Ramayan - Chapter 5 - Part 31 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 31

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 31

अध्याय 31

इंद्रजिताचा अपमान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लक्ष्मण पुढील वर्णन वाचतो

इंद्रजित युद्धा निघतां आवेशीं । असाळी उठिली विवशी ।
श्रीरामें निरसिलें तियेसी । अति उल्हासीं हनुमंत ॥ १ ॥
गजदळेंसीं अति उन्नद्ध । सैन्य देखोनियां सन्नद्ध ।
हनुमंतासी अति आल्हाद । श्रीराम गोविंद तुष्टला ॥ २ ॥
राक्षस मारावया अति अद्‌भुत । वनउपाडा पाहे सुमूहूर्त ।
इंद्रजित गांजोनियां तेथ । गर्वहत करीन मी ॥ ३ ॥
माझें पुरावावया मनोरथ । आजि तुष्टला श्रीरघुनाथ ।
इंद्रजित आला सैन्यासमवेत । हनुमान नाचत स्वानंदें ॥ ४ ॥
पुच्छ नाचतें पैं रणीं । मारोनियां वीरश्रेणी ।
पूजूं चामुंडा चवंडायणी । भूतां देऊं धणीं मांसाचीं ॥ ५ ॥
अखया कुमराची बोहणी । प्रथम केली म्या रणांगणीं ।
येथोनि वीरांचिया श्रेणी । मारीन रणांगणी रणमारें ॥ ६ ॥
हनुमान पुच्छासीं करी एकांत । जो जो आला रणाआंत ।
परतोनि न जावा नगराआंत । करावा घात अवघ्यांचा ॥ ७ ॥
जो जो येईल शरण । त्यासी येवों न द्यावें मरण ।
याचि नांवें दादुलेपण । येरां मर्दन रणमारें ॥ ८ ॥
पुच्छा आलिंगोनि पोटीं । हनुमंताची गोड गोष्टीं ।
पुच्छें कवळोनि सैन्यासंकटी । राक्षसकोटी मारीन ॥ ९ ॥
स्वामिवचन मानोनि शिरीं । पुच्छ रक्षण लंकाद्वारीं ।
मागें परतल्य निशाचरीं । महामारीं मारावया ॥ १० ॥
कपिपुच्छसंवादमेळीं । करावयां वीरां रणरांगोळी ।
युद्धानंदीं पिटीन टाळी । आतुर्बळी खवळलें ॥ ११ ॥
ऐकोनि कपिपुच्छसंवाद । वानरां वाढिवेचा आल्हाद ।
ऐकावया हनुमंतयुद्ध । अति सावध स्वानंदें ॥ १२ ॥
सुग्रीवें उठोनि आपण । धरिले लक्ष्मणाचे चरण ।
इंद्रजितहनुमंतांचें रण । सांग संपूर्ण वाचावें ॥ १३ ॥
उगे रहावया अवघे जण । घातली श्रीरामाची आण ।
वानर वीर सावधान । हनुमद्रण परिसावया ॥ १४ ॥
परिसावया युद्ध उद्‌भट । टवकारोनि नेत्रवाट ।
वळोनि पुच्छाचा पैं साट । वीर मर्कट सावध ॥ १५ ॥
कैसें पत्र वाचितों पुढें । लक्ष्मणाच्या तोंडाकडे ।
पहात ठेलीं पैं माकडें । युद्धचाडें श्रवणार्थी ॥ १६ ॥
परिसावया कपीचा पुरूषार्थ । अति उल्हासला श्रीरघुनाथ ।
लक्ष्मण वाची ब्रह्मलिखितार्थ । युद्धकंदनार्थ कपीचा ॥ १७ ॥
ऐसें ऐकतां वानरीं सकळीं । हर्षानंदे पिटीली टाळी ।
जें आमुचे ह्रदयकमळीं । तेंचि सुखमेळीं रामाच्या ॥ १८ ॥
ऐसियापरी वानरगण । ऐकावया हनुमद्रण ।
अवघे बैसले सावधान । पत्र वाचणें सौमित्रा ॥ १९ ॥

नंतर इंद्रजित युद्धासाठी पुढे येतो

ऐकोनि असाळीचा घात । कोपें खवळला इंद्रजित ।
कपीचा करावया घात । रथ त्वरित प्रेरिला ॥ २० ॥
तडक फुटला अति दुर्धर । निशाणें भेरी शृंगाकार ।
इंद्रजित आला गडगजर । रणतुरें वाजती ॥ २१ ॥
एकलें एक पैं वानर । त्यावरी येतां असंख्य वीर ।
चळीं कांपती महाशूर । दुर्धर मार कपीचा ॥ २२ ॥
जाणोनि सैन्याचा वृत्तांत । इंद्रजितें रथ प्रेरिला त्वरित ।
पुढें लक्षोनी हनुमंत । शर वर्षत पैं आला ॥ २३ ॥
धनुष्याचा करिता टणत्कार । दुमदुमिले गिरिकंदर ।
नादें कोंदलें अंबर । वीर दुर्धर इंद्रजित ॥ २४ ॥
कपीनें करितां भुभुःकार । खळबळिले सप्तसागर ।
ध्यानीं दचकला पंचवक्त्र । सुरासुर कांपती ॥ २५ ॥
नक्षत्रें तुटोनि पडती तळीं । तेंचि रणरंगी रणरांगोळी ।
भूतें कांपती कपिआरोळी । भद्रकाळी आश्वासीं ॥ २६ ॥
याचिया रणमाराआंत । अति कृपाळु हनुमंत ।
मेदमांसे करील तृप्त । भय निश्चित तुम्हां नाहीं ॥ २७ ॥

दोघांची तुलना व वर्णन :

ऐकतां कपिगिराजगजर । मरणोन्मुख निशाचर ।
खळबळिले रथ कुंजर । निधडे वीर कांपती ॥ २८ ॥
इंद्रजितें युद्धाचे कडाडीं । रथ प्रेरिला लवडसवडीं ।
कपि पुच्छाची उभवोन गुडी । नाचे आवडीं रणमारा ॥ २९ ॥
एक रावण कुमरराज । दुजा रामदूत वानर ।
येर राक्षसीं राक्षसेंद्र । दुजा कपींद्र कपिकुळीं ॥ ३० ॥
दोघे वीर अति प्रबळ । समान बळ समान शीळ ।
दोघे संग्रामकुशळ । दोघे चपळ रणमारा ॥ ३१ ॥

ते द्वंद्वयुद्ध पाहाण्यासाठी स्वर्गस्थ देवांचे आगमन

दोघें भिडतां महावीर । पाहूं आले सुरवर ।
सिद्ध गंधर्व विद्याधर । नाग किन्नर ऋषी पाहती ॥ ३२ ॥
सावित्रीसहित चतुर्मुख । उमेसहित पंचमुख ।
शक्तिसहित षण्मुख । आला देवमुख्य हव्यवाट ॥ ३३ ॥
शचीसहित सुरेंद्र । विकेटसहित वीरभद्र ।
सिद्धिबुद्धींसीं गणेंद्र । युद्धीं कपींद्र पाहूं आले ॥ ३४ ॥

उभयतांचे युद्ध चालू :

दोघे खवळलें महावीर । काळ कृतांत अति दुर्धर ।
दोघे जैसे काळाग्निरूद्र । युद्धा सत्वर मिसळले ॥ ३५ ॥
एक त्रिपुर एक शंकर । एक मदन एक शंकर ।
अनिरूद्ध बाणासुर । जेंवी सूकर हिरण्याक्ष ॥ ३६ ॥
एक गज एक केसरी । एक सर्प एक सर्पारी ।
वृत्र आणि वज्रधारी । ऐसियांपरी मिसळले ॥ ३७ ॥
एक मरू एक मुरारी । एक त्रिपुर एक त्रिपुरारी ।
सहस्त्रबाहु वज्रधारी । जेंवी नरहरि हिरण्यकशिपूसीं ॥ ३८ ॥
एकासीं रथाची रथगती । दुजिया निजपुच्छ सारथी ।
दोघे भिडती वीर्यार्थीं । रणव्युत्पत्तीं महामारें ॥ ३९ ॥
क्षणैक भिडती भूतळीं । क्षणैक भिडती नभोमंडळी ।
क्षणैक भिडती समुद्रजळीं । कुळाचळीं पैं दोघे ॥ ४० ॥
जैसी इंद्रजिताची पैं गती । त्याहूनि सवेग हनुमंती ।
न चले शक्ति ना छ्ळणोक्ती । रणीं मारूती नाटोपे ॥ ४१ ॥
इंद्रजित म्हणे दुर्धर घात । हनुमान विटावी फळें खात ।
कांखा पिटोनि घुलकावित । मग दावित आंगोठा ॥ ४२ ॥
इंद्रजित खवळोनि रणीं । वर्षलासें दुर्धर बाणीं ।
हनुमान वर्षला पाषाणीं । रणांगणीं गर्जोनियां ॥ ४३ ॥
बाणीं पाषाण करी तो कूट । पाषाणीं बाण होती पीठ ।
दोघां जणां समसकट । कडकडाट युद्धाचा ॥ ४४ ॥
विंधी सुवर्णपुंखें भाळीं । वानर हाणी सबळ शिळीं ।
भाळीं करोनि रांगोळी । मुकुटतळीं पाडिला ॥ ४५ ॥
इंद्रजित तेव्हा मुक्तकेशीं । शस्त्रें हाणी अति आवेशीं ।
जें तें तोडोनियां पुच्छीं । इंद्रजितासी गणीना ॥ ४६ ॥
रागें हाणी चेंडूचक्र । वानर हाणी शिळाशिखर ।
सवेग हाणितां तोमर । पर्वताग्रें टाकिलीं ॥ ४७ ॥
इंद्रजित वर्षे चक्रकांडे । वानरा वर्षे पर्वतधोंडें ।
उडोनि हाणितां पैं खांडें । ठोकिला तोंडीं चडकणा ॥ ४८ ॥

मारूतीच्या व पुच्छाच्या पराक्रमाने इंद्रजित व सैन्य जर्जर

इंद्रजित गांजिला पुरा । मुखीं सुटल्या रूधिरधारा ।
मारावया पैं वानरा । निर्वाण शस्त्रा घेतलें ॥ ४९ ॥
साटोपे हाणितां शूलशक्ती । जाजावला अति पर्वती ।
इंद्रजित थोंटावला चित्तीं । रणीं मारूती नाटोपे ॥ ५० ॥
यंत्रादि शस्त्रें हाणितां तवकें । वानरें ढिलाविला खडकें ।
फुटले इंद्रजिताचें धैर्यमडकें । पडिलें अटकें पुच्छाचें ॥ ५१ ॥
इंद्रजिताची रणव्युत्पत्ती । फावल्या रणीं लावी ख्याती ।
नाटोपतां पळे मागुती । पुच्छाप्रतीं तें न चाले ॥ ५२ ॥
सैन्यासभोंवतीं चहूंकडां । पडिला पुच्छाचा पैं वेढा ।
सरों नये मागां पुढां । वानरें वेढा लाविला ॥ ५३ ॥
मेघांकित इंद्रजितासी । पळोनि जावें मेघापाठीसीं ।
कपिपुच्छ तळपें आकाशीं । पळावयासी वाट नाहीं ॥ ५४ ॥
इंद्रजित हाणी निर्वाणघात । वानर वर्षे गिरिपर्वत ।
सैन्यासीं चकचुरी होत । अति आकांत महावीरां ॥ ५५ ॥
बोंब सुटली सैन्याआंत । इंद्रजित मेला किंवा जीत ।
वानरें केला पर्वतघात । रणीं हुंबत राक्षस ॥ ५६ ॥
वानर न धरवे बळें । जरी धरावा कपटमेळें ।
कपट निर्दळी लांगूळें । गोळांगुळें लाजविलें ॥ ५७ ॥
कपि नाटोपें शस्त्रघातीं । अस्त्रें शस्त्रें धाकें गळतीं ।
रणीं नाकळे मारूती । चिंतावर्तीं इंद्रजित ॥ ५८ ॥
न चले शस्त्रांस्त्रांची शक्ती । मागें न पळवे पुच्छहातीं ।
पुढें नाटोपे मारूती । चिंतावर्ती इंद्रजित ॥ ५९ ॥
चिंताग्रस्त देखोनि त्यातें । हनुमान म्हणे इंद्रजिताते ।
शिळा शिखरें न हाणी तूतें । न हाणीं पर्वतें भाक माझीं ॥ ६० ॥
इंद्रजित नांवाचा बडिवार । जिहीं बाणीं त्वां जिंतिला इंद्र ।
तिहीं बाणीं दंडोनि वानर । करीं गजर विजयाचा ॥ ६१ ॥
जया बाणांच्या कडाडीं । देव घातले बांधवडीं ।
ते बाणीं मज विंधोनि प्रौढी । उभारीं गुढी विजयाची ॥ ६२ ॥
ऐसें बोलतां वानर । इंद्रजित कोपला दुर्धर ।
निर्वाणशस्त्रांचा विविध मार । महाघोर मांडिला ॥ ६३ ॥
रणा पाडिल्या मारूती । मंत्रयुक्ती शरणशक्ती ।
इंद्रजित विंधी व्युत्पत्ती । कपिप्रयुक्ती ते ऐका ॥ ६४ ॥
इंद्रजित विंधी मारका शक्ती । हनुमानाचे रणव्युत्पत्ती ।
रामनामाच्या आवर्ती । निःशंकस्थिति वानर ॥ ६५ ॥

इंद्रजिताचेच बाण त्याच्यावरच परतविण्याचा हनुमंताचा विक्रम

निर्वाणबाण वीर मोकली । हनुमान वरचेवरी झेली ।
पुच्छें करोनि गटांगुळी । दावी गोळांगुळ वांकुल्या ॥ ६६ ॥
कोपें भडका उठोनि पोटीं । इंद्रजित वर्षे बाणकोटी ।
हनुमान सावधान दृष्टीं । शरवृष्टी झेलिली ॥ ६७ ॥
कवळोनियां त्याचे बाण । हनुमान गगनीं उसळोन ।
त्याचेंनि बाणें त्यासचि जाण । रणकंदन मांडिले ॥ ६८ ॥
कपीनें करितां बाणसंपात । इंद्रजित कासावीस होत ।
सैन्य पडिलें बहुत । जालें विपरीत संग्रामीं ॥ ६९ ॥
हनुमंतेसीं करितां रण । इंद्रजित भुलला संपूर्ण ।
आपुलें सैन्य मारी आपण । निर्वाणबाण वर्षोनी ॥ ७० ॥
धनुष्यबाण कपीपासीं । हे सामुग्रीं नाहीं त्यासीं ।
आलीसे भुली इंद्रजितासी । निजसैन्यासीं मारित ॥ ७१ ॥
माझे निर्वाणीचें बाण । वानरें कवळोनि संपूर्ण ।
आमच्या बाणी आम्हांसीं जाण । रणकंदन मांडिलें ॥ ७२ ॥
माझे सुटलिया शर । भेणें पळती सुरासुर ।
निःशंक निधडा हा वानर । बाण समग्र झेलिले ॥ ७३ ॥
आमचीं शस्त्रें आम्हांवरी । परतलीसे महामारी ।
आतां राक्षसां कायसी उरी । कपिकेसरी नाटोपे ॥ ७४ ॥
कपिपुच्छाची व्युत्पत्ती । धनुष्य भंगी हातीचे हातीं ।
रथ उपडितांचि क्षितीं । वारू सारथी निमाले ॥ ७५ ॥
इंद्रजित उडोनि सत्वर । तेणें सांडिला रहंवर ।
रणीं उठिला हाहाकार । राजकुमार मारिला ॥ ७६ ॥
रामनामाच्या निजशक्ती । निधडा निःशंक मारूती ।
इंद्रजितासी लाविली ख्याती । केला विरथी रणरंगीं ॥ ७७ ॥

सारथी व रथाचा संहार :

बाण मंत्र शक्तियुक्त । रणीं वानरें केले व्यर्थ ।
मारिला सारथी भंगिला रथ । तेणें धाकत इंद्रजित ॥ ७८ ॥
दिव्य अस्त्रें एकैक । वानरें केलीं निरर्थक ।
इंद्रजितें घेतला धाक । जीवीं धुकधुक लागली ॥ ७९ ॥
न चले शस्त्रांची खटपट । न चले मंत्रास्त्रनेट ।
न चले कपिपुच्छासी कपट । रणीं उद्‌भट मंत्रास्त्रनेट ।
न चले कपिपुच्छासीं कपट । रणीं उद्‌भट गांजिंले ॥ ८० ॥

नंतर उभयंताचे मल्लयुद्ध, इंद्रजित मूर्च्छापन्न :

खुंटली शस्त्रास्त्रांची युक्ती । वानर विचारीत चित्तीं ।
मल्लविद्येची व्युत्पत्ती । शरीरशक्ती पाहूं याची ॥ ८१ ॥
इंद्रजित पडला अति संकटीं । तव वानर झोंबिंनला कंठीं ।
दोघां झाली लटापटीं । धिंगामस्ती मिसळले ॥ ८२ ॥
उरींशिरीं आणि कोपरीं । तडवें हाणिती परस्परीं ।
कळा लावोनि भुजांतरीं । हाणिती उरीं चपटेघात ॥ ८३ ॥
सदा तूं सेविसी घृतक्षीर । आतुर्बळिया राजकुमार ।
मी वानर पालेखाईर । मजसमोर राहें पां ॥ ८४ ॥
ऐसें बोलोनि हनुमंत । मल्लव्युत्पत्ती हाणी लात ।
जे जंव चुकवी पिलंगत । तंव ठोकित तळवेनी ॥ ८५ ॥
जो जंव चुकावी आघात । तंव तळपोनियां हनुमंत ।
उरीं शिरीं ललाटीं घात । स्वयें हाणित अनुबंधें ॥ ८६ ॥
करितां मल्लविद्यामार । रणीं गांजिला निशाचर ।
भवंडोनियां सांडी चक्राकार । जीवें वानर न मारीच ॥ ८७ ॥
इंद्रजित रूधिर वमून । रणीं पडिला मूर्च्छापन्न ।
त्यासी न मारीच आपण । श्रीलक्ष्मण यासी हंता ॥ ८८ ॥
भूतळीं समस्त ऋषीश्वर । गगनीं सुरनर किन्नर ।
अवघे करिती जयजयकार । विजयी वानर श्रीरामें ॥ ८९ ॥
रणीं इंद्रजित मूर्च्छापन्न । स्वयें होवोनि सावधान ।
अतिशयेंसीं लज्जायमान । अति उद्विग्न इंद्रजित ॥ ९० ॥

इंद्रजिताचा उद्वेग व भीती :

हनुमंताची धैर्यवृत्ती । हनुमंताची शौर्यशक्ती ।
हनुमंताची संग्रामगती । अतर्क्य स्थिति तर्कवेना ॥ ९१ ॥
रणीं इंद्रातें जिंकोन । पावलों इंद्रजित अभिधान ।
वानरेंसीं करितां रण । तृणासमान मज केलें ॥ ९२ ॥
मी एक गाढा वीर सृष्टीं । ऐसा फुगारा होता पोटीं ।
कपिपुच्छें पुरवोनि पाठी । तृणासमान मज केलें ॥ ९३ ॥
जळो माझी वीर्यवृत्ती । जळो माझी शौर्यशक्ती ।
रणीं नाटोपे मारूती । कीर्ति अपकीर्ति मज माझी ॥ ९४ ॥
कोणी एखादी युक्ती । न चले वानरासीं निग्रहार्थीं ।
जळो माझी यश कीर्ती । चिंतावर्ती इंद्रजित ॥ ९५ ॥
माझ्या वरदाची वरदोक्ती । मारूं न शके मज मारूती ।
धरोनि नेलिया रामाप्रती । विटंबिती वानर ॥ ९६ ॥
रावणें आणिलें सीतेसी । बदला मज नेईन रामापासीं ।
तेथें करितां अपमानासीं । वानरांसी कोण वारी ॥ ९७ ॥
रावण होवोनि भिकारी । चोरोनि आणिली सीता सुंदरी ।
वानरें करोनि जुंझारी । मज निर्धारीं नेईल ॥ ९८ ॥
पूर्वी अंगद पाळण्यासीं । खेळणें बांधिलें रावणासी ।
पौलस्तीनें मागतां त्यासी । अपमानेंसीं सोडिलें ॥ ९९ ॥
मुंडोनियां खांडमिशी । मसी लावोनि दशमुखांसी ।
पांच पाट काढोनि शिरासीं । ऐसा लंकेसीं झुगारिला ॥ १०० ॥
पडतां लंकेचे चौबारां । हुरो लाविला दशशिरा ।
कोण आंवरी लहानथोरां । लंकेश्वरा अति लाज ॥ १०१ ॥
मज धरोनि नेल्यापाठीं । माझीही होईल ऐशीच गोष्टी ।
वानर नाटोपे जगजेठीं । पुच्छें पाठी पुरविली ॥ १०२ ॥
पुच्छीं बांधोनि तत्वतां । मज हनुमंतें धरोनि नेतां ।
धांवण्या कोणी न ये सर्वथा । परम चिंता इंद्रजिता ॥ १०३ ॥
अख्याच्या कैवारासीं । कोणा न येववे वानरापासीं ।
मज बांधोनि नेतां पुच्छीं । धाकें धांवण्यासी कोणी न ये ॥ १०४ ॥

इंद्रजित बिळात लपतो :

ऐसा धाक घेवोनि पोटीं । रणीं वानरा देवोनि पाठी ।
इंद्रजित पळे उठाउठीं । पुच्छासाठीं धाकोनी ॥ १०५ ॥
पळतां न पळवें पुढें । पडिलें पुच्छाचें बिरडें ।
तेथिले विवरामाजी दडे । बहु माकडे गांजिलें ॥ १०६ ॥
दुस्तर धाक घेवोनि मनीं । गुप्त विवर अशोकवनीं ।
इंद्रजित तेथें गेला पळोनी । अति दडोनी राहिला ॥ १०७ ॥

पुच्छाने केलेला सैन्यसंहार व सर्वत्र हाहाःकार

लागों न ये पळत्यापाठीं । हे तंव स्वधर्मयुद्धगोष्टी ।
इंद्रजिता मारणें नाहीं पोटीं । यालागीं पाठीं न लागेचि ॥ १०८ ॥
पुच्छ म्हणे गा कपिनाथा । कोंडोनि राखिलें सैन्या समस्ता ।
तूं भागलासी इंद्रजित दमितां । मज युद्धार्था दे आज्ञा ॥ १०९ ॥
हनुमान म्हणे तुझेनि बळें । म्यां महावीर मारिले खळ ।
आतां निर्दाळूं हें दळ । रणकल्लोळ विचारूनी ॥ ११० ॥
मी जातें तूं घालीं वैरण । ऐसें भरडूं राक्षससैन्य ।
डोळे जे उरती सघन । रणकंदन करूं यांसी ॥ १११ ॥
करावया सैन्यसंहार । कपि पुच्छासीं करोनि विचार ।
मग दिधला भुभुःकार । राक्षसभार खवळला ॥ ११२ ॥
येतां देखोनि हनुमंत । राक्षसवीर समस्त ।
होवोनियां एकभूत । शस्त्रें वर्षत समकाळ ॥ ११३ ॥
बाणीं खिळीलें पृथ्वीसीं । शस्त्रें न समाती आकाशीं ।
शस्त्रीं बुजिलें हनुमंतासीं । वीरीं राक्षसीं गर्जोनी ॥ ११४ ।
हनुमान युद्धीं निगरघट । राक्षस हाणिती भट सुभट ।
हाणितां शस्त्रें होती पीठ । अहा कटकट राक्षसां ॥ ११५ ॥
हनुमंत निधडा वीर । साहोनि त्यांचा शस्त्रसंभार ।
करावया सर्व संहार । रणीं वानर खवळला ॥ ११६ ॥
अश्वीं अश्वांतें मारित । गजीं गजा संहारित ।
रथीं रथांतें उपटित । वारूनि मत्त सारथींसी ॥ ११७ ॥
पायींचा पायीं रगडित । वीरें वीर पैं झोडित ।
ध्वज शस्त्रें छत्रें मोडित । रणीं पाडित महामारे ॥ ११८ ॥
हनुमान युद्ध करी भिन्न । पुच्छें करी भिन्न कंदन ।
तेंही ऐका सावधान । रणमर्दन पुच्छाचें ॥ ११९ ॥
शायशीं प्रयुतें मत्त हस्ती । पुच्छें उपटोनि मारूती ।
हस्तींच्या पिष्ट केल्या अस्थी । रणसमाप्ती गजदळा ॥ १२० ॥
विदारितां कुंभस्थळा । विखरा होय गजमुक्ताफळां ।
त्याचि रणरंगीं रंगमाळा । अति सोहळा युद्धाचा ॥ १२१ ॥
पुच्छ रिघोनि सैन्यातळीं । महावीरां बांधोनि मोळी ।
उपडी त्यासीं भूतळीं । करी रांगोळी तळिल्यांची ॥ १२२ ॥
अश्वतर खर उष्ट्र । पुच्छीं बांधोनि अपार ।
तळीं उभे अश्वसंभार । घायीं चकचूर करी त्यांचा ॥ १२३ ॥
कपिपुच्छाचा महामार । रणीं उठिला हाहाकार ।
येरीकडे हनुमान वीर । करी रणमार तो ऐका ॥ १२४ ॥
रागें हाणितां थापडी । वीर मारीत लक्षकोडी ।
कोट्यनुकोटी पायीं रगडी । मुष्टिपडिपाडीं असंख्य ॥ १२५ ॥
बहुत चिरफाळी नखाग्रीं । एकें मारिलीं जानुचक्रीं ।
जानुवा अपाना बहुतां मारी । अर्धचंद्री पैं एकें ॥ १२६ ॥
आंवळोनि उरावरी । वीर मारीत शतसहस्त्रीं ।
तडवे हाणोनि उपराउपरीं । लक्षांतरीं मारित ॥ १२७ ॥
देतां भुभुःकार प्रबळ । रणीं उठिला हलकल्लोळ ।
भेणेंकरोनि मूत्रमळ । प्राण तत्काळ सांडिला ॥ १२८ ॥
हनुमंताचे गिरागजरें । आक्रंदोनि वाजिकुंजरें ।
रणी निमालीं अपारें । लक्षांतरें वीरश्रेणीं ॥ १२९ ॥
भोंवता पुच्छाचा आंवर्त । मध्यें मारितो हनुमंत ।
जाला सैन्याचा अंत । आला प्राणांत राक्षसां ॥ १३० ॥
पुच्छें पुरविलीसें पाठी । होवों नेदी कुटुंबभेटी ।
लंका पाहूं नेदी दृष्टीं । जीवासाठी राक्षसां ॥ १३१ ॥
रणीं महामारी हनुमंत । पुच्छ पळों नेती नगरांत ।
जो तो लपे प्रेताआंत । मिथ्या मूर्च्छित वीरश्रेणीं ॥ १३२ ॥
एक घायें घाबरलीं वेडीं । एक नागवी उघडीं ।
एक पडिलीं उपडीं । मेलीं मढीं होवोनि ठेली ॥ १३३ ॥
झाडिला इंद्रजिताचा पादाडा । केला सैन्याचा नितोडा ।
रामनामे हनुमान गाढा । केला झगडा निजनेयें ॥ १३४ ॥
युद्ध झालें अति कर्कशीं । रणीं निर्दळिलें समस्तासीं ।
हाव न बाणे हनुमंतासीं । राक्षसांसी मारित ॥ १३५ ॥
रथ भंगिलें कोट्यनुकोटी । मारिल्या अश्वगजांच्या थाटी ।
छत्रें भंगिली तीं सृष्टीं । ध्वजा कोटी विखरल्या ॥ १३६ ॥
अशुद्ध वाहत गडगडाडीं । तेचि रणनदी गाढी ।
जालिया प्रेतांच्या दरडी । गजकरवडी महाग्राह ॥ १३७ ॥
तीर वाहती सपिच्छीं । तेचि मासे रणनदीसीं ।
वोडणें वाहती कासवें जैसीं । सर्प सपुच्छीं रणभाले ॥ १३८ ॥
मेद मांस अति दुर्गम । तेचि दोहीं तीरींचा कर्दम ।
विक्राळ शिसाळें विक्रम । सुसरी परम दोहीं भागीं ॥ १३९ ॥
मोक्षसुखाची सुरवाडी । रणनदी वाहे पूराडीं ।
सर्वस्वात्यागें जो घाली उडी । त्याचिये जोडी तो जोडे ॥ १४० ॥
ध्वजेंसीं वाहे रंहवरू । तेंचि शिडेंसहित तारूं ।
येथें तारक श्रीरामचंद्रू । परपारू पाववी ॥ १४१ ॥

भूतादि शंखिणी, डाखिनी देवतास आनंद :

उदो म्हणोनि भद्रकाळी । घेवोनि आली भूतावळी ।
खाती मांसाच्या वडवाळी । रूधिरांजुळी प्राशिती ॥ १४२ ॥
यक्षिणी बहुकाळाच्या वृत्ती । लाखोली काळिजें घेवोनि हाती ।
शंखिणी डाकिनी वाणें देती । मग भक्षिती स्वानंदें ॥ १४३ ॥
आनंदें नाचे क्षेत्रपाळ । शिरें चौडकें वाहे वेताळ ।
भूतें मिळोनिया सकळ । रणगोंधळ नाचती ॥ १४४ ॥
बहुतां दिवसांचे धरणें । दिधलें हनुमंतें पारणें ।
अवघे घालिती लोटांगणें । विजयी होणे रणरंगीं ॥ १४५ ॥
पीक पिकलें रणचत्वरीं । राक्षसदांतांच्या राशी थोरी ।
भूतें मोविती कुडवेंकरी । कौलकरी हनुमंत ॥ १४६ ॥
देव ब्राह्मण भैरवासी । बलुतें देती वेताळासी ।
खळेंदान तें भूतासी । महाकाळीसी राजभाग ॥ १४७ ॥
खळमातेरें मारकोसी । मेसको तिचे घरची दासी ।
वेसी पेंढी ते सटवाईसी । पाळभारियासीं काळिका ॥ १४८ ॥
अग्रिम पिकाची व्युत्पत्ती । विभागली स्वयें मारूती ।
पश्चिम धान्याची महाख्याती । श्रीरघुपती विभागील ॥ १४९ ॥

ते वर्णन ऐकून वानर सैन्यात हर्ष :

कुडवें दांत मेविजेती । ऐसी हनुमंते केली ख्याती ।
हर्षानंदें कपी गर्जती । स्वयें उपरमती आल्हादें ॥ १५० ॥
आमुचा हनुमान आतुर्बळी । रणीं राक्षसां केली रांगोळीं ।
वानरीं पिटोनियां टाळी । सुखसमेळीं नाचती ॥ १५१ ॥
सुग्रीव राजा तये वेळीं । आणोनियां द्रव्यांजुळी ।
हनुमंतावरी ओंवाळी । ह्रदयकमळीं आलिंगी ॥ १५२ ॥
तूं विसावा कपिकुळासी । सुखी केलें श्रीरामासी ।
वांचविलें वानरांसी । यश आम्हांसी तुझेनि ॥ १५३ ॥
स्फुरण आलें अंगदासी । खांदी घेवोनि हनुमंतासी ।
हरिखे नाचतां चौपासीं । कळिकाळासी विटावी ॥ १५४ ॥
धरिल्या हनुमंताचे चरण । कळिकाळ बापुडें तें कोण ।
करोनि हनुमंताचे स्फुरण । मरणा मारीन मी आतां ॥ १५५ ॥

श्रीरामांना आनंद व विस्मय, मारुतीला आलिंगन

हनुमंताचें अगाध चरित्र । ऐकोनियां ब्रह्मलिखित ।
श्रीराम होवोनि समस्त । आलिंगीत हनुमंता ॥ १५६ ॥
परमामृतें अभिषिंचन । नेत्रद्वारा रघुनंदन ।
हनुमंतासी करी आपण । स्वर्गीं सुरगण विस्मित ॥ १५७ ॥
कृपा करील रघुनंदन । हनुमंताचें भाग्य गहन ।
स्वमुखें वानी त्रिनयन । भेरी निशाण लावोनी ॥ १५८ ॥
आलिंगितां हनुमंता । राम विसरे श्रीरामता ।
कपि विसरे वानरता । एकात्मता आल्हाद ॥ १५९ ॥
सांडोनियां मीतूंपण । देवां भक्तां आलिंगन ।
खुंटला बोल तुटले मौन । सुखसंपन्न श्रीरामें ॥ १६० ॥
निबिड आणि नित्य निघोट । सुख कोंदले घनदाट ।
नाहीं आदि मध्य शेवट । न चले वाट वेदवादा ॥ १६१ ॥
जेथें मौनावल्या श्रुती । तेथें पावला मारूती ।
सार्थक हनुमंताची भक्ती । पावन कीर्ति तिहीं कीं ॥ १६२ ॥
स्वयें सुखावे रघुनंदन । ऐसें हनुमंताचें भजन ।
पायां लागे ब्रह्मज्ञान । एकाजनार्दना उपदेश ॥ १६३ ॥
नित्य श्रीरामस्मरण । नित्य श्रीरामनामभजन ।
एकाजनार्दना शरण । ब्रह्मज्ञान हरिभजनीं ॥ १६४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितइंद्रजित अपमानहनुमंत पराक्रमवर्णनं नाम एकत्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३१ ॥
॥ ओव्यां १६४ ॥ श्लोक ७ ॥ एवं संख्या १७१ ॥