Ramayan - Chapter 6 - Part 6 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 6

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 6

अध्याय 6

शिष्टाईसाठी अंगदाचे जाणे

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रक्ताचे पाट पाहून श्रीरामांचा कळवळा :

पूर्वप्रसंगीं रणांगणीं । वानरीं मारिल्या वीरश्रेणी ।
रुधिर प्रवाह देखोनि धरणीं । श्रीराम मनीं कळवळला ॥ १ ॥

सर्व बंदोबस्त करुन नंतर पुढील योजनेचा बेत :

कृपा उपजली रघुनाथा । एकाचिया अपकारता ।
करुं नये सकळांच्या घाता । राजधर्मता हे नव्हे ॥ २ ॥
सुग्रीवराजा आणि जांबवंत । अंगदादि वानर समस्त ।
नळनीळादि हनुमंत । शरणागत बिभिषण ॥ ३ ॥

राघवः सन्निवेश्यैवं स्वसैन्यं रक्षसां वधे ।
संमंत्र्य मंत्रिभिः सार्धं निश्चित्य च पुनःपुनः ॥१॥
आनंतर्यमभिप्रेप्सुः क्रमयोगार्थतत्ववित् ।
बिभीषणस्यानुमते राजधर्मनुस्मरन् ॥२॥

दुर्गपरिधी द्वाबंध । करावया राक्षसांचा वध ।
सैन्य ठेविलें सन्नद्ध । वीर विविध आतुर्बळी ॥ ४ ॥
याउपरी काय कर्तव्यता । श्रीराम पुसे समस्तां ।
अवघे म्हणती रघुनाथा । युद्ध तत्वतां करावें ॥ ५ ॥
तुम्ही वृद्ध धर्मयुक्त । सुबुद्धी बुद्धिवंत ।
या पुढील कर्तव्यार्थ । सुनिश्चित मज सांगा ॥ ६ ॥
वानरभाराच्या गजरीं । सेतु बांधोनि सागरीं ।
रावण मारावया सहपरिवारीं । लंकेवरी आम्ही आलों ॥ ७ ॥
ससैन्य मारावें लंकानाथा । विचार कायसा पैं आतां ।
ऐसें समस्तां सांगतां । तें रघुनाथा न मानेचि ॥ ८ ॥

शिष्ट पाठविण्याची सूचना :

जे राजधर्म वेद विहित । तेणेंचि साधे परमार्थ ।
ऐसे धर्म श्रीरघुनाथा । उपपादित सच्छास्त्रें ॥ ९ ॥
अतिशयेंसीं अति समर्थ । शिष्ट धाडावा लंकेआंत ।
ऐसें बोलतां श्रीरघुनाथ । वानर समस्त क्षोभले ॥ १० ॥

त्याला कांही वानरांचा विरोध :

आमची चोरोनि नेली सीता । आम्हींच शिष्ट पाठवावा आतां ।
हें तंव अयुक्त रघुनाथा । युद्ध करितां भय काय ॥ ११ ॥
नाहीं पां हटलों रणें । नाहीं युद्धीं आलें उणें ।
याहीवरी शिष्ट धाडणें । लाजिरवाणें आम्हासी ॥ १२ ॥

श्रीराम त्या वेळी चार प्रकारचा युद्धधर्म सांगतात :

ऐसें बोलतां समस्त । श्रीराम सांगे राजधर्मार्थ ।
भूतदया आणि परमार्थ । समचित्त उपपादी ॥ १३ ॥
युद्धधर्म चतुर्विध । साम दाम दंड भेद ।
अनादिसिद्ध हे प्रसिद्ध । ऐका विशद विभाग ॥ १४ ॥
धुरेचे आंगीं गाढेपण । तेथें युद्ध करी कोण ।
गज वाजी रथ देवोनि धन । शत्रु बुझावून बोळवावे ॥ १५ ॥
नातरी देवोनि देशदुर्ग । वांचवावे धुरेचें अंग ।
या नांव गा दानप्रयोग । भेद विभाग तो ऐका ॥ १६ ॥
पडल्या धुरेसीं दारुण युद्ध । नाहीं सेनानी सैन्य सन्नद्ध ।
तेणें परसैन्या करोनि भेद । करावें युद्ध तदन्वयें ॥ १७ ॥

सामाचा महिमा :

भेदाचियां अनुवृत्तीं । रणीं परचक्रा लाविती ख्याती ।
ऐसी भेदाची गती । सामस्थिती ते ऐका ॥ १८ ॥
युद्धसमयीं सामानुक्रम । हा मुख्यत्वें राजधर्म ।
सामीं भूतदयासंभ्रम । साम तो परम परमार्थ ॥ १९ ॥
साम न करितां जाण । युध करितां दारुण ।
असंख्य मरती प्राणिगण । ते हत्या कोण सोशील ॥ २० ॥
स्वयें साम न करितां । साम मानी जो सर्वथा ।
भूतहत्या त्याचे माथां । राजधर्मता सुनीती ॥ २१ ॥
श्रीराम स्वयें परब्रह्म । अनुवादला राजधर्म ।
तेचि भूतदया निःसीम । परमार्थ परम संग्रामीं ॥ २२ ॥
करितां युद्ध रणकंदनार्थ । तेथेंची लाभे पैं परमार्थ ।
ऐसें बोलतां रघुनाथ । वेद विस्मत विरिंचि ॥ २३ ॥
स्वधर्म बोलतां रघुपती । चाकाटला बृहस्पती ।
चाकाटल्या वेदश्रुती । टकमकती शास्त्रार्थ ॥ २४ ॥

यस्य नाहंकृतो भावो बुद्धियस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमांल्लोकान्न हंति न निबध्यते ॥३॥

अहंकार सोडून युद्ध केले तर दोष लागत नाही :

गीतेमाजी श्रीभगवंत । युद्धीं बोलिला परमार्थ ।
तोचि अनुवादे श्रीरघुनाथ । तोचि श्लोकार्थ अवधारा ॥ २५ ॥
ज्यांसी नाहीं रणाभिमान । कर्मीं नाहीं कर्माभिमान ।
ज्यांसी देहीं नाहीं देहाभिमान । ते तूं जाण नित्यमुक्त ॥ २६ ॥
ते जें जें करिती कर्माचरण । ते तें कर्मचि होय ब्रह्मपूर्ण ।
त्यांसी नाहीं दोषदर्शन । चैतन्यघन निजदृष्टीं ॥ २७ ॥
ज्यांच्या बुद्धीच्या पैं ठायीं । देह देही दोनी नाहीं ।
कर्मबाध त्यां न बाधी कांहीं । देहीं विदेही ते पुरुष ॥ २८ ॥
ऐशा पुरुषीं करिता रण । मरतें मारिते नाहीं जाण ।
ठसठसावोनि पूर्ण । करिती रण रणमारें ॥ २९ ॥
ब्रह्म पावोनि तटस्थ जाला । तो तंव सल्वगुणें प्राशिला ।
त्रिगुणां जिणोनि दादुला । युद्धीं तगटला तो शूर ॥ ३० ॥
समूळ स्वधर्माची कथा । स्वयें सांगतां श्रीरघुनाथा ।
अति विस्मय हनुमंता । जांबवंता ताटस्थ्य ॥ ३१ ॥
ऐकोनि श्रीरामाचें वचन । हनुमान घाली लोटांगण ।
अंगदसुग्रीवादि बिभीषण । वानरगणसमयोगें ॥ ३२ ॥

सर्वांना आश्चर्यं श्रीरामांना वानर अनुकूल :

येथोनियां श्रीरघुनाथा । आमच्या युक्ति खुंटल्या आतां ।
तुझ्या मानेल अनुमता । त्या कार्यार्था तूं करीं ॥ ३३ ॥

शिष्ट कोणाला धाडावें ? तो कसा असावा :

ऐकोनि वानरांचे वचन । स्वयें पुसे पैं सर्वज्ञ ।
शिष्ट पाठवावा कोण । तो निवडून मज सांगा ॥ ३४ ॥
शिष्ट नसावा महाभेड । शिष्टें न धरावी भीड ।
शिष्ट बोलला सुघड । निधडा प्रौढ निजबळें ॥ ३५ ॥
शिष्ट नसावा कानकुडा । शिष्ट नसावा प्रेमळ गाढा ।
शिष्ट नसावा ज्ञानमूढा । पाहिजे निधडा अति योग्य ॥ ३६ ॥
शिष्ट पाहिजे अति चतुर । उत्तरीं देणे प्रत्युत्तर ।
राहोनिया धुरेसमोर । अति प्रखर बोलका ॥ ३७ ॥
धुरेसंमुख बोलतां । सभाक्षोभ नुपजे चित्ता ।
आपुल्या दावोनि पुरुषार्था । स्वामिकार्यार्था साधक ॥ ३८ ॥
दूत पाहिजे अत्यंत लाठा । क्षोभल्या गांजी दशकंठा ।
रावणसभेचा उन्मादताठा । जो वांटीव पाटा रणमर्दें ॥ ३९ ॥
श्रीरामीं सर्वज्ञत्व चोखडें । आम्ही तंव वानर माकडें ।
काय बोलावें तुजपुढें । जेंवी सूर्यापुढें खद्योतें ॥ ४० ॥
जे बदलासी दूतकथा । जो लक्षेना आमुच्या चित्ता ।
जो तुज मानेल रघुनाथा । त्यासी तत्वतां धाडावें ॥ ४१ ॥

हनुमंतापासून सुग्रीवापर्यंत सर्वांचा विचार :

शिष्ट धाडावा हनुमंता । येणें गांजिलें लंकानाथा ।
लंका जाळून आला आतां । त्यासी सर्वाथा नये धाडूं ॥ ४२ ॥
नीळ दूत विचक्षण । बोलूं जाणे सुलक्षण ।
त्याच्या ठायीं अवलक्षण । अति अवगुण तो एका ॥ ४३ ॥
शिष्टाई न घेतां रावण । नीळ न परते आपण ।
त्यासींच करील रणकंदन । बळाभिमान बळदर्प ॥ ४४ ॥
नळही त्याचसारिखा । न कळे स्वामिकार्याचा आवांका ।
जावोनि झोंबेल दशमुखा । बाहुबळें देखा मारावया ॥ ४५ ॥
दूत पाठवावें दधिमुखा । संधि न माने दशमुखा ।
तो पावोनियां अति दुःखा । मर्दिल लंका अविवेकें ॥ ४६ ॥
दूत पाठवावा जांबवंत । अति वृद्ध पायीं अशक्त ।
तो अतिमंत्री बुद्धिवंत । असावा सतत मजपासीं ॥ ४७ ॥
दूतत्वें धाडूं पनस । परी तो अतिशयें कर्कश ।
नेणे सदुक्ति अनुप्रवेश । झोंबेल उदास दशकंठा ॥ ४८ ॥
दूत धाडितां कुमुद । करील रावणासीं विवाद ।
बोलता बोलता चढेल क्रोध । करील उपमर्द लंकेशा ॥ ४९ ॥
दूत पाठवावा सुषेण । चतुर बोलका सुलक्षण ।
संधि न मानितां रावण । देईल प्राण सीतेसाठीं ॥ ५० ॥
श्रेष्ठत्वा दूत केसरी । त्यासीं रावणाचा राग भारी ।
सर्पमुंगुसांच्या परी । परस्परें भिडतील ॥ ५१ ॥
ऋषभ शरभ गवय गवाक्ष । मैंद द्विविद रंभ पद्माक्ष ।
नेणतां शिष्टाईचा पक्ष । अतिदक्ष संग्रामीं ॥ ५२ ॥
इतर जे जे वानरवीर । नेणती शिष्टाईचा प्रकार ।
मारावया दशशिर । अवघे सत्वर उठती ॥ ५३ ॥
सुग्रीव मुख्य वानरराजा । धाडूं नये दूतकाजा ।
दूत लक्षावया दशरथात्मजा । वानरसमाजा शोधित ॥ ५४ ॥
दूत पाठवितां बिभीषण । अवश्य मारील रावण ।
मग मज देणें प्राण । हेही आपण नये करुं ॥ ५५ ॥

हनुमंत अंगदाचे नाव सुचवितो अंगदाचे गुणवर्णन :

तंव बोलिला हनुमंत । विनंती परियेंसीं श्रीरघुनाथ ।
युवराजा अति विख्यात । दूतकार्यार्थ साधील ॥ ५६ ॥

वेढेंदुपद्ममितवानरवाहिनियं
प्रोढप्रतापनिधयः कप्योऽत्र सर्वे ।
तात्रापि च प्रखरबुद्धिवचःप्रतापं
जानेंऽगदं रघुपते तव दूतयोग्यम् ॥४॥

हनुमान म्हणे रघुनंदना । मुख्य मुख्य धुरांच्या गणना ।
वीस पद्में संख्या जाणा । आंगवणा आतुर्बळी ॥ ५७ ॥
यांहीमाजी वाळिसुत । अंगद अति बळें विख्यात ।
रावणाच्या सभेआंत । अति समर्थ बोलावया ॥ ५८ ॥
बोलतां राक्षससभेमधीं । सभाक्षोभ यासीं न बांधी ।
शत्रुवाक्यें वाक्यें निषेधी । अतिसुबुद्धि बोलका ॥ ५९ ॥
अंगद बोलका निघरघट । अंगद वीर धीर सुभट ।
अंगद गांजूं शके दशकंठ । वीर वरिष्ठ अंगद ॥ ६० ॥
अंगदामाजी परमधीर । अंगद अतिशयेसीं शूर ।
अंदाचा निजनिर्धार । अतिगंभीर क्षीरोद ॥ ६१ ॥
छळावया रावणाच्या युक्ती । अंगदामाजी अति व्युत्पत्ती ।
अंगद एकला पुरुषार्थीं राक्षसा ॥ ६२ ॥
अंगद निधडा स्वामिकार्यार्थीं । अंगदापासीं अनेक युक्ती ।
अंगदा अंगी अगाध शक्ती । रणकंदनार्थी राक्षसां ॥ ६३ ॥
अंगद वाळीचा लाडका सुत । दूतकार्यार्थीं योग्य युक्त ।
ऐसें बोलतां हनुमंत । श्रीरघुनाथ तोषला ॥ ६४ ॥

अंगदं वालितनयं कौसलेंद्रोऽब्रवीद्वचः ।
गच्छ सौ‍म्य दशग्रीवं ब्रूहि मद्वचनादिदम्॥५॥
अराक्षसमिमं लोकं तर्कास्मि निशितैः शरैः ।
न चेच्छरणभ्येषी तामादाय च मैथिलीम्॥६॥
यद्याविशसि लिकांस्त्रीन्पक्षीभूत्वा मनोजवः ।
मम चक्षुःपथं प्राप्य न जीवन्प्रतियास्यसि॥७॥

श्रीराम त्याच्याबरोबर संदेश देतात :

पाचारोनि अंगदासी । श्रीराम आलिंगी हृदयासी ।
शिष्ट जावोनि रावणापासीं । सांगें हें त्यासी मद्वाक्य ॥ ६५ ॥
दंडासी कारण मुख्य चोरी । तुवां चोरिली माझी नारी ।
तुज दंडावया बाणधारीं । आलो मी निर्धारीं सीताकांत ॥ ६६ ॥
मुख्य परदाराहरण । तुझ्या मरणा हेचि कारण ।
सुटल्या माझे दुर्धर बाण । तुज कोण राखील ॥ ६७ ॥
सावध ऐकें दशमुखा । सबंधु सुपुत्र ससैन्यका ।
अराक्षसी करीन लंका । बाणसंपर्का निजनेटें ॥ ६८ ॥
लंकेसीं आणोनि माझी कांता । म्हणती श्रीरमा न सुटे सीता ।
तो मी वधावया आलों लंकानाथा । केउता आता पळसील ॥ ६९ ॥
सीता अभिलाषितां काका । पाठी लाविली दर्भशिखा ।
त्यासी पळतां तिहीं लोकां । ठाव देखा न मिळेचि ॥ ७० ॥

सीता परत करावी व शरण यावे :

मग तो मज आला शरण । म्यां वामनेत्र घेऊन ।
त्याचा वाचविला प्राण । हें विंदान ईषिकेचें ॥ ७१ ॥
ऐसी दुर्भशिखा दारुण । सुटल्या माझे दुर्धर बाण ।
पक्षी होवोनि पळतां जाण । जीवें रावण मारीन ॥ ७२ ॥
त्रैलोक्यां पळतां दिग्पटीं । बाण न सोडी पाठी ।
आतुडल्या माझे दृष्टीं । दशकंठीं निःपात ॥ ७३ ॥
काक अपराधी संपूर्ण । मज अनन्य रिघतां शरण ।
शरणागता नाहीं मरण । मज त्याचा प्राण वांचविला ॥ ७४ ॥
रावणा तूंही तैसाचि जाण । सीता देवोनि रिघाल्या शरण ।
लंकाराज्यीं स्थापून । जन्म मरण येवों नेदी ॥ ७५ ॥

बिभीषणाला दुसरी लंका देऊ :

बिभीषणा लंकादान । तदर्थीं ऐकें सावधान ।
नवी लंका करुन निर्माण । तेथें बीभीषण स्थापीन ॥ ७६ ॥
सागरीं तारिले पाषाण । त्या मज श्रीरामासीं जाण ।
करितां नवी लंका निर्माण । अर्ध क्षण लागेना ॥ ७७ ॥
यालागीं श्रीरामा अर्पितां सीता । स्वस्थ जीवित लंकानाथा ।
लंका निजराज्य स्वस्थता । श्रीरघुनाथाचेनि धर्में ॥ ७८ ॥

अमृतफळे देऊन अंगदास निरोप :

ऐसें श्रीरामें आपण । स्वमुखें अंगदासी सांगोन ।
अमृतफळें देवोनि जाण । करवी गमन लंकेसीं ॥ ७९ ॥
अमृतफळांचा शकुन । ज्यांसी करवी रघुनंदन ।
मर्दूनि परांचा मानाभिमान । विजयी पूर्ण तो होय ॥ ८० ॥

अंगदाची कृतार्थता :

अंगदा तुझी शौर्यशक्ती । धृति कीर्ति सहनशांती ।
परम पुरुषार्थाची ख्याती । हनुमंतें मजप्रती सांगितली ॥ ८१ ॥
अंगद म्हणे श्रीरघुनाथा । आज्ञा प्रमाण जी समर्था ।
स्वयें पुरुषार्थ बोलतां । अति मूर्खता येऊं पाहे ॥ ८२ ॥
असो आमुचिया पुरुषार्था । तुझी आज्ञा श्रीरघुनाथा ।
कार्यसिद्धीचिये माथां । आम्हा विजयता श्रीरामें ॥ ८३ ॥
वानर वनचर पालेखाईर । झाले श्रीरामाचे किंकर ।
तेणें आमुचा प्रताप थोर । सुरासुर वंदिती ॥ ८४ ॥
श्रीरामा तुझे आज्ञेपुढें । रावण कायसें बापुडें ।
आजि माझें भाग्य चोखडें । कार्य मजकडे सांगितलें ॥ ८५ ॥
आजि माझे सफलित मनोरथ । स्वयें स्वमुखें श्रीरघुनाथ ।
मज सांगितला कार्यार्थ । भाग्यवंत मी एक ॥ ८६ ॥
सद्‌गुरु हनुमंताचा धर्म । मज तुष्टला श्रीरघूत्तर ।
स्वमुखें सांगे कार्यानुक्रम । भाग्याचा परम मी एक ॥ ८७ ॥
श्रीरामाज्ञा आल्या हाता । साधावया स्वामिकार्यार्था ।
अति उल्लास अंगदचित्ता । होय निगता लंकेसीं ॥ ८८ ॥
करोनि श्रीरामातें प्रदक्षिणा । लागोनि श्रीरामचरणां ।
चरणतीर्थ घेवोनि जाणा । लोटांगणा घातलें ॥ ८९ ॥
वंदोनि लक्ष्मण बिभीषणां । लागला सुग्रीवाच्या चरणां ।
तेणें देवोनि आशीर्वचना । उल्लासें जाणा अनुवादे ॥ ९० ॥

श्रीरामादिकांना अंगद वंदन करुन निघतो :

श्रीरामाज्ञा वंदोनि शिशीं । जिवित्व अर्पिलें श्रीरामासी ।
तुझेनि श्लाघ्यता कपिवंशासी । रामकार्यासी शीघ्र साधीं ॥ ९१ ॥
नळ नीळ जांबवंत सुषेण । इत्यादि वानरगण ।
लोटांगणें वंदूनि चरण । आज्ञापन पूसत ॥ ९२ ॥
अवघे म्हणती वाळिसुता । मृदु मंजुळ विनीतता ।
सुखी केलें आम्हां समस्तां । निजविजयार्था तूं लाहसी ॥ ९३ ॥
देखोनि सद्‌गुरु हनुमंता । अंगदासी उल्लासता ।
त्याचे चरणीं ठेवोनि माथा । सप्रेमता सद्‌गदित ॥ ९४ ॥
अंगदा हनुमंताची भक्ती । अंगदा हनुमंतासीं प्रीती ।
शिघ्र जावया लंकेप्रती । आज्ञा मारुति देतसे ॥ ९५ ॥
अंगदासी हनुमंतें । आश्वासोनि वरदहस्तें ।
लंकेसी पाठविलें त्यातें । दशमुखातें गांजावया ॥ ९६ ॥
श्रीरामा साष्टांग नमस्कार । अवलोकोनि लंकापुर ।
करोनि रामनामें गजर । अंगदवीर उसळला ॥ ९७ ॥

जगामाकाशमाविश्य मूर्तिमानिव हव्यवाट ।
सोऽभिपत्य मुहूर्तेन श्रीरामद्रावणमंदिरम् ॥८॥
ददर्शासीनमव्यग्रं रावणं सचिवैः सह ॥९॥

गगनी जातां अंगदवीर । सुग्रीवादि पैं वानर ।
तिहीं केला जयजयकार । अति गजर नामाचा ॥ ९८ ॥

आकाशमार्गाने अंगदाचे लंकेकडे गमन :

जैसा श्रीरामाचा बाण । तैसें अंगदाचें उड्डाण ।
सत्वर सत्वर करोनियां गमन । आला आपण लंकेसीं ॥ ९९ ॥
आकाशाचिये पोकळी । अंगदें धालोनि पायांतळीं ।
चढोनि निरालंब निराळीं । लंकेजवळी स्वयें आला ॥ १०० ॥
बाळसूर्य रसें ओतिला । किंवा अग्नितेजें घडला ।
तैसा अंगद शोभला । लंके आला दैदीप्यमान ॥ १ ॥
अंगदाचें निज‍उड्डाण । लंकेपासीं आले जाण ।
एका जनार्दना शरण । पुढें निरुपण अति गोड ॥ २ ॥
अंगदरावणसंभाषण । युक्तिप्रयुक्तीचें छळण ।
तेंही गोड निरुपण । सावधान अवधारा ॥ ३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
अंगदशिष्टाईगमनं नाम शष्टोऽध्यायः ॥ ६ ॥
ओव्या ॥ १०३ ॥ श्लोक ॥ ९ ॥ एवं ॥ ११२ ॥