Ramayan - Chapter 5 - Part 41 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 41

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 41

अध्याय 41

रामसैन्याचे समुद्रोल्लंघन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सेतू बांधून पूर्ण झाल्यावर श्रीराम लक्ष्मणाला घेऊन लंकेच्या वाटेला लागतात :

नळें बांधिला सेतु समाप्त । यालागीं म्हणती नळसेत ।
परी तो श्रीरामपुरूषार्थ । जाला विख्यात तिहीं लोकीं ॥ १ ॥
सेतु जालिया समाप्त । सुग्रीव संतोषें डुल्लत ।
वंदोनियां श्रीरघुनाथ । स्वयें बोलत स्वानंदें ॥ २ ॥
समुद्रीं लाभली पायवाट । आमचे चुकले परम कष्ट ।
आता लंका करीन सपाट । दशकंठ वधोनि ॥ ३ ॥
प्रधान सेनानी सपरिवार । राक्षसांचे भार संभार ।
रणीं मारीन दुर्धर वीर । तरी किंकर मी तुझा ॥ ४ ॥
सेतु होतांचि समाप्त । लंका जाली हताहत ।
रणीं निमेल लंकानाथ । संदेह येथ असेना ॥ ५ ॥
एकोनि सुग्रींवाचे वचन । सेतु देखोनि संपूर्ण ।
उल्लासला श्रीरघुनंदन । शीघ्र गमन करावया ॥ ६ ॥
सोडवावया सीता सती । सवेग जावें लंकेप्रतीं ।
लक्ष्मणा धरोनि हातीं । शीघ्रगतीं निघे राम ॥ ७ ॥

जांबुवंताची भीती व रामास विनंती :

ते काळी जांबवंत गर्जोन । हाक देवोन बोले वचन ।
पायीं चालतां श्रीरघुनंदन । आनेंआन हों पाहे ॥ ८ ॥
श्रीराम चरणीं शिळातारीं । दोघे जातां सेतु उद्धरीं ।
आम्ही राहोनि ऐलतीरीं । किलकिल करीतचि पैं ॥ ९ ॥
लागतां श्रीरामाचे चरण । सेतु पावेल उद्धरण ।
दोघे जातील निघोन । आम्ही राहों ऐलीकडे ॥ १० ॥
एकला जावोनि रघुनाथ । सकळ साधील कार्यार्थ ।
आमचा नव्हे रणसाह्यार्थ । ऐसा अनर्थ होऊं पाहे ॥ ११ ॥
ऐकोनि जांबवंताची मात । सकळां मानला सत्यार्थ ।
सुग्रीव निघाला धांवत । श्रीरघुनाथ थांबवावया ॥ १२ ॥
सुग्रीवें घालोनि लोटांगण । दृढ धरिले श्रीरामचरण ।
स्वयें बोलिला युक्तवचन । सावधान अवधारा ॥ १३ ॥
वानर समस्त शरणागत । आम्हांसी सांडोनियां येथ ।
एकलें जाणें लंकेआंत । नव्हे उचित श्रीरामा ॥ १४ ॥
लागतां तुझें श्रीचरण । सेतु पावेल उद्धरण ।
आम्ही वानरें अडकोन । सर्वथा गमन न करवे ॥ १५ ॥
कष्टलों आणोनि पर्वत । हर्षे सेतु केला समाप्त ।
एकला जासीं तूं रघुनाथ । धिक्‌ जीवित्व पैं आम्हां ॥ १६ ॥
एकला साधिसी कार्यार्थ । आम्हांसी मानलें निश्चित ।
तेव्हां आमचें व्यर्थ जीवित । धिक्‌ पुरूषार्थ वाटिवा ॥ १७ ॥
रावण मारोनि सगण । सीता सोडवील रघुनंदन ।
तेव्हां आमुचें काळें वदन । धिक्करण कपिकुळा ॥ १८ ॥
सवें घेवोनि कपी समस्तां । लंकेसी जावें श्रीरघुनाथा ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । सप्रेमता सुग्रीवें ॥ १९ ॥
ऐकोनि सुग्रीवाचे वचन । श्रीराम जाला सुखसंपन्न ।
हनुमान येवोनि आपण । जाहला वहन श्रीरामा ॥ २० ॥
जेंवी अपत्याचें बाळभाषण । पिता न करी उपेक्षण ।
तेवी सुग्रीवाचें वचन । श्रीरघुनंदन स्वयें मानी ॥ २१ ॥

ती विनंती मान्य करून मारूतीच्या पाठीवर श्रीराम व
नीळाच्या पाठीवर लक्ष्मण बसून सर्व सैन्य निघाले :

ऐकोनि सुग्रीवाच्या वचनार्था । श्रीराम चढला स्कंधी हनुमंता ।
सौमित्रासीं उल्लासता । पृष्ठीं बैसविता नीळ जाला ॥ २२ ॥
सज्जन चढती गुणातींतीं । तैसा श्रीराम हनुमंतीं ।
अवघे जयजयकार करिती । सुरवर वर्षती सुमनातें ॥ २३ ॥
जेवी निजबोधाचें माथां । साधु चढें निरपेक्षता ।
तेंवी नीळपृष्ठीं तत्वता । होय बैसता सौमित्र ॥ २४ ॥
श्रीरामनामाचा गजर । हर्षे करिती वानरवीर ।
आनंदें नाचती थोर थोर । देती भुभुःकार हरिनामें ॥ २५ ॥
एक गर्जती नर्दत । एक आल्हादे नाचत ।
लंकेसीं निघाला श्रीरघुनाथ । उल्लासती वानर ॥ २६ ॥
कोट्यनुकोटी पैं वानर । अर्बुदें निर्बुदेंहूनि अपार ।
सेतूसीं दाटला वानरभार । करिती गजर श्रीरामनामें ॥ २७ ॥
एक श्रीरामनामें नर्तती । एक श्रीरामनामें गर्जतीं ।
एक श्रीरामनामामृतें डुल्लती । हाका देती श्रीरामनामें ॥ २८ ॥
सुग्रीव बिभीषण दोहींकडे । श्रीरामापासीं निजनिवाडें ।
नळ नीळ अंगद अवघ्यांपुढे । पाठीसी गाढे तरस तरळ ॥ २९ ॥
श्रीरामापासीं जांबवंत । निकटवर्ती बुद्धिवंत ।
सुषेण वैद्द्यराज समर्थ । तो अति आप्त सुग्रीवा ॥ ३० ॥

वानरांचा उत्साह व लीला :

श्वेत पीत रक्तपुष्पित । वृक्ष उभविले सैन्याआंत ।
कर्दळीपत्रें टके डोलत । तेणें सैन्य शोभत अति शोभा ॥ ३१ ॥
माड ताल झेलिती गंभीर । तेचि महाकेतु दुर्धर ।
नामें गर्जती वानर । गतिप्रकार तो ऐका ॥ ३२ ॥
एक समुद्री घाळिती उडिया । एक आल्हादें देती बुडिया ।
एक धांवती थडोथडिया । उभवोनि गुढिया पुच्छांच्या ॥ ३३ ॥
एक ते श्रीरामा सांगती । जलतरणे दाविती गती ।
एक ते सेतुधारा चालती । एक नाचती जळस्थळीं ॥ ३४ ॥
नातळोनियां सेतूसीं । एकांची गती आकाशीं ।
एक सव्यें श्रीरामापासीं । येणें प्रकारेंसीं चालती ॥ ३५ ॥
सेतूसीं दाटले जुत्पती । एकां न लभे मार्गप्राप्ती ।
एक खचोनि समुद्रीं पडती । सवेंचि घेती उड्डाण ॥ ३६ ॥
सेतूचिया कांठावरी । चालती वानरांच्या हारी ।
एक ते उडोनि अंबरीं । लंकापरपारीं पावलें ॥ ३७ ॥
वानरवीर प्रतापवंत । कोट्यनुकोटी अर्बुदांत ।
समुद्र उतरले समस्त । श्रीरघुनाथ अनुलक्षी ॥ ३८ ॥
शतयोजन सेतूप्रती । मध्यें न करितांचि वस्ती ।
मुहूर्तें आले लंकेप्रती । शीघ्रगती हनुमंतें ॥ ३९ ॥
पृष्ठीं वाहोनि रघुनंदन । हनुमंताचे शीघ्र गमन ।
तयांसवे वानरगण । चालतेपण विसरले ॥ ४० ॥
श्रीराम लक्षोनियां दृष्टीं । चालतां वानरांच्या कोटी ।
श्रम पळाला उठाउठीं । आले परतटीं स्वानंदें ॥ ४१ ॥
श्रीरामसवें करितां गमन । श्रम निवाल संपूर्ण ।
विरोनि गेलें भागलेपण । आले कपिगण स्वानंदें ॥ ४२ ॥
श्रीरामासवें श्रमनिवृत्तीं । श्रीरामासवें सुगम गती ।
श्रीरामासवें परम पदप्राप्ती । आले जुत्पती स्वानंदे ॥ ४३ ॥
परतटा येतां वानरगण । पुढें देखिलें लंकाभुवन ।
रत्नकलशीं विराजमान । तेजें परिपूर्ण तेजस्वी ॥ ४४ ॥
अलकावती भोगावती । कायसी बापुडी अमरावती ।
कैलासासम दिसे दीप्ती । तेजें उघडती दशदिशा ॥ ४५ ॥
ऐसी लंका देखोनि दृष्टीं । वानरवीर जगजेठी ।
उडोनि रिघावया त्रिकूटीं । कोट्यनुकोटी खवळले ॥ ४६ ॥

बिभीषण आपल्या अनुयायांसह पुढे निघतो :

तें देखोनि बिभीषण । निवारोनि वानरगण ।
अवघ्यांपुढें आपण । गदा घेवोनि चालिला ॥ ४७ ॥
राक्षस कपटी गुप्तघाती । छळोनि वानरांतें मारिती ।
त्यांसी निर्दाळावया प्रयुक्ती । जाणे युक्ती बिभीषण ॥ ४८ ॥
राक्षसगती निर्बंधन । करूं जाणती चवघे प्रधान ।
सवें घेवोनि वानरगण । पुढें बिभीषण निघाला ॥ ४९ ॥
गदापाणि बिभीषण । त्यापुढें राक्षस तंव तृण ।
संमुख येवों शके कोण । धाकेंच प्राण सांडिती ॥ ५० ॥

त्याच्या जीवाला धोका पोचू नये म्हणून श्रीराम त्याला आपल्याजवळ ठेवतात :

बिभीषणा पुढें जातां । श्रीराम सांगें हनुमंता ।
त्यासी जावों नेदीं सर्वथा । ऐक तत्वतां विचार ॥ ५१ ॥
बिभीषण पुढें जात । छळोनि राक्षसां केलिया घात ।
व्यर्थ जीवित्व पुरूषार्थ । याहूनि अनर्थ तूं ऐकें ॥ ५२ ॥
शरणागत मारिल्या जाण । आम्हींच स्वयें सोडूं प्राण ।
कोण करील सीतासोडवण । अति दारूण अनर्थ ॥ ५३ ॥
यालागीं सांक्षेपेंसी रघुपतीं । बिभीषणा धरोनि हातीं ।
बैसविला आपणाप्रतीं । कृपामूर्ति कृपाळुवें ॥ ५४ ॥

श्रीराम ससैन्य लंकाव्दारी येताच आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी :

राक्षसगतिनिर्बंधन । करूं धाडिले चवघे प्रधान ।
तेही अतिशयें सावधान । विचक्षण रणयोद्धें ॥ ५५ ॥
समुद्राचे परतीरीं । फळमूळजळसंभारीं ।
बैसल्या वानरांच्या हारी । स्वानंदेकरीं डुल्लती ॥ ५६ ॥
श्रीराम समुद्रपथतटीं । सुग्रीवसैन्य वानरकोटी ।
बैसला देखोनि जगजेठी । केली पुष्पवृष्टी सुरसिद्धीं ॥ ५७ ॥
शत्रु जाणोनि समर्थ । पृथ्वी समुद्रमेखलान्वित ।
प्रतिपाळावया तूं समर्थ । सुर गर्जत स्वानंदें ॥ ५८ ॥
दश सहस्त्र वर्षांआंत । निष्कंटक राज्य प्राप्त ।
देव करावया बंदिमुक्त । तुझा पुरूषार्थ श्रीरामा ॥ ५९ ॥
बंधमुक्तता सुरवरीं । आम्ही तुझे कृतोपकारी ।
स्मरोनि जन्मजन्मांतरीं । जयजयकारीं गर्जतीं ॥ ६० ॥

समुद्राचे सहकुटुंब आगमन :

बांधिला देखोनि सेतुबंधु । ससैन्येंसी राम उतरला सिंधु ।
उतरला वानरांचा वृंदु । ऐकोनि सिंधु अनुतापी ॥ ६१ ॥
पूर्वीं भेटलों श्रीरघुवीरासी । युक्ती सांगितली सेतुबंधासी ।
नाहीं पूजिलें श्रीरामासीं । मूढता ऐसी पैं माझी ॥ ६२ ॥
मी ज्येष्ठ श्रीराम कनिष्ठ । ऐसें मानितों पापिष्ठ ।
तेणें अभिमानें मी दुष्ट । श्रीराम वरिष्ठ न पूजीं ॥ ६३ ॥
कनिष्ठ मानितां श्रीराममूर्तीं । महापापी मी त्रिजगती ।
त्या मज पापियाचीं पापयुक्तीं । सेतुसमाप्त नव्हेचि ॥ ६४ ॥
सेतु नव्हे माझे पापोक्ती । वृथा गेली नळवरदोक्ती ।
श्रीरामपायी पर्वत तरती । सेतुसामग्री श्रीरामें ॥ ६५ ॥
समुद्रीं पर्वत तरती स्पष्ट । तो श्रीराम मी मानीं कनिष्ठ ।
मजही परता पापिष्ठ । अतिदुष्ट आन नाहीं ॥ ६६ ॥
ऐशिया अनुतापवृत्तीं । पूजावया श्रीराममूर्तीं ।
घेवोनियां अलंकारसंपत्ती । श्रद्धान्वित सिंधु आला ॥ ६७ ॥
विजयलाभाच्या अनुवृत्तीं । सेतु पावला समाप्ती ।
परतीरीं देखिला श्रीरघुपती । सुग्रीव कपिपतीसमवेत ॥ ६८ ॥
संमुख लंका देखोनि दृष्टीं । बैसल्या वानरांच्या कोटी ।
रावण मारावया उठाउठीं । उल्लास पोटीं वानरां ॥ ६९ ॥
ऐसा देखोनि रघुनंदन । समुद्र घाली लोटांगण ।
श्रीराम वंदी सिंधुचरण । ज्येष्ठ संपूर्ण तूं आम्हां ॥ ७० ॥
ज्येष्ठ कनिष्ठ हा अभिमान । तेणें मजमाजी पाडलें ठान ।
श्रीरामाचें महिमान । ज्येष्ठाभिमान कळों नेदी ॥ ७१ ॥
खांबी उपजला सिंहवदन । तो काय धाकटा प्रल्हादाहून ।
तेंवी ज्येष्ठ तूं रघुनंदन । धाकटेपण तुज नाहीं ॥ ७२ ॥
पायें तारिसी पाषाण । तो तरूं परमात्मा परिपूर्ण ।
तुज कैंचें धाकुटेपण । ज्येष्ठ ज्येष्ठपण श्रीरामीं ॥ ७३ ॥
तूं परब्रह्म ब्रह्मस्थिती । तूं परमात्मा परंज्योती ।
तूं चिदात्मा चिन्मूर्ती । सगुणानुवर्ती निर्गुणत्वें ॥ ७४ ॥
तुजदेखतांहि सगुण । परी सर्वांगें निर्गुण ।
हेही जाण उणी खूण । श्रीराम पूर्ण परब्रह्म ॥ ७५ ॥

युद्धासाठी मुनिवेषात जाण्यापेक्षा क्षत्रियाप्रमाणे जाणे उत्तम :

सिंधु उतरला श्रीरघुनाथ । समुद्र सव्यें आला तेथ ।
त्या दोघांसी समस्त । स्वयें वंदित तें ऐका ॥ ७६ ॥
लक्ष्मण सुग्रीव जांबवंत । बिभीषणादि वानर समस्त ।
श्रीरामा आणि सिंधूसी वंदित । दोघे समर्थ अति श्रेष्ठ ॥ ७७ ॥
समुद्रें करोनि स्तवन । स्वयें घालोनि लोटांगण ।
श्रीराम वंदी सिंधुचरण । ज्येष्ठ संपूर्ण तूं आम्हां ॥ ७८ ॥
ज्येष्ठ कनिष्ठपणाची कथा । मागें वदलों मी यथार्थता ।
कांहीं एक विनवितों श्रीरघुनाथा । कृपावंता अवधारीं ॥ ७९ ॥
मुनिवेषे श्रीरघुनाथा । युद्ध नये गा रणीं करितां ।
ऐक मुनिवेषाची कथा । तुज तत्वतां सांगेन ॥ ८० ॥

मुनिवेष केव्हा योग्य :

मुनिवेष पाहिजे निवृत्तीं । मुनिवेष पाहिजे शांती ।
मुनिवेष पाहिजे परमार्थी । युद्धकंदनार्थीं नये कामा ॥ ८१ ॥
मागील राजे नरवीर । युद्धार्थ करिती वीरशृगांर ।
युद्धीं आलिया मुनिवेषधर । वीर जुंझार न मानिती ॥ ८२ ॥
मुनिवेषाचें लक्षण । स्वभावें केलें निरूपण ।
मारिले त्रिशिरा खर दूषण । मुनिवेषपण असतांचि ॥ ८३ ॥
संन्यासी आणि झेंपदें राऊत । हा आहणां होईल प्राप्त ।
मुनिवेषें युद्धकंदनार्थ । नव्हे शास्त्रार्थ श्रुतिमूळ ॥ ८४ ॥
निधडा वीर तूं समर्थ । कांहीं एक माझें मनोगत ।
श्रद्धें पूजावा श्रीरघुनाथ । अलंकारयुक्त उल्लासें ॥ ८५ ॥
सर्वालंकारभरणीं । उभा ठाकलिया रणांगणीं ।
आमच्या डोळ्यांची पुरेल धणी । म्हणोनि चरणीं लागला ॥ ८६ ॥
पुढती अलंकारयुक्त । कैं मी देखेन श्रीरघुनाथ ।
माझे पुरवावे मनोरथ । सिंधु विनवीत अति श्रद्धें ॥ ८७ ॥
सुग्रीवअंगदादि जुत्पती । सालंकृत श्रीरघुपती ।
पहावया उल्लास चित्तीं । आल्हादतीं स्वानंदें ॥ ८८ ॥
श्रीराम बाणल्या रत्नाभरणें । फिटेल डोळ्यांचे पारणें ।
उठे वल्कलाचें धरणें । बोळवणें मुनिवेषा ॥ ८९ ॥
लेइल्या अलंकार विचित्र । सुखी होतील आमचे नेत्र ।
तुझें देखतांचि वक्त्र । सुख चिन्मात्रा कोंदाटे ॥ ९० ॥
श्रीराम देखिल्या कृपानिधी । मनाच्या सकळ आधिव्याधी ।
अहंकोहंसोहंसिद्धीं । याही उपाधी हरपती ॥ ९१ ॥
चित्त होय चैतन्य । बुद्धि होय समाधान ।
प्रपंच होय ब्रह्मार्पण । श्रीरामदर्शनें अति श्रेष्ठ ॥ ९२ ॥

ते पाहून समुद्राला आनंद :

सिंधु सुग्रीव आणि वानर । अवघें करोनि जयजयकार ।
भावें प्रार्थितां रामचंद्र । कृपें रघुवीर तुष्टला ॥ ९३ ॥
सिंधुसुग्रीवप्रार्थन । ऐकोनियां रघुनंदन ।
स्वयें जाला सुप्रसन्न । मुनिवेषपणत्यागार्थ ॥ ९४ ॥
फेडोनियां वल्कलांबर । श्रीराम वेष्टी पीतांबर ।
जो कां अत्यंत मनोहर । स्वयें समुद्रें आणिला ॥ ९५ ॥
श्रीरामकासेसीं लागोन । वीज विसरली अस्तमान ।
तैसा पीतांबर जाण । दैदीप्यमान तेजस्वी ॥ ९६ ॥
स्वयें श्रीराम आपण । सुमनीं जटा आच्छादोन ।
त्यावरी समुद्रें आपण । मुकुट संपूर्ण बाणला ॥ ९७ ॥
अनर्घ्यरत्नीं रत्नघन । मस्तकीं मुकुट दैदीप्यमान ।
तेणें शोभला श्रीरघुनंदन । जननयनसुखकारी ॥ ९८ ॥
निजतेजें घवघवोनि । मुकुट माथां अनर्घ्यमणी ।
श्रीराम शिरोमणींचा शिरोमणी । तोही आभरणीं शोभत ॥ ९९ ॥
कुंडलें शोभती मकराकार । लौकिक बाह्य विचार ।
तो मुख्य मूळीं निर्विकार । श्रवणें विकार निर्दाळी ॥ १०० ॥
उभय बाहूबाहुवटें । वरी कंकणें उद्भटें ।
मुक्ताफळें श्रेष्ठश्रेष्ठें । शोभती मनगटें सुंदर ॥ १०१ ॥
मनगटें बाणली सुंदरें । कंठीं बाणली चौसरें ।
श्रीरामा आवडे एकसरें । गुह्य समुद्रें नेणिजे ॥ १०२ ॥
गुणातीत परिपाक । तेंचि श्रीरामा ह्रदयीं पदक ।
पाहतां जीवशिवां पडलें टक । अलौकिक निजसेवा ॥ १०३ ॥
कटीं बाणली कटिमेखळा । क्षुद्रघंटिकाज्वाळमाळा ।
कंठीं अनर्घ्य रत्नमाळा । मुक्ताफळांसमयोगें ॥ १०४ ॥
वाकींआंदुवांचा मेळा । ज्यांचा धाक कळिकाळा ।
वैरी कांपती चळचळां । तो चरणकमळा तोडरू ॥ १०५ ॥
श्रीरामाचा मुखमृगांक । परिपूर्णत्वें निष्कळंक ।
त्याचे उपमें नये शशांक । तो सकळंक क्षयरोगी ॥ १०६ ॥
मुकुट कुंडलें मेखळा । कांसें कसिला सोनसळा ।
घवघवीत घनसांवळा । देखोनि डोळां निवाले ॥ १०७ ॥
टिळक रेखिला पिवळा । आपाद कंठी रत्नमाळा ।
घवघवीत घनसांवळा । देखोनि डोळां निवाले ॥ १०८ ॥
कंठीं कौस्तुभ तेजाळा । कटिसूत्रीं किंकिणीजाळमाळा ।
ऐसा घवघवीत घनसांवळा । देखोनि डोळा निवाले ॥ १०९ ॥
मुक्तीचा दुकाळ मुक्ताफळां । ते पडली श्रीरामाच्या गळां ।
मुक्ती देवोनि मुक्ताफळां । घनसांवळा शोभत ॥ ११० ॥
अम्लान नवपंकजांची माळा । श्रीरामा तुळसीमाळ गळां ।
तोडर गर्जे रामपदकमळा । घनसांवळा घवघवीत ॥ १११ ॥
ह्रदयीं पदक अति गंभीर । बाहीं बाहुवटें मनोहर ।
ऐसा देखोनि श्रीरामचंद्र । नाचती नेत्र सुखोर्मी ॥ ११२ ॥
चरणकमळीं संत भ्रमर । वांकीअंदुबांचा गजर ।
ऐसा देखोनि श्रीरामचंद्र । नाचती नेत्र सुखोर्मी ॥ ११३ ॥
रूपरेखा अति लावण्य । ऐसा देखोनि रघुनंदन ।
ठाणमाण लावण्यघन । नाचती नयन सुखोर्मीं ॥ ११४ ॥
मांडोनि माहेश्वरी ठाण । करीं धरोनि धनुष्यबाण ।
ऐसा देखोनि रघुनंदन । नाचती नयन सुखोर्मी ॥ ११५ ॥
वीरकंकणीं झणत्कार । करमुद्रिका दशावतार ।
ऐसा देखोनि रामचंद्र । नाचती नेत्र सुखोर्मी ॥ ११६ ॥
नेत्रा निवाले निर्विकारें । बुद्धि दोंदली सन्मात्रें ।
ह्रदय आनंदलें समग्र । चिदचिन्मात्र श्रीराम ॥ ११७ ॥
अहंकोहंसोहंपण । सांडोनि अभिमान आपण ।
वंदितां श्रीरामाचें चरण । स्वानंदें पूर्ण निवाले ॥ ११८ ॥
वीर शृगांर श्रीराममूर्ती । देखतांचि इंद्रियवृत्ती ।
परमानंदे नित्य तृप्ती । सरित्पत्ति तटस्थ ॥ ११९ ॥
टक पडिले समुद्रा । टक पडिले वानरा ।
टक पडिलें सुरनरां । श्रीरामचंद्रा देखोनि ॥ १२० ॥

समुद्राने श्रीरामांवरून रत्ने ओवाळिली :

वाहों विसरलें जीवन । जावों विसरला पवन ।
रवि विसरला दिनमान । श्रीरघुनंदन देखोनी ॥ १२१ ॥

ते पाहून समुद्राला आनंद :

देखतां श्रीरामाची मूर्ती । समुद्र सुखावला चित्तीं ।
सुग्रीव सुखावला कपिपती । सुखी जुत्पती वानर ॥ १२२ ॥
सुखावोनि वानर । अवघे करिती जयजयकार ।
देतां रामनामें भुभुःकार । नादें अंबर कोंदलें ॥ १२३ ॥
समुद्रें श्रीराम धरोनि हातीं । नेला वरूणालयाप्रती ।
वरूणासी नमस्कारी रघुपती । वृद्ध मूर्ति देखोनी ॥ १२४ ॥
वरूण घाली लोटांगण । श्रीराम अवतारी ब्रह्म पूर्ण ।
शीघ्र करीं लंकागमन । विजयी पूर्ण तूं होसी ॥ १२५ ॥
जैसा शृंगारिला श्रीरामचंद्र । तैसाचि सखा सौमित्र ।
दोघे महावीर शूर । जेंवी रविचंद्र आकाशीं ॥ १२६ ॥
समुद्रें आणोनियां जाण । रत्नांजळी भरोनि पूर्ण ।
श्रीरामासी ओंवाळून । सांडिली आपण स्वानंदें ॥ १२७ ॥
सुग्रीव येवोनि उठाउठीं । ओंवाळोनि धनकोटी ।
वाटूं जातां समुद्रतटीं । मागता दृष्टीं दिसेना ॥ १२८ ॥

रत्ने वानरांनी उधळली ती रावणाच्या सभेत पडली :

श्रीरामाचियें संगतीं । लोलुपता निमाली निश्चितीं ।
मागण्याची समूळ शंती । स्वानंदें तृप्ती सर्वांसी ॥ १२९ ॥
मागता न देखोनि दृष्टीं । वानरीं उडोनि उठाउठीं ।
रावणाचे सभानिकटीं । केली वृष्टी धनरत्नीं ॥ १३० ॥
कायसी धनरत्नांचीं वृष्टी । पाहूं धाडिल्या राक्षसकोटी ।
घेवोनि वानरसेनाकोटी । आला जगजेठी श्रीराम ॥ १३१ ॥

तेव्हा चौकशी केली त्यावेळी श्रीरामांचे सैन्य आल्याचे कळले :

आला ऐकोनि श्रीरामासी । दशानन चिंता मानसीं ।
पाहों धाडिलें प्रधानांसी । आणि लंकेसीं आकांत ॥ १३२ ॥
मागें पळावया नाहीं वाडी । पुढें आली वानरधाडी ।
रावणाची बुद्धि कुडी । बांदवडी स्त्रीपुत्रां ॥ १३३ ॥
एकाजनार्दना शरण । हदादिलें लंकाभुवन ।
श्रीराम येवोनि आपण । करील कंदन राक्षसां ॥ १३४ ॥

स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडें एकाकारटीकायां
श्रीरामसैन्यसिंधुपरपारप्रवेशो नाम एकचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥ ४१ ॥
॥ ओव्यां १३४ ॥ श्लोक १६ ॥ एवं संख्या १५० ॥