Ramayan - Chapter 3 - Part 18 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 18

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 18

अध्याय 18

रावण सीतेला अशोकवनात पाठवतो

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

जटायू मूर्च्छित झाल्यामुळे सीतेला शोक :

जटायूस स्वयें रावण । वधिता जाला करोनि छळण ।
ते देखोनि सीता जाण । झाली आपण अति दुःखी ॥ १ ॥

तं स्वल्पजीवितं भूमौ क्षतजार्द्र जटायुषम् ।
निरिक्ष्य पतितं सीता विललाप सुदुःखिता ॥ १ ॥

जटायूचे उपडितां पांख । भूमीं मूर्च्छित जीव निःशेख ।
त्याचें देखोनियां असुख । परम दुःख सीतेसी ॥ २ ॥
न पवतीच श्रीरामलक्ष्मण । जटायु करितां सोडवण ।
तों त्यासीच आलें मरण । कपटी रावण दुष्टात्मा ॥ ३ ॥
जटायूसी म्हणे आपण । तुझें मज न येचि कां मरण ।
तूं बळियां बळीं संपूर्ण । मजलागीं प्राण वेंचिला ॥ ४ ॥
युद्धीं गांजोनि रावण । माझी केली सोडवण ।
तुझें करोनियां छळण । मारी रावण महापापी ॥ ५ ॥
ऐसें बोलोनि सुंदरी । लल्लाट पिटी निजकरीं ।
जो होय माझा साह्यकारी । तो निशाचरीं मारिजे ॥ ६ ॥
वेगीं पावता श्रीरघुनंदन । तरी तुझा वाचवित प्राण ।
माझी करिता सोडवण । रणीं रावण मर्दोनी ॥ ७ ॥
जटायु सबळ धांवणे करी । जटायु माझा साह्यकारी ।
जटायु माझा निजकैवारी । तोही निशाचरीं मारिला ॥ ८ ॥
रावण विचारी मानसीं । चराचर साह्य श्रीरामासी ।
भलता सोडविल सीतेसी । शीघ्र लंकेसी हे न्यावी ॥ ९ ॥
शंकरें टाळिलें जटायुविघ्न । आणि उठलिया आन ।
मज न ठाके लंकाभुवन । शिघ्र गमन करावें ॥ १० ॥

तां क्लिष्टमाल्याभरणां विलपन्तीमनाथवत् ।
अभ्यधावत वैदेहीं रावणो राक्षसाधिपः ॥ २ ॥
क्रोशंती राम रामेति रामेण रहितां वने ।
जावितांताय केशेषु जग्राहान्तकसंनिभः ॥ ३ ॥

रावणाला रामांच्या सामर्थ्याची सीता जाणीव देते :

केलिया जटायूच्या घाता । दुःखभरें आक्रंदे सीता ।
तिसी धरावया मागुता । होय धांवा लंकानाथ ॥ ११ ॥
रावणासी म्हणे सीता । तूं मला लंकेसी नेतां ।
करविसी राक्षसांचे अंता । तूं निजघाता पावसी ॥ १२ ॥
जटायूसीं करितां रण । तुवां धरिले दातीं तृण ।
तेथें आलिया श्रीरामबाण । कुळनिर्दळण तुजसहित ॥ १३ ॥
कासया समुद्र अचाट । कायसें लंकेचें त्रिकूट ।
बाणें एकें करील पीठ । तुजसगट राक्षसां ॥ १४ ॥
ऐसें बोलतां सीतेसीं । कोप आला रावणासी ।
मग धांवोनि धरली केशीं । जेंवी जीवांसी अंतक ॥ १५ ॥

सीतेला धरताना तिच्या हिसक्याने रावण खाली पडतो :

रावणें धरतांची सीता । रागें लोटी लंकानाथा ।
तंव चांचरोनि पडे पालथा । धांवे मागुता धरावया ॥ १६ ॥
जेंवी भेकापासीं आलिया सर्प । तेंवी सर्वांगीं होय कंप ।
देखोनि सीतेचा प्रताप । अति कंप रावणा ॥ १७ ॥
युद्धा प्रवर्तलिया सीता । मज नाटोपे सर्वथा ।
ऐसें कळलें लंकनाथा । श्रीरामकांता दुर्धर ॥ १८ ॥

वीस हातांनी तिला धरुन त्याचे पुढे प्रयाण :

ऐसें रावणें विचारोनि मनीं । विसां भुजीं आकळोनी ।
सीता धरिली आंवळोनी । जेंवी कां स्वप्नीं निधान ॥ १९ ॥
मज सीता जाली प्राप्त । रावणाचा मनोरथ ।
स्वप्नप्राय अवघा व्यर्थ । तोही कथार्थ अवधारा ॥ २० ॥
जरी निर्बळ असती सीता । तरी रावण बलात्कारें भोगिता ।
तिची जाणोनि सबळता । होय प्रार्थिता शरणार्थी ॥ २१ ॥
रावणापासोनि सीता । क्षण न लगे स्वयें सुटतां ।
परि निर्दळावया दुष्टां समस्तां । निजहरणार्था आक्रंदे ॥ २२ ॥
पुढील रामायणी कथा । दुसरेनि रावण हरी सीता ।
उल्लास राक्षसाचे चित्ता । लंकेस नेता तो होय ॥२३॥

खमुत्पतंतं तं दृष्ट्वा मैथिली जनकात्मजा ।
दुःखिता परमोद्विग्ना भये महति वर्तिनी॥ ४ ॥

रथ भंगिला तो जटायून । नाहीं आणविलें विमान ।
गगनगति दशानन । सीता घेवोन निघाला ॥ २४ ॥
सीता सोडविली जटायून । तेणें सूखी जाले ऋषिजन ।
सवेंचि तिचें करितां हरण । तपोधन तळमळती ॥ २५ ॥
जळचर भूचर खेचर । जंगम आणि स्थावर ।
तळमळती जीवमात्र । सीता दशवक्त्र नेताचि ॥ २६ ॥
सीता निजखांदी घेऊन । खेचरगतीं निघे रावण ।
ठाकावया लंकाभुवन । सवेग आपण निगाला ॥ २७ ॥

आपला शोध लागवा म्हणून सीता अलंकार टाकीत जाते :

तो मार्ग कळावया श्रीरामासी । सीता सांडी निजचिन्हांसी ।
मार्गोमार्गी निजमाळेसीं । सांडी सुमनांसी मार्गार्थ ॥ २८ ॥
श्रीराम येईल धांवणियासी । ही आशा सीतेचे मानसीं ।
यालागीं मार्गामार्गासीं । प्रदेशोप्रदेशीं चिन्हें सांडी ॥ २९ ॥
उल्लंघोनि महापर्वत । पंथ क्रमिला महादुस्तर ।
शुद्धि पावावया श्रीरघुनाथ । वस्त्रें शुद्ध्यर्थ सीता सांडी ॥ ३० ॥

ह्रियमाणा तु वैदेही कंचिन्नाथमपश्यती ।
ददर्श गिरिशृंगस्थान्पंचवानरपुंगवान ॥ ५ ॥
तेषां मध्ये विशालाक्षी कौशेयं कनकप्रभम ।
उत्तरीयं वरारोहा शुभान्याभरणानि च ।
मुमोच यदि रामाय शंसेयुरिति भामिनी ॥६॥

लंघोनि पर्वतां थोराथोरां । कृष्णा वेण्या तुंगभद्रा ।
नदिया लंघोनि दुस्तरा । लंकापुरा मज नेतो ॥ ३१ ॥
धांवण्या न येववे श्रीरघुनाथा । कोणी न देखें सोडविता ।
ऐसे जाणोनियां सीता । परम चिंता पावली ॥ ३२ ॥

एका पर्वतावर पाच वानर बसलेले पाहून सीता उत्तरीय वस्त्रात अलंकार बाधून खाली टाकतेः

युद्धि सांगावया श्रीरामचंद्रा । भोवतें पाहे श्रीरामभद्रा ।
पर्वतमाथां पंच वानरा । देखे सुंदरा दुरोनि ॥ ३३ ॥
श्रीरामाचे जीवप्राण । वानर होती पांचही जण ।
सीता जाणोनि संपूर्ण । वस्त्राभरण तेथें त्यागी ॥ ३४ ॥
वस्त्राभरणें वरिचेवरी । सीता सांडी हे नव्हे चातुरी ।
जाणोनि अवताराची थोरी । त्यागी सूंदरी शुद्ध्यर्थ ॥ ३५ ॥
पीतांबर कनकशोभा । दिव्यालंकारांची प्रभा ।
शुद्धि सांगावया निजवल्लभा । पद्मगर्भा स्वयें सांडी ॥ ३६ ॥
नीळ पीत आरक्त देखा । पहातसे मज सन्मुखा ।
वानरांमाजी तो माझा सखा । तो रघुकुळटिळका सुद्धि सांगो ॥ ३७ ॥
श्रीरामनामांकित खेवणें । करमुद्रिका करकंकणें ।
पीतांबरीं बांधोनि तिनें । सुद्धिकारणें सांडिली ॥ ३८ ॥

ते अलंकार हनुमंताच्या हातात पडतातः

सीतेने वरुनि सांडितां । तीं आलीं हनुमंताच्या हाता ।
तेणें वंदोनिया माथां । होय सांगता सुग्रीवा ॥ ३९ ॥
तंव सुग्रीव म्हणे हनुमंतासी । हें तू ठेवीं आपणापासीं ।
कैचें आले पां आकाशीं । विस्मयो त्यासी वाटत ॥ ४० ॥
सभाग्यें भाग्य ज्याचे माथां । श्रीराममुद्रा ये त्याचे हाता ।
उल्हास हनुमंताच्या चित्ता । श्रीरामकार्यार्था उद्यत ॥ ४१ ॥

सीतेचा अक्रोश; हनुमंताचा संताप व उड्डाण :

श्रीरामा वेगीं धांव पाव । ऐसा ऐकतां सीतारव ।
मग अवघे वानर मानिती अपूर्व । जे नभीं कोण रव अनुवादे ॥ ४२ ॥
श्रीरामनामामृतगोष्टी । उठती नभाचिये पोटीं ।
अवघे पाहती ऊर्ध्वदृष्टीं । परी वदतां दृष्टीं लक्षेना ॥ ४३ ॥
व्यक्ताक्षरें ऐकों येती कानीं । परी वदता न देखों नयनीं ।
जरी मानूं आकाशवाणी । तरी आक्रंदोनि अनुवादत ॥ ४४ ॥
ऐकोनि सीताआक्रंदन । आलें हनुमंता स्फुरण ।
मग तिची करावया सोडवण । नभीं उड्डाण करुं पाहे ॥ ४५ ॥
दोन्ही वळोनि वज्रमुष्टी । पाहे वटारिलिया दृष्टीं ।
रागें थरकत पुसाटी । भूमी आपटी सक्रोध ॥ ४६ ॥
निर्दळावया दशवदन । काळाग्निरुद्र देदीप्यमान ।
सगळें निळों पाहे गगन । भ्यासुर वदन भासत ॥ ४७ ॥
निवटावया दशशिरा । दांत खातसे करकरा ।
रोम बाहु थरकती थरथरां । कोप वानरा अनिवार ॥ ४८ ॥

ते पाहून रावणाने तळात जाऊन लंकेत प्रवेश केला :

करितां वानरे उड्डाण । गेले ध्रुवलोकासमान तंव तळीं पळाला रावण ।
सीता घेवोनि लंकेसी ॥ ४९ ॥
ऐसें हनुमंतें देखतां दृष्टीं । रावण भय घेवोनि पोटीं ।
समुद्राचें परतटीं । उठाउठीं पळाला ॥ ५० ॥
जटायूपीस अति दारुण । येथेंही उठों पाहे विघ्न ।
तेणें धाकें पलायमान । लंकाभुवन ठाकिले ॥ ५१ ॥

रावणाकडून सीतेला विवाहाबद्दल आग्रह, भावी सुखाची प्रलोभने :

लंकेसी गेला लंकानाथ । हनुमंतें क्रोध केला शांत ।
लंका जाळीन निमेषांत । हें पोटांत दृढ धरिलें ॥ ५२ ॥
राक्षसधुरांचिया कोडी । मारीन न लागतां अर्ध घडी ।
ऐसिया कोपाची चौघडी । सांतिबुडीं सांठविली ॥ ५३ ॥
तंव येरीकडे लंकानाथ । सीता मज जाली प्राप्त ।
येणें उल्लासें नाचत । येथे रघुनाथ केंवी पावे ॥ ५४ ॥
अति दुर्घट लंकागड । भोंवता समुद्राचा अगड ।
न चले रामाची चरफड । मार्ग अवघड येथें यावया ॥ ५५ ॥
रावण सांगें सीतेप्रती । तुज म्यां आणिलें नभोगती ।
श्रीरामलक्ष्मण पदाभिगती । कैसेनि येती यां ठाया ॥ ५६ ॥
क्रूर श्वापदें वनीं वसती । मार्गा दुर्घट पर्वतीं ।
दुस्तर सरितांचे स्रोती । केंवीं रघुपत येऊं पावे ॥ ५७ ॥
ऐसेनि आलिया कष्टकोडी । दोघे मानवें बापुडीं ।
मज मारितां न लगे घडी । त्यांची गोडी तूं सांडीं ॥ ५८ ॥
त्या दोघांसी चारी भुजा । मज एकलिया वीस भुजा ।
मी मारीन श्रीरामराजा । निजपैजा जानकिये ॥ ५९ ॥
यापरी वो विचारितां । येथें न येववे श्रीरघुनाथा ।
तूं मज वरुनि आतां । राज्यभोगता सुखें भोगीं ॥ ६० ॥
अनर्ध्यरत्‍नांचे अलंकार । वस्त्रें दिव्यें मनोहर ।
पदकमेखळा गंभीर । विचित्र हार मणिमय ॥ ६१ ॥
चंदन आणि कृष्णागरु । कस्तूरी कुंकुम केशरु ।
विलेपनें सुख अपारु । सुखसेजारु सुमनांचा ॥ ६२ ॥
दोघे बैसोनि विमानीं । क्रीडा करुं नंदनवनीं ।
अथवा लंकेचे भुवनीं । अशोकवनीं सुख भोगूं ॥ ६३ ॥
इंद्रादिक सुरवर । करीन तुझे आज्ञेचे किंकर ।
मंदोदर्‍यादि अंतःपुर । त्या निरंतर तुझ्या दासी ॥ ६४ ॥
कायसी मृगाची कांचोळी । कंचुक्या लेई मुक्ताफळी ।
अर्धचंद्र लेईं तो भाळीं । मस्तकीं जाळी गजमुक्त ॥ ६५ ॥
श्रीरामप्रिया भोगीं दशशिर । हा तुझ ब्रीदाचा तोडर ।
रावणें हरिली सीता सुंदर । हा चरणीं गजर अंदुवांचा ॥ ६६ ॥
सीता रावणाची पट्टराणी । ऐसिया वांकी गर्जती चरणीं ।
ऐकोनि रावणाची वाणी । सीता संतापोनी बोलत ॥ ६७ ॥

सीतेकडून रावणाचा धिक्कार, राम-रावणाची तुलना व त्याची निर्भर्त्सना :

मर मर निर्लज्जा दशशिरा । काय बोलतोसी चिकुरा ।
तुजसारिखा निलाजिरा । जगीं दुसरा असेना ॥ ६८ ॥
स्वयंवरीं दावितां बळबड । धनुष्यें दंडिलें वितंड ।
सभेंत जालें काळें तोंड । श्रीरामें कोदंड भंगिता ॥ ६९ ॥
तै न करिसीच माझें हरण । काळें वदन पलायमान ।
तूं तंव शूर्पणखेसमान । नाकेंवीण जल्पसी ॥ ७० ॥
सदाचे तुझें काळें मुख । न राहवेचि रामासन्मुख ।
माझा धरोनि अभिलाख । मागों भीक आलासी ॥ ७१ ॥
भीक मागतां म्हणसी जननी । आणि अतां म्हणसी करीन पत्‍नी ।
तुजसारिखा मातृगमनी । आन त्रिभुवनीं असेना ॥ ७२ ॥
संन्यासी आणि चोरी करी । यतिधर्मीं आणि परद्वारी ।
हे तुजचि साजे गा थोरी । तूं नानापरी मातृगमनी ॥ ७३ ॥
करितां जटायुसीं रण । तुवां दाती धरिलें तृण ।
मज सांडोनि पलायमान । तेंव्हां आंगवण काय जाली ॥ ७४ ॥
घालितां श्रीरामाची आण । जटायु बोलिला सत्य वचन ।
तुवा कपतें करोनि छळण । घेतला प्राण जटायूचा ॥ ७५ ॥
माझा भोग भोगूं पाहे रावण । तेंही अधर्म्या अति दूषण ।
वायसां विष्ठेचे भक्षण । आणि अमृतपान चकोरा ॥ ७६ ॥
तैसी सीता श्रीरामासी । रावणा उपभोग राक्षसी ।
अभिलाषितां जानकीसी । अनायासीं मरसील ॥ ७७ ॥
गजाचें जें आभरण । तें रासभा गालितां ये मरण ।
तैसी सीता अभिलाषितां रावण । कुळनिर्दळण पावेल ॥ ७८ ॥
सकळ रस सेवितां मासी । परी दीप चाखितां मरण तीसीं ।
तेंवी राज्य भोगितां रावणासी । सीताभिलाषीं प्राणांत ॥ ७९ ॥
स्तनपनींच्या अपत्या । उत्तम पक्वान्नें सेवितां ।
तें त्यासि न जिरे सर्वथा । तेंवी लंकानाथा जानकी ॥ ८० ॥
जरी जाले अनर्घ्य रत्‍न । तरी तें नव्हे शाळिग्रामासमान ।
तैसी सीता श्रीरामभोगायतन । ते दशानन केंवी पावे ॥ ८१ ॥
ऐरावती बैसे इंद्र । तेथें बैसों जातां मरे खर ।
सीताभिलाषीं दशवक्र । सकुळगोत्र निमेल ॥ ८२ ॥
सुंदरा आरसा सुखरुप । तोचि सिमुरा दावितां अति संताप ।
रावणाआंगीं सिमुरें पाप । सीता सुखरुप त्या नव्हे ॥ ८३ ॥
ऐसिया नाना सवर्म युक्ती । रावणा निर्भत्सीं सीता सती ।
तेणें कोपला लंकापती । मग दूतांप्रती बोलत ॥ ८४ ॥

संदिश्य राक्षसान्घोरान्सवणोऽष्टौ महाबलान् ।
आत्मानं बुद्धिवैक्लव्यात्कृतकृत्यममन्यत ॥ ७ ॥
अप्रमादाच्च गन्तव्यं गन्तव्यं सवैरेव निशाचरैः ।
कर्तव्यश्च सदायत्‍नो राघवस्यवधं प्रति ॥ ८ ॥

राक्षसांमाजी बळी संपूर्ण । कपटकर्मी अति प्रवीण ।
ऐसे बोलावोनि आठ जण । स्वयें रावण सांगत ॥ ८५ ॥
तुम्ही दुर्धर निशाचर । होवोनि जनस्थानीं एकत्र ।
रामवधार्थी निरंतर । अति सादर रहावें ॥ ८६ ॥

कपटकर्मप्रवीण अशा चौदा राक्षसांना रामांवर हल्ला करण्यासाठी पाठवितो :

मारिलें त्रिशिरा दूषण खर । त्या रामा आणि आम्हां बद्धवैर ।
तदर्थी तुम्ही आठही वीर । साढावें छिद्र अति यत्‍नें ॥ ८७ ॥
सन्मुख युद्ध करितां त्यासीं । जिवें मारील समस्तांसी ।
यालागीं अति गुप्तवेंसीं । त्याचे वधासी साधावें ॥ ८८ ॥
मारुं जातां श्रीरघुनंदन । तुम्हांसी निर्दळील लक्ष्मण ।
एकेच वेळे दोघे जण । साधोन आपण वधावे ॥ ८९ ॥
निजले असतां वनीं । निदसुरे मारावे दोन्ही ।
कां आसनीं भोजनीं शयनीं । उदकपानीं साधावे ॥ ९० ॥
पडल्या श्रीरामाचें दृष्टीं । मग जिण्याची कायसी गोष्टी ।
आठांचीही शिरें निवटी । शरवृष्टिप्रतापें ॥ ९१ ॥
यालागीं आपणां लपवोनी । जनीं विजनीं गमनागमनीं ।
सीताशुद्धि पाहतां वनीं । सितरोनी मारावे ॥ ९२ ॥
छळें बळें कपतमेळें । दोघे मारावे एके वेळे ।
तदर्थी तुम्हीं प्रबळें । स्वकार्य समूळ साधावें ॥ ९३ ॥
मारिल्या रामलक्ष्मण । तुम्हांसी दिधलें जनस्थान ।
तेथें नांदावे आपण । ढोल निशाण लावोनी ॥ ९४ ॥

नंतर रावणाने अत्युत्तम सजविलेल्या रंगमहालात सीतेला नेली :

ऐसें सांगोनिया त्यांसी । रावण आला सीतेपासीं ।
तीस न्यावया निजभवनासी । गृहें चौपासीं शृंगारिलीं ॥ ९५ ॥
गुढिया तोरणें विचित्र । मखरें शोभती मनोहर ।
सीता देखोनि मंदिर । मज अनुसरें तैसे करा ॥ ९६ ॥
रावणें हातीं धरोनि सीता । मंदिरें दाखवी अपूर्वता ।
दावोनि आपली समर्थता । अति अकांता आणिली ॥ ९७ ॥
पाहता कोणी न देखे दृष्टीं । आणि दुजयाची न पडे दृष्टी ।
ऐसिया अकांता गोरटी । उठाउठीं आणिलीं ॥ ९८ ॥

आत्मविश्वासी सीता निर्भयपने महालात जाते :

रावणासवें अति एकांता । निःशंक आलिसे सीता ।
हा मज झालिया झोंबता । लंकानाथा उपटीन ॥ ९९ ॥
शुंभ निशुंभ चंडमुंड । जेंवी जगदंबा करी दुखंड ।
तेंवी रावणाचें बळबंड । खंडविखंड करीन मी ॥ १०० ॥
श्रीरामसेवेचें धडफुडें । माजें अंगी बळ गाढें ।
रावण दहा मुखाचें किडे । मजपुढें केवीं झोबें ॥ १ ॥
विसां भुजांतें वामकरें । दडपोनियां निजभारें ।
सकुंडल दाही शिरें । चमत्कारें खुडीन ॥ २ ॥
याचीं छेदावया कंठनाळे । कां लागलीं शस्त्रबळें ।
नखें खुडीन शिरकमळें । रावण केवळ तृण जैसें ॥ ३ ॥
आलिया इंद्रजित कुंभकर्ण । मारीन चडकणानें हाणोन ।
कुमार सेना आणि प्रधान । निर्दळीन क्षणमात्रें ॥ ४ ॥
माझें लंकेसी आगमन । रावण निर्दळाव्या ससैन्य ।
तें एकांतीं फावलिया पूर्ण । भीड कोण राखील ॥ ५ ॥
श्रीरामसेवाफळ संपूर्ण । निर्दळावें द्वंद्व दारुण ।
ते ज्याचेनि नव्हे जाण । भक्तपण त्या नाहीं ॥ ६ ॥
सीता श्रीरामनिजशक्ती । ते केंवी आकळे रावणाहातीं ।
येणें बळें सीता सती । आली एकांती निःशंक ॥ ७ ॥

सीतेचे अद्भुत सामर्थ्य लक्षात घेऊन रावण सीतेच्या पाया पडून भोगाची याचना करतो :

सीता नाकळे निजबळें । हे रावणासी समूळ कळे ।
मग विषयाचे प्रीतिमेळें । चरणकमळें वंदिलीं ॥ ८ ॥

एतौपादौमया स्निग्धौ शिरोभिः परिपीडितौ ।
प्रसादं कुरु मे क्षिप्रं वश्यो दासोऽहमस्मि ते॥ ९ ॥
एमाःशून्या मया वाचःशुष्यमाणेन भाषिताः ।
न चापि रावणः कांचिन्मूर्धा स्त्रीं प्रणमेतह ॥ १० ॥

सीता आणोनी एकांता । रावणें चरणीं ठेविला माथा ।
मज विषयशरणागता । कृपा तत्वतां करीं सीते ॥ ९ ॥
त्यजोनियां श्रीरघुनाथा । मज वरावें तुवां तत्वतां ।
माझी वाचा न करीं वृथा । शरणागता नुपेंक्षी ॥ ११० ॥
तुझीं वंदितां चरणकमळें । मस्तकीं लागलीं वो कोमळें ।
करस्पर्शनीं अति मवाळे । मन कळवळे भोगार्थी ॥ ११ ॥
जिचे चरण सुखरुप । तिचें भोगितां स्वरुप ।
मज येईल सुख अमूप । कृपानुरुप वरीं मातें ॥ १२ ॥
मी तंव अतिगर्वी रावण । ब्रह्मादि देवां नव्हें शरण ।
दानवमानवां पाड कोण । तो मी तुझे चरण वंदितों ॥ १३ ॥
चरण वंदोनियां देख । होईन वशवर्ती सेवक ।
अनुदिनीं तुझा आज्ञाधारक । कृपायाचक भोगार्थीं ॥ १४ ॥
सीतेचे चरण धरोनि हातीं । रावण येतसे काकुळती ।
मज अंगीकारीं भोगार्थी । तंव सीता सती हांसली ॥ १५ ॥

अत्यंत तुच्छतेने झीडकारुन सीता त्याचा उपहास करते :

सुरवरां वंद्य श्रीरामचंद्र । त्यापुढें तुच्छ राक्षसेंद्र ।
सांडोनियां गजेंद्र । आरोहणा खर तैसा तूं ॥ १६ ॥
सांडोनिया अमृतपान । करावें कागविष्ठाभोजन ।
तेंवी त्यजोनि श्रीरघुनंदन । तुच्छ रावण भोगावा ॥ १७ ॥
सांडोनियां सत्संगती । बैसावें सूकराचे पंक्तीं ।
तेंवी त्यजोनियां श्रीरघुपती । रावण दुर्मती भोगावा ॥ १८ ॥
कागाघरीं श्राद्धविधान । तेथें विष्ठेने पितृतर्पण ।
तें न स्वीकारिती ऋषिजन । तें सेवन कागाचें ॥ १९ ॥

त्यामुळे रावण क्रुद्ध होऊन तिला धमकी देतो व रामलक्ष्मण मेल्याचे खोटे सांगतो :

ऐकोनि सीतेचें वचन । रावण कोपला दारुण ।
तुज श्रीरामाचें दर्शन । कल्पांतीं जाण हों नेदीं ॥ १२० ॥
तुज श्रीरामा नव्हेचि भेटी । तुज त्यांसी करों नेदीं गोष्टी ।
तुज श्रीरामा देखो नेदीं दृष्टीं । मी महाहट्टी रावण ॥ २१ ॥
सीते ऐकें सावधान । तुज मी वधीन आपण ।
कां तुज मी कुजवीन । जंव तूं शरण मज येसी ॥ २२ ॥
तज नेदीं अन्नपान । नेदीं अभ्यंगादि मर्दन ।
तुज नेदीं शय्या सुखासन । जंव तूं शरण मज येसी ॥ २३ ॥
मस्तकीं जीव पडती भारी । वस्त्रें लागती वज्रापरी ।
तुज मी पीडिन तंववरी । जव तूं अंतुरी होसी माझी ॥ २४ ॥
पैल पाहे इंद्रजित कुंभकर्ण । कोत्यनुकोटी राक्षसगण ।
कुमार प्रधान अति दारुण । मशक कोण श्रीराम ॥ २५ ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । ते तेव राक्षसांचें भक्षण ।
तुझीं कोण करील सोडवण । आग्रही पूर्ण तूं मूर्ख ॥ २६ ॥
माझे राक्षसांही घालोनि घाला । राम लक्ष्मण गेला मेला ।
सीते अंगिकारीं मजला । सांडीं आपला दुरागहो ॥ २७ ॥
पापभोगाचियें राशीं । वनी कष्टलीसी रामासरिसीं ।
परम पुण्यें लंकेशासी । भोगीं सुखासीं जानकीये ॥ २८ ॥
पाप असेल तुझिये माथां । तरि सांडिसील लंकानाथा ।
भोगूं म्हणती श्रीरघुनाथा । तरी तो सर्वथा निमाला ॥ २९ ॥

सीतेकडून पुनः निर्भत्सना :

ऐकोनि रावणाचें बोलणें । सीता हांसिली सत्राणें ।
तूं मज भोगावयाकारणें । मरणा धरणें बैसलासी ॥ १३० ॥
पतंगें आकळितीं दीपासी । जळोनि मरे स्नेहसंगतीसीं ।
ते तुज दशा रावणासी । भद्भोगेंसीं मरणार्थ ॥ ३१ ॥

ततासुस्त्वं गतश्रीको गतसत्वो गतेंदियः ।
लंका वैधव्यसंयुक्ता त्वत्कृते न भविष्यति ॥ ११ ॥
स हि देवरसंयुक्तो मम भर्ता महाद्युतिः ।
जिर्भयो वीर्यमाश्रित्य शून्ये वसति दंडके ॥ १२ ॥
स ते वीर्यं बलं दर्पमुत्सेकं च यथाविधम् ।
व्यपनेष्यति गात्रेभ्यः शरवर्षेण संयुगे ॥ १३ ॥

रामबाणांनी तुझा समूळ संहार होईल असे सीता त्याला बजाविते :

करितां परदारेची चोरी । गेले आयुष्य यश कीर्ती श्री ।
लंकावैधव्याची परी । बैसेल निखरी तुझेनि ॥३२ ॥
मारिलें म्हणसी श्रीरघुनाथा । हे तंव तुझी मिथ्या वार्ता ।
श्रीराम काळाचा नियंता । ऐकें आतां सांगेन ॥ ३३ ॥
नेणसी श्रीरामाची थोरी । मृत्यु श्रीरामाची आज्ञा वरी ।
सकुळ मरण दशशिरीं । मग बोहरी राक्षसां ॥ ३४ ॥
श्रीरामबाण अति तिखट । धाकें समुद्र देईल वाट ।
भेदील गिरि त्रिकूट । दाहीं कंठ छेदील ॥ ३५ ॥
इंद्रजित सबळ बळप्रवीण । क्षणार्धे मारील लक्ष्मण ।
कुमर वीर प्रधान सैन्य । घायें प्राण जातील ॥ ३६ ॥
निदसुरा कुंभकर्ण । रणीं हरवील नाक कान ।
लागतां श्रीरामाचा बाण । उभ्याच प्राण सांडील ॥ ३७ ॥
ऐसें बोलोनियां सीता । क्षोभें पाहे लंकानाथा ।
त्यासी चळकांप सुतला चित्ता । दुर्धर दूतां पाचारी ॥ ३८ ॥

सीतेचा रुद्रावतार पाहून रावण घाबरतो व तिला अशोकवनात पाठवतो :

म्हणे इसीं भला नव्हे एकांत । क्षोभें करील माझा घात ।
विचारीं पडला लंकानाथ । खृतकार्यार्थ साधेना ॥ ३९ ॥
भोगिली न वचे बळात्कारीं । पायां पडल्या नांगीकारी ।
सीता पतिव्रता खरी । राज्यभोगावरी भुलेना ॥ १४० ॥
सीता सती पतिव्रता । सत्य मानले लंकानाथा ।
आपलीया निजस्वार्था । होय राखता जानकी ॥ ४१ ॥
त्रिजटा रावणाची भगिनी । गुज सांगे तिचे कानीं ।
सीता नेवोनि अशोकवनीं । सावधानी राखावीं ॥ ४२ ॥
अशोकवन ऐकतां गोष्टी । बांधी सीता शकुनगाठीं ।
शोक पळाला उठाउठीं । होईल भेटी श्रीरामा ॥ ४३ ॥
अशोकवन ऐकोनि कानीं । अशोकवन देखें नयनीं ।
अशोक श्रीरामहृदयभुवनीं । सीता तत्स्थानीं राखिली ॥ ४४ ॥
सीता राखिली अशोकांत । अशोकामाजी श्रीरघुनाथ ।
तीपासीं असे तो सतत । सावधानार्थ सुखरुप ॥ ४५ ॥
एकाजनार्दना शरण । सीता प्रवेशली अशोकवन ।
अशोकीं नाहीं शोकबंधन । सीता तें स्थान पावली ॥ १४६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
सीताअशोकवनप्रवेशो नाम अष्टादशोऽध्याय ॥ १८ ॥
॥ ओव्या १४६ ॥ श्लोक १३ ॥ एवं १५९ ॥