Ramayan - Chapter 6 - Part 8 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 8

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 8

अध्याय 8

अंगद – शिष्टाई वर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाची दुर्दशा :

मागिले प्रसंगीं जाण । वामनें गांजिला रावण ।
तिज्या रावणाचें प्रकरण । सांगें आपण अंगद ॥ १ ॥
पूर्वप्रसंगीं स्वभावतां । जाली दों रावणांची कथा ।
तिज्या रावणाची प्रौढता । ऐक तत्वता लंकेशा ॥ २ ॥
परिसतां अंगदवचन । रावणा हृदयीं खोंचती बाण ।
कांही न चले आंगवण । ऐके आपण कुसमुसित ॥ ३ ॥

श्वेतद्विपातील फाजिती :

एक रावण मूर्खावेशीं । स्वयें निधाला श्वेतद्वपासी ।
तेथें गति न चले विमानासीं । सेवकांसीं अगम्य ॥ ४ ॥
मागे सांडोनि विमान । राहवोनियां सेवकजन ।
एकला निघे रावण । मूर्खाभिमान । आक्रोशीं ॥ ५ ॥
श्वेतद्विपीचें राज्य समस्त । करावया हस्तगत ।
येणें अभिलाषें लंकानाथ । असें जात श्वेतद्विपा ॥ ६ ॥
श्वेतद्विपासी स्वयें जाण । नारद जाऊं न शके आपण ।
तेथैं बापुडें रावन । सशक कोण प्रवेशे ॥ ७ ॥
रावण चालतां षण्मास । श्वेतद्वीप न ठाके त्यास ।
मार्गी शिणला बहुवस । परम क्लेश पावला ॥ ८ ॥
न कळे उदय अस्तमान । न मिळे अन्न ना जीवन ।
नसे बसाव्या वस्तीचें स्थान । दशानन अति दुःखी ॥ ९ ॥
पुढें लक्षेना पैं स्पष्ट । मागें यावया भुलला वाट ।
भ्रमणचक्रीं दशकंठ । परम कष्ट पावला ॥ १० ॥
निरंजनीं विजनवासीं । रावण रडे उकसाबुकसीं ।
कोण संबोखील त्यासी । परदेशीं एकाकी ॥ ११ ॥
जळ न्यावया नगराआंत । गंगा प्रवाहे श्वेत ।
जळ वाहका दासींची मात । ऐके निवांत रावण ॥ १२ ॥
जळ वाहतां देखोन दासी । रावण जाला अति उल्लासी ।
मी पावलों श्वेतद्वीपासी । हरिखें तीपासीं पुसों आला ॥ १३ ॥
देखोनियां दशमुखासी । स्वयें विनोदें धरिती त्यासी ।
खेळणें करावया दशशिसीं । कौतुकेंसीं आणिला ॥ १४ ॥
दहा मुखें वीस हात । दहाही शिरें मुकुटांकित ।
अभिनव किडें आलें तेथ । दासी धरित साक्षेपें ॥ १५ ॥
सोडवावया आपणाप्रती । न चले रावणाची शक्ती ।
जेंवी कां चिडिया पारध्याहांतीं । तैसिया रीतीं धरियेला ॥ १६ ॥
पारध्या हातीं चिडी चिचात । दासीपासीं लंकानाथ ।
अडकला कुंथत कुंथत । कांहीं सामर्थ्य चालेना ॥ १७ ॥
धरिला देखोन दशानन । भोंवतें मिळाले पैं जन ।
विनोदें अवघे जण । करिती छळण तें ऐका ॥ १८ ॥
काड्या घालोनियां नासी । विचकाविती दहाही मुखांसी ।
टोले हाणोनियां शिसीं । डोळे विसी मिचकावी ॥ १९ ॥
एकें हाणोनिया लात । एक हरणुली नाचवित ।
एक गटांगळ्या देत । अवघेही दांत विचकावया ॥ २० ॥
काकस्वरें श्वानस्वरें । खरस्वरें जंबुकस्वरें ।
भुंकविती पैं लेंकुरें । घुघुस्वरें पैं एक ॥ २१ ॥
एक घालविती कोल्हाटे । एक घालविती हेलाटे ।
दुःख पावोनि दशकंठें । म्हणे येथें कोठें मी आलों ॥ २२ ॥
अवघ्या मिळोनियां दासी । चेंडू करोनि रावणासी ।
एक टाकिती एकीपासीं । एकी चौपासीं धांवती ॥ २३ ॥
एकी टाकिती एकीवरी । एकी झोलिती माझारीं ।
एकी उडविती वरच्यावरी । दुःख दुर्धर रावणा ॥ २४ ॥
जळो ते माझी शौर्यशक्ती । जळो ते माझी प्रताव्यक्ती ।
जळो ते माझी यश कीर्ती । दासी झेलिती तृणप्राय ॥ २५ ॥
चाकांटली माझी बुद्धी । विध्वंसली माझी शुद्धी ।
येथें कां आलों मी दुर्बुद्धी । पडिलों बंदी दासींच्या ॥ २६ ॥
दासी परस्परें टाकिती । रावण डसला एकीचें हातीं ।
चाविरें म्हणोनि निश्चितीं । झुगरिती लंकेसीं ॥ २७ ॥
आदळतां लंकापुरीं । सवोष्ट दातांची चकचुरी ।
नाक चेंदलें वाहे रुधिरीं । राजद्वारीं आकांत ॥ २८ ॥
ऐसा कोण निधडा दादुला । अंतरिक्षीं संग्राम केला ।
तेथोनि रावण झुगरिला । तो आदळला लंकेसीं ॥ २९ ॥
इंद्रजितासहित कुमरजन । वृत्तांत पुसती प्रधान ।
रावण झाला लज्जायमान । प्रतिवचन नेदीच ॥ ३० ॥
तिज्या रावणाची ख्याती । श्वेतद्विपगमनानुवृत्ती ।
सांगितली सर्वही तुजप्रती । यथानिगुतीं लंकेशा ॥ ३१ ॥

वालीच्या तावडीत :

चौथ्या रावणाची स्थिती । अतिशयें अभिनव कीर्तीं ।
ते मी सांगेन तुजप्रती । लंकापते अवधारीं ॥ ३२ ॥
चवथा रावण आतुर्बळी । ध्यानस्थ देखोनियां वाळी ।
त्यासी धरितां कपटमेळीं । तेणें काखेतळीं दडपिला ॥ ३३ ॥
रावण घालोनि काखेतळीं । स्वेग उडोनियां वाळी ।
सप्तसमुद्रीं करोनि आंघोळी । ध्यानानुमेळीं बैसला ॥ ३४ ॥
रावणा दृढ लागली कळ । चरफडी परी न चले बळ ।
नाकीं तोंडीं भरलें कक्षाजळ । जाला विकळ ते काळीं ॥ ३५ ॥
निजभवना येतां वाळी । अंगद उचलितां सुखसेळीं ।
काखेचा रावण पडिला तळीं । वानरी सकळीं देखिला ॥ ३६ ॥
वीस भुजा दश शिर । मुकुट कुंडलें मनोहर ।
कंठीं विविध विचित्र हार । अति सुंदर अंगदिप्ति ॥ ३७ ॥
पाचू पदक हृदयावरी । मुक्ता फळांच्या झालरी ।
कटिसूत्र कटीवरी । झळकत हारी क्षुद्रघंटा ॥ ३८ ॥
ऐसा देखतां वानरीं । अंगदाच्या पाळण्यावरी ।
रावण बांधिला खेळण्यावारी । हेमसूत्री शृंखळा ॥ ३९ ॥
बाळलीलापदसंचारी । लाथा हाणी मुखावरी ।
अंगदमुत्राची धार थोरी । रिघें मुखांतरीं रावणाच्या ॥ ४० ॥
चिमटितां वानरवानरीं । दांत विचकी नानाविकारीं ।
टोले देतां शिरावरी । डोळे त्यांवरी मिचकावी ॥ ४१ ॥
लाता हाणितां संमुखा । क्षतें पडलीं दहाही मुखां ।
अंगद पारखी निका । तेणें दशमुखा लोळखिलें ॥ ४२ ॥
अंगद म्हणे त्यातील तूं कोण । हें पुसावें न लगे जाण ।
माझे लातांचे वण । तुझे मुखीं संपूर्ण दिसती ॥ ४३ ॥
माझ्या मुताची बाळधार । तुझे मुखी पडतां निरंतर ।
तेही चिन्हें उभय अधर । घांसली कोर दिसतसे ॥ ४४ ॥
तो तूं अतिशयें हीन दीन । भद्रीं बैसलासि रावण ।
तुज कैंची आंगवण । करावया रण रामासीं ॥ ४५ ॥

त्याचा रावणावर परिणाम त्याची धमकी :

अंगदाचे वाग्बाण । हृदयीं खोंचले संपूर्ण ।
तेणें तळमळी रावण । वचनें प्राण जाऊं पाहे ॥ ४६ ॥
अंगदवाक्य खडतर । शतधा खोंचलें जिव्हार ।
तेणें तळमळी दशशिर । सर्वथा वानर नाटोपे ॥ ४७ ॥
अंगद नाटोपे वचनानुमेळीं । अंगद नाटोपें करितां कळी ।
अंगद बैसला आतुर्बळी । रावण चळीं कांपत ॥ ४८ ॥
अंगदासीं करावया रण । स्वयें साशंकित दशानन ।
कुमर कांपती प्रधान । कंपायमान राक्षस ॥ ४९ ॥
हनुमंते लाविला धाक । त्याहुनि अंगद निःशंक ।
तेणें धाके एकएक । सैन्य सेवक सेनानी ॥ ५० ॥
ऐसें देखोनियां चिन्ह । बुद्धिवंत दशानन ।
अति कोपें हास्यवदन । काय आपण अनुवादे ॥ ५१ ॥
सभेसीं बैसोनि वानरा । किती जल्पसी सैरावैरा ।
तोंडी नाही वोढावारा । दशशिरा नोळखसी ॥ ५२ ॥
ऐक माझी आंगवण । वंदीं घातले सुरगण ।
श्रीराम बापुडें तें कोण संमुख रण करावया ॥ ५३ ॥
माझी वाजताचि हाक । सुरासुरीं अति धाक ।
श्रीराम बापुडें मशक । मजसंमुख केंवी राहे ॥ ५४ ॥

इंद्रं माल्यकरं सहस्त्रकिरणं द्वारे प्रतिहारकं ।
चंद्रं छत्रधरं संमीरवरुणौ संमार्जयंतौ गृहान् ।
पाच्यत्वे परिनिष्ठितं हुतवहं किं मद्‌गृहे नेक्षसे
रक्षोभक्ष्यमनुष्यमात्रवपुषं त्वं राघवं स्तौषि किम् ॥१॥

रावणाची अवस्तव आत्मस्तुती :

रणीं करोनियां दुर्धर मार । बंदीं घातले सुरवर ।
कामार केले समग्र । तोही प्रकार अवधारीं ॥ ५५ ॥
पाचारोनि कुसमाकर । विचित्र शेजा विचित्र हार ।
इंद्रें आणावे सत्वर । माल्यधर तो केला ॥ ५६ ॥
सूर्य जो कां सहस्रकर । द्वारपाळ निरंतर ।
मलयानिळ चवरधर । चंद्रें छत्र धरावें ॥ ५७ ॥
वायूचा अधिकार जाण । बिदी झाडाव्या संपूर्ण ।
वरुण येवोनि आपण । सडासंमार्जन करावें ॥ ५८ ॥
स्वयें न लावितां इंधन । फुंकिते रांधिते नसोन ।
अग्नि निपजवी अन्न पक्वान्न । सूपविधान शास्त्रार्थें ॥ ५९ ॥
जाहलिया पाकविधान । स्वयें अग्नीनें आपण ।
करावें वस्त्रक्षाळण । रंग राखोन सावध ॥ ६० ॥
सबळ डाग बैसले पोटीं । ते काढावे उठाउठीं ।
जावों न द्यावी का नवटी । कळमळवटीं फेडावीं ॥ ६१ ॥
जळावांचून सकळ मळ । सबाह्य करावे निर्मळ ।
ऐसा क्षाळक कुशळ । अधिकारी प्रबळ नेमाचा ॥ ६२ ॥
विधि दळकांड करी । चंडी तराळी माझे नगरीं ।
माझ्या सामर्थ्याची थोरी । घरोगरीं पाहें पां ॥ ६३ ॥
बृहस्पति माझे कीर्तींचा भाट । बह्मा नित्य जपे शांतिपाठ ।
माझ्या सामर्थ्याचा लोत । अति वरिष्ठ तिहीं लोकीं ॥ ६४ ॥
राम बापुडें मानवी नर । आमुचें खाजुकें ग्रासमात्र ।
वानर जे कां पालेखाईर । धाकेंचि समग्र निमतील ॥ ६५ ॥
मुख्य भक्ष्य राम लक्ष्मण । वानर तिखटें कोशिंबिरी जाण ।
एकेंचि घांसें कुंभकर्ण । भक्षील आपण निमेषार्धें ॥ ६६ ॥
शंभुसमवेत गौरी । म्यां आंदोळिला कैलासगिरी ।
त्या मज रावणाची थोरी । चराचरीं अतुळित ॥ ६७ ॥
तो मी ऐकतां दशानन । मानवी श्रीरामाचें स्तवन ।
अंगदा वल्गसी गर्जोन । आनेंआन सैराचि ॥ ६८ ॥
श्रीरामें कोंठे केलें रण । कोणे दमिला वीर दारुण ।
मारिले त्रिशिरा खर दूषण । हेचि उचकण मज देशी ॥ ६९ ॥
ऐसें बोलतां दशानन । अंगद वक्ता अति सज्ञान ।
श्रीरामाचे गुण गर्जोन । वदे संपूर्ण पुरुषार्थ ॥ ७० ॥

अंगदाकडून रावणाचा धिक्कार :

धिग् धिग् रावणा तुझी कथा । संमुख न येववेचि रघुनाथा ।
चोरुन पळालासी सीता । वृथा पुरुषार्था जल्पसी ॥ ७१ ॥
जेणें तुज बैसवूनि कांखेतळीं । केली सप्तसमुद्रीं आंघोळी ।
तो श्रीरामें मारोनि वाळी । तुज सहकुळीं वधूं आला ॥ ७२ ॥
जया विराधाभेण । सर्वदा पळे रावण ।
तो श्रीरामें मारोनि जाण । राक्षसकंदन करुं आला ॥ ७३ ॥
स्वयंवरीं नुचलेचि कोदंड । तें श्रीरामे केलें दुखंड ।
तयाहीपुढें बळबंड । वृथा तूं लंड वल्गसी ॥ ७४ ॥
ज्यासी समुद्र आला शरण । जेणें समुद्री तारिले पाषाण ।
त्या श्रीरामा माणुसपण । मूर्ख रावण तूं म्हणसी ॥ ७५ ॥

रे रे रावण हीन दीन कुमते रामोऽपि किं मानुषः
किं गंगापि नदी गजः सुरगजो उच्चैश्रवाः किं हयः।
किं रंभाप्यबला कृतं किमु युगं कामोपि धन्वी नु किं
त्रैलोक्यप्रभवप्रतापविभवः किं रे हनूमान्कपिः ॥ २ ॥

रामाचे महत्व न कळल्याबद्दल रावणाचा धिक्कार :

ऐकें रावणा कुमती । दुष्टबुद्धि तूं दुर्मती ।
चैतन्यविग्रही श्रीराममूर्तीं । मनुष्य त्याप्रतीं तूं म्हणसी ॥ ७६ ॥
रामनामें मनुष्य तरती । मनुष्य मानिसी त्या रघुपती ।
रावण तुज अति दुर्मती । द्वेषानुवृत्तीं मरसील ॥ ७७ ॥
इतर ओहळांसमान । मानूं नये गंगाजीवन ।
जिचे जळीं करितां स्नान । परम पावन जड जीव ॥ ७८ ॥
समुद्रमंथनींचा ऐरावती । मानूं नये रानवट हस्ती ।
उच्चैःश्रवा अश्वजाती । पशु अश्वस्थितीं मानू नये ॥ ७९ ॥
कर्पूर कर्दळीजन्मस्थान । रंभा युवती स्वर्गभूषण ।
ते जड मूढ स्त्रियांसमान । सर्वथा जाण नव्हे ॥ ८० ॥
कृतयुगाचें महिमान । सत्यवादी सात्विक जन ।
इतर युगेंसीं समान । तें युग जाण नये मानूं ॥ ८१ ॥
अंगी नुमटतां वण । स्त्रीपुरुषां भेदी पंचबाण ।
तो स्थूळ धनुर्धरांसमान । सर्वथा जाण नये मानूं ॥ ८२ ॥
समुद्राचें उल्लंघन । राक्षसकंदन लंकादहन ।
ऐसा हनुमंताचा प्रताप पूर्ण । त्रैलोक्यीं जाण स्वयें वंद्य ॥ ८३ ॥
ऐसा हनुमंत कपींद्र । ज्यासीं आत्मत्वें मानी श्रीरामचंद्र ।
त्यासी तूं म्हणसी वानर । तूं दशशिर महामूर्ख ॥ ८४ ॥
गंगा नव्हे नदीपडिपाडें । ऐरावता हस्तित्व न घडे ।
उच्चैःश्रवा नव्हे घोडें । कृतयुगा न घडे इतर युगत्व ॥ ८५ ॥
रंभा नव्हे इतर नारी । हनुमान नव्हे तनुवानरी ।
राम परब्रह्म अवतारी । मनष्यदेहधारी तो नव्हे ॥ ८६ ॥
राम नव्हे मानुषवेख । राम त्रैलोक्यीं तारक ।
राम परमात्मा चोख । राम निष्टंक परब्रह्म ॥ ८७ ॥
मरमर रे लंकानाथा । मनुष्य मानिसी रघुनाथा ।
बळें कुंथतोसि आतां । तुझे बळ वृथा ते ऐक ॥ ८८ ॥
शंभूसहित स्वयें गौरी । आंदोळिला कैलासगिरी ।
म्हणसी त्या बळाची थोरी । तृणावारी सरेना ॥ ८९ ॥

रे रे रावण शंभुशैलमथने प्रख्यातवीर्य
कथं रामेण प्रतियोद्धुमिच्छसि मुधा चेत्तत्र युक्तं तव ।
रामस्तिष्ठतु लक्ष्मणेन धनुषा रेखा कृताऽलंघिता
तच्चारेण च लंघितो जलनिधिर्दग्धा हतोक्षः पुरी ॥३॥

रावणाची अंगदाकडून निर्भर्त्सना :

कैलास आंदोळणाचें बळ । सीता चोरितांचि तत्काळ ।
तुझें तुज जालें निर्फळ । तूं निर्बळ नपुंसक ॥ ९० ॥
म्हणसी श्रीरामीं करीन युद्ध । अनुक्त वचन बोल अबद्ध् ।
श्रीरामाभेणें पळसी निर्बंध । त्यासीं युद्धा तें केवीं मिळसी ॥ ९१ ॥
तुज नाहीं आंगवण । श्रीरामासीं न करावे रण ।
लक्ष्मणरेखेपुढें जाण । काळें वदन तुझें जालें ॥ ९२ ॥
लक्ष्मणाची धनुष्यरेखा । नुल्लंघवेचि दशमुखा ।
तूं सदाचि काळमुखा । वृथा आवाकां बळदर्प ॥ ९३ ॥
तुज नुल्लंघवे धनुष्यरेखा । श्रीरामसेवकाचा आवांका ।
समुद्र लंघोनियां देखा । येवोनि लंका विध्वंसी ॥ ९४ ॥
वनकर किंकर प्रधान पुत्र । जंबुमाळी अखया कुमर ।
मारोनियां निशाचर । लंकापूर जाळिलें ॥ ९५ ॥
तुम्हांमाजी इंद्रजित अदट । त्याचें हनुम्यानें काठिलें चरपट ।
पळावया पुढें न फुते वाट । विवरीं स्पष्ट लपाला ॥ ९६ ॥
श्रीरामाचा निजसेवक । हनुमान एकला एक ।
तेणें मर्दूनि तुझें कटक । तुझें दशमुख जाळिलें ॥ ९७ ॥
हनुम्यानें जाळिलें तुझ्या तोंडा । सभेसीं बैसलासी काळतोंडा ।
वृथा बोलसी बळवंडा । ऐक लंडा निजहित ॥ ९८ ॥
सीता अर्पूनि आपण । श्रीरामासीं रिघाल्या शरण ।
तैच तुझे वांचती प्राण । येरवीं मरण कुळेंसीं ॥ ९९ ॥
श्रीरामा सीता न देतां जाण । रावणा तुज राखेल कोण ।
मीच तुझा घेईन प्राण । आंगवण पाहें माझीं ॥ १०० ॥

अंगदाचा अविष्कार आणि रावणाची तारांबळ :

रावण तुझीं दहाही शिरें । मी छेदितों नखाग्रं ।
परी ती शिवनिर्माल्य अपवित्रें । म्हणोनि करें ना स्पर्शे ॥ १ ॥
शिरें वाहून विश्वनाथा । परतोनि वाहिली माथां ।
पूर्ण पापी तूं लंकानाथा । तुज मारितां दोष नाहीं ॥ २ ॥
स्मरोनियां श्रीरघुनाथा । पाप न बाधी तुज मारितां ।
दहाहि शिरीं हाणोनि लाता । रणीं आतां पाडीन ॥ ३ ॥
दशमुखासंमुख । अंगद आला निःशंक ।
रावणा तूं रंक मशक । मारितां देख कोण राखे ॥ ४ ॥
अतिशयेंसिं निगरघट । अंगीं आदळला मर्कट ।
तेणें बजबजिला दशकंठ । करील शेवट वानर ॥ ५ ॥

ततः सरोषमापन्नः शशास सचिवांस्तदा ।
गृह्यतामिति दुर्मेधा वध्यतामिति चासकृत् ॥४॥
रावणस्य वचः श्रुत्वा दीप्तग्निमिव तेजसा ।
आललंबुस्ततो घोराश्चत्वारो रजनीचराः ॥५॥
ग्राहयामास तारेयः स्वयमात्मानमात्मवान् ।
बलं दर्शयितुं वीरो निशाचरगणे तदा ॥६॥
स तान्बाहुद्वयासक्तानादाय पतगनिव ॥७॥

अंगदाच्या माराने रावण गडबडला :

अंगद आदळला अंगासीं । बोलिला निष्ठुर वाक्यासी ।
तेणें रावण कासाविसी । अति कोपेंसीं कोपला ॥ ६ ॥
रावणासीं विविध बाध । स्वयेंचि भय स्वयेंचि क्रोध ।
धरा म्हणावया अंगद । सहसा शब्द न बोलवे ॥ ७ ॥
वांचवावया आपणासी । आक्रोशें सांगें प्रधानांसी ।
धरा मारा रे वानरासी । मज सभेसीं निर्भत्सीं ॥ ८ ॥
न धरितां भीडचाड । सभेमध्यें हा माकड ।
माझें म्हणे काळें तोंड । खंडविखंड करा यासीं ॥ ९ ॥
माझे अपवाद असंख्यांत । हा बोलिला सभेआंत ।
अवश्य याचा करावा घात । तुम्हीं समस्त मोळोनी ॥ ११० ॥

अंगदाला पकडण्याचा सेनानींचा प्रयत्‍न :

ऐकोनि रावणाचें वचन । अंगद धरावया जाण ।
सैन्य सेनानी प्रान । अति गर्जोन धांवती ॥ ११ ॥
अंगद विचारी मानसीं । मारुं नये रावणासीं ।
अलोट रावणाच्या बळासीं । आणि सैन्यसीं शक्ति किती ॥ १२ ॥
यालागीं अंगदें आपण । थोडेंचि केलें उड्डाण ।
त्यासी धरावया सकळ सैन्य । अति सत्राण धाविन्नलें ॥ १३ ॥
गदा मुद्‌गल परिघ पाषाण । शिळा शिखरें विंधिती बाण ।
अंगदासी धरावया पूर्ण । रक्षोगण धाविन्नले ॥ १४ ॥
धरीं मारीं पाडीं पाडीं । करीत आले राक्षसकोडी ।
अंगदा न बाधी भयसांकडी । लव वांकडी नव्हेचि ॥ १५ ॥
लांब सोडिली पुसाटी । तेथें झोंबल्या राक्षसकोटी ।
एक झोंबलें चरणासन्निष्ठीं । एकीं तो कंठीं कवळिला ॥ १६ ॥
पक्षी उडोनि आकाशीं । झडपोनि धरिती वृक्षासी ।
तेंवी चौघे वीर पक्षाभिवेषीं । अंगदासीं झोंबले ॥ १७ ॥
चौघांही वीरां बळ बहू । अंगद धरिला दोहीं बाहू ।
रामस्मरणें निःसंदेहू । नाहीं संदेहू अंगदा ॥ १८ ॥
जेंवी कां गुळावरी माशी । तेंवी अंगद राक्षसीं ।
वेढिला तो चौपासीं । तरी अंगदासीं नाहीं शंका ॥ १९ ॥

प्रासादं शैलसंकाशमुत्पपातांगदस्तदा ।
तेंऽतरिक्षाद्विनिर्धूतास्तस्य वेगेन राक्षसाः ॥८॥
भूमौ निपातिताः सर्वें राक्षसेंद्रस्य पश्यतः ।
भंवत्वा प्रासादशिखरं नाम विश्राव्य चात्मनः ॥९॥
आस्फोटयामास तदा विनद्यं चक्रमे पुनः ।
वायुवेगं समालंब्य रावणस्य तदांगदः ॥१०॥
जग्राह मुकुटं चीरं पादप्रास्थाय मस्तके ।
अंगदेन पदाक्रांतो रक्षः संसदि रावणः ॥११॥
रावणस्तु परं चक्रे क्रोधं प्रासादघर्षणात् ।
विनाशं चात्मनो पश्यन्निःश्वासपरमोऽभवत् ॥१२॥

अंगदाच्या पराक्रमाचे वर्णनः

कटिपुष्ठीं बाहुमूळीं । अंगद धरिला राक्षसीं सकळीं ।
तेणेंसी तो आतुर्बळी । स्वयें तत्काळीं उडाला ॥ १२० ॥
लंकेसीं शिखरासमान । रावणाचे निजभवन ।
अंगदाचें निज‍उड्डाण । सवेग जाण तेथें आलें ॥ २१ ॥
तेथोनिया पाहतां तळीं । भूमिका दिसताहे जवळी ।
म्हणोनि अंगद बळिया बळी । वेगें निराळीं उडाला ॥ २२ ॥
अंग झाडितां आतुर्बळी । राक्षसीं धरिला होता बळीं ।
अंगवातें पडोनि तळीं । जाली रांगोळी अवघ्यांची ॥ २३ ॥
पाणी न मागतां देख । निमाले एक एक ।
महावीरीं घेतला धाक । त्यासंमुख न ये कोणी ॥ २४ ॥
तेथोनि अंगदाचें उड्डाण । सवेग येतांचि सत्राण ।
तळीं पाडोनि रावण । मस्तकीं चरण दिधला ॥ २५ ॥
अंगदें हाणितांचि लाथा । रावण पडिला पालथा ।
त्यासी होतां पैं उलथा । बळ सर्वथा राहेना ॥ २६ ॥
रावण घालोनि पायांतळीं । अंगद गर्जे महाबळीं ।
धुर सोडवावया ये काळीं । राक्षस कुळीं कोण आहे ॥ २७ ॥
इंद्रजित अथवा कुंभकर्ण । सैन्य सेनानी प्रधान ।
सोडवावया स्वयें रावण । आंगवण नव्हे कोणा ॥ २८ ॥
कुंभकर्ण निद्राग्रस्त । वानरभयें इंद्रजित ।
स्वयें चळचळां कांपत । भयें आकांत प्रधानां ॥ २९ ॥

अंगदाचे राक्षसांना आव्हान :

राक्षसांचे सभेआंत । लिडाविला लंकानाथ ।
अंगद अतिशयें गर्जत । नव्हें पुरुषार्थ राक्षसां ॥ १३० ॥
नामविख्यात वाळिसुत । अरे मी अंगद श्रीरामदूत ।
दमावया राक्षसपुरुषार्थ । लंकेआंत आलों असें ॥ ३१ ॥
कोणा अंगी असेल बळ । कोणी करुं शकेल सळ ।
तेणें येवोनि तत्काळ । राणकल्लोळ करावा ॥ ३२ ॥
माझ्या पायांतळीं दशानन । अडकलासे संपूर्ण ।
ज्यासी असेल आंगवण । तेणें सोडवण करुं यावें ॥ ३३ ॥
सभामंडपीं अति आवेशीं । अंगद पाचारी युद्धासीं ।
कोणी न ये सोडवणेसी । घेतला राक्षसीं अति त्रास ॥ ३४ ॥
विध्वंसावें लंकाभुवन । तें शरणागता दिधलें दान ।
तेणें क्षोभेल रघुनंदन । ऐसें आपण नये करुं ॥ ३५ ॥
दान दिधलें शरणागता । ते म्यां लंका मोडितां ।
क्षोभ वाटेल रघुनाथा । यालागीं स्वस्थता राखिली ॥ ३६ ॥
स्वयें मारुं नये रावण । अंगदें जाणोनि आपण ।
पायीं दडपोन दशानन । मुकुट होरोन घेतला ॥ ३७ ॥
मुकुट घेवोनि आपण । अंगद उडतां सत्राण ।
मस्तकें मंडप उचलिला पूर्ण । नाहीं ज्ञान अंगदा ॥ ३८ ॥
धन्य अंगदाचा साटोप । ऐशींसहस्रस्तंभी मंडप ।
उपडितां न कळेचि अल्प । परम प्रताप कपीचा ॥ ३९ ॥
ख्याति करोनि उद्‌भट । शिरीं मंडप हातीं मुकुट ।
अंगद आला वीरवरिष्ठ । देखिला स्पष्ट वानरीं ॥ १४० ॥
मागें लंकेमाजी जाण । कळकळिती राक्षसगण ।
नेलें सभेचें मंडण । भाग्यें रावण वांचला ॥ ४१ ॥
अंगद वीर उद्‌भट । रावणा घोळसोनि स्पष्ट ।
हिरोनि घेतला मुकुट । माग्यें दशकंठ वांचला ॥ ४२ ॥
अंगदापासून रावणें भाग्यें सुटल्या जीवें प्राणें ।
आजि करा याचें जिताणें । वर्धापन जीविताचें ॥ ४३ ॥
रावण सांगे स्वभावतां । अंगदें हाणितांचि लाथा ।
प्राण जावा पैं तत्वतां । सभाग्यतां वांचलों ॥ ४४ ॥
म्हणों पुरुषार्थीं हनुमंत । त्याहून अंगद विख्यात ।
देखोनि वानाराचा पुरुषार्थ । साशंकित रावण ॥ ४५ ॥
मंडप अंगदाचे शिरीं । रत्‍नकळसांचियां हारी ।
मुक्ताफळांच्या झल्लरी । पताका वरी विचित्र ॥ ४६ ॥
वानर् सांगती उल्लासतां । सगळी लंका घेवोनि माथां ।
अंगद आला ऊर्ध्वपंथा । पाहें पुरुषार्था श्रीरामा ॥ ४७ ॥

अंगदाच्या कृतीने रामास क्रोध, अंगद मंडप पुनर्स्थापित करतो :

मंडप देखोनियां माथां । कोप आला श्रीरघुनाथा ।
अंगदें केली अधर्मता । तुझ्या घाता मी करीन ॥ ४८ ॥
लंका दिधली शरणागता । तेथींचा अर्थ येणें आणितां ।
मज लागेल अधमता । तुज या अर्था दंडीन ॥ ४९ ॥
अंगद म्हणे ऐकें रघुनाथा । निजबळें मज उडतां ।
केव्हा मंडप बैसला माथां । नकळतां मज येथें आला ॥ १५० ॥
मस्तकबळें उपडोन । मंडपाचें येथें आगमन ।
सर्वथा मज नाहीं ज्ञान । तुझी आण श्रीरामा ॥ ५१ ॥
ऐकोनि अंगदाची आण । श्रीराम झाला सुप्रसन्न ।
अंगदें करोनि रामस्मरण केलें विंदान तें ऐका ॥ ५२ ॥
पुढील येतें जें उड्डाण । तें करोनि उलटें किराण ।
लक्षोनियां सभास्थान । मंडप संपूर्ण सांडिला ॥ ५३ ॥
बाप अंगद विंदानी । उथाळीं बैसलीं स्तंभस्थानीं ।
समूळ सूत्र चुकों नेदूनी । ठेविला स्वस्थानीं मंडप ॥ ५४ ॥
मंडप येतां कडकडाट । राक्षसां होय हृदयस्फोट ।
आक्रंदला दशकंठ । आलें अरिष्ट अनिवार ॥ ५५ ॥
अंगद मंडप गेला घेवोनी । श्रीरामें सोडविला परतोनी ।
रावणें ऐकतांचि कानिं । धाकें मनीं भयभीत ॥ ५६ ॥
अंगद म्हणे दशानना । रामें मंडप धाडिला जाणा ।
लंका दिधली बिभीषणा । रणीं रावणा मारुनी ॥ ५७ ॥
ऐसें सांगोनि लंकानाथा । अंगद परतला तत्वतां ।
भेटावया श्रीरघुनाथा । उल्हासता स्वानंदें ॥ ५८ ॥

अंगदःपुनरागत्य ववंदे चरणौ ततः ।
सुग्रीवस्य च रामस्य लक्ष्मणस्य तथैव च ॥१३॥
अन्योन्यं ते महावीरा अभिवाद्य महाबलाः ।
रक्षोराजस्य मुकुटं राघवाय न्यवेदयत् ॥१४॥
तंदृष्टवा मुकुटं रामो रत्‍नसारविभूषितम् ।
आबबंध महाबाहू रावणानुजमस्तके ॥१५॥

अंगदाचे रावणाच्या मुकुटासह पुनरागमन :

लंकेसीं मंडप सांडून । अंगदें करोनियां उड्डाण ।
सवेग येवोनि आपण । श्रीरामचरण वंदिले ॥ ५९ ॥
वंदोनि सौ‍मित्र चरण । सुग्रीवासी अभिवंदन ।
वंदोनिया बिभीषण । लोटांगण हनुमंता ॥ १६० ॥
आणिकही वानरवीर । नळनीळजांबुवंतादि थोर ।
अवघे वंदोनि वानर । केला भुभुःकार रामनामें ॥ ६१ ॥
सवेचि अंगद महावीर । येवोनि श्रीरामा समोर ।
पुरुषार्थाचें निजसार । केलें चरित्र तें दावी ॥ ६२ ॥
अनर्घ्य रत्‍न अति तेजिष्ठ । रावणाचा महामुकुट ।
श्रीरामापुढें ठेवोनि स्पष्ट । पायां मर्कट लागला ॥ ६३ ॥
तुझिया कृपा श्रीराघुनाथा । लंकेसीं जावोनि तत्वतां ।
रावणापासीं सांगतां सीता । अति अहंर्तां अनुवादे ॥ ६४ ॥
तेथें म्यां केल्या तीव्र गोष्टी । जेणें रावण कपाळ पिटी ।
तरी तो राक्षस महाहट्टी । सीता गोरटी सोडीना ॥ ६५ ॥
तुम्हांसी मागता कोरान्न । मी तंव सीता नेदीं चिद्रत्‍न ।
ऐसें बोलतां दशानन । कोप दारुण मज आला ॥ ६६ ॥
रावण ऐसा अति बळिष्ठ । घायें ढिलाविला सुभट ।
पायें चेपून दशकंठ । शिरीचा मुकुट हरियेला ॥ ६७ ॥
राक्षसांच्या वीरश्रेणी । धाविन्नल्या माझ्या ग्रहणीं ।
त्या म्यां आपटितां अवनीं । रुधिरें धरणीं प्रवाहे ॥ ६८ ॥
रावण गांजिलियापाठीं । राक्षस निघाले दिग्पटीं ।
तिहीं सांडिल्या युद्धगोष्टी । संमुख दृष्टी कोणी नये ॥ ६९ ॥
तेथूनि मज सवेग येतां । मंडप आला न कळतां ।
तो म्यां सांडिला मागुता । सत्य रघुनाथा हे गोष्टी ॥ १७० ॥
ऐकोनि अंगदाच्या गोष्टी । मुकुट देखोनियां दृष्टीं ।
श्रीराम सुखावला पोटीं । स्वानंदपुष्टीं आलिंगी ॥ ७१ ॥

आनंदशौर्याचा गौरव :

धन्य अंगदाचा पुरुषार्थ । रणीं गांजोनि लंकानाथ ।
मुकुट घेवोनि आला व्यक्त । अति विस्मित श्रीराम ॥ ७२ ॥
संतोषोनि रघुनंदन । हृदयीं आलिंगी सुप्रसन्न ।
करी अंगदमुखचुंबन । अंगद धन्य श्रीरामें ॥ ७३ ॥
श्रीरामें मुकुट घेवोन । पाचारोनि बिभीषण ।
त्याचे मस्तकीं आपण । सतोषोन स्वयें घाली ॥ ७४ ॥
बिभीषण जाला राज्यधर । वानरीं केला जयजयकार ।
रामनामें गर्जें अंबर । देती भुभुःकार स्वानंदें ॥ ७५ ॥
मुकुट बिभीषणाचे मौळीं । देखोनि वानरीं सखळीं ।
हरिखें पिटोनिया टाळी । सुखकल्लोळीं नाचती ॥ ७६ ॥
नळ नीळ जांबवंत । सुग्रीव सुषेण हनुमंत ।
अंगदाचा पुरुषार्थ । वानर वानीत आल्हादें ॥ ७७ ॥
अंगद वीर अति उद्‌भट । अंगद वीर भट सुभट ।
तेणें गाजोनि दशकंठ । आणिला मुकुट पत्यक्ष ॥ ७८ ॥
ऐसी अंगदाची वाटिव । वानर वानिताती सर्व ।
अंगदमानसीं श्रीराघव । भाग्यें अभिनव अंगद ॥ ७९ ॥
शिष्टायी न मानीच रावण । तेणें क्षोभला रघुनंदन ।
आतां करील रणकंदन । दुर्धर बाण सोडूनी ॥ १८० ॥
वानर निशाचर रणीं । भिडती झोंटधरणीं ।
अशुद्धें पूर वाहेल धरणीं । आयणीपायणी भिडतील ॥ ८१ ॥
एका जनार्दना शरण । अंगदशिष्टाई जाली पूर्ण ।
पुढें गोड निरुपण । रम्य रामायण श्रीरामें ॥ १८२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने युद्धकांडे एकाकारटीकायां
अंगदशिष्टाई निरुपणं नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
ओंव्या ॥ १८२ ॥ श्लोक ॥ १५ ॥ एवं १९७ ॥