Ramayan - Chapter 5 - Part 21 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 21

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 21

अध्याय 21

गजेन्द्राचे आख्यान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

लंकादहनाचा परिणाम :

श्रीरामभक्तांचे महिमान । अगाध गहन अति पावन ।
हनुमंतें केले लंकादहन । ओंतिली संपूर्ण सुवर्णाची॥ १ ॥
रामभक्त करिती कंदन । तें कंदन होय सुखसंपन्न ।
ऐसें भक्तीचें महिमान । कृपा संपूर्ण रामाची ॥ २ ॥
हनुमंतें जाळिलें लंकेसीं । नव्हे काळी कोळसा मसी ।
सुवर्ण ओतिलें चौपासीं । पीतप्रभेसीं शोभत ॥ ३ ॥
करितां लंकेचें दहन । लंका ओतिली सुवर्ण ।
याचे मूळ मुख्य कारण । गजोपाख्यान अवधारा ॥ ४ ॥

गजेन्द्र उद्धाराचे आख्यान :

भगवंताचें कृपाळुपण । नामस्मरणाचें महिमान ।
गजेन्द्राचें उद्धरण । प्रसंगें पूर्ण सुवर्णमय लंका ॥ ५ ॥
चालतां कथा रामायण । त्यामाजी गजेंद्रोद्धरण ।
लंका ओतिली सुवर्ण । तें कारण सांगेन ॥ ६ ॥

श्रीशुकांनी परिक्षितीला हे आख्यान सांगितले :

जो योगियांचा योगाग्रणी । जो ब्रह्मचर्य शिरोमणी ।
जो ज्ञानियांचा मुकुटमणीं । तो श्रीशुकमुनि सांगत ॥ ७ ॥
जो कां वैराग्याचा निधी । ज्ञानविज्ञानाचा उदधी ।
जो कां सद्‌बुद्धीची बुद्धी । तो शुक त्रिशुद्धी बोलत ॥ ८ ॥
जो पांडवकुळीं कुळदीपक । कौरवकुळीं कुळनायक ।
श्रोता परीक्षिति त्यक्तोदक । श्रवणचातक कथार्थीं ॥ ९ ॥
त्या परीक्षितीकारण । गजेंद्राचें उद्धरण ।
श्रीशुक सांगे आपण । वसतिस्थान गजांचें ॥ १० ॥

त्रिकूट पर्वतावर गंडकी गिरीत मोठे सरोवर आहे :

त्रिकूटनामा गिरिवर । योजनें अयुद दहा सहस्त्र ।
गंडकीपासोनि क्षीरसागर । एवढा थोर पर्वत ॥ ११ ॥
जितुका पृथ्वीवरी विस्तार । तितुका उंच दश सहस्त्र ।
त्रिकूटनामा त्रिशिखर । गिरिवर शोभत ॥ १२ ॥
नाना रत्‍नांचिया खाणीं । नाना धातूंचिया भरणी ।
निर्मळ जळांचिया श्रेणी । सरें पुष्करणीं तेणें भरती ॥ १३ ॥
पर्वताचें निजमहिमान । नाना वर्णी विराजमान ।
श्वेतश्यामसुवर्णवर्ण । सोहा संपूर्ण गिरिवरा ॥ १४ ॥
वृक्ष वल्ली लता द्रुम । सिंहव्याघ्रादि पशु प्लवंगम ।
नाना जातींचें विहंगम । ऋषिआश्रम सिद्धांचे ॥ १५ ॥
निर्मळ जळसरोंवरें पूर्ण । नानापक्षिकुळभाषण ।
गोचमरींचें वसतिस्थान । शोभायमान पर्वत ॥ १६ ॥
सुवर्णताम्ररौप्यखाणी । लोहो निपजे लोहपाषाणीं ।
नाना धातुप्रवाहश्रेणी । पर्वतांतूनी प्रसवती ॥ १७ ॥
जया पर्वताची दरी । जे लागली गंडकीगिरीं ।
वनें उपवनें अति साजिरीं । नाना वृक्षांतरी गंभीर ॥ १८ ॥
जें देखतां उपवन । विश्रांतीतें पावे मन ।
छाया शीतळ सुगंध पवन । कोकिळाकूजन सुखकारी ॥ १९ ॥
सर्वां ऋतूंचें एकायतन । सर्वां ऋतूंचें फळ पुष्प जाण ।
त्या वनीं सदा सुखसंपन्न । क्रीडास्थान अप्सरां ॥ २० ॥
अमृतापरिस फळें सुस्वाद । कस्तूरीहूनि सुगंध ।
मलयानिळ सुस्वर संबद्ध । क्रीडती आनंदें अप्सरां ॥ २१ ॥
कृष्णसारूप्यें कृष्ण भ्रमर । सुमनीं प्रवेशोनि सादर ।
आमोद सेविती सुखसार । केंवी केशर कुचुंबें ॥ २२ ॥
वृक्ष शोभती देवतरू । पाटली पारिजातक मांदारू ।
संतानादिक कल्पतरू । वृक्षविस्तारू चंदनादि ॥ २३ ॥
चंदन चंपक हरिचंदन । चूतवन अशोकवन ।
खर्जुरीवन तालवन । नंदनवनसम शोभे ॥ २४ ॥
रायकेळी सोनकेळी । मघमघिती कर्पूरकर्दळी ।
घडघडित नारीकेळी । शोभा वनफळीं समवेत ॥ २५ ॥
मधुवन विमलार्जुन । औंदुंबर अति गहन ।
तमालवृक्ष शोभायमान । बिल्ववनें साजिरीं ॥ २६ ॥
द्राक्षामंडप शोभायमान । जांबुळीवृक्ष एकसमान ।
इक्षुदंड श्वेत कृष्ण । रस उलोन स्त्रवत पैं ॥ २७ ॥
कंटकहीन बदरी रसाळी । आंवळीवृक्ष रायआंवळी ।
फणस मघमघिती फळीं । मधूकवृक्षातळी फळशोभा ॥ २८ ॥
पिचुमंद सुशीतल । सकळ व्याधि निरसी सबळ ।
गुग्गुळवृक्ष सोवन सरळ । वट पिंपळ पलाश ॥ २९ ॥
निंबोणी नारिंगी पोफळी । रायनिंबोणीच्या हारी ।
विशाळी कपित्थवनाची नवाळी । वर्तुळफळीं परिपक्व ॥ ३० ॥
कोरांटे जेंवी कां कोविदार । वृक्षवटाहूनि थोर ।
श्वेतपीतपुष्पीं सुंदर । आणि बीजपूर मातुलुंगें ॥ ३१ ॥
सुरभिवृक्ष देवदार । भल्लातकीवृक्षविस्तार ।
इंगुदीवृक्ष अपार । फळसंभार बहुपुष्पी ॥ ३२ ॥
ऐसिया वृक्षांचिया जाती । असंख्यात नेणों किती ।
तेणें शोभा पर्वतीं । ऋषीं वसती मुनि सिद्ध ॥ ३३ ॥
त्या गिरिकंदराचे ठायीं । एक अगाध सरोवर पाहीं ।
तेथींच्या जळा मर्यादा नाहीं । पूर्णत्व ठायी परिपूर्ण ॥ ३४ ॥
न्यूनपूर्णता जळीं । असेनाचि कोणें काळीं ।
रातोत्पळीं सीतोत्पळीं । हेमकमळीं शोभत ॥ ३५ ॥
कुमुदें कल्हारें नीलोत्पळें । मल्लिका शतपत्रें कुड्भळें ।
जळचांचल्यें चलत्कमळें । जळ परिमळे स्वादिष्ठ ॥ ३६ ॥
समस्त ऋतु एकाकाळें । सुपुष्पित सदा फळें ।
सरोवरींचेनि जळें । क्रीडती सकळें जळचरें ॥ ३७ ॥

त्या सरोवरात फार मोठा नक्र (सुसर)
होता आणि त्या वनातही मोठा हत्ती होता :

सरोवरीं जळचर । मत्स्य कच्छ पर्वताकार ।
त्यांसी ग्रासी ऐसा नक्र । थोरां थोर गजग्रहो ॥ ३८ ॥
तेचि वनीं वसे गजेंद्र । तेचि सरोवरीं वसे नक्र ।
दोघांसही पूर्व वैर । अति दुर्धर ब्रह्मशापें ॥ ३९ ॥
एवढी ब्रह्मशापाची थोरी । यांसी घडली कैशा परीं ।
तेही कथीन निजनिर्धारी । पूर्वानुस्मरीं अवधारा ॥ ४० ॥
पूर्वीं इंद्रद्दुम्न राजेंद्र । ब्रह्मशापें जाहला गजेंद्र ।
हूहू गंधर्व अति दुर्धर । तो झाला नक्र ब्रह्मशापें ॥ ४१ ॥
पौंड्रेदेशीं राजा इंद्रद्दुम्न । भगवद्‌भक्तिपरायण ।
तो या सरोवरा येउन । एकांत देखोन राहिला ॥ ४२ ॥
एकांत आणि विश्रांती । राव सुखावला चित्तीं ।
तेथें राहोनि नेमस्तीं । व्रत चालवी तपश्चर्या ॥ ४३ ॥
तोचि राजा इंद्रद्दुम्न । त्रिकाळ करितां संध्यास्नान ।
केश वळिले जटाग्रंथन । तपस्वी पूर्ण तापसत्व ॥ ४४ ॥
तो एके काळीं इंद्रद्दुम्न । आराधनकाळ लक्षून ।
ते सरोवरोदकीं करोनि स्नान । घालोनि आसन बैसला ॥ ४५ ॥
तेचि काळीं अगस्तिमुनी । आला शिष्येंसी परिवारूनी ।
रायें अभ्युत्थान न करोनीं । बैसला आसनीं ध्यानस्थ ॥ ४६ ॥
ऋषि येतां देखोनी । रावें सांडिला उपेक्षोनी ।
नाहीं नमन ना अभ्युत्थानीं । बैसला ध्यानीं ध्यानस्थ ॥ ४७ ॥

गर्वाचे प्रकार व त्यांचे परिणाम :

साधु सर्वांगीं चैतन्यघन । त्यासी न भजतां धरी ध्यान ।
तें ध्यान नव्हे परम विघ्न । अधःपतन ध्यानगर्वे ॥ ४८ ॥
ध्यानगर्व ज्याचे ठायीं । ज्ञानगर्वे जो उताणा पाहीं ।
विद्यागर्वीं मुसमुसी देहीं । तो नर पाहीं अधःपाती ॥ ४९ ॥
साधु सच्चिदानंदव्यक्ती । ध्यानीं काल्पनिक मूर्ती ।
साधुउपेक्षा ध्यानाप्रती । ते अधःपाती ध्यानगर्वे ॥ ५० ॥
उपेक्षोनि साधुसज्जन । जो साक्षेपें आदरी ध्यान ।
ध्यान नव्हे ते नागवण । आपणा आपण नाडिलें ॥ ५१ ॥
ध्यान ब्राह्मणीं नाहीं ब्रह्मभाव । भूतीं नाहीं भगवद्‌भाव ।
त्याचें ध्यानचित्त वाव । आला अपाव ध्यानगर्वे ॥ ५२ ॥

साधूंच्या उपेक्षेचे परिणाम :

ब्राह्मणीं नाहीं ब्रह्मत्वभक्ती । ना भगवद्‌भाव सर्वां भूतीं ।
रायाची खोटी ध्यानस्थिती । येणें अगस्ति कोपला ॥ ५३ ॥
राजा सावधान भगवद्ध्यानीं । परी उपेक्षा साधुसज्जनीं ।
परम विघ्न ध्यानस्थानीं । देखोनि मुनि कोपला ॥ ५४ ॥
रायाचा झडे ध्यानाभिमान । भगवत्प्राप्ति पावे पूर्ण ।
ऐसी कृपा अनुलक्षून । शापवचन देतसे ॥ ५५ ॥
परम कृपाळू अगस्ती । शाप वदला कृपामूर्तीं ।
साधुसज्जनीं गर्वोन्मत्तीं । गजत्वप्राप्ती पावसी ॥ ५६ ॥
साधु सज्जनीं गर्वोन्मत्त । तों तूं होसी गज उन्मत्त ।
ऐसे अगस्ति जंव वदत । गजत्व प्राप्त रायासी ॥ ५७ ॥
ब्राह्मणाचिया अभक्ती । साधुसज्जनीं ध्यानोन्मत्तीं ।
रायासी गजत्वाची प्राप्ती । मुनि अगस्तीचेनि शापें ॥ ५८ ॥
ब्राह्मण शाप अति दुर्धर । तेचि वनीं तो राजेंद्र ।
जाला उन्मत्त गजेंद्र । बळोद्गार महाबळी ॥ ५९ ॥
ऐसीं इंद्रद्दुम्नाची गती । हूहू गंधर्व याचि रीतीं ।
ब्रह्मशापाचेनि प्राप्ती । नक्रत्वस्थिती पावला ॥ ६० ॥
तेचि सरोवरीं माध्यान्हकाळीं । देवऋषि करितां आंघोळी ।
हूहू गंधर्व तेचि काळीं । करी जळकेळी स्त्रियांयुक्त ॥ ६१ ॥
देवऋषि जळां आंत । उभा सूर्यसूक्त जपत ।
हूहू गंधर्व जळीं गुप्त । येवोनि धरी ऋषिपाय ॥ ६२ ॥
ग्रह जैसा उदकीं । येवोनि झोंबें एकाएकीं ।
तैसाचि गंधर्व अविवेकीं । झोंबला तवकीं ऋषिपायीं ॥ ६३ ॥
पायां झोंबतां सत्वर । कोपोनि शापी ऋषीश्वर ।
गुप्तरूपें जळचर । होसी नक्र गजग्रहो ॥ ६४ ॥

दोघेही ऋषींना शरण गेल्यावर त्यांना उःशाप मिळाला कीं
त्यांचे द्वंद्वयुद्ध जुंपल्यावर भगवंतांच्या कृपेने दोघांचा उद्धार होईल

ब्रह्मशाप ऐकोनि कानीं । गंधर्व इंद्रद्दुम्न दोनी ।
उच्छाप मागाया लागूनी । कर जोडूनी विनविती ॥ ६५ ॥
आमुचे आम्ही गर्वोन्मत्त । ब्रह्माशाप जाला प्राप्त ।
तुम्ही दोघे अति कृपावंत । शापन्मुक्त करावें ॥ ६६ ॥
आम्ही दोघे अति अपराधी । तुम्ही दोघे कृपानिधी ।
तुम्ही अक्षोभ अगाधबुद्धी । आम्हां त्रिशुद्धी उद्धरावें ॥ ६७ ॥
तुम्ही मायबापांहूनि आप्त । आम्ही अपराधी अत्यंत ।
दोघे कृपाळू जी समर्थ । शापोन्मुक्त करावें ॥ ६८ ॥
ऐसें ऐकतां प्रार्थन । कृपेनें द्रवले दोघेजण ।
वदते जाले उच्छापवचन । सावधान अवधारा ॥ ६९ ॥
एक जळीं एक स्थळीं । वैरी व्हाल आतुर्बळी ।
युद्ध करिता जलकल्लोळी । तुम्हां वनमाळी पावेल ॥ ७० ॥
युद्ध करितां अत्यंत । जेव्हां मांडेल प्राणांत ।
तेव्हां पावोनि भगवंत । नित्य निर्मुक्त करील ॥ ७१ ॥
शापोन्मुक्त जन्मोन्मुक्त । हरि करील भवनिर्मुक्त ।
ऐसे वदले वरदोक्त । ऋषि समर्थ कृपाळु ॥ ७२ ॥
ब्राह्मण शापिती क्षोभोन । हें समूळ मिथ्या वचन ।
ऋषी कृपाळु दीनोद्धरण । वरद वदोन उद्धरिले ॥ ७३ ॥
उद्धरावयाची नवलपरी । काढिले जन्ममरणाबाहेरी ।
एवढी कृपेची थोरी । कोपामाझारी ऋषींच्या ॥ ७४ ॥
जैसा मातेचा निजकोप । वरी कठिण आंत सुखरूप ।
तैसाचि ब्राह्मणांचा शाप । शापें चिद्रूप पावती ॥ ७५ ॥
ब्राह्मणांचे कोपें निवृत्ती । पाप निर्दळोन ब्रह्मप्राप्ती ।
संतोषलियाकाय देती । श्रुतिस्मृती अगम्य ॥ ७६ ॥

त्यामुळे गजेन्द्र सरोवरात कधीही गेला नाही :

ऐसी वरदोक्ति वरदोन । ऋषी गेले करोनि स्नान ।
गजेन्द्र नक्र दोघे जण । जाले आपण ऋषिशापें ॥ ७७ ॥
राजा गजेंद्र वनस्थळीं । गंधर्व नक्र जाला जळीं ।
दोघे जण आतुर्बळी । जळीं स्थळीं विचरत ॥ ७८ ॥
जळीं नक्र महाबळी । तिमिंगिलातें सगळें गिळी ।
जळचरें कांपती जळीं । जलकल्लोळी विचरतां ॥ ७९ ॥
लहानसान नाणी दृष्टी । पर्वतप्राय मत्स्य घोंटी ।
ऐसा नक्र जगजेठी । सुखसंतुष्टी राहिला ॥ ८० ॥
शापें स्मृति गेली समस्त । तरी माझा वैरी उदकांत ।
ऐसें गजेंद्र नित्य स्मरत । न ये उदकार्थ सरोवरा ॥ ८१ ॥
गजेंद्र जों कां माझा वैरी । वसतो याचि वनांतरीं ।
हे आठवण नित्य नक्रीं । न ये बाहेरी आहारार्थ ॥ ८२ ॥
नक्र जळीं महाबळीं । गजेंद्र वनीं बळिया बळी ।
दोघे जण शापसमेळीं । जळीं स्थळीं विचरत ॥ ८३ ॥
जो गजेंन्द्र ते गिरिकंदरीं । गजीगजशावसह परिवारीं ।
क्रीडा करीं वनांतरीं । वनविंहारीं उन्मत्त ॥ ८४ ॥

उन्हाळ्यात आपल्या सहकार्यांसह वनातून विहार करीत
असता तहानेने व्याकुळ होऊन गजेन्द्र सरोवरात आला

चैत्रमासींच्या वनशाखी । तयानें सेवितां एकाएकीं ।
मद चालिला पैं तवकीं । अति उद्रेकीं उन्माद ॥ ८५ ॥
तेणें उन्मादें आपण । मांडिलें वनविहरण ।
वेळु जाळिया उपडून । वेत्रवन विध्वंसी ॥ ८६ ॥
गुल्मलता थोर थोर । गगनचुंबी तरूवर ।
कांटेसांवरी अपार । उन्मूळी समग्र दंताग्रें ॥ ८७ ॥
हाणितां दातांची पैं झडें । पाडी पर्वतांचे कडे ।
त्याचे मदगंधापुढें । पळती रोकडे वनसिंह ॥ ८८ ॥
गजेंद्रमदाचे अवघ्राणें । दिग्गज कांपती संपूर्ण ।
शरभ शार्दूळ पलायमान । सांडिती प्राण व्याघ्रसिंह ॥ ८९ ॥
आस्वन वराह महिष वृक । गौरवानर खड्ग जंबुक ।
गोचमरी शाळ शशक । मृगादिक भयें पळती ॥ ९० ॥
पळत्या पशूंसी नाभीकार । देवोनि राखी त्यांसी गजेंद्र ।
घेती उदक साचार । दर्प दुर्धर साहवेना ॥ ९१ ॥
पर्वतीं चालतां गजेंद्र बळीं । पर्वत दडापीत पाताळीं ।
सर्प चेपती फणामंडळी । पन्नगकुळीं आकांत ॥ ९२ ॥
गजेंद्र उन्मादमदमेळीं । करितां वनांची रवंदळी ।
चैत्रींचा रवि माध्यान्हकालीं । कुंभस्थळीं पोळत ॥ ९३ ॥
गजी गजशाव समस्त । उष्णें जालीं अति संतप्त ।
अवघीं जालीं तृषार्त । उदकार्थ तळमळती ॥ ९४ ॥
करोनि पंचयोजनें गमन । नित्य करिती गंडकीउदकपान ।
परी सरोवरांचें जीवन । नक्राभेण स्पर्शेना ॥ ९५ ॥
गंडकी न ठाके उष्णसमेळीं । किरणीं पोळला कुंभस्थळीं ।
आला सरोवराजवळीं । भयसमेंळी तृषार्त ॥ ९६ ॥
सोंड घालितां सरोवरीं । गजेंद्र धाकत जिव्हारीं ।
झणीं मज झोंबेल वैरी । भय भारी जळपानीं ॥ ९७ ॥
सोंड घालितांचि जळीं । गजमदगंध सेवावया अळी ।
रूंजी करिती गंडस्थळीं । भ्रमरावळी रूणझुणती ॥ ९८ ॥
गजी गजशावयांसंयुक्त । तृषें पीडिलीं जळार्थ ।
गजेंद्रेंसीं समवेत । आलीं धांवत सरोवरा ॥ ९९ ॥
तें तडाग अति पुष्कळ । माजी निर्मळ जळसुनीळ ।
कमळगंध सुपरिमळ । अति शीतळ शीकरांबु ॥ १०० ॥
गज राहोनि जळाबाहेरी । सोंड घालोनि सरोवरीं ।
जळ प्राशिलें स्वइच्छेवरीं । मस्तकावरी शिंपिलें ॥ १०१ ॥
जळप्राशनें गजपती । जाली सकळ श्रमां शांती ।
जलशिंपणें जाली विश्रांती । चढला पुढती गजमद ॥ १०२ ॥
रिघोनि सरोवरजळीं । उन्मादें मांडिली जळकेळी ।
कमळां करित रवंदळी । जलकल्लोळीं क्रीडत ॥ १०३ ॥
गजी गजशाव उदकाप्रती । रिघावया अवघीं भीती ।
शुंडादंडें गजपती । जळ पाजीत सर्वांसी ॥ १०४ ॥
पहिलें पाजिलें प्रिय भार्येसी । भार्या पाजी प्रियपुत्रासी ।
मग पाजित इतरांसी । जेंवी कुटुंबासी गृहस्थ ॥ १०५ ॥
विसरोनियां निजमरण । गृहस्था कुटुंबपोषण ।
तैसा गजेंद्र आपण । नक्रग्रहण विसरला ॥ १०६ ॥
प्राणी विसरे निजमरणासी । काळ टपतसे तयासी ।
तेंवी नक्र गजेंद्रासी । जळसहवासीं टपतसें ॥ १०७ ॥
जेंवी काळ पाहोनि अंत । मग प्राण्याचा करी घात ।
तेंवी गजेंद्र सरोवराआंत । नक्र धरित साटोपें ॥ १०८ ॥
माये केला विपरीरार्थ । विसरोनियां अपघात ।
स्त्रीपुत्रांअति मोहित । केला भ्रांत मोहममते ॥ १०९ ॥
अंगीं देहलोभाचा मद । दुसरा बळाचा उन्माद ।
तिसरा गजमदाचा मद । जाला मदांध गजेंद्र ॥ ११० ॥
जन्ममरणाचा महाबाध । ज्या नाठवे तो मोहांध ।
न देखे नरकपातबाध । तो मधांद महामूढ ॥ १११ ॥
त्रिविध मोहमंदें मोहित । बुद्धिअंधत्वें गजेंद्र भ्रांत ।
विसरोनिया नक्रघात । जळीं क्रीडत स्त्रीलोभें ॥ ११२ ॥
ऐसें क्रीडतां जळस्थानीं । नक्रें धांवोनि धरिला चरणीं ।
गजें निजबळें ओढोनी । बाहेर आणूंनी मारूं पाहें ॥ ११३ ॥
तंव तो नक्र महाबळीं । हबका हाणोनि नेला जळीं ।
गजें युद्ध केलें तें काळीं । सोंडें कवळी नक्रातें ॥ ११४ ॥
सोंड हाणितां तवकें शिरीं । सोंड आदळे जळावरी ।
नक्र निश्चळ जळा भीतरी । भय न धरीं सोंडेंचे ॥ ११५ ॥
सोंड बुडवितां जळसंपुटीं । नक्रें खुडिली सोंड आनकुटीं ।
तेणें गज आला कष्टी । मकरमिंठी सुटेना ॥ ११६ ॥
नक्र जाणे गजवर्मस्थ । सोंडेची अणी टपोनि खुडित ।
अमित प्रवाहें पैं रक्त । गज किरकिरित अति दुःखें ॥ ११७ ॥

मग दोघांची झटपट सुरू झाली :

गजें ओढितां भूतळीं । नक्र निजबळें ओढी जळीं ।
सहस्त्र वर्षे रणरवंदळीं । जळकल्लोळीं भिडले ॥ ११८ ॥
सहस्त्र वर्षें करितां रण । सोघे सबळ सप्राण ।
तें देखोनि अमरगण । आश्चर्य पूर्ण करिताती ॥ ११९ ॥
नक्रासी जळीं जळाहार । गजा पडिले निराहार ।
भूतळा नाणवेचि नक्र । शक्ति समग्र क्षीण जाली ॥ १२० ॥
खंडितां सोंडेच्या अणीसी । गजेंद्र जाला कासाविसी ।
मग बोभाय स्त्रीपुत्रांसी । ओढोनि पुच्छेसीं मज काढा ॥ १२१ ॥
पुच्छीं लागोनि समग्र । बळें ओढिती स्त्रीपुत्र ।
तिळभरी ढळेना तो नक्र । केलें विचित्र तें ऐका ॥ १२२ ॥
समस्तीं ओढितां पुच्छासी । न सोडवे गजेंद्रासी ।
शेखीं न ओढवेचि नक्रासी । अति बळेंसीं कष्टतां ॥ १२३ ॥
नक्रें आसुडितां तेथ । गजीगजशावसमवेत ।
गजेंद्र नेला सरोवरांत । भयभीत जळमग्न ॥ १२४ ॥
नक्रभयें भयभीत । जळमय निर्बुजत ।
गजेंद्रा सांडोनियां समस्त । आले पळत तीरासीं ॥ १२५ ॥
स्त्रिया म्हणती भाग्य थोर । संकटीं वांचले कुमर ।
नक्रें गिळिला गजेंद्र । अक्षत पुत्र कडे आले ॥ १२६ ॥
माता पुत्रांसी कृपादृष्टी । बुद्धि सांगती गोमटी ।
सोडा गजेंद्राच्या गोष्टी । जळसंकटीं न रिघवे ॥ १२७ ॥
आयुष्य व्हावें निजपुत्रांसी । उदक पाजोनि समस्तांसी ।
संकटीं सांडोनि भ्रतारासी । घेवोनि पुत्रांसी वना गेल्या ॥ १२८ ॥

हजार वर्षे युद्ध झाल्यावर गजेंद्र
हतबल झाला व त्याने प्रभूचा धावा केला

सहस्त्र वर्षें पुरूषार्थी । युद्ध करितां नक्राप्रती ।
निराहारीं युद्धावर्तीं । क्षीणशक्ती गजेंद्र ॥ १२९ ॥
क्षीण शरीरबळशक्ती । मन : शक्ती प्राणशक्ती ।
क्षीण इंद्रिये इंद्रियशक्ती । ग्रहगति गजेंद्रा ॥ १३० ॥
ऐसा गजेंद्र क्षीणशक्ती । येतां स्त्रीपुत्रां काकुलती ।
सांडोनि गेली पतिप्राणांतीं । कोणी अंतीं न येती कामा ॥ १३१ ॥
गजेंद्र पाहे ममता धरोनी । अंतीं सांडिलें सुह्रज्जनीं ।
ज्येष्ठ कनिष्ठ असंख्य पत्‍नी । अंतीं त्यागोनि मज गेल्या ॥ १३२ ॥
मजसमान बळ दुर्धर । शतानुशत माझे कुमर ।
अंती विमुख समग्र । पुत्र कलत्र न ये कामा ॥ १३३ ॥
सुह्रद आणि पुत्र प्रौढ । तिहीं सांडिली माझी चाड ।
हस्तिणीचा कोण पाड । अति अवघड प्राणांत ॥ १३४ ॥
सोडवावया नक्राप्रती । गजें वेंचिली निजशक्ती ।
पुत्र कलत्र सुह्रदज्ञाती । अंती न येती उपयोगा ॥ १३५ ॥
सार्थक करावया अंतकाळ । एक भगवंत कृपाळ ।
नामें मोक्षाचा सुकाळ । कळिकाळ आंकणा ॥ १३६ ॥
ज्याचें आदरें करितां स्मरण । निःशेष निमे जन्ममरण ।
त्याचे चरणा रिघोनि शरण । भवबंधन छेदावें ॥ १३७ ॥
जीवशिवांहूनि पर । चहूं वाचां परात्पर ।
गुणागुणीं अनिवार । त्यासी साचार शरणार्थीं ॥ १३८ ॥
श्रीहरीसी जालिया शरणागत । देहीं असोनि देहातीत ।
कळिकाळाचे पाडोनि दांत । फाडीन खत विषयांचें ॥ १३९ ॥
गर्जतां रामनामपडवाडे । कर्मबंधन समूळ उडे ।
यम अंतक पायां पडे । नक्र बापुडें तें काय ॥ १४० ॥
ऐसी मज जे आठवण । हे श्रीहरीची कृपा पूर्ण
हरीचे अनुग्रहविण । नामस्मरण नाठवे ॥ १४१ ॥
करावें श्रीहरीचें स्मरण । ऐसी युक्ति विवंचून ।
मनबुद्धीं ह्रदयीं समाधान । देवोनि आपण स्वस्थ जाला ॥ १४२ ॥
नक्रें केला जो कां व्यग्र । ते व्यग्रता निरसावया समग्र ।
धैर्यधारणा धरोनि अव्यग्र । जपे परात्पर तें ऐका ॥ १४३ ॥
धैर्य नाहीं जयांपासीं । ते जन्ममरणाचे आंदणी दासी ।
पूर्वभजनसंस्कारेंसीं । धैर्य गजासी हरिस्मरणीं ॥ १४४ ॥
पूर्वभजनपरिपाटीं । हरिस्मरणीं धृष्टि पुष्टी ।
मंत्र जपावया वाक्पुटीं । उल्लास पोटीं गजेंद्रा ॥ १४५ ॥
एकाजनार्दना शरण । गजेंद्रमुखींचे श्रवण ।
अनुतापें पशु पावन । त्याचें ज्ञान अवधारा ॥ १४६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
गजेंद्रोपाख्यानं नाम एकविंशतितमोऽध्यायः ॥ २१ ॥
॥ ओव्यां १४६ ॥ श्लोक ३१ ॥ एवं संख्या १७७ ॥