Ramayan - Chapter 4 - Part 5 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 5

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 4 - किष्किंधाकांड - 5

अध्याय 5

वालीकडून सुग्रीवाचा पराभव

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

वालीच्या सामर्थ्याने सुग्रीवाला भीती :

पुढती वाळीच्या संत्रासीं । सुग्रीव सांगे श्रीरामापासीं ।
हृतराज्य गुप्त वनवासी । तेथेंही आम्हांसी मारूं धांवे ॥१॥

तेनाहमपविद्धश्च हृतदारश्च राघव ।
तद्‌भयाश्च महीं कृत्स्नां विचरामि समंततः ॥१॥
ऋष्यमूकं गिरिवरं भार्याहरणदुःखितः ।
प्रविष्टोऽस्मि दुराधर्ष वालिनः कारणान्तरे ॥२॥

आम्हीं जावें जेथ जेथ । वाळी मागें धावें तेथ तेथ ।
आमचा करावया जीवघात । वैर पोटांत दृढ धरिलें ॥२॥
वालिभयें भयभीत । अहोरात्र असों गुप्त ।
पाळती येवोनियां तेथ । शुद्धि सांगत वाळीसी ॥३॥

त्यामुळे सुग्रीव ऋषमूक पर्वताचा आश्रय घेतो :

भयें भोंवतां दशदिशीं । नारदें सांगीतलें आम्हांसी ।
जावोनि रहावें ऋषमूक पर्वतांसी । तेथें वाळीसी ऋषीशाप ॥४॥
ऐक शापाचे कारण । दुंदभि बळें उन्मत्त पूर्ण ।
वाळीपासीं येवोनि आपण । युद्ध दारूण मांडीलें ॥५॥

संगृहीत्वा विषाणाभ्यां दुंदुभिं गिरिसन्निभम् ।
पातयामास तं वाली क्षितौ पंचत्वमागतः ॥ ३ ॥
चिक्षेप बलवान्वाली पादेनैकेन योजनम् ।
तस्य वेगप्रविद्धस्य वाक्त्रात्क्षतजबिंदवः ॥ ४ ॥
प्रपेतुर्मारुतोत्क्षिप्ता मतंगस्याश्रमं प्रति ।
तान् दृष्ट्वा पतितांस्तत्र मुनिःशोणितदिप्रुषः ॥ ५ ॥
उत्ससर्ज महाशापं क्षेप्तारं वालिनं प्रति ।
इह तेनाप्रवेष्टव्यं प्रविष्टस्य वधो भवेत् ॥ ६ ॥

त्या संबंधी शापाचे मूळ कारण :

वेगीं धरोनि दुंदुभीसी । वाळीनें आपटितां भूमीसीं ।
घाये सांडवोनि प्राणांसी । पंचत्वासी पावविला ॥६॥
वाळीनें वेगें वामपदेंसी । दुंदुभि उडविला आकाशीं ।
मतंग ऋषीच्या आश्रमासी । रुधिर त्यापासीं पैं स्रवलें ॥७॥
स्रवतां देखोनि रुधिरासी । कोप आला मतंगऋषीसी ।
तेणें शापिलें वाळीसी । अति आक्रोशीं सक्रोध ॥८॥
ज्याचिया आघातनिजशक्तीं । अशुद्ध स्रवे आश्रमाप्रती ।
त्यासी रिघतां या पर्वतीं । मरण निश्चितीं पावेल ॥९॥
पाय लावितां ऋष्यमूकासी । शापें मरण आहे वाळीसी ।
नारद सांगोनि सुग्रीवासी । धाडी वस्तीसी ऋष्यमूका ॥१०॥
ऋष्यमूकीं करितां वसती । होईल वालिमयाची निवृत्ती ।
थोर पावाल यश कीर्ती । श्रीरघुपतिप्रसादें ॥११॥
नारदवचनें ऋष्यमूकीं । निर्भय राहिलों निजसुखी ।
वाळिभयाची धुकधकी । येथें निःशेकी असेना ॥१२॥
शापभय घेवोनि पोटीं । वाळी ऋष्यमूक न पाहे दृष्टीं ।
येथें यावयाची न करी गोष्टी । सुखसंतुष्टीं असों आम्ही ॥१३॥
नारदवचनाची वचनोक्ती । आजि मज आली प्रतीती ।
तूं भेटलासी कृपामूर्ती । आम्हीं त्रिजगतीं निजविजयी ॥१४॥

एतत्ते सर्वमाख्यातं विरोधे कारणं महत् ।
अनागसा मया प्राप्तं स्थानं निर्भयमात्मनः ॥७॥

वैराचे मुख्य कारण :

सर्व वैराचें कारण । मुख्य माझे दारहरण ।
तें म्यां सांगितलें संपूर्ण । निर्भयस्थान ऋष्यमूकीं ॥१५॥
माझी भार्या जे का रुमा । ते मज पंढियंती जैसा आत्मा ।
ते सोडविल्या श्रीरामा । सुखसंभ्रमा पावेन ॥१६॥
तारा निजपत्‍नी वाळीसी । तेणे सुख भोगावे तियेसीं ।
रुमा माझी मज द्यावी गौरवेसीं । वैर दोघांसीं असेना ॥१७॥
आम्हां दोघा व्यर्थ विरोध । स्रीहरणें वैरसंबंद ।
सासामासीं करितां युद्ध । पडियेलें द्वंद्व स्रीलोभें ॥१८॥
बहुत युद्ध त्यासीं आम्हांसीं । नेमस्त करितां सासामासी ।
सुटका नव्हे निजपत्‍नीसी । उकसाबुकसीं स्फुंदत ॥१९॥
देखोनि सुग्रीवाचें रुदन । श्रीराम काढी निर्वाणबाण ।
घायें वाळीचा घेईन प्राण । सत्य जाण सुग्रीवा ॥२०॥
वाळी सबळ बळवाहन । आतुर्बळी श्रीरघुनंदन ।
दोघे जण समसमान । न्यून पूर्ण असेना ॥२१॥

वालीचा वध करण्याचे तीन पर्याय :

पैल दुंदभिकलेवर जाण । अंगें उचली जो आपण ।
त्याचेनि हस्तें वालिमरण । मातंगी ऋषि भाषे ॥२२॥
सप्तताड विषम वन । एकें बाणें करी जो छेदन ।
त्याचेनि हस्तें वालिमरण । ऋषि भाषे मातंगी ॥२४॥

एवमुक्तवतस्तस्य सुग्रीवस्य महात्मनः ।
राघवो दुन्दुभेः कायं वामांगुष्ठेन चालयन् ॥८॥
लीलयैव महावीर्यश्चिक्षेप दशयोजनम् ॥९॥

दुंदुभीचा मृत देह डाव्या पायाच्या अंगठ्याने रामांनी उडविला :

ऐकोनि सुग्रीवचहन । स्वयें श्रीराम हास्यवदन ।
दुंदुभिकलेवर गिरिसमान । देखिलें आपण श्रीरामें ॥२५॥
तें वामांगुष्ठें उचलोन । केलें त्रिवार तोलन ।
स्वलीला सांडितां हेळसोन । दश योजन उडविलें ॥२६॥
दुंदुभिकाय अति समर्थ । श्रीरामें उडविलें अंगुष्ठवत ।
तरी सुग्रीव साशंकित । बोले भयभीत तें ऐका ॥२७॥

आर्दं समांसं प्रत्यग्रं क्षिप्तं कायं च वालिना ।
सांप्रतं लघु निर्मांसं क्षिप्तं कायं त्वयाद्य वै ॥१०॥
नात्र शक्यं बलं ज्ञातुं तंव वा तस्य वाधिकम् ।
तालानेतान्सुनिर्भिद्य भवेद्व्यक्तिर्बलाबले ॥११॥

परंतु शुष्क कलेवर उडविल्याने सुग्रीवाचे समाधान झाले नाही :

वाळींने मारोनि दुंदुभीसी । मांसरक्तसार्द्रासी ।
पायें उडविलें आकाशीं । आम्हां सर्वांसी देखतां ॥२७॥
आतां तुवां श्रीरघुनाथा । दुंदुभिकाय अति शुष्कता ।
वाळून जाला अति लघुता । तो पदघातें उडविला ॥२८॥
ऐसेंही आम्हां देखतां । लक्षेना बळाबळता ।
विशाल ताड एकें बाणें छेदितां । तैं वाळिहंता तूं होसी ॥२९॥
रामाने बाणाने केलेले सात तालवृक्षांचे छेदनः
संदिग्ध वानरवचन । ऐकोनि श्रीरामें चढवोनि गुण ।
गुणीं लाविला फणीबाण । तालच्छेदन करावया ॥३०॥
विषम तालांची ताडस्थिती । शेषपृष्ठीवरी उत्पत्ती ।
त्यांसी छेदावया श्रीरघपती । केली युक्ती ते ऐका ॥३१॥
धनुष्य ओढोनी आपण । चेपिला लक्ष्मणाचा चरण ।
तेणें चुकवितां अंग संपूर्ण । विषम ते सम ताड झाले ॥३२॥
शेषावतार लक्ष्मण तेणें । अंग चुकवितां संपूर्ण ।
विषम ताड झाले समान । श्रीरघुनंदनें छेदितां ॥३३॥

स गृहीत्वा धनुर्घोरं शरमेकं च राघवः ।
तालन्भित्वा गिरींश्चैव प्रविवेश रसातलम् ॥१२॥

धनुष्य वाहूनि दुर्धर । गुणीं लाविला अमोघ शर ।
बाण सोडीतां श्रीरामचंद्र । जालें विचित्र तें ऐका ॥३४॥
सप्ततालांते छेदूनीं । गिरीवरातें विदारूनी ।
सप्तपाताळ भेदूनी । गेला निघोनि शषांगा ॥३५॥
शेषाचे आंगीं तालमूलता । त्यांते झाला समूळ छेदिता ।
परतोनि येवोनि श्रीरामहाता । रिघोनि भातां स्वस्थ राहे ॥३६॥

त्यामुळे सर्वांना विस्मय व आनंद :

श्रीरामें छेदिले विषम ताळ । तेणें सुग्रीवा सुखकल्लोळ ।
जयजयकारें गर्जती सकळ । आम्ही सबळ श्रीरामें ॥३७॥
भवभय ताडविषमता । श्रीरामदृष्टीं होय समता ।
विषम ताड श्रीराम छेदिता । सुख समस्ता कपिकुळा ॥३८॥
श्रीराम आम्हां सुखसंपत्ती । नीराम आम्हां निजविश्रांती ।
श्रीराम आम्हां साह्यार्थी । निजसांगाती श्रीराम ॥३९॥
श्रीराम आम्हां जिवलग सोयरा । श्रीराम निजात्मा वानरा ।
श्रीराम स्वामी चराचरां । वंद्य सुरवरां श्रीराम ॥४०॥
ऐसें बोलोनि आपण । सुग्रीवें घातलें लोटांगण ।
श्रीरामें दिधले आलिंगन । समाधान जीवशिवां ॥४१॥

श्रीराम सुग्रीवास वालीला युद्धाचे आव्हान देण्यास सांगतात :

श्रीराम म्हणे सुग्रीवासी । पुढें जावोनि किष्किंधेसी ।
वाळीतें पाचारीं युद्धासी । तुझे पाठीसीं मी असें ॥४२॥
वाळी आलिया संग्रामासीं । बाणें निवटीन क्षणार्धेसी ।
तूं तंव भिवों नको त्यासी । निःशंकतेसी युद्ध करीं ॥४३॥
सुग्रीवा वाळीसीं युद्ध करितां । विसरूं नको मज रघुनाथा ।
जयो पावसी सर्वथा । सत्वर वचन माथां वंदिलें ॥४४॥

सुग्रीवाचा भुभुःकार ऐकून वालीचे आगमन :

ऐसें सांगतां श्रीरघुवीर । सुग्रीवें केला भुभुःकार ।
कौतुक पाहे श्रीरामचंद्र । वाळी वानर मी मारीन ॥४५॥
वाळी बळिया अति बळी । मीही श्रीराम आतुर्बळी ।
आजि वाळीची करीन होळी । रणखंदळी पाहे माझी ॥४६॥

एवमुक्त्वा तु सुग्रीवं शूरौ तौ नरवानरौ ।
जग्मतुःसहातौ शीघ्रं किष्किंधां वालिपालिताम् ॥१३॥
ते सर्वे सहसा गत्वा रामसुग्रीवलक्ष्मणाः ।
वृक्षैरात्मानमावृत्य ह्यतिन्गहने वने ॥१४॥

ऐसे बोलतां सुग्रीवासीं । सवेग उठिला सौमित्रेंसीं ।
येवोनि किष्किंधाप्रदेशीं । वाळिवधासी उद्यत ॥४७॥
एका सखा जिवलग सौमित्र । दुजा सुग्रीव सन्मित्र ।
दोघे घेवोनि वेगवत्तर । श्रीरामचंद्र निघाला ॥४८॥
एक जाले नरवानर । वानरवीरांचा संभार ।
अवघे करिती जयजयकार । किष्किंधाद्वार ठाकिलें ॥४९॥
श्रीराम सुग्रीव आणि सौमित्र । तिघे चालती एकत्र ।
आनंदे गर्जती वानर । किष्किंधाद्वार पावले ॥५०॥
जेंवी आत्मा देहाआंत । असोनि न देखती समस्त ।
तेंवी श्रीराम त्या वानरांत । ठेविला अति गुप्त जनदृष्टीं ॥५१॥
वालिसुग्रीवयुद्ध अतिदुर्धर । पहावया श्रीरामचंद्र ।
वनीं वसोनि अगोचर । नरवानर न देखती ॥५२॥
निकट न देखती नरवीर । देखों न शकती ऋषीश्वर ।
त्यांसी केंवी देखे वाळी वानर । अगोचर श्रीराम ॥५३॥
गोचरा न दिसे अगोचर । हें तंव मूळींचेंचि ब्रह्मसूत्र ।
जवळी असतां श्रीरामचंद्र । नरवानर न देखती ॥५४॥
असो हे कथा अति विस्तार । श्रीराम कोणा नव्हे गोचर ।
साधु जाणती हा विचार । श्रीरामचंद्रगुह्य गुप्त ॥५५॥
सुग्रीवें घालोनियां कांस । पाहोनि श्रीरामाची वास ।
भुभुळकारें अति उल्लास । नांदे आकाश दुमदुमिलें ॥५६॥
सुग्रीवाच्या गिरागजरें । दिवसा पडती नक्षत्रें ।
डळमळिलीं मेरुशिखरें । गिरिकंदरें दुमदुमलीं ॥५७॥
दिग्गजांची बैसलीं टाळीं । नादें गजबजिला वाळी ।
ऐसा कोण आला बळी । प्रळयआरोळी देवोनी ॥५८॥
दूत सांगती वाळीसी । सुग्रीव आलासे युद्धासी ।
हें सामर्थ्य नाहीं त्यासी । शक्ती अनारिसी दिसतसे ॥५९॥
त्यासी कोणी भेटला बळी । त्याचेनि देतो महा आरोळी ।
ऐसें विचारोनि वाळी । कांस तत्काळीं घातली ॥६०॥
आजिचें युद्ध अति संकटीं । विजयमाळा घातली कंठीं ।
तरी धाकतसें पोटीं । आरोळी मोठी ऐकोनी ॥६१॥
आजि मरणें कीं मारणें । दोहींचें वैर आजि छेदणें ।
ऐसा निश्चय करोनि तेणें । युद्धा येणें क्रोधें ॥६२॥

श्रुत्वा तु निनदं भ्रातुः कुद्धो वाली महाबलः ।
निष्पपात सुसंरब्धो भास्करोऽस्ततटादिव ॥१५॥
ततः सुतुमलं युद्धं वालिसुग्रीवयोरभूत् ।
तलैरशनिकल्पैश्च वज्रकल्पैश्च मुष्टिभिः ॥
जघ्नतुः समरेऽन्योन्यं भ्रातरौ क्रोधमूर्च्छितौ ॥१६॥

दोघांचे घनघोर युद्ध :

ऐकोनि सुग्रीवाची आरोळी । युद्धा क्रोधें आला वाळी ।
दोघे भिडती क्रोधानळीं । महाबळी वानर ॥६३॥
वालिसुग्रीव युद्धव्युपत्ती । ब्रह्मादि देव पाहूं येती ।
नभ दाटलें विमानपंक्तीं । दोहींची शक्ती लक्षावया ॥६४॥
समानबळ दोहीं वीरीं । युद्धव्युत्पत्ती दोघां पुरी ।
कवणा जया कवरा हारी । पाहूं सुरवरीं येइजें ॥६५॥
दोघां होतां दृष्टादृष्टी । क्रोपोद्‌भव उठिला पोटीं ।
समबंधुत्वा पडिली तुटी । स्रीलोभासाठीं अपघात ॥६६॥
जेंवी ग्रहणपर्वणीसीं । ग्रासूं धांवे राहू सूर्यासी ।
तेंवी वाळी सुग्रीवासी । निर्दळावयासी धांवत ॥६७॥
वाळी पर्वत हाणी दारुण । सुग्रीव मुष्टिघातें करी चूर्ण ।
शाल ताल मानी कोण । रणमदें पूर्ण उन्मत्त ॥६८॥
दोहींची अदट आंगवण । अंग घटलें करितां रण ।
घाय हाणिती दारूण । भ्यांडांचें प्राण निघो पाहती ॥६९॥
वज्रपाय कराभिघाता । निष्ठुर मुष्टि हाणिती माथां ।
परस्परें तडवे देतां । अति निघाला पेटले ॥७०॥
दंडीं मुंडपीं उरीं शिरीं । घाय हाणिती शिरोदरीं ।
जानु हाणिती उरावरी । ताडिती कोंपरीं येरयेरां ॥७१॥
दोघां जेत्यांचा आवांका । लाविती पुच्छांचा तडाका ।
परस्परें हाणिती थडका । उठला धडका अंतराळीं ॥७२॥
एका एका तळीं वरी । दोघे तळपती चक्रापरी ।
दोघे उसळती गगनोदरीं । निराधारीं भिडती ॥७३॥
घाय हाणिती महाबळीं । न्याहो उठिला पाताळीं ।
कृतांताची बैसली दांतखिळी । देता आरोळी गर्जोनी ॥७४॥
क्षण एक युद्ध पृथ्वीवरी । क्षण एक युद्ध गगनोदरीं ।
युद्धमाघवता वानरीं । सुरासुरीं विस्मयो ॥७५॥
बाप बळिये दोघे वानर । वीर धीर महाशूर ।
दोघे योद्धे अति दुर्धर । येरयेरां नाटोपती ॥७६॥

धनुरादाय काकुत्स्थस्तावुभौ समुदैक्षत ।
अन्योन्यसदृशौ वीरावुभौ देवाविवाश्विनौ ॥१७॥
यन्नावगच्छत्सुग्रीवं वालिनं वापि राघवः ।
ततो न कृतवान्बुद्धिं मोक्तुमंतकरं शरम् ॥१८॥

दोघात कमालीचे साम्य असल्यामूळे श्रीरामास बाण सोडता येईना :

दोघे वीर रणप्रवीण । देखोनि वानरांचें रण ।
संतोषला श्रीरघुनंदन । बळ समान दोहींचें ॥७७॥
दोघे वानर अनन्य । सबळ बळें समसमान ।
देखोनि श्रीरामें योजिला बाण । वाळी विंधोन मारावया ॥७८॥
तंव वाळी सुग्रीव दोघे जण । ठाणमाण वर्णलक्षण ।
रुपरेखा समसमान । कोणास बाण विंधावा ॥७९॥
जैसे कां दोघे अश्विनौ देव । समरुप समानभाव ।
तैसेचि वाळीसुग्रीव । समावयव सारिखे ॥८०॥
श्रीराम सज्जूनियां बाण । स्वयें जाला विस्मयापन्न ।
दोघांमाजी वाळी कोण । कोणासी आपण वधावें ॥८१॥
न कळोनियां विंधूं जातां । अवचट जालिया सुग्रीवघाता ।
तेव्हां मी जालों विश्वासंहता । भाकही वृथा होय माझी ॥८२॥
बाण लागलिया अवचितां । श्रीरामें मारिलें शरणागता ।
ऐसें निंद्यत्व बैसेल माथां । क्षोभ समस्तां पूर्वजांसी ॥८३॥
मुख्य क्षोभेल हरिश्चंद्र । शिबी भगीरथ पृथु नरेंद्र ।
काकुस्थ दिलीपादि नृपवर । वंसीचे समग्र क्षोभती ॥८४॥
रुक्मांगद धर्मांगध । सूर्यवंशींचे वीर अगाध ।
अवघे क्षोभती प्रबुद्ध । केलें विरुद्ध श्रीरामें ॥८५॥
शरणागता वज्रपंजर । मिथ्या मिरवी श्रीरामचंद्र ।
ऐसें निंदितील सर्वत्र । लागल्या शर सुग्रीवा ॥८६॥
ऐसें विचारोनि जाण । श्रीराम न विंधीच बाण ।
तंव वाळीनें केलें आन । जयो आपण पावावया ॥८७॥
वीर्य धैर्य आंगवण । सबळ बळें दोघे समान ।
वाळीनें जाणोनि आपण केलें विंदान । निजविजया ॥८८॥
सुग्रीव नाटोपे निजबळें । वाळीस कळलें युद्धसमेळें ।
मग दाखविलें वरदमाळे । जयकाळें विजयार्थीं ॥८९॥
युद्ध करितां वर्षानुवर्षी । श्रम खेद नव्हे दोघांसी ।
वाळी जाणोनि मानसीं । मग माळेसी प्रयोजी ॥९०॥

एतस्मिन्नंतरे भग्नः सुग्रीवस्तेन वालिना ।
अपश्यद्राघवं नाथमृष्यमूकं ययौ जवात् ॥१९॥

बहुतकालपर्यंत युद्ध झाल्याने सुग्रीव सुवर्ण-माळेपुढे मूर्च्छित :

होता विरदमालादर्शन । सुग्रीवशक्ति झाली क्षीण ।
भोंवडी येवोनि पडे आपण । मूर्च्छित पूर्ण ऋष्यमूकीं ॥९१॥

कष्टाने ऋष्यमूक पर्वतात पडला :

रणीं मूर्च्छित पडतां पहा हो । सुग्रीवें सांभाळिला आवो ।
उडोनि ऋष्यमूकीं पहा हो । पडे माहबाहो मूर्च्छित ॥९२॥
करावया सुग्रीवाचा अंत । वाळी रिघों न शकें ऋष्यमूकांत ।
वाळी निजविजयें गर्जत । व्यर्थ रघुनाथ साह्य केला ॥९३॥

सुग्रीव उद्विग्न व त्याचा रामांवर आरोप :

धरोनि श्रीरामांचें बळ । मगसीं करूं आलासी सळ ।
युद्धीं केलासी विकळ । व्यर्थ तळमळ कां करिसी ॥९४॥
मजसीं करावया संग्राम । सन्मुख राहों न शके राम ।
सांडी स्रीराज्याचा भ्रम । व्यर्थ श्रम करूं नको ॥९५॥
सुग्रीवा दिधलें रे जीवदान । न मारीं ऋक्षराजाची आण ।
ऐसें वाळी गर्जोन । गेला निघोन किष्किंधे ॥९६॥
विजयाच्या जयजयकारीं । वाळी प्रवेशला नगरीं ।
सुग्रीव ऋष्यमूकामाझारीं दुःखेंकरीं विलपत ॥९७॥

अपश्यद्राघवं नाथमृष्यमूकं प्रदुद्रुवें ।
क्लांतो रुधिरसिक्तांगः प्रहारैर्जर्जरीकृतः ॥२०॥
राघवोऽपि सह भ्रात्रा सह चैव हनूमंता ।
तदेव वनमागच्छत्सुग्रीवो यत्र वानरः ॥२१॥

वानरांचा संभ्रम :

सुग्रीव पडतांचि मूर्च्छित । वानर झाले हाहाभूत ।
वाळिभयें भयभीत । वानरें पळत ऋष्यमूकीं ॥९८॥
वाळिच्या घायीं जर्जरीभूत । रक्तें न्हाणिला धगधगीत ।
सुग्रीव अति दुःखें विलपत । साह्य रघुनाथ नव्हेचि ॥९९॥
वाळिवधाचा आक्रम । श्रीरामें दावोनि पराक्रम ।
करविला युद्धधर्म । अति दुर्गम वाळीसी ॥१००॥

सुग्रीवाचा शोक आणि श्रीरामास दूषण :

वाळी वधावया तत्काळ । धरोनि श्रीरामांचे बळ ।
निःशंक युद्ध केलें तुंबळ । अति सबळ वाळीसीं ॥१०१॥
श्रीरामबळाचा निजनेट । युद्ध केलें कडकडाट ।
श्रीरामें पाहिला माझा शेवट । घायवंट जंव पडें ॥१०२॥
वालीनें केला जर्जरीभूत । तरी साह्य नव्हे श्रीरघुनाथ ।
दैवें आलों ऋष्यमूकांत । येर्हवीं प्राणांत पावतों ॥१०३॥
पडतों ऋष्यमूकाबाहेरी । तरी वाळी मारिता क्षणामाझारीं ।
श्रीराम होवोनि साहाकारी । रणद्वारीं गांजिलो ॥१०४॥
श्रीरामाचें साह्यबळ । रणरंगी जालें विफळ ।
सुकली कृपेची पैं ओल । पायीं सखोल गांजिलो ॥१०५॥
श्रीरामें हारविली निजकांता । तो मज साह्य होईल आतां ।
वृथा बोलणें श्रीरघुनाथा । मज तत्वतां मानलें ॥१०६॥
श्रीराम सत्य सर्वज्ञ । राज्य त्यजोनि आला वना ।
तोही माझिया संरक्षणा । मिथ्याप्रतिज्ञ होवोनि ठेला ॥१०७॥
ऐसा सुग्रीव विलपत । तंव लक्ष्मणहनुमंतांसमवेत ।
तेथें आला श्रीरघुनाथ । कृपावंत कृपाळू ॥१०८॥

आह्यायस्वेति मामुक्त्वा दर्शयित्वा च विक्रमम् ।
वैरिणा घातयित्वां मां किंत्विदानीं करिष्यसि ॥२२॥

स्वमुखें सांगे श्रीरघूनाथ । वाळीसी पाचारीं युद्धार्थ ।
दृष्टीं पडतांचि करीन घात । तुझा कार्यार्थ साधीन ॥१०९॥
ऐसें बोलोनि आपण । वाळीसीं मज लाविलें रण ।
घायी माझा निघतां प्राण । साह्य संपूर्ण नव्हेचि ॥११०॥
आतां येवोनियां येथ । काय साधिसी कार्यार्थ ।
वाळी गेला नगरांत । निजविजरार्थ साधोनी ॥१११॥
वाळीनें करितां अति निर्वाण । नाहीं ढळलों अणुप्रमाण ।
वरदमाळा दावितां जाण । मूर्च्छापन्न मी पडिलों ॥११२॥
दैवें पडिलें ऋष्यमूकांत । येर्हवीं वाळी करिता माझा घात ।
साह्य नव्हसीच मूर्च्छित । दुःखाभिभूत मज केलें ॥११३॥
मी मूर्च्छित होतां विमुख । पाठीसीं घालोनि निःशंक ।
वाळीसीं नव्हसीच सन्मुख । परम दुःख मज दिधलें ॥११४॥
साह्य होवोनियां करावें सुखी । श्रीराम सत्यवादी तिहीं लोकीं ।
तुवां मज केलें परम दुःखी । तेही लटकी कीर्ति केली ॥११५॥
सुग्रीव देखोनि दुःखाभिभूत । कळवळला श्रीरघुनाथ ।
त्याचें ऐकोनि रुदित । स्वयें बोलत कृपाळु ॥११६॥

सुग्रीव श्रूयतां तात क्रोधश्च व्यपनीयताम् ।
कारणं येन बाणोऽयं न मया विनियोजितः ॥२३॥
अलंकारेण वेषेण प्रमाणेन गतेन च ।
त्वं च सुग्रीव वाली च सदृशौ स्थः परस्परम् ॥२४॥

रामाने कारणाचे स्पष्टीकरण करून सुग्रीवाची खात्री केली :

क्रोध सांडोनि सावधान । सुग्रीवा ऐकें माझें वचन ।
साह्य न व्हावयाचें कारण । झालें विंदान परियेसी ॥११७॥
गुणीं लावोनियां बाण । वाळिचा म्यां घ्यावा प्राण ।
तंव तुम्ही बंधु दोघे जण । समसमान भासलेती ॥११८॥
वस्रें अलंकार आभरण । रुपरेखा समसमान ।
न कळे वाळीचें निजचिन्ह । यालागीं बाण न विंधींच ॥११९॥
न कळोनि बाण विंधितां । जरी तुज मागता अवचितां ।
तरी श्रीरामें मारिलें शरणागता । निजजघन्यता तिहीं लोकीं ॥१२०॥
अवचटें तुज लागल्या बाण । मग म्या त्यजावा कीं आपुला प्राण ।
ऐसें जाणोनियां आपण । शरसंधान न करीचं ॥१२१॥
तुझेनि कैवारें एकाएक । वाळीसीं युद्ध करिता देख ।
तेथेंही थोर आहे अटक । जरी सन्मुख वरदमाळा ॥१२२॥
जो जो युद्ध करी संमुख । वरदमाळा करी विमुख ।
मज नाहीं होणें पराङ्मुख । ते मज अटक युद्धार्थी ॥१२३॥
युद्ध न करावया हेंचि कारण । साह्य व्हावे तंव दोघे समान ।
यालागीं मीं न विंधींच बाण । सत्य जाण सुग्रीवा ॥१२४॥
व्यर्थ कां होसी खेदयुक्त । हा तुझा प्रारब्धयोग निश्चित ।
आणि वाळीचें काहीं आयुष्यप्राप्त । तेणें पदार्थ ऐसा घडला ॥१२५॥
घायें घ्यावया वाळीचा प्राण । आतां मी घेतों धनुष्यबाण ।
मज मारितां न लगे क्षण । युद्धाक्रमण करीं वाळीसीं ॥१२६॥

सुग्रीवाचे समाधान व वालीशी युद्धाची ईर्ष्या :

सुग्रीव म्हणे नाहीं शक्तीं । केंवी मी पाचारूं युद्धार्थीं ।
कृपेनें आलिंगी श्रीरघुपती । अमृतहस्तीं स्पर्शिला ॥१२७॥
आलिंगनमिषें जाण । दिघली निजशक्ती संपूर्ण ।
पहिल्यापेंक्षां शतगुण । आंगवण सुग्रीवा ॥१२८॥
सुग्रीव पाहे सावधान । अंगीं न देघे घाय ना वण ।
पुरती बाणली आंगवण । वाळीसीं कण करावया ॥१२९॥
सुग्री उठे ते काळीं । प्रतापें बोले श्रीरामाजवळी ।
आजि मी लोळवीन वाळी । रणकल्लोळीं विचरुनी ॥१३०॥
ऐसें बोलोनि श्रीरामाजवळी । वेगीं उठिला तत्काळीं ।
युद्ध करावया बळी । उडे अंबरीं सुग्रीव ॥३१॥

या वेळी राम खुणेसाठी सुग्रीवाच्या गळ्यांत गजकमलमाला घालतात :

श्रीरामें पाचारोनि त्यासी । समरुपता तुम्हां दोघांसी ।
युद्धी ओळखावया सुग्रीवासी । घालवी त्यासी गजमाळा ॥१३२॥

गजपुष्पीमिमां फुल्लामुत्पाट्य शुभलक्षणाम् ।
कंठे कुरु त्वं सौमित्रे सुग्रीवस्य महात्मनः ॥२५॥

गजकमळमाळा सुलक्षण । श्रीरामें निर्मोनियां आपण ।
सुग्रीवकंठीं घातली संपूर्ण । ओळखण रणरंगी ॥१३३॥
गजांतलक्ष्मी यावयासी । गजकमळमाळ घातली त्यासीं ।
तेचि ओळखण रणभूमीसीं । वालिवधासी मुख्य मूळ ॥१३४॥
श्रीरामाज्ञा अति समर्थ । माळा न तुटे युद्धाआंत ।
लागतां वीराचे आघात । भंगातीत राममाळा ॥१३५॥
लक्ष्मण विंदोनीं महाबळी । कमळांच्या अष्टदळीं ।
सबाह्य लिहिल्या नामावळी । आर्तुबळी तेणें जाला ॥१३६॥
गुणेंवीण निजकमळा । निर्गुणगुंती गुंफिली माळा ।
घालितां सुग्रीवाच्या गळां । कळिकाळा नावरे ॥१३७॥
सुग्रीवकंठी घालितां माळ । हरिकला वानरांचा पाळ ।
नळ नीळ तार तरळ । सैन्य सकळ समुदावा ॥१३८॥

सुग्रीवाचे उड्डाण व भुभुःकार, वालीला आव्हान :

श्रीराम सौमित्र हनुमंत । सुग्रीव वानरांसमवेत ।
आले किष्किंधेपर्यंत । हर्षयुक्त उल्लासें ॥१३९॥
अति आक्रोशें महाथोर । सुग्रीव करी भुभुःकार ।
ऐकोनि कोपला वाळी वानर । युद्ध दुर्धर करूं पाहे ॥१४०॥
दोघे बंधु क्रोधयुक्त । युद्ध करिती अत्यद्‌भुत ।
वाळी वधील श्रीरघुनाथ । तोही गुह्यार्थ अवधारा ॥१४१॥
एकाजनार्दना शरण । पुढें गोड निरूपण ।
श्रीरामें वाळीउद्धरण । संसारतरण श्रीरामें ॥१४२॥
श्रीरामनामें द्वयअक्षर । क्षराक्षरातित पर ।
रामनाम स्मरे निरंतर । पावन नर तिहीं लोकीं ॥१४३॥
रामनाम पडतां एकाएक । तोहीं तिहीं लोकीं अलोकिक ।
एकाजनार्दनीं होत एक । नित्य निष्टंक श्रीराम ॥१४४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे किष्किंधाकांडे एकाकारटीकायां
सुग्रीव भंगो नाम पंचमोऽध्यायः ॥५॥
॥ओंव्या १४४ ॥ श्लोक २५ ॥ एवं १६९ ॥