Ramayan - Chapter 5 - Part 28 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 28

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 28

अध्याय 28

ब्रह्मलिखित सीता-मारूती संवादकथन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पुढील वृत्तांत वाचन

मागील प्रसंग संपतां । अंगदसुग्रीवजांबवंतां ।
लक्ष्मणेंसीं श्रीरघुनाथा । घेवोनि उडतां हनुमंत ॥ १ ॥
हनुमंताची परम कीर्ती । गगनीं सुरवर वानिती ।
भूतळीं वाखाणिती जुत्पती । वानीं कपिकिर्तीं श्रीराम ॥ २ ॥
आवडीं म्हणे श्रीरघुनाथ । सौमित्रां वाचीं ब्रह्मलिखित ।
मुद्रिका देवोनि हनुमंत । करी एकांत सीतेसीं ॥ ३ ॥
धन्य ब्रह्मयाचें ब्रह्मपत्र । धन्य श्रवणार्थी श्रीरामचंद्र ।
धन्य वाचक सौमित्र । धन्य कपींद्र कपिकुळीं ॥ ४ ॥

श्रीराममुद्रेमुळे झालेली सीतेची अवस्था

मुद्रिकातेजदेदीप्यता । श्रीराम आला मानी सीता ।
तेणें होवोनि सलज्जता । सप्रेमता घाबरी ॥ ५ ॥
सावधान पाहतां देखा । पुढें देखे आंगोळिका ।
जाणोनि श्रीराममुद्रिका । सुखोन्मुखा जानकी ॥ ६ ॥

सीतेचे भाषण :

पहिलें वंदिली निढळीं । मग आलिंगिली ह्रदयकमळीं ।
स्वानंदे चुंबी जनकबाळी । सुखें वेल्हाळी आलीसी ॥ ७ ॥
म्हणोनि घाली लोटांगण । भागलीस दूराभिगमन ।
तुझें करीन चरणक्षाळण । तीर्थसेवन हितार्थ ॥ ८ ॥
तुझें सेवितां तीर्थचरण । लक्ष्मणासी केलें म्या छळण ।
त्या पापाचें निर्दाळण । प्राप्ती संपूर्ण श्रीरामीं ॥ ९ ॥
तूं तंव सखी श्रीराममुद्रा । घालूं शेज करिसी निद्रा ।
श्रमलीस उतरतां समुद्रा । मार्गीं गिरिवरां लंघिता ॥ १० ॥
मी वामांगीं तूं दक्षिणांगीं साजणीं । आम्ही दोघी स्वानंदभगिनी ।
श्रीरामाची समूळ कहाणी । कृपा करोनी मज सांगें ॥ ११ ॥
नाठवे सचेतन अचेतन । सद्‌गुरूभक्तिप्रेम पूर्ण ।
तेणें हनुमंता आलें रुदन । धन्य भजन सीतेचें ॥ १२ ॥
आम्ही म्हणवितों श्रीरामभक्त । हें प्रेम नाहीं आम्हांआंत ।
जानकी सप्रेम सदोदित । हीस रघुनाथ तुष्टला ॥ १३ ॥
सगुण निर्गुण श्रीरामभक्त । जो वंदी तो नित्यमुक्त ।
जो निंदी त्यासी नरकपात । वदे हनुमंत वेदार्थ ॥ १४ ॥
मुद्रिका देखतांचि दृष्टीं । अत्यादरें मानी गोरटी ।
तिसी पुसे सप्रेम गोष्टी । राम जगजेठी काय करितो ॥ १५ ॥
स्वस्थ श्रीरामलक्ष्मण । तरीं कां माझी सोडवण ।
करावया न करिती आंगवण । दुर्धर बाण असतांही ॥ १६ ॥
श्रीरामभातां दुर्धर शर । समुद्र शोषोनि समग्र ।
निवटोनियां दशशिर । सीता सत्वर सोडविता ॥ १७ ॥
त्यांही दोघीं त्यजिली सृष्टी । हे न सांगवे दुःखकोटी ।
म्हणोनि सुचली मौननिष्ठी । सज्ञान मोठी राममुद्रा ॥ १८ ॥
श्रीराम गेला परलोकता । मौनमुद्रा सांगे वार्ता ।
तो जरी येथें स्वस्थ असता । मज सोडवितां निमेषार्धें ॥ १९ ॥
श्रीरामचा एकैक बाण । करील त्रैलोक्याचें कंदन ।
त्यापुढें कायसें दशानन । गेला त्यजोन परलोका ॥ २० ॥
सखा छळिला म्या लक्ष्मण । तेणें क्षोभला रघुनंदन ।
मज उदधींत सांडोन । गेले दोघे जण परलोका ॥ २१ ॥
मुद्रिके सांग सत्य गोष्टी । मज रावणें हरिल्यापाठीं ।
दोघें येवोनि पंचवटीं । अति संकटीं काय केलें ॥ २२ ॥
मुद्रिका नेदी प्रतिवचन । तुझ्या मौनाचें हेंचि कारण ।
माझेनि विरहें दोघे जण । रामलक्ष्मण निमाले ॥ २३ ॥
किंवा लोकलज्जे भ्याले । दोघे विष घेवोनि निमाले ।
माझेनि दुःखे दुखावले । मूर्च्छेसवें गेले प्राण त्यांचे ॥ २४ ॥
माझेनि दुःखें दुःख प्रबळ । त्यजिला आहार फळमूळ जळ ।
दोघां भरोनियां तरळ । प्रबळ तत्काळ सोडिले ॥ २५ ॥
सीता सीता आक्रंदोनी । प्राण सांडिला दोघीं जणीं ।
नातरीं मागतां पाणीं पाणीं । ताहना फुटोनी निमालें ॥ २६ ॥
मज न देखतां पर्णकुटीं । दोघे जाले कडेलोटी ।
अथवा शस्त्रें घातलीं पोटीं । केला कंठी गळफांस ॥ २७ ॥
पर्वतकड प्रचंड धोंडीं । दोघीं घातल्या मुरकुंडी ।
तेथें वाळोनि जाल्या कर्वडी । दुःखा निर्वडी निमाले ॥ २८ ॥
कीं विजनीं मूर्च्छित पडिलें । वृकव्याघ्रीं तें फाडिले ।
सिंहशार्दूळीं विभांडिले । किंवा रगडिले वनगजीं ॥ २९ ॥
ते तंव वीर दोघें निधडे । सिंह शार्दूळ ते बापुडे ।
अथवा रावणें केलें कुडें । छळोनि रोकडे मारिले ॥ ३० ॥
विश्वामित्रायागाप्रती । श्रीराम सावध अहोरात्रीं ।
करितां सुबाहु छळणोक्ती । त्यासी रघुपतीनें मारिले ॥ ३१ ॥
छळावया श्रीरामलक्ष्मण । शूर्पणखा सुंदर पूर्ण ।
तिचें केलें विटंबण । न चले छळण श्रीरामीं ॥ ३२ ॥
श्रीराम सहजेंचि उदासी । रावणें हरितां सीतेसी ।
न्यस्तशस्त्र जाला सन्यासी । वनवासीं वनस्थ ॥ ३३ ॥
अथवा आणिक आहे गुज । श्रीराम आत्माराम सहज ।
रावणें हरितांचि मज । समाधिशेजे प्रवेशला ॥ ३४ ॥
जन्म मरण आधि व्याधी । जेथें शमती त्रिशुद्धी ।
श्रीराम सेवी ते समाधी । देहउपाधि जेथें नाहीं ॥ ३५ ॥
देहबुद्धीचिया माथां । मी राम सीता कांता ।
हेंही नाठवे रघुनाथा । समाधिअवस्था समपदीं ॥ ३६ ॥
समाधिसुखी स्वभावतां । कैंचा राम कैंची सीता ।
रावणें हरिली माझी कांता । हेंही रघुनाथा नाठवे ॥ ३७ ॥
समाधिसेजे सुखसंपन्न । मिथ्या देहादि प्रपंचभान ।
मिथ्या राम मिथ्या रावण । धांवण्या कोण धांवेल ॥ ३८ ॥
ऐसें ऐकतां ब्रह्मलिखित । श्रीराम जाला समाधिस्थ ।
सर्वेंद्रियें उपरमत । कर्तव्यार्थ नाठवे ॥ ३९ ॥

त्याचे वचनाचा राम व सर्व श्रोत्यांवर झालेला परिणाम

जें लिहिलें ब्रह्मलिखितीं । जें बोलिली सीता सती ।
तेंचि जाला रघुपती । स्वरूपस्थिती स्वभावें ॥ ४० ॥
श्रीराम परब्रह्ममूर्ती । ब्रह्मा लिखित ऐकोनि स्थिती ।
स्वयें पावला उपरती । स्वरूपस्थिती स्वभावें ॥ ४१ ॥
नेत्र जाले अर्धोन्मीलित । प्राण पांगुळला जेथींचा तेथ ।
चित्त चैतन्यीं समरसित । जाला सदोदित परब्रह्म ॥ ४२ ॥
ब्रह्मस्थितीचें लक्षण । जेथें नाहीं मीतूंपण ।
कैंचा राम सीता रावण । आपणा आपण विसरला ॥ ४३ ॥
लक्ष्मणा खुंटली वाचाशक्ती । स्वरूपीं सुलीन रघुपती ।
सुग्रीव कळवळिला कपिपती । तळमळती वानर ॥ ४४ ॥
लक्ष्मणा खुंटली वाचासिद्धी । श्रीराम पावला समाधी ।
सीता ना सुटे लंकावबंदी । कार्य त्रिशुद्धी नासलें ॥ ४५ ॥
हनुमंतें धरिलें दृढ मौन । कथा ऐके कर जोडून ।
देखोनि समाधिविंदान । हनुमान संपूर्ण खवळला ॥ ४६ ॥
श्रीरामा समाधि ते उपाधी । मज कळलेंसें त्रिशुद्धी ।
हनुमंतें कैसी केली बुद्धि । विंदानविधी अवधारा ॥ ४७ ॥
म्यां आणिली सीताशुद्धी । मिथ्या होऊं पाहे त्रिशुद्धीं ।
पुढील खुंटली कार्यसिद्धी । रामसमाधि भली नव्हे ॥ ४८ ॥
म्यां सीतेसी दिधली भाक । कीं येथें आणीन रघुकुळटिळक ।
कायसें बापुडें समाधिसुख । माझी भाक नव्हे मिथ्या ॥ ४९ ॥
समाधिव्युत्थापनापरता । श्रीराम स्वयें स्वभावता ।
त्यासी कायसी समाधिअवस्था । सावध आतां मी करीन ॥ ५० ॥
श्रीरामस्वरूप स्थिती । सकळ जाणें स्वयें मारूती ।
प्रबोधावया रघुपती । केली युक्ती ते ऐका ॥ ५१ ॥
स्थूळ लिंग आणि कारण । तिहीं वेगळा होऊन ।
जेथें नाहीं मीतूंपण । तेथें आपण प्रवेशे ॥ ५२ ॥
महाकारणीं प्रवेशोन । प्रबोधावया रघुनंदन ।
वाचेवीण अनुवादोन । गुरूवचन प्ररिपादी ॥ ५३ ॥
श्लोक श्रीसद्‌गुरू वशिष्ठाचा । हनुमान वदे पांचव्या वाचा ।
तोडावया बंध समाधीचा । अर्थ तेथींचा अवधारा ॥ ५४ ॥
हातींचें हातीं घेतां वस्तु । शब्देंवीण अर्थ प्राप्तु ।
पांचवे वाचेचा हा अर्थु । श्रोता समर्थु हा राम ॥ ५५ ॥
अंतरीं अद्वैत एक । बाह्य स्वधर्में पाळी लोक ।
अंतरीं निजबोध चोख । वेदविवेक बाह्य पाळीं ॥ ५६ ॥
अंतरीं सर्वस्वाचा त्याग । बाह्यावतार भोगीं भोग ।
सांडोनि समाधिनिजयोग । उद्धरीं जग निजकीर्ती ॥ ५७ ॥
सांडोनि समाधिसांकडी । तोडीं नवग्रहांची बेडी ।
सोडी देवांची बांधवडी । उभारीं गुढी रामराजा ॥ ५८ ॥
सद्‌गुरू वसिष्ठाचें वचन । ऐकोनियां रघुनंदन ।
स्वयें होवोनि सावधान । दिधलें आलिंगना हनुमंता ॥ ५९ ॥
श्रीरामचें जें ह्रद्गत । हनुमान जाणे भगवद्‌भक्त ।
हनुमंताचा भावार्थ । जाणे रघुनाथ ह्रदयस्थ ॥ ६० ॥
कपीसी दिधलें आलिंगन । श्रीराम जाला सावधान ।
देवा भक्तांचें अनन्यपण । अगम्य जाण श्रुतिशास्त्रां ॥ ६१ ॥
श्रीराम अनन्यभक्त सीता । अनन्य भक्ति हनुमंता ।
दोहींची ऐकावया कथा । श्रीरघुनाथा आल्हाद ॥ ६२ ॥

सीतेचा मुद्रिकेशी संवाद

ब्रह्मलिखिताच्या अर्था । ऐकावया आवडी रघुनाथा ।
अशोकवनीं वदली सीता । ते कथा अति गोड ॥ ६३ ॥
श्रीराममुद्रा अचेतन । तिसी देवोनि अति सन्मान ।
घालोनियां लोटांगण । सीता आपण पुसत ॥ ६४ ॥
कैसेनि चालवलें वाटा । कैसेनि उल्लंघिलें घाटा ।
समुद्र तरणीं दुस्तर मोठा । केंवी परतटा आलीस ॥ ६५ ॥
तुज आणिलें रघुपतीं । किंवा आणिकाचे संगती ।
तें तें सांगें मजप्रती । सीता सती पूसत ॥ ६६ ॥
रामनाम तुजवरी । अटक नाहीं चराचरीं ।
सुखें तरसीं भवसागरीं । धन्य संसारी तूं राममुद्रें ॥ ६७ ॥
श्रीराममुद्रा ज्यासी लागे । तो संसारीं तरे सर्वांगें ।
हें तुज पुसणेंचि नलगे । कृपानुरागें आलीसी ॥ ६८ ॥
मी वामांगीं तूं दक्षिणांगिनी । आम्ही तुम्ही दोघी बहिणी ।
लगबगेसीं मजलागोनी । कृपानुरागिणी आलीसी ॥ ६९ ॥
माझी कृपा तुझें पोटीं । तरी सांग पां गुह्य गोष्टी ।
मजमागे पंचवटीं । रामें संकटीं काय केलें ॥ ७० ॥

सीतेची मूर्च्छा पाहून हनुमंतावर परिणाम

मुद्रिका नेदी प्रतिवचन । तुझे मौनाचें कारण ।
निमालें रामलक्ष्मण । न सांगोन सांगसी ॥ ७१ ॥
श्रीराम गेला निजधामासी । तुज धाडिले सांगावयासी ।
मीही त्यजीन या देहासी । कांस सरसी तिणें केली ॥ ७२ ॥
साक्ष करूनि मुद्रिकेसी । मुद्रा धरोनि ह्रदयासीं ।
आठवितां श्रीरामासीं । पडें भूमीसीं मूर्च्छित ॥ ७३ ॥
सीता पडतांचि मूर्च्छित । गजबजिला हनुमंत ।
श्रीरामविरहे सीता संतप्त । प्राण निश्चित त्यागील ॥ ७४ ॥
देखतां श्रीराममुद्रेसीं । राम निमाला वनवासीं ।
धरोनि निश्चयों मानसीं । निजदेहासीं त्यागील ॥ ७५ ॥
येथें निमालिया सीता । काय मुख दाखवूं रघुनाथा ।
तुझी मरोनियां कांता । आलों मी आतां पुरूषार्थी ॥ ७६ ॥
करोनि समुद्रोल्लंघन । मीचि सीतेसी झालों विघ्न ।
श्रीराममुद्रा स्वयें टाकोन । घेतला प्राण सीतेचा ॥ ७७ ॥
श्रीरामें मुद्रां दिधली खूण । ते म्यां आणोनि आपण ।
घेतला सीतेचा प्राण । अति उद्विग्न हनुमंत ॥ ७८ ॥
खूण दावोनि आणावी सीता । शेखीं खुणेनें मारिली तत्वतां ।
कैसेनि भेटों श्रीरघुनाथा । प्राणांतावस्था हनुमंतीं ॥ ७९ ॥
मुद्रिका टाकिली उठाउठीं । हेचि बुद्धी म्यां केली खोटीं ।
श्रीराममुद्राविरहासाठीं । सीता गोरटी निमाली ॥ ८० ॥
मज येवोनि लंकेआंत । ना सीता ना रघुनाथ ।
ऐसा ओढवला अनर्थ । तेणें हनुमंत अति दुःखी ॥ ८१ ॥
माझेनि निमाली पैं सीता । अपेश बैसलें माझे माथा ।
काय करूं रें रघुनाथा । बुद्धिदाता मज होई ॥ ८२ ॥
श्रीरामा मी तुझें अति दीन । माझे माथां बैसलें विघ्न ।
तूं कृपाळू रघुनंदन । नित्य निर्विघ्न मज करीं ॥ ८३ ॥
आदरें स्मरतां रघुनंदन । बुद्धि आठवली अति निर्विघ्न ।
सीता व्हावया सावधान । श्रीरामकीर्तन करावें ॥ ८४ ॥
श्रीरामकीर्ती हनुमंत । आदरें गाय वृक्षाआंत ।
जेणें जोडे स्वार्थ परमार्थ । तैसा अर्थ अनुवादे ॥ ८५ ॥

हनुमंताचे रामचरित्र संकीर्तन

ऐकतां श्रीराम कीर्तन । सीता होय सावधान ।
तैसें हनुमंतें आपण । हरिकीर्तन मांडिलें ॥ ८६ ॥
कौसल्यागर्भी गर्भातीत । दाशरथि श्रीरघुनाथ ।
परब्रह्म मूर्तिमंत । सूर्यवंशांत अवतरला ॥ ८७ ॥
श्रीराम पुरूष सीता प्रकृती । राम चैतन्य सीता चिच्छक्ती ।
श्रीराम धैर्य सीता धृती । धन्य जगतीं अवतार ॥ ८८ ॥
गोडी आणि साखर पाहतां । दों नामीं एकचि वस्तुता ।
तेंवी श्रीराम आणि सीता । एकात्मता अवतार ॥ ८९ ॥
श्रीरामाचे आचरित । गुरूपितृआज्ञे नित्य विक्रीत ।
ब्राह्मणांचा अनन्य भक्त । सुरसाह्यार्थ अवतार ॥ ९० ॥
कैकेयीवरदें श्रीदशरथें । श्रीरामा धाडिलें दंडकारण्यातें ।
सखा लक्ष्मण सांगातें । निघे रघुनाथ वनवासा ॥ ९१ ॥
वनवास गंगातटीं । वसतिस्थान पंचवटीं ।
राम राहिला जगजेठी । सीता गोरटी समवेत ॥ ९२ ॥
शूर्पणखा विटंबून । मारिले त्रिशिरा खर दूषण ।
श्रीरामें घेवोनि जनस्थान । दिधलें दान द्विजांसीं ॥ ९३ ॥
मृगकंचुकीस लोभतां । मृगामागें पाठविलें रघुनाथा ।
छळोनि सौमित्रा दवडितां । हरिली सीता रावणें ॥ ९४ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । करितां सीतेचें गवेषण ।
जटायुरावणाचें रण । दोघे जण तेथें आलें ॥ ९५ ॥
श्रीराम कृपाळु पूर्ण । करोनि जटायुउद्धरण ।
कबंधातें मारोन । आले आपण किष्किंधें ॥ ९६ ॥
रामें निर्दाळोनि वाळीसी । राज्य दिधलें सुग्रीवासीं ।
यौवराज्य अंगदासी । वानरांसी निजसख्य ॥ ९७ ॥
तुझे शुद्धीलागोनि येथें । मज धाडिलें श्रीरघुनाथें ।
तुझे भेटीलागीं सीते । व्रत रघुनाथें धरियेलें ॥ ९८ ॥
विश्वासावें मनीं ह्या वानरा । म्हणोनि रामें दिधली मुद्रा ।
सांडोनियां निद्रा तंद्रा । भेटें कपींद्रा रामदूता ॥ ९९ ॥
ऐकोनि रामकथामृत । सीता उठली हर्षयुक्त ।
कथानुवाद वृक्षाआंत । तेणें विस्मित जानकी ॥ १०० ॥

श्रीरामकथा ऐकून सीतेचे आवाहन

कृपेनें कळवळला श्रीरघुनाथ । मज आश्वासावया येथ ।
वृक्ष कथा अनुवादत । आला निश्चित श्रीराम ॥ १०१ ॥
वृक्षांसीं पुसे करोन नमन । कोण करितो रामकीर्तन ।
त्याचें पाहीन मी वदन । लोटांगण त्या माझें ॥ १०२ ॥
ज्यासी श्रीरामकथाशैली । त्याचे चरणींची रजधुळी ।
मी वंदीन सुखसमेळीं । मुख मजजवळी दावावें ॥ १०३ ॥
ज्याचें मुखीं रामकीर्तन । त्याचें मज देखतां वदन ।
परम सुख समाधान । कृपा करोन भेटावें ॥ १०४ ॥
सीता सप्रेम निजचित्तें । आंत उत्कंठित भावार्थे ।
जेणें खूण मुद्रा आणिली येथें । कृपावंतें मज भेटावें ॥ १०५ ॥

हनुमंताचे सीतेस वंदन :

ऐकोनि सीतेचें वचन । हनुमंतें स्वयें उतरोन ।
सीतेसीं घालोनि लोटांगण । मस्तकीं चरण वंदिले ॥ १०६ ॥
महानिधीचा लाभ जाला । सुधाब्धि चूळोदकें प्राशिला ।
किंवा कळिकाळ जिंकोनि आला । तो पाहु जाला हनुमंता ॥ १०७ ॥
तेणें हरिखाचेनि मेळे । गडबडां पायांवरी लोळे ।
आनंदाश्रू स्त्रवती डोळे । सुखसमेळे डुल्लत ॥ १०८ ॥
धांवधांवोनि पायां पडे । सस्वेद सद्गद सप्रेम रडे ।
पुच्छ नाचवोनि पुढें । हर्षें उडे वानर ॥ १०९ ॥
येथें सांपडली सीता । जाली कार्यसिद्धि रघुनाथा ।
यश आलें मज हनुमंता । उल्हासता नाचत ॥ ११० ॥

सीतेकडून हनुमंतास प्रश्न :

सीता विचारी पोटाआंत । हा म्हणवितो रामदूत ।
रामासवें कैंचा हनुमंत । पंचवटिकेंत हा नव्हता ॥ १११ ॥
राम लक्ष्मण दोघे वीर । त्यांसवें नाहीं वानर ।
कैंचें नेणों हें वनचर । नानाविकार करिताहे ॥ ११२ ॥
पूर्वी जटायु देखिला होता । नाहीं देखिलें हनुमंता ।
येथें आलासे अवचितां । सीताछळणार्थ रावण ॥ ११३ ॥
पूर्वीं होवोनि आला संन्यासीं । आता आला वानरवेषीं ।
केंवी विश्वासूं मी यासीं । सीता मानसीं विचारी ॥ ११४ ॥
श्रीरामकथा अनुवादत । धन्य धन्या हा श्रीरामभक्त ।
कपटी नव्हे हा हनुमंत । मज निश्चित मानलें ॥ ११५ ॥
मिथ्या म्हणों नये हनुमंता । सत्य सांगितली श्रीरामकथा ।
याच्या पूर्वापरवृत्तांता । यासी मी आतां पुसेन ॥ ११६ ॥
सीता पुसेल वृत्तांत । सत्य सांगेल हनुमंत ।
तेचि कथेचा कथार्थ । मुख्य मोक्षार्थ अवधारा ॥ ११७ ॥
एकाएकीं अशोकवनांत । आला देखुनी हनुमंत ।
त्याचा समूळ वृत्तांत । पुसे साद्यंत जानकी ॥ ११८ ॥
मी वनवासीं असतां । तूं नव्हतासि हनुमंता ।
कैंचा आलासी तूं आता । निजवृत्तांता मज सांगें ॥ ११९ ॥
कैसेनि श्रीराम देखिला दृष्टीं । तुम्हां श्रीरामा कैसेनि भेटीं ।
कैशा कैशा केल्या गोष्टी । जेणें का पोटीं अति प्रीती ॥ १२० ॥
कैसा बाणला वचनार्थ । साधावया श्रीरामकार्यार्थ ।
हनुमान सर्वांगीं उल्लासत् । तो गुह्यार्थ मज सांगें ॥ १२१ ॥
श्रीराम भेटल्या कैसें सुख । श्रीरामवचनीं कैसें पीयूख ।
श्रीरामसंगें कैसा हरिख । योगपरिपाकें मग सांगें ॥ १२२ ॥
श्रीरामाचें ठाणमाण । रूप रेखा गुणलक्षण ।
कैसा आहे सखा लक्ष्मण । दोहींची खूण मज सांगें ॥ १२३ ॥

मारूतीवर रामकथेचा परिणाम

ऐकता श्रीरामाची कथा । दुःख शोक नाठवे चित्ता ।
निमे भवभयाची वार्ता । कथा ऐकतां आनंद ॥ १२४ ॥
याचिलागी पुढतपुढती । तुज मी पुसें अति प्रीतीं ।
कथेमाजीं अति विश्रांती । जाण मारूती हरिभक्ता ॥ १२५ ॥
केलिया कथेचें श्रवण । नाहीं मनन निदिध्यासन ।
तरी ते कथा होय शून्य । जेंवी मैथुन वंध्येचें ॥ १२६ ॥
श्रद्धा श्रीरामकथाश्रवण । ऐकती त्यांचे महिमान ।
अहं सोहं कोहं विरोन । ब्रह्मपूर्ण स्वयें होती ॥ १२७ ॥
चित्त तेंचि होय चैतन्य । बुद्धि समसाम्य समाधिधन ।
कर्म होय ब्रह्म परिपूर्ण । इंद्रियाचरण चिन्मात्र ॥ १२८ ॥
ऐसी श्रीरामस्वरूपसंस्था । सादरें पुसतां पैं सीता ।
टक पडली हनुमंता । कथा वार्ता विसरला ॥ १२९ ॥
श्रीरामस्वरूप वदे सुंदरा । तेणें अवस्था अति वानरा ।
नेत्रीं अश्रूंचिया धारा । अंग थरथरां कांपत ॥ १३० ॥
अंग जालें रोमांचित । स्वेद आला डवडवित ।
मूर्च्छापन्न पडें हनुमंत । तेणें विस्मित जानकी ॥ १३१ ॥
वानर वनचर पालेखाईर । त्यासी श्रीरामीं प्रेमपडिभार ।
लंघोनि आलें हें सागर । भक्त साचार हनुमंत ॥ १३२ ॥
ऐसें जाणोनि तत्वतां । आवडीं आश्वासी त्या सीता ।
सावधान करी हनुमंता । श्रीरामवार्ता पुसावया ॥ १३३ ॥
एकाजनार्दना शरण । सीताहनुमंतसंवाद कथन ।
गोड गोड निरूपण । सावधान अवधारा ॥ १३४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
ब्रह्मलिखितजानकीहनुमंतसंवादकथनं नाम अष्टाविंशतितमोऽध्यायः ॥ २८ ॥
॥ ओव्यां १३४ ॥ श्लोक ६ ॥ एवं संख्या १४० ॥