Ramayan - Chapter 5 - Part 29 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 29

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 29

अध्याय 29

हनुमंतप्रतापाचे ब्रह्मलिखित वर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

हनुमंताने केलेले श्रीरामलक्ष्मण वर्णन

सीता पुसे श्रीरामज्ञान । ते सांगावया हनुमान जाण ।
गिळोनियां ज्ञानाज्ञान । जाला सावधान श्रीरामें ॥ १ ॥
सीतेनें पुसिली श्रीरामकथा । तेचि सांगावया स्वरूपता ।
उल्हास हनुमंताचे चित्ता । यथार्थता सांगत ॥ २ ॥
लक्ष्मणाचें निजलक्षण । ठाणमाण सगुणगुण ।
समूळ सांगेल आपण । सावधान अवधारा ॥ ३ ॥
सादर श्रवणार्थी स्वयें सीता । तेणें आल्हाद हनुमंता ।
सावधान मिळाल्या श्रोता । वदे वक्ता आल्हादें ॥ ४ ॥
श्रीरामरूप अति स्वरूप । रूपें जिंतला कंदर्प ।
परी तो रूपेंचि अरूप । चित्स्वरूप श्रीराम ॥ ५ ॥
राम राजीवलोचन । जगाचे नयना सादृश्य तें नयन ।
परी देखणा डोळेवीण । देखणेपण हें त्यांचे ॥ ६ ॥
दृश्य देखें हें तत्व गौण । श्रवणांत देखणे नयन ।
सर्वांगदेखणा रघुनंदन । डोळेविण देखत ॥ ७ ॥
कुंडलें वर्णिती साकार । एक म्हणती मकराकार ।
श्रवणें मावळती विकार । निर्विकार निजलेणें ॥ ८ ॥
श्रीरामचेनिं श्रवणें । श्रवणां होती निजभूषणें ।
श्रवणां श्रवणचि लेणें । श्रवण देखणें परब्रह्म ॥ ९ ॥
परमार्थाचें मुख्य बीक । निरपेक्षा तेंचि नासिक ।
तेणेंवीण ते निर्नासिक । कैंचे सुख सापेक्षा ॥ १० ॥
श्रीरामाची नासिकस्थिती । प्राण्या प्राणें नित्य विश्रांती ।
श्रीराम जाणे प्राणगती । गतीसीं विश्रांति श्रीराम ॥ ११ ॥
श्रीरामाचा मुखमयंक । नित्यानंदें निष्कळंक ।
ब्रह्मादि देवां सुखदायक । जीवशिवां सुख श्रीरामें ॥ १२ ॥
जीव शिव ते दोन्ही अधर । श्रीराम अधरीं जाले सधर ।
मिळणीं मिळाले एकाकार । शिवसुख साचार श्रीराम ॥ १३ ॥
श्रीराममुखीं दंतपंक्तीं । जेंवी आकारामाजी श्रुती ।
श्रुतीस्मृतींसी निजविश्रांती । श्रीराममूर्तिमुखचंद्र ॥ १४ ॥
श्रीरामाचें निजनिढळीं । सच्चिदानंद हेचि त्रिवळी ।
त्याचे ललाटभाग्य समेळीं । लोकीं सकळीं नांदिजे ॥ १५ ॥
प्रेमकेशरसमेळा । टिळक रेखिला पिंवळा ।
निर्धार अक्षता निढळा । राम प्रेमळां पढियंता ॥ १६ ॥
अहं मृग वधी निर्लोभेंसीं । काढिलें सोहं मृगनाभीसी ।
तेंही अर्पिलें श्रीरामासी । निजांगासी चर्चोनी ॥ १७ ॥
जन विजन विवंचून । साधिलें निजधैर्य चंदन ।
त्याचाही सुगंध काढून । उद्वर्तन श्रीरामा ॥ १८ ॥
विद्याअविद्याशक्तिपडळा । त्यजोनि काढिलें मुक्ताफळा ।
तेच श्रीरामाचें गळां । मुक्तामाळा शोभत ॥ १९ ॥
ॐकार तोचि कंबुकंठ । तेथोनि वेदा वाहती वाट ।
गर्जती विधिवादे उद्‌भट । होती प्रकट त्रिकांडीं ॥ २० ॥
त्वंपदा तत्पदा अतीत । ह्रदयीं पदक सदोदित ।
साधुचिद्रत्‍नीं रत्‍नखचित । लखलखित निजतेजें ॥ २१ ॥
म्हणती कांसें कसिला पीतांबर । श्रीरामकांसें चिदंबर ।
झांकी शून्यत्वाचें छिद्र । कांसे अच्छिद्र श्रीराम ॥ २२ ॥
श्रीरामकांस दृढ भारी । एकपत्‍नीव्रतधारी ।
कांसे लागल्यातें तारी । भवसागरीं तारक ॥ २३ ॥
श्रीराम आकळे सगळा । भक्तभावार्थ कटिमेखळा ।
क्षुद्रघंटिकाज्वाळमाळा । जालिया सकळा ऋद्धिसिद्धि ॥ २४ ॥
सूक्ष्म मध्याची रचना । अभिमान होता पंचानना ।
देखोनि श्रीराममध्यरचना । लाजोनि वना तो गेला ॥ २५ ॥
पहावया श्रीराममध्यासी । शाहाडे जडे मेखळेंसी ।
सर्वस्वें वेधले श्रीरामासीं । जावों वनासी विसरले ॥ २६ ॥
श्रीरामचरणांची ख्याती । जड पाषाण उद्धरती ।
श्रीराम सकळांची गती । गतींस सद्गति श्रीराम ॥ २७ ॥
श्रीरामचरणांचेनि भूषणें । वांकीनें वेदांसी आणिले उणें ।
ते तंव धरोनि ठेले मौने । हरिकीर्तन हें गर्जे ॥ २८ ॥
चहूं वाचांसी अगोचर । चरणीं गर्जती तोडर ।
श्रीराम चिदचिन्मात्र । परात्पर परब्रह्म ॥ २९ ॥
लक्षितां श्रीरामांचे मन ठाण । त्यासी ठेंगणें दिसे गगन ।
पाहतां श्रीरामाचें मन । पडिले मौन श्रुतिशास्त्रां ॥ ३० ॥
पाहतां श्रीरामाचे गुण । सगुणीं दिसे निर्गुण ।
रामनामें हरे त्रिगुण । निजनिर्गुण श्रीरामा ॥ ३१ ॥
लक्षितां श्रीरामलक्ष्मण । जो लक्षी तोचि सुलक्षण ।
ऐसा श्रीराम विचक्षण । लक्ष्यलक्षण त्या नाहीं ॥ ३२ ॥
श्रीराममुखींचीं अक्षरें । क्षराक्षरातीत परें ।
सभाग्य सेविती श्रवणद्वारें । सर्वांगीं सुभरे स्वानंद ॥ ३३ ॥
देखतां श्रीरामांचे श्रीमुख । फिके होय समाधिसुख ।
स्वप्नीं न देखिजे दुःख । हरिखें हरिख कोंदाटे ॥ ३४ ॥
कोंदाटल्या परब्रह्म । ब्रह्मरूप क्रियाकर्म ।
हरपले धर्माधर्म । जाला उपरम वेदवादा ॥ ३५ ॥
ऐसा श्रीराम नेटका । तैसाचि सौमित्र निजसखा ।
दोघां अभिन्नत्व देखा । भिन्न आवाका दिसताहे ॥ ३६ ॥
घालोनियां लोटांगण । तुज कुशळ कल्याण ।
स्वयें पुसे लक्ष्मण । पुसे कल्याण श्रीराम ॥ ३७ ॥
ऐसें हनुमंतें सांगतां । तटस्थ ठेली श्रीरामकांता ।
आपआपणा विसरे सीता । हनुमंताचेनि बोलें ॥ ३८ ॥
हनुमंताचे बोलाआंत । अवघा आणिला श्रीरघुनाथ ।
तेणें सीतेचा मनोरथ । सदोदित स्वानंदे ॥ ३९ ॥
हर्ष न माये पोटीं । होत हर्षाचिया कोटी ।
तेणें हर्षें सीता गोरटी । घाली मिठी हनुमंता ॥ ४० ॥
वानर वदे मनुष्यवाणी । श्रीरामकथा त्याचे वदनीं ।
ज्या कथेच्या निजश्रवणीं । भवबंधनीं निर्मुक्त ॥ ४१ ॥
ऐकोनि वानराच्या गोष्टी । सत्य श्रीरामीं जाली भेटी ।
निरसोनियां दुःखकोटी । ओतली सृष्टी सुखरूप ॥ ४२ ॥
हरिखाच्या लवलाह्या । स्वानंदें पसरोनि बाह्या ।
आलिंगिलें कपिराया । जेंवी कां माया प्रियपुत्रा ॥ ४३ ॥
सीतेसी सुख जालें गाढें । पुत्रसुख तृण त्यापुढें ।
हनुमंत वाडेंकोंडे । प्रेमपडिपाडें पढियंता ॥ ४४ ॥

त्यामुळे सीतेचा आनंद व तितकेच हनुमंताचे कौतुक

श्रीराम भर्ता लक्ष्मणा देवर । दोघे सुखरूप महावीर ।
ऎं ऐकतांचि उत्तर । सुख अपार मज जाले ॥ ४५ ॥
मज येथें सामासांपाठीं । श्रीरामाची कथा गोष्टी ।
अजि ऐकलीं तुझें वाक्पुटीं । धन्य सृष्टी हनुमंता ॥ ४६ ॥
मरतया अमृतपान । सुकतया मीना मिळे जीवन ।
दुकळलिया मिळे मिष्टान्न । तेंवी तुझें वचन हनुमंता ॥ ४७ ॥
श्रीरामस्वरूपाची कथा । जेंवीं वदलासी हनुमंता ।
ते मुखीं ब्रह्मसायुज्यता । नये तुकितां तुकेसीं ॥ ४८ ॥
श्रीरामकथाअनुवादन । तेणें मी जाले सुखसंपन्न ।
तुज मी वदतें वरदान । सावधान अवधारी ॥ ४९ ॥
हनुमंता होईं चिरंजीवी । तेंही जीवित्व ज्ञानानुभवी ।
नित्य नवा सुखसंभवी । श्रीरामपदवीवैभवें ॥ ५० ॥
तुज कळिकाळ कांपें चळीं । ऐसा होशील आतुर्बळी ।
यश पावसी भूमंडळी । नामसमेळीं श्रीरामें ॥ ५१ ॥
निरसोनियां ज्ञानाज्ञान । श्रीरामभजनें प्रबुद्ध प्राज्ञ ।
ज्ञेय मुके जाणपण । श्रीरामस्मरणाचेनि बळें ॥ ५२ ॥
शतयोजन सिंधु अगाध । तुवां लंघिला जैसा गोष्पद ।
त्यापुढें कायसें माझें वरद । प्रज्ञाप्रबुद्ध हनुमंत ॥ ५३ ॥
तुज म्हणो नये वानर । सुरासुरां तूं दुर्धर ।
धांडोळिलें लंकानगर । निशाचरें गांजोनी ॥ ५४ ॥
एकला एक हनुमंत । रावणाचे सभेआंत ।
करोनि राक्षसां आकांत । लंकानाथ गांजिला ॥ ५५ ॥
लंकेमाजी कडोविकडीं । गांजिल्या राक्षसांच्या कोडी ।
रावणाची सभा उघडी । केली रोकडी तुवां एकें ॥ ५६ ॥
एवढा करितांही आकांत । येथे आलासी हनुमंत ।
नाही कळलें लंकेआंत । ऐसा समर्थ तूं एक ॥ ५७ ॥
रावणमंदोदरीएकांत । तिचा ऐकोनि स्वप्नवृत्तांत ।
आलासी अशोकवनाआंत । अति समर्थ तूं एक ॥ ५८ ॥

श्रीरामास आणण्याची विनंती :

ऐसा प्रताप शिरोमणी । पावलासी अशोकवनीं ।
तूंचि जनक तूंचि जननी । राम घेवोनि शीघ्र यावें ॥ ५९ ॥
तुझी होईन मी दासी । चरण झाडीन निजकेशी ।
शीघ्र आणावें श्रीरामासीं । म्हणोनि पायांसी लागली ॥ ६० ॥
तुवां वंदिले माझें चरण । म्यां काय व्हावें उत्तीर्ण ।
आलें हनुमंतासीं स्फुरण । भेटवीन श्रीरामा ॥ ६१ ॥

हनुमंताची सीतेला पाठीवरून नेण्याची तयारी

तुज येवढी अवस्था । विलंब कायसा वो आतां ।
शीघ्र भेटवीन श्रीरघुनाथा । बैसें आतां मम पृष्ठीं ॥ ६२ ॥
माझे पृष्ठीं बैसल्या सीता । येचि क्षणीं श्रीरघुनाथा ।
तुज भेटवीन मी आतां । विलंब वृथा करूं नको ॥ ६३ ॥
शुद्धि सांगावया रघुनाथा । तुज मज सांडोनि जातां ।
मागें राक्षसीं केलिया घात । शुद्धि वृथा होय माझी ॥ ६४ ॥
येथें मजचि देखतां । रावण मारूं आला होता ।
दैवें चुकविलें अनर्था । सांडोनि जातां मज नये ॥ ६५ ॥
सांडोनि जाणे न घडे गोष्टी । वेगीं बैसें माझें पाठीं ।
करीन श्रीरामेंसीं भेटी । विकल्प पोटीं धरूं नको ॥ ६६ ॥
शूर्पणखा केली नकटी । तुझा राग तिच्या पोटीं ।
तुज मारील उठाउठीं । महा खोटी राक्षसीं ॥ ६७ ॥
लंकात्रिकूट महागिरी । उपडोनियां बळेंकरीं ।
एकें उड्डाणें समुद्रीं । नेईन परतीरीं जानकिये ॥ ६८ ॥
करोनि एकचि उड्डाण । तुज भेटवीन रामलक्ष्मण ।
वाहतों श्रीरामाची आण । करी आरोहण पृष्ठिभागीं ॥ ६९ ॥
तुज म्यां नेतां अति त्वरेंसीं । राक्षसवीरां महासुरांसी ।
वेगें न येववे मजपासीं । त्या मशकांसीं केंवी ढाके ॥ ७० ॥
आलिया इंद्रजित कुंभकर्ण । त्यासी रणी विभांडून ।
रावणातेंही गांजोन । भेटवीन श्रीरामा ॥ ७१ ॥
ब्रह्मलिखिताची व्युत्पत्ती । पूर्वसंवाद सीतामारूती ।
रामें परिसावया हनुमत्कीर्ती । नायुक्ती लिहिली असे ॥ ७२ ॥

अनेक अडचणी सीतेने सांगितल्या

सीता म्हणे अवधारीं । बैसतां तुझे पृष्ठीवरी ।
तुझ्या उड्डाणवेगेंकरीं । पडेन सागरीं हिसळोन ॥ ७३ ॥
पडतांचि सागराप्रती । मत्स्य मगर मज गिळिती ।
तेव्हां तूं पडसी आवर्तीं । केंवी मारूती म्यां यावें ॥ ७४ ॥
कां धांवणें आलिया लागवेगीं । तूं परतसी युद्धालांगीं ।
झगडा देतां युद्धभागीं । मी रणरंगीं पडेन ॥ ७५ ॥
मज पडताच क्षितीं । क्रोधें राक्षस मज मारिती ।
हेही न घडे गा युक्ती । केंवी मारूती म्यां यावें ॥ ७६ ॥
मज मारिलियापाठीं । जरी तुवां मारिल्या राक्षसकोटी ।
सुख नव्हे श्रीरामाच्या पोटीं । हे बुद्धि खोटी हनुमंता ॥ ७७ ॥
सीतें ऐकें सावध गोष्टी । मज न लगे युद्धअटाटी ।
माझें पुच्छ कोपल्यापाठीं । मारील कोटी राक्षसां ॥ ७८ ॥
तुज मी सुखीं राखीन स्वस्थ । माझें पुच्छ प्रतापवंत ।
करील राक्षसांचा घात । अर्बुदांत जरी आले ॥ ७९ ॥
सीता म्हणे तूं अल्प मारूती । तुझें पुच्छ तंव तें किती ।
केंवी राक्षसां लावील ख्याती । सत्यत्व चित्तीं मानेना ॥ ८० ॥

सीतेला मारूतीचे उत्तर :

सीते म्हणती वानर किती । कायसी पुच्छाची शक्ती ।
पाहें माझी स्वरूपस्थिती । म्हणोनि मारूती वाढला ॥ ८१ ॥
विंध्य मेरू आणि मंदार । त्याहून वाढला वानर ।
जैसा प्रलयकाळाग्निरूद्र । तैसा दुर्धर भासत ॥ ८२ ॥
सीते नेणसी माझें सत्व । पाहें माझें स्वरूप प्रभाव ।
देव दानव आणि मानव । राक्षस सर्व गांजीन ॥ ८३ ॥
माझें पुच्छा पाहें प्रतापवंत । राक्षसदळणीं अति समर्थ ।
सगळी लंका तुजसमवेत । निमेषार्धांत नेईन ॥ ८४ ॥
विकल्प सांडोनियां पोटीं । सीते बैस माझें पृष्ठीं ।
करीन श्रीरामासीं भेटीं । सुखसंतुष्टी स्वानंदें ॥ ८५ ॥

परपुरूषाचा स्पर्श वर्ज असे तिचे उत्तर :

परपुरूषीं आरोहण । हेंचि परिव्रतेसी दूषण ।
ऐकोनि सीतेचें वचन । पूर्वकथन कपि सांगे ॥ ८६ ॥
मारूती आपला सद्‌भाव तिला पटवितो :
राम सर्वार्थीं सर्वज्ञ । गर्भीं ब्रह्मचर्यकौपीन ।
माझी श्रीराम देखोन । धाडी आपण तुजपासीं ॥ ८७ ॥
माझी जाणोनि समूळ स्थिती । स्त्रियेंसी भेटी एकांती ।
ऐसें जाणोनि श्रीरघुपति । मज तुजप्रती धाडिलें ॥ ८८ ॥
तुझा विकल्प जावया जाण । निजमुद्रा देवोनि खूण ।
श्रीरामें धाडिलें आपण । अपत्य जाण मी तुझें ॥ ८९ ॥
आणिक सांगितली खूण । कैकेयी वल्कले परिधान ।
तुज नेसतां न येती जाण । श्रीरामें आपण नेसविलीं ॥ ९० ॥
खूण सांगतां हनुमंता । चित्ती चमत्कारली सीता ।
विकल्प सांडोनि तत्वतां । गुज एकांत पूसत ॥ ९१ ॥
श्रीरामें आणविलें शुद्धीसीं । किंवा आणविलें सीतेंसी ।
हें सत्य सांगें मजपासीं । त्या कायासी मी करीन ॥ ९२ ॥
श्रीरामें आणविली सीता । तरी आतांच येईन हनुमंता ।
ऐसें सीतेचे पुसतां । आला कपिनाथा गहिंवर ॥ ९३ ॥
आपुला दावोनि पुरूषार्थ । शीघ्र नेईन म्हणे हनुमंत ।
अगाध सीतेचें महिमासामर्थ्य । पुसे इत्यर्थ आज्ञेचा ॥ ९४ ॥
सावध अवधारीं वो माते । असत्य न बोले मी येथें ।
श्रीरामें आणविलें शुद्धीतें । हेचि निश्चितें रामाज्ञा ॥ ९५ ॥
सीता म्हणे हनुमंता । विलंब न करावा सर्वथा ।
शीघ्र जावोनियां आतां । श्रीरघुनाथा सांगावें ॥ ९६ ॥
मजवरी कृपा आहे हनुमंता । तरी जावोनि शीघ्रता ।
शुद्धि सांगावया श्रीरघुनाथा । चरणीं माथा ठेविला ॥ ९७ ॥
सीतेनें करितां नमस्कार । पायावरी लोळे वानर ।
अहो मी तुझें रंक किंकर । आज्ञाधर नेमस्त ॥ ९८ ॥
श्रीरामसेवक जो जो कोणी । तो मज मुकुटमणी ।
त्याचें चरणीं लोटांगणीं । सत्य वाणी हनुमंता ॥ ९९ ॥
ऐकतां सीतासद्‌भाववचन । आले हनुमंता स्फुरण ।
आतांचि देवों आपली खूण । शीघ्र गमन मी करितों ॥ १०० ॥
सत्य मानावया वानरा । खूण म्यां आणिली श्रीराममुद्रा ।
तूंही खूण दे श्रीरामचंद्रा । सत्य कपींद्रा मानावया ॥ १०१ ॥
ऐकतां कपीचें वचन । सीता खूण दे कळवळोन ।
कैसी दिधली खूण । सावधान अवधारा ॥ १०२ ॥

आपली खूण म्हणून सीता मारूतीला चूडामणी देते :

उकलोनियां निजवेणीं । खुणेसीं दिधला चूडामणी ।
खूण सांगितली मुखवचनीं । श्रीरामालागोनी सांगावया ॥ १०३ ॥
श्रीरामें स्वहस्तें स्वलीळा । उगाळोनि मनशिळा ।
माझें कपाळीं लाविला टिळा । गोळांगूळा हे खूण सांगें ॥ १०४ ॥
चित्रकूट पर्वतांत । काकें मज क्षतविक्षत ।
करितां कुचाग्रीं रक्ताक्त । तेणें रघुनाथ क्षोभला ॥ १०५ ॥
कोपें इषीकास्त्र सोडितां । काग तिहीं लोकीं पळतां ।
शिवशक्र यम विधाता । कोणी रक्षिता नव्हेचि ॥ १०६ ॥
नारदवचनें तो मागुता । शरण आला श्रीरघुनाथा ।
डाव्या डोळ्या करोनि घाता । होय रक्षिता श्रीराम ॥ १०७ ॥
ऐसीं दिव्यास्त्रें तुजपासीं । तरी कां मज उपेक्षिसी ।
मृगामागें धाडिलासी । तेणें रूसलासी श्रीरामा ॥ १०८ ॥
महापापीण मी सीता । स्वामीवरी केली सत्ता ।
तेणें आतुडले लंकानाथा । अधर्मता महादोषें ॥ १०९ ॥
लक्ष्मण ठेविला त्वां रक्षण । त्याचेंही म्यां केले छळण ।
ऐसी पापिणी मी जाणोन । सोडवण न करिसी ॥ ११० ॥
सकळ दोष श्रीरघुनाथा । क्षमा करीं कृपावंता ।
ऐसें हनुमंतासी सीता । अति दीनता अनुवादे ॥ १११ ॥

हनुमंत निघतेवेळी सीतेचा त्याच्याबरोबर सर्वांना निरोप

हनुमंतासी संभाषण । करून सीता दीनवदन ।
चिंतामणी ह्रदयीं धरोन । रामलक्ष्मण अति दुःखी ॥ ११२ ॥
श्रीरामासी आलें रुदन । अश्रुधारा स्त्रवती नयन ।
मस्तकमणी ह्रदयीं धरून । करीं स्फुंदन कृपाळु ॥ ११३ ॥
वारिज समुद्रमणी । युद्धीं इंद्रें संतोषोनी ।
दिधला दशरथालागोनी । नमुचि जैं रणीं पराभविला ॥ ११४ ॥
तो हा दशरथें महामणी । दिधला कौशल्ये प्रियपत्‍नी ।
तिनें दिधला सीतेलागोनी । प्रथमदर्शनीं सूनमुखीं ॥ ११५ ॥
मणि देतां हनुमंता । माता पिता प्रियकांता ।
तिघें भेटलीं तत्वतां । ऐसी मज चिंता होतसे ॥ ११६ ॥
मणि मजपासीं देतां । प्रत्यक्ष भेटलीसे सीता ।
ऐसा आल्हाद श्रीरघुनाथा । हनुमंता आलिंगी ॥ ११७ ॥
आलिंगूनी पुसे हनुमंता । पुढें काय वदली सीता ।
ते ते सांगे समूळ वार्ता । ऐके सादरता श्रीराम ॥ ११८ ॥
ऐसें पुसतां श्रीरघुनंदन । हनुमान घाली लोटांगण ।
पुढील सीताअनुवाद । वाची लक्ष्मण ब्रह्मलिखित ॥ ११९ ॥

सीतेची चिंता :

समुद्रलंघीं दिसे अभावो । स्वयें सीतेसीं हा संदेहो ।
तोचि हनुमंतासी पहाहो । स्वयमेव पूसत ॥ १२० ॥
ऐक बापा हनुमंता । माझें पोटीं परम चिंता ।
समुद्रलंघनीं तिघांची सत्ता । न देखें चौथा पुरूषार्थीं ॥ १२१ ॥
गरूड बायो कीं हनुमंता । दुर्धर समुद्र येरां समस्तां ।
नरवानरसह श्रीरघुनाथा । केंवी येथें आतां येववे ॥ १२२ ॥
नुल्लंघवें गा हा सागर । न आणवे वानरांचा भार ।
येवों न शकती राम सौमित्र । केंवी दशवक्त्रा मारवे ॥ १२३ ॥

हनुमंताचे उत्तर वा आश्वासन :

ऐकोंनि सीतेचें वचन । हनुमान जाला हास्यवदन ।
श्रीरामाचें नेणसी महिमान । बाणप्रेरण अनिवार ॥ १२४ ॥
श्रीरामभातां दुर्धर शर । बाणीं वाहोनि नरवानर ।
उतरोनियां परपार । निशाचर मारील ॥ १२५ ॥
निर्दळोनि निशाचर । विध्वंसोनि लंकापुर ।
मारोनियां दशशिर । तुझा उद्धार करील ॥ १२६ ॥
ऐसें उत्तर ऐकतां । सुखें उल्लासली सीता ।
वेगीं जाईं बां हनुमंता । शीघ्र रघुनाथा आणावया ॥ १२७ ॥

राक्षसांची कुरापात काढण्याची युक्ती :

न करितां युद्धकंदन । न करितां राक्षसांचे दमन ।
न करितां लंकादहन । उगा येथोन मी ना वचें ॥ १२८ ॥
मी काय आलों नाटिकार । मी नेऊं तें प्रतिउत्तर ।
लंकेमाजी करीन क्षेत्र । दशवक्त्र गांजीन ॥ १२९ ॥
राक्षसांचे बळ किती । किती सैन्य शस्त्रशक्ती ।
अवघी तुकीन मी मारूती । रणव्युत्पत्ती भिडेन ॥ १३० ॥
राक्षसांसी करावया झगडा । मुख्य मूळ वनउपाडा ।
हनुमान बुद्धिवंत गाढा । केलें पुढां तें ऐका ॥ १३१ ॥

हनुमंताची सीतेला विनंती :

ऐसें विचारी जंव आपण । सीता म्हणे करीं बा गमन ।
हनुमान घाली खालती मान । लज्जायमान बोलेना ॥ १३२ ॥
भेटावया श्रीरघुनाथा । उल्लास न देखे हनुमंता ।
ऐसी प्रबळ कोन चिंता । ते मज तत्वतां सांगावी ॥ १३३ ॥
माझें सांगतां निजवृत्तांता । तुज लागेल अति चिंता ।
शोध तुझे हो न करितां । अन्नपानता मज नाहीं ॥ १३४ ॥
नाहीं अन्न नाहीं जीवन । क्षुधेनें जावों पाहे प्राण ।
न करवे समुद्रलंघन । अति उद्विग्न तेणेंसीं ॥ १३५ ॥
कपीचें वचन ऐकतां । गहिवरें रूदन करी सीता ।
महापापीण मी तत्वतां । धाडीं हनुमंता भुकेलें ॥ १३६ ॥
हें माझें करकंकण । लंकेमाजी जावोनि आपण ।
घेवोनि चतुर्विधा अन्न । करीं भोजन यथेष्ट ॥ १३७ ॥
हनुमान पुसे सीतेसी । अन्नाची चव आहे कैसी ।
सीता म्हणे हनुमंतासी । काय तुम्हांसी भक्षणें ॥ १३८ ॥
आम्ही वानर वनचर । वनवासीं निरंतर ।
नित्य वनफळांचा आहार । अन्नमात्र स्पर्शेना ॥ १३९ ॥
माझें मोडोनि कंकण । लंकेमाजीं फळें संपूर्ण ।
आवडे तें घेवोनि आपण । फळभोजन करीं बापा ॥ १४० ॥

फळे खाण्याची अनुमती :

ऐक वो माते माझें शीळ । मी तंव स्वयंपाकी केवळ ।
ज्यासी मनुष्याचा विटाळ । तें मज फळ अपवित्र ॥ १४१ ॥
हाटवटींचें विक्रित अन्न । जेंवी न घेती सुब्राह्मण ।
तैशींच फळें विक्रीत जाण । मजलागून अपवित्र ॥ १४२ ॥
ऐकोनि कपीचिया मता । साशंकित जाली सीता ।
हनुमंतासी आहारार्था । काय म्यां आतां अर्पावें ॥ १४३ ॥
याचि अशोकवनाआंत । फळें आहेत अत्यद्‌भुत ।
यांसी लावितांचि हात । करितील घात राक्षस ॥ १४४ ॥
कपे तुझा करितील घात । तोच माझा प्राणांत ।
साधिला प्रयत्‍न होय व्यर्थ । स्वामिकार्यार्थ नासेल ॥ १४५ ॥
हनुमान म्हणे असो वृत्तांत । जाईन भुकेला कुंथत ।
क्षुधा नव्हे हा कल्पांत । आला प्राणांत मजलागीं ॥ १४६ ॥
बोलतां बोलतां गेला चाचरीं । मूर्च्छित पडला धरणीवरी ।
दोहीं डोळां लाविली चंद्री । सीता सुंदरी गजबजली ॥ १४७ ॥
थापटोनिया हनुमंता । स्वयें सावध करी सीता ।
कोणासही कळों न देता । गुप्त आहारार्था तूं सेवीं ॥ १४८ ॥
जोंवरी होय क्षुधाहरण । पडलीं फळें खांवी आपण ।
घालितें श्रीरामाची आण । फळें तोडोनि न खावीं ॥ १४९ ॥
ऐकोनि सीतेचे वचनासी । हनुमान खाजवी दोन्ही कुसी ।
मग आला वनवृक्षांपासीं । निजमानसीं विचारी ॥ १५० ॥
सीतावचन अति प्रमाण । पाळोनि श्रीरामाची आण ।
वृक्ष उपटोनि झोडीन । फळें खाईन पडलीं तीं ॥ १५१ ॥

श्रीरामांचे कौतुक

ऐकोन हनुमंताचें वृत्त । श्रीराम गदगदां हांसत ।
सुग्रीवादि कपि समस्त । स्वयें हांसत सौमित्र ॥ १५२ ॥
श्रीराम म्हणे गा सौमित्रा । कपीनें दमिलें निशाचरां ।
लंकेमाजी केलें क्षेत्रा । त्या ब्रह्मपत्रा वाचीं वेगी ॥ १५३ ॥
कैचें विध्वंसिलें वन । कैसें केलें राक्षसकंदन ।
इंद्रजित गांजिला दशानन । ब्रह्मलेखन तें वाचीं ॥ १५४ ॥
एकाजनार्दना शरण । हनुमंताचें लंकादहन ।
श्रोता श्रीराम सावधान । वक्ता लक्ष्मण तें ऐका ॥ १५५ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमत्प्रतापब्रह्मलेखनपत्रवर्णनं नाम एकोनत्रिंशत्तमोऽध्यायः ॥ २९ ॥
॥ ओव्यां १५५ ॥ श्लोक २६ ॥ एवं संख्या १८१ ॥