Ramayan - Chapter 5 - Part 33 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 33

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 33

अध्याय 33

हनुमंतप्रतापवर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणासमोर मारुती पुच्छासन मांडून बसतो त्यामुळे रावण भयभीत होतो

रावणसिंहासनासमान । घालोनियां पुच्छासन ।
हनुमान बैसला सावधान । दशानन लक्षोनी ॥ १ ॥
जैसा सिंहापुढें गजाचा दर्प । कीं गरूडापुढें कांपती सर्प ।
तैसा देखोनि कपिप्रताप । महाकंप रावणा ॥ २ ॥

बिभीषण व इंद्रजित रावणास सूचना करितात

जंव रावण देखे भयभीत । तंव बिभीषण इंद्रजित संयुक्त ।
लंकेशासी बुद्धि सांगत । कीं अवध्य हनुमंत सर्वथा ॥ ३ ॥
मारूं जातां हनुमंतासी । तेणें गांजिलें महावीरांसी ।
पुच्छें निर्दळिलें सैन्यासी । तो कपि कोणासी नाटोपे ॥ ४ ॥
तरी बुझवावया हनुमंता । श्रीरामा अर्पावी सीता ।
आणि शरण रिघालिया रघुनाथा । आम्हां समस्तां कल्याण ॥ ५ ॥
जें श्रीरामाचें एक वानर । केवळ तेंही पालेखाइर ।
तें नाटोपे आम्हां अति दुर्धर । मग आल्या रघुवीर कोणा साहे ॥ ६ ॥

ते ऐकून रावणास चिंता, पण त्यांची सूचना अमान्य

ऐसें ऐकोनि बिभीषण उत्तरा । आणि देखोनि इंद्रजितासी रणभेदरा ।
परम चिंता दशशिरा । देखोनि वानरा चळकांप ॥ ७ ॥
तरी इंद्रजिताची बुद्धि भिन्न । आणि बिभीषण म्हणे रिघावें शरण ।
तरी म्यां काय करावें आपण । ऐसें रावण विचारी ॥ ८ ॥

म्हणून मारूतीचा कपटाने घात करावा अशी योजना

तरी ऐकल्या वानराभेण । रिघावें श्रीरामासी शरण ।
तरी मज आलें उणेपण । करोनि छळण कपि मारूं ॥ ९ ॥
जैसा जटायु नाटोपतां जाण । मग म्यां मारिला करोनि छळण ।
तैसेंचि यासी घालोनि आण । पुसोनि मरण कपि मारूं ॥ १० ॥
जरी श्रीरामभक्त सत्यवादी । असत्य न बोलती त्रिशुद्धी ।
तरी याचे मरणा हेचि बुद्धि । छळणानुवादीं मारावा ॥ ११ ॥

मारूतीची स्तुती करून रामाची शपथ घालून त्याचे मरण विचारतो

ऐसीं विचारोनि युक्ती । मग दाहींमुखीं लंकापती ।
स्तवूं आदरिला मारूती । मरणयुक्ती पुसावया ॥ १२ ॥
तरी ऐकें कपींद्रा सावधान । तुज घालितों श्रीरामाची आण ।
कीं तुज कैसेनि ये मरण । हें सत्य वचन मज सांगें ॥ १३ ॥

आपण अमर असल्याचे मारूती सांगतो

ऐकोनि श्रीरामाची आण । हनुमान घाली लोटांगण ।
मज सर्वथा नाहीं मरण । हें सत्यवचन लंकेशा ॥ १४ ॥
ऐसें परिसतां कपिवचन । गदगदां हांसे दशानन ।
जे जन्माआधीं गर्भी मरण । अमरपण तुज कैचें ॥ १५ ॥

रावणाचा अविश्वास :

मग रावण वदे हनुमंता । मिथ्या वदो नको श्रीरामभक्ता ।
आणि तूं कां वदसी मिथ्या वार्ता । निजवृत्तांता मज सांगें ॥ १६ ॥
जैसें जटायूस पुसोनि मरण । त्यासि मारिले करोनि छळण ।
तैसेंचि मजही करिसी जाण । तेणें भयें वदें मिथ्या ॥ १७ ॥
तरी मरणभय जयाचे चित्तीं । मग त्यासी कैंची श्रीरामभक्ती ।
देहलोभ्या श्रीरामाप्राप्ती । कदा कल्पांती असेना ॥ १८ ॥

मारूतीचे प्रत्युत्तर व रावणाची निंदा

ऐसें परोपरी प्रबळ ज्ञान । योग्यता बोले दशानन ।
तरी परदाराचोरी आपण । हें जाणतेपण कोण रावणा ॥ १९ ॥
तरी मरणभयें कासाविसी । आणि सीता चोरोनि स्वयें पळसी ।
तो तूं आम्हां शिकविसी । मरणभयासी कां भीत ॥ २० ॥
वर्मीं खोंचला लंकानाथ । मग त्यासी सांगे हनुमंत ।
ऐक माझा मरणार्थ । तुज यथार्थ सांगेन ॥ २१ ॥

पुच्छांचे दहन झाले तरच माझे मरण निश्चित असे मारूती सांगतो

मी असत्य वदलों नाहीं तुजसीं । जें मरण नाहीं माझे देहासी ।
तरी मरण आहे पुच्छासी । तें मारिसी तै मी मरें ॥ २२ ॥
कपिपुच्छासी केलिया दहन । अवश्य हनुमंतासी मरण ।
इंद्रजित सत्य मानी आपण । आणि सैन्य प्रधान सत्य मानिती ॥ २३ ॥
श्रीरामाआणेनें भयभीत । वदला मरणार्थ ।
पुच्छदाहें मरेल हनुमंत । ऐसें लंकानाथ सत्य मानी ॥ २४ ॥

ते कसे करावे असे रावणाने विचारल्यावरून वस्त्रे
गुंडाळून तेल तूप शिंपणे हा मार्ग मारूती सांगतो

मग स्वयें पुसे दशानन । तरी कोणे युक्ती पुच्छदहन ।
जें जाळावया लंकाभुवन । करावया छळण कपि सांगे ॥ २५ ॥
वस्त्रें तेलतुपीं भिजवोन । पुच्छ गुंडाळावें संपूर्ण ।
मग जाळावें अग्नि लावोन । तेणें मरण वानरासी ॥ २६ ॥
मरणवर्म आलें हाता । तेणें अतो उल्हास लंकानाथा ।
मग होय दूतांसी सांगता । वेष्टनार्था कपिपुच्छा ॥ २७ ॥

वस्त्रांकरिता सर्व नागरिकांना नग्न केले

पुच्छ गुंडाळितां तांतडी । तंव सरलीं जुनीं पानीं लुगडीं ।
मग गुंडिती नवी घोंगडीं । धुवट उडी उकलोनी ॥ २८ ॥
मग दिंडे आणिली उदंडें । परी तें कपिगुच्छ न गुंडे ।
तेणें चाटे भाटे फोडिती धोंडें । करिती तोंडे महाशब्द ॥ २९ ॥
शेले खाखी बेजवटे । काळीं बेरी समसगटें ।
सखरें निखरें धुवटें । परी पुच्छ न वेष्टे कपीचें ॥ ३० ॥
राजगृहींची वस्त्रें । आणि नगरींची वस्त्रमात्रें ।
सभा नागविली समग्र । परी पुच्छ चतकोर गुंडेना ॥ ३१ ॥
पोताचीं वस्त्रें घेती काढकाढूं । आणि पडदे गुंडिती फाडफाडूं ।
का दुसे गुंडिती उघडउघडूं । द्वंद्वीं माकडू पेटला ॥ ३२ ॥
कोणाचा मेहुणा कोणाचा पाहुणा । जांवई आणिला दिवाळसणा ।
त्यांचेही करितां वस्त्राहरणा । शंखस्फुरणा ते करिती ॥ ३३ ॥
जे जे देखती वस्त्रयुक्त । त्यांतें दूत नागवित ।
नगरीं भोवें पुच्छावर्त । कळकळत नरनारी ॥ ३४ ॥
पुरूष नागवले हळहळित । मग कां तृणें लिंग झांकित ।
मागें पुढें देवोनि हात । स्त्रिया पळत अति नग्न ॥ ३५ ॥
मग राणिवसाची लुगडीं । करोनि आणितीं उघडीं ।
लंका नागविली रोकडी । कडोविकडी कपिपुच्छें ॥ ३६ ॥
नगर नागविलें हळहळित । आणि सभा नागविली समस्त ।
नग्न स्त्रिया राणिवसांत । पुरविला अंत कपिपुच्छें ॥ ३७ ॥

जनानखान्यातही आक्रमण केले तरी पुच्छ मोकळेच

दुर्गसांठवण निर्वडी । तेलतुपांची टांकीं गाढीं ।
कपिपुच्छें केलीं कोरडीं । घोंगडीं पांगडीं भिजवोनि ॥ ३८ ॥
घृत स्नेह नाहीं नगरांआंत । वाती लाविल्या समस्त ।
गडद पडदे लंकेआंत । लंकानाथ धुकधुकी ॥ ३९ ॥
नगरीं तेलतुपाचा धडा । आणि भोंवता वस्त्रांचा हरडा ।
तरी पुच्छ न गुंडे पुढां । लाविलें वेडा वानर ॥ ४० ॥
सभा नागविली वीरानुवीरीं । वस्त्रमात्र न मिळे नगरीं ।
नागव्या हळहळित नरनारीं । कपिपुच्छ तरी न गुंडे ॥ ४१ ॥
पुच्छ गुंडावयाची व्युत्पत्ती । ज्याचें नगर त्याचे हाती ।
स्वयें नागवी मारूती । लाविली ख्याती कपिपुच्छें ॥ ४२ ॥
वानर महाजगजेठी । लंका नागविली पुच्छासाठीं ।
शिणतां राक्षसांच्या कोटी । पुच्छ शेवटीं न गुंडे ॥ ४३ ॥
पुच्छ गुंडितां पैं कैवाडें । अग्र अधिकाधिक वाढें ।
ऐसी ख्याती लाविली माकडें । मरण रोकडें राक्षसा ॥ ४४ ॥
नाहीं झगडा ना भांडण । करितां कपिपुच्छासीं वेष्टण ।
तृणप्राय केला रावण । ऐसी गाढी आंगवण हनुमंता ॥ ४५ ॥
पुच्छ वेष्टिलें समग्र । अल्प उरलें दिसे अग्र ।
ऐसें ऐकोनि दशशिर । पीतांबर म्हणे गुंडाळा ॥ ४६ ॥
इंद्रजित प्रधानसमवेत । रावण संतोषचित्त ।
पुच्छदाहें मरें हनुमंत । पुच्छ समस्त वेष्टावें ॥ ४७ ॥
मग पीतांबरें श्वेतांबरें । आणि पट्ट्कुळें मनोहरें ।
गुंडिताती क्षौमांबरें । पुच्छ न भरे कपीचें ॥ ४८ ॥
तंव इंद्रजित अतिशयें धाकत । जरी वांचला हनुमंत ।
तरी समस्तां करील घात । पुच्छदहनार्थे मारावा ॥ ४९ ॥
रावण धाके मानसीं । जें पुच्छ न गुंडें पैं आम्हांसीं ।
तरी केंवी मारवेल हनुमंतासी । म्हणोनि उकसाबुकसीं स्फुंदत ॥ ५० ॥

सीतेचे वस्त्र आणण्याचा विचार करताच पुच्छ गुंडाळले गेले

तंव बोलिला विद्युन्माळी । जरी वानर आकळेना महाबळी ।
तरी उघडी करावी जनकबाळी । मग पुच्छ तत्काळीं आकळेल ॥ ५१ ॥
ऐसें ऐकतां हनुमंतें । मग सांवरिलें निजपुच्छातें ।
तंव दूत सांगती रावणातें । जें आम्ही पुच्छातें आकळिलें ॥ ५२ ॥
आम्ही सेवक आतुर्बळी । पुच्छ आकळिलें समूळीं ।
म्हणोनि पिटिली सर्वी टाळी । केला समूळीं गडगर्ज ॥ ५३ ॥

पुच्छ पेटवण्यासाठी लोहाराच्या भात्याची योजना

तंव रावण सांगे अति क्रोधार्थें । अग्नी लावा रे पुच्छातें ।
मग आणोनि लोहकारातें । लाविले भाते अग्नीसीं ॥ ५४ ॥
लंकानाथ सुखसमेळीं । पुच्छा करावया होळी ।
हनुमंत मारावा महाबळी । अग्नीजवळीं स्वयें आला ॥ ५५ ॥
तंव अग्नीच्या पोटाआंत । कीं अपमानावा लंकानाथ ।
तंव तेंचि करूं पाहे हनुमंत । तो गुह्यार्थ अवधारा ॥ ५६ ॥
तयाकाळीं हनुमंते । विनविलेसें पितयातें ।
जे वायु सखा अग्नीतें । तरी ज्वाळा तेथें होवों नेदीं ॥ ५७ ॥
ज्वाळा होवों नेदी येथें । ऐसे नमोनियां वायूतें ।
अपमानावया रावणाते । कपि पुच्छार्थे खवळला ॥ ५८ ॥
भातें फुंकितां चौपासीं । परी स्पर्शेना पुच्छासी ।
राक्षस होती कासाविसी । परी अग्नि तयासी लागेना ॥ ५९ ॥

अचेतन भात्यांनी सचेतन पुच्छ कसे पेटणार?

मग रावण पुसे हनुमंतासी । अग्नि कां न लागे पुच्छासी ।
हनुमान म्हणे रावणासी । तूं आहेसी अति मूर्ख ॥ ६० ॥
सदसद्विवेकज्ञान । ज्यासी नाहीं तो अति अज्ञान ।
तूं तंव ज्ञानगर्वीं पाषाण । जे धर्मलक्षण लक्षेना ॥ ६१ ॥
भातें फुंकितां अचेतन । केंवी ज्वाळा होती सचेतन ।
तरी हें तुज नाहीं ज्ञान । अति अज्ञान लंकेशा ॥ ६२ ॥
तें तंव वचन मानलें लंकेशासीं । मग पाचारोनि निजवीरांसी ।
फुंकूं लाविलें पुच्छासीं । साक्षेपेंसी सांगोनि ॥ ६३ ॥
राक्षस फुंकितां चौपासीं । तंव पुच्छें दडपिलें अग्नीसी ।
घोर घाणी उठे घशासीं । तेणें कासाविसी राक्षसें ॥ ६४ ॥
घोर घाणी अति प्रबळ । डोळां आंसुवें मुखीं लाळ ।
आणि ऊर्ध्वश्वासें खोकती सकळ । हलकल्लोळ मांडिला ॥ ६५ ॥
ऐसा द्वंद्वा पेटला हनुमंत । सभा जाहली धूम्राकुळित ।
वानरें मांडिला हा अनर्थ । लंकानाथ गजबजिला ॥ ६६ ॥

तरीही ते पुच्छ पेट घेईना म्हणून मारूतीच्या
सूचनेप्रमाणे रावण फुंकर घालू लागला

मग रावण पुसे हनुमंता । पुच्छ कां न जळे फुंकिता ।
हनुमान म्हणे लंकानाथा । ऐक आतां सांगेन ॥ ६७ ॥
पोफळ नेदितां यजमानासी । होम न करवे तयासी ।
तई न फुकिता रावणासी । अग्नि पुच्छासी स्पर्शेना ॥ ६८ ॥
जेंवी गृहस्थें न करितां ब्रह्मर्पण । द्विज न घेती आपोशन ।
तेंवी न फुंकितां रावण । हुताशन प्रबळेना ॥ ६९ ॥
एक मुखें किती फुंकिती । दहा मुखें तुज आहेती ।
तुवां फुंकिलिया लंकापती । पुच्छप्रदीप्ती हुताशना ॥ ७० ॥
मग करोनि शुद्धाचमन । आणि प्रथम देवोनी घृतावदान ।
मग फुंकावया हुताशन । दशानन बैसला ॥ ७१ ॥
हनुमंताची विवेकयुक्ती । सत्य मानलें लंकापती ।
पुच्छासी फुंकावया प्रदीप्ती । केली आइती तें ऐका ॥ ७२ ॥
रावणाचे पोटीं कपट । कपि मारावया समसगट ।
येणें आवेशें दशकंठ । हव्यवाट फुंकित ॥ ७३ ॥
जें रावणाचे निजचित्तीं । माझेनि मुखें पुच्छप्रदीप्ती ।
शांत जालिया मारूती । जगीं किर्ति वाढेल ॥ ७४ ॥
तंव हनुमान म्हणे पित्या पवनासी । अग्नि फुंकितां रावणासीं ।
अति अपमान द्यावा त्यासी । मुख कोणासी न दावी ॥ ७५ ॥

तेव्हा एकदम भडका उडून रावणाच्या दाढी मिशा जळाल्या

तंव अति आवेशें दशानन । आक्रोशें फुंकी हुताशन ।
तंव भडका एकसरें होऊन । केलें दहन खांडमिशां ॥ ७६ ॥
होतां खांडमिशादहन । मुखीं पोळला दशानन ।
शंख करी गुद त्राहाटोन । काळें वदन लंकेशा ॥ ७७ ॥

रावणाने तोंड वर करताच पुच्छही वर झाले

जंव रावण तोंड परतें करीं । तंव हनुमान पुच्छ वरतें धरी ।
पहिला अपमान राजशिरीं । केली बोहरी खांडमिशां ॥ ७८ ॥

हा वृत्तांत ऐकून राम, लक्ष्मण व सुग्रीवादि सर्वांना
फार हसू आले; व वानरसमूहात हनुमंताचा जयजयकार

अभिनव कपीची ख्याती । एकोनि हांसे श्रीरघुपती ।
आणि सुग्रीवासारखे जुत्पती । स्वयें हांसती स्वानंदें ॥ ७९ ॥
वाचितां पत्र लक्ष्मण । तोही जाला हास्यवदन ।
हनुमंताचे अति विंदान । काळें वदन लंकेशा ॥ ८० ॥
आमुचा हनुमान आतुर्बळी । जे धुरेच्या मुखा केली होळी ।
म्हणॊनि वानरीं पिटिली टाळी । सुखसमेळीं गर्जत ॥ ८१ ॥
विजयी हनुमंत महावीर । हरिखें नाचती वानर ।
अवघे करिती जयजयकार । श्रीरामचंद्र स्मरोनी ॥ ८२ ॥
मग अंगदें उठोनि जाण । भेरी त्राहाटिल्या निशाण ।
तंव सुमनें वर्षती सुरगण । तेणें सुखसंपन्न श्रीराम ॥ ८३ ॥
ऐकतां सेवकाची ख्याती । स्वयें सुखावे रघुपती ।
धन्य धन्य तों मारूती । जे पावन कीर्ति तिहीं लोकीं ॥ ८४ ॥

मारूतीचे रामचरणी वंदन व श्रीरामस्तुती

मग सौमित्रा श्रीराम सांगत । पुढें वाची ब्रह्मलिखित ।
पुच्छेदहनें हनुमंत । पुढें पुरूषार्थ काय केला ॥ ८५ ॥
वंदोनि श्रीरामाचे चरण । पत्र वाची लक्ष्मण ।
आवडीं परिसत रघुनंदन । तें सावधान अवधारा ॥ ८६ ॥
श्रीरामाते अनुलक्षोनी । हनुमान उभा कर जोडूनी ।
आपुल्या स्तुती ऐकोनी । ना श्लाघे ना अभिमान ॥ ८७ ॥
मी पालेखाइरें वानर । माझी कीर्ति करिता श्रीरामचंद्र ।
रणीं रामनाम महाशूर । अति दुर्धर रामनाम ॥ ८८ ॥
श्रीराम हाताचा हात । श्रीराम शस्त्राचें सामर्थ्य ।
राम करिता राक्षसघात । रणकंदनार्थ श्रीराम ॥ ८९ ॥
श्रीराम प्राणाचाही प्राण । श्रीराम बाणाचाही बाण ।
श्रीराम माझी आंगवण । श्रीरामीं समर्पण पैं माझें ॥ ९० ॥
ऐसें ऐकतां हनुमंताचे बोल । श्रीरामा येती सुखाचे डोल ।
जे भक्तिभावार्थाची ओल । अति सखोल श्रीरामीं ॥ ९१ ॥

पुच्छाने केलेले वंदन :

पुढें ब्रह्मयाचें ब्रह्मलिखित । हरिखें सौमित्र वाचित ।
अपमानिला लंकानाथ । सभेआंत सलज्ज ॥ ९२ ॥
प्रथमप्रारंभीं पुच्छकंदन । दाढ्यामिश्या जाळिल्या दहन ।
सिंहासनीं काळें वदन । लज्जायमान रावण ॥ ९३ ॥
कीर्ति जाली अपकीर्तीं । थोर चिंता रावणचित्तीं ।
पुढें काय करील मारूती । पुच्छ्दहनार्थीं कळेना ॥ ९४ ॥
छळों जातां वानरासी । छळण न चले रामभक्तासी ।
छळणें जाळिलें माझ्या मुखांसी । खांडमिशांसी पुच्छदाहो ॥ ९५ ॥

ते सप्तपाश तोडून मारूती मोकळा होतो

वानर उडतां रामनामेंसी । छेदिलें दुर्धर सप्त पाशांसी ।
तेथें द्रुमपाश रज्जुपाशांसी । यमपाशासी कोण पाड ॥ ९६ ॥
काळपाश कर्मपाश । धर्मपाश ब्रह्मपाश ।
मायापाश मोहपाश । जन्मपाश सातवा ॥ ९७ ॥
काळपाश तो आयुष्यघात । कर्मपाश तो नैश्वर्यवंत ।
धर्मपाश तो आश्रमगत । वेदविहितार्थ ब्रह्मपाश ॥ ९८ ॥
देहममता मोहपाश । मुख्य माया तो आशापाश ।
कनककांता हा जन्मपाश । ऐसे सप्त पाशांहीं जीव बद्ध ॥ ९९ ॥
सप्त पाशांची निवृत्ती । रामनामें करी मारूती ।
तेथें येरांची न चले युक्ती । शास्त्रव्युत्पत्ती शीणतां ॥ १०० ॥
श्रीरामाचें जें नाम । तेंचि केवळ परब्रह्म ।
नामें निर्दळी कर्माकर्म । धर्माधर्मच्छेदक ॥ १०१ ॥
अबद्ध पढतां पैं वेद । अनिवार बाधिता निषेध ।
आणि नाम स्मरतांचि अबद्ध । होती सुबद्ध श्रवणार्थी ॥ १०२ ॥
अबद्ध मंत्राच्या प्रयुक्तीं । जापक चळलें नेणों किती ।
आणि अबद्ध नांवाच्या आवर्ती । जड मूढ तरती असंख्य ॥ १०३ ॥
करितां क्रियाकर्मव्युत्पत्ती । जरी विधिविधानें व्यंग होती ।
व्यंग कर्मे नव्हें उद्धारगती । आणि हरिनामोक्ती अच्युत ॥ १०४ ॥

नाममहिमा, रामरक्षेचा प्रभाव

नामासीं नाहीं कर्मबंधन । नामासीं नाहीं विधिविधान ।
आसनीं भोजनीं शयनीं जाण । नाम पावन हरीचें ॥ १०५ ॥
स्वप्नीं स्मरतां रामनाम । तिन्ही अवस्था करीं भस्म ।
ऐसें दाटुगे हरीचे नाम । नाम परब्रह्म प्रत्यक्ष ॥ १०६ ॥
स्वप्नींचिया स्वप्नस्थिती । कौशिका रामरक्षेची प्राप्ती ।
जे कां दाटुगी त्रिजगतीं । उद्धरणार्थीं जयाचे ॥ १०७ ॥
तरी रामरक्षा ज्याचे हातीं । कळिकाळ त्यासी कांपती ।
यमधर्म पायां लागती । तीर्थे मागती चरणतीर्थ ॥ १०८ ॥
असो रामरक्षाव्युत्पत्ती । दोनचि अक्षरें रामनामोक्ती ।
चहूं मुक्तीची फिटे भ्रांती । ब्रह्मप्राप्ति ठसावे ॥ १०९ ॥
श्रीरामस्मरणाचेनि योगें । ब्रह्मस्थिति घर रिघे ।
कळिकाळासी करी उभें । ऐसें नाम दाटुगें श्रीहरीचें ॥ ११० ॥
ऐसी रामनामाची स्थिती । पूर्ण बाणली हनुमंती ।
तेणें त्याची पावन कीर्ती । त्रिजगती निजविजयी ॥ १११ ॥
ऐसी हनुमंताची स्थिती । ब्रह्मयानें लिहिली ब्रह्मलिखितीं ।
पुढें कपिपुच्छप्रदीप्ती । केली ख्याती ते ऐका ॥ ११२ ॥

मारूती मेल्याचे सोंग करितो

पुच्छीं धडाडी हुताशू । हनुमंतासीं अति आवेशू ।
जैसा खेवा आलिया अमृताशूं । ऐसा उल्लासू वानरीं ॥ ११३ ॥
रामनामाहींपरतें । नाहीं साधन सरतें ।
अग्नि बांधूं न शके मातें । कृपा रघुनाथें मज केली ॥ ११४ ॥
श्रीरामनामें हनुमंत । सप्तपाशबद्ध निर्मुक्त ।
परी तोही पुच्छें तळमळित । राक्षसां अंत करावया ॥ ११५ ॥
नेत्रीं लाविली अर्धचंद्री । आणि खरसीं आणिली मुखाभीतरी ।
पुच्छ पसरोनि धरणीवरी । मरणानुकारी कपि पडे ॥ ११६ ॥

राक्षसांचा त्यामुळे हर्ष :

मग राक्षस येवोनि समस्त । जंव हालवोनि पहात ।
तंव कपि हालवीना पाय हात । वानरें दांत विचकिले ॥ ११७ ॥
एक उलथें पालथें करिती । एक उफराटें धरिती ।
तंव ते पुच्छाग्नीनें पोळती । मग पळती माघारें ॥ ११८ ॥
एक ढुंगीं घालती काठ्या । एक हाणिती फडफडाटा ।
ऐसा वानर मीसगाढा । दांत दाढा हालवीना ॥ ११९ ॥
ऐसें मीस करोनि अति निगुतीं । हालों नेदी पातया पातीं ।
म्हणती निमाला मारूती ॥ करोनि ख्याती रणमार ॥ १२० ॥
वानरवीर जगजेठी । मारिल्या राक्षसांच्या कोटी ।
इंद्रजित रावण धाकें पोटीं । अवघ्यां पोटीं अति धाक ॥ १२१ ॥
जरी हा मरण न सांगता । तरी करिता अवघ्यांच्या घाता ।
परी तीक्ष्ण बुद्धि लंकानाथा । छळणें हनुमंता मारिलें ॥ १२२ ॥
वानर सत्यवादी पूर्ण । पाळोनि श्रीरामाची आण ।
सांगोनियां निजमरण । आपणा आपण मारविले ॥ १२३ ॥

वैद्यांचे मत :

जंव वैद्य पाहती विचक्षण । म्हणती कपीचे ह्रदयीं आहे प्राण ।
परी तो अतिशयेंसी क्षीण । क्षणार्धे पूर्ण निमेला ॥ १२४ ॥

मारूती मेला या वार्तेने तेथे त्याला पाहाण्यासाठी प्रचंड गर्दी :

हनुमान निमाला ऐकोनि । घाव घातला निशाणीं ।
इंद्रजित हरिखला मनीं । वांटी शेरणी लंकेसीं ॥ १२५ ॥
रावणें मारिला मारूती । लंकालोक पाहूं येतीं ।
राक्षसवीरांचिया पंक्ती । अमित क्षितीं दाटलिया ॥ १२६ ॥

ती गर्दी पाहताच त्या पेटत्या शेपटीचे त्यांच्यावर एकदम आक्रमण केले :

मिळाली राक्षसाची मांदी । मीस घेतलें निजबुद्धी ।
अवघ्यां वधावया त्रिशुद्धी । पेटला द्वंद्वीं तों ऐका ॥ १२७ ॥
दाटल्या देखोनि राक्षसहारी । जळत पुच्छ घाली त्यांवरीं ।
तंव ते पोळती उरीं शिरीं । ऐसी आपांपरी राक्षसां ॥ १२८ ॥

शेपटीने सर्वांचे रस्तेच बंद केल्यामुळे एकच त्रेधातिरपीट

पळों जातां बाहेरी । तंव जळत पुच्छ लाविलें द्वारी ।
अवधियां केली कोंडमारी । ऐसा निशाचरी आकांत ॥ १२९ ॥
जनांच्या वस्त्रां लाविली आगीं । तेणें जळती सर्वांगी ।
पुच्छ घाली एकएकाचें ढुंगीं । नेसण्या आगी लाविली ॥ १३० ॥
आगी लागल्या धोत्रांसी । द्विज पोळले लिंगप्रदेशी ।
नागवे नाचती रावणापासीं । दाविती त्यासी लिंगव्यथा ॥ १३१ ॥

हनुमंत राजद्वारी जातो :

हनुमान निघाला राजद्वारीं । निशाणें त्राहाटिल्या भेरी ।
जळो ते रावणा तुझी थोरी । जोहारवोहारी त्या केली ॥ १३२ ॥
लंका नागविली वस्त्रासाठीं । तेलातुपा पाडिली तुटी ।
दिवा लावणें खुंटली गोष्टी । शेवटीं जीवा साटी कपिपुच्छ ॥ १३३ ॥
आधींच वानर सबळ । आणि पुच्छ पेटविलें प्रबळ ।
आतां लंका जाळील तत्काळ । आणि मारील राक्षसां ॥ १३४ ॥
रावणा तुझें पोटीं कपट । त्या कपटें केले तळपट ।
पुच्छें पेटला मर्कट । करील सपाट सर्वांचें ॥ १३५ ॥

रावणाने मारूतीस विचारल्यावरून हा सर्व
शेपटीचा परिणाम आहे असे त्यास सांगतो

रावण म्हणे रे हनुमंता । लंका जाळिसी कवण्या अर्था ।
सावध ऐकें लंकानाथा । तुज तत्वतां सांगेन ॥ १३६ ॥
पुच्छासी मरण आलें निश्चित । तें मरणभयें झाडा देत ।
भयें लोकांमाजी लपत । तरी त्यासी मी येथ काय कीजे ॥ १३७ ॥
एकाचे चरण धरित । आणि एकाचें पोटीं गवसत ।
एकाचे पालवीं झोंबत । जे मरणभयार्थ चुकवावया ॥ १३८ ॥
एकासीं होत शरणागत । एकाचें गळी पडत ।
जे विनवूनी लंकानाथ । मरणोन्मुक्त करा म्हणे ॥ १३९ ॥
रावणा मीही करितों विनंती । जे जाजावोनि दहनार्थीं ।
पुच्छ येतें काकुळतीं । तरी मरणोन्मुक्ती करी त्यांसी ॥ १४० ॥
उरीं शिरीं स्वयें जाळित । त्या नांव म्हणिजे शरणागत ।
पुच्छें मांडिला मरणावर्त । मरणोन्मुक्त करा म्हणे ॥ १४१ ॥
करावया राक्षसांचा घात । द्वंद्वा पेटला हनुमंत ।
देखोनि पुच्छदहनार्थ । लंकानाथ चळीं कांपे ॥ १४२ ॥

मारुतीचे सर्व लक्ष नंतर राजमंदिराकडे वळले

रावण कपिभयें कांपत । आणि निःशंक बैसला हनुमंत ।
पुच्छें मांडिला आकांत । दहनावर्त राक्षसां ॥ १४३ ॥
दशमुखेंसीं संमुख । हनुमान बैसला निःशंक ।
पुच्छे सेना आणि सैनिक । एकैक पोळविले ॥ १४४ ॥
राक्षससैन्या माझारीं । बोंब सुटली एकसरीं ।
अग्नि पोळतां उरीं शिरीं । पुच्छ महामारीं पेटलें ॥ १४५ ॥
पुच्छ तव तें अग्निकल्लोळ । लंका वेढिली सकळ ।
राक्षसें करिती तळमळ । न चले बळ कपिपुच्छीं ॥ १४६ ॥
तंव हनुमान विचारीं मानसीं । अग्नि लागला माझें कासेंसीं ।
तरी परम तृप्ती द्यावी यासी । ऐसें अति उल्लासे वानर ॥ १४७ ॥
विचारितां मूळ अनुवादु । वेदानुवाद सखे बंधु ।
दोहींचा पिता वायु प्रसिद्धु । परम सुह्रदु आत्मत्वें ॥ १४८ ॥
अग्नि वायूचा ज्येष्ठ सुत । आणि कनिष्ठ भेटला हनुमंत ।
मग सुतें आलिंगिला सुत । तेणें उल्लासत स्वयें वायु ॥ १४९ ॥
ज्येष्ठ बंधु अति वरिष्ठ । भोजनीं लंकाभुवनताट ।
राजमंदिरी परवडी श्रेष्ठ । भक्ष चोखट तें ऐका ॥ १५० ॥

घराघरातून पुच्छप्रवेश व त्यामुळे दाह :

रावणाचा छत्रदाहो । प्रथम प्राणाहुति पहा हो ।
माड्या गोपुरें गृहसमुदावो । निजनिर्वाहो भोजनीं ॥ १५१ ॥
चंदनमंदिरें तेंचि ओदन । गृहसामग्री तेंचि वरान्न ।
पताका कथिका ते पूर्ण । आणि घृत जाण मणिमाळा ॥ १५२ ॥
नानापरींचे वृक्षदहन । त्या शाका स्वादिष्ठ संपूर्ण ।
गुप्तधन तें वरी लवण । दधिओदन तृणघरें ॥ १५३ ॥
जालिया तृणघरांचें दहन । मग सवेंचि उत्तरापोशन ।
ऐसें ज्येष्ठ बंधूसी भोजन । लंकाभुवन अर्पित ॥ १५४ ॥
हनुमान बैसला पूर्वद्वारीं । आणि पुच्छ प्रेरिलें असे नगरीं ।
अग्नि लावितां घरोघरीं । नरनारीं आकांत ॥ १५५ ॥
नवल लाघवी वानर । पुच्छ करोनियां चौफेर ।
सबाह्य आकळिलें नगर । निशाचरें तळमळिती ॥ १५६ ॥
निर्गम न पुरे नगरीं । जळत पुच्छ नगरद्वारीं ।
तळमळिती नरनारी । आपांपरी राक्षसां ॥ १५७ ॥

त्यामुळे नागरिकांची दैन्यावस्था :

नेसण्या आगीं लावी आधीं । नरनारीं धांवती नागव्या बिदीं ।
हळहळित राक्षसमांदी । सांदोसांदी कळकळिती ॥ १५८ ॥
लेंकीस माय म्हणे तूं कां बुची । तंव ते सांगे माझी पोळीली खोची ।
तंव जांवई आला नागवाची । तो देखे सासूची नग्नता ॥ १५९ ॥
मग म्हणे आजि सफळ नयन । जें देखिले स्त्रियेंचें जन्मस्थान ।
तंव लाजे सासू झांकी नयन । अवघे नग्न हळहळित ॥ १६० ॥
एक पोळती स्तनांतरीं । एक पोळती योनिद्वारीं ।
एक पोळती उरीं शिरीं । गुदद्वारीं पैं एक ॥ १६१ ॥
ऐसा राक्षसांसी आकांत । नगरीभोंवता पुच्छावर्त ।
काळें तोंड लंकानाथ । जें नगरदाहार्थ तेणें केला ॥ १६२ ॥

शेवटी सर्व वाटा अडाविल्यामुळे नागरिकांचा कोंडमारा

पुच्छाग्नीनें मारावा वानर । तंव तेणें अग्नि केला तीव्र ।
लंका जाळिली समग्र । निशाचर देहदाहो ॥ १६३ ॥
निघाल्या नगराबाहेरी । येतां जनांचिया हारी ।
तंव जळत पुच्छ चौफेरीं । लंकापुरी कवळोनी ॥ १६४ ॥
जे जे द्वारीं रिघो जात । तंव पुच्छ धगधगीत तेथ ।
निर्गम न पुरे अति आकांत । जन भ्रमत अति भ्रांती ॥ १६५ ॥
आगी लावोनि प्रबळ बळीं । पाडिले हुडे दुर्गांच्या पौळी ।
अगड बुजिल्या पैं तळीं । मांडिली होळी दुर्गाची ॥ १६६ ॥
हुडें खचती दडदडां । तंव तळीं होता राक्षसां रगडा ।
सैन्या मारोनि बुजी अगडा । पुढें झगडा जिंतावया ॥ १६७ ॥
पाडोनि दुर्गांच्या पौळी । खंदक बुजिला समूळीं ।
श्रीराम यावया संवदळीं । वाट मोकळी कपि करी ॥ १६८ ॥
लंकानगरीचीं दुर्घटें । जाळिल्या अर्गळा कपाटें ।
मोकळे सातही रक्षक दारवंटे । ख्याती मर्कटे लाविलीं ॥ १६९ ॥

लंकेभोवती रक्षक असलेले राक्षस जाळले :

लंकानगरीसभोंवतें । गडपाळ सैन्य जागृत होतें ।
तीं तीं स्थळें बळें समस्तें । हठें कपिनाथें जाळिली ॥ १७० ॥
दुर्गाभोंवतीं चौफेरें । भरली होती अग्नियंत्रें ।
अग्नि लावितां वानरें । ती एकसरें सुटती ॥ १७१ ॥
एक वेळ समकाळ । सुटलें यंत्रांचे यंत्रगोळ ।
नगरीं उठिला हलकल्लोळ । वीर प्रबळ निमाले ॥ १७२ ॥
हनुमान अग्नि वायु तिन्ही । लंका जाळितां तिघीं जणीं ।
तापें तापलीसे धरणीं । तेणें सर्पफणा पोळती ॥ १७३ ॥
सर्प पोळोनि फणोफणीं । बुडी देती आवरणजीवनीं ।
तंव शेष पोळेना सहस्त्रफणी । जे शेषशयनी श्रीराम ॥ १७४ ॥
जेंवी प्रळयकाळींचा अग्नीं । राहे सत्यलोका जाळूनी ।
तैसा लंकादाहें दहनवन्ही । झोंबें धांवोनी निराळीं ॥ १७५ ॥
लंका जाळितां मारूती । तापें तापली त्रिजगती ।
लंकाजन अति आवर्तीं । आली शांती राक्षसां ॥ १७६ ॥

रावणाच्या निवासस्थानावर आक्रमण :

तंव रावणाच्या राणिवसांत । अग्नि लावी स्वयें हनुमंत ।
मग रावण बैसला जेथ । आलें तेथ कपिपुच्छ ॥ १७७ ॥
रावणा मांडिला अति आकांत । तेणें राक्षस धाकती समस्त ।
इंद्रजित जाला शोकाकुळीत । लंकानाथ केंवी वांचें ॥ १७८ ॥
युद्ध करितां मारूती । आमुचिया खुंटल्या सर्व शक्ती ।
मरण आलें लंकापती । कैशा रीतीं वांचला ॥ १७९ ॥
रावण काढा रे बाहेरी । नातरी पडेल पुच्छजोहरी ।
मग दुर्ग पाडोनि निशाचरीं । कष्टांतरीं माग केला ॥ १८० ॥
नवल कपिपुच्छाचीं थोरी । जळत पुच्छ टाकिलें द्वारीं ।
तेणें निर्गम न पुरे बाहेरी । मग हाहाकारीं गर्जती ॥ १८१ ॥
मग ते काळीं निशाचर । निवडोनियां निधडे वीर ।
रागें लोटले कपीवर । शस्त्रास्त्रीं सन्नद्ध ॥ १८२ ॥
वोडणखांडे शूळ त्रिशूळ । परशु पट्टिश गदा मुद्गळ ।
बाणीं कोंदले नभभूतळ । ऐसा रणकल्लोळ वीरांचा ॥ १८३ ॥
रावणाचे दृष्टीपुढां । होतो निर्वाणींचा झगडा ।
तंव हनुमान होवोनि गाढा । रणीं वेंगाढा ऊठिला ॥ १८४ ॥

सर्व वीरांचा मारूतीवर एकवटून हल्ला, परंतु सर्व व्यर्थ :

कपीनें बहुतां लाविली ख्याती । तरी आज याची करूं शांती ।
गर्जोनियां रणविख्याती । शस्त्रासंपाती मारण ॥ १८५ ॥
कपीस मारावया रोकडें । कवची खड्गी वीर गाढे ।
सरकोनि थरकोनि चहूंकडे । घाय देव्हडे हाणिती ॥ १८६ ॥
एक कपिपुच्छें आकांत । लघुलाघवें चुकवित ।
संमुख वंचोनि आघात । रणकंदनार्थ मांडिला ॥ १८७ ॥
मग हनुमान विचारी पोटांत । वीर खवळले अत्यद्‌भुत ।
यांचा तरी पाहू पुरूषार्थ । अंगीं घात साहोनि ॥ १८८ ॥
यांच्या शस्त्रांच्या समेळीं । माझी न तुटें रोमावळी ।
शस्त्रें हाणितां महाबळी । घायातळीं राहिला ॥ १८९ ॥
हनुमान आला घायातळीं । मग वीरीं दिधली आरोळी ।
म्हणती अवघे बळी रे बळी । जे कपि भूतळीं पाडिला ॥ १९० ॥
संमुख हाणिती तोमर । तंव एक मागोनि हाणिती वज्र ।
एके वेळें नाना शस्त्र । अति दुर्धर हाणिती ॥ १९१ ॥
वीर वर्षती शरजाळीं । तंव हनुमान पडला घायातळीं ।
मारूती मारिला आतुर्बळीं । पिटिली टाळी सकळिकीं ॥ १९२ ॥
राहिलें उड्डाण किराण । निःशेष याचा गेला प्राण ।
आमची गाढी आंगवण । भेरी निशाणें त्राहाटिलीं ॥ १९३ ॥
वानरें थोर केली ख्याती । परी आम्ही वीर भद्रजाती ।
जे रणा आणिला मारुती । अति व्युत्पत्ती रणमारें ॥ १९४ ॥
ऐसें अति वाढिवा गर्जती वीर । आणि हरिखें वांटिती साखर ।
आतां विझवा रे लंकापुर । रणीं वानर पाडिला ॥ १९५ ॥
आतां रण शोधा रे सत्वर । जे कोणी घायीं निमाला कपींद्र ।
तंव तेथें करोनि भुभुःकार । वेगीं वानर उसळला ॥ १९६ ॥
ऐकता कपीचें गर्जन । धाकिन्नला दशानन ।
राक्षसांचे पळाले प्राण । जें अचुक मरण ओढवलें ॥ १९७ ॥
लंका पडिली दहनावर्ती । पळावया वाट नाहीं रिती ।
आणि पुढें खवळला मारुती । तेणें मरणप्राप्ती राक्षसां ॥ १९८ ॥
तंव सभामंडपींचा थोर । स्तंभ उपटोनि अष्टधार ।
आणिक कवळोनि निशाचर । घायें चकचूर करीतसे ॥ १९९ ॥
पुच्छें कवळोनि निशाचर सगट । अवघे करोनि एकवट ।
मग खांब हाणोनि उद्‌भट । केलें पीठ अवघ्यांचे ॥ २०० ॥
हात पाया ना मनगट । नाड्या अस्थि शिर कंठ ।
आणि पोटापाठींचें करोनि पीठ । केली एकवट अवघ्यांची ॥ २०१ ॥
ऊर्ध्वगती अधोगती । पुढती नव्हे मरणप्राप्ती ।
ऐसे राक्षसां मारोनि मारुती । गुणातीतीं तें नेले ॥ २०२ ॥
इंद्रियें अवघीं त्रिगुणावृत्ती । इंद्रियें देवता नानारूप ज्योती ।
जिवें मारोनियां मारूती । गुणातीतीं ते नेले ॥ २०३ ॥
श्रीरामभक्तांचें निजहस्तीं । जे जे निमती मारकयुक्ती ।
ते ते पावती गुणातीतीं । भक्ताची ख्याती पैं ऐसी ॥ २०४ ॥
हरिभक्तांचे दृष्टीपुढे । मरे त्याचें भाग्य गाढें ।
जाणोनि त्रिगुणांचें सांकडें । पावती रोकडें परब्रह्म ॥ २०५ ॥

याप्रमाणे मारुतीचा पराक्रम झाला

असो ऐसें रणव्युत्पत्ती । सैन्य मारिलें मारूती ।
तंव संमुख जाला लंकापती । मरणानुवृत्तीं धाकत ॥ २०६ ॥
रावण धाकत निजचित्तें । जें सैन्य मारिलें हनुमंतें ।
आतां आल्या मजभोंवतें । कोण कपीतें निवारी ॥ २०७ ॥
अखयाकुमार केला पुरा । इंद्रजितासीं रणभेदरा ।
आणि रणीं मारिलें निशाचरां । कोण वानरा निवारी ॥ २०८ ॥
रावणा तुझें दाही माथे । कपि म्हणे म्या तोडावे हातें ।
परी मज वारिंले श्रीरघुनाथें । जें तुज निजहस्तें मारावें ॥ २०९ ॥
श्रीरामाची मर्यादारेखा । कपीस नुल्लंघवे देखा ।
तेणें वांचविलें दशमुखा । मरणोन्मुखा चुकवोनी ॥ २१० ॥
ऐसा गांजोनि दशानन । आणि जाळोनि लंकाभुवन ।
मग कपि परतला आपण । श्रीरामचरण वंदावया ॥ २११ ॥
सीतेसी घालोनि लोटांगण । आणि तिसी होवोनि अनन्यशरण ।
कपि परतला आपण । श्रीरामचरण वंदावया ॥ २१२ ॥
मस्तकमणि घेवोनि खूण । आणि खूण पुसोनि मुखवचने ।
कपि परतला आपण । श्रीरामचरण वंदावया ॥ २१३ ॥
मुखीं श्रीरामनामावृत्ती । आणि ह्रदयीं श्रीरामाची मूर्तीं ।
देह विकला श्रीरामकीर्ती । अनन्यभक्तीं हनुमंतें ॥ २१४ ॥
श्रीराम देखे सत्सर्वार्थीं । श्रीराम देखे सर्वांभूतीं ।
देह विकला श्रीरामकार्यार्थीं । अनन्यभक्तीं हनुमंतें ॥ २१५ ॥
श्रीराम देखे गतीची गती । श्रीराम देखे नयनस्वार्थीं ।
श्रीराम देखे सर्वां भूतीं । भक्त परमार्थीं हनुमंत ॥ २१६ ॥
श्रीरामरूप इंद्रितस्थिती । श्रीरामरूप नानावृत्ती ।
श्रीरामरूप स्वप्नासुषुप्ती । भक्त परमार्थी हनुमंत ॥ २१७ ॥
एकाजनार्दना शरण । जालें ब्रह्मलिखित संपूर्ण ।
पुढारें श्रीरामागमन । सेतुबंधन अवधारा ॥ २१८ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितहनुत्प्रतापकथनं नाम त्रयस्त्रिंशतितमोऽध्यायः ॥ ३३ ॥
॥ ओव्यां २१८ ॥ श्लोक – ॥ एवं संख्या २१८ ॥