें उड्डाण शरबंधा ॥ १४ ॥
येतां गरुडाचें उड्डाण । सर्पोद्‌भुत शरबंधन ।
पळोनि जाले शिवभुषण । गरुडाभेणें अतिधाकें ॥ १५ ॥

गरुडभयाने सर्पांचे शंकराच्या शरीरावर आरोहण :

वेगळें पाहतां आपण । गरुड करील पैं विदारण ।
सर्प जाले शिवभूषण । निजमरण चुकवावया ॥ १६ ॥
शिवाचिया अंगावरी । बाहुभूषणें उरीं शिरीं ।
लपती सर्पांचिया हारी । देखोनि सर्पारी अति धाकें ॥ १७ ॥

रामलक्ष्मण संपूर्ण सावध, गरुडाचे रामांना वंदन व क्षमायाचना :

शरबंधनी सर्पबंधन । ते सर्प जातांचि पळोन ।
श्रीराम आणि लक्ष्मण । सावधान स्वयें जाले ॥ १८ ॥
सावध होता रघुनंदन । गरुड घाली लोटांगण ।
मी तंव अपराधी दारुण । क्षमा संपूर्ण मज कीजे ॥ १९ ॥
पुढती नमन लोटांगण । पुढती करी प्रदक्षिण ।
मी तंव अपराधी दारुण । क्षमा संपूर्ण मज कीजे ॥ १२० ॥
मज लगल्या शरबंधन । तुवां सांडिलें उपेक्षून ।
ऐसे श्रीरामा तूं न म्हण । शठ पूर्ण मज न मानीं ॥ २१ ॥
शरबंधाचिये संकटीं । म्यां नाहीं ऐकिले जगजेठी ।
शिवें सांगताचिं गोष्टी । उठाउठीं मी आलों ॥ २२ ॥
मज येतांचि पैं जाण । फिटलें सर्प शरबंधन ।
माझेनि दोघां मुक्तपण । सेवा संपूर्ण हे माझी ॥ २३ ॥
मी तंव घरगुती आप्त । दोघांही केलें शरनिर्मुक्त ।
हेचि सेवा सुनिश्चित । श्रीरघुनाथसुखार्थीं ॥ २४ ॥

सर्पबंधनाचा प्रताप :

सर्पशरबंध दारुण । आल्या सुरासुरगण ।
मिळालिया सिद्ध चारण । शरबंधन सुटेना ॥ २५ ॥
ब्रह्म शक्र कुबेर वरुण । आल्या कोतिकोटि सुरगण ।
सर्पोद्‍भुत शरबंधन । सर्वथा जाण सुटेना ॥ २६ ॥
अठ्यायशीं सहस्र ऋषिपंक्ती । आल्या तपस्वी तेजोमूर्ती ।
सर्पशरबंधनिवृत्ती । त्यांच्या निजशक्तीं न करवे ॥ २७ ॥
सर्पशरबंध अति कठिण । ब्रह्मादिकां अगम्य जाण ।
त्यांचें केलें म्यां निवारण । सेवा संपूर्ण श्रीरामीं ॥ २८ ॥
असतां दिव्यास्त्रें संपूर्ण । दोघां दुर्गम शरबंन ।
तें म्या निवारिलें जाण । सेवा संपूर्ण हे माझी ॥ २९ ॥
तुमच्या अंगीं रुतले बाण । त्यांचे बुजवावे वण ।
करितां गरुडें परिमार्जन । लज्जायमान स्वयें जाला ॥ १३० ॥

सर्पबंधनाचा रामलक्ष्मणावर काहीच परिणाम नाही :

श्रीराम आणि लक्ष्मण । अंगी रुपले नाहींत बाण ।
अंगसीं पडला नाहीं वण । परिमार्जन तें काय ॥ ३१ ॥
शरबंधी सर्प शिवभूषण । करिती श्रीरामस्तवन ।
शरबंधीं रघुनंदन । सुखसंपन्न स्वानंदें ॥ ३२ ॥
शरबंधीं सर्प सतत । शोधितसत्व समस्त ।
भाग्यें उठिला रघुनाथ । नित्यमुक्त श्रीराम ॥ ३३ ॥
शरबंधीं सुखसंपन्न । सर्प करिती मधुर स्तवन ।
लक्ष्मण तोचि शेष शयन । रघुनंदन सुखशायी ॥ ३४ ॥
गरुडें सोडविलें सर्पबंधन । हें तों माझें मिथ्या वचन ।
श्रीराम नित्यमुक्त चिद्‍धन । लज्जायमान वैनतेय ॥ ३५ ॥
शरबंधीं राम सुखसंपन्न । सरसर्प करिती रामस्तवन ।
अगाध श्रीराममहिमान । मी केंवी दीन आकळीं ॥ ३६ ॥
श्रीरामप्रताप निजजिवाडें । सेवा कीजे चंद्रचूडें ।
तेथें मी काय बापुडें । श्रीरामापुढें सामर्थ्यें ॥ ३७ ॥
शरबंध करावया निर्मुक । अतिशयेंसीं मी समर्थ ।
ऐसा गर्वें होता फुंजत । तोही गर्वहत श्रीरामें ॥ ३८ ॥
श्रीरामसामर्थ्य चोखडें । कळिकाळ न पाहे तयाकडे ।
येथें मी कायसें बापुडें । पायां पडे अनुतापें ॥ ३९ ॥

रावणं च रणे हत्वा सीतां त्वमुपलप्स्यसे ।
इत्येवमुक्त्वा वचनं संपूर्णः शीघ्रविक्रमः ॥२७॥
रामंच निरुजं कृत्वा मध्ये तेषां वनौकसाम् ।
प्रदक्षिणं तुतं कृत्वा परिष्वज्याभिवाद्य च ॥२८॥
जगामाकाशमाविश्य गरुडः पवनो यथा ।
नीरुजौ राघवो दृष्ट्वा ते तु वानरयूथपाः ॥२९॥
प्रहृष्टाः ससृजुर्नादान्सक्षसानां भयावहान् ।
ततो भेरीः समाजघ्नुर्मृदंगांश्चाप्यवादयन् ॥३०॥
दध्मुः शंखान्संप्रहृष्टाः क्ष्वेलंत्यपि यथापुरम् ॥३१॥

गरुडाचे रामास वंदन व प्रयाण :

ते काळीं गरुडें आपण । प्रदक्षिणा लोटांगण ।
हरिखें वंदोनि वानरगण । प्रेमसंपूर्ण श्रीरामीं ॥ १४० ॥
वानर पूर्ण श्रीरामभक्त । गरुडें जाणोनि निश्चित ।
कपिकुळासमवेत । श्रीरघुनाथ अभिवंदी ॥ ४१ ॥
पुढती पुढती प्रदक्षिणा । पुढती पुढती लोटांगणा ।
हर्षे वंदी वानरगणा । करावया गमना पूसत ॥ ४२ ॥
देखोनि गरुडाचें प्रेम पूर्ण । श्रीराम झाला सुप्रसन्न ।
देवोनि आलिंगन समाधान । करवी गमन स्वानंदें ॥ ४३ ॥

गरुडाचें आशीर्वचन, रामाच्या अस्त्रामध्ये प्रवेश :

गरुडें करितांचि गमन । श्रीरामासीं आशीर्वचन ।
अनुवादला संतोषोन । गिरागर्जन तें ऐका ॥ ४४ ॥
रणीं मर्दूनि रावणासी । राज्य देवोनि बिभीषणासी ।
सीता आणोनि स्वानंदेसीं । सुखी होसी श्रीरामा ॥ ४५ ॥
गरुडें नमूनि श्रीरामासी । वेगें उसळला नभासीं ।
पवन प्रवेशें आकाशीं । तेणें वेगेसीं निघाला ॥ ४६ ॥
रामरावण झुंजारी । पहावया उल्लास गरुडा भारी ।
श्रीरामभात्याभीतरीं । गरुड गरुडास्त्रीं प्रवेशें ॥ ४७ ॥
अस्त्रदैवतें अत्यद्‍भुतें । यश पावावया श्रीरामहस्तें ।
भातां दाटलीं समस्तें । रणसाह्यार्थे श्रीरामा ॥ ४८ ॥
राम शस्त्रांची निजगती । राम अस्त्रदेवतां निजशक्ती ।
राम जगदात्मा त्रिजगतीं । राम निश्चितीं परब्रह्म ॥ ४९ ॥
गरुडें केलिया गमन । श्रीराम देखोनि सावधान ।
वानरां आलें स्फुरण । करिती गर्जन हरिनामें ॥ १५० ॥
हरिखाच्या निजगजरीं । निशाणें त्राहाटिल्या भेरी ।
ताल घोळ मृदंग मोहरी । शंख वानरीं आस्फुरिले ॥ ५१ ॥

श्रीराम शुद्धीवर आल्यामुळे सर्वत्र आनंद :

श्रीमाम नित्य सावधान । वर्म जाणोनि वानरगण ।
रणीं मर्दावया रावण । गुढिया उभवोनि नाचती ॥ ५२ ॥
वाजंत्र्यांचा ध्वनि गंभीर । वानरीं केला भुभुःकार ।
त्यामाजी रामनामाचा गजर । नामीं अंबर कोंदलें ॥ ५३ ॥
नाम कोंदले गगनीं । आनंद झाला त्रिभुवनीं ।
दचकल्या राक्षसश्रेणी । ऐकतां ध्वनी सुटला कंप ॥ ५४ ॥
ऐकतांचि ते नादध्वनी । रावण दचकला सिंहासनीं ।
इंद्रजित दचकला मनीं । राम शरबंधनी सुटला ॥ ५५ ॥
सुटोनिया शरबंधन । श्रीराम जाला सावधान ।
सुमनें वर्षती सुरगण । उल्लास संपूर्ण सर्वासी ॥ ५६ ॥
एका जनार्दना शरण । श्रीराम नित्य सावधान ।
पुढील कथा अति पावन । मोक्षोपपादन श्रोतयां ॥ ५७ ॥
नर वानर निशाचर । युद्ध करिती घोरांदर ।
तें मोक्षाचें निजमाहेर । कथा पवित्र श्रीरामें ॥ ५८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटिकायां
रामशरबंधननिर्मुक्तिर्नामत्रयो दशोमोऽध्यायः ॥ १३ ॥
ओंव्या ॥ १५८ ॥ श्लोक ॥ ३१ ॥ एवं ॥ १८९ ॥