Ramayan - Chapter 6 - Part 3 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 3

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 3

अध्याय 3

रामांच्या मायवी शिराने सीतेचा छळ

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

प्रारंभी झालेल्या अपशकुनाने रावण उद्विग्न :

साधावया रणांगण । मुळींच रावणा अपशकुन ।
श्रीरामें केलें छत्रभंजन । अति उद्विग्न लंकेश ॥ १ ॥

विसर्जयित्वा सचिवान्प्रविवेश स्वामालयम् ।
ततो राक्षसमादाय विद्युज्जिव्हं महाबलम् ॥१॥
मायाविनं महाघोरमब्रवीद्राक्षसाधिपः ।
मोहयिष्यामहे सीतां मायया जनकात्मजाम् ॥२॥
शिरो मायामयं गृह्य राघवस्य निशाचर ।
मां त्वं समुपतिष्ठस्व महच्च सशरं धनुः ॥३॥
एवमुक्तस्तथेत्याह विद्युज्जिह्वो निशाचरः ।
तस्य तुष्टोऽभवद्राजा प्रददौ चास्य भूषणम् ॥४॥

छत्रभंगाचा अपशकुन । तेणें उद्विग्न रावण ।
विसर्जूनियां प्रधान । आला आपण निजधामा ॥ २ ॥
सबळ बळें श्रीरघुनाथा । वानरसैन्य असंख्यातता ।
काय म्यां करावें आतां । प्रबळ चिंता लंकेशा ॥ ३ ॥

रावणाचे विचार :

बळेंचि जानकी भोगूं जातां । मजपरीस सबळ सीता ।
ते करुं शके माझ्या घाता । मज मारितां ते नये ॥ ४ ॥
श्रीरामसेवाअनुवृत्तीं । जन्ममरणाहूनि परती ।
स्वये सीतेची नित्य वस्ती । सीता निश्चितीं न मारवे ॥ ५ ॥
करितां श्रीरामनामस्मरण । तेणें ये मरणासीच मरण ।
तिसीं न चाले मारकपण । सीता संपूर्ण विदेही ॥ ६ ॥
करितां श्रीरामनामस्मरण । उठोनि पळे जन्ममरण ।
तिसीं न चाले मारकपण । सीता संपूर्ण विदेही ॥ ७ ॥
भोगितां न भोगवे सीता । न मारवे मारुं जातां ।
रणीं न जिंकवे रघुनाथा । काय मीं आतां करावें ॥ ८ ॥
रणीं मारिल्या रघुनाथा । वश्य होय जनकदुहिता ।
श्रीराम न मारवे सर्वथा । छळणे सीता वश्य करुं ॥ ९ ॥

विद्युज्जिव्ह राक्षसाला सीतेला छळण्याचा आदेश :

स्वयें कपटी रावण । विद्युज्जिव्ह कपटी पूर्ण ।
करावया सीताछळण । त्यासी आपण गुज सांगे ॥ १० ॥
करावया सीतेचें छळण । श्रीरामाचें शिर संपूर्ण ।
मायिक करावें आपण । धनुष्यबाण समवेत ॥ ११ ॥
विद्युज्जिव्ह म्हणे आपण । शीघ्र शिर करीन निर्माण ।
त्यासीं संतोषोनि रावण । करकंकण अर्पित ॥ १२ ॥

तो विश्वकर्म्याकडे जातो :

मायिक शिर रघुनाथा । करितां न करवे सर्वथा ।
विद्युज्जिव्हां परम चिंता । काय लंकानाथा मुख दाखवूं ॥ १३ ॥
मायिक करिता रामशिर । मोडलें मुंडलें हातियेर ।
जवा न बैसें कोरेकोर । मायिक शिर न करवे ॥ १४ ॥
श्रीराम नव्हे पैं रंगिक । रंगें वोरंगले सकळीक ।
विद्युज्जिव्हासी परम दुःख । दशमुख क्षोभेल ॥ १५ ॥
माया जाणोनि समस्ता । माव न चले श्रीरघुनाथा ।
विद्युज्जिव्हासीं परम चिंता । काय म्या आतां करावें ॥ १६ ॥
माया नाहीं श्रीरामासीं । मायिक शिर न घडवे त्यासीं ।
विद्युज्जिव्ह कासाविसी । विश्वकर्म्यापासीं मग गेला ॥ १७ ॥

त्याला विश्वकर्म्याचे उत्तर :

चरण वंदोनियां त्याचे । मायिक शिर श्रीरामाचें ।
करोनि द्यावें निश्चयाचे । ऐसें वाचे अनुवादे ॥ १८ ॥
विश्वकर्मा वदे साचें । मायिक शिर श्रीरामाचें ।
म्हणता कुष्ठ लागे वाचे । कुळनाशाचें निजमूळ ॥ १९ ॥
जेथें कपट तेथे तळपट । वेदानुवाद घडघडाट ।
भ्रमें भुलला दशकंठ । मरेल स्पष्ट कुळेंसीं ॥ २० ॥
श्रीराम सत्याचें निजसत्य । माया केवळ मिथ्याभूत ।
त्याचें मायिक शिर येथ । मज निश्चित न करवे ॥ २१ ॥
तुमचे निदान आलें गाढें । यालागीं कपट मांडलें कुडें ।
कपट न चले सीतेपुढें । रणीं रोकडें मराल ॥ २२ ॥
ऐसें ऐकतां वचन । विद्युज्जिव्ह करी रुदन ।
श्रीरामशिर न नेतां जाण । दशानन मारील ॥ २३ ॥
रावणा सीतासन्निपात । न कळे स्वार्थ ना परमार्थ ।
अवश्य करील माझा घात । तो अनर्थ चुकवावा ॥ २४ ॥
दांतीं धरोनि अंगुंठे जाण । मस्तकीं धरिले दृढ चरण ।
तुझा शिष्य मी पुरातन । माझे प्राण वांचवीं ॥ २५ ॥
मायिक विद्येची व्युत्पत्ती । तुजपासून मज प्राप्ती ।
तेचि न चले श्रीरामाप्रती । कृपामूर्ति वांचवीं ॥ २६ ॥
पुढती धरिले दृढ चरण । घालोनियां लोटांगण ।
विश्वकर्मा पैं आपण । कृपेनें पूर्ण कळवळला ॥ २७ ॥

विश्वकर्मा ध्यानयोगाने काल्पनिक रामशिर त्याला देतो :

संतचरणरज वंदून । ब्राह्मणचरणतीर्थ प्राशून ।
विश्वकर्मा स्वयें आपण । श्रीरामध्यान आरंभी ॥ २८ ॥
जैं ब्राह्मणपदरज वंदिती । तैं सकळ संपत्तीची अवाप्ती ।
समस्त निर्दळती आपत्ती । श्रीराममूर्ति स्वयें भेटे ॥ २९ ॥
ब्राह्मणचरण रजोमहिमान । जे जे वांछिल अर्थ संपूर्ण ।
भुक्ति त्यांपाशीं आंदण । सुप्रसन्न श्रीराम ॥ ३० ॥
विश्वकर्म्याची ध्यानस्थिती । प्रगटली श्रीराममूर्ती ।
मायिक शिराची पैं प्राप्ती । वरदोक्ती स्वयें मागत ॥ ३१ ॥
विश्वकर्म्याची ध्यानमूर्ती । आनुवदे तयाप्रती ।
तुझी मागणी वरदोक्ती । कठिण प्राप्ती ते आइक ॥ ३२ ॥
शिर न ये करणी करितां । शिर न घडे स्वचें घडितां ।
काल्पनिक शिरःसंस्था । निजवरदार्था मी देईन ॥ ३३ ॥
आरसां बिंबे प्रतिवदन । रुपरेखा समसमान ।
तैसें कल्पित शिर संपूर्ण । समयीं जाण पावशील ॥ ३४ ॥
जेव्हा मागेल रावण । विद्युज्जिव्ह तेव्हाची जाण ।
काल्पनिक शिर संपूर्ण । स्वयें आपण पावेल ॥ ३५ ॥
आदर्शांत प्रतिमुख दिसे । परी तें तयामाजी नसे ।
मनःकल्पित शिर तैसें । अनायासें पावसी ॥ ३६ ॥
तेही शिर अचेतन । आणिक कल्पित धनुष्यबाण ।
समयीं पावेल जाण । ऐसें वरदान पावला ॥ ३७ ॥
ऐसें लाहोनि वरदान । विद्युज्जिव्ह येतांचि जाण ।
आशोकवना निघे रावण । अति संपर्णू साटोपें ॥ ३८ ॥

अशोकवनिकायां च सीतादर्शनलालसः ।
नैर्ऋतानमधिपतिः संविवेश महाबलः ॥५॥
ततो दीनामदीनां तां ददर्श धनदानुजः ।
अधोमुखीं शोकपरामुपविष्टां महीतले ॥६॥
भर्तारमनुध्यायंतीमशोकनिकां गताम् ।
उपसृत्य ततः सीतां प्रहृष्टेनांतरात्मना ॥७॥
इदं च वचनं धृष्टमुवाच जनकात्मजाम् ।
सांत्वमाना मया भद्रे यमाश्रित्य विमन्यसे ॥८॥
खरहंता स ते भर्ता राघवः समरे हतः ।
छिन्नं ते सर्वथा मूलं दर्पश्च निहतो मया ॥९॥
व्य्सनेनात्मनः सीते मम भार्या भविष्यसि ।
विसृजैतां मतिं मूढे किं मृतेन करिष्यसि॥१०॥

ते रामांचे मस्तक घेऊन रावण अशोकवनात जातोः

करीत हिरखाचा गजर । अशोकवना अति सत्वर ।
स्वयें आला दशशिर सीता सुंदर प्रलोभावया ॥ ३९ ॥
बाह्य मळीं दिग्ध दिसे दीन । अंतरीं सुखैकश्रीरामध्यान ।
सीता देखोनि दशानन । काय आपण जल्पत ॥ ४० ॥
श्रीरामबळाच्या अभिनिवेशीं । माझें वचन उपेक्षिसी ।
रामवाढीव अहर्निशीं । प्रजल्पसी सर्वदा ॥ ४१ ॥

रावण सीतेला ते शिर दाखवितो :

मारिला म्हणसी त्रिशिरा खर । ऐसा बळिया श्रीरामचंद्र ।
मारुन आला इंद्रजित कुमर । आणिलें शिर रामाचें ॥ ४२ ॥
माझा राम शूर श्रेष्ठ । माझा राम वीर सुभट ।
राम वानिसी रणश्रेष्ठ । मज फोलकट मानिसी ॥ ४३ ॥
ज्याचें धरोनियां बळ । मजसीं सदा चालविसी सळ ।
तो म्यां केलासे निर्मूळ । वरीं तत्काळ मजलागीं ॥ ४४ ॥
रणीं मारिलें रघुनाथा । आतां कोण सोडवील सीता ।
त्याची सांडोनि चिंता वार्ता । वरीं मज लंकानाथा उल्लासें ॥ ४५ ॥
गर्वे म्हणसी पातिव्रता । ते तूं आतुडसी लंकानाथा ।
तुज मी न सोडीं सर्वथा । उल्लसतां वरीं मज ॥ ४६ ॥
आता रावण न वरितां । तुज तांव गति नाहीं अन्यथा ।
सांडोनियां अति मूखर्ता । होय तूं कांता लंकेशा ॥ ४७ ॥
रणीं मारिले रामलक्ष्मण । निर्दळिले वानरगण ।
आतां तुझा आग्रह कोण । करीं रावण प्रियभर्ता ॥ ४८ ॥
श्रीराम पडलिया रणीं । सौ‍मित्रेंसहित वानरश्रेणी ।
भेरी त्राहाटिल्या निशाणीं । रावण राणी सती सीता ॥ ४९ ॥

रावणाची सीतेजवळ प्रौढी :

ऐकोनि श्रीराममरण । सीते न करिसी रुदन ।
मिथ्या म्हणसी माझें वचन । रणकंदन तें ऐकें ॥ ५० ॥
ऐसे रावण जल्पतां । कांही न बोले सती ।
समूळ जाणे मिथ्या वार्ता । श्रीरघुनाथाचेनि धर्में ॥ ५१ ॥
घाला घालोनि इंद्रजित । रणीं मारिला रघुनाथ ।
सत्य न मानिसी माझी मात । रणवृत्तांत तो ऐक ॥ ५२ ॥

श्रुणु भर्तृवधं सीता घोरं वृत्रवधं यथा ।
बलेन महता रामो व्रजस्तस्तं दिवाकरे ॥११॥
सन्निविष्टः समुद्रस्य तीरमासाद्य चोत्तरम् ।
अथाध्वनि परिश्रांतमर्धरात्रे स्थितं बलम् ॥१२॥
सुखसुप्तं तमासाद्य चरितं प्रथमं चरैः ।
तत्प्रहस्तप्रणीतेन बलेन महता मम ॥१३॥
बलमस्य हतं रात्रौ यत्र रामःसलक्ष्मणः ।
पट्टिशान्परिघांश्चक्राण्यृष्टीर्दंडान्महायुधान् ॥१४॥
उद्यम्योद्यम्य रक्षोमिर्वानरेषु निपातिताः ।
अथ सुप्तस्य रामस्य प्रहस्तेन प्रमाथिना ॥१५॥
असक्तं कृतहस्तेन शिरश्छिन्नं महासिना ॥१६॥

जेंवी इंद्र वधी वृत्रासुरासी । तेंवी राक्षसीं वधिलें श्रीरामासी ।
भ्रतार वधिला कोणे प्रदेशीं । तेंहि तुजपासीं सांगेन ॥ ५३ ॥
सेतु बांधोनि सागरीं । वानरभार निजगजरीं ।
ऐसा राम समुद्राच्या पारीं दक्षिणतीरीं राहिला ॥ ५४ ॥
जंव जाला अस्तमान । मार्गी भागिले वानरागण ।
अवघीं केलें सुखें शयन । रामलक्ष्मणसमवेत ॥ ५५ ॥
बिभीषणाचें भय दारुण । तोही जाला निद्रापन्न ।
ऐसी पाळती आणोन पूर्ण । निघे प्रधान प्रहस्त ॥ ५६ ॥
ससैन्य इंद्रजित प्रहस्त । घाला घातला रातोरात ।
निद्रिस्थ मारिला रघुनाथ । समवेत सौ‍मित्र ॥ ५७ ॥
सुग्रीवादि वानरसैन्य । मध्यरात्रीं निद्रापन्न ।
प्रहस्तें घाला घालोन । रणकंदन तें केलें ॥ ५८ ॥
फरश पट्टिश तोमर । गदा मुद्‌गल बाण चक्र।
पाचारोनिंया वानर । रणीं समग्र मारिले ॥ ५९ ॥
निष्ठुर ग्रहस्ताचे कर । छेदोनि श्रीरामाचें शिर ।
येथें आणिलें वो साचार । तुझा भ्रतार मारुनी ॥ ६० ॥
श्रीरामाचें धनुष्यबाण । राम मारोनि आणिलें जाण ।
ऐसें सांगतां दशानन । सीता रुदन करीना ॥ ६१ ॥
रणीं मारिला श्रीरामचंद्र । सत्य न मानी सीता सुंदर ।
तेणें क्षोभोनि दशशिर । वीरमहामार सांगत ॥ ६२ ॥
राम लक्ष्मण निद्रितां घात । सुग्रीवाचा ग्रीवापात ।
आघातें मरे हनुमंत । जांबवंत कटिभंगे ॥ ६३ ॥
करोनियां जानुविहीनु । रणीं पाडिला इंद्रजानु ।
शळें विदारिला सुषेणु । गंधामादनु पट्टिशें ॥ ६४ ॥
वर्षोनियां बाणजाळ । रणीं पाडिले नळ नीळ ।
मैंद द्विविद प्रबळ । छेदिलें कपाळ असिधारा ॥ ६५ ॥
तार तरळ गवय गवाक्ष । कुमुद महावीर देख ।
पांचही मारिले निःशेख । शस्त्रें अनेक वर्षोनी ॥ ६६ ॥
पिकोनियां फणस झडे । तेवी पनसाचें शिर पडे ।
वानर वीर अति गाढे । रणीं रोकडे वारिले ॥ ६७ ॥
हरिमुख दधिमुख । सुमुख आणि दुर्मुख ।
रणीं वानरांचें कटक । एक एक मारिलें ॥ ६८ ॥
बाहु भेदोनि सहस्कंद । रणीं पाडिला अंगद ।
रात्रीं निशाचर प्रबुद्ध । रणविमर्द वानरां ॥ ६९ ॥
अश्व रगडिले एक एक । गज मर्दिले अनेक ।
एवं वानरांचें कटक । रणीं निःशेख मारिलें ॥ ७० ॥
दिवसा सबळ वानर । रात्रीं दुर्धर निशाचर ।
तिहीं करोनि रात्रीं मार । नर वानर रणीं मारिले ॥ ७१ ॥

एवं ते निहतो भार्ता ससैन्यो मम सेनया ।
क्षतजार्द्ररजोध्वस्तमिदं तस्याहतं शिरः॥१७॥
विद्युज्जिहृस्तदा गृह्य शिरस्तस्याग्रतःस्थितः ।
तमब्रवीत्ततो राजा रावणो राक्षसं स्थितम् ॥१८॥
विद्युज्जिव्हं महाज्जिव्हं समीपपरिवर्तिनम् ।
अग्रतः कुरु सीतायाःशीघ्रं दाशरथेःशिरः॥१९॥
एवमुक्तं तु तद्रक्षस्तच्छिरः प्रियदर्शनम् ।
पुरो निक्षिप्य सीतायाः क्षिप्रमंतरधीयत॥२०॥
रावणश्चापि चिक्षेप भासुरं कार्मुकं तदा ।
त्रिपु लोकेषु विख्यातं रामस्य तदिति ब्रवन्॥२१॥

माझें सैन्य सेनानी निशाचर । जावोनि रातोरातीं सत्वर ।
निजल्या जागीं मारोनि रगुवीर । त्याचें शिर आणिलें ॥ ७२ ॥
माझ्या वचनाची वचनोक्ती । सत्य न वाटे सीतेप्रती ।
हें घे शिर देतों हातीं । भेट निजपतीसीं स्वानंदें ॥ ७३ ॥
ऐकोनि रावणाची गोष्टी । सिता सज्ञान पैं मोठी ।
पालवीं बांधिली शकुनगांठी । अचुक भेटी श्रीरामीं ॥ ७४ ॥
शत्रुमुखींचें वचन । वदविता राम चिद्धन ।
तुज भेटवितों रघुनंदन । राम परिपूर्ण भेटेल ॥ ७५ ॥
रावण बोले उपहासता । शीघ्र भेटवीन रघुनाथा ।
तोही शकुन मानी सीता । छळणार्थता शिर दावी ॥ ७६ ॥
गर्जोनि बोले दशशिर । विद्युज्जिव्ह येईं शीघ्र ।
श्रीरामाचें शिर सुंदर । देई सत्वर सीतेसी ॥ ७७ ॥

त्याचा सीतेवर झालेला अनुकूल परिणाम :

मायिक शिर सीतेसीं देतां । विद्युज्जिव्हा चळीं कंपता ।
रावण दंडील न देतां । अति भीतता देतसे ॥ ७८ ॥
मिथ्या शिर सीतेसी देतां । क्षोभें शापील पतिव्रता ।
विद्युज्जिव्हा भयभीतता । अदृश्यता पळाला ॥ ७९ ॥
मिथ्या जाणोनि श्रीरामशिर । तेथेंही सीता भजनतत्पर ।
स्वयें देखता दाशशिर । करी नमस्कार साष्टांग ॥ ८० ॥
श्रीरामाचें धनुष्यबाण । देखोनियां सीता आपण ।
अनन्य घाली लोटांगण । स्वयें रावण देखतां ॥ ८१ ॥
श्रीरामशिर देखोनि छिन्न । सीता मिथ्या करी रुदन ।
रुदनामाजी महिमान । ऐके रावण तैसें गाय ॥ ८२ ॥
जन्ममरणापरता । नित्यवस्ति श्रीरघुनाथा ।
त्यासीं राक्षसीं केल्या घाता । केंवी सत्यतां घडे रामा ॥ ८३ ॥
निजबळें स्वयें खद्योत । सूर्याचा करी घात ।
तरी राक्षसीं रघुनाथ । रणाआंत न मारवे ॥ ८४ ॥
श्रीराम नित्य सावधान । जागृतिस्वप्न-सुषुप्तिविहीन ।
त्यासी निद्रिता राक्षसीं हनन । केलें हें वचन केंवी घडे ॥ ८५ ॥
धूमें धुरकटेना आकाशशशी । तेंवी निद्रा न लागे श्रीरामासी ।
सूखावस्था वधिलें त्यासी । निश्चयेसीं केवीं मानू ॥ ८६ ॥
उदकीं असोनियां गगन । अंगी न लागे ओलेपण ।
तेंवी श्रीराम द्वंद्वविहीन । त्यासी मरण केंवी मानूं ॥ ८७ ॥
पर्जन्यधारा समुद्रासीं । कदा न रुपती ज्याच्या त्यासी ।
तेंवी शस्त्रें श्रीरामासी । निजांगासीं न लागती ॥ ८८ ॥
उंदीर कराडूं शके चांदु । तरी श्रीरामा शिरच्छेदु ।
करुं न शके राक्षस मंदु । अबद्ध बोधु केंवी मानूं ॥ ८९ ॥

हाही कपटी प्रयत्‍न व्यर्थ गेला म्हणून रावणाचा जळफळाट :

ऐसें श्रीरामपवाडे पढत । सीता उकसाबुकसीं स्फुंदत ।
तंव रावण चरफडत । सीता छळणार्था मानीना ॥ ९० ॥
स्वयंवरीं वाहतां त्र्यंबक । केलें रावणाचें काळें मुख ।
त्या रामाचें प्रचंड धनुष्य । कोण मशक आणूं शके ॥ ९१ ॥
श्रीरामाचा निजबाण । रणीं करुनि रिपुमर्दन ।
स्वयें भातां रिघे परतोन । वेगळा कोण करुं शके ॥ ९२ ॥
ऐकतां सीतेचे रुदन । ललाट पिटी दशानन ।
सर्वथा सीतेसीं न चले छळण । तळमळी पूर्ण अभिलाषें ॥ ९३ ॥
तळमळितां दशानन । तंव झालें आनेआन ।
श्रीरामशिराचें परिज्ञान । पाहे सुचिन्ह जानकी ॥ ९४ ॥

सासीता तच्छिरो दृष्ट्वा तच्च कार्मुकमुत्तमम् ।
नयने मुखवर्णं च भर्तुस्तत्सदृशं भवेत् ॥२२॥
अंतर्धानं च तच्छीर्ष तच्च कार्मुकमुत्तमम् ।
जगाम रावणस्यैव निर्याणसमनंतरम् ॥२३॥

सादरें पाहे सीता सुंद्र । श्रीरामासारिखें शिर ।
परी रामाचें नव्हे साचार । वदे गंभीर श्लोकपद ॥ ९५ ॥
श्लोकपद अति सुरस । श्रीरामशिरेसीं सादृश्य ।
हाचि पदगर्भविलास । जाणें अनायासें जानकी ॥ ९६ ॥
श्लोकपदगर्भ गंभीर । श्रीरामशिरासारिखें शिर ।
रघुनाथाचें नव्हे साचार । सीता सुंद्र स्वयें जाणे ॥ ९७ ॥
नेत्र वक्त्र श्रवण घ्राण । ओष्ठ वदन भंवया दर्शन ।
श्रीराममुखासीं समान । केलें आनेआन कृत्रिम ॥ ९८ ॥

सीता घाबरली नाहीः

मिथ्या देखोनि श्रीरामघाता । गजबजिली नाहीं सती सीता ।
राक्षसां न मारवे रघुनाथा । समूळ कथा अवधारा ॥ ९९ ॥
शस्त्रें सतेज सज्जून । सर्वथा न छेदवे गगन ।
तेंवी श्रीरामशिरच्छेदन । राक्षसां जाण न करवे ॥ १०० ॥
शस्त्र करांडितां दुधार । मुखच्छेदें मरे उंदीर ।
राक्षसां न छेदवे श्रीरामशिर । रामें निशाचर मरतील ॥ १ ॥
सर्वही रस चाखे माशी । दीप चाखितां पोळे मुखासीं ।
राम न मारवे राक्षसांसी । श्रीराम त्यांसी प्राणांत ॥ २ ॥

सीतेच्या नजरेपुढून ते शिर अदृश्य झालेः

कृत्रिमशिर रघुनाथा । घडितां न घडवे सर्वथा ।
सादर पाहूं जातां सीता । अदृश्यता उडालें ॥ ३ ॥
शिर देवोनियां सीतेच्या करीं विद्युज्जिव्ह पळे बाहेरी ।
सीता पाहतां शिर निर्धारीं । क्षणामाझारीं अदृश्य ॥ ४ ॥
थिल्लरीं सूर्य बिंबला पाहीं । काढूं जातां तो तेथें नाहीं ।
कल्पित शिराची नवायी । ठायींच्या ठायीं अदृश्य ॥ ५ ॥
कल्पित शिरेसीं धनुष्यबान । सीतेनें पाहतां निर्धारुन ।
अदृश्यगती गेलें उडोन । सत्य संपूर्ण तें नव्हे ॥ ६ ॥
सीतेचिये दृष्टीपुढें । सर्वथा राहों न शके कुडें ।
मिथ्यात्वें तें समूळ उडें । मागें पुढें श्रीराम ॥ ७ ॥
सीतासतीचा भजनानुक्रम । नयनीं राम वदनीं राम ।
शयनीं राम जीवनीं राम । तीपुढें भ्रम केंवी राहे ॥ ८ ॥
स्मरणीं राम करणीं राम । पंचभूतेंसीं धरीणीं राम ।
क्षराक्षरेंसीं वाणीं राम । तीपुढें भ्रम केंवी राहे ॥ ९ ॥
कर्मी राम धर्मी राम । आश्रम विश्राम स्वयें राम ।
सदा स्वधर्मी श्रीराम । तीपुढें भ्रम केंवी राहें ॥ ११० ॥
गति श्रीराम स्थिति श्रीराम । वृत्ति श्रीराम धृति श्रीराम ।
सर्वा भूतीं सदा श्रीराम । तीपुढें भ्रम केंवी राहे ॥ ११ ॥
ऐसियापरी सीता सती । विनटली श्रीरामभक्ती ।
तिसीं न चले छळणोक्ती । लंकापति अति मुर्ख ॥ १२ ॥

एतस्मिन्नतरे द्वाःस्थो रावणाय न्यवेदयत् ।
कार्यमात्यंतिकं घोरं सज्ञया भ्रांतलोचनः॥२४॥

त्याच वेळी द्वारपाळ श्रीरामांच्या आक्रमणाची वार्ता आणतो :

तेचि समयीं अति विव्हळ । उत्तरद्वारीचा द्वारपळ ।
रावणेंसीं बोले बरळ । नेत्रीं विव्हळ भयभीत ॥ १३ ॥
सपरिवार वानरगण । लावोनियां भेरी निशाण ।
लंके आलें रामलक्ष्मण । दुर्धर बाण सज्जूनी ॥ १४ ॥
विध्वंसूनि लंकाभुवन । राक्षसांसी करुनि कंदन ।
वधावया दशानन। दोघे जण स्वयें आले ॥ १५ ॥
अजूनि काय सीतेंसी छळ । संग्रामासीं नीघ तत्काळ ।
नातरी देवोनि जनक्बाळ । शरण केवळ रिघे रामा ॥ १६ ॥
द्वारपाळें रावणापासीं । गोष्टी सांगतांचि ऐसी ।
छळण सांडोनि सीतेसीं । निजसभेसीं स्वयें आला ॥ १७ ॥

सीतां तु मोहितां ज्ञात्वा सरमा नाम राक्षसी ।
तांसमाश्वासयामास सखीस्नेहेन सुव्रताम्॥२५॥
न हतो राघवः सीते श्रीरान शत्रुनिबर्हणः ।
रावणेन नृशंसेन माया मायाविना कृता॥२६॥

सरमा सीतेला धीर व आश्वासन देतेः

रावणें ठेविली राखण । सरमा नामें राक्षसी जाण ।
तिसीं सीतेसीं आप्तपण । मैत्री पूर्ण सदाकाळी ॥ १८ ॥
रावणें सीतेसी केलें छळण । ऐसें जाणोनि संपूर्ण ।
सरमा तिसी आपण । आश्वासून अनुवादे ॥ १९ ॥
तुज छळावया येथ । मिथ्यावादी लंकानाथ ।
नाहीं वधिला रघुनाथ । होईं तू स्वस्थ जानकिये ॥ १२० ॥
सरमा वदे जाणोनि पूर्ण । स्वस्थ श्रीराम लक्ष्मण ।
स्वस्थ लाडका हनुमान । वानरगण स्वस्थ सुखी ॥ २१ ॥
तुझे करावया छळण । मायिक शिर धनुष्यबाण ।
रावणें दाखविलें जाण । कपटी पूर्ण महापापी ॥ २२ ॥
श्रीरामेंसहित कपिकटक । अंगद सुग्रीवादि देख ।
वधावया दशमुख । लंकेसंमुख स्वयें आले ॥ २३ ॥
पैल पाहें वानरभार । करील आले गडगजर ।
ऐकोनि सरमेचें उत्तर । सुखनिर्भर जानकी ॥ २४ ॥
सीतेनें देवोनि अलिंगन । हर्षे दिधलें करकंकण ।
एका जनार्दना शरण । समाधान श्रीरामें ॥ २५ ॥
श्रीरामें सुखसंपत्ती । श्रीरामें सुखैकप्राप्ती ।
श्रीरामें सीता सती । छळणार्थी छळेना ॥ १२६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
जानकीच्छलनं कपटशिरोदर्शनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
ओंव्या ॥ १२६ ॥ श्लोक ॥ २६ ॥ एवं ॥ १५२ ॥