Ramayan - Chapter 5 - Part 14 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 14

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 5 - सुंदरकांड - 14

अध्याय 14

रावणपुत्र अखयाचा मारूतीकडून वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

ऎंशी हजार किंकर, चौदा हजार बनकर व संपूर्ण
वनाचा मारूतीने विध्वंस केला म्हणून रावणाचा संताप

किंकर मारिले ऐशीं सहस्त्र । चवदा सहस्त्र बनकर ।
वन विध्वंसिलें मनोहर । तेणें दशशिर कोपला ॥ १ ॥
वानर जाणोनि महाबळी । प्रहस्तसुत जंबुमाळी ।
रावणें पाचारोनि जवळी । गुज त्याजवळी सांगत ॥ २ ॥
मारिले किंकर बनकर । विध्वंसिलें मनोहर ।
तो तुवां मारावा वानर । युद्धीं दुर्धर गांजोनी ॥ ३ ॥
वानर न मरतां देख । तुज परतल्या एकाएक ।
तरी तुवां हारविलें नासिक । नपुंसक राक्षसांत ॥ ४ ॥
वानरा न करो मर्दन । तेव्हांचि तुझे काळें वदन ।
रासभारोहण अपमान । मूतें वपन मस्तका ॥ ५ ॥
ऐसी ऐकवोन वचनावळी । युद्धा धाडिला जंबुमाळी ।
तो ही वीर आतुर्बळीं । क्रोधानळीं चालला ॥ ६ ॥

युद्धांतून माघारी आल्यास अपमान करण्याची धमकी
देऊन प्रहस्त प्रधानाचा पुत्र जंबुमाळी याला पाठविला

महाखरीं जुंपिला रथ । शस्त्रसामुग्री घालोनि समस्त ।
धनुष्य घेवोनि अत्यद्‌भुत । आला युद्धार्थ जंबुमाळी ॥ ७ ॥
टणत्कारोनियां मेढा । क्रोधे गर्जे वानरांपुढां ।
किंकरां बनकरांच्या सुडा । घ्यावया रोकडा मी आलों ॥ ८ ॥
हनुमान सांगे गोड गोष्टी । तुम्हीं चोरिली सीता गोरटी ।
मारीन राक्षसांच्या कोटीं । अवघ्यांशेवटीं रावण ॥ ९ ॥
जंबु तुझी आवड मोठी । किंकरां बनकरांसीं भेटी ।
तुज मी करीन उठाउठीं । रथसंपुटीसमवेत ॥ १० ॥
अर्धचंद्रबाणसमेळीं । हनुमान विंधिला कपाळी ।
बाण हिसळोनि ते काळीं । लागला निढळीं जंबूच्या ॥ ११ ॥
लागतां बाणाचा आघात । जंबुमाळी पडला मूर्च्छित ।
हनुमान गदगदां हांसत । विपरीतार्थ येथें जाहला ॥ १२ ॥
सावध होवोनि जंबुमाळी । वर्षलासे बाणजाळीं ।
बाण कोंदले नभ : स्थळीं । भूमंडळीं शरजाळ ॥ १३ ॥
रामस्मरणें अति समर्थ । बाणांमाजी हनुमंत ।
रणधेंडा स्वयें नाचत । अंगीं आघात लागेना ॥ १४ ॥
पंचक्रोश शिळा सोज्ज्वळी । कपीनें हाणिली जंबुमाळी ।
येरें विंधोनि बाणजाळीं । केली रांगोळी शिळेची ॥ १५ ॥
कोपोनियां हनुमंतें । विशाळ वृक्ष घेवोनि हातें ।
वेगें हाणितां जंबूतें । बाणें वृक्षातें छेदिलें ॥ १६ ॥
लागवेगाचेनि लवलाहें । चौं बाणीं विंधोनि पाहें ।
वृक्ष केला तिळप्राये । जाहलें आश्चर्य हनुमंता ॥ १७ ॥
जीवे घ्यावा हनुमंत । निर्वाण परिघ घंटायुक्त ।
रागें काढिला धगधगित । करावया अंत वानरा ॥ १८ ॥
परिघ घेवोनि करतळीं । गर्जिन्नला जंबुमाळी ।
वानरा तुझी करीन होळी । घावो सांभाळीं हनुमंता ॥ १९ ॥
माझ्या परिघाचा आघात । निश्चयें निमाला हनुमंत ।
कैसेनि राखेल रघुनाथ । रणवृत्तांत पाहों याचा ॥ २० ॥
रावणें नेमिलें आहे मातें । जीवें मारावें वानरातें ।
कोण निवारील माझ्या परिघातें । हनुमंतातें वांचवावया ॥ २१ ॥
परिघ येतां अति वेगेंसीं । हनुमान जाणें लघुलाघवासीं ।
अंग चुकविलें घायासीं । वेगें आकाशीं उडाला ॥ २२ ॥
शस्त्रदेवता पैं लाठी । परिघ गेला हनुमत्पाठीं ।
पुच्छें परिघा घातलीं मिठी । चेपिली घाटी देवतेची ॥ २३ ॥
देवता म्हणे गा हनुमंता । तुज मी शरण आलियें आतां ।
शस्त्रशक्ति ज्या समस्ता । शरणागता तुज होती ॥ २४ ॥
शस्त्रशक्ती भूतशक्ती । आणिक मंत्रांच्या मंत्रशक्ती ।
अवघ्या तुज शरण येती । मज मारूती वांचविलिया ॥ २५ ॥
सोडोनि पुच्छाचें बंधन । शस्त्रदेवता वांचवोन ।
शक्तिमंडळा लोटांगण । घाली आपण हनुमंत ॥ २६ ॥
मारूं नये शरणागता । म्हणोनि वांचविली शस्त्रदेवता ।
भूतीं भजावें श्रीरघुनाथा । या बुद्धि समस्ता शक्ती वंदी ॥ २७ ॥
तंव त्या शक्ती पैं समस्ता । ओंवाळिती हनुमंता ।
करितां राक्षसांच्या घाता । आम्ही युद्धार्था तुज साह्य ॥ २८ ॥
सीता आमुची आद्यशक्ती । तीस गांजितो लंकापती ।
राक्षसां विमुख याचि अर्थीं । साह्य सर्वार्थीं रामभक्तां ॥ २९ ॥
हनुमान म्हणे पुच्छा जगजेठी । युद्धी माझी राखिजे पाठी ।
साह्य शक्ती कोट्यनुकोटी । पुच्छासाठीं मज जाहल्या ॥ ३० ॥
ऐसें पुच्छांचें स्तवन । करोनि पुच्छाचे लालन ।
देवोनि पुच्छासीं चुंबन । जाहला सावधान युद्धार्थी ॥ ३१ ॥
परिघ घेवोनिया हातां । येता देखोनि हनुमंता ।
जंबु पावला परम चिंता । माझें शस्त्र मज घाता प्रवर्तलें ॥ ३२ ॥
रावणा परदारा अधर्म । पापें शक्ती क्षोभल्या परम ।
नासला आक्रम पराक्रम । मरणानुक्रम राक्षसां ॥ ३३ ॥
करावया वानरांचे घाता । राक्षसें परिघ सोडिला होता ।
तो आला हनुमंताचे हाता । जंबूचा माथा छेदावया ॥ ३४ ॥
कोप आला हनुमंता । परिघ भोवंडिला साटोपता ।
लक्षोनि जंबूचिया माथा । होय हाणिता तें ऐका ॥ ३५ ॥
वेगीं उडोनियां अंबरा । दांत खादले करकरां ।
परिघ भोवंडिला गरगरां । रहंवरा ठोकिलें ॥ ३६ ॥
निधडी हनुमंताची शक्ती । ना त्या शरीर ना त्यास अस्थी ।
हातपाय न दिसती । न दिसे व्यक्ती राक्षसा ॥ ३७ ॥
ना तो रथ ना तो वारू । ना तें धनुष्य ना शस्त्रसंभारू ।
वानरें केला अव्यक्त मारू । न दिसे गोचरू राक्षस ॥ ३८ ॥
दुर्धर हनुमंताचा घात । जीव मारोनियां तेथ ।
घायवट न दिसे प्रेत । केला भस्मांत राक्षसां ॥ ३९ ॥
आधीं हनुमंत महाबळी । ऐशियापरी जंबुमाळी ।
परी घायें मेळविला धुळी । रणरांगोळी करोनी ॥ ४० ॥

द्वंद्वयुद्धात जंबूच्या परिघानेच त्याचा घात :

जंबु मारिला तयीं मारूती । प्रहस्त बोंबले दोहीं हस्तीं ।
द्यावया मंत्राग्नी पुरती । शोधितां अस्थी न लभेचि ॥ ४१ ॥
पावोनियां पुत्रशोक । येवोनि रावणासंमुख ।
प्रहस्त करी महाशंख । दुर्धर दुःख घोटेना ॥ ४२ ॥
झोटीं सुटली मोकळी । प्रहस्त लोळे क्षितितळीं ।
ज्येष्ठ पुत्र जंबुमाळी । वानरे धुळी मेळविला ॥ ४३ ॥
युद्धीं पडला प्रहस्तकुमर । इतर प्रधानांचे पुत्र ।
वेगीं मोकली दशशिर । रणीं वानर मारावया ॥ ४४ ॥
रावणाची सभेआंत । प्रधानपुत्र अति गर्वित ।
महा वीरांतें दृष्टी न गणित । बळोन्मत्त प्रतापें ॥ ४५ ॥
ऐसें बलदर्प अतिदृप्त । शस्त्रास्त्रीं निपुण नित्य ।
येरयेरां नापेक्षित । अति समर्थ युद्धार्थी ॥ ४६ ॥
युद्धाग्रणी प्रधानसुत । निवडोनियां समस्त ।
हनुमंतासीं युद्धार्थ । धाडी लंकानाथ साक्षेपें ॥ ४७ ॥
तुमचे अंगी युद्धक्रम । नित्य वानितां पराक्रम ।
वन विध्वंसी प्लवंगम । त्यासीं संग्राम करावा ॥ ४८ ॥
तुम्ही अवघे बुद्धि समर्थ । बांधोनि आणावा हनुमंत ।
नातरी करावा त्याचा घात । पाहों पुरूषार्थ तूमचा ॥ ४९ ॥
थोर वाढिवेची मात । नित्य सांगा सभेआंत ।
तोच दावावा पुरूषार्थ । युद्धीं हनुमंत जोंकोनी ॥ ५० ॥
ऐसें सांगता लंकानाथ । प्रधानपुत्र समस्त ।
वेगीं संजोगोनी रथ । शीघ्र युद्धार्थ निघाले ॥ ५१ ॥
हेमरत्‍नमाळा विराजित । शृगांरिले अश्वरथ ।
ध्वज पताका डोलत । रथ शोभत अति शोभा ॥ ५२ ॥
मारिल्यावांचोनि हनुमंत । परते तो मातृगामी येथ ।
ऐसी करोनियां शपथ । आले समस्त युद्धार्थीं ॥ ५३ ॥
रथारूढ धनुष्य हातीं । पुढें वाजंत्रें गाजती ।
मागें माता शंख करिती । पुत्रसंतती निमाली ॥ ५४ ॥

जंबुमाळीच्या मातांचा आक्रोश :

प्रहस्तदुःखासमान । दुःखी करावया प्रधान ।
हट्टीं पेटला दशानन । युद्धी संतान मोकलिलें ॥ ५५ ॥
प्रहस्तपुत्र महाबळी । रणीं मारिला जंबुमाळी ।
किंकरांची केली होळी । केली रांगोळी बनकरां ॥ ५६ ॥
तेथें किती प्रधानसंतान । आजिच जाहलें निःसंतान ।
वानर नव्हे महाविघ्न । आलें निदान राक्षसां ॥ ५७ ॥
स्त्रिया सुह्रद तळमळिती । माता पिता शंख करिती ।
वधूं धाडितां मारूती । पुत्रसमाप्ती वानरें ॥ ५८ ॥

मारूतीवर सर्वांकडून एकत्रित प्रहार :

येरीकडे कडकडाटा । प्रधानपुत्र घनदाट ।
रथचक्राचा घडघडाट । आले निकट हनुमंता ॥ ५९ ॥
देवालयाचे महाद्वारीं । बैसला होता तोरणावरीं ।
देखोनि प्रधानपुत्रहारी । उल्लास भारी हनुमंता ॥ ६० ॥
जैसें पतंग दीपावरी । तैशा प्रधानपुत्राच्या हारी ।
लोटल्या हनुमंताचेवरी । शरधारीं वर्षती ॥ ६१ ॥
बाण सुटती सणसणा । शस्त्रें वाजती खणखणां ।
बाण विंधिती झणझणां । कालकंडना मांडिली ॥ ६२ ॥
समकाळ शरसंपात । हनुमान बैसला सावचित्त ।
बाण चुकवी पिलंगत । अमात्यसुत मारावया ॥ ६३ ॥
बाण वर्षले अत्यद्‌भुत । जैसे मेघ पर्वतांत ।
अचुकहस्ती आम्ही समस्त । मारा हनुमंत विंधोनी ॥ ६४ ॥
एक म्हणती विंधा शिरीं । एक म्हणती विंधा उरीं ।
एक म्हणती करा कांडोरी । चरणां करां चुरा पैं ॥ ६५ ॥
एक म्हणे विंधा पोटीं । एक म्हणे विंधा पाठीं ।
एक म्हणे विंधा कंठीं । फोडूं घाटी याची पैं ॥ ६६ ॥
एक म्हणती माझें संधान । याचें नासिक मी छेदीन ।
एक म्हणे छेदीन दोनी कान । पुच्छ छेदीन म्हणे एक ॥ ६७ ॥

त्या सर्वांना पुच्छात गुंडाळून त्यांचा एकदम अंत :

ऐशा ऐकोनियां गोष्टी । हनुमान हांसिन्नला पोटीं ।
मग उठोनियां जगजेठी । लांगूल त्राहटी सत्राणे ॥ ६८ ॥
देतां भुभु:कार उद्‌भट । अवघ्यां झाला ह्रदयस्फोट ।
पुच्छें कवळोनि एकवट । केले पिष्ट निजघातें ॥ ६९ ॥
उडी टाकितां हनुमंत । अवघ्यां एकचि प्राणांत ।
धडधडां पडती पृथ्वीआंत । समवेत रथघोडी ॥ ७० ॥
प्रेतें नुरती भूतळा । अतळ वितळ ना सुतळा ।
हनुमान निजबळें आगळा । रसातळा ते नेले ॥ ७१ ॥
लागतां हनुमंताचा घावो । प्रेतपणा नुरेचि देहो ।
रसातळीं न मिळे ठावो । धाडी महाबाहो वैकुंठा ॥ ७२ ॥

लंकेत विलाप :

ऐसियापरी हनुमंत । निर्दळिले प्रधानसुत ।
बोंब सांगावया नुरे तेथ । केले निर्मुक्त अवघेही ॥ ७३ ॥
दुरोनि पाहती सुह्रदलोक । अवघे करिती महाशंख ।
प्रधानपुत्र एकाएक । रणीं निःशंक मारिले ॥ ७४ ॥
हाकाबोंबाचा कल्लोळ । लंकेमाजी हलकल्लोळ ।
रावणा आली काळवेळ । करील निर्मूळ राक्षसां ॥ ७५ ॥
प्रहस्तादिक मुख्य प्रधान । रावणापासीं येवोनि जाण ।
अवघे करिती शंखस्फुरण । निःसंतान त्वां केलें ॥ ७६ ॥
तो वानर नव्हे केवळ । सीताकोपाग्निकल्लोळ ।
वनीं वाढलासे प्रबळ । राक्षसकुळ निर्दळावया ॥ ७७ ॥

रावणाचा संताप :

प्रधानपुत्रसंतती । रणीं मारिली मारूती ।
तें ऐकोनि लंकापती । चिंता चित्तीं अनिवार ॥ ७८ ॥
जो जो धाडी युद्धाप्रती । त्याची कपि करी समाप्ती ।
मग रावणें पांचही सेनापती । संग्रामार्थी पाठविले ॥ ७९ ॥

यूपाक्ष, विरूपाक्षादि पाच प्रमुख सेनापती मारुतीवर रावणाने धाडलें :

यूपाक्ष विरूपाक्ष दोघे जण । दुर्धर प्रघस भासकर्ण ।
हे सेनानी वीर दारूण । पांच जण दृढ योद्धे ॥ ८० ॥
रावण त्यांसी सांगें युक्ती । तुम्ही दुर्धर वीर पुरूषार्थी ।
वानर धरावा युद्धशक्तीं । तुम्हीं समस्ती मिळोन ॥ ८१ ॥
संमुख येतां प्रधानसुत । त्यांचा वानरें केला घात ।
तुम्हीं बुद्धिबळें प्रतापवंत । युद्धे प्रशस्त करावें ॥ ८२ ॥
चौघे राहूनि चौं दिशांप्रतीं । एकें रहावें नभस्थिती ।
दावोनियां निजशक्ती । युद्धीं मारुती धरावा ॥ ८३ ॥
युद्धीं धरितां नये हाता । तरी करावें त्याच्या घाता ।
ऐसें सांगोनि समस्तां । होय धाडिता लंकेश ॥ ८४ ॥
रथपताका डोलायमान । पांच जण युद्धीं प्रवीण ।
पांचां ठायी विखरोन । युद्ध दारूण मांडिले ॥ ८५ ॥
पांचां ठायी पांच जण । हनुमंतातें वेढोन ।
युद्धा झगटले दारूण । शस्त्रास्त्रीं संपूर्ण हाणित ॥ ८६ ॥
दुर्धर पंचमुख पंचबाण । मस्तकीं विंधिलें संमुख येऊन ।
पाठीशी तो भासकर्ण । हाणी दारूण गदाघात ॥ ८७ ॥
दक्षिणबाहू यूपाक्ष । वामांगी विरूपाक्ष ।
शूळ हाणिती प्रत्यक्ष । कुक्षोपकुक्ष लक्षोनी ॥ ८८ ॥
घ्यावया हनुमंतासीं घस । गगना चढला तो प्रघस ।
बाण वर्षे असमसाहस । जेंवी आकाशीं मेघधारा ॥ ८९ ॥
पांचांची उडी अवचितीं । आली हनुमंताभोंवतीं ।
तेव्हां पुच्छें केली ख्याती । साह्य युद्धार्थी सर्वदा ॥ ९० ॥
भोंवतां पुच्छाचा आवर्त । त्यांच्या शस्त्रां करोनि घात ।
पांचही आकळिले पुच्छाआंत । वीर विख्यात सेनानी ॥ ९१ ॥
जेंवी योगिया आपण । स्वयें निरोधी पंच प्राण ।
तेंवी पुच्छें पांचही जण । आकळोन राखिले ॥ ९२ ॥
जेंवी काळ प्रळयांत । पंचभूतांकरी आवर्त ।
तेंवी पांचही पुच्छाआंत । बांधी हनुमंत वधार्थी ॥ ९३ ॥
जेंवी विवेकी साधुजन । पंचही विषयां करिती दमन ।
तेंवी वीर पांचही जण । पुच्छें गोंवोन राखिले ॥ ९४ ॥
कोपें वानर अति आरक्त । बाळसूर्यासम भासत ।
रागें उपडोनि पर्वत । करील कल्पांत पांचांही ॥ ९५ ॥
पांचही विषय जैं निर्दळिती । तैं सुख पावे परमार्थी ।
वधोनी पांचही सेनापती । सुखें मारूती उल्लासे ॥ ९७ ॥
श्रीरामभक्ताचें आघातीं । अस्थिमांस ना गुणव्यक्तीं ।
अवघे नेलें गुणातीतीं । धन्य मारूती सुखमरण ॥ ९८ ॥
श्रीरामभक्तांचे कौतुक । मारून द्यावें परम सुख ।
कोटि जन्मांचे हरोनि दुःख । सुखदायक संग्रामीं ॥ ९९ ॥

त्यानंतर भुभु:कार करून मारुती मंदिरावर बसला :

निर्दळोनि पांचही जण । भुभुःकारें देवोनि किराण ।
देवालयाचें तोरण । धरोन स्थान बैसला ॥ १०० ॥
पंचभूतांची निवृत्ती । साधका परमानंदप्राप्ती ।
वधोनि पांचही सेनापती । सुखें मारुती उल्लासे ॥ १०१ ॥

ते रावणास कळल्यावर आपला पुत्र अखयाकुमाराची योजना :

मारिले पांचही सेनापती । बोंब गेली लंकेप्रती ।
दचकलासे लंकापती । वानरें ख्याति लाविली ॥ १०२ ॥
पारखें केले अशोकवन । सहजें सीता नेईन हिरोन ।
क्रोधें कांपें दशानन । पाहे आपण कोन धाडूं ॥ १०३ ॥
तंव देखिला समोर । जो कां लाडका अखया कुमार ।
त्यासी सांगे दशशिर । मारीं वानर प्रतापें ॥ १०४ ॥
आज्ञा देतां दशशिर । वेगें निघाला अखया कुमार ।
छत्र पताका ध्वज मनोहर । रहंवर रत्‍नाढ्य ॥ १०५ ॥
आठ वारूं शिरोमणी । हेमबाण सचाप तूणी ।
पाठीसीं राजकुमारश्रेणी । निपुण रणीं रणयोद्धे ॥ १०६ ॥
अंगीं बळाचा गर्व थोर । रथीं बैसोनि अखया कुमार ।
जेथें आहे हनुमान वीर । तेथें सत्वर पैं आला ॥ १०७ ॥
प्रधान आप्त थोर थोर । रावणासीं करिती मरमर ।
मरों धाडिला अखया कुमार । बळें दुर्धर वानर ॥ १०८ ॥

या योजनेबद्दल प्रधानदिक सर्व आप्तस्वकियांचा असंतोष :

चवदा सहस्त्र बनकरां । पुच्छें बांधोनियां भारा ।
मत्स्यमगरां दिधला चारा । आणि किंकरां मारिलें ॥ १०९ ॥
प्रधानपुत्र गर्वभरित । आति बळें सदा कुंथत ।
त्या अवघ्यांचा केला घात । केला निःपात जंबूचा ॥ ११० ॥
घालोनि पुच्छाच्या आवर्ती । पांच मारिले सेनापती ।
अखया बापुडें तें किती । क्षणें मारुती मारील त्या ॥ १११ ॥
तुझा हा लाडका कुमार । जाणोनि हनुमंत करील मार ।
रावणा तूं चुकलासी थोर । तेथें कां कुमार धाडिला ॥ ११२ ॥

अखयाशिवाय दुस‍र्‍या कोणालाही पाठविण्याची विनंती :

दृष्टी पडिलिया हनुमंता । अखया परतेना मागता ।
त्याचे रक्षणीं लंकानाथा । वीरां समर्थां धाडावे ॥ ११३ ॥
रावणें निवडोनियां चोखट । रणरंग दाडिले वीर उद्‌भट ।
महायुद्धाचा कडकडाट । आले निकट हनुमंता ॥ ११४ ॥
रावणें चतुरंग एकवट । निधडे धाडिले महाभट ।
अश्व गज रथी घडघडाट । आले निकट हनुमंता ॥ ११५ ॥
न येतां मागिले वीरांसी । अखया भिडला हनुमंतासीं ।
लघुलाघवें शरधारांसीं । हनुमंतासी आच्छादी ॥ ११६ ॥
अमित बाणीं विंधिला शिरीं । दो बाणी विंधिला भुजांवरी ।
बाण विंधले स्तनावरी । सर्वांग शरीं व्यापिलें ॥ ११७ ॥
तेचि समयीं मागील वीर । वर्षती शस्त्रसंभार ।
तेणें आच्छादिला वानर । दिवाकर जेंवी अभ्रीं ॥ ११८ ॥
गर्जगर्जोनि पर्जन्यधारा । कदा न रूपती गिरीवरा ।
तेंवी राक्षसशरसंभार । अंगीं वानरा न बाधती ॥ ११९ ॥
निधडी हनुमंताची शक्ती । बाण लागतां पिष्ट होती ।
शस्त्रे भंगोनि पडता क्षितीं । रणीं मारूती नाटोपें ॥ १२० ॥
व्यर्थ करोनि शत्रुशस्त्रांसीं । हनुमान उडाला आकाशीं ।
अखयाची शक्ती कैसी । रथ आकाशीं चालविला ॥ १२१ ॥

मारूती आणि अखयाचे आकाशात युद्ध :

कुमार आणि हनुमान वीर । दोघे भिडती निराधार ।
बळ वानिती सुरवर । चक्राकार संग्रामीं ॥ १२२ ॥
रथाचिया गतिविगती । तैसाची पिलंगत मारूती ।
क्षणैक नभी क्षणैक क्षितीं । दुर्धर शक्तीं दोघांची ॥ १२३ ॥
अखया मारूं पाहे हनुमंत । त्यासीं तो घाय नाढळत ।
कपि कुमाराचा करितां घात । त्यासी तो रथ नाटोपे ॥ १२४ ॥
क्षणैक रथ दिसे भूतळीं । क्षणैक दिसे नभ : स्थळीं ।
क्षणैक दिसे समुद्रजळीं । त्रिकूटाचळीं एकक्षण ॥ १२५ ॥
अखया कुमार अति समर्थ । वेडाविला हनुमंत ।
तेणें वानर अति विस्मित । कैसेनि घात करूं याचा ॥ १२६ ॥
तंव बोलती सैन्यसंभार । निधडा योद्धा अखया कुमार ।
जाणोनि धाडी दशशिर । घायें वानर मारील हा ॥ १२७ ॥
ठाकोनियां अखया कुमार । पळो जातां हा वानर ।
आम्हीं धांवोनि संग्राम थोर । तीरमार करूं यासीं ॥ १२८ ॥

मारूतीने शेपटीच्या साहाय्याने अखयाचा रथ, ध्वज, सारथी यांचा नाश केला :

रणीं नाटोपे अखया कुमार । त्यासी मारावयाचा विचार ।
हनुमान विचारी साचार । गुप्त प्रकार तो ऐका ॥ १२९ ॥
कैसेनि मारूं अखयासी । ऐसें विचारिता मानसीं ।
कोप आला पुच्छासी । राजपुत्रासी वधावया ॥ १३० ॥
कामग रथ अखयासी । रणीं नाटोपें तो आम्हांसी ।
पुच्छ लागोनी पाठीसी । रथ चौपासीं बांधिला ॥ १३१ ॥
स्वर्ग मृत्यु कैलासपृष्ठीं । रथ पळवितां संकटीं ।
पुच्छें पुरवोनियां पाठी । कडकडाटीं बांधिला ॥ १३२ ॥
लाता हाणोनि छत्रपात । करतळें ध्वजासीं घात ।
तालवृक्षाचा आघात । भंगिला रथ ते काळीं ॥ १३३ ॥
आंख चक्र रथकुबरू । पोंवळवेलीच्या धुरा थोरू ।
आठही वारू सारथि वीरू । केला चकचूरू एकें घायें ॥ १३४ ॥
पुच्छ नाचविलें धांदडीं । रथ उपडिला कडाडीं ।
अखया कुमारें लवडसवडी । घातली उडी अतिवेगें ॥ १३५ ॥
वोडण खांडें घेवोनि करी । मारावया खड्गधारी ।
धांविन्नला हनुमानावरी । गिरागजरीं गर्जोनी ॥ १३६ ॥
राहें साहें हनुमंता । तुझ्या करीन मी घाता ।
रणीं भंगिलें माझ्या रथा । झणीं श्लाघ्यता मानिसी ॥ १३७ ॥
धाकें थरकत चमकत । वोडणें धडकोनि धांवत ।
खड्ग लघुविद्या तळपत । आला त्वरित अति बळें ॥ १३८ ॥

अखयास धरून, गरगरा फिरवून शिळेवर आपटला, त्यातच त्याचा अंत झाला :

कुमार आणि वानरांसी । क्षण भूमीं क्षण आकाशीं ।
युद्ध होतां अति आक्रोशीं । येरयेरांसी वधावया ॥ १३९ ॥
वानर मारावयाठायीं । अखया उपरमे लवलाहीं ।
हनुमंतें वायुवेगें पाहीं । धरिला पायीं लघुवेगें ॥ १४० ॥
हनुमान अति आवेशीं । भोवंडितां अति आक्रोशीं ।
भोवंडी दाटली तयासीं । देहभावासी विसरला ॥ १४१ ॥
वोडण पडिलें त्रिकूटावरी । खड्ग पडिलें सागरीं ।
मुकुट पडिला सभेमाझारी । अपांपतीं भूषणें ॥ १४२ ॥
आवांकूनी महाबळी । आपटितां शिळातळीं ।
लंकादुर्ग कांपे चळीं । निधा पाताळीं ऊठिला ॥ १४३ ॥
दिग्गजां टाळीं बैसलीं कानीं । पन्नगां पाताळीं पळणी ।
मेरू पडला तुटोनी । कांपे अवनी येणें मानें ॥ १४४ ॥
हनुमान श्रीरामभक्त चिद्रत्‍न । युद्धामाजी कृपाळू पूर्ण ।
अखया न देखें जन्ममरण । ऐसा संपूर्ण मारिला ॥ १४५ ॥
अखया राखावयासाठीं । रावणें धाडिले कोट्यनुकोटी ।
अश्वगज रथ पळतां थाटीं । पुच्छें पाठी पुरविली ॥ १४६ ॥
ऐसा केला कोंडमार । वानरें करोनि शिळामार ।
रणी पाडिले वीर वीर । धरणीं रूधिर प्रवाहे ॥ १४७ ॥
हनुमंतेम ऐशिया रीतीं । केली अवघ्यांची समाप्ती ।
सुरनर ऋषीश्वर वर्णिती । अगाध किर्ती हनुमंताची ॥ १४८ ॥
सुर वर्षती सुमनीं । जयजयकार ऋषिजनीं ।
कीर्ती पावन त्रिभुवनीं । धन्य अंजनीनिजसुत ॥ १४९ ॥
एकाजनार्दना शरण । जाहलें अखायानिर्दळण ।
पुढें इंद्रजितहनुमंतां रण । सावधान अवधारा ॥ १५० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां
हनुमदक्षवधो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
॥ ओव्यां १५० ॥ श्लोक २४ ॥ एवं संख्या १७४ ॥