Ramayan - Chapter 4 - Part 9 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 9

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 9

अध्याय 9

वानरसेनेला श्रीरामदर्शन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

सुग्रीव श्रीरामांना वानरसेनेचा विस्तार समजावून सांगतो :

सुग्रीवें विनविला रघुवीर । सैन्य सेनानी सेनाधर ।
सैन्ययूथपाळ महावीर । नमस्कार करूं पाहती ॥१॥
स्वामि समवेत सौमित्र । पहावा वानरांचा संभार ।
ऐकोनि सुग्रीवांचे उत्तर । जाला सादर श्रीराम ॥२॥

यूथपा दशसाहस्रं वृता वानरकोटिभिः ।
वानयैः पार्वतीयैश्च सामुद्रैश्च महाबलैः ॥१॥

माझे कटकीं दहा सहस्र । सेनानायक सेनाधर ।
एकएकातळीं कोटि वीर । अति दुर्धर रणयोद्धे ॥३॥
उदयास्तगिरिपर्यंत । वानर आले जी समस्त ।
नंदवनींचे वीर विख्यात । आले त्वरित रामाकार्या ॥४॥
सप्तारण्य सप्तसमुद्र । नदीस्रोत वनें उखर ।
तेथोनियां वानरवीर । आले सत्वर रामकार्या ॥५॥
मेरू मंदार आणि विंध्याद्री । वेंकटाद्रि आणि सह्याद्री ।
तेथोनि यावा केला वानरीं । निजगजरीं रामकार्या ॥६॥
हिमाचळ अर्बुदाचळ । गंधमादन आणि श्रीशैल ।
पर्वतीं वानर सकळ । आले तत्काळ रामाकार्या ॥७॥
घेवोनि आपुलाला भार । पृथक् करूं येती नमस्कार ।
स्वामीनें पहावे सादर । वानरवीर रणयोद्धे ॥८॥
शतबळीनामा वानर । सेना दशकोटिसहस्र ।
घेवोनियां वानरभार । केला नमस्कार श्रीरामा ॥९॥
हनुमंताचा पिता सावत्र । केसरिनामा महावीर ।
सेना कोट्यनुकोटि वानर । केला नमस्कार श्रीरामा ॥१०॥
वानराचे जातीआंतौता । केसरी अंजनीचा निजभर्ता ।
तो हनुमंताचा क्षेत्रजपिता । येणें ग्रंथार्था सत्यत्व ॥११॥
हनुमंत वायूचा वीर्यज सुतु । केसरी क्षेत्रत्वें पितु ।
दोहीं बापाचा हनुमंतु । सत्य ग्रंथु वाल्मिकी ॥१२॥
नळ वीरू दहनदीप्त । बालसुर्यासम आरक्त ।
वानरसेना अयुतायुत । वेगें श्रीरघुनाथ वंदिला ॥१३॥
गोळांगूळ असंख्यात । कोट्यनुकोटि लक्षानुलक्ष ।
घेवोनि आला गवाक्ष । श्रीराम संमुख वंदिला ॥१४॥
अभ्रवर्ण अति दुर्धर । धूम्रनामा महावीर ।
घेवोनि सेना शतसहस्र । केला नमस्कार श्रीरामा ॥१५॥
पनस वानर दुर्धर । पर्वतोपम महावीर ।
दशकोटि सहपरिवार । केला नमस्कार श्रीरामा ॥१६॥
मैंद द्विविद दोनी वीर । एका सप्तकोटि परिवार ।
एका अष्टकोटि वानर । केला नमस्कार श्रीरामा ॥१७॥
वीर वानर गंधमादन । साठी कोटि वानरसैन्य ।
घेवोनि आला आपण । केलें नमन श्रीरामा ॥१८॥
तार तेजाचा घडिला । कीं चंद्रबिंबाचा ओतिला ।
तैसा तारवानर शोभला । श्रीरामें देखिला तेजस्वी ॥१९॥
ऐसा तार महावीर । सवें शतकोटि वानरभार ।
घेवोनि आला सत्वर । केला नमस्कार श्रीरामा ॥२०॥
गाळोनि व्योमींची नीळिमा । ओतिली नळाची प्रतिमा ।
सुनीळशोभा प्लवंगमा । जो कां श्रीरामा पढियंता ॥२१॥
सेतुबंधाची अनुवृत्ती । याचेनि हातें शिळा तरती ।
हें जाणोनि श्रीरघुपती । करी अति प्रीती नळासीं ॥२२॥
नामें नील वर्णें नीळ । कांस घातली सुनीळ ।
शतसहस्रकोटि दळ । घेवोनि तत्काळ तो आला ॥२३॥
सुग्रीवदळचा दळपती । नीळ दुर्धरप्रतापशक्ती ।
तेणें येवोनि विनीतवृत्ती । श्रीरघुपती वंदिला ॥२४॥
दधिमुख दुराधर्ष दोनी । अकरा कोटि सेना घेवोनी ।
श्रीरामातें अभिवंदोनी । कर जोडूनी राहिले ॥२५॥
तरू तरळ कुमुद कुमुदाक्ष । गज शरभ गवय गवाक्ष ।
महाहनु इत्यादि प्रमुख । यूथप असंख्य पाहों श्रीरामा ॥२६॥
तारेचा पिता वाळीचा श्वशुर । सुषेण वैद्यराज वानर ।
दहा अयुतें वानरभार । केला नमस्कार श्रीरामा ॥२७॥
जांबवंताचा जेष्ठ बंधु । नामें धूम्र पैं अगाधु ।
रीससैन्यासीं सन्नद्धु । आला साधूं रामाकार्या ॥२८॥
जांबवंत वरि प्रबळ । बाहत्तर कोटि रीस सबळ ।
घेवोनयां निजदळ । आला तत्काळ निजगजरें ॥२९॥
जांबवंत आपण । नित्य करितां रामस्मरण ।
तेचि अस्वलांसी गुणगुण । अनुदिन अहर्निशी ॥३०॥
रामनामाची गुणगुण । तेणें कोंदलें त्रिभुवन ।
महीजीवन पावन । नामें गगन कोंदलें ॥३१॥
देखोनियां जांबवंत वीर । श्रीरामसौमित्रां आल्हाद थोर ।
त्यासी स्वयें श्रीरामचंद्र । पुसे विचार निजविजया ॥३२॥
नामापासीं  नित्य कीर्ती । नामापासीं नित्य शांति ।
नामापासीं विजयवृत्ति । भवनिर्मुक्ति रामानामें ॥३३॥
ऐसें जाणोनि श्रीरघुनाथ । आप्त मानी जांबवंत ।
त्यांसी करोनि नित्य एकांत । निजविजयार्थ साधावया ॥३४॥
ऐसे वानरांचे भार । श्रीरामें देखिले अपार ।
तंव जाला अति गजर । तुरें अपार लागलीं ॥३५॥

ततः पद्महस्रेण वृत्तः शंखशतेन च ।
युवराजोंऽगदः प्राप्तः पितृतुल्यपराक्रमः ॥२॥

निशाणें त्रहाटिली लवलाहीं । ढोल टिमक्या बुरंगे पाहीं ।
गिडिबिडिती ठायींच्या ठायीं । विराणीं पाहीं वाजती ॥३६॥
काहळा आणि रणकाहळा । शंख त्राहाटिला भूगोळा ।
महागजर भेरींचा जाला । अंगद झाला युवराजा ॥३७॥
तडक फुटले एकसरें । वोडणें भिंडिमाळांचे पागोरे ।
खाखाइलीं रणतुरें । भुभुःकारें गिरि गर्जे ॥३८॥
पद्म महापद्म जाणा । शंखशब्दे असंख्यगणना ।
अंगदाची वानरसेना । आंगवण दाटुगी ॥३९॥
वृक्ष उन्मूळिले सहसुमनां । श्वेत पीत केतक वानरसेना ।
शालतालवृक्षकर्दळीपाना । ध्वजा संपूर्णा शोभती ॥४०॥
किंशुक फुलले आरक्त । अगस्तिवृक्षीं सुमने श्वेत ।
कांचन फुलले श्वेत पीत । तेणें सैन्यांत अति शोभा ॥४१॥
ऐसा निजसेनासंभार । त्यामाजी अंगद राजकुमार ।
युवराज मनोहर । श्वेतच्छत्र रत्‍नांक ॥४२॥
कनकदंडयुग्मचारी । आरुढला रथावरी ।
ध्वजीं मुक्ताफळें झालरी । जयजयकारीं चालिला ॥४३॥
हैकार थैकार जैकार । तळपत चमकत चमत्कार ।
वृक्ष झेलिती अपार । देती वानर किराणें ॥४४॥
वानरवीर अति सावध । शालतालशिळायुद्ध ।
महावीर पैं उन्नद्ध । सन्नद्ध बद्ध दळभार ॥४५॥
रथ लोटिले घडघडाट । वानरसेनेचा पैं थाट ।
वीर चालिले उद्‌भट । कडकडाट सैन्याचा ॥४६॥
वाजंत्रांचा नाद गंभीर । वानरीं केला भुभुःकार ।
दुर्धरदेनानिजसंभार । अंगद वीर पैं आला ॥४७॥
वाळिबळें सबळबळ । अंगद आला समदळ ।
वीर परुषार्थी प्रबळ । दुर्धर मेळ युद्धाचा ॥४८॥

सुग्रीव व अंगदाचे स्वागत :

देखोनि अंगदाचा यावा । सुख जालें श्रीराघवा ।
सुख सुग्रीवाच्या जीवा । सुख सर्वां सुरनरां ॥४९॥
अंगदें सांडोनियां रथा । श्रीरामचरणीं ठेविला माथा ।
श्रीरघुनाथही उल्लासता । होय आलिंगिता अंगदासी ॥५०॥

अंगदाकडून सुग्रीवाची स्तुतीः

चुंबोनि अंगदाचें वदन । श्रीरामें दिधलें आलिंगन ।
तेणें त्यासी समाधान । सुखसंपन्न श्रीरामें ॥५१॥
केलें सुग्रीवासी नमन । सुग्रीवें दिधलें आलिंगन ।
अंगदे सुग्रीवा समाधान । सुखसंपन्न श्रीरामें ॥५२॥
सुग्रीवे करविलें वाळिघाता । हा द्वेक्ष नाठवे अंगदाचे चित्ता ।
श्रीरामें उद्धरिला माझा पिता । त्यासी मुख्य कर्ता सुग्रीव ॥५३॥
वाळिजन्मशतांच्या कोडी । सुग्रीवें तोडविली ते बेडी ।
श्रीरामसुखाची निजगुढी । उभविली रोकडी वाळीनें ॥५४॥
आम्ही पावलो श्रीरघुनाथा । हाही सुग्रीवधर्म तत्वतां ।
पित्याहूनि अधिक चुलता । आम्हां समस्तां उद्धरिलें ॥५५॥
ज्याचेनि पाविजे परमार्था । तोचि माझा सखा पिता ।
सुग्रीवाहूनि परता । सखा सर्वथा मज नाहीं ॥५६॥
सुग्रीवें वंश उद्धरिला । सुग्रीव वानरसखा अवतरला ।
पुढती सुग्रीवाच्या चरणा लागला । अंगदा जाला वंदिता ॥५७॥
ऐकोनि अंगदाचें वचन । सुग्रीवासी आलें रुदन ।
अंगद वंशासीं सुखनिधान । मी सुखसंपन्न अंगदें ॥५८॥
ऐसे सुग्रीव बोलोन । अंगदासी दिधलें अलिंगन ।
सभेद द्वेष गेला विरोन । सुखसंपन्न श्रीरामें ॥५९॥
वानरांचा उल्लास व लीला, रामांचा उपहासः
देखोनि अंगदाचा दळभारू । नळनीळादि प्रधान वानरू ।
अवघीं केला जयजयकारू । श्रीरामाचंद्र वंदिला ॥६०॥
एक फळ ठेविती श्रीरामापुढें । एक वानर घेवोनि तें उडे ।
संमुख बैसोनि रामापुढें । खाती निवाडें विटंबिती ॥६१॥
वांकुल्या दाविती रामापुढें । डोळे मिचकाविती लक्ष्मणापुढें ।
सुग्रीवा घुलकाविती रोखडें । नाचें उडती किळकिळित ॥६२॥
श्रीरामें हारवोनि सीता । ऐसा ऐसा रडत होता ।
उकसाबुकसी होय स्फुंदता। पडे मूर्च्छित सीते सीते ॥६३॥
वानरचेष्टा श्रीरघुनाथ । देखोनि खदखदां हांसत ।
हांसतां सौमित्र मूर्च्छित । चेष्टायुक्त वानर ॥६४॥

मारुतीची स्तुती :

देखोनि वानरांचे भार । सुखी जाला श्रीरामचंद्र ।
तंव येवोनि पवनपुत्र । केला नमस्कार श्रीरामा ॥६५॥
सुग्रीव सांगे निजनिवाडे । सकळ सैन्य एकीकडे ।
न तुके हनुमंताचेनि पाडें । अति बळ गाढें हनुमंताचें ॥६६॥
हनुमंताच्या बळापुढें । सकळ सैन्य तें बापुडें ।
फोडिलें राहूचें जाभाडें । रवि यापुढें चळीं कांपे ॥६७॥
वाळीचे निवारण मारूतीने कां केले नाहीः
ऐकोनि सुग्रीवाची मात । श्रीराम जाला विस्मित ।
आतुर्बळी हा हनुमंत । श्रीरघुनाथ स्वयें जाणे ॥६८॥
असतां निजसखा हनुमंत । तुझा साधावया कार्यार्थ ।
वाळीचा केला नाहीं घात । तो वृत्तांत मज सांगें ॥६९॥
ऐसें पुसतां सुग्रीवासी । तंव तेथें आला अगस्ति ऋषी ।
देखोनि सकळ वानरांसी । भेटे विशेषीं श्रीरामा ॥७०॥

अगस्तींचे आगमन व रामांच्या प्रश्नाला उत्तर :

पर्वविशेषीं स्नानासी । पंपे आला अगस्ति ऋषी ।
देखोनियां श्रीरामासी । आला उल्लासीं भेटावया ॥७१॥
ऋषीस देवोनि सन्मान । श्रीरामें केलें अभिवंदन ।
मग बैसवोनि सावधान । केला प्रश्न श्रीरामें ॥७२॥
सुग्रीवसखा हनुमंत । असतां अतुर्बळी वीर्यवंत ।
वाळीचा केला नाहीं घात । तो वृत्तांत मज सांगें ॥७३॥
हनुमंताचे जन्मकथन । नारदें सांगितलें संपूर्ण ।
तें मी सांगेन आपण । सावधान अवधारीं ॥७४॥
हनुमंताचे जन्मकर्म । बाळपणीं अति पराक्रम ।
कथा रम्य मनोरम । श्रोता संपूर्ण श्रीराम ॥७५॥
हनुमंताचें बाळकिराण । ग्रासूं गेला रविबिंब पूर्ण ।
ते कथा परम पावन । एकाजनार्दन विनवीत ॥७६॥
रामायणींचा एक एक श्लोक । वेदशास्राहूंनी अधिक ।
एकलें रामनाम एक । होय छेदक जन्ममरणा ॥७७॥
ऐसी रामायणींची कथा । अगस्ति वक्ता श्रीराम श्रोता ।
जन्मप्रयोग हनुमंता । होय सांगता ऋषिवर्य ॥७८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
सर्वसुग्रीवसेना श्रीरामदर्शनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
॥ ओव्या ७८ ॥ श्लोक २ ॥ एवं ८० ॥